तुम कहाँ जाओगे …. :)

धडाम्म….

दार धाडकन बंद… मनातल्या सगळ्या रागाचं कारण ते दारच जणू…… कारणं अगदीच कळंत नाहीये असं नाहिये बरं का…. कळतयं पण वळू द्यायचं नाहिये ना आज…. ‘हा असं का बोलला???  ‘ का म्हणून याने असं बोलावं हा मुद्दा आज मनाला लावून घ्यायचाच म्हटल्यावर काय बोलणंच खुंटलं ना मग!!! मग आलंच ओघाने डोळ्याच्या कडेला अडवलेलं ते पाणी… मनातली ती धुसफूस… ईत्यादी ईत्यादी…..

रस्त्यावर आलाय तो फक्त देह…. मन घुटमळतय घरातच… घरात आहेत ’तो’ आणि दोन भांबावलेली पिल्लं… त्यांना काही कळत नाहिये झालय काय मम्मा बाबाला…. आत्ता एक दहा मिनिटापुर्वी तर धमाल होती घरात…. आपण म्हणे बाहेर जाणार होतो… मग ही मम्मा एकटीच का निघून गेली….

रस्त्यावरच्या तिला हे पहायला आणि समजायला घरात असणं गरजेचं नाहीये… तिला सगळं समजतयं ते…..मुलांची एकमेकांमधली प्रश्नार्थक नेत्रपल्लवी चाललेली आहे… ते बाबाच्या आसपास अपेक्षेने घुटमळताहेत की बाबा सांगेल समाजावून काय झालयं ते…. पण बाबाही गप्प आहे…. त्यालाही काहितरी चुकलयं असंच तर वाटतय…. आणि जिच्यावर तो हक्काने रागावतो तिचे असे पुर्णत: अनपेक्षित घराबाहेर निघून जाणे मुळात त्यालाच कुठे समजतेय अजून….

रस्ता चाललाय… रस्त्याने ती…. आपल्याला कोणी आत्ता ओळखायला नकोय असे मनात वाटतेय… आजूबाजूच्या गर्दीत ती एकटीच…. डोळ्यातला पुर तसाच महत्प्रयासाने थोपवलेला…. चेहेरा सांभाळलेला…न  जाणो कोणाला काही समजायला नकोय…. एकच प्रश्न मनात पिंगा धरून नाचतोय… तो असं का बोलला???? आजूबाजूला वारंवार पहाणाऱ्या स्वत:च्याच नजरेचा चोमडेपणा आवडत नाहिये तिच्या मनाला, पण मनालाही जाणवतयं तो फार वेळ थांबणार नाहिये घरात ती बाहेर पडल्यावर….. फार फार तर रस्त्यावरचा समोरचा कोपरा फक्त… तो धावत येईलच मागून….. त्याचा मागोसा घेणारी नजर त्याची वाट पहातेय हे मनाशी कबुल करावे की नको या विचाराशी अडलेली ती पुढे चालतेय….

मनात अचानक आठवलेला दहा वर्षापुर्वीचा प्रसंग …. अशीच रुसलेली ती…. असाच एक रस्ता…. चाल चाल चालली ती आणि त्याला गाठता येऊ नये म्हणून रस्त्यावरचे एक नवखे वळण घेऊन पुढे निघाली….. एका मनाला कुठेतरी मनात खात्री होती तो नक्की शोधणार आपल्याला…. मनाच्या रागावलेल्या कोपऱ्याला हे पहिले मन मस्त हसत होते…..ती मनातल्या मनातच या मनावरही रुसली मग… काही नकोय त्याने शोधायला बिधायला…. तंद्रीतून चालताना कोणाला तरी धडकली ती…. दचकून समोर पाहिले तर तो हसत उभा…. खुदकन हसली असावी ती क्षणभर पण लगोलग चे्हेरा निर्विकार केला तिने….

“तूला कसं कळलं मी इकडे येणार ते??”  तिने विचारले….

