अपनी तो पाठशाला…..

’शाळा सुटली पाटी फुटली’ म्हणण्याचे दिवस सरून २५ वर्ष झाली…. पाचवीपासून पुढे या गाण्याची आणि पाटीचीही साथ सुटली… कॉलेज शिक्षण संपूनही साधारण दशक उलटतेय… जीवन की पाठशाला मात्र नित्यनेमाने नवनवे धडे गिरवून घेतीये…. गमतीचा भाग असा की इथे अभ्यासाचा काही भाग ऑप्शनला टाकायचा ऑप्शन नाहीये!!! किंबहूना काही बाजूला टाकावेसे वाटत नाही…

ऑप्शनच्या प्रश्नाला मी घाटातले रस्ते म्हणते… त्यालाही एक कारण आहे …. शाळेतला एक तास कायम लक्षात राहिलाय माझ्या, सर काही तरी तोंडी परिक्षा घेत होते आणि अचानक म्हणाले, ” कुलकर्णी तू सांग घाटातले रस्ते वळणावळणाचे का असतात??? ” दचकले होते मी…. मनात आले हाय रे दैवा बाकि हजार प्रश्न सोडून सरांनी मला नेमका हाच प्रश्न विचारावा…. ’ हा एकच प्रश्न मला आवडलाच नाहीये…. मला नाही आवडत याचे उत्तर लिहायला… आता लगेच “का” असे विचारू नकोस… मलाच माहित नाही,पण मी हा प्रश्न ऑप्शनला टाकलाय हे खरे!! ” हे ज्या मैत्रीणीच्या कानात मी नुकतेच कुजबूजले होते ती गालातल्या गालात हसत असलेली तशीच्या तशी आठवते मला 🙂 शाळा कॉलेजात एखादा प्रश्न/ धडा ऑप्शनला टाकल्याने विशेष काही फरक पडत नाही येव्हढे माफक शैक्षणिक चातुर्य आपल्यात आलेय याचे मला कोण कौतूक 🙂

या शाळेबाहेरच्या पाठशाळेत मात्र न चुकता कितीतरी गोष्टी कधी आवर्जून तर कधी नकळत यायला लागतात… कोणाचे अक्षर सुरेख तर कोणाची वही नीटनेटकी, मग आपण का नाही तसे असे वाटते…. लहानसहान ते मोठ्या गोष्टी मनात रुजत जातात… कधी चूकताना, कधी सुधरवताना एक तळ्यातून मळ्यातला क्षण येतो मग…. आपल्याला आपलं अक्षरं, वही ठेवण्याची पद्धतच नव्हे तर अस्तित्वं , व्यक्तिमत्त्व गवसतं!!! वय वाढतं आणि आणि शिकायच्या गोष्टींची व्याप्तीही….एक आई, पत्नी, स्त्री म्हणून असो की त्याचबरोबरचा एक स्वतंत्र व्यक्ती असो या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावरच्या पेपरमधे मात्र सगळेच गणितं सोडवायला लागतात….

विचारामागून विचार येताहेत मनात…. काही सुसंगत काही विसंगत वाटावे असे… काही असले तरी इथे मांडायचे हा नियम मोडायचा नाही म्हणून सरळ टाईप करतेय….आत्तापर्यंतची पोस्ट कधीचीच ड्राफ्ट्स मधे टाईप करुन ठेवलेली होती,जेव्हा लिहीली तेव्हा त्यात पुढे काय लिहायचे ते ही खरं तर विसरलेय मी … 🙂 आज जिथून वाटले तिथून पुढे टायपायची सुरूवात केलीये, कारण या पाठशाळेतल्या दोन नव्या टिचर्सनी नुकताच एक एक तास घेतलाय विचारांचा….

नेटवरच्या भटकंतीमधे नुकतचं हाती लागलं ते अनिल अवचटांचं पुस्तकं “सुनंदाला आठवताना..”

