गहन बुडबुडे..शेंडा ना बुडूख…

गाढ झोपलेय मी….

माझ्या डोक्यात कोण्या एका कथेतली दोन पात्र बोलताहेत आत्ता…. ते नवरा-बायको आहेत, भाऊ भाऊ आहेत, भाऊ बहिण आहेत की मित्र मैत्रीण आहेत मला समजत नाहीये…. असुदे!!! काहितरी नातं आहे दोघांत आणि मनातलं सगळं एकमेकांना सांगताहेत तेव्हा मैत्री नक्कीच आहे त्यांची….. एकजण आपल्या आई वडिलांवर किंबहूना साऱ्या जगावरच हा काही कारणाने जरासा नाराज वाटतोय….आणि दुसरा जो कोण आहे तो पहिल्याचे म्हणणे शांतपणे ऐकतोय, त्याला मोकळं होऊ देतोय असा काहिसा त्या कथेतला प्रसंग घडतोय….

पहिला म्हणतोय, ” नको नको होतात कधी कधी या आठवणी अगदी…. त्रास देतात नुसत्या… मनाच्या दारावरच्या त्यांच्या वारंवार येणाऱ्या धडका नकोश्या होतात आताशा… वाट्तं साऱ्या घराची जशी साफसफाई करतो ना आपण तसा या मनाचा कानाकोपरा स्वच्छ लख्ख घासुनपुसून साफ करावा….. जुन्या आठवणींची लोंबकळलेली कोळीष्टक पार काढून फेकावीत…..इतकच काय तर चक्क व्हॅक्युम फिरवावं मनात, काय अडकलेल्या,साठलेल्या, मुरलेल्या त्रासदायक आठवणी असतील तर त्यांचही समूळ उच्चाटन झालं पाहिजे!!! मग त्या अगदी जन्मदात्यांच्या असोत की भावंडांच्या…”

दुसरा किंवा दुसरी म्हणतेय, ” मान्य आहे रे मला… समजतेय तुझी घालमेल… पण आईवडिल म्हणजे काही आठवणींची धुळ का रे वेड्या…. अरे त्या तर उन्हापावसापासूनच नव्हे तर जगातल्या अनेक प्रकारच्या धूळीपासुन आपल्याला वाचवणाऱ्या संरक्षक भिंती आणि छतं नाही का….. भिंती आणि छप्परच ओढून काढणारे कोणते रे व्हॅक्य़ुम असते??? ”

पहिला पुन्हा एकदा, ” बरोबर आहे तुझे…. अरे पण आईवडिल म्हणजे संरक्षक भिंती म्हटलं तर जेव्हा आम्ही आईवडिल झालो तेव्हा आमच्या मुलांसाठी आम्हिही याच भुमिकेत शिरणार की नाही…. मग तेव्हा आधिच्या भिंतींनी ताठपणा सोडून जरा मागे नको का सरकायला?? की रहाणार ते तिथेच तसेच, त्याच भुमिकेत ?? अडचण नाही का होणार त्यामुळे….. अरे आधिच्या भिंती मागे सरकल्या, विस्तारल्या तरच मोकळेपणा येणार नाहितर घुसमटच ना सगळी!!!!”

माझी झोप उडतेय हळूच…. जराशी जाग आल्यासारखी वाटतेय…. मगाच्या संभाषणातले काही दुवे हाती लागताहेत…. स्वच्छता, व्हॅक्य़ुम…. भिंती… घुसमट ऐसाच कुछ तो याद आ रहा है!!!

झोपेचा अंमल अंमळ आणि थोडा कमी होतोय…. वरचे सगळे शब्द हे उद्या करायच्या घर साफसफाईबद्दल नाहित…. तर मी न लिहिलेल्या पण माझ्या नकळत कधितरी डोक्यात शिजत असलेल्या कुठल्या तरी कथेतली अनोळखी पात्रांच्या संवादातली आहेत इतपत समजतेय आता…. गहन आहेत की हे संवाद 🙂 ….. मी हे संवाद वगैरे भानगडीत अडकलेय आणि माझ्या स्वत:च्या घरातले इतर पात्र मात्र गाढ झोपलेले आहेत आत्ता, त्यांच्या वाट्याची स्वप्न पहात 🙂 …. या दोन अनोळखी लोकांनी आणि त्यांच्यातल्या संवादाने माझ्या झोपेचे खोबरे केलेय आता…. म्हणजे त्यांचे संवाद गहन बिहन ठीके पण हे असले जडं संवाद बोलणारी पात्र माझ्याच स्वप्नात का, एरवीही खून, मारामाऱ्या चोऱ्या होतातच स्वप्नात, पण आज हे प्रकरण नवे ??? क्यूँ??? या प्रश्नाचा ससेमिरा लागलाय आता…कूस बदला आणि विचार करा आता….. मला झोपायचेय परत….. नो जागरण!!!

