ऋणानूबंध…..

दिड वर्षापुर्वी ’सहजच’ सुरू केलेला हा उद्योग …… आजची ही ९० वी पोस्ट….. सुरूवात चाचपडत केलेली, मग काही निबंधछाप, काही रटाळ तर काही बऱ्या पोस्टा लिहीत आजवर पार पडलेला हा प्रवास!!! रोजच्या जीवनातले साधेसे प्रसंग, कधी वाचलेल्या पुस्तकांबद्दलचे मत, कधी काही मतं काही आठवणी या लहानश्या भांडवलावर आजवर केलेले लिखाण…. गृहिणीचा जॉब पार पाडताना कूठून आणणार लिखाणात वैविध्य असा एक प्रश्न खूप सुरूवातीला पडला होता…… तरीही लिहीत गेले…. जे जसे वाटले तसे, सुचले तसे!!!

महेंद्रजी, नचिकेत, अनिकेत, श्रीताई अश्या एक एक ओळखी होऊ लागल्या …… मग रोहन, शिनू, गौरी, सुहास, देवेंद्र, रविंद्रजी,पेठेकाका, हेरंब, बाबा, योगेश, माऊ, आनंद,विशाल,सोनल, दीपक अशी ही ओळखीची यादी वाढत गेली. तरिही या जुनपर्यंत यापैकी प्रत्यक्ष कोणाशी बोलण्याचे, भेटण्याचे योग काही जूळलेले नव्हते….हे तर झाले ब्लॉगर्स पण प्रतिक्रीयांची आत्तापर्यंत असलेली संख्या जवळपास २००० आहे…. त्यातल्या काही माझ्या वगळल्या तरी निदान १५०० पेक्षा जास्त अपरिचितांनी असा स्नेह नक्कीच व्यक्त केलेला आहे!!!

यावेळेसची सुट्टी मात्र अगदी आगळी वेगळी झाली….. सुखद अनुभव सगळे एक से एक!!! आत्तापर्यंत जे जे मित्रमंडळी भेटत होते ते सगळे आधिपासून ओळखीचे, प्रत्यक्ष पाहिलेले भेटलेले होते…… यावेळी मात्र तसे नव्हते….. ज्यांना भारतभेटीत भेटायचे ठरवत होते त्यांची ओळख अप्रत्यक्ष होती……

भारतात गेल्यावर दुसऱ्याच दिवशी विशालचा, माऊचा, श्रीताईचा फोन आला….. आणि सुरू झाले माहेराचे गाणे आणि ब्लॉ्गर्स ऋणानूबंधाची सुरूवात!! विशालच्या फोनने प्रत्यक्ष एकमेकांशी बोलायला सुरूवात झाली तरी भेट मात्र अजुन कोणाशी झालेली नव्हती.

पहिली भेट झाली ती श्रीताईच्या आईबाबांशी, लेकाच्या मुंजीसाठीचे निमंत्रण द्यायला येते असे काकुंना कळवले पण वेळेअभावी जाणे झालेच नाही…. तरिही काका- काकू मुंजीला आलेच आणि केवळ आलेच नाहीत तर घरचे एक होऊन सगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहिले!!! मुंजीनंतर काका-काकुंना भेटायला निवांत गेलो आणि जाणवले की श्रीताई आणि आपल्यात असलेले हजारो मैलांचे भौगोलिक अंतर प्रत्यक्ष नात्यातल्या जिव्हाळ्यात कणाचाही अडसर करत नाहीये…… प्रेमाचा, आपुलकीचा, आशिर्वादाचा मोठा साठा काका-काकुंकडून घेऊन निघालो यावेळेस भारतातून…. मुलांनाही हे आजी-आजोबा खूप आवडले!!!पोहे, पन्हे आणि अतिशय मेहेनतीने सायीत केलेल्या वड्या काकूंकडे खाल्या आणि श्रीताईच्या चविष्ट ब्लॉगचे रहस्य समजले!!!

