वाचाळ…..

वाचाळ म्हणजे अतिशय बडबडे किंवा वाचनाचा नाद असलेले असे जर दोन्ही अर्थ घेतले तर ते दोन्हिही मला १००% लागू होतात…. वाचायला आवडायला कधीपासून लागलं हे माहित नाही पण नुकतीच अक्षरओळख झाल्यावर शाळेतल्या पुस्तकांबरोबरच दुकानांच्या पाट्या वाचायला सुरुवात केली होती…. काना मात्रा, वेलांट्या, उकार हे ज्ञान जसजसे वाढत गेले तसे वाचनही वाढत गेले, आवडायला लागले किंबहूना समजायला लागले!!

बाबांबरोबर कायम लायब्ररीत जाणे व्हायचे…. लोकांना वाचताना बघणं व्हायचं…. लायब्ररी वरच्या मजल्यावर होती आणि खालच्या मजल्यावर अनेक पेपर्स टेबलवर ठेवलेले असायचे आणि अत्यंत तन्मयतेने ते वाचणारे लोक पाहिले की कुतूहल वाटायचं नेहेमी!!! आई- बाबा, आजी- आजोबा पेपर नूसते वाचायचे नाहीत तर अग्रलेख हा बरेचदा चर्चेचा मुद्दा असायचा जो मला तेव्हा अत्यंत रटाळ वाटायचा पण कानावर पडायचे त्यांचे बोलणे!! असाच मग कधितरी पेपर हातात आला, आधि मटा मग लोकसत्ता तो आजतागायत…..

तिसरी/ चौथी पर्यंत गोष्टीची पुस्तकं आली खजिन्यात…. आमचे आजोबा रेल्वेच्या शाळेत मुख्याध्यापक होते, शाळेच्या लायब्ररीतली पुस्तकांनी खचाखच भरलेली अनेक कपाटं हा सुट्टीचा मुख्य अजेंडा असायचा…. मजा होती एकदम… ही गोष्टींची पुस्तकं म्हणजे गम्माडी गम्मत…. एक राज्य असतं… राजाची राजकन्या अतिशय सुस्वरूप असते… ती सहसा नवसानेच झालेली असते, आणि दिसामाजी तिचे सौंदर्य वाढत गेलेले असते…. ती तिच्या मैत्रीणींबरोबर राजवाड्याच्या गच्चीत खेळत असते मग हवेत उडणारा दुष्ट राक्षस येतो आणि तिला पळवून नेतो….राजा कितीही शुर, पराक्रमी ईत्यादी असला तरी तो आणि त्याचे सैन्य राजकन्येला शोधून आणण्यासाठी दवंडी पिटण्याचा सोपा मार्ग स्विकारतात….त्या राज्यात एक हुशार, धाडसी मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईसोबत गावच्या टोकाला किंवा गावाबाहेर आणि झोपडीतच रहात असतो…..या मुलाला वडील असल्याचा उल्लेख कधीच नसतो….मग दवंडी ऐकल्यावर आई मुलाला शिदोरी बांधून देते…. हा मुलगा निघतो , वाटेत त्याला साधू, परी, ऋषी कोणितरी भेटून त्या राक्षसाचा प्राण अमुकढमूक मधे आहे हे तरी सांगतात किंवा काहितरी जादूची वस्तू तरी देतात 🙂 …. हाच आशय असलेल्या कथा किती वाचल्यात माहित नाही….

दिड किंवा दोन रूपये ईतकीच किंमत असलेली ही पुस्तकं स्वत:च एक जादू होती….. रामायण, महाभारत, असेच ओळखीचे झाले . मग कळलं अश्या कथांना mythological  कथा म्हणतात 🙂  … मग चंपक, चांदोबा, ठकठक , पंचतंत्र, अकबर-बिरबल, ईसापनिती, तेनालीरामन, जातक कथांचे दिवस आले आणि कोल्हा, मगर, सिंह, वाघ, बगळे, ससे वगैरे यच्चयावत प्राणीसृष्टी बोलू लागली…. अरेबियन नाईट्स, सिंदबादच्या सफरी, हिमगौरी, अलीबाबा सगळ्यांशी ओळख होत गेली…. Moral stories /बोधकथा किती सहज आपल्याला एखादे नितीतत्त्व शिकवू शकते हे आता मुलांना गोष्टी सांगताना जाणवते…. चलरे भोपळ्या असो, की लाकूडतोड्या असो, कावळा चिमणी असो की माकड-मगर असो मुलांची झटकन मैत्री होते या सगळ्यांशी!!

