रिमिक्स कापुसकोंड्या…

लहान मुलांसाठी गोष्टी सांगणे ऐकणे किती महत्त्वाचे असते नाही…. माझ्या पिढीतल्या लहानपणी आजी-आजोबा, आई-बाबा गोष्टी सांगायचे… गोष्टीची पुस्तकं वगैरे होती….

लहानपणी आमचे आजोबा जेव्हा १०-१२ गोष्टी सांगून झाल्यावर पुढची गोष्ट सांगायला कंटाळायचे तेव्हा ते ’कापुसकोंड्याची गोष्ट ’ सांगायला घ्यायचे…. 🙂 त्यालाही आम्ही बधलो नाही की ’एक किनई धान्याचे गोदाम असते, त्याची एकदा खिडकी उघडी राहिली… मग काय झालं एक चिमणी आली दाणा खाऊन गेली, दुसरी चिमणी आली दाणा खाऊन गेली, तिसरी चिमणी आली दाणा खाऊन गेली, …….’ ही न संपणारी कथा यायची 🙂  ना गोदामातले धान्य संपायचे ना येणाऱ्या चिमण्या…. एक आहे मात्र ईतर अनेक गोष्टींबरोबर या दोन्ही गोष्टीही आवडतातच!!!

आजकाल  मुलांसाठी अनेक कॅसेट्स, सिडीज वगैरे उपलब्ध आहेत गोष्टींच्या… नेटवर यूट्यूबच्या माध्यमातूनही गोष्टींचा रतीब सुरूच असतो….तरिही मला स्वत:ला मुलांना गोष्टी सांगायला आवडतात…. आपण काहितरी सांगतोय ते ऐकताना मुलांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पहाणं हाच एक आनंदसोहळा असतो….लाकूडतोड्या, कावळा-चिमणी, चल रे भोपळ्या, माकड आणि मगर, ससा-कासव, कबुतर-मुंगी पासून ते हिरण्यकश्यपू वगैरे मुलांच्या लाडक्या गोष्टी….

आजची गोष्ट जरा वेगळी आहे पण, ही गोष्ट माझ्या लेकीने मला सांगितलेली आहे… सध्या शाळांना हिवाळी सुट्ट्या सुरू आहेत… आज दुपारी मला आज्ञा झाली की मम्मा हिरण्यकश्यपू वगैरे नको आज मी तूला गोष्ट सांगते… 🙂

ऐक….

—एक असतं जंगल… घनदाट जंगल…. त्यात किनई एक तळं असतं…. त्या तळ्यात एक कासव असतं आणि एक मगर असतं…. ते फ्रेंड्स असतात… ठीके… (आमच्या माना हलल्या .. ती परवानगी गृहीत धरून पुढची गोष्ट सुरू होते ) ….हं….  ते जे कासव असतं ना कासव ते जाम जाम म्हणजे एकदम जाम दुष्ट असतं…. आणि एकदम बेशिस्त…. बेशिस्त म्हणजे बेssssशिsssssस्तssss!!!!! 🙂 (कासवातले दुर्गूण अगदी स्पष्ट केले गेलेत आमच्यासमोर… असेल त्याचा काहितरी संबंध गोष्टीत म्हणून आमच्या माना हलल्या पुन्हा एकदा )…. ते कासव अजिबात ऐकत नाही कोणाचंच…. ते त्याच्या आईला त्रास देतं… बाबांना त्रास देतं… भाऊ बहिणला त्रास देतं….

(आत्तापर्यंतच्या गोष्टीत भोपळ्यातल्या म्हातारीसारखं आणि ईतर अनेक गोष्टींसारखं आधि जंगल आलयं घनदाट, पण गोष्ट तशी आजकालच्या जगातही येत होती सारखी वगैरे विचार माझ्या मनात …. )

—ते कासव फार वाईट असतं… देवबाप्पा अश्यांना टॉलच करणार नाही…. ते काय करतं माहितीये…. तळ्यातलं पाणी रस्त्यावर टाकतं… मग त्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पडून जातात…..

—अगं त्या गोष्टीत एक मगर पण आहे ना तिचे काय?? (दादाचा एक प्रामाणिक प्रश्न )

—हो आहे ना…. ते मगर एक चड्डी घालतं ती घसरून जाते…. मग लोक त्याला शेम शेम म्हणतात….