एकीकडे सगळ्या भावंडांशी फोनाफोनी सुरू होती तशीच ब्लॉगर्सशीही बोलणी सुरूच होती….. वेध लागले होते सगळ्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे…… आणि आली सिंहगड वारी…… आनंद काळे (याचे नाव सगळ्यात आधि … सिंहगडाच्या पायथ्याशी या मावळ्याची लढाई पाहिलीये मी 🙂 ), देवेंद्र, सुहास, सचिन, आनंद, भारत, अभिजी्त, विद्याधर, अनुजाताई आणि पेठेकाका आणि अस्मादिक सगळ्यांची अतिशय अनौपचारिक भेट….. सगळेच एकमेकांना पहिल्यांदा भेटत होते…… मुंबई-पुण्याच्या ब्लॉगर्स भेटीत यायला न जमलेले आमच्यातले काही आणि त्या भेटीत असलेले काहीजण….. मजा , धमाल आली एकदम!!! सिंहगड वारीबद्दल मुलांनी पोस्टा टाकलेल्या आहेतच….. २/३ तासांची उणिपुरी भेट ती, पण नाते हे ओळखींच्या कालावधीवर, भेटींच्या संख्येवर अवलंबून नसते हे जाणवून देणारी!!

ताई….. माझा अत्यंत आवडता शब्द….. आई शब्दाशी साम्य असणारा….. आम्हा भावंडांमधे सगळी माझ्यापेक्षा जास्तीत जास्त २/३ वर्षाने लहान असली तरी मी सगळ्यांची ताई आहे….. नव्या दम्याच्या ब्लॉगर्सच्या फळीबाबतही मला तेच नाते पुन्हा मिळालेय….. याचा अर्थ मी खूप जुनी आहे ब्लॉगिंगमधे असे नाही तरिही जरा का होईना सिनियर म्हणजे सिनीयरच असतो!! 🙂

सिंहगडावर भेटल्यानंतर ८ दिवसाने विद्याधर पुन्हा मिलानला परतला, तारखेचा घोळ झाल्याने त्याला फोन केला तोवर हे महाशय मिलानात पोहोचलेले होते!! पण फोनवर गप्पा मारायला मिळाल्या काका-काकुंशी ….. मनमोकळ्या गप्पा मारल्या काकूंशी आणि समाधानाने फोन ठेवला!!! महेंद्रजी, रोहन यांना भेटायला मिळणार नाहीये ही रुखरूख मनात होती ….. त्यातच महेंद्रजी ना्सिकला येताहेत असे समजले… लगेच त्यांना फोन केला आणि भेटायला गेलो…… इथेही अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार होते…… गप्पा केवळ महेंद्रजींशीच नाहीत तर संध्याताईंशीही (महेंद्रजींच्या बहिणाबाई) मारायल्या मिळाल्या!! “तुझा ब्लॉग मला आवडतो, पण जरा रेग्युलर लिहीत जा” असे संध्याताई म्हणाला आणि माझ्या एक-दोन लेखांबद्दल बोलल्या….. खरचं “और क्या चाहिये” अशी गप्पांची मैफिल होती ती!!!! गौरी आणि ईशानला जसे सिंहगडावरचे मामा खूप आवडले तसे खिशामधे शेंगादाणे भरून खेळायला पाठवणारे महेंद्रकाका देखील मित्रच वाटले!!!

६ जूलै, माझा ३२वा  वाढ्दिवस !!! वाढ्दिवसाच्या ४/५ दिवस आधि माहेरच्या गाण्यावर एक कमेंट आली होती, कमेंट होती ’सुमन ओक’ या नावाने…. लगेच हेरंबला मेल टाकले आणि त्याचे उत्तर आले की ” हो ते कमेंट आईनेच टाकलेय…. तिला तुझा ब्लॉग आवडतो!!” ….. हेरंबकडूनच काकूंचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी बोलले, भरभरून बोलणारा काकूंचा आवाज अजुनही आठवतो मला!!!! माझ्या वाढ्दिवसाला यावेळेस मला भेट नव्हे तर या अनेक ’भेटी’ मिळाल्या…… त्यांच्यामूळे आज श्रीमंती वाढलीये माझी!!! 🙂

साधारण ऐंशी वर्ष पार केलेल्या , गुडघ्यात खूप त्रास होणाऱ्या आमच्या एक काकू बिल्डिंगचे जीने उतरून , “छान लिहीतेस गं!!! अशीच व्यक्त होत रहा!!” सांगायला आल्या….. आशिर्वादाचे मोल होत नाही वगैरे वाक्य आणि त्यांचा अर्थ उलगडणारे हे क्षण!!!भारतातून ऐन निघताना रोहन- शमिका मला भेटायला नासिकला आले….. दिवसभर गप्पा मारल्या सगळ्यांनी!!! योगेशशीही यावेळेस नुसते फोनाफोनी करणे झालेय ….

