विसाव्याच्या वळणावर…

कधी कधी असे होते की हातात अगदी मोकळा वेळ असतो…. ’बरंच काही करायचयं ’ या सदरातल्या पेंडींग कामांची यादी पडीक असते…. पण या मोकळ्या वेळेत यातलं एकही काम करावसं वाटत नाही…. बरेच दिवस आणून ठेवलेले एखादे पुस्तक असो की आवर्जून आणलेली एखादी CD असो काहीच हातात घ्यावे वाटत नाही…. एक विलक्षण जडत्त्व मनाला आलेले असते….

तर कधी याच्या अगदी उलट होते….. सकाळ होते तीच अगदी प्रसन्न…. एक अनामिक उत्साहाचा, उमेदीचा झरा अंतर्मनात झिरपतो!!एरवी कंटाळवाणी वाटणारी कामंही चटाचट होतात तेव्हा…..

परवा रात्री असेच वैश्विक गुडनाईट म्हणू म्हटले तर मॉडेमबूवा रूसलेले….. दोन चार वेळा प्रयत्न करूनही बेटं पुढे सरकेना… आता खरं तर माझी निदान माफक तरी चिडचिडीची वेळ… पण जराही रागवावेसे वाटले नाही…. मॉडेमची ईच्छा शिरसावंद्य म्हणून शांत होते मी!! शिल्पाताईंच्या मॉडेमच्या पंगतीत आपलेही श्री. मॉडेमराव जाऊन बसले म्हटलं!! खरं तर नेट बंद होणे हे माझ्यासाठी भरभक्कम नुकसान पण मी शांत पाहून नवऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला असावा….  दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेटची आठवणही काढली नाही तेव्हा मात्र मला नक्कीच बरे नाही असे त्याला वाटले असावे…. 🙂

मला मात्र काहितरी गवसलेय असे वाटत होते सारखे…. काय माहित नाही? असे का वाटतेय ते ही समजत नव्ह्ते….  मुलं शाळेत गेलेली…सगळी कामं उरकून सोफ्यावर विसावले जरा मी….हातात वाफाळता चहाचा कप आणि लेक यईपर्यंतचा दोन अडीच तासाचा वेळ हातात….. टिव्ही पहायचा नाही हा संकल्प जोरदार त्यामूळे तो मार्ग बंद होता आणि न वाचलेले घरातले एकमेव पुस्तक म्हणजे थरोचे वॉल्डन,  आत्ता ते ही नको होते….. हातातला वेळ पोकळी वाटावा ईतपत शांतता भोवती होती…. तरिही कंटाळा वाटेना, एकटे वाटेना… उलट नुकतेच स्वत:च आवरलेल्या घराकडे एक शांत नजर टाकावी वाटली…. रोजचेच घर रोजच्याच वस्तू रोजच्याच जागी तरिही तोच तो पणा वाटेना…. उलट त्या तश्या त्याच जागी पाहून छान वाटले क्षणभर….  मनाला मोकाट धावायची संधी दिली होती पण ते ही आज उगा या विचाराच्या धाग्याहून त्याला लटक , त्यावरून इथे उडी मार असले प्रकार करेना…… म्हणजे अगदी शांत होते असेही नाही पण पठ्ठं आज उगा धावपळीच्या मुडमधे नसावं बहूतेक….. मुक्तपणे फिरत होतं रमतंगमतं पण बागेत फिरल्यासारखं, हात मागे बांधून निवांत….

अचानक काही दिवसांपुर्वीचा KBC चा पाहिलेला एक भाग आठवला…. अमिताभ त्याच्या खर्जातल्या आवाजात हरिवंशराय बच्चनांची एक रचना म्हणत होता…. ती रचना ऐकली तेव्हाच मनात उतरली होती…..

जीवन की आपाधापी में कब वक़्त मिला
कुछ देर कहीं पर बैठ कभी यह सोच सकूँ
जो किया, कहा, माना उसमें क्या बुरा भला।

जिस दिन मेरी चेतना जगी मैंने देखा
मैं खड़ा हुआ हूँ इस दुनिया के मेले में,
हर एक यहाँ पर एक भुलाने में भूला
हर एक लगा है अपनी अपनी दे-ले में
कुछ देर रहा हक्का-बक्का, भौचक्का-सा,
आ गया कहाँ, क्या करूँ यहाँ, जाऊँ किस जा?
फिर एक तरफ से आया ही तो धक्का-सा
मैंने भी बहना शुरू किया उस रेले में,
क्या बाहर की ठेला-पेली ही कुछ कम थी,
जो भीतर भी भावों का ऊहापोह मचा,
जो किया, उसी को करने की मजबूरी थी,
जो कहा, वही मन के अंदर से उबल चला,
जीवन की आपाधापी में कब वक़्त मिला
कुछ देर कहीं पर बैठ कभी यह सोच सकूँ
जो किया, कहा, माना उसमें क्या बुरा भला।