अनिल अवचटांबद्दलचे पैलू त्यांच्या लिखाणातून, कलेतून, पुस्तकांमधून सामोरे आले होते पण  सुनंदाताईंबद्दल तितकेसे माहीत नव्हते…. अनिल अवचटांच्या पुस्तकातले त्यांच्याबद्दलचे उल्लेख, त्या ’मुक्तांगण” या व्यसनमुक्तीच्या संस्थेशी निगडीत आहेत वगैरे झाली जुजबी ओळख ….  डॉ.आनंद नाडकर्णींच्या ’शहाण्यांच्या सायकियाट्रीस्ट ’ मधे सुनंदाताईंबद्दल उल्लेख मैत्रीण- आई म्हणून आहे!! त्या खऱ्या सामोऱ्या आल्या त्या मात्र अनिल अवचटांचा ’सुनंदाला आठवताना..’ हा लेख वाचताना…. मनात स्थान मिळवलेल्या अनेक लेखांपैकी हा एक उत्तम लेख…. त्यात अवचटांचे सहज लिखाण भावले त्याहीपेक्षा कित्येक पट अधिक भावल्या त्या सुनंदाताई….

वाक्यावाक्यागणिक थक्क व्हायला होते कधी कधी…. एका आयुष्यात किती किती गोष्टी केल्या जाऊ शकतात याची प्रचिती आली!!! आयुष्य सार्थकी लावणे म्हणतात याला…. सहानुभुती दाखवणे तसे सोपे असते पण एखाद्या कार्याला वाहून घेणे म्हणजे काय हे सुनंदाताईंच्या वागण्यातून दिसून येते!!! शेवटच्या आजारपणाच्या काळात त्यांनी दाखवलेले धैर्य, चिकाटी, खचून न जाण्याची जिद्द सगळेच स्मरणात ठेवावे असे!!! मन नकळत झूकले सुनंदाताईंना सलाम करण्यासाठी!!!

असं काही वाचलं की नकळत आपल्याही मनात सकारात्मक विचारांचे तरंग उमटतातच…. मान्य जगात बरचं काही वाईट आहे, आपल्या आजूबाजूला चुकीचेही काही ना काही घडतेच आहे तरीही त्या सगळ्यावर आपल्यापुरती तरी मात केली जाऊ शकते….. आयुष्यात , जगण्यात अर्थ असू शकतो… एक निश्चित सकारात्मक ध्येय नक्कीच असू शकते वगैरे विचार दाटीवाटी करतात मनात….

असाच अजून एक ताजा अनुभव म्हणजे कौन बनेगा करोडपती मधली पहिली करोडपती महिला, राहत तस्लीम…. शिकायची खूप ईच्छा होती पण शिकता आले नाही असं म्हणणारी…. आयुष्यभर गृहिणीची भुमिका पार पाडलेली ही महिला जेव्हा अनेक अवघड वाटणारे प्रश्न लीलया पेलत होती तेव्हा खरचं कौतूक वाटलं तीचं…. केवळ गृहिणी आहोत म्हणून जगापासून फारकत घ्यावी लागत नाही… संधी मिळताच सामान्यातले असामान्यत्व जगासमोर येतेच… किंवा तूम्ही स्टार असालच तर कधी ना कधी चमकल्याबिगर रहाणार नाही ई. धडे कसे सहज मिळतात असे काही पाहिले ऐकले की….

राहत ला पाहिले आणि वाटले पडद्याआडूनही जग ईतके सजगतेने पहाता येऊ शकते…. आम्हाला तर ईथे अडचणींचा पाढा वाचायची सवय… यांना येत नसतील का त्या??? की यांना शिकवलेय परिस्थितीने लढायला…. पुन्हा एक असे व्यक्तिमत्त्व जे आपल्या आयुष्यात नकळत एक आशेचा किरण देते!!

हे धडे गिरवले की मग वाटेवर चालताना, विचार करताना केव्हा तरी एक विचार असाही चमकतो की नसेलही कदाचित माहित की घाटातले रस्ते का असतात वळणावळणाचे, ती वळणं मात्र न चूकता न थकता जिद्दीने जोमाने तरिही पार करता येतीलच की…. नाही का????

27 thoughts on “अपनी तो पाठशाला…..

 1. ताई,
  बरेचदा आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी असामान्यत्व लपलेलं असतंच आणि ते आयुष्याच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कधीतरी समोर येतंच… वेळ वेगवेगळा लागतो किंवा कधी कधी ते चटकन डोळ्यांत भरत नाही एव्हढंच!!
  मस्त लिहिलंयस गं ताई! एकदम विचारात पडलो!

  • बाबा होय रे…. माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती सहसा आरामाची असते त्यामूळे आपल्यात लपलेले गुणांचे गाठोडे कस लागेपर्यंत आपणही शोधत नाही…..