असे ना रात्रीचे किती वाजलेत हे ही माहित नसते … अर्धवट जाग आणि बऱ्यापैकी पेंगलेले डोके आणि मन, मग स्वस्थ बसावे ना….. ते नको… कुठल्या तरी विचाराचा उंदीर उगाच डोक्यात खूडखूड करणार…. त्या उंदराचा मग स्पायडरमॅन होणार… विचारांच्या धाग्यांना लोंबकळणार….

काहितरी कुठलं तरी जुनपानं अडगळीतलं काहितरी अंधूक आठवतय  …. तेव्हा कोणितरी दिलेला आधाराचा हात आठवतोय…. झोपेत मग वाटणार , औदासिन्याच्याही अनेक छटा असतात नाही, कधी आपण आपले सावरतो कधी इतर कोणी आपल्याला सावरते… मळभं हटतं हे मात्र खरं…. प्रकाशाची तिरीप साऱ्या काळ्या सावल्यांना वाकोल्या दाखवत आत झिरपतेच…. दरवेळी ती तिरीप शोधायची, इतकं सोप्प आहे सगळं!!! (हाय की नाय गहन षटकार… 🙂 )

पुढे….. (म्हणजे झोपेतल्या झोपेतच गाडी पुढे 🙂 )

आज एक नवा शोध लागलाय… गेले आठ वर्ष मी ओरड ओरड ओरडतेय, की मुलांना चप्पल घालताना आपण एक चप्पल पुढे करावी आणि मुलं नेमका दुसरा पाय पुढे करतात….. नेहेमी मग आपण ओरडावे “नेमका चुकीचा पाय पुढे करतात ही मुलं, अगदी कायम…..हा नाहीsss तो पाय” किंवा मग सरळ आपण हातातली चप्पल खाली ठेवून दुसरी उचलावी….. आज एकदम विचार चमकला, मुलं माझंच तर प्रतिबिंब आहेत…. ते चूकीचा पाय पुढे करत नाहीत तर ते माझ्या समोर असल्यामूळे माझी उजवी बाजू त्यांच्या डावीकडे असते इतकेच…. मग ते जेव्हा उजवाच पाय पुढे करतात तेव्हा मला ते उलट वाटते…. मज्जा आहे, म्हणजे मुलांचे मुद्दे पहायला मला निदान मनाने तरी समोरच्या बाजूला जायला हवे…. म्हणजे मलाही त्यांचे उजवे उजवेच दिसेल…. य्ये… आवडला हा शोध… 🙂

झोपेतच कष्टाने डोळे उघडावे आणि मुलांच्या अंगावर चादर व्यवस्थित करावी….

आता झोपेचा अंमल अजून कमी झालाय असा जो समज झाला होता तो खोडून काढलाय कष्टाने नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी, कारण ते चटकन मिटताहेत… विचारांचे कनेक्शन तेव्हढे काढले की डोक्यातही अंधार होईल…. अंधारात कसे झाडं बिडं हलत असतातच, वारा वहातच असतो .. आपल्याला पडतो का काही फरक… आपल्याला कसे ’आप मरे दुनिया डूबी’ अवस्था असते ना ती… तसेच पडू देत मेली काही स्वप्न बिप्न, हमको कुछ लेना देना नही उनसे….

तेव्हा झोपायसाठी डोळे मिटलेत…. आता पुढे…..

कधी कधी वाटतं… कधी कधी काय कायमच वाटतं, रात्री झोपेत ज्या विचारांच्या साखळ्या होतात त्यांची पोस्ट होऊ शकते…. झोपेतेच ती होतेही… सकाळी सुर्य उगवतो आणि पोस्ट मावळते…. अ की ठ आठवत नाही…मग जाम दु:ख होतं एकदम ….. आजचं तसं होत नाहिये…. मला अंधूक आठवताहेत विचार…. मगर म्येरेको झोपनेका है…. क्या करू???  असे विचार करणाऱ्यांचं बरं असतं नाही , कुठला तरी बुडबूडा येतो विचाराचा त्यालाच पकडायचं…. त्यावरच आणि थोडा विचार करायचा… आणि बनवायचा ’वैचारिक बुडबूडा’ …. मग तो असा मस्तपैकी द्यायचा सोडून वाचणाऱ्याच्या डोक्यात… बसं म्हणायचं तू पण विचार करत 🙂

हाहाहा… हा वरचा बिनडोक विचारही एक ’वैचारिक बुडबूडा’ नाही तर काय आहे दुसरं….. ’बुडबूडा’ हा शब्द तसा अजिबात सुंदर नाहिये….. पण असा मस्त साबणाचा फेस असावा, त्यातून अनेक बुडबूडे निघावेत….. लहानमोठे… चौफेर वहावेत…. वेगवेगळ्या दिशांना…. एखादा अलगद हाताच्या तळव्यावर विसावावा….. एखाद्यातून सुर्याच्या किरणाने आरपार लखलखावे तर एखाद्यात क्षणभर इंद्रधनू चमकावे…. एखाद्याच्या मागे मात्र कितीही धावले तरी त्याने मात्र आपल्याला सफाईदार चूकवावे…. आनंदाच्या उकळ्या म्हणा की दु:खाचे कढ , सगळ्याचेच बुडबूडे…..