म्हटलं य्ये बात!!! हेच रहस्य आहे आजच्या या वेगळ्याच वातावरणाचं…. जीवन की आपाधापी में आज मी इथे बसलेय बहुधा हिशोब मांडत मनात,की जो किया, कहा, माना उसमें क्या बुरा भला। 🙂 मानलं हरिवंशराय तुम्हाला….. लेखाजोखा मांडतेय मी अलवार मनात…… या वळणावर विसावा घेतेय म्हणजे मी आज!! सगळी या बंद नेटची कृपा…… एरवी स्वत:ला असे अडकवलेले असते तिथे की मोकळा वेळही त्याच विचारात जात असावा….. नेट हवे की नको किंवा प्रमाण किती कसे हा मुद्दा घेऊन मला आज स्वत:ला प्रश्न आणि कोडे घालायचे नव्हते….. काहितरी जाणवतयं ते मनसोक्त जाणवू द्यायचे होते…… आज नेट बंद म्हणून मी त्रागा करत नाहीये या भावनेने सुखावू द्यायचे होते मनाला…..

“क्या बाहर की ठेला-पेली ही कुछ कम थी,
जो भीतर भी भावों का ऊहापोह मचा,”

हो हेच तर होतेय नेहेमी….. बाहेर आहेच की गोंधळं पण अंतर्यामी काय तिथेही तर भावभावनांचा कोलाहल अटळ होतोय…. माझेच विचार माझ्याच हातात नसावेत….. त्यांच्याशी लढण्यातही तर शक्ती खर्च होतेच आहे……

बहिणाई आणि कबीराला शरण जावेसे त्याला वाटले तर माझी त्यालाही हरकत नव्हती…..

जीव देवानं धाडला
जल्म म्हने ‘आला आला’
जव्हा आलं बोलावनं
मौत म्हने ‘गेला गेला’

दीस आला कामामधी
रात नीजमधी गेली
मरनाची नीज जाता
जलमाची जाग आली

नही सरलं सरलं
जीवा तुझं येन जानं
जसा घडला मुक्काम
त्याले म्हनती रे जीनं

बहिणाई अगं म्हणूनच तर तूला शरण आलेय आज….. कसा घडतोय मुक्काम याला जीनं म्हणतात हे तू सांगितलेस ना ईतके नेटके….. हेच तर शोधतेय गं मी…. या मुक्कामाचाच विचार करतेय गं आज….. सोपं केलसं बघ सगळं…..

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

कबीरा अरे आम्हाला गरज आहे या सगळ्या लिखाणाची हे तुम्हाला माहित होतं जणू असे व्यक्त झालात तुम्ही सगळे!! की एक दिवस कोणितरी पांथस्थ येईल गोंधळलेला आणि तुम्ही दाखवाल त्याला पुढचा रस्ता अगदी सहजपणे…..

शांत शांत होतेय मी…. कुठली तरी खळबळ निवतेय…. संवाद हल्ली भरपूर होतोय माझा…. जनसंपर्क जगसंपर्कही वाढलाय….. पण सगळ्या भाउगर्दीत स्वत:शीच कधी बोलले होते शेवटचं ते आठवतही नाहिये….. नाही म्हणायला रोजची चर्चा चालतेही मनात पण निवांत विसाव्याच्या गप्पा छे छे…. व्यस्त ना आम्ही…… जगण्यात जगण्याची नवनवी साधनं शोधण्यातं…. मग भलेही त्या गोंधळात जगायचेच का राहून जाईना…… नको नकोच ते!!! निदान कधीतरी मुक्तपणे तरी असे वाटावे असे जगावे की पंखांना पुन्हा बळं मिळेल… विचारांची झेप पुन्हा घेता येईल…..

प्रत्येकाचे मार्ग वेगळे, गती वेगळी, गरजा वेगळ्या… पोहोचायची ठिकाणं वेगळी पण प्रत्येक वाटेवर थांबायलाच हवेय नाही एखाद्या विसाव्याच्या वळणावरं!!!!!!

 

Advertisements

शंकऱ्या….

काल तुझी जाम आठवण आली …. जाम म्हणजे जामच…. आता म्हणशील ना ’हा जाम शब्द कुठला??’ … हा आम्ही तेव्हाही वापरायचो, तू होतास तेव्हा… तुझ्यासमोर त्याला ’फार’ असे म्हणायचो…. शब्द महत्त्वाचा नाहिये रे….. काल ’जाम’ आठवण आली , नेहेमीच येते पण काल खरचं I missed u…. काल तुझा वाढ्दिवस होता….. गेलास सहा वर्षापुर्वी तेव्हा बहुतेक ७४ वर्षाचा होतास तू….. काल ८०चा झाला असतास…..