—(डोळे वटारलेली मी ) कशाला गं विनाकारणच काहितरी खुळ्ं तुझं….नीट सांग गोष्ट…

— अगं मम्मा लोक खरंच त्याला  शेम शेम म्हणतात, परवा तूम्ही मला म्हणाले होते ना तसेच…. त्या मगरला राग येतो ते ओरडते ’शेम शेम’ नका म्हणू मी आत आणि एक चड्डी घातलीये….

(अच्छा म्हणजे परवा स्वत: न बोललेले वाक्य आता प्रत्यक्ष मगरीच्या तोंडी घालण्यात आलेले आहे 🙂 )

— ते मगर एकदा रोडवर जातं… (तंद्री लागलीये आता… वाट्टेल तिथे कल्पनाशक्ती भराऱ्या घेतेय ) मग काय होतं…. तिकडून एक गाडी जोरात येते आणि मगरला डॅश करते… मगरचा हात आणि पाय तुटतो… पण तो लगेच बरा होतो….. हवेने बरा होतो, डायरेक्ट …. मगर त्या दुखणाऱ्या हाताला म्हणते जा तू माझा हातच नाही, मग तो हात दुखेनासा होतो… पण तरिही मगर मरलंच…. 😦

—अगं बरं झालं होत ना, मग कशाला मारलंस त्याला?? ( कशाला नसते क्रौर्य असा माझा विचार )

—पण लोक त्या मगरला हॉस्पिटलमधे नेतात… त्याला ईंजेक्शन देतात…. कारण्ं द्यायचंच असतं ईंजेक्शन 🙂

— अगं मरलंय ना ते तुझ्या म्हणण्यानुसार ???? आणि कसवाचं काय झालं पुढे??? (दादा पुन्हा एकदा प्रकट झालाय)

— अंssssss

—अंsssss

—- अगं सांग ना…

—-थांब ना दादा, सोचू दे मला जरा… हं आठवलं त्या कासवचा एक मोठ्ठा कासव अंकल येतो …. आण्णि तो मोठ्ठा कासव अंकल अज्जिब्बात दुष्ट नसतो!!!! तो मोठ्ठा कासव अंकल त्या छोट्या कासवाला रागावतो आणि मग तो छोटा कासव फ्लाय करत करत हॉस्पिटलमधे मगरला भेटायला जातो……

— ए कासवाला कुठे फ्लाय करता येते का?? (दादाचा आणि एक प्रश्न 🙂 )

— येते … हो ना मम्मा…. येते ना??? तो त्याच्या दोन बर्ड फ्रेंड्स ना बोलावतो…. मग ते फ्लाय करतात…. मम्मा फ्रेंड्स हेल्प करतातच ना… करायचीच असते!!! कबुतर आणि मुंगीसारखे…..

एव्हाना लांबलेली गोष्ट पहाता दादा मधेच पळ काढतो… आणि हातात चॉकलेट घेऊन अवतीर्ण होतो…. त्याच्या हातातले चॉकलेट पाहून कथाकथनाचा कार्यक्रम थांबतो कारण ब्रेक तो बनता है भाई 🙂

कशाचा कशाशी संबंध नाही म्हणावा तर या एकाच गोष्टीत कन्यारत्नाने आधि ऐकलेल्या अनेक गोष्टी समाविष्ट झालेल्या…. त्यात स्वत:चे विचार मांडलेले….  मला मधे मधे ऍलिस ईन वंडरलॅंडची आठवण येत होती…. माझी हिमगौरी स्वत:च्याच विश्वात रममाण होती….. गोष्ट सांगताना चेहेऱ्यावर बदलणारे हावभाव अतिशय बोलके होते…..

चॉकलेट ब्रेक नंतर गोष्ट पुन्हा सुरू झाली….. पण कहानी में आता ट्विस्ट होती …..

आता चतूर सश्याने सिंहाला विहीरीजवळ आणलेय…. मग तो आधिचा लायन आणि सश्याने आणलेला लायन सरळ रेस लावतात…. ससा नेहेमीप्रमाणे प्रत्येक शर्यतीप्रमाणे झोपून जातो….. लायन्स पळतात पळतात , अचानक समोरून गाडी येते, मग ते लायन्स रस्त्याच्या कडेला सरकतात…. (आमच्या अंगणात होणाऱ्या रेसमधला प्रॉब्लेम या रेसमधेही आलाय 🙂 ) पुढे काय होतं की लायन्स पळत जातात…. आणि पहातात की कासव तर रेस जिंकलेले आहे….

