रिमिक्स कापुसकोंड्या…

लहान मुलांसाठी गोष्टी सांगणे ऐकणे किती महत्त्वाचे असते नाही…. माझ्या पिढीतल्या लहानपणी आजी-आजोबा, आई-बाबा गोष्टी सांगायचे… गोष्टीची पुस्तकं वगैरे होती….

लहानपणी आमचे आजोबा जेव्हा १०-१२ गोष्टी सांगून झाल्यावर पुढची गोष्ट सांगायला कंटाळायचे तेव्हा ते ’कापुसकोंड्याची गोष्ट ’ सांगायला घ्यायचे…. 🙂 त्यालाही आम्ही बधलो नाही की ’एक किनई धान्याचे गोदाम असते, त्याची एकदा खिडकी उघडी राहिली… मग काय झालं एक चिमणी आली दाणा खाऊन गेली, दुसरी चिमणी आली दाणा खाऊन गेली, तिसरी चिमणी आली दाणा खाऊन गेली, …….’ ही न संपणारी कथा यायची 🙂  ना गोदामातले धान्य संपायचे ना येणाऱ्या चिमण्या…. एक आहे मात्र ईतर अनेक गोष्टींबरोबर या दोन्ही गोष्टीही आवडतातच!!!

आजकाल  मुलांसाठी अनेक कॅसेट्स, सिडीज वगैरे उपलब्ध आहेत गोष्टींच्या… नेटवर यूट्यूबच्या माध्यमातूनही गोष्टींचा रतीब सुरूच असतो….तरिही मला स्वत:ला मुलांना गोष्टी सांगायला आवडतात…. आपण काहितरी सांगतोय ते ऐकताना मुलांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पहाणं हाच एक आनंदसोहळा असतो….लाकूडतोड्या, कावळा-चिमणी, चल रे भोपळ्या, माकड आणि मगर, ससा-कासव, कबुतर-मुंगी पासून ते हिरण्यकश्यपू वगैरे मुलांच्या लाडक्या गोष्टी….

आजची गोष्ट जरा वेगळी आहे पण, ही गोष्ट माझ्या लेकीने मला सांगितलेली आहे… सध्या शाळांना हिवाळी सुट्ट्या सुरू आहेत… आज दुपारी मला आज्ञा झाली की मम्मा हिरण्यकश्यपू वगैरे नको आज मी तूला गोष्ट सांगते… 🙂

ऐक….

—एक असतं जंगल… घनदाट जंगल…. त्यात किनई एक तळं असतं…. त्या तळ्यात एक कासव असतं आणि एक मगर असतं…. ते फ्रेंड्स असतात… ठीके… (आमच्या माना हलल्या .. ती परवानगी गृहीत धरून पुढची गोष्ट सुरू होते ) ….हं….  ते जे कासव असतं ना कासव ते जाम जाम म्हणजे एकदम जाम दुष्ट असतं…. आणि एकदम बेशिस्त…. बेशिस्त म्हणजे बेssssशिsssssस्तssss!!!!! 🙂 (कासवातले दुर्गूण अगदी स्पष्ट केले गेलेत आमच्यासमोर… असेल त्याचा काहितरी संबंध गोष्टीत म्हणून आमच्या माना हलल्या पुन्हा एकदा )…. ते कासव अजिबात ऐकत नाही कोणाचंच…. ते त्याच्या आईला त्रास देतं… बाबांना त्रास देतं… भाऊ बहिणला त्रास देतं….

(आत्तापर्यंतच्या गोष्टीत भोपळ्यातल्या म्हातारीसारखं आणि ईतर अनेक गोष्टींसारखं आधि जंगल आलयं घनदाट, पण गोष्ट तशी आजकालच्या जगातही येत होती सारखी वगैरे विचार माझ्या मनात …. )

—ते कासव फार वाईट असतं… देवबाप्पा अश्यांना टॉलच करणार नाही…. ते काय करतं माहितीये…. तळ्यातलं पाणी रस्त्यावर टाकतं… मग त्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पडून जातात…..

—अगं त्या गोष्टीत एक मगर पण आहे ना तिचे काय?? (दादाचा एक प्रामाणिक प्रश्न )

—हो आहे ना…. ते मगर एक चड्डी घालतं ती घसरून जाते…. मग लोक त्याला शेम शेम म्हणतात….

—(डोळे वटारलेली मी ) कशाला गं विनाकारणच काहितरी खुळ्ं तुझं….नीट सांग गोष्ट…

— अगं मम्मा लोक खरंच त्याला  शेम शेम म्हणतात, परवा तूम्ही मला म्हणाले होते ना तसेच…. त्या मगरला राग येतो ते ओरडते ’शेम शेम’ नका म्हणू मी आत आणि एक चड्डी घातलीये….