शंकऱ्या…. शंकर रामचंद्र घमंडी…. किती चिडवायचे मी या ’घमंडी’ आडनावावरून, म्हणायचे तुमच्या नावातच घमंड आहे…. तूझ्या ऐवजी मामा उत्तर द्यायचा नेहेमी, ’कुळकर्णी’ कुठलं चांगलयं … चौकात ’ए कुळकर्णी’ असं ओरडलं तर दहा जण धावतील, आडनाव हवं आमच्यासारखंच….. 🙂 … तू बोलायचा नाहीस तेव्हाही , मिश्किल भाव चेहेऱ्यावर ठेवत तू चालू द्यायचास आमची जुगलबंदी!!!! मग काहितरी एक भन्नाट मार्मिक वाक्य बोलायचास की सगळे्च गप्प व्हायचे!!

असे तरी गप्प करायचास नाहितर रागावून तरी…. काय टाप होती कोणाची तू रागावलास की बोलायची??? तुझा तो जमदग्नीचा अवतार पाहिला की भले भले गप्प व्हायचे…. मग आजी म्हणायची ,” अगं आतातरी निवळलेत, पुर्वी तर आणि कडक होते हे!!!”सगळे तूला घाबरून असायचे असे नाही म्हणणार पण मी, आम्हा सगळ्यांना विलक्षण आदर आणि प्रेम होते तुझ्याबद्दल…. ’होते’ म्हणू की ’आहे’ म्हणू….. आहेच म्हणते….. हो आहेच!!! आम्ही सगळे जमलो की, “आठवतं तेव्हा बापू असे म्हणाले होते.. ” हे वाक्यं दर दोन-तीन वाक्यांनंतर पुर्णविरामासारखं येतचं!!!

सगळे तूला ’बापू’ म्हणायचे, म्हणतात…. ’शंकऱ्या’ म्हणायला धजावणारी मीच….. मला तू दिला होतास तो अधिकार…. पुलं चे असामी पहिल्यांदा ऐकले ते तुझ्याच पलंगावर बसून…. इथे “तुझ्याच पलंगावर” हे महत्त्वाचे…. ईतर कोणी निदान तुझ्यासमोर तरी हा पराक्रम करायचे नाही…. ईगतपुरीला लहानपणी मी झोपायलाही बरेचदा तुझ्या मच्छरदाणीत यायचे… तू येऊ द्यायचास, ’ताई वळवळ करत नाही झोपली की..’ असे तू ईतर नातवंडांना सांगायचास, मग मी त्यांना तू झोपण्याआधि मला एकटीला सांगितलेली तुझ्या लहानपणीची आठवण सांगायचे….जाम स्पेशल आहोत आपण असं वाटायचं मला तेव्हा!!! अनेकदा वाटलं , “बापूसाहेबांची नातं का तू!!!” असं लोक विचारायचे तेव्हा दरवेळेस वाटलं तसं….असामि ऐकल्यानंतर तूला मी एकदा ’शंकऱ्या’ अशी हाक मारली होती आठवतं, आजीच्या हातातून भांड निसटायचं बाकि राहिलं असावं किचनमधे….. तू हसून म्हणालास, ” कर्ट नव्हे बेबी शरयू स्कर्ट स्कर्ट 🙂 ” तेव्हापासूनची आपली मैत्री पक्की होती….. तुझा कप्पा आवरणे हा एक काय नाद होता मला राम जाणे… मी आवरणार, तुझी कागदपत्र हरवणार हे नित्याचे…. ’झंडू बाम’ हा प्रकार तर किस्सा आहे, रोज न चुकता ते हरवायचे, मग तू रागावायचास आणि मी तुझ्यावर रागावायचे!!!

तुझा राग कित्येकदा आलाय तसा, मामाने दिलेले फटाक्याचे पैसे तू काढून घेतलेस तेव्हा रागावले होते मी तुझ्यावर… प्रचंड त्रागा केला होता,  मी जे जे बोलले ते घरी समजले आणि आश्चर्य म्हणजे मला कोणीच रागावले नाही…. प्रतिकूल परिस्थीतून शिकत तू एका शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंतचा केलेला खडतर प्रवास, त्यामूळे पैसे जपून वापरावेत असे असणारे तू्झे विचार असो…. की राजकारण, समाजकारण, कायदे, ईतिहास, साहित्य अनेक अनेक क्षेत्रातला तूझा व्यासंग असो आम्हा नातवंडांना हळूहळू जाणवणार, समजणार, उमजणार आहे हे तूम्ही ओळखून होतात…. काहिही असो, पण जशी मी मोठी होत गेले, तूझ्या स्वभावाचे बारकावे समजत गेले!!! लहानपणी तूझा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून जो काही धाक कधी वाटला असेल पुढे तो ही वाटला नाही… उरला तो आदर!! तूझ्या स्वभावात दरारा आहे पण त्याचबरोबर एक अत्यंत मिश्किल, खोडकरं मुलं लपलेलं आहे तुझ्यात , एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि अत्यंत हळव्या मनाचा तू मालक आहेस हे उमजत वयाची २० वर्ष पार करावी लागली मला!!!