कॉमिक्स तर अतिशय आवडते… एकिकडे ढगासारख्या आकारात काहितरी लिहीलेले तर त्याच चौकटीत बोलणाऱ्याचे चित्र…. कुठल्याही खेळण्यांपेक्षा यांचे मोल निश्चितच जास्त होते!!! चाचा चौधरी आणि साबूने तर एक काळ गाजवला होता, कितीही मारा धोपटा, समुद्रात टाका तो राका परत यायचाच….. आम्ही सुट्टीत आजीकडे म्हणून जाण्यासाठी म्हणून रेल्वे स्टेशनला गेलो की मी आमच्या आजोबांना पैसे मागायचे पुस्तक घ्यायला, आणि ते दर सुट्टीत मला रागावायचे की तुला ५० पैसे देतो, तिथेच स्टॉलसमोर उभी राहून वाच, तसेही घेतलेले पुस्तक खूप काळ पुरत नाही तूला , मग बडबड सुरू करतेस पुन्हा 🙂 …. असे म्हणायचे तरीही पैसे द्यायचेच ते आणि मग ते पुस्तक अजूनच आवडायचे…. माझ्या दुसऱ्या आजोबांनी मला चौथीत दिलेले ’श्यामची आई’ माझ्याकडे अजूनही आहे, अगदी मस्कतलाही….. पिवळी पानं झालेलं ते पुस्तक मधेच नजरेस पडतं आणि सुखावतं….

शिवाजीमहाराज, ज्ञानेश्वर आदि संत शाळेच्या ईतिहासाबरोबरच या गोष्टींच्या पुस्तकांतून जास्त ओळखीचे झाले….. बाबासाहेब पुरंदऱ्यांचे शिवचरित्र वाचून महाराज आदरस्थान होत होते !!

पेपरमधल्या रंगीबेरंगी चित्र असलेल्या पुरवण्या पहात आणि त्यातलं लहान मुलांचं सदर वाचता वाचता हळूच कधीतरी ललीतही यादीत आलं, मग ते आपल्याला झेपतयं असंही वाटायला लागलं….. लोकप्रभा, चित्रलेखा, जी वगैरे मासिकं चाळता चाळता वाचलीही जाऊ लागली…. मागे एकदा मी बाबांना विचारलही होतं की तुम्ही पुस्तकं बदलायला आम्हाला पाठवायचे ते सहज की वाचनाची गोडी लागावी म्हणून?? त्यावर ते हसले नुसते नेहेमीप्रमाणे, पण दर आठवड्याला होणाऱ्या या लायब्ररी वारीने मला वाचाळ बनवण्यात मोठा वाटा उचललाय 🙂

बारावी संपल्यावर कादंबरी वाचनाची ऑफीशियल परवानगी मिळाली 😉 त्याआधि पु.लं. की वपू हे चर्चेचे मुख्य कारण असायचे…. नंतर पु.लं.चे खुसखूशीत गुदगूल्या केल्यासारखे हलकेफूलके लिखाण तर व.पुंचे मोजक्या शब्दातले अत्यंत नेटके विचार, यांच्यात आपल्याला तूलना नकोय तर  ते दोन्ही अतिशय आवडते हे ही समजले!! एकदा सुहास शिरवळकर वाचले आणि मग झपाटल्यासारखे शिरवळकरांची पुस्तकं वाचली….. व.पुं ची पार्टनर, तप्तपदी, आपण सारे अर्जून, ठिकरी, ही वाट एकटीची किती नावं घ्यायची , निदान एकदा तरी वाचली गेलीच पाहिजेत ही पुस्तकं!! एकदा वाचली की आपोआपच ती पुन्हा पुन्हा वाचली जातात, दरवेळेस नवे काही गवसते आणि त्यातून…. दासबोध जसे कधिही बदलत नाही तसेच व.पुं.ची वाक्य , अगदी मनाच्या प्रत्येक अवस्थेवर नेमके भाष्य करणारी!!!

आमच्या हॉस्टेलवाचनाची मात्र गंमत होती , मुली जेव्हा वेगळ्या कथांमधली , त्यातही काही मोजकीच पानं वाचायला लागल्या तेव्हा मी nancy drew वाचायला घेतले, ईंग्लिश वाचनाचा तो पहिला अनूभव आणि तोच मला जास्त आवडायचा…. मग मोठी पुस्तकं वाचणाऱ्या मैत्रीणी आम्हाला ’बच्चे’ 🙂 असं चिडवायच्या….. पण तिथेही मी बरेचदा मराठी पुस्तकं घेऊनच जायचे, ईंजिनीयरिंगची पुस्तकं जड आणि जाड आहेत यावर आम्हा मैत्रीणींचं एकमत व्हायचं आणि आम्ही कथा/ कादंबऱ्या वाचायचो!! 😉