“सरड्याची धाव कुंपणापर्यंत मॅडम 🙂 ….. आणि तसंही जाऒगे तुम कहाँ???? 🙂 दहा महिने झाले ओळखतोय की तूला… ” …..तो

का विरघळतो हा राग हेच समजत नाही अश्यावेळी…. पण आज तसे होऊच देणार नाहिये मी…. का बोलला हा मला असे???? विचाराचा पिंगा सुरु…पिंगा गं बाई पिंगा…. नाही आवडत मला हे गाणे…. आणि ते आशावादी सतत हसणारे ,  न रागावणारे मन पण नाही आवडत… त्या मनाशीच कट्टी आज… रुसलेल्या या मनाच्या भिंतीवरून त्या मनाच्या अंगणात डोकावले तर तिथे वेगळाच घोळ चाललाय … त्या मनाला म्हणे काळजी वाटतेय….. तो बोललाच का यापेक्षाही ’का बोलला’ हा विचार नको का करायला… कधी बोलतो का तो असे ??? बोलेल का??? बरं शब्द भलेही असावा मनाला लागणारा पण त्या शब्दाला त्याच अर्थाने त्याने वापरले असेल का??? किंबहूना असे तो कधी वापरेल का???? सगळ्याची उत्तरं स्पष्ट ’नाsssssही… मुळीsssch नाsssही ’ अशीच तर येताहेत… मग तो दमलाय नक्कीच…. की त्याला बरं नाहीये…. की बिनसलयं काही ऑफिसमधे…. की काही विचारात आहे तो….. छे छे कोणाचं चुकतयं…. आपण तर विचारायला हवे ना त्याला???      “”Sticks and Stones may break my bones but words never hurt me “”” हे वाक्य काय केवळ Facebook ला स्टेट्स म्हणूनच ठेवायचे … ते प्रत्यक्षात अमलात आणायचे नाहीये का मनाला???? की ते जगासाठी ….’हा’ कुठे येतो ईतरांमधे…. याच्या अस्तित्वात माझं अस्तित्वं  आहे…. मला खरच शब्द दुखावताहेत की  माझ्या अत्यंत लाडक्या व्यक्तीला असे  रागाच्या भरात ताबा ठेवता येत नाहिये शब्दांवर या जाणिवेचा त्रास होतोय….. दुसरीच शक्यता जास्त खरी…..

विचारांचं चक्रीवादळ आहे डोक्यात…. कोपऱ्यावरच्या दुकानात वेळ काढायचाय आता थोडासा… उगाच खालच्या मजल्यावरून वरच्यावर टंगळ मंगळ करायचीये… काहितरी खरेदी करायचे का??? दुकानात नुसतं शिरायचं आणि काहीच विकत घ्यायचे नाही हे त्याला आवडत नाही…. त्याचा कशाला विचार करतेय मी… त्याला नाही आवडत , न आवडू दे… मला असंच आवडंत…. माझा attitude चुकतोय म्हणे… . हे, हे चाललेय काय… हात कशाला उचलताहेत त्या चित्रकलेच्या वह्या…. अरे हातांनो काही खरेदी नाही करायची असं ठरवलय न मनाने!!! स्वत:साठी नाही घेत मी काही… मुलांना घेतेय वह्या… हा हा… मनाला पटलयं हातांनी दिलेले कारण….मनाला मान्य नाही करायचंय त्याचं माझ्यासोबत वावरणारं अस्तित्वं…… दुकानाबाहेर उभी असलेली गाडी ओळखीची आहे…. आलेत म्हणजे हे आपल्याला शोधत आणि ते ही अचूक…. काहितरी उमलतय पुन्हा मनात… पण नाही उमलू द्यायचय आज… आज ना मला रुसायचचं आहे हे नक्कीsss!!!!

गाडीत बसल्यावर आता हे काय होतयं…. आत्तापर्यंत ईमान राखलेले डोळे फितूर का झालेत??? अरे अडवले होते ना पाणी तुम्ही .. ते तुमच्या बांधाला न जुमानता येतेय ना रे बाहेर….