माझी आई तुझी सगळ्यात लाडकी, ती श्रीदेवीसारखी दिसते असं तू म्हणाला होतास आठवतयं , काय हसलो होतो आम्ही सगळे…. मग मी तूला हळूच विचारले होते, “बापू श्रीदेवी कोण माहितीये ना तुम्हाला?” 🙂 चाट पडले होते मी तूझे उत्तर ऐकून,” ती गं मि.ईंडियातली नटी :)” …. तूझे हे रूप नवे होते…. मोजकचं बोलायचास तू…. आयूष्यच आखिव रेखीव होतं तुझं…. अलिप्त असायचास तरी आमच्यात असायचास….. की तूझ्यातल्या विद्वत्तेची जाण असल्यामूळे आम्ही एक अंतर राखायचो तुझ्याशी राम जाणे!!! आजीशी अजूनही मनमोकळं बोलतो आम्ही, तुझ्याशी संवाद व्हायचा मात्र हे नक्की!! नुसता नावाचा ’बापू’ बाकि गांधिजींशी कूठलेही साम्य नव्हते तूझे, राजकारण हा शब्द आला आणि, “एकजात हरामखोर सगळे.. ” अशी तू सुरूवात केलीस की फार आवडायचे मला, कारण या सुरूवातीनंतर तू शिवाजी महाराज, औरंगजेब, ज्ञाने्श्वरी, पासून ते आजकालचे कायदे, राजकारण, राजकारणी, ईतिहास भुगोल अश्या अनेक अनेक विषयांवर बोलत रहायचास…. आम्ही ऐकत रहायचो, कोण सोडतेय ती मेजवानी!!!

आठवण येते तूझी खरचं खरचं खूप….. माझी ही भारतवारी होण्याआधि तू स्वप्नात आला होतास माझ्या, म्हणालास मामाला सांग काळजी करू नकोस!!!… गेल्या सहा वर्षात दुसऱ्यांदा स्वप्नात आलास, तू गेलास असे कधी वाटतच नाही रे पण!!मामाला सांगितले तर मामा म्हणाला, “मनी वसे ते स्वप्नी दिसे” म्हटलं असेलही तसेही असेल पण तू मनात तसाच आहेस हे पक्कं, आणि रहाशीलही तसाचं!!! तू लहानपणी सांगितलेल्या ध्रूवबाळाच्या गो्ष्टीसारखा, अढळ आम्हा नातवंडांच्या मनोराज्यात…..

तूला आठवतेय एकदा मला गावाहून यायला उशीर होणार होता, मी नासिक-रोडला जाण्यापेक्षा गावात उतरले आणि तूझ्या घरी आले रहायला…. रात्री दिड वाजला असावा पोहोचायला, तू चादर झटकून मच्छरदाणी लावून ठेवली होतीस, मी तूला विचारलेही, “वर्षानूवर्षे बघतेय बापू , मच्छरदाणी लावायचा कंटाळा नाही का हो येत तूम्हाला? ” आता जाणवतेय…. तूझी मायेची, प्रेमाची पद्धत होती ती…. न बोलता, न जाणवू देता छत्र धरलेस तू आमच्यावर सतत!!! माझ्या दहावी- बारावीच्या रिझल्ट्स नंतर तू लिहीलेली पत्रं आहेत अजूनही माझ्या नासिकच्या पेटीत, दर सुट्टीत वाचते मी ते…. शब्द दिसतात ते डोळ्यांना आणि डोक्यावर मायेचा हात फिरतो तूझा!! कोणाला काही बोलत नाही मी…. किंबहूना आम्ही कोणीच कोणाला काही सांगत नाही, बहुधा आम्हा सगळ्यांच्या अस्तित्वातले तूझे असणे आम्हाला सगळ्यांना आकळलेय…..

तूझ्या शेवटच्या वाढ्दिवसाला मी तूला एक बॅग दिली होती, अश्याच एका २३ नोव्हेंबरला मी ऑफिसला दांडी मारून ती तूला द्यायला आले होते, ईशानचा हात धरून चालताना पाहिले तू उभा आहेस पायऱ्यांवर…. मला पाहून म्हणालास, ” ये तुझीच वाट पहात होतो!!!” आजी म्हणालीही, ” तू कळवलं होतसं का येणार म्हणून, हे जेवायला का थांबलेत तूझ्यासाठी? ” मी नव्हतं कळवलं बापू तुम्हाला, मग तूम्हाला कसे कळले मी येणार म्हणून हे विचारायचेच राहिले तेव्हा आणि मग राहूनच गेले….. तूम्ही २६ ला निघून गेलात दुरच्या प्रवासाला… असेच अचानक न सांगता…..

