शंकऱ्या….

काल तुझी जाम आठवण आली …. जाम म्हणजे जामच…. आता म्हणशील ना ’हा जाम शब्द कुठला??’ … हा आम्ही तेव्हाही वापरायचो, तू होतास तेव्हा… तुझ्यासमोर त्याला ’फार’ असे म्हणायचो…. शब्द महत्त्वाचा नाहिये रे….. काल ’जाम’ आठवण आली , नेहेमीच येते पण काल खरचं I missed u…. काल तुझा वाढ्दिवस होता….. गेलास सहा वर्षापुर्वी तेव्हा बहुतेक ७४ वर्षाचा होतास तू….. काल ८०चा झाला असतास…..

शंकऱ्या…. शंकर रामचंद्र घमंडी…. किती चिडवायचे मी या ’घमंडी’ आडनावावरून, म्हणायचे तुमच्या नावातच घमंड आहे…. तूझ्या ऐवजी मामा उत्तर द्यायचा नेहेमी, ’कुळकर्णी’ कुठलं चांगलयं … चौकात ’ए कुळकर्णी’ असं ओरडलं तर दहा जण धावतील, आडनाव हवं आमच्यासारखंच….. 🙂 … तू बोलायचा नाहीस तेव्हाही , मिश्किल भाव चेहेऱ्यावर ठेवत तू चालू द्यायचास आमची जुगलबंदी!!!! मग काहितरी एक भन्नाट मार्मिक वाक्य बोलायचास की सगळे्च गप्प व्हायचे!!

असे तरी गप्प करायचास नाहितर रागावून तरी…. काय टाप होती कोणाची तू रागावलास की बोलायची??? तुझा तो जमदग्नीचा अवतार पाहिला की भले भले गप्प व्हायचे…. मग आजी म्हणायची ,” अगं आतातरी निवळलेत, पुर्वी तर आणि कडक होते हे!!!”सगळे तूला घाबरून असायचे असे नाही म्हणणार पण मी, आम्हा सगळ्यांना विलक्षण आदर आणि प्रेम होते तुझ्याबद्दल…. ’होते’ म्हणू की ’आहे’ म्हणू….. आहेच म्हणते….. हो आहेच!!! आम्ही सगळे जमलो की, “आठवतं तेव्हा बापू असे म्हणाले होते.. ” हे वाक्यं दर दोन-तीन वाक्यांनंतर पुर्णविरामासारखं येतचं!!!

सगळे तूला ’बापू’ म्हणायचे, म्हणतात…. ’शंकऱ्या’ म्हणायला धजावणारी मीच….. मला तू दिला होतास तो अधिकार…. पुलं चे असामी पहिल्यांदा ऐकले ते तुझ्याच पलंगावर बसून…. इथे “तुझ्याच पलंगावर” हे महत्त्वाचे…. ईतर कोणी निदान तुझ्यासमोर तरी हा पराक्रम करायचे नाही…. ईगतपुरीला लहानपणी मी झोपायलाही बरेचदा तुझ्या मच्छरदाणीत यायचे… तू येऊ द्यायचास, ’ताई वळवळ करत नाही झोपली की..’ असे तू ईतर नातवंडांना सांगायचास, मग मी त्यांना तू झोपण्याआधि मला एकटीला सांगितलेली तुझ्या लहानपणीची आठवण सांगायचे….जाम स्पेशल आहोत आपण असं वाटायचं मला तेव्हा!!! अनेकदा वाटलं , “बापूसाहेबांची नातं का तू!!!” असं लोक विचारायचे तेव्हा दरवेळेस वाटलं तसं….असामि ऐकल्यानंतर तूला मी एकदा ’शंकऱ्या’ अशी हाक मारली होती आठवतं, आजीच्या हातातून भांड निसटायचं बाकि राहिलं असावं किचनमधे….. तू हसून म्हणालास, ” कर्ट नव्हे बेबी शरयू स्कर्ट स्कर्ट 🙂 ” तेव्हापासूनची आपली मैत्री पक्की होती….. तुझा कप्पा आवरणे हा एक काय नाद होता मला राम जाणे… मी आवरणार, तुझी कागदपत्र हरवणार हे नित्याचे…. ’झंडू बाम’ हा प्रकार तर किस्सा आहे, रोज न चुकता ते हरवायचे, मग तू रागावायचास आणि मी तुझ्यावर रागावायचे!!!