प्रमोद देवकाकांनी काढलेला ’जालनिशी’चा अंक….. आपली मुळात प्रत्यक्ष ओळख नाही , उगाच मधेमधे कसे करायचे असा विचार करत मी आधि काही अभिवाचन पाठवलेले नव्हते, आणि ऐन वेळेस तर सर्दी-तापाने हैराण झाल्यामूळे ईच्छा असली तरी अभिवाचन पाठवणे शक्यच नव्हते….. तेव्हढ्यात विद्याधराचे मेल आले, ताई तुझ्या एका लेखाचे अभिवाचन पाठवलेय मी!!! आभार वगैरे मानायचे नाहीत अश्या बाबाच्या कडक सुचना असल्यामूळॆ ,”खूप आनंद झालाय रे मला!!” ईतकच बोलले त्याच्याशी!! तर त्यावर “तायडे सगळ्यांची नावं असतील ना तिथे, मला तुझंही नाव पहायचे होते तिथे!!! ” असे सांगून बाबा राखीपौर्णिमेला सार्थ करून गेला!!!

नेटभेटद्वारे सलीलनेही अनेक वाचकांशी निस्वार्थपणे माझी ओळख करून दिली!!! तसा्च अमोल कपोले, पुणे ब्लॉगर्सच्या केलेल्या बातमीत त्याने सहजच माझाही उल्लेख केला….. भुंग्याने केलेले ब्लॉगचे चिन्ह, हा कोंबडा, नवी पहाट रोज आणतो!!!

स्टार माझाची ’ब्लॉग माझा’ स्पर्धा आल्याचे हेरंबने कळवले….. सगळ्यांनी मेल्स पाठवले आहेत की नाहीत याचा पाठपूरावा सगळेच करत होते….  निकोप स्पर्धा हा देखील निकष इथे लागू होत नाही कारण मूळात कोणाची कोणाशी स्पर्धाच नाहीये!! खेळीमेळी यालाच म्हणतात  नाही का!! माझ्या लॅपटॉपचे साधे एक सॉफ्टवेअर बंद पडले तर आनंद आणि बाबा दिवसभर पाठपुरावा करत होते…. नवरा हसून म्हणालाही ” तुझे भाऊ आहेत समर्थ तुला मदत करायला!! 🙂 मी निघतो हापिसात!!”

किती लिहू 🙂 …. पोस्ट भलती मोठी आहे ही!! ब्लॉगची वाचकसंख्या ५०,००० ओलांडून पुढे चाललीये….. नवी ओळख, नवे अस्तित्त्व, आणि जगण्याकडे पहाण्याच्या दृष्टिकोनाची ओ्ळख आणि पडताळणी करता आली इथे!!!अनेक सुहृद आपली मतं कमेंट्सच्या रूपात मांडताहेत…. प्रत्येक पोस्टला निदान ३/४ नव्या मंडळींशी ओळख होते….

मागे माझा एक मित्र म्हणाला होता की कायम स्वत:बद्दल, घराबद्दल, नात्यांबद्दल तर लिहितेसच आता जरा विषयांचा आवाका वाढव….. करेनच तो ही प्रयत्न नक्की करेनच…. तोवर इतकेच म्हणेन….

I should talk not so much

about myself if there were

anybody else whom I knew as well.

Unfortunately, I am confined to

this theme by the narrowness

of my experience.

– Henry David Thoreau, From WALDEN

जाता जाता इतकेच म्हणेन की ’आज मै खुश हुँ!!! 🙂 ’

54 thoughts on “ऋणानूबंध…..