ICU मधे तुमच्या पायांजवळ मी आणि दादा उभे होतो ….. तूम्ही पडलेले आहात पलंगावर म्हटल्यावर मी नकळत तूमचे पाय दाबले…. लहानपणापासूनची सवय आम्हाला ती…. तूमचे पाय कायम दूखायचे….. ते दाबायचा आम्हाला कंटाळा यायचा नेहेमी, पण तूम्ही पुरे आता थांबा असे काही म्हणायचा नाहीत…. मी ही तेच करते मग ईशान दणादण नाचतो माझ्या पायावर…. तूम्ही कायम आठवता तेव्हा!!! मग मी त्याला म्हणते, “काय करणार हेरेडिटी आहे 🙂 ” तूमच्याच स्टाईलमधे!!! त्यादिवशी तूमचे पाय हातात घेतले, किती ओळखीचा होता तो तळवा बापू आमच्या… अजूनही मला तूमचा तळपाय, नखांची ठेवणं आठवतात … ते पाय एका अत्यंत कष्टाळू माणसाचे आहेत आणि तो माणूस माझा शंकऱ्या होता….. एका अपघाताने आ्मच्यापासून अचानक हिरावलेला….

कालच्या वाढदिवसाला तू पुन्हा आठवलास, रडले मी एकटीच!!! तूझे माझे मैत्र बरेचदा जगते एकटीच तसेच पुन्हा एकदा….खूप घटना आठवतात तूझ्या आठवणीबरोबर, हळवे व्हायला होते मग!!! ब्लॉग लिहीतेय ना तेव्हापासून बरेच जण विचारतात तू आधिपासून लिहायचीस का? … मी हसून उत्तर देते, “हेरेडिटी आहे ना 🙂 ….. दोन्ही आज्या, आजोबा , आई, मावशी शिक्षक आहेत माझे!! ” कालच्या बक्षिसाचे नाव वाचले आणि शंकऱ्या तू डोळ्यासमोर आलास, तूझाच अग्रलेख वाचून दाखवणारा….. देशदूत,गांवकरीचा सहसंपादक, संपादक अशी मुशाफिरी आठवली तूझी!!! लिहायचास भन्नाट, खरं खूरं, आडपडदा न ठेवता… कधी हळवं, कधी कणखरं!!!

काल तूला सांगायचे होते रे स्टार माझाने घेतलेल्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगला, लिखाणाला मान्यता मिळालीये….. शंकऱ्या आता मला कोणी विचारेलही, कसं लिहीतेस?? काय सांगू….. सांगू खरं खरं आमच्या शंकऱ्याचा वारसा आहे हा….. त्याच्याईतके व्यासंग मिळवायला हा जन्म नाही पुरायचा मला….तरिही लिहावेसे वाटण्याची उर्मी त्याने दिलीये मला…. तू आणि बाबा दोघेही लिहीणारे, दोघांची पद्धत वेगळी, पण माझ्यावरचे संस्कार तूम्हा दोघांचे!! परवा बाबांना फोन केला, रिझल्ट सांगायला, त्यांचे पाणावलेले डोळे इथून पाहिले मी….. शंकऱ्या तूलाही झालाय ना आनंद!!!!

काल तूझ्याशी खरंच खूप बोलायचे होते रे… खरंच खरंच….तूझे पाय न कंटाळता दाबून द्यायचेत मला…. यावेळेस १-१०० म्हणेन तूझे पाय दाबताना तर आकडे गाळणार नाही मी लहानपणी गाळायचे तसे… खरचं रे!!!

शंकऱ्या, म्हणं ना बेबी शरयू…………………………………………….

निकाल….

स्टार माझा चे निकाल नुकतेच जाहीर झालेत….

’सहजच’ ला विजेत्यांच्या यादीतले सहावे स्थान मिळालेय!!! खरं तर सकाळी जी-मेलला लॉगईन केले तेव्हा सगळ्यांचे अभिनंदनाचे मेल्स पाहिल्यावर या निकालाची आठवण झाली, आणि प्रत्यक्ष निकाल पाहून मनापासून आनंद झाला!! 🙂

संपुर्ण यादी इथे आहे…

ब्लॉग माझा-३ स्पर्धा : निकाल आणि विजेते ब्लॉग्स

स्टार माझा तर्फे,ब्लॉग लेखकांसाठी,प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धा घेण्यात आली होती. नुकतेच याचे विजेते जाहीर करण्यांत आले असून विजेत्यांची नावे व ब्लॉग्स खालील प्रमाणे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे.http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

दिड दोन वर्षाचा ब्लॉग कारकिर्दीत, मला लॅपटॉपवर काम करताना बघूनही चिडचिड न करणाऱ्या माझ्या नवऱ्याचे आज मला आभार मानायचे आहेत!! मला सातत्याने विषय पुरवणारी माझी मुलं , कायम प्रोत्साहन देणारे माझे आई-बाबा, बहिण,आजी, मामा सगळ्यांचे आभार!! स्टार माझाचे आणि परिक्षकांचेही विशेष आभार!!