   विचारात पडलायेस म्हणजे बहुधा तुझ्याकडून आणि एक मस्त पोस्ट येणार असे गृहीत धरतेय मी 🙂

 2. अनिल अवचटांचा मीही मोठा फॅन आहे. त्यांनी पूर्वी खूपच उत्कृष्ट रिपोर्ताज स्टाईलमधे पत्रकारितेचा उत्तम नमुना म्हणता येईल असं लिखाण केलं. हल्ली त्यांची स्टाईल खूपच बदलली आहे आणि ते एक ललित लेखक बनले आहेत.

  त्यांची स्ट्रेन्थ असलेली ती स्टाईल जरी त्यांना सोडून गेली असली तरी जे लिहितात ते अजूनही काही प्रमाणात वाचनीय असतंच.

  हे झालं अवांतर. सुनंदा अवचटांचा विषय एकदम परफेक्ट लिहिलास. अनिलजींनी अनेक विषय हाताळले आणि संवेदनशील मनाने खूप ठिकाणी फिरून अनेक समस्या, व्यथा, सामाजिक प्रश्न लिखाणातून समोर आणले. मुक्तांगणसारख्या मोठ्या प्रोजेक्टला पु.लं.चा स्पर्श होणे, इतरही मोठ्या लोकांनी त्यात हातभार लावणे हे अनिल अवचट यांच्या ग्लॅमरमुळे झालं. पण प्रत्यक्ष ऑन ग्राउंड काम / कष्ट रुग्णांवर उपचाराचा क्लिनिकल भाग इ.इ. मध्ये सुनंदाजींनी त्यांच्या हजारपट काम केलंय आणि कुठेही नाव न येता, गाजावाजा न होता त्यांनी व्रतस्थ राहून ते केलं. याचा कृतज्ञ उल्लेख स्वत: अनिल अवचट यांनी अनेक जागी केलाय.

  सुनीताबाई देशपांडेही एक अफाट व्यक्तिमत्व होत्या. त्यांचेही कर्तृत्व पु.लं.मागे झाकले गेले. असो.

  लेख मस्तच .. अति अवांतर प्रतीक्रीयेबद्दल सॉरी…

  • नचिकेत अति अवांतर प्रतिक्रीया वगैरे म्हणू नकोस…. उलट मला खूप आवडलीये तुझी कमेंट… ’का’ ते ही सांगते….

   ही पोस्ट लिहीताना ज्या मंथनातून मी जात होते ते वाचणाऱ्यांपर्यंत तसे व्यवस्थित पोहोचेल का याबाबत साशंक होते… तुझी कमेंट वाचून ती शंका दुर झाल्यासारखी वाटतेय :).. सो आभार फॉर दॅट…

   आणि एक महत्त्वाचे असे की आपण लिहीलेली प्रत्येक पोस्ट संपुर्ण असावीच हा नियम नाही ना…. मी एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करतेय तो आपण सगळे विचारातून पुढे नेऊया… त्या विचाराने तुझी कमेंट मी मांडू पहात असलेल्या मुद्द्याला पुढे नेतेय….

   पु.लं, सुनीताबाईंचे मुक्तांगणच नव्हे तर ईतरही सामाजिक कार्य निश्चितच महान आहे रे…. बाकि सुनिताबाईंचे व्यक्तिमत्त्व हा एक स्वतंत्र पोस्टचा विषय होऊशकतो ईतके अफाट होते खरोखर!!

   आभार रे!!!

 3. sundar pointer ahe ha lekh mhaNaje. mee puN anil-sunanda avachatanchee ek silent admirer ahe, tuzyasarakheech in awe of these tremendous personalities…kahee ‘doghejaN’ kase kharach ekmekanna purak asataat na? for example- Baba Amte anee sadhanatai Amte, Abhay aNee Ranee Bang.. amazing what they are made of . aNee tyancha ekatra yeNa hehee kitee mahatvacha asata -tyanha hatun tee prachanda kama ghadun yeNyasathee, daivee yojanach vaTate tee .

  • स्मिता मनापासून आभार!!!

   या पोस्टने मनात थोडा गोंधळ मांडला होता माझ्या…. नक्की काय, कसे ते समजत नव्हते… u have made my point clear…

   This post is a pointer 🙂 … well said!!

   खरयं तुझं परस्पर पुरक अशी ही मंडळी एकत्र येणं ही निश्चितच दैवी योजना असावी!!!