आज खरं तर यादी करत होते, साधारणपणे आजवर वाचलेल्या पुस्तकांची आणि पुढे कुठली पुस्तकं वाचायची आहेत याची…. रणजीत देसाईंचे श्रीमान योगी,स्वामी, राऊ, राधेय असोत की शिवाजी सावंतांचे मृत्यंजय, छावा असो, विश्वास पाटलांचे संभाजी, पानिपत, झाडाझडती असोत,  गोनीदांचे पडघवली, शितू, दास डोंगरी रहातो, दुर्गभ्रमण असो की सावरकरांचे माझी जन्मठेप असो, ना.सं. ईनामदारांचे शहेनशहा , रविंद्र भटांचे भेदीले शुन्यमंडळा, भगीरथ, असो, श्री.ना. पेंडसेंचे गारंबीचा बापू असो, अनिल अवचटांची पुस्तकं असोत, हेच का कमलाबाई ओगलेंचे रुचिरा असो, हवेच नाही आपल्याकडे!!! त्याचबरोबर नव्या पुस्तकांमधले अभय बंगांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग, अलका मांडकेंचे हृदयस्थ हे ही हवेच…… यादी प्रचंड मोठी आहे ही, आज आठवू म्हटले तरी भराभर आठवलेली ही काही वाचलेली पण संग्रही ठेवायची पुस्तकं!!!

पुढे शिव खेरांच्या You Can Win, पासून सुरू झालेली प्रेरणादायक, यशाचा मंत्र देणारी अनेक पुस्तकं…. यात विठ्ठल कामतांच्या ईडली ऑर्किडचाही समावेश होतो…. रॉबिन शर्माने तर अनेक दिवस पुरणारे वैचारिक खाद्य दिले…. चेतन भगतनेही सोप्या भाषेतली पुस्तकं आणली…. हेरंबने पाठवलेले white tiger ही असेच, आधि रटाळ वाटलेले पण पकड घेणारे पुस्तकं!!!हेरंबनेच अनेक ई-पुस्तकांचा खजिना पाठवलेला आहे, पण वाचन म्हणजे निवांत उशीला टेकून करायचे काम, ते मला लॅपटॉपवर एक दोन पानांच्या वर वाचायला अजूनही आवडलेले नाही, त्यामूळे त्याचा मुहुर्त काही अजून लागलेला नाही!!!

कित्येक पुस्तकांमधल्या अधोरेखीत करून ठेवलेल्या, किंवा डायरीमधे लिहून ठेवलेल्या ओळी कधीतरी उदास असताना सोबत करतात, आणि जगण्याची उर्मी पुन्हा देतात….. कधी हसवतात, कधी चटका लावतात पण मोहवतात हे खरे!! 🙂 यावेळेस मायदेशातून आणलेल्या पुस्तकांवर २ पोस्ट लिहून झाल्यात तरी बरीच पुस्तकं बाकी आहेत अजून…. डॉ. आनंद नाडकर्णी, आणि अल्बर्ट ईलीसची विवेकनिष्ठ मानसोपचार हे विषय सध्या टारगेट आहेत माझे!!

वाचनाला निवांत वेळ मिळणं हे ही खरं तर भाग्याचे लक्षणं आहे, हे भाग्य ज्याच्या नशीबात त्याचा मला नेहेमी हेवा वाटतो!! मधे एकदा मला कधीतरी लायब्ररीयनच व्हावे असा विचार आला होता…. कितीही अधाशासारखे वाचले तरी वाचन उरणारच आहे हे माहिती आणि मान्य असले तरी, कोणाच्या घरी गेले आणि व्यवस्थीत मांडलेली पुस्तकं दिसली की त्या पुस्तकांच्या कपाटाकडेच लक्ष जाते!! शाळेत निबंधाला विषय असायचा ’वाचाल तर वाचाल’ तेव्हा मी कधीही नाही लिहायची या विषयावर निबंध, त्यापेक्षा मी अमुक ढमूक झाले तर, किंवा अमकेतमके बोलू लागले तर हे माझे आवडते विषय होते…… पण मुळातच वाचाळ असल्यामूळे तो निबंध आज लिहून काढतेय असे वाटतेय कारण पुन्हा मायदेशात जायचे आहे आणि पुन्हा नवी पुस्तकं आणायची आहेत….. स्वत:ला वाचनाचे वेड असले तरी हा साठा पुढे मुलांपर्यंतही न्यायचा आहे…. टि.व्ही., लॅपटॉपमधे रमलेल्या मुलाला पुस्तकं वाचायला लावायची आहेत….

कामं फार आहेत नाही…. थांबावे का इथेच…. कित्येक पुस्तकांचे, लेखकांचे नावही आलेले नसावे पोस्टमधे, हरकत नाही, अचानक नाव आठवले नसले तरी मनात कुठेतरी नोंद असेलच…आज ना उद्या आठवतील नावं!!

कितीही लिहीले तरी ’अपुर्ण’ अशी एक पोस्ट टाकतेय याची जाणीव मनात ठेवून आज थांबतेय इथेच……

 

Advertisements