  • >>>> ही नाती वेगळीच आहेत……

   अरे तू काही नाही लिहीलेस तरी समजेल मला… मोठी बहिण याचसाठी असते ना!! 🙂

 1. ताई खूप खूप लिहते रहा ग. ह्या ब्लॉग प्रपंचातूनच तर आपली ओळख झाली..
  हे ऋणानूबंध कधीच न तुटणार्‍या धाग्यांनी जोडलेले आहेत…खूप खूप शुभेच्छा ग 🙂

  • आभार रे सुहास!!! खरयं तुझं न तुटणाऱ्या धाग्यांनी जोडले गेलो आहोत आपण सगळे…… खूप व्यस्त झालेल्या सगळ्यांच्या जीवनात असे ऋणानुबंध जुळलेत हेच भाग्याचे!!!

 2. आणि हो…सिंहगडावर भेटण्याच्या आधी तुला भेटायला नाशिकला येतो असं सांगत सांगत मी जो अभूतपूर्व घोळ घातला होता…तो एकदम आठवला…
  तू आलीस सिंहगडावर म्हणून भेटलो तरी…!!! 😀

  • आभार सचिन 🙂

   अरे ब्लॉगहिट्स ५०,००० झाले त्याबद्दलही एक पोस्ट लिहायचा विचार होता पण नुसतीच पोस्ट लिहायला लागले आणि मनात झरझर आले हे विचार!!!!

 3. सहज अन खरच छान लिहीलय. मी पण ब्लॉगर्सच्या विश्वात नविनच आहे. त्यामुळे ओळखी कमीच पण वाढतायत.
  नातेवाईक, जुने मित्र याशिवाय ब्लॉगर्स मित्र, आपले संबंध विस्तारण्यात मजा असते.

  शुभेच्छा.

  अजय.

  • आभार अजय आणि नुसतेच माझ्या ब्लॉगवरच नव्हे तर ब्लॉगविश्वातही आम्हा सगळ्यांतर्फे स्वागत…..

   >>>>नातेवाईक, जुने मित्र याशिवाय ब्लॉगर्स मित्र, आपले संबंध विस्तारण्यात मजा असते.

   अगदी मान्य!!! 🙂

 4. ही ब्लॉग पोस्ट हाच एक उबदार मेळावा किंवा Family get together झालंय..

  “महेंद्रजी, नचिकेत, अनिकेत, श्रीताई”….

  यातला नचिकेत म्हणजे मीच असं मानायला मला आवडेल.

  • 🙂

   तो तूच आहेस 🙂 …. तुझ्या ’पंधराशे आठवड्यांवर’ पहिल्यांदा कमेंटले होते बहुतेक…. तेव्हापासून तुझ्या लिखाणाची फॅन आहेच….

   ’उबदार मेळावा’ मस्त शब्द आहे रे…. शेवटी लिहीलेले वाक्य वाचलेस ना…. तोडक्या मोडक्या अनुभवांवर मांडलेल्या पोस्ट्स हेच काय ते भांडवल…पण आलेल्या अनुभवांची शिदोरी मोठी सुखकारक आहे!!! 🙂

  • देवा आभार रे…. 🙂

   देवमामाला मी आवडतो, तो माझ्या फोटोंवर कमेंट्स टाकतो हे जेव्हा ईशान बोलला ना तेव्हा ईशानईतकाच मलाही आनंद झाला होता….

   हे ऋणानूबंध ईतकं काही देताहेत ना कसल्याही अपेक्षेविना की त्यांच्या ऋणात रहाणे कधिही आवडेल मला 🙂

  • आनंदा काय लिहू रे….. एकमेकांना चिडवतो आपण सगळे, फिरक्या घेतो पण घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झालेय याची नोंद मनात अलगद होतेच बघ!!! 🙂

   >>>>आणि प्राऊड टू से तुझ्यासारखी ताई मिळाली.

   स्पेशल आभार 🙂

 5. आणि हो मी ब्लॉगींग सुरु केल तेव्हा सुरुवातीच्या काळात ज्या काही थोड्या जणांनी प्रतिक्रिया देवुन माझी लिहायची उमेद कायम ठेवली त्यापैकी तु ही एक, नाहीतर हा दवबिंदु ब्लॉगविश्वातुन केव्हाच नाहिसा झाला असता…..धन्स ग….(तर माझा ब्लॉग जर कोणाला आवडत नसेल तर त्याबद्दल थोडा राग इथेही व्यक्त करावा… 🙂 )

  • >>>>> नाहीतर हा दवबिंदु ब्लॉगविश्वातुन केव्हाच नाहिसा झाला असता…

   हे होणे नाही!!