रात्र तशीच जातेय रुसव्याची….. सकाळ मुद्दाम उशिरा सुरू होतेय, तो गेलाय ऑफिसला याची खात्री झाल्यावरच…..मुलंही उठलीयेत… सगळं रोजच्याप्रमाणे सुरू आहे… पण आज ना मनाचा मुक्काम तुकडी ’ड’ मधून तुकडी ’अ’ मधे परत आलाय…. तुकडी ’ड’ कुठली आणि तुकडी ’ढ’ मेली…. साधं विचारू नये मी त्याला की का रे बाबा असा पटकन रागावलास… आणि खरं तर त्याचा स्वभाव का नवा आहे मला आता… ऑफिसमधून आल्यावर कधितरी पटकन रागावून काहितरी बोललेलं मुळात तो स्वत:च पुढच्या पाचेक मिनिटात विसरतो मग मी का बाऊ करावा….. काही कळतं नाहिये….एरवी तो असं काही बोलला की हसून उडवणारी मी असं का वागले हा प्रश्न आज पुन्हा पिंगा घालणार दिसतयं मनात…. पिंगा ग बाई पिंगा!!!

दुपारी तो जेवायला आला नाही…. येणारच नव्हता, माहितीये मला….. संध्याकाळीही उशिरा येईल आज… हे ही माहितीये मला…… मुलगा विचारतोय, ” मम्मा बाबाचा फोन कुठे आला मग तुला कसे माहितीये??? ” ….. काय सांगू याला आता…..

संध्याकाळी त्याला उशिर होणार माहितीये पण मग करावा का आपण फोन??? तो उचलणार नाही हे ही माहितीये…. तरी हाताने उचललाय फोन बघा…. हे हातही फितूरी फार करताहेत हल्ली…. लावला फोन त्यांनी…. रिंग वाजत राहिली…. चांगली जिरली या हातांची… सांगितलं ना तो नाही घेणार फोन, असचं पाहिजे!!! डोळे लागलेत घड्याळाकडे….. नेमका खिडकीचा पडदा सरकवावा आणि त्याने यावे….. मग त्याला कळेल मी वाट पहातेय….. छे छे नकोच ते….. मग किचनच्या खिडकीतून हळूच कानोसा घ्यावा का… हो चालेल….. अजून कसा नाही आला हा???? पुन्हा फोन करावा…. ’हो’ ……. आत्ताच्या वेळी मात्र मनाचे आणि हाताचे एकमत आहे….. काळजी दाटतेय मनातही आता….. फोन पुन्हा वाजतोय…. नको उचलूस जा मलाही काही घेणं देणं नाहिये…..

दार वाजलयं…. आलाय तो… चेहेऱ्या आता जबाबदारी तुझ्यावर…. डोळ्यांनो तुमचा गाढवपणा नकोय आज….. काळजी वाटली होती याचा त्याला थांग लागू द्यायचा नाहिये…. चला सगळे अळी मिळी करा….. पहायचचं नाहिये…. मुलांना भरपुर आनंद झालाय बाबा आल्याचा…… थकलेला दिसतोय हा…. चेहेरा ओढलाय….. नाही नाही बोलायचं नाहिये मला उठायचंही नाहिये जागेवरून…..

“किती वेळ बसला होतास बागेत????? शंभर फोन केले उचलता येत नाहीत…. काय अवतार केलाय हा आणि…… नाही सहन होत स्वत:ला तर ठेवायचा ना रागावर ताबा… ते नको ….. आणि कधी नाही ते मी रागावले तर विचारता नाही येत का गं बाई तुला काय झालं म्हणून??? बागेत काय झाडं सांगणार होती तूला सगळं….. आता सोबत समोसे आणलेस की केक , तरी बरं ईतकी स्वस्तात राग विसरणारी बायको आहे???… पण मेली इथे कदर कोणाला???? ” ………………….. जाऊ देत बोललं जातयं तर बोललं जाऊ देत…. ” अरे मठ्ठा मी नव्हतेच रागावलेले….. रागावते का मी कधी….. आणि ईतकी अवस्था करून घ्यायला मी काय कायमचे वर नव्हते पोहोचले काही… जा पटकन हात-पाय धुऊन ये आणि जेवायला बसं…. मी थांबलेय तुझ्यासा्ठी… आवर आता आणि एक अजून लक्षात ठेव attitude बद्दल बोलायचे ना…. तर don’t show me your attitude mine is stronger than you असं स्टेट्स Facebook ठेवणाऱ्या मुलीची मोठी बहिण आहे म्हटलं मी….. तेव्हा जपून सांभाळून 🙂 ”

“हे काय बाबा तू गार्डन मधे गेला होतास का?? आम्हाला का नाही सांगितलंस??? आणि मम्माला कधी सांगितलस??? ” मुलांची प्रश्नावली सुरू….