तुझा राग कित्येकदा आलाय तसा, मामाने दिलेले फटाक्याचे पैसे तू काढून घेतलेस तेव्हा रागावले होते मी तुझ्यावर… प्रचंड त्रागा केला होता,  मी जे जे बोलले ते घरी समजले आणि आश्चर्य म्हणजे मला कोणीच रागावले नाही…. प्रतिकूल परिस्थीतून शिकत तू एका शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंतचा केलेला खडतर प्रवास, त्यामूळे पैसे जपून वापरावेत असे असणारे तू्झे विचार असो…. की राजकारण, समाजकारण, कायदे, ईतिहास, साहित्य अनेक अनेक क्षेत्रातला तूझा व्यासंग असो आम्हा नातवंडांना हळूहळू जाणवणार, समजणार, उमजणार आहे हे तूम्ही ओळखून होतात…. काहिही असो, पण जशी मी मोठी होत गेले, तूझ्या स्वभावाचे बारकावे समजत गेले!!! लहानपणी तूझा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून जो काही धाक कधी वाटला असेल पुढे तो ही वाटला नाही… उरला तो आदर!! तूझ्या स्वभावात दरारा आहे पण त्याचबरोबर एक अत्यंत मिश्किल, खोडकरं मुलं लपलेलं आहे तुझ्यात , एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि अत्यंत हळव्या मनाचा तू मालक आहेस हे उमजत वयाची २० वर्ष पार करावी लागली मला!!!

माझी आई तुझी सगळ्यात लाडकी, ती श्रीदेवीसारखी दिसते असं तू म्हणाला होतास आठवतयं , काय हसलो होतो आम्ही सगळे…. मग मी तूला हळूच विचारले होते, “बापू श्रीदेवी कोण माहितीये ना तुम्हाला?” 🙂 चाट पडले होते मी तूझे उत्तर ऐकून,” ती गं मि.ईंडियातली नटी :)” …. तूझे हे रूप नवे होते…. मोजकचं बोलायचास तू…. आयूष्यच आखिव रेखीव होतं तुझं…. अलिप्त असायचास तरी आमच्यात असायचास….. की तूझ्यातल्या विद्वत्तेची जाण असल्यामूळे आम्ही एक अंतर राखायचो तुझ्याशी राम जाणे!!! आजीशी अजूनही मनमोकळं बोलतो आम्ही, तुझ्याशी संवाद व्हायचा मात्र हे नक्की!! नुसता नावाचा ’बापू’ बाकि गांधिजींशी कूठलेही साम्य नव्हते तूझे, राजकारण हा शब्द आला आणि, “एकजात हरामखोर सगळे.. ” अशी तू सुरूवात केलीस की फार आवडायचे मला, कारण या सुरूवातीनंतर तू शिवाजी महाराज, औरंगजेब, ज्ञाने्श्वरी, पासून ते आजकालचे कायदे, राजकारण, राजकारणी, ईतिहास भुगोल अश्या अनेक अनेक विषयांवर बोलत रहायचास…. आम्ही ऐकत रहायचो, कोण सोडतेय ती मेजवानी!!!

आठवण येते तूझी खरचं खरचं खूप….. माझी ही भारतवारी होण्याआधि तू स्वप्नात आला होतास माझ्या, म्हणालास मामाला सांग काळजी करू नकोस!!!… गेल्या सहा वर्षात दुसऱ्यांदा स्वप्नात आलास, तू गेलास असे कधी वाटतच नाही रे पण!!मामाला सांगितले तर मामा म्हणाला, “मनी वसे ते स्वप्नी दिसे” म्हटलं असेलही तसेही असेल पण तू मनात तसाच आहेस हे पक्कं, आणि रहाशीलही तसाचं!!! तू लहानपणी सांगितलेल्या ध्रूवबाळाच्या गो्ष्टीसारखा, अढळ आम्हा नातवंडांच्या मनोराज्यात…..