   तू लिहीत रहा रे सगळ्यांना आवडतोय तुझा ब्लॉग, आणि कोणी असेल तर सांग ’ताईगिरी’ करते जरा!!! 🙂

 6. खरंय तन्वी ताई !
  ….आणि तन्वीशी माझा जुळलेला ऋणानुबंध तर अजबच म्हणावा लागेल !!
  कोण कुठली मस्कत ची तन्वी ! एक तर तिच्याशी जुळुन यावे हा खरा तर दैवी योग म्हणावा लागावा.मी तर तुमच्या कुठल्याही ब्लॉग वरही नव्हतो.
  कोणी तरी एक मुलगी ऑर्कुट वरील माझी चित्रे पाहून चित्रांच्या प्रेमात काय पडते, व तो धागा पकडत तिच्या आजीच्या _ म्हणजे माझ्या बालमैत्रीणीशी इतक्या वर्षांनी ओळख व भेट ही होते सगळेच स्वप्नवत ! जवळ जवळ पंचावन साठ वर्षांचा काळ मधे गेलेला
  …आणि तन्वी बरोबर सगळयांचीच नुसतीच जवळीक घडून आली नाही, तर नात्यांचा परीघ मोठ्ठा झाला. सिंहगडाचा मिनी मेळावा हे अनुजाचे कर्तृत्व ! त्याचे क्रेडीट तिच्या पदरात पडते… पण त्या चार घटकांनीच खरे म्हणजे हे घडवून आणले.
  गौराईशी अधिक संबंध यायला हवा होता पण अमित आणि इशान तर एकदम आवडून गेलेत !
  तू मस्कतला परतलीस व मग मी सव्वा महीना मुंबईत ! नंतर कर्नाटक –कोकण ट्रीप. पुढे माझ्या कंम्प्युटर चे माझ्याशी फटकून वागणे …वगैरे वगैरे मुळॆ माझे दुर्लक्ष ! त्यामुळे ह्या आधीच्या पोस्ट ला मी कमेंटू शकलो नव्हतो, पण आजचा विषयच जिव्हाळ्यांचा…म्हणून हा निबंध लिहिला गेला !

  • काका 🙂

   तुमच्या निबंधांची वाट पहात असते मी!!!

   खरयं काका खूप काही दिलेय मला या ब्लॉगाने…..

 7. >> किती लिहू …. पोस्ट भलती मोठी आहे ही!!

  इतकी माणसं जोडली आहेस तू त्या मानाने पोस्ट लहानच आहे ग 🙂 ..

  >> किती बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुझ्या मनाने टिपून घेतल्या आहेत.. खरंच ग्रेट.
  + २३४१२३८

  कधी कोणाला न बघितलेले, न बोललेलो, न भेटलेले आपण सगळे जण (अर्थात हे फक्त माझ्यापुरतं.. तुम्ही सगळेजण छान भेटला आहात आता एकमेकांना) नुसतं ब्लॉग या एका गोष्टीपायी इतके जवळ आलो की जन्माजन्मांचे ऋणानुबंध जुळले जणु.

  खूप छान हळवी पोस्ट.. कर्केची 😀

  तुझ्या पन्नास हजाराचे पाच लाख होवोत लवकर या सदिच्छा !!!

  • एक खेकडा दुसरे को नय पहचानेंगा तो और कोण करेंगा ये काम??? 🙂

   अरे माहेरच्या गाण्यावरचे काकूंचे कमेंट असो, की २/३ तास खपून आमच्यासाठी वड्या करून ठेवणाऱ्या श्रीताईच्या आई असो, की अगं विद्याधर सांगत होता तुझ्याबद्दल, नक्की ये आमच्याघरी म्हणणारी बाबाची आई असो…. ठेवा आहे ना हेरंबा हा!!!! सुमनकाकूंशी बोलले ना तर त्या म्हणाल्या तू ये नाहितर मी येइन तूला भेटायला….