 4. मी पण अवचटांचा पंखा आहे. तू त्यांचं ‘स्वतःविषयी’ वाचलं आहेस का? ते पुस्तक त्यांनी सुनंदा यांना अर्पण केलं आहे. त्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत ते म्हणतात

  “सुनंदा, हे पुस्तक तुला अर्पण करताना म्हणून का होईना पण तुला स्वतःतून दूर काढावं लागतंय. !!”

  मूळ शब्द अगदी आशेच्या असे नाहीत पण भावना ह्याच !! अर्पणपत्रिका वाचूनच प्रेमात पडलो पुस्तकाच्या. अप्रतिम आहे. त्यात सुनंदा अवचटांच्या कामाबद्दलही बरीच माहिती आहे.

  असो पुन्हा एकदा भरकट प्रतिक्रियेबद्दल स्वारी.. खूप छान झाली आहे पोस्ट.

  • नाही रे आता भारतात गेले (पुन्हा 🙂 ) की आणेन हे पुस्तक…. मला तर वाटतय जाऊन मुक्तांगणाला भेट देऊन यावी…. निदान या सगळ्या लोकांची कर्मभुमी पाहून तरी यावी..

   जे जे शक्य आहे ते तरी करावे असे वाटते रे…. नाहितर आम्हाला काहीच जमत नाही हे म्हणण्याचा करंटेपणा आहेच नेहेमीचा….

   >>>असो पुन्हा एकदा भरकट प्रतिक्रियेबद्दल स्वारी.. खूप छान झाली आहे पोस्ट.

   हे इथे पुन्हा का लिहीले माहितीये का.. या वाक्याचे एक टेम्प्लेट करून घेतेय मी म्हणजे ते मला तुझ्या ब्लॉगवर मी टाकत असलेल्या प्रत्येक कमेंटला चिटकवता येईल….
   वेडा आहेस का तू… भरकट कशी रे प्रतिक्रीया…. नचिकेतला काय लिहीलय मी ते वाच… मी जर एक विचार मांडला (इथे मी म्हणजे आपल्यापैकी कोणिही एक) तर तो बाकि सगळ्यांनी पुढे न्यावा, नाही का…..

   ता.क. राहतचा KBC चा व्हिडिओ पहायला विसरू नकोस!!

 5. हे असे घाटातले रस्ते आणि ऒप्शनला टाकलेले पाठ नेहमीच मलाही गोधळवू्न टाकत आलेत.आजही काही काही घटनाच मला ऒप्शनला टाकावयाश्या वाटतात. पण ते जाऊ दे…

  ” सुनंदाला आठवताना ” अप्रतिमच आहे. इतकी महान माणसे किती साधीसुधी व जमिनीवर होती.

  खरंच कुढणे, रडणे, मीच का सारखे तद्दन गोंजरणारे प्रश्न आपल्याला निष्कारण निष्क्रिय बनवत राहतात. भरभरून करण्यासारख्या अनेक गोष्टी अवतीभोवती असतात आणि आपल्यात ती कुवतही असते. फक्त ते उमगतच नाही. 😦

  • ताई तुझ्या कमेंट्सला क्या बात है म्हणावेसे वाटतेय…

   >>>>खरंच कुढणे, रडणे, मीच का सारखे तद्दन गोंजरणारे प्रश्न आपल्याला निष्कारण निष्क्रिय बनवत राहतात. भरभरून करण्यासारख्या अनेक गोष्टी अवतीभोवती असतात आणि आपल्यात ती कुवतही असते. फक्त ते उमगतच नाही. 😦

   बर्रोब्बर्र…

   एक गंमत सांगू येव्हढ्यातच ना मी एका अश्याच रसिक, कलाकार, हळव्या, संवेदनशील, माझ्यामते ग्रेट पण अगदी जमिनीवर असलेल्या एका मस्त व्यक्तीमत्त्वाला भेटलेय 🙂

 6. तुझ्या ह्या पोस्ट मुळे व त्यातली लिंक पकडीत मी त्या पुस्तका पर्यंत पोहोचलो व तुझी पोस्ट अर्धवट टाकून तेंच वाचायला सुरुवात केलीय. पुस्तक वाचतानाच झपाटून गेलॊय. आता फारच हळवं व्हायला होतं ! पण डोळे पुसत पुसत नक्कीच वाचिन. तसे तुझे लेखही खुपदा डोळ्यातून पाणी काढतातच ! पण बरे त्यामुळे डोळे तरी स्वच्छ होऊन जातात.