हा हसतोय आता….. असाच छान वाटतो…. हिरमुसलेला नाही आवडत मला…. पण मी काय कमी मुर्ख आहे… आततायी कोणिकडची…..

“तूला कसं कळलं मी बागेत आहे म्हणून??? आणि केक आणलाय गाडीत आहे…. पण ते ही तूला कसं कळल??? ” आत्ता विचारतोय हा…. 🙂

“महाराज अहो सरड्याची धाव कुंपणापर्यंत…. दहा वर्ष झालेत की लग्नाला…. 🙂 ” ………..

“सॉरी….. 🙂 ” ………..

दादा बघ मम्मा -बाबा नेहेमीसारखे पुन्हा एकत्रच बोलताहेत…… 🙂 ….. मुलंही हसताहेत…..

रफीचा स्वर कानात उमटतोय…… वादियाँ मेरा दामन,रास्ते मेरी बाहें….. जाऒ मेरे सिवा तूम कहाँ जाऒगे…. 🙂

मला नाहीच जायचं मुळी कुठेच… अगदी कुठेच!!! 🙂

Advertisements

64 thoughts on “तुम कहाँ जाओगे …. :)

  • लेख छान म्हणालास त्याबद्दल आणि बरेच दिवसाने ब्लॉगवर आलास त्याबद्दलही आभार…..

   >>>पण मला अजिबात आवडला नाही.:(

   हे का रे?

   • लेख छान कारण इतक्या व्यवस्थीत मनाला कागदावर(स्क्रीनवर) उतरवणे अवघडच 🙂

    पण हे असले प्रसंग बहुतेककरून प्रत्येक घराघरात होतच असतात आणि आपल्याच घरातील असा नकोसा त्रासदायक कठीण प्रसंग सकाळी सकाळी वाचायचा म्हणून मला नाही आवडला. 😦

    ह्या न आवडण्यामागे एक पुरषी मनही आहे ज्याला बायकांच्या अशा आतातयी वागण्याचा संतापही येतो. 😉

   • रणजित…. हं बरोबर आहे तुझं … घराघरात होतातच वाद….

    आता पुरूषी मनाच्या मुद्द्याला…. हे बघ मी काही कायम आततायी नाही बर्ं… दहा वर्षात दोन वेळा आततायीपणा करणं ईज ओके…. 🙂 … आणि तो असा जाहिर मान्य करणं म्हणजे हिम्मत लागते 😀 आणि पुरूषाने असे वागावेच कशाला की स्त्रीया आततायी वागतील…. 😉

    असो, गमतीचा मुद्दा बाजूला राहू देत… पण ही पोस्ट माझ्या याच आठवणीसाठी की मी घर सोडून फार फार तर १०० मीटरवरच्या कोपऱ्यावर पोहोचू शकते, त्यातही पुर्णवेळ घरच्यांचाच विचार करत आणि माझ्या घरच्यांना हे लक्षात ठेवण्यासाठी की असे नका रे बाबांनो बोलू काही जे माझ्या मनाला लागेल… 🙂
    आणि घरच्या सगळ्यांना एकूणात हे पुन्हा एकदा बिंबवायला , “एक दुसरे से करते है प्यार हम ” 🙂

  • योगेश आभार रे 🙂

   आवडलं ना तूला ते स्टेट्स… माझ्या दहावीतल्या मामेबहिणीच्या प्रोफाईलला होते ते… मलाही जाम आवडले होते …..

  • अरे ईतके विचार येतात एका मागे एक झुक झुक गाडीसारखे की सलग मांडले तर आपण स्वत:च नंतर खो खो हसू शकतो 🙂 ….. बघ हसलास ना तू…. हसते रहो…

   आभार रे!!