या ब्लॉगवर प्रेम करणारे (किंबहूना या खर्डेघाशीला सहन करणारे) वाचक आणि ब्लॉगमूळे मिळालेले अनेक मित्र-मैत्रीणी यांचे मनापासून आभार!! तुम्ही सगळे आहात म्हणून ब्लॉगचा कोंबडा त्याचा तूरा मानाने मिरवतोय!!

तरिही यादीत स्वत:चे नाव शोधताना नकळत श्रीताई, हेरंब, रोहन, विद्याधर कुठे आहेत ते आधि शोधले जात होते…. श्रीताईचे नाव दोन्ही याद्यांमधे नाही हे पाहून सखेद आश्चर्य वाटतेय!!! हेरंब, रोहन , विद्याधर, नचिकेत उत्तेजनार्थ म्हणून पाहून देखील आनंद की आश्चर्य ह्या संमिश्र भावना मनात आहेत!!

परिक्षकांचे मतं आणि आपले वैयक्तिक मत यात अंतर असणारच असे जरी मान्य केले तरी माझ्या यशात काहितरी सुटलेय हा विचार मनात कायम रहाणार आता!!

सगळ्या विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन!!!

अ ब क ड ई…. किंवा दळण… किंवा काहिेही….

काल आठवलेला दिवाळीतल्या दिवसातला एक प्रसंग, आम्ही एका ओळखीच्यांकडे त्यांच्याच निमंत्रणानूसार गेलो होतो. नेहेमीप्रमाणे स्वागत छान पार पडले आणि गप्पा रंगायला लागल्या….. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकायला लागला तसा एक अस्वस्थपणा पसरत होता तिथे….. आम्हाला दिलेली वेळ आम्ही पाळलेली होती, मग चुकतेय काय ते समजेना….. घरातली लोकं घड्याळ पहात होते आणि मी चिडून नवऱ्याकडे पहात होते कारण सद्य मंडळी त्याच्या ओळखीची होती 🙂 तेव्हढ्यात त्या घरातलं २२-२३ वर्षाचं शेंडेफळ मित्रांकडचा फराळ आटोपून घाईघाईने घरात प्रवेशलं….. त्याने आल्या आल्या आमची दखलही न घेता आधि टिव्ही लावला आणि त्याच्याकडे आनंदाने पहाणाऱ्या त्याच्या आईकडे पाहून विचारले, “सुरू नाही ना झालं अजून?? ” माँसाहेब उत्तरल्या, “नाही जरा आहे वेळ अजून!!!”

अजूनही आम्हाला उलगडा होत नव्हता की असे काय आहे ज्याबद्दल सारे घर टिव्हीकडे ईतके आतूरतेने पहातेय!! टिव्ही पहाण्याला माझा विरोध कधीच नाही, मी स्वत: भरपुर टिव्ही पहाते… अगदी सगळ्या सिरियलांची अपनेको लिंक होती है!!! पण निदान कोणिही आले तर टिव्ही बंद ठेवावा हा नियम मी पाळते, त्यात जर आपणच निमंत्रण केले असेल तर मुलांनाही सांगितलेले असते की टिव्हीसमोर बसायचे नाही!!! लेकिन कुछ साल पहलेके किस्से मे बात अलग थी….. आता मला राग न येता उत्सूकता वाटत होती की ये राज है क्या?? माझे प्रश्न बहुधा चेहेऱ्यावर दिसले असावेत कारण त्या घरातल्या काकांनी कसंनूसं हसत सांगितलं आज किनई अवंतिकाचा शेवटचा भाग आहे, यांना फार नाद हो सिरियलांचा….. आता आज ती अवंतिका काय निर्णय घेते हा प्रश्नच आहे बघा, जाते परत सौरभकडे की नाही राम जाणे!!!  🙂

त्यादिवशी त्या फ्यामिलीचा जरा राग आला होता…. ठीक आहे पहायचाय ना तुम्हाला अवंतिकाचा शेवट मग आम्हाला का बोलावलतं वगैरे !!!! नंतर हा प्रसंग विसरलेही ….. काल मी स्वत:च टिव्ही पहात होते, कुठली एक सिरियल असे नाही सांगू शकत सॉरी….. म्हणजे मी पोळ्या आटोपल्यावर टिव्ही लावला तेव्हा लावला झी टिव्ही , हल्लीचं माझं आवडतं च्यानल….. पुर्वी नुसतं झी नसून ते झी मराठी होतं पण असंभवच्या वेळेसचं चऱ्हाट पाहिलं आणि सध्या मी माझा मराठी बाणा त्यागून भारतीयत्व स्विकारलयं….. आजकल हम बहूत हिंदीच देखते है, वैसे मधे कधीतरी आम्ही सारे खवय्ये देखते है, उसमेकी अट अभी भी वहीच है की प्रशांतबाबू दामलेच पाहिजे सुत्रसंचालन मे….. शेफ निलेश होंगे तो हम शेफली च्यानलवा बदलते है!!! रानी गुनाजीजी अगर कम बोलनेका गुन अपनावे तो हम शायद गुरूवार/शुक्रवार को भी मराठी देखेंगे!!! लेकिन सध्यातरी हिंदीच….