पुढच्या कथनामधे पेंग्विन्स, मगर , कासव, माकडं अनेक अनेक प्राणी येतात….

एका गोष्टीमधे अनेक अनेक गोष्टी येताहेत….  माझ्या डोळ्यासमोर माझं पावणे चार वर्षाचं पिल्लू गोष्ट मला समजावून सांगतय अगदी मनापासून, मी हा सोहळा आनंदाने उपभोगतेय!!!! ’तारें जमीं पर’ च्या गाण्यातल्या काही ओळी नकळत मनात उमटताहेत…

ये हवा बटोरा करते है

बारिश की बुंदे पढते है

और आसमान के कॅन्वस पे ये कलाकारियाँ करते है!!!

 

अगदी अगदी हेच तर होतेय की, आसमान च्या कॅन्वासवर अनेक रंगाच्या मनसोक्त उधळणीने कलाकारी केली जातीये….. कधीतरी एक मन वाटतं की पिल्लूला सांगावं अगं या रिमिक्स कापुसकोंड्याच्या गोष्टीला काही अर्थ नाही लागत… पण पुन्हा वाटतं  दुनिया का ईशारा जमे रहो असतो हे तर मुलांनाही कधी तरी कळणारच आहे…. आणि प्रत्येक गोष्टीतून बोध, मॉरल मिळालाच पाहिजे असे असेल तर आज मुलांना काही न शिकवता मी शिकते काहितरी…. एक नवा धडा या ही गोष्टीचा की माझ्यासमोरच्या लहानश्या डोक्यात अनेक विचार चाललेत, सुसंगत-विसंगत या गणितात न मावणारे , कदाचित माझ्या कल्पनेच्या भरारीच्याही खूप पुढे जाणारे……. माझी मजल तोकडी असे मान्य करावे आणि रमावे या कापुसकोंड्यात पुन्हा एकदा…. 🙂

41 thoughts on “रिमिक्स कापुसकोंड्या…

 1. हा हा.. पोस्ट वाचून गरगरायला झालंय मला. कसली अफ्फाट कल्पनाशक्ती आहे !! रोलिंगबाईच्या मुस्काटात मारणार गौरा 😉 ..

  आणि तुम्ही लोक उगाच नाही नाही ते प्रश्न विचारून का छळता ग तिला?? ए ना चॉलबे !!

  शेवटचा परिच्छेद एकदम खासम् खास.. नेहमीप्रमाणेच !!

  रच्याक, शीर्षकावरून एक महान जोक आठवला.. नुकताच फॉरवर्ड मधून आलेला..

  तुला कापूसकोंड्याची गोष्ट माहित्ये का? नाही????

  रजनीकांतला माहित्ये

  लोल… 😉

  • आभार हेरंबा 🙂

   अरे प्रश्न न विचारून कसे चालेल, मगरीला चड्डी म्हणजे बघ… बरं ती ही घसरणारी 😉

   वाट्टेल ते रे…. करमणूक आहे नुसती!!!

   जय रजनीदेवा!! (अरे तुम्हा सगळ्यांचे रजनीपुराण ऐकून मी परवा सिवाजी-द बॉस पाहिला 🙂 )

 2. हा हा हा …. 🙂
  हा रिमिक्स कापुसकोंड्या जाम जाम आवड्या …
  गौराबाई जोरात…स्वतंत्र गोष्ट तयार करतेय,जबरदस्त ग …तीला पण एक ब्लॉग काढून दे आता … 🙂
  ह्या पोस्टने आज सकाळ सकाळ खूप हसायला लावलं ,आजचा दिवस मस्त जाणार …गौराबाई धन्स…
  आमच्या दादाचे मात्र सगळे प्रश्न तुम्ही अनुत्तरीत ठेवलेत हं … 😀

  दुनिया का ईशारा जमे रहो ……

  • आभार देवा 🙂

   गौराचा ब्लॉग .. नको रे…. अरे म्हणजे तर मग ब्लॉगिंग ही आमच्या खानदान की परंपरा होईल 🙂

   दादाचे प्रश्न 🙂 … अरे सुट्ट्या आहेत दोघांना सध्या, हैदोस आहे घरात!!!

   बघ शिकलास ना…

   दुनिया का ईशारा जमे रहो ……

   मोठेपणीचे हेच दु:ख आहे रे… इथे अलग अंदाज नाही ठेवता येत, वक्त का गुलाम व्हावे लागते!! 😦

 3. >>तुला कापूसकोंड्याची गोष्ट माहित्ये का? नाही????