(अच्छा म्हणजे परवा स्वत: न बोललेले वाक्य आता प्रत्यक्ष मगरीच्या तोंडी घालण्यात आलेले आहे 🙂 )

— ते मगर एकदा रोडवर जातं… (तंद्री लागलीये आता… वाट्टेल तिथे कल्पनाशक्ती भराऱ्या घेतेय ) मग काय होतं…. तिकडून एक गाडी जोरात येते आणि मगरला डॅश करते… मगरचा हात आणि पाय तुटतो… पण तो लगेच बरा होतो….. हवेने बरा होतो, डायरेक्ट …. मगर त्या दुखणाऱ्या हाताला म्हणते जा तू माझा हातच नाही, मग तो हात दुखेनासा होतो… पण तरिही मगर मरलंच…. 😦

—अगं बरं झालं होत ना, मग कशाला मारलंस त्याला?? ( कशाला नसते क्रौर्य असा माझा विचार )

—पण लोक त्या मगरला हॉस्पिटलमधे नेतात… त्याला ईंजेक्शन देतात…. कारण्ं द्यायचंच असतं ईंजेक्शन 🙂

— अगं मरलंय ना ते तुझ्या म्हणण्यानुसार ???? आणि कसवाचं काय झालं पुढे??? (दादा पुन्हा एकदा प्रकट झालाय)

— अंssssss

—अंsssss

—- अगं सांग ना…

—-थांब ना दादा, सोचू दे मला जरा… हं आठवलं त्या कासवचा एक मोठ्ठा कासव अंकल येतो …. आण्णि तो मोठ्ठा कासव अंकल अज्जिब्बात दुष्ट नसतो!!!! तो मोठ्ठा कासव अंकल त्या छोट्या कासवाला रागावतो आणि मग तो छोटा कासव फ्लाय करत करत हॉस्पिटलमधे मगरला भेटायला जातो……

— ए कासवाला कुठे फ्लाय करता येते का?? (दादाचा आणि एक प्रश्न 🙂 )

— येते … हो ना मम्मा…. येते ना??? तो त्याच्या दोन बर्ड फ्रेंड्स ना बोलावतो…. मग ते फ्लाय करतात…. मम्मा फ्रेंड्स हेल्प करतातच ना… करायचीच असते!!! कबुतर आणि मुंगीसारखे…..

एव्हाना लांबलेली गोष्ट पहाता दादा मधेच पळ काढतो… आणि हातात चॉकलेट घेऊन अवतीर्ण होतो…. त्याच्या हातातले चॉकलेट पाहून कथाकथनाचा कार्यक्रम थांबतो कारण ब्रेक तो बनता है भाई 🙂

कशाचा कशाशी संबंध नाही म्हणावा तर या एकाच गोष्टीत कन्यारत्नाने आधि ऐकलेल्या अनेक गोष्टी समाविष्ट झालेल्या…. त्यात स्वत:चे विचार मांडलेले….  मला मधे मधे ऍलिस ईन वंडरलॅंडची आठवण येत होती…. माझी हिमगौरी स्वत:च्याच विश्वात रममाण होती….. गोष्ट सांगताना चेहेऱ्यावर बदलणारे हावभाव अतिशय बोलके होते…..

चॉकलेट ब्रेक नंतर गोष्ट पुन्हा सुरू झाली….. पण कहानी में आता ट्विस्ट होती …..

आता चतूर सश्याने सिंहाला विहीरीजवळ आणलेय…. मग तो आधिचा लायन आणि सश्याने आणलेला लायन सरळ रेस लावतात…. ससा नेहेमीप्रमाणे प्रत्येक शर्यतीप्रमाणे झोपून जातो….. लायन्स पळतात पळतात , अचानक समोरून गाडी येते, मग ते लायन्स रस्त्याच्या कडेला सरकतात…. (आमच्या अंगणात होणाऱ्या रेसमधला प्रॉब्लेम या रेसमधेही आलाय 🙂 ) पुढे काय होतं की लायन्स पळत जातात…. आणि पहातात की कासव तर रेस जिंकलेले आहे….

पुढच्या कथनामधे पेंग्विन्स, मगर , कासव, माकडं अनेक अनेक प्राणी येतात….

एका गोष्टीमधे अनेक अनेक गोष्टी येताहेत….  माझ्या डोळ्यासमोर माझं पावणे चार वर्षाचं पिल्लू गोष्ट मला समजावून सांगतय अगदी मनापासून, मी हा सोहळा आनंदाने उपभोगतेय!!!! ’तारें जमीं पर’ च्या गाण्यातल्या काही ओळी नकळत मनात उमटताहेत…

ये हवा बटोरा करते है

बारिश की बुंदे पढते है

और आसमान के कॅन्वस पे ये कलाकारियाँ करते है!!!

 

अगदी अगदी हेच तर होतेय की, आसमान च्या कॅन्वासवर अनेक रंगाच्या मनसोक्त उधळणीने कलाकारी केली जातीये….. कधीतरी एक मन वाटतं की पिल्लूला सांगावं अगं या रिमिक्स कापुसकोंड्याच्या गोष्टीला काही अर्थ नाही लागत… पण पुन्हा वाटतं  दुनिया का ईशारा जमे रहो असतो हे तर मुलांनाही कधी तरी कळणारच आहे…. आणि प्रत्येक गोष्टीतून बोध, मॉरल मिळालाच पाहिजे असे असेल तर आज मुलांना काही न शिकवता मी शिकते काहितरी…. एक नवा धडा या ही गोष्टीचा की माझ्यासमोरच्या लहानश्या डोक्यात अनेक विचार चाललेत, सुसंगत-विसंगत या गणितात न मावणारे , कदाचित माझ्या कल्पनेच्या भरारीच्याही खूप पुढे जाणारे……. माझी मजल तोकडी असे मान्य करावे आणि रमावे या कापुसकोंड्यात पुन्हा एकदा…. 🙂

Advertisements