हाय रे कर्मा आज हे असे काय विचार येताहेत…. फूंकर घालते या बुडबूड्यांवर… आणि झोपते आता……

……………………………………………………………..

…………………………………………………………………..

सकाळ…..

सुर्य उगवलाय, पोस्ट अर्धीमुर्धी हाती लागलीये…… आज अजून एक गैरसमज दूर होतोय, कारण कधी नाही ते गाढ झोपेतले गु्ढगंभीर असे (माझ्यामते 😉 )काही विचार आठवताहेत….. म्हणजे ज्या ’विचारांच्या’ पोस्ट कराव्या अशी माझी भ्रामक कल्पना होती, ते जरा जास्तच गहन बुडबूडे निघाले…. 🙂 हे असलं शेंडा बुडूख नसलेलं काही टाईप करणं म्हणजे वाचणाऱ्याची सोशिकतेची मर्यादा तपासणं आहे….. काहितरीच अगम्य, अतर्क्य, अलंकारिक (कोण आहे ते जे ’चमत्कारिक’ असं वाचतयं !!! 🙂 ) आहे हे प्रकरण……

छे छे छे…. इथून पुढच्या पोस्ट्स व्यवस्थित जागेपणी लिहिणार, म्हणजे ’अपने पुरे होशोंहवास में ’ वगैरे….. उद्याला काही हलकंफूलकं सुचलं तरच लिहीन आता (तोवर सहन करा ही पोस्ट 😉 ) ……

Advertisements

तुम कहाँ जाओगे …. :)

धडाम्म….

दार धाडकन बंद… मनातल्या सगळ्या रागाचं कारण ते दारच जणू…… कारणं अगदीच कळंत नाहीये असं नाहिये बरं का…. कळतयं पण वळू द्यायचं नाहिये ना आज…. ‘हा असं का बोलला???  ‘ का म्हणून याने असं बोलावं हा मुद्दा आज मनाला लावून घ्यायचाच म्हटल्यावर काय बोलणंच खुंटलं ना मग!!! मग आलंच ओघाने डोळ्याच्या कडेला अडवलेलं ते पाणी… मनातली ती धुसफूस… ईत्यादी ईत्यादी…..

रस्त्यावर आलाय तो फक्त देह…. मन घुटमळतय घरातच… घरात आहेत ’तो’ आणि दोन भांबावलेली पिल्लं… त्यांना काही कळत नाहिये झालय काय मम्मा बाबाला…. आत्ता एक दहा मिनिटापुर्वी तर धमाल होती घरात…. आपण म्हणे बाहेर जाणार होतो… मग ही मम्मा एकटीच का निघून गेली….

रस्त्यावरच्या तिला हे पहायला आणि समजायला घरात असणं गरजेचं नाहीये… तिला सगळं समजतयं ते…..मुलांची एकमेकांमधली प्रश्नार्थक नेत्रपल्लवी चाललेली आहे… ते बाबाच्या आसपास अपेक्षेने घुटमळताहेत की बाबा सांगेल समाजावून काय झालयं ते…. पण बाबाही गप्प आहे…. त्यालाही काहितरी चुकलयं असंच तर वाटतय…. आणि जिच्यावर तो हक्काने रागावतो तिचे असे पुर्णत: अनपेक्षित घराबाहेर निघून जाणे मुळात त्यालाच कुठे समजतेय अजून….

रस्ता चाललाय… रस्त्याने ती…. आपल्याला कोणी आत्ता ओळखायला नकोय असे मनात वाटतेय… आजूबाजूच्या गर्दीत ती एकटीच…. डोळ्यातला पुर तसाच महत्प्रयासाने थोपवलेला…. चेहेरा सांभाळलेला…न  जाणो कोणाला काही समजायला नकोय…. एकच प्रश्न मनात पिंगा धरून नाचतोय… तो असं का बोलला???? आजूबाजूला वारंवार पहाणाऱ्या स्वत:च्याच नजरेचा चोमडेपणा आवडत नाहिये तिच्या मनाला, पण मनालाही जाणवतयं तो फार वेळ थांबणार नाहिये घरात ती बाहेर पडल्यावर….. फार फार तर रस्त्यावरचा समोरचा कोपरा फक्त… तो धावत येईलच मागून….. त्याचा मागोसा घेणारी नजर त्याची वाट पहातेय हे मनाशी कबुल करावे की नको या विचाराशी अडलेली ती पुढे चालतेय….

मनात अचानक आठवलेला दहा वर्षापुर्वीचा प्रसंग …. अशीच रुसलेली ती…. असाच एक रस्ता…. चाल चाल चालली ती आणि त्याला गाठता येऊ नये म्हणून रस्त्यावरचे एक नवखे वळण घेऊन पुढे निघाली….. एका मनाला कुठेतरी मनात खात्री होती तो नक्की शोधणार आपल्याला…. मनाच्या रागावलेल्या कोपऱ्याला हे पहिले मन मस्त हसत होते…..ती मनातल्या मनातच या मनावरही रुसली मग… काही नकोय त्याने शोधायला बिधायला…. तंद्रीतून चालताना कोणाला तरी धडकली ती…. दचकून समोर पाहिले तर तो हसत उभा…. खुदकन हसली असावी ती क्षणभर पण लगोलग चे्हेरा निर्विकार केला तिने….