  रजनीकांतला माहित्ये
  माझ्या डोक्यात आलेली पहिली गोष्ट पोस्टचं नाव वाचून… :D:D:D

  गौराबाई पुढे माझी तोकडी शब्दसंपदा अजूनच थिटी पडल्यागत होते. आणि देवेंद्र म्हणतो तसा…आमचा समजूतदार दादा बाजूलाच राहतो 🙂

  • दादा खरच समजुतदार आहे रे…. नाहितर ही मुलुखमैदान सांभाळणे मला एकटीला कठीण होते… 🙂

   >>>रजनीकांतला गौराईची भेट घालून द्यावी एकदा असा विचार येतोय मनात 🙂

   तुझी तिची भेट राहिली बघ याहीवेळेस….

 4. सही तन्वी. मुलांच्या तोंडून त्यांच्याच शब्दात, कल्पनेच्या भरार्‍या मारणार्‍या गोष्टी ऐकणे हा आनंदसोहळा असतो.
  >> सोचू दे मला जरा
  एकदम सही. श्रृतीची भाषाही अशीच हिंदी, मराठी, इंग्लीश ‘रिमिक्स’ असते.

  • अगं घरात अक्षरश: रिमिक्स चालतो भाषांचा 🙂

   ईशानला नाही येत हा प्रश्न तितकासा कारण बहुतेक तो वयाच्या चवथ्या वर्षापर्यंत भारतात होता पण गौराई म्हणजे सतत सरमिसळ भाषांची…. तुझ्याही घरात तेच म्हणजे अश्याच शाब्दिक चकमकी घडत असणार 🙂

   होय गं मुलांच्या गोष्टी ऐकणे हा भन्नाट अनुभव असतो 🙂
   आभार गं 🙂

  • होय महेंद्रजी तिने खरचं प्रत्येक गोष्ट ओवलीये तिच्या या माळेत .. तेच नव्हे तर स्वत:च्या आयुष्यातले काही प्रसंग गुंफलेत त्यात… बरं ते सगळं सांगताना चेहेऱ्यावरचे हावभाव असे मोहक होते म्हणून सांगू….

   जाम मजा आली तिची गोष्ट ऐकताना 🙂

   मनापासून आभार!!!

 5. गौराच्या कल्पनाशक्तीच्या भराऱ्या एकदम अफाट आहेत बर ………
  नवीन पिढी साठी नवीन रिमिक्स कापूसकोंड्याची गोष्ट……… नाहीतरी किती दिवस जुनाच कापूसकोंड्या ऐकायचा.

  रोलिंगबाईच्या मुस्काटात मारणार गौरा 😉 .. +++++१२३४५६६७७८९

  • >>>> नवीन पिढी साठी नवीन रिमिक्स कापूसकोंड्याची गोष्ट……… नाहीतरी किती दिवस जुनाच कापूसकोंड्या ऐकायचा.
   अगदी बरोबर!!
   अरे पण या पिढीतला प्रत्येक जण स्वत:ची नवी गोष्ट लिहीणार असे दिसतेय… आपण मुकाट ऐकायचो आपल्याला सांगितलेल्या गोष्टी… इथे कथा कमी आणि प्रश्न जास्त असे चित्र असते 🙂

   आभार रे!!!

  • गौरी की कथाएँ नावाचा ब्लॉग सुरू केला तर तिच्या मम्मा की व्यथाएँ नावाचा दुसरा सुरू करावा लागेल रे…. 🙂

   अरे आधिच ईतकी बोलते ती की माझ्या नाकी नऊ येतात 🙂

   तुझा निरोप नक्की देते तिला…

   बऱ्याच दिवसानी आलास, त्याबद्दल स्पेशल आभार रे!!!

  • स्मिता आभार गं!!

   >>>गौरी की कथाएँ नावाचा ब्लॉग सुरू केला तर तिच्या मम्मा की व्यथाएँ नावाचा दुसरा सुरू करावा लागेल …. 🙂

   खरयं अगं कल्पनाशक्तीला उधाण भरती आलेली असते तिच्या कायम… 🙂

 6. खूपच छान …. 🙂 मजा आली वाचताना 🙂 खरंच काय imagination असतं ह्या पोरांचं. आमचे चिरंजीव शाळेत जायला लागले कि अशी लढाई लढावी लागणार असं दिसतंय … 🙂

  • प्रिती आभार गं!!!