तूला आठवतेय एकदा मला गावाहून यायला उशीर होणार होता, मी नासिक-रोडला जाण्यापेक्षा गावात उतरले आणि तूझ्या घरी आले रहायला…. रात्री दिड वाजला असावा पोहोचायला, तू चादर झटकून मच्छरदाणी लावून ठेवली होतीस, मी तूला विचारलेही, “वर्षानूवर्षे बघतेय बापू , मच्छरदाणी लावायचा कंटाळा नाही का हो येत तूम्हाला? ” आता जाणवतेय…. तूझी मायेची, प्रेमाची पद्धत होती ती…. न बोलता, न जाणवू देता छत्र धरलेस तू आमच्यावर सतत!!! माझ्या दहावी- बारावीच्या रिझल्ट्स नंतर तू लिहीलेली पत्रं आहेत अजूनही माझ्या नासिकच्या पेटीत, दर सुट्टीत वाचते मी ते…. शब्द दिसतात ते डोळ्यांना आणि डोक्यावर मायेचा हात फिरतो तूझा!! कोणाला काही बोलत नाही मी…. किंबहूना आम्ही कोणीच कोणाला काही सांगत नाही, बहुधा आम्हा सगळ्यांच्या अस्तित्वातले तूझे असणे आम्हाला सगळ्यांना आकळलेय…..

तूझ्या शेवटच्या वाढ्दिवसाला मी तूला एक बॅग दिली होती, अश्याच एका २३ नोव्हेंबरला मी ऑफिसला दांडी मारून ती तूला द्यायला आले होते, ईशानचा हात धरून चालताना पाहिले तू उभा आहेस पायऱ्यांवर…. मला पाहून म्हणालास, ” ये तुझीच वाट पहात होतो!!!” आजी म्हणालीही, ” तू कळवलं होतसं का येणार म्हणून, हे जेवायला का थांबलेत तूझ्यासाठी? ” मी नव्हतं कळवलं बापू तुम्हाला, मग तूम्हाला कसे कळले मी येणार म्हणून हे विचारायचेच राहिले तेव्हा आणि मग राहूनच गेले….. तूम्ही २६ ला निघून गेलात दुरच्या प्रवासाला… असेच अचानक न सांगता…..

ICU मधे तुमच्या पायांजवळ मी आणि दादा उभे होतो ….. तूम्ही पडलेले आहात पलंगावर म्हटल्यावर मी नकळत तूमचे पाय दाबले…. लहानपणापासूनची सवय आम्हाला ती…. तूमचे पाय कायम दूखायचे….. ते दाबायचा आम्हाला कंटाळा यायचा नेहेमी, पण तूम्ही पुरे आता थांबा असे काही म्हणायचा नाहीत…. मी ही तेच करते मग ईशान दणादण नाचतो माझ्या पायावर…. तूम्ही कायम आठवता तेव्हा!!! मग मी त्याला म्हणते, “काय करणार हेरेडिटी आहे 🙂 ” तूमच्याच स्टाईलमधे!!! त्यादिवशी तूमचे पाय हातात घेतले, किती ओळखीचा होता तो तळवा बापू आमच्या… अजूनही मला तूमचा तळपाय, नखांची ठेवणं आठवतात … ते पाय एका अत्यंत कष्टाळू माणसाचे आहेत आणि तो माणूस माझा शंकऱ्या होता….. एका अपघाताने आ्मच्यापासून अचानक हिरावलेला….