“तूला कसं कळलं मी इकडे येणार ते??”  तिने विचारले….

“सरड्याची धाव कुंपणापर्यंत मॅडम 🙂 ….. आणि तसंही जाऒगे तुम कहाँ???? 🙂 दहा महिने झाले ओळखतोय की तूला… ” …..तो

का विरघळतो हा राग हेच समजत नाही अश्यावेळी…. पण आज तसे होऊच देणार नाहिये मी…. का बोलला हा मला असे???? विचाराचा पिंगा सुरु…पिंगा गं बाई पिंगा…. नाही आवडत मला हे गाणे…. आणि ते आशावादी सतत हसणारे ,  न रागावणारे मन पण नाही आवडत… त्या मनाशीच कट्टी आज… रुसलेल्या या मनाच्या भिंतीवरून त्या मनाच्या अंगणात डोकावले तर तिथे वेगळाच घोळ चाललाय … त्या मनाला म्हणे काळजी वाटतेय….. तो बोललाच का यापेक्षाही ’का बोलला’ हा विचार नको का करायला… कधी बोलतो का तो असे ??? बोलेल का??? बरं शब्द भलेही असावा मनाला लागणारा पण त्या शब्दाला त्याच अर्थाने त्याने वापरले असेल का??? किंबहूना असे तो कधी वापरेल का???? सगळ्याची उत्तरं स्पष्ट ’नाsssssही… मुळीsssch नाsssही ’ अशीच तर येताहेत… मग तो दमलाय नक्कीच…. की त्याला बरं नाहीये…. की बिनसलयं काही ऑफिसमधे…. की काही विचारात आहे तो….. छे छे कोणाचं चुकतयं…. आपण तर विचारायला हवे ना त्याला???      “”Sticks and Stones may break my bones but words never hurt me “”” हे वाक्य काय केवळ Facebook ला स्टेट्स म्हणूनच ठेवायचे … ते प्रत्यक्षात अमलात आणायचे नाहीये का मनाला???? की ते जगासाठी ….’हा’ कुठे येतो ईतरांमधे…. याच्या अस्तित्वात माझं अस्तित्वं  आहे…. मला खरच शब्द दुखावताहेत की  माझ्या अत्यंत लाडक्या व्यक्तीला असे  रागाच्या भरात ताबा ठेवता येत नाहिये शब्दांवर या जाणिवेचा त्रास होतोय….. दुसरीच शक्यता जास्त खरी…..

विचारांचं चक्रीवादळ आहे डोक्यात…. कोपऱ्यावरच्या दुकानात वेळ काढायचाय आता थोडासा… उगाच खालच्या मजल्यावरून वरच्यावर टंगळ मंगळ करायचीये… काहितरी खरेदी करायचे का??? दुकानात नुसतं शिरायचं आणि काहीच विकत घ्यायचे नाही हे त्याला आवडत नाही…. त्याचा कशाला विचार करतेय मी… त्याला नाही आवडत , न आवडू दे… मला असंच आवडंत…. माझा attitude चुकतोय म्हणे… . हे, हे चाललेय काय… हात कशाला उचलताहेत त्या चित्रकलेच्या वह्या…. अरे हातांनो काही खरेदी नाही करायची असं ठरवलय न मनाने!!! स्वत:साठी नाही घेत मी काही… मुलांना घेतेय वह्या… हा हा… मनाला पटलयं हातांनी दिलेले कारण….मनाला मान्य नाही करायचंय त्याचं माझ्यासोबत वावरणारं अस्तित्वं…… दुकानाबाहेर उभी असलेली गाडी ओळखीची आहे…. आलेत म्हणजे हे आपल्याला शोधत आणि ते ही अचूक…. काहितरी उमलतय पुन्हा मनात… पण नाही उमलू द्यायचय आज… आज ना मला रुसायचचं आहे हे नक्कीsss!!!!

गाडीत बसल्यावर आता हे काय होतयं…. आत्तापर्यंत ईमान राखलेले डोळे फितूर का झालेत??? अरे अडवले होते ना पाणी तुम्ही .. ते तुमच्या बांधाला न जुमानता येतेय ना रे बाहेर….

रात्र तशीच जातेय रुसव्याची….. सकाळ मुद्दाम उशिरा सुरू होतेय, तो गेलाय ऑफिसला याची खात्री झाल्यावरच…..मुलंही उठलीयेत… सगळं रोजच्याप्रमाणे सुरू आहे… पण आज ना मनाचा मुक्काम तुकडी ’ड’ मधून तुकडी ’अ’ मधे परत आलाय…. तुकडी ’ड’ कुठली आणि तुकडी ’ढ’ मेली…. साधं विचारू नये मी त्याला की का रे बाबा असा पटकन रागावलास… आणि खरं तर त्याचा स्वभाव का नवा आहे मला आता… ऑफिसमधून आल्यावर कधितरी पटकन रागावून काहितरी बोललेलं मुळात तो स्वत:च पुढच्या पाचेक मिनिटात विसरतो मग मी का बाऊ करावा….. काही कळतं नाहिये….एरवी तो असं काही बोलला की हसून उडवणारी मी असं का वागले हा प्रश्न आज पुन्हा पिंगा घालणार दिसतयं मनात…. पिंगा ग बाई पिंगा!!!