   अगं भन्नाट कल्पना असतात मुलांच्या डोक्यात …. होय तर अशीच लढाई लढावी लागणार, कंबर कसून सज्ज हो!! 🙂

 7. superb aahe, aani kharech aahe..
  tyanchi kalpanashakti Achhat aste.
  I have experienced the same, pahilyanda don goshti mix karun sangtat, mag tya goshtit aankhi goshti aani khare-khure prasang suddha mixing karat jatat…
  pan aikayla kaay majjjja yete, mahitiye…..

  • प्रिया आभार आणि स्वागत 🙂

   अगदी शब्दश: पटतेय तुझे म्हणणे ….

   >>>pan aikayla kaay majjjja yete, mahitiye…..

   इथे मी ’हो मला माहितीये’ असे म्हणेन 🙂 नुकताच घेतलाय गं हा मस्त अनुभव….

 8. kharach 3rd generation chi Kapuskondyachi gosta ahe….

  ek choti shi request ahe, jar Gaurai khup bolate ahe mhanun tumhi kantalu naka…. ani o tichya prashanachi shakya tevdi (khari) uttare denyacha pryatna kara. mhanje tichi kalpna shakti ashich vadhel.

  nice article, i have enjoyed lot.

  • आभार दिगंबर आणि स्वागत ब्लॉगवर 🙂

   नक्कीच तिच्या प्रश्नांना न टाळता आणि न कंटाळता खरी उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन… आभार 🙂

  • आभार सीया 🙂

   बरोबर बोललीस मुलांच्या गोष्टी छानच असतात कारण कल्पनाशक्तीला समाजाचे, नियमांचे बंधन नसते ना घालायचे त्यांना… ते मनसोक्त उडतात हवे तिथे 🙂

   >>>tyacha story madhye lion asaaycha bahutek..

   🙂 असेच असते गं… आमच्या ईशानच्याही प्रत्येक चित्राची सुरूवात सुर्य काढून होते 🙂

 9. गौरा जियो!! माझ्या डोळ्यासमोर आपल्या दोघींना झोपाळ्यासमोर उभे राहून बोलणारी गौराच आली…

  सोचू दे ना मला… :)) सहीच! अगं हीचे तारे कुठून कुठे तुटलेत पाहा तरी… आणि मस्त अविर्भावासकट श्टोरी टेलिंग झाले ना… पुन्हा तिच्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेच.

  रजनी इतरांना वेड लावतो ही त्यालाच भीरभीरवेल. वर त्याला दमातही घेईल…. 😀

  गौरा तुम लगे रहो आम्ही आहोतच लाड करायला.

  • ताई आभार गं…. 🙂

   अगं हो ना ही पोस्ट लिहीताना अमित म्हणालाच ताईला बर्रोब्बर कळेल ही बया कशी बडबडली असेल या गोष्टीत…. तूला म्हणाली होती बघ काहितरी वस्तू या खिश्यात नाही मावत दुसऱ्यात डालून बघते…. 🙂

   >>>रजनी इतरांना वेड लावतो ही त्यालाच भीरभीरवेल. वर त्याला दमातही घेईल…. 😀

   🙂 तू भेटलीयेस ना तिला निवांत त्यामूळे तू हे म्हणू शकतेस 🙂

   >>गौरा तुम लगे रहो आम्ही आहोतच लाड करायला.

   माझे पण, माझे पण :)… गमतीचा भाग वेगळा, अगं तुम्ही सगळे आहात या भरवश्यावरच तर ती दमबाजी करत असते कायम 🙂

   आभार गं बयो!!

 10. आत्ता इथे बसून मी ही गौराईच्या गोष्टीची मजा चाखली. थोडा वेळ तिच्या भाव विश्वात अगदि रमून गेलो होतो. माझी मोठी इतकी नव्हती पण धाकट्या कन्येची आठवण झाली. कदाचित तूं हि त्याला अपवाद नसावीस !

  ती चित्रे काढायला लागलेली असेल ना ? नसेल तर उद्युक्त कर. त्यात ही तुला हेच भाव विश्व आढळेल.