 1. तायडे, अगं विचारांचा खेळ किती अचूक शब्दांत पकडला आहेस..
  मी खूपदा विचार करतो की अशी आंदोलनं शब्दांत पकडली तरी त्रयस्थाला त्यांतला गाभा कितपत कळणार…पण तू इतकी मस्त मांडलीयस की मी तो प्रत्येक विचार ते प्रत्येक आंदोलन जगलो..
  एकदम मस्त!!!!!! 🙂

  • बाबा अरे ही पोस्ट टाकली खरी पण एक मन वाटले काढून टाकावी की काय…. कारण तेच तू म्हणतो आहेस तसे….. आपण जेव्हा आपले एका मागोमाग येणारे विचार मांडतो तेव्हा त्याचा गाभा खरच पोहोचेल का अशी शंका मनात येतेच रे….

   आता तू म्हणतोयेस की गाभा ईज पोहोचिंग तर मग असू दे ही पोस्ट ईथेच 🙂

 2. दार वाजलयं…. आलाय तो… चेहेऱ्या आता जबाबदारी तुझ्यावर…. डोळ्यांनो तुमचा गाढवपणा नकोय आज….. काळजी वाटली होती याचा त्याला थांग लागू द्यायचा नाहिये

  You have exacly written the way our mind speaks 🙂
  your diferent variety of posts encourage me to write but time is a big issue..

  • सीया आभार गं 🙂

   >>>You have exacly written the way our mind speaks 🙂

   तूला खरं सांगू का आपण अगदी मनातलं जसच्या तसं लिहू शकलो ना तर ते सगळ्यांना त्यांच्याच मनातलं उतरवलयं असं वाटतं…

   सध्या वेळ नाहिये लिहायला म्हणतेस ना… मग जेव्हा जसे जमेल तसे निदान कागदावर तर उतरवून ठेव….. सुट्टीत वगैरे टाईप कर…. आणि ज्याअर्थी तुझी ईच्छा आहे तू नक्की वेळ काढणार बघ, खात्री आहे मला!!!

  • आभार रे सुहास 🙂

   >>>मला सांग तू सहजच लिहतेस आणि ते अप्रतिम कस ग होत?

   हिवाळ्यात हरभऱ्याचं पीक येतेचं 🙂 असं म्हणूया ….. तरिही आभार रे…. मुठभर वाढलेल्या वजनासह पडते त्या हरभऱ्यावरून 🙂

   • @ हेरंब…

    मला माहित होतं या म्हणीला तू दुजोरा देणार… 😉

    @ महेंद्रजी…

    “चहाच्या कपातले वादळं ” अगदी बरोबर शब्द आहे हा महेंद्रजी…. माझे बाबा नेहेमी आईला सांगतात की अगं ते नवरा-बायको भांडले तरी कधिही काळजी करू नकोस… “चहाच्या कपातले ” वादळ असते ते… आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ते होतील एक चटकन पुन्हा 🙂 …. आज अगदी बाबांच्या वाक्याची आठवण आली 🙂

  • अरूणाताई मन:पुर्वक आभार…. 🙂

   पोस्टबद्दल खरं सांगू…. ती अगदी खरीखूरी लिहीली ईतकेच… कदाचित त्यामूळेच प्रामाणिक वाटली असावी!! 🙂

 3. >>>ती मनातल्या मनातच या मनावरही रुसली
  हे भारी होत….मनातल द्वंद्व शब्दात छान व्यक्त केलस…विषय कोणताही असो एकदम सहजच मांडण्यात तुझा चांगलाच हातखंडा आहे…वाचताना मजा आली हे वेगळ सांगायची गरज नाही …ते ‘पिंगा ग बाई पिंगा ‘ खूप आवडल ,वाचताना ते आता परत कधी येईल ह्याची वाट बघत होतो…. 🙂

  असे छोटे मोठे प्रसंगांचा उपयोग एकमेकांतील जवळीक अजून वाढवण्यासाठीच करा आणि सात काय पुढचे सगळेच जन्म असेच एकत्र रहा ….शुभेच्छा …!!!