दुपारी तो जेवायला आला नाही…. येणारच नव्हता, माहितीये मला….. संध्याकाळीही उशिरा येईल आज… हे ही माहितीये मला…… मुलगा विचारतोय, ” मम्मा बाबाचा फोन कुठे आला मग तुला कसे माहितीये??? ” ….. काय सांगू याला आता…..

संध्याकाळी त्याला उशिर होणार माहितीये पण मग करावा का आपण फोन??? तो उचलणार नाही हे ही माहितीये…. तरी हाताने उचललाय फोन बघा…. हे हातही फितूरी फार करताहेत हल्ली…. लावला फोन त्यांनी…. रिंग वाजत राहिली…. चांगली जिरली या हातांची… सांगितलं ना तो नाही घेणार फोन, असचं पाहिजे!!! डोळे लागलेत घड्याळाकडे….. नेमका खिडकीचा पडदा सरकवावा आणि त्याने यावे….. मग त्याला कळेल मी वाट पहातेय….. छे छे नकोच ते….. मग किचनच्या खिडकीतून हळूच कानोसा घ्यावा का… हो चालेल….. अजून कसा नाही आला हा???? पुन्हा फोन करावा…. ’हो’ ……. आत्ताच्या वेळी मात्र मनाचे आणि हाताचे एकमत आहे….. काळजी दाटतेय मनातही आता….. फोन पुन्हा वाजतोय…. नको उचलूस जा मलाही काही घेणं देणं नाहिये…..

दार वाजलयं…. आलाय तो… चेहेऱ्या आता जबाबदारी तुझ्यावर…. डोळ्यांनो तुमचा गाढवपणा नकोय आज….. काळजी वाटली होती याचा त्याला थांग लागू द्यायचा नाहिये…. चला सगळे अळी मिळी करा….. पहायचचं नाहिये…. मुलांना भरपुर आनंद झालाय बाबा आल्याचा…… थकलेला दिसतोय हा…. चेहेरा ओढलाय….. नाही नाही बोलायचं नाहिये मला उठायचंही नाहिये जागेवरून…..

“किती वेळ बसला होतास बागेत????? शंभर फोन केले उचलता येत नाहीत…. काय अवतार केलाय हा आणि…… नाही सहन होत स्वत:ला तर ठेवायचा ना रागावर ताबा… ते नको ….. आणि कधी नाही ते मी रागावले तर विचारता नाही येत का गं बाई तुला काय झालं म्हणून??? बागेत काय झाडं सांगणार होती तूला सगळं….. आता सोबत समोसे आणलेस की केक , तरी बरं ईतकी स्वस्तात राग विसरणारी बायको आहे???… पण मेली इथे कदर कोणाला???? ” ………………….. जाऊ देत बोललं जातयं तर बोललं जाऊ देत…. ” अरे मठ्ठा मी नव्हतेच रागावलेले….. रागावते का मी कधी….. आणि ईतकी अवस्था करून घ्यायला मी काय कायमचे वर नव्हते पोहोचले काही… जा पटकन हात-पाय धुऊन ये आणि जेवायला बसं…. मी थांबलेय तुझ्यासा्ठी… आवर आता आणि एक अजून लक्षात ठेव attitude बद्दल बोलायचे ना…. तर don’t show me your attitude mine is stronger than you असं स्टेट्स Facebook ठेवणाऱ्या मुलीची मोठी बहिण आहे म्हटलं मी….. तेव्हा जपून सांभाळून 🙂 ”

“हे काय बाबा तू गार्डन मधे गेला होतास का?? आम्हाला का नाही सांगितलंस??? आणि मम्माला कधी सांगितलस??? ” मुलांची प्रश्नावली सुरू….

हा हसतोय आता….. असाच छान वाटतो…. हिरमुसलेला नाही आवडत मला…. पण मी काय कमी मुर्ख आहे… आततायी कोणिकडची…..

“तूला कसं कळलं मी बागेत आहे म्हणून??? आणि केक आणलाय गाडीत आहे…. पण ते ही तूला कसं कळल??? ” आत्ता विचारतोय हा…. 🙂

“महाराज अहो सरड्याची धाव कुंपणापर्यंत…. दहा वर्ष झालेत की लग्नाला…. 🙂 ” ………..

“सॉरी….. 🙂 ” ………..

दादा बघ मम्मा -बाबा नेहेमीसारखे पुन्हा एकत्रच बोलताहेत…… 🙂 ….. मुलंही हसताहेत…..