तश्या मराठीवर लज्जा सारख्या वेगळ्या विषयांवरच्या मालिका आहेत म्हणा, लेकिन हम हिंदीच देखते है ना आजकाल :)…. मधे कुठल्यातरी एका ब्रेकात (हो हे ब्रेक प्रकरण जाम सहीच आहे… च्यानलवाले कितीही पोटतिडकीने ओरडले की कुठेही जाऊ नका आम्ही आलोच बिलोच तरी मी का त्यांच ऐकू??? तेव्हा ब्रेकात रिमोट नक्कीच शिव्या घालत असणार एकूणातच तमाम प्रेक्षकांना, ब्रेकात रिमोटच्या बटनांवर तबला खेळला जातो अक्षरश:  ..) मी ’माझिया प्रियाला..” नावाचा प्रकार पाहिला होता , चकचकीत वातावरण आणि डायलॉग्स, आणि कटकारस्थाने का जाणे पण ओळखीची वाटली जरा मग उलगडा झाला हिंदी-मराठी बहेन बहेन हा नारा पुकारत एकता ताई इथेही दाखल झाल्यात!!!! हिंदी च्यानलांवर मराठी कुटूंब दाखवत त्या मराठीला सरावल्या असाव्या किंवा त्या सिरियलांचा टिआरपी पहाता मराठी लोक जास्त रिकामटेकडे आहेत हा निष्कर्ष त्यांच्या चतूर मनाने काढला असावा…. कारण काहिही असो मला हे प्रकरण पटले नाही तेव्हा नकोच ती सिरियल म्हणून ती बंद झाली!!!

तर >>>> काल मी स्वत:च टिव्ही पहात होते, कुठली एक सिरियल असे नाही सांगू शकत सॉरी.<<<< पासुन पुढे ….. तर वाळवंटात गॅससमोर उभे राहून पोळ्या करण्याचे दिव्य पार पाडले की मी अर्धा तास किचनकडे फिरकतही नाही, मठ्ठासारखी टिव्ही समोर बसते (म्हणजे असे काही कारण हवे असेच नाही , एरवीही मी माझ्या सिंहासनावर बसू शकते… टिव्ही समोरच्या आमच्या खुर्चीला नवरा माझे सिंहासन म्हणतो ;)) अगले जनम, पवित्र रिश्ता, ज्योती, तारक मेहेता, बात हमारी पक्की है, सास बिना ससुराल, बंदिनी , राम मिलाए जोडी, बाबा ऐसो वर….वगैरे वगैरे कोणतेतरी कार्यक्रम जोडीने, तिकडीने वगैरे चाललेले असतात… आपल्याला विषेश काही करायचे नसते  एका ब्रेकात (किंवा अधेमधेही) केव्हाही दुसरे च्यानल बदलायचे आणि सिरियली पहायच्या किंवा ऐकायच्या…. दोन्ही प्रकारात काही फरक पडत नाही कारण तत्सम सिरियलींमधे ऍक्टिंग केलीच पाहिजे अशी अट सहसा नसते त्यामूळे चलता है…. अपवाद तारक मेहेता आणि अगले जनम चा….

हे करत असताना माझ्या अचानक मनात विचार आला अरेच्या त्या दो सहेलियाँ नावाच्या सिरियलीचे काय बुवा झाले शेवटी??? आणि हाच होता तो टर्निंग प्वाईंट आणि पोस्टचा विषय!! 🙂 नमनाला टॅंकरभर तेल ओतलेय ना 🙂 दिवाळी आहे ना सध्या तळातळी चाललीये घरात म्हणून पोस्टेवरही अंमल तेलाचा जास्त हात 🙂

असो, आजका घर बैठे लखपती का सवाल है बेटियाँ, काशी, देवी, अंतरा, दो सहेलियाँ… , कसोटी जिंदगी की, १२/२४ करोल बाग, कुमकूम , वहिनीसाहेब, जुन्या वैतागात बनेगी अपनी बात ….. ह्या माझ्या माहितीतल्या आणि आत्ता आठवलेल्या काही आणि असल्याच अनेक सिरियलांचा शेवट कोणी पाहिलाय का?????? मी तर नाही पाहिलेला… मग जर सिरियलवाले एखादी सिरियल शेवटापर्यंत दाखवू शकत नाहीत, या दळणाचे पीठ पाडतात आणि पोळी करत ना्हीत तर ते दळण पहायचे का?? आहे किनई सच्चा सवाल???आज मला त्या अवंतिकाचा शेवट आमच्याकडे दुर्लक्ष करूनही नेटाने पहाणाऱ्या का्कूंचे कौतूक वाटले एकदम…. म्हटलं वर्षानूवर्षे आपण ज्या पीडेला अर्धा तास देतो आयुष्यातला त्याचा शेवट दाखवणे हे सिरियलवाल्यांचे कर्तव्य आणि आपला अधिकार आहे!!! 🙂

हे मी ईतरांना नाही स्वत:लाच विचारले काल!!! बरं मग राग आला तो स्वत:चाच कारण किती वेळ वाया जातो आपला आणि तरिही शेवट काय ईतपत उत्सूकताही असू नये आपल्याला… की या अनादी अनंत दळणाची सवय लागलीये आपल्याला…. म्हणजे अनेक जे अघोषित अलिखीत नियम असतात तसाच एक की सिरियलांना शेवट बिवट काही असू नये….