  • देवा आभार रे 🙂

   अरूणाताईंना दिलेले उत्तर बघ… जे जसे मनात आले ते तसे प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केलाय रे फक्त 🙂

   >>>असे छोटे मोठे प्रसंगांचा उपयोग एकमेकांतील जवळीक अजून वाढवण्यासाठीच करा आणि सात काय पुढचे सगळेच जन्म असेच एकत्र रहा ….शुभेच्छा …!!!

   मनापासून आभार रे…. 🙂

 4. कसलं लिहिलंयस ग.. जबरी भन्नाट.. मला तर सुरुवातीला एखादी कथा वाचतोय असाच भास झाला 🙂 .. मग बाबा, मम्मा, पिल्लं वाचल्यावर म्हटलं बाईसाहेबांची स्वतःचीच कथा आहे तर 😛 …

  मलाही “ती मनातल्या मनातच या मनावरही रुसली” हे जामच आवडलं… डोळे, चेहरा, हात, फितुरी, सगळं वर्णन सगळा प्रसंग जबरी भारी झालाय..

  >> मला नाहीच जायचं मुळी कुठेच… अगदी कुठेच!!!

  हे वाचून तो घर सोडायच्या तयारीत असलेला पण जिलबीच्या वासाने परतणारा छोटू आठवला .. हेहे .. इथे जिलबी वेगळी पण भाव तेच.. मस्त !!

  • हेरंबा आभार रे…. 🙂

   अरे अमित मला म्हटलाही की काही डिटेल्स बदलले तर वाचणाऱ्यांना कळणार नाही की तू किती भांडकुदळ आहेस ते 😉 …कथा वाटेल ही… बघ म्हणजे पोस्टचं कारण ’तो’ आणि भांडकुदळ मी म्हणे ,चोराच्या पार उलट्या पालट्या एकदम… पण त्याला म्हटलं की फरक पैंदा है… सगळीकडे हेच असेच असते…. आणि मी प्रामाणिक भांडकुदळ आहे 🙂

   ’जलेबीsss’ माझी पण जाम आवडती जाहिरात आहे ती…. 🙂

 5. हा हा… महेंद्रसारखेच म्हणते, ” घरोघरी मातीच्याच अर्रर्रर्र… तुझ्याकडे गॆस का कॊईल गं? त्याच्या चुली… ” 😀

  तू अमितशी भांडत होतीस का स्वत:शी? 🙂 तन्वे, एकदम बढिया! कधी या झुल्यावर तर कधी त्या… खूप आवडलं.

  आणि टॆगलाईन मस्तच आहे. मला त्यावरून कशाची तरी आठवण होतेय… :))

  • आभार गं तायडे…. 🙂

   अगं अमितशी भांडले की सगळ्यात जास्त त्रास स्वत:लाच होतो गं… 🙂

   तू झापणार आहेस याची पुर्णकल्पना आहे मला म्हणून आधीच स्वारी बयो…:)

   >>>आणि टॆगलाईन मस्तच आहे. मला त्यावरून कशाची तरी आठवण होतेय… 🙂

   हा हा समजलं मला.. 🙂

 6. बापरे ! दिलकी भडास सगळी बाहेर पडलेली दिसतेय. असा आततायीपणा १० वर्षात केवळ दुसर्‍यांदांच……पण बाकी ते शब्दात मांडून प्रत्यक्षात पोस्टायचे धाडस तरी केलेस बाई. पण पोस्ट एकदम मस्त ओघवत्या भाषेत झाली आहे.

  • श्रेयाताई सगळ्यात आधि तर आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   अगं गम्मतच आहे सगळी… नवऱ्यानेच शिकवलं मला की काही पटलं नाही की मुळूमुळू रडायचं नाही… निदान समोरच्याला माफक जाणिव तर करून दिलीच पाहिजे वगैरे…. पण मुळात चिडायचा, रागावायचा स्वभाव नाही…. मग समोरच्याला जणिव बिणिव करून दिली की स्वत:ची झोप ४/५ दिवस गूल होते…. त्यामूळे हा मधला रस्ता निवडला यावेळेस घराबाहेर जाण्याचा… 🙂 …

   >>>असा आततायीपणा १० वर्षात केवळ दुसर्‍यांदांच…

   बराच ताबा आहे नाही माझा स्वत:वर… 🙂

   आभार गं!!