  एक छान लेख तुझा सुध्दां !

  • होय खरय काका, खूप हळवं व्हायला होतं ते पुस्तक वाचताना…..

   मनापासून आभार काका… तुमच्या कमेंट्सच माझ्यासाठी आशिर्वादाचं मोल आहे त्यामूळे त्या दिसल्या की नेहेमीच आनंद होतो!!

 7. you are giving a lot of lessons of life through your posts to young readers like us.. I’m still studying pan tumche posts amhala nakki madat kartat bara ka.. i admit I havent understd everything about this post,may be due to lack of my experience.
  But what u said about Rahat Tasleem is true. me baghitla hota to episode.

  • सीया आभार 🙂

   अगं मी खरं तर काही धडा द्यायचा प्रयत्न करत नाहीये… उलट स्वत:च्याच धड्यांची उजळणी (रिव्हीजन ) करतेय… 🙂

   राहत तस्लीम बद्दल मी जे म्हटले ते जर तुला पटले म्हणतेस ना तर उरलेली पोस्टही तुला नक्कीच समजेल 🙂

   • सॉरी रे….तुझा ब्लॉग नक्की वाचायचा आहे गं.. सध्या नेटानेटी कमी आहे फार माझी, मुलांना सुट्ट्या आहेत नं… पण वाचून तुला कळवणार हे नक्की !!!

 8. Tanvi sarvat pratham Thanks.Thank you so much……….
  Tuzyamule etaki chan pustak vachayala milale 🙂
  Tuza lekh sodun te pustakch aadhi vachun kadhale 😀
  Khup chan lekh lihila aahes ani……..
  Aapan mhanaje na ase kahitari vachale ki ekdam halato……
  Kahitari karayala have ase mhanato ani thodya diwasat sagale visarun sudhha jato…..
  Pan kahrech Sunanda ani Anil awachat kiti gr8 aahet he aaj jastach janawale…….

  • आभार अनिता 🙂

   >>>Tuza lekh sodun te pustakch aadhi vachun kadhale 😀

   चालेल, आवडेल… अगं तिथून परतून पुन्हा इथे यावे वाटले हेच खूप मोठे आहे माझ्यासाठी 🙂

   बरोबर आहे तुझं… कटू असलं तरी हेच सत्य आहे की आपण या गोष्टी विसरून जातो काही काळाने, किंबहूना म्हणूनच मी मनातल्या आवर्तनांच्या पोस्ट्स करते सरळ… आपणच आपल्याला आठवण करून द्यायची या सकारात्मक मुद्द्यांची 🙂

 9. सुंदर लेख.
  >> अभ्यासाचा काही भाग ऑप्शनला टाकायचा ऑप्शन नाहीये!!! किंबहूना काही बाजूला टाकावेसे वाटत नाही. +१००
  सुनंदाताईंच्या बद्द्ल थोडीफार माहीती होती. तू दिलेल्या लिंकवरून लेख डाऊनलोड करून ठेवलाय. आता लगेच वाचून काढते.

 10. By the way for all the Pu-La Sunitabai admirers above: Sunitabainvar Mangala Gobolenee ek pustak lihilay-‘SuneetaBai” yach shishakacha. Anee tyat ek swatantra lekh AruNa Dhere nee lihilay- shirshak ahe” Aise KaTheN KovaLepuN”. aaj saptaheek sakaL madhye parikshaN alay chaan ahe.

 11. मी नाही वाचल अजून ते…डालो केल आताच…बाकी अवचटांच ‘माणस’ वाचतांना कितीतरी वेळा आतून रडलो होतो मी…रस्त्यावरच्या वळणांचा विचार न करता आपण जिद्दीने चालत राहावे,असेल आतून धमक तर चमक मिळेलच कधी ना कधी ….

  • हो रे देवा, माणसं वाचताना खरचं किती वेळा हेलावले याची गणती नाही…

   >>>असेल आतून धमक तर चमक मिळेलच कधी ना कधी ….

   मस्तच रे आणि खरंही!!

   आभार रे!!!

  • सोनाली आभार 🙂

   सलीलला मेल टाकलेच आहे, नेटभेटमधे माझा कुठलाही लेख आला तरी मला आनंदच आहे… 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s