  आमच्या मृत्युंजयेश्वर मंदीरातील वर्गात आम्ही अगदि लहान मुलांना आम्ही घेत नाही पण एक दिवस एक माता आपल्या चिमुरडीला घेऊन आली. “अहॊ खूप काय काय चित्रे काढीत असते तुमच्या वर्गात घेऊन शिकवा तिला…तुमची काय फी असेल ती देईन…” वगैरे. मुलगी गोड आहे बघून मी त्या मातेस परवानगी दिली अन स्वच्छ सांगीतले की तिला येऊ दे पण मी हिला काहीहि शिकविणार नाही काहीहि सांगणारही नाही तिला मनसोक्त पध्दतीने इथे येऊन रमू दे… आणि ती यायला लागली……..अजिबात त्रास नाही आली की तिची ती चित्रे काढत बसते…काय काय एकेक भन्नाट कल्पना असतात तिच्या, मी काय शिकविणार तिला ?.. अगदि वरील गोष्टीतील गौराईचीच आठवण न झाली तरच नवल !!

  तिच्या गोष्टीत व भावविश्वात तूं ही किती रममाण झाली होतीस हे तुझ्या खास लिहीण्याच्या ’स्टाईल’ने कळून येतंय ! तुलाही मानायलाच हवे त्या साठी…म्हणूनच हातवारे करीत..डोळे मिचकावित…मध्येच ओठांचा चंबू करणारी…मध्येच थांबरे करीत काहीतरी आठवणारी ..तिच्या गोष्टीत ती रमलेली व आपल्यालाही रमवणारी गोड गोड गौराई मला इथून दिसत होती, व मी ही गोष्टीतील मजा चाखित होतो !

  • काका बरोबर आहे तुमचे, मी नव्हते अपवाद 🙂 … आईला विचारा किती बोलायचे मी लहानपणी, म्हणजे अजुनही खूप बोलते…. वस्तूंशीही नकळत बोलते मी, मग ईशान आणि गौरीही बोलतात 🙂

   होय काका, काढतेय ती चित्र, बरी जमताहेत आणि….. बरीच चित्र आपल्याला समजत नाहीत मग ते नक्की काय आहे ते ती सांगते…. मजा येते पण!!!

   आवडली ना गोष्ट तुम्हाला….

   आभार काका…. 🙂

   • अशी काही गंमतीची चित्रे, तिच्या खुलाश्यांसह….व्वा आणि तू लिहिणार ! मग काय एका छान पोस्टची बेगमी झाली ! वाट पहात आहे !

    हो हो हे काय विचारणे झाले ? गोष्ट तर आवडलीच अन तुझ्या मुळे ती छान समजली सुध्दा !

 11. पिंगबॅक रिमिक्स कापुसकोंड्या… | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

  • सोनाली आभार 🙂

   सलीलला मेल टाकलेच आहे, नेटभेटमधे माझा कुठलाही लेख आला तरी मला आनंदच आहे… 🙂

 12. खरच अप्रतिम लिखाण केलेलं आहे . मी तसा फार online वाचत नाही पण हि पोस्ट netbheT मध्ये वाचली आणि प्रतिक्रिया दिल्या शिवाय राहू शकलो नाही !!!!!!!!!!

  बाकी breake to बनता है भाई !!!!!!!!!! मस्तच !!

  breake न घेता असेच लिखाण करत रहा !!!!!!!!

  शुभेछा !!!!!!!!

  • पंत आभार आणि ब्लॉगवर स्वागत… 🙂

   >>> breake न घेता असेच लिखाण करत रहा !!!!!!!!

   निश्चितच तसाच प्रयत्न करेन .. पुन:श्च आभार!!

 13. त्या मगरला राग येतो ते ओरडते ’शेम शेम’ नका म्हणू मी आत आणि एक चड्डी घातलीये….>>>>
  ह.ह.पु.वा. लागली….
  हापिसातली मंडळी माझ्या तोंडाकडे बघु लागली माहितिय…. 😉

  धम्माल आहेत गोष्ट…
  ब्लॉग नको गं गौराचा… डायरेक्ट चिंटु सारखं एखादं सदर सुरु कर.. 😉

  • हाहा 🙂 …. आनंदा अरे आमच्याकडे तर गौराचा रोजचा धमाल कार्यक्रम सुरू असतो रे…. जाम जूमानत नाही ती कोणाला… हिंदी, मराठी आणि ईंग्लिशची जी काही सरमिसळ चालते की विचारू नकोस…

   आभार रे 🙂

   ’चिंटू सारखे सदर” सही आहे कल्पना… नक्की प्रयत्न करून बघते… अर्थात चिंटू जाम ग्रेट आहे तरिही लहानसा प्रयत्न नक्कीच होऊ शकतो आपलाही 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s