   शांत बसून आठवायचे आणि त्यामापात श्रीमंती मोजायचे क्षण ते!!! आपल्या पदरात देवाने अनेकांच्या प्रेमाचे, आशिर्वादाचे दान टाकल्यावर जे मिळते ते कुठल्याही मॉलात अजूनही उपलब्ध नाहीये रे!!!!

   >>>तुझ्या पन्नास हजाराचे पाच लाख होवोत लवकर या सदिच्छा !!!

   हा पंचवार्षिक नव्हे दशवार्षिक प्लॅन आखावा लागेल!!! 🙂

  • अनुजा ताई एव्हढी काही तन्वी विसरभोळी नाही, तुझ्या नावाचा उल्लेख आहेना ! …आणि तुझे क्रेडीट मी टाकले आहे ना तुझ्या पदरात ! …आणि तशीही तू सहनशील आहेसच गं ! आता परत कधी येताय तुम्ही सगळे ? करूया ना परत धम्माल काय ?

 8. tumha bloggers sathee ha ananda- dayee ubdaar meLava tar aselach, puN vachakansathee sudhha ha ek chhan anubhav ahe, karaN baryach veLa apalya ajubajula kinva kaMachya theekaNee apalya avadee nivadee match hoNaree kinva samasheel maNase asateelach / disateelach asa nahee, puN ya medium madhun kadhee kadhee achanak asa vaTun jata, kee are , mala hee exactly asach mhaNayacha hota, I can relate to what Tanvi says … thodasa remote ka hoina puN ruNanubandha lekhak aNee vachak yanchyatala …

  abhinanadan.

  • स्मिता अगदी बरोबर बोललीस…
   वाचक- लेखक हे व्यक्त/ अव्यक्त नाते आहेच इथे!!! लिहिणारे आपली मत पोस्टमधे मांडतात आणि वाचक त्यांची मतं प्रतिक्रीयांद्वारे….. ऋणानूबंध जुळतात हे मात्र खरे!!

   आभार !!!

  • तनूजा आभार आणि ब्लॉगवरच नव्हे तर ब्लॉगविश्वात स्वागत!! 🙂

   तूला लिहायला सुचवू म्हणतेस…. आधि तुझा ब्लॉग वाचते निवांत आणि बोलतेच गं पुन्हा…. आणि खरं सांगू का उत्स्फुर्त जितके लिहीशील ना तितके तुलाच तुझे लिखाण, मतं आवडतील…. आणि ही सवय लागायला वेळ लागत नाही!! एकदा सवय लागली की दखल घेण्याजोगे काहिही घडले की आपण लागतो बघ कीबोर्ड बडवायला 🙂

 9. ( Bayo jarashi dhugdhugi asnare Net milaley tyatun baraha gandaley mhanun he ase dhedgujari lihitey ga… bhavanela ani premala asehi kashachech bandhan nastech… khare na? )

  Abhinandan!:)
  Tanve, kaay mhanu ga… saglech tula mahit aahe. Hajarao mailnche anter kshanardhaat langhun aapli mane julali- maitri drudha zali. Tali nehmich don hatane vajate…. ( eka hatane vajvaycha kitihi praytna kela tari shevati aapalecha haat dukhavale jaatat ) lavkar ye ga, aamhi vaat pahato aahot.

 10. खूप खूप छान झालिये पोस्ट…मस्तच एकदम…. 🙂
  आणि हो..पुढच्या वेळी आपण सुद्धा भेटुयात नक्की….

 11. माझ्या ब्लॉगिंगची सुरवातच ’सहजच’ वाचून झाली.
  मला सुरवातीला पोस्ट वरच्या कमेंटस्‌ वाचून वाटायचे की हे सर्व तुझ्या आधीपासूनच्या ओळखीचे आहेत. पण आता कळालं की ही नाती, या ओळखी ‘अप्रत्यक्ष’ आहेत. म्हणजे माझ्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीलाही जिव्हाळा, आपुलकी आणि तुमच्यातला ऋणानुबंध जाणवतो. हीच खरी संपत्ती आहे. खरंच खूप मनापासून अभिनंदन…..
  रच्याक – तुझ्याकडून माणसं कशी जोडायची हे शिकायला हवं.