कालच्या वाढदिवसाला तू पुन्हा आठवलास, रडले मी एकटीच!!! तूझे माझे मैत्र बरेचदा जगते एकटीच तसेच पुन्हा एकदा….खूप घटना आठवतात तूझ्या आठवणीबरोबर, हळवे व्हायला होते मग!!! ब्लॉग लिहीतेय ना तेव्हापासून बरेच जण विचारतात तू आधिपासून लिहायचीस का? … मी हसून उत्तर देते, “हेरेडिटी आहे ना 🙂 ….. दोन्ही आज्या, आजोबा , आई, मावशी शिक्षक आहेत माझे!! ” कालच्या बक्षिसाचे नाव वाचले आणि शंकऱ्या तू डोळ्यासमोर आलास, तूझाच अग्रलेख वाचून दाखवणारा….. देशदूत,गांवकरीचा सहसंपादक, संपादक अशी मुशाफिरी आठवली तूझी!!! लिहायचास भन्नाट, खरं खूरं, आडपडदा न ठेवता… कधी हळवं, कधी कणखरं!!!

काल तूला सांगायचे होते रे स्टार माझाने घेतलेल्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगला, लिखाणाला मान्यता मिळालीये….. शंकऱ्या आता मला कोणी विचारेलही, कसं लिहीतेस?? काय सांगू….. सांगू खरं खरं आमच्या शंकऱ्याचा वारसा आहे हा….. त्याच्याईतके व्यासंग मिळवायला हा जन्म नाही पुरायचा मला….तरिही लिहावेसे वाटण्याची उर्मी त्याने दिलीये मला…. तू आणि बाबा दोघेही लिहीणारे, दोघांची पद्धत वेगळी, पण माझ्यावरचे संस्कार तूम्हा दोघांचे!! परवा बाबांना फोन केला, रिझल्ट सांगायला, त्यांचे पाणावलेले डोळे इथून पाहिले मी….. शंकऱ्या तूलाही झालाय ना आनंद!!!!

काल तूझ्याशी खरंच खूप बोलायचे होते रे… खरंच खरंच….तूझे पाय न कंटाळता दाबून द्यायचेत मला…. यावेळेस १-१०० म्हणेन तूझे पाय दाबताना तर आकडे गाळणार नाही मी लहानपणी गाळायचे तसे… खरचं रे!!!

शंकऱ्या, म्हणं ना बेबी शरयू…………………………………………….

Advertisements

37 thoughts on “शंकऱ्या….

  • आशू अगं या पोस्टवरच्या कमेंट्सवर काय उत्तर देऊ हेच समजत नव्हते….

   बापुंची आठवण आहेच गं आपल्या सगळ्यांच्या मनात… एकदा आपण सगळे एकत्र भेटूयात आता आजीसाठी….

  • हेरंबा अरे ज्यांच्याबद्दल लिहीलयं ते मला खरचं हवे होते हा निकाल ऐकायला… किंबहूना आजी-आजोबा कायमच हवे असतात नाही आपल्याला….

 1. सुमन लग्न होऊन गेली व तिने आमच्या वाड्यातील जागा ही सोडली. तेव्हा ती घमंडी झालीय इतकेच अंधूक आठवत असावे ! पुढे सुमन माहीत झाली तुझ्यामुळे व नंतर प्रत्यक्षच भेटून आलो सगळ्यांना. अर्थात तेव्हा तुझे बापू …शंकऱ्या नव्हतेच ते आत्ता भेटतायंत !

  शब्द चित्र अगदि पुलंच्या स्टाईलने ठसतंय !…तरीहि

  दोघांचा फोटो असेल तर टाक ना !

 2. नमस्कार, मी अद्वैत. मी आपला ब्लॉग स्टार माझाच्या विजेत्या यादित पाहिला म्हणून बघावं म्हटल काय लिहिले आहे, नक्कीच जबरदस्त लिखाण! मनापासून अभिनंदन.

  माला आपल्याशी संपर्क साधायचा होता पण कोठेच संपर्कासाठीची माहिती दिसली नाही म्हणून इथे लिहित आहे. कृपया राग मानू नये!