अपवाद मगा म्हटल्याप्रमाणे अगले जनम आणि तारक मेहेताचा….. अगलेजनम केवळ ताकदीच्या अभिनयासाठी आणि कथेच्या वेगळेपणासाठी , तर तारक मेहेता बद्दल काय बोलावे , अत्यंत हलकेफूलके पण उत्तम विषयांची सुंदर मांडणी यासाठी हे सोडले तर बाकि नुसतेच विषय वेगळे पण मसाला जुना असला प्रकार येतो समोर!!! राजा शिवछत्रपती दुसऱ्यांदा दाखवल्यावरही मी पुन्हा पाहिले आणि निष्कर्ष काढला महाराज आजच्या या रटाळ टिव्हीतल्या हिरोंमधेही राजा आहेत…. एकही दिवस पुन्हा कशाला पहायचे हे असे वाटले नाही ….

दरवर्षा अखेरी मनात आपण आढावा घेतो ना वर्षभर काय तीर मारलेत याचा, मी पण घेते…. मग मला नेमेची येतो मग पुन्हा हिवाळा (कारण वर्षाखेरी हिवाळा असतो 😉 ) या नियमाने आ्पण वर्षाच्या फर्स्ट हाफ मधे जरा सद्वर्तनी झालो होतो, टिव्ही आणि तत्सम गोष्टींवर कमी वेळ घालवायचो हे आठवते, त्याचबरोबर सेकंड हाफात आधिचे नियम विसरत अंगात आळशीपणा वाढवत आपण खूप टिव्ही पा्हिला वगैरे जाणीव होते …. मग मी नित्यनेमाने टिव्ही डाएट आखते….

तरिही जाता जाता मनात येतेच की पुर्वीच्या म्हणजे मला आठवतात तेव्हाच्या सिरियल्स मधल्या (ज्या १३ भागाच्या असायच्या) तलाश, एक आभाळ संपलं, पार्टनर, ईंतजार,हमराही  जरा पुढच्यांमधे हसरतें, साँस, ई.ई. आठवतात मग…. पुन्हा जाणवते ठराविक भागांचे बंधन हवेच…. आणि त्यांना नसेल ते पाळता येत तर निदान आपल्या स्वत:वर तरी बंधन हवेच … कशाला पहायच्या ईतक्या लांबलचक, अनिर्णित, अशेवट असणाऱ्या कहाण्या ??? चूकून कथा लिहीणार होते पण ’कथा’ नसतेच काही या रवंथात…. नको नको नकोच ते!!!!

थोडक्यात या दिवाळीपासून पुन्हा एक जुनाच संकल्प नव्या दमाने, ” हम अब ये सिरियल्स कमच देखेंगे!!! हमको वैताग ज्यादा नको आहे!! मोजक्या सिरियली देखेंगे… नॅट Geo, डिस्कवरी वगैरे देखेंगे…ऍनिमल प्लॅनेट मे जब किडे-माकूडे, साप, माकडं नही होंगे तो वो भी देखेंगे !!!!ब्रेकमे गप्प बसेंगे ई.ई….  ” इथे स्मायली टाकणार होते पण संकल्पाचे गांभीर्य लक्षात घेता स्मायली टाळलेला आहे…. 🙂 आणि तो इथे टाकलेला आहे!!!

आता या असल्या पोस्टला नाव देणे म्हणजे कठीण , पण एकता मातेच्या धसक्याने हल्ली मी ’क’लाच काय तर अ ब क ड ई सगळ्यालाच घाबरते म्हणून ते, किंवा सिरियलांचे (हवे तर मालिका म्हटले तरी चालेल, मी सिरियली म्हणते म्हणून ते लिहीलेय ) दळण किंवा अक्षरश: काहिही आपल्या आवडीनूसार 🙂

शेवटाचे महत्त्व मला वेळीच समजले नसल्यामूळे ज्या काकुंवर मी क्षणिक राग धरला होता त्या उदार मनाने मला माफ करतील अशी आशा ( कारण वर उल्लेखलेल्या अनेक सिरियलींची त्यांना लिंक असते मग त्या माझ्याशी त्याच विषयावर बोलतात :)) मनात धरत आता या पोस्टचा शेवट इथेच…

समाप्त!!