  • प्रज्ञा विशेष आभार 🙂

   का ते सांगते, अत्यंत बोलकी प्रतिक्रीया आहे तुझी!! अगं मी ब्लॉगविश्वात आले तेव्हा फक्त महेंद्रजींशी ओळख होती ती देखील ऑर्कूटमुळे, अप्रत्यक्षच!!! पण आज बघ मोठा गृप आहे, आणि कंपुबाज असाही एक गोंडस शब्द काहीजण वापरतात… पण मी ईतकचं म्हणेन की हा एक उबदार मेळावा आहे (नचिकेतचा शब्द ) आणि यात सगळ्यांचे स्वागत आहे 🙂

   >>>हीच खरी संपत्ती आहे. खरंच खूप मनापासून अभिनंदन…..

   मान्य!!

 12. तन्वी, अभिनंदन … ५०००० चा टप्पा ओलांडल्याबद्दल!
  तुझ्या या भारतभेटीत आपली भेट झालीच नाही … पुढच्या वेळी नक्की …

 13. एखाद्या ब्लोग वरच जुनं लिखाण वाचायला म्हणून वारंवार भेट द्यावी असं फार क्वचित घडतं. तुमचा ब्लोग मात्र नियमित वाचतो. अजून संपूर्ण वाचून व्हायचा आहे. पण तुम्ही सगळ इतकं सुंदर व्यक्त करता कि असं वाटतं खूप जुन्या ओळखीतल्या कुणाशीतरी संभाषण चाललंय. Keep writing.

  -सौरभ

  • येस मॅडम नक्की भेटुयात!! 🙂

   तू आर्यनबद्दल लिहीत होतीस तेव्हाच खरं तर ही शंका यायला हवी होती नाही मला की तू खेकडा आहेस…. असो!! वेलकम टू द गॅंग ऑफ खेकडेज…. सध्या मी आणि हेरंब मेंबर्स आहोत, आता तू पण!!!!

   ता.क. फराळ जास्त कर दिवाळीत यावेळेस , मी येतेय दिवाळीत 🙂

 14. Tanvi, ya lekha varachya comments aNee tuze responses pahilyavar, mala black and white khaas “asha kaLe style” mrathee chitrapata madhye shiralyasarakha vaTala jara:-)) ( “Tayade, bhau, daditalya, khapitlya vagaire tya chitrapatanchee khasiyat right? :- such rare warmth !

 15. खुप उशिरा प्रतिक्रिया देतो आहे..
  काय करणार.. गुगल रिडर मध्ये सगळे ब्लॉग आहेत… ईतक्या पोस्ट होत्या की बोलता सोय नाही.. आज ही पोस्ट वाचली…आणि सिंहगड आणि सगळे सोबती आठवले..
  या मावळ्याची लढाई तु विसरणार नाहीच हे वाचुन बरं वाटलं… 😉
  शुभेच्छा…

  • आनंद उशिरा दिलीस किंवा अगदी नाही जरी देऊ शकलास प्रतिक्रीया तरिही भापोच असतात रे!!

   आभार रे!! भारतात आले की तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भेटायचा नक्कीच प्लान आहे 🙂

 16. ही पोस्ट मी पाहिली नव्हती. बहूतेक कामाच्या गडबडीत सुटली असेल. खरंच या ब्लॉग मुळे खूप नवीन ओळखी झाल्यात. सेल फोन मधे ब्लॉगर्सची नांवं सेव्ह करतांना आधी बी अक्षर लिहितो. सहज पाहिलं, तर चक्क ३८ नंबर्स आहेत.. 🙂 छान लिहितेस.. लिहित रहा.

  • महेंद्रजी मनापासून आभार 🙂

   गंमत आहे या पोस्टवर तुमची कमॆंट नाही हे माझ्या लक्षातही आले नव्हते, मी बहूधा तुमचा अभिप्राय मनात गृहीत धरला होता (नाहीतर कमेंट टाका म्हणुन मेल लिहीले असते हक्काने 🙂 ) ….

   खरचं खूप दिलेय या ब्लॉगविश्वाने…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s