रफीचा स्वर कानात उमटतोय…… वादियाँ मेरा दामन,रास्ते मेरी बाहें….. जाऒ मेरे सिवा तूम कहाँ जाऒगे…. 🙂

मला नाहीच जायचं मुळी कुठेच… अगदी कुठेच!!! 🙂

एक’क’ …..

सहज येणारे विचार काव्यात बांधणे सोपे नक्कीच नाही… माझ्यासारख्या गद्याशी सुत जमवलेल्या व्यक्तीने तर त्या वाट्याला जाऊही नये… तशी मी जातही नाही….

कधितरी असेच काहीतरी विचार गर्दी करतात जे ना पद्य असते ना गद्य…. मनात हे विचार दाटिवाटी करतात….

आज असेच काहिसे…. कविता किंवा काव्य वगैरे काहिही शोधू नका, मी ही शोधलेले नाहिये…. एकेका ओळींचे विचार म्हणूया हवे तर….

क कूचाळक्यांचा

क कौतूकाचा

क कंटाळ्याचा

क कर्तुत्त्वाचा

क कटूतेचा

क कणवेचा

क कंजूसाचा

क कर्णाचाही

क कहराचा

क कृपाप्रसादाचा

क किचकटही

क कुतूहलही

क कृतघ्नही

क कृतज्ञही

क क्रौयातही

क कारूण्यातही

क कणखरही

क कोमलही

क करडा काळा

क कांचन केशरीही

क किंचितही

क कौशल्यही

क कातरवेळही

क किरणही

क कैकेयीचा

क कौशल्येचा

क कॅब्रेतही

क किर्तनातही

क केराचाही

क केवड्याचाही

क काव-काव ही

क कुहू-कुहू ही

क कसाबचाही

क कलामांचाही

क कलमाचा

क किबोर्डचाही

क नूसता ’क’ म्हणावा की त्याला एकक म्हणावे….. कुठले परिमाण, विशेषण लावावे…. निवडु म्हणतेय आज एकच ’क’ , पहिला नव्हे दुसरा…. आवडेल मला माझ्या नावामागे तेच एक’क’…..

जाता जाता एक’क’ मग असा आठवतो जो मला सांगतो…

क कागदाचा होता

क कॉंप्यूटरचाही झालाच की…  🙂

 

ता.क. ही सहजच वरची १०० वी पोस्ट 🙂

कल भी-आज भी-कल भी….

कल भी आज भी ….. आज भी कल भी… कुछ रिश्ते बदलते नही है कभी… 🙂

VIP suitcase ची जुनी जाहिरात आणि तिच्यातल्या या ओळी अनेकदा नकळत मनात गुणगुणल्या जातात… काही नाती बदलू नयेत असेच नेहेमी वाटते, नाही!!!! आणि हेच ईतके ठामपणे सांगणाऱ्या या ओळी कायम स्मरणात राहिल्या असाव्यात… 🙂 आजही या ओळी मनात  आल्या, पण ’का’ या प्रश्नाशी गाडी अडली….

मनात येणारे उघड विचार आणि आपण कितीही कामात असलो तरी मनाच्या कोपऱ्यात स्वत:चे स्पष्ट अस्तित्व राखणारे काही विचार असतात नाही का… हे कोपऱ्यातले विचार बरेचदा जाणवतही नाहीत इतके खोलवर असतात ….. उघड विचार आणि त्यांचे एकमेकांमधे मस्त भाष्य़ चालते आपल्याला न कळू देता… लेकिन हम भी कुछ कम नही है…. आज या ओळी का मनात आल्या ते शोधायचेच हा चंग बांधला मी आणि समद्या विचांरांचा वैचारिक मागोवा घ्यायला सुरूवात केली…. 🙂 (काय शब्दबंबाळ झालाय हा पॅरा… पण खरचं हे असंच घडलं असल्याने मला पर्याय नाहीये 🙂 )

गेले संपुर्ण वर्ष.. ब्लॉगाच्या निमित्ताने झालेल्या अनेक सुंदर ओळखी… स्टार माझाचे मिळालेले बक्षीस वगैरे अनेक विचार मनात घोळताहेत हे आठवतेय मला…. त्याबद्दल मी बेहद्द खुशही आहे… पण अजूनही काहितरी आहे.. असावे नक्कीच!!!