  मी व आमच्या काही सहकार्यांनी मिळून मराठी ब्लॉगर्सना एकत्र करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे.(केवळ ब्लॉगर्स असे नाही तर कोणीही join होऊ शकतो.) त्याला आम्ही “मराठी कॉर्नर” असे नाव दिले आहे. कॉर्नर का तर आम्ही मराठी म्हणून इतर भाषांचा तिरस्कार करत नाही हे दाखवायचे आहे. कारण जर स्वतःच्या आईचा मान राखत असू तर म्हणून दुस~याच्या आईचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असो, मुळ मुद्दा असा की मी आपल्याला मराठी कॉर्नरवर येण्याचे निमंत्रण देत आहे. आपल्या येण्याने निश्चितच आम्हाला आनंद होईल. आत्ता पर्यंत जवळ जवळ ६० ब्लॉगर्स जोडले गेले आहेत आणि हळू हळू का होईना पण विविध विषय मांडले जात आहेत. आपणही जरूर यावे व आपले विचार इतर ब्लॉगर्सशी मांडावेत ही आमची ईच्छा!

  आशा आहे आपण आमच्या निमंत्रणाला मान देऊन मराठी कॉर्नरच्या परिवारात सामिल व्हाल.
  मराठी कॉर्नर:http://www.marathicorner.com

  तसेच आपण आपला ब्लॉग आमच्याशी जोडूही शकता:
  http://www.marathicorner.com/memberblogs/

  कळावे!
  आपला विश्वासू,
  अद्वैत

  • अद्वैत आभार आणि ब्लॉगवर स्वागत… राग नाही मानत उलट संपर्कासाठी ई-मेल आयडी टाकतेय मी आता ब्लॉगवर….

   मराठीकॉर्नर हा निश्चितच उत्तम उपक्रम आहे…..

   • धन्यवाद! आपल्या सहकार्याची आणि सहभागाची आम्हाला सदैव प्रतिक्षा राहिल! आशा करतो लवकरच मी आपल्याला मराठी कॉर्नरवर पाहिन! बाकी ब्लॉग एकदम बेष्ट!

    कळावे!
    आपला विश्वासू,
    अद्वैत
    मराठी कॉर्नर टिम। टेक्निकल विभाग
    http://www.marathicorner.com/

  • तायडे अगं हो गं…. आपण सारे भाग्यवान आहोत….

   अश्या वेळी वाटतं की दुर असूनही आपली माणसं आपल्या ईतकी जवळ असतात यातच सारे आले!!

  • मंदार अरे काय मस्त वाटतय तुझी कमेंट पाहून 🙂

   होय रे आपले बापू होतेच असे… आपल्या सगळ्यांच्या भावना याच असणार खात्री होती मला…..

   आशूला लिहीलेय बघ की आपण सगळे एकदा एकत्र भेटुया आता आजीसाठी….

   मधूरा आणि अद्वयला आठवण सांग!!! 🙂

 3. ऑफिसमध्ये काम संपल म्हणून ब्लॉग वाचायला घेतला. ही पोस्ट वाचता वाचता टचकन डोळ्यात पाणी आलं.
  आता इथे सगळे विचारातायेत तू का रडतेयेस? काय सांगू त्यांना?
  मला जे वाटत ते तसच्या तसा शब्दात नाही मांडता येत ग तुझ्यासारखं.
  Hats off !

 4. इथल्या पोतडीतून (अर्थात नाशिकच्या [हे नाशिक का नासिक ते परत कधीतरी बघू] पेटीतपण काय काय आहे ह्याच कुतूहल आहेच) काय काय बाहेर निघेल आणि त्याचे काय रंग असतील ह्याचा कधी अंदाजच लागत नाही…
  आठवणींच्या ह्या पदराला अश्रूंची किनार असायचीच, हसू तरी आसू आणि रडू तरी पुसू 🙂
  … आणि शंकऱ्या म्हणतोच ”कर्ट नव्हे बेबी शरयू स्कर्ट स्कर्ट… “, नेहमीच!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s