गेल्या शनिवारी भारतात गेले… गेल्या जवळपास ८-९ वर्षातला एकटीने केलेला पहिला प्रवास… मुलाचा जन्म झाल्यानंतर कायम आम्ही दोघांनी एकत्र प्रवास केले… एकटीने आता प्रवास करता येईल का असे वाटावे ईतपत मुलांच्या सोबतीची झालेली सवय….. पण यावेळेस स्टार माझाच्या चित्रीकरणासाठी एकटी निघाले… विमानतळावर बोर्डिंग पास घेताना हट्टाने लहान मुलांसारखी खिडकीची जागा मागितली… 🙂 … मस्तपैकी  जागेवर जाऊन बसलेही… शेजाऱ्यांशी ओळखी झाल्या… मुलांची आठवण, ते रहातील ना व्यवस्थित वगैरे मनात वारंवार डोकावणाऱ्या प्रश्नांना मागे सारले जरासे… विमान आकाशात ज्या गतीने धावत होते त्यापेक्षा कितितरी वेगाने माझ्या मनात एकामागे एक अनेक विचार चौफेर धावत होते…. ढगांचे पुंजके… खाली समुद्रात मधेच दिसणारे एखादे जहाज… मग त्या जहाजावरून कोणितरी आत्ता या विमानाकडे पहात असेल वगैरे टिपीकल लहानपणीचे विचार मनात डोकावत असताना आमच्या विमानाची सावली खालच्या समु्द्राच्या निळयाशार पाण्यावर दिसली…. आणि खूळ्यागत मी ती वाकून पहात राहिले…. लहानपणीच नाही तर अगदी कॉलेजात असतानाही ट्रेनमधून वाकवाकून मागे पळणाऱ्या झाडांकडे पहायचे तसे 🙂 … आणि वाटलं का्लच्या ’मी’ चे अंश मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत गड्या आपल्यात 🙂 शेजारच्या माणसाशी मस्त ओळख झालेली होतीच…. माझा बालिशपणा पाहून ते म्हटलेही, “खूप वाकू नका हं… खिडकीतून मान बाहेर काढू नका… मागून येणारे विमान ठोकेल 😉 ” मनसोक्त हसलो आम्ही दोघे….. जेवण नामक प्रकार आल्यावर मी , “मला बरे नाहिये, नको मला जेवायला ” सांगितल्यावर शेजारच्या दादांनी, अहो नका जेऊ पण सॅलड खा तेव्हढे…. मग ते संपल्यावर… चक्कर येतेय ना ती खिर खा तेव्हढी :)… ती संपवल्यावर … एक काम करा बघू थोडा भात-भाजी खा तकवा राहील म्हणून मला जवळपास सगळे ताट संपवायला लावले…. 🙂 मला आई आठवली कायम रागावणारी, घरात गं कुठला आग्रह लागतो तूला…. आळशी…. जेवायचा कुठला आळस या मुलीला म्हणणारी…. 🙂 …. मुलांना याच मुद्द्यांवर रागावणारी मी आहे तशीच आहे की अजून… गम्माडी गंमत आहे हा नवा शोध म्हणजे ….

आई-बाबा मुंबईला विमानतळावर वाट पहातच होते…. गाडीत बसल्या बसल्या आईने पुन्हा आग्रहाने खाऊ घातले…. मला खूप आवडते म्हणून माझ्या हॉस्टेलला येताना ती नेहेमी बटाट्याच्या काचऱ्या आणि वांग्याचे भरित आणायची… त्यादिवशीही तोच डबा पाहिला आणि वाटले, माँसाहेब मानले तुम्हाला…… कुछ चीजे और कुछ डबे कभी नही बदलते 🙂 … मुलं झाल्यानंतर जसा अनेक वर्षाने माझा पहिला एकटीने केलेला प्रवास होता तसे गेल्या पंचवीस वर्षात आई-बाबा आणि फक्त मी असे आम्ही तिघेच पहिल्यांदाच भेटत होतो एकमेकांना…. आम्हाला न कोणाला फोन करायचा होता, न कोणाला लवकर भेटायचे होते… खूप गप्पा मारायच्या होत्या एकमेकांशी…. मग त्या गप्पा आमच्याबरोबर नसलेल्या आमच्या घरातल्या ईतरांबद्दलच्याच असल्या तरी… ते क्षण आमचे तिघांचेच… किंबहूना माझेच… 🙂

भरपूर भटकले मी आई-बाबांबरोबर… मधे मधे माझ्या तब्येतीची कुरकुर सुरू असली तरी कुठल्याही अडचणीवर मात करावी असा आई-बाबांचा हात हातात आणि डोक्यावर होता…. ईतकं शांत , सुरक्षित वाटत होतं की जाणवलं आपल्याला ढिग गर्व असेल आपण खूप मोठे झाले आहोत वगैरे… सब झूट …आई-बाबांची कुशी आणि त्यात उबदार सुरक्षित वाटणे ह्यापुढे सगळेच लहान वाटते….

लहानपणी शाळेत फक्त बुधवारी यूनिफॉर्मची सक्ती नसायची… मग मैत्रिणींचे वेगवेगळे ड्रेसेस पहायला मिळायचे त्यातला कुठला तरी एक खूप आवडायचा…. बाबा घरी आले की माझा फतवा निघायचा… बाबा मला तसाच्या तसा ड्रेस आजच्या आज हवा…. आणि माझी आणि बाबांची वरात कपड्यांच्या दुकानात निघायची… ते थेट तसाच्या तसा ड्रेस घेऊन घरी यायची… आई रागावायचा लहानसा प्रयत्न करायची, पण बहूधा बाबांनी माझे हट्ट पुरवावे हे तिलाही मान्य असावे….. मग तिच्या कुठल्या तरी कुरकुरीला बाबा म्हणायचे, “अरे फिकिर नॉट , हम है ना 🙂 “…. असं वाटायचं आपण फक्त मागण्याचा अवकाश, बाबा ती वस्तू हजर करू शकतात!!! परवा मुंबईत फिरताना बाबांनी मला डझनभर ड्रेसेस घेतले, तरी मला हवी तशी पर्स मिळेना…. आई-बाबा मात्र न कंटाळता फिरत होते, पर्स शोधत…. केव्हातरी म्हटलं बाबा असू द्या, दमलात तुम्ही…. हसून बाबा म्हणाले, “अरे अभी मिलेगी तुमको पर्स… फिकिर नॉट… हम है ना!!!” पुढच्या दहा -पंधरा मिनिटात खरचं तशीच पर्स मिळालीही…. डोळे तेव्हाही पाणावले होते.. आजही पाणावताहेत….

रस्त्यावरून चालताना एक खड्डा दिसला, मी पुढे झाले आणि आई-बाबांना हात दिला…. आई-बाबा पुढे गेले आणि मी त्या खड्ड्याचे वळून आभार मानले… एक जाणिव होती ती… लहानपणापासून आय़ुष्याच्या वाटेवरच्या अनेक खड्ड्यांना ज्यांच्या आधाराने मी सहज पार केले त्यांना आज मला आधार द्यायचाय, आणि जसे त्यांनी मला प्रत्येक खड्ड्यापासून वाचवले तसेच मला माझ्या मुलांना सावध करायचे आहे….

स्टार माझाचे शुटिंग आटोपल्यावर विद्याधरच्या घरी मालाडला गेले…. काकुंनी भरपूर लाड केले…. माझ्या बॅगेत माझ्याकडचे सामान मावेना…. मी आणि विद्याधर मिळून ती बॅग बंद करायचा अयशस्वी प्रयत्न करत होतो आणि काकू आल्या…. आम्हाला म्हणाल्या, व्हा बाजूला मी भरते सामान… प्रश्न सामानाचा नाहिये, ते सामान कसे कोंबलेय त्याचा आहे…. काकुंच्या चेहेऱ्यात मला आई दिसत होती तेव्हा…. सामान भरण्यावरून नेहेमी रागावणारी… काका-काकूंशी गप्पा मारल्या मस्त…कुछ रिश्ते खरच तसेच असतात नाही… ’आई” बसं शब्दच पुरेसा आहे… आई ही एक भावना आहे नाही का, म्हणून आई कोणाची याने फरक पडत नाही, त्या सगळ्या बाया सारख्याच असतात :)….. मस्कतला आल्यावर नवरा म्हणालाही, मालाड नव्हे मा’लाड’ ठेव नाव… म्हटलं हो तर यावेळेस नासिकला जाणे नाही झाले पण माझे माहेरपण झाल्याशिवाय रहात नाही 🙂

शुटिंगमधे झालेल्या अनेक नव्या ओळखी, विद्याधर,सुहास आणि मी ट्रेनमधे मारलेल्या भरपूर गप्पा, एक नवा अनुभव आणि आलेले क्षण भरभरून जगण्याची ईच्छा, माझ्यातल्या ’मी’ मधे काही फारसे बदल झालेले नाहित हेच खरे 🙂

आज ही पोस्ट लिहिताना जाणवतेय हे ईतके सगळे मंथन मनाच्या कोपऱ्यात निवांत चालले होते आणि यासगळ्याची मावळत्या वर्षाच्या संध्याकाळी माझे मन नोंद घेत होते तर…. परिपाक म्हणजे मनात आलेल्या ’कल भी-आज भी… आज भी- कल भी’ या ओळींचे तरंग…. 🙂

खरयं कालच्या मी ला शोधताना मला आजच्या मी पासून जरा बाजूला व्हावे लागले आणि खूप काही नव्याने गवसले …. मस्कतला पोहोचल्या पोहोचल्या कन्यारत्न कानात म्हटले, “मम्मा आम्ही तुझ्यासाठी काहीच नाही आणलेय… गाडीतल्या तुझ्या सिटवर काहीच ठेवलेले नाही हं बुके वगैरे !! ” 🙂

मनात आल्या पुढच्या ओळी, ” कुछ रिश्ते बदलते नही है कभी ” 🙂

आयूष्यातलं , कॅलेंडरातलं एक पान उलटलं… पण कुठलिही हुरहूर न लावता…. नवी उमेद, नवी जिद्द, नव्या आशा सबकुछ है…. 🙂 … माझ्या मुलांमधे मलाही एक विश्वास निर्माण करायचा आहे, ” फिकिर नॉट… हम है ना!!” ….

काल-आज आणि उद्याचे एक वैचारिक आवर्तन सुफळ संपुर्ण झालेय 🙂 येणारे नवे वर्ष जगायला मी तयार आहे…

एक महत्त्वाचे विसरून चालणार नाहिये…

तुम्हा सगळ्यांनाही येणाऱ्या नव्या वर्षाच्या अनेकोनेक उत्तमोत्तम शुभेच्छा…. सगळी स्वप्न, अपेक्षा, आशांची पुर्तता होवो, जो जे वांछिल ते ते सगळे प्रत्येकाला मिळो ह्याच सदिच्छा !!! 🙂