 7. मस्तच:))))भरपेट करमणुक. आमच्यात एक करार झालाय, भांडण झालं की चूक कोणाचिही असो रूसवा त्यानच काढायचा कारण तो शाण्णा मुलगा आहे मी गाढव मुलगी. असं माझे वडिल सुरवातिच्या काळात बोलले होते (घ्या गनिमच फ़ितुर) त्या एका वाक्यावर मी डिंक लावून चिकटून आहे. :)))) भांडण झाल्यावर घरातून बाहेर पडल्यावरचं वर्णन तर फ़िट्ट आहे. परवा मिही रागावून बाहेर पडले जाताना चांगला भक्कम बॅलन्स ट्रान्सफ़र करायला लावला आणि सगळे पैसे उडवणार म्हणून धमकी दिली. चार तास पायपीट करून आणलं काय तर त्याच्यासाठीच सॉक्स (घेताना मनात विचार, कधिचे बदलायचे आहेत), त्याच्यासाठी एक नाही दोन नाही तर चांगले चार टी शर्ट (घेताना विचार, कधीचे घ्यायचे म्हणत होते ), आणि वह्या, रबरं, खेळणी. माझ्यासाठी म्हणशिल तर दूर निघून जाणार होते नां म्हणून चांगलं ५०० रूपयांचं पेट्रोल :))))) घरी परत आल्यावर सगळं बघून परत चिडवत बसला. ५०० रूपयात कुठे पळून जाणार होतीस म्हणून:))) गंमतच सगळी. अगदी परवाच घडलं नां सगळं आणि त्यातच तुझी पोस्ट वाचली. माते धन्य आहेस गं बयो. :)))

  • अगं गनिम फितूर म्हणशील तर आपल्यातले साम्य पार गनिमांच्या काळातले गो बयो…. 🙂 … आमचेही बाबा आधि मला विचारतात “तू काय केले होतेस?? ” मग सरळ जावयाची बाजू घेतात…. छे छे… अन्याय बघ आपल्यावर 🙂

   तूझी खरेदी जाम आवडली मला … सेम पिंच गं …. 🙂

   या नवऱ्यांना ना पक्कं माहितीये कुठे जात नाहित पळून या बाया 😉

   आभार गो!!

  • स्मिता 🙂

   अगं मस्कतात वातावरण मस्त ढगाळ, पावसाळी झालं आहे सध्या त्यामुळे आजारी पडणे, आणि मुलांची आजारपण काढणे असा भरगच्च कार्यक्रम हाती घेतला आहे…

   पण लिहीतेच गं… जाम मस्त वाटतं गं असं कोणी आपली आठवण काढली की… 🙂 आभार गं!!!

 8. मस्तच लिहिलं आहेस ग … लग्न जरा मुरलं ना, म्हणजे भांडण करतानाच आता याच्या पुढे कोण काय म्हणणार, त्यावर काय प्रतिक्रिया येणार, किती वेळाने, कसं मिटणार सगळं कळत असतं दोघानाही … आणि तरीही मधून मधून भांडावं लागतंच.

  • अगदी बरोबर गौरी…. एकदम परफेक्ट ऍनालिसीस बघ मुरलेल्या लग्नाचे….

   >>>>आणि तरीही मधून मधून भांडावं लागतंच. + अगणित

   मधून मधून भांडलं की कसं सगळं पुन्हा स्वच्छ होतं ना… मजा येते जरा कचकचायला 🙂

  • मंद्या अरे बघ तुझी ताई हल्ली कशी भांडायला लागलीये 🙂

   छान वाटतं तूला ब्लॉगवर बघून…. ती जी टॅगलाईन आहे ना attitude ची ती गार्गीच्या प्रोफाईलला होती 🙂 …. मी ढापली तिथून 🙂

 9. don’t show me your attitude mine is stronger than you

  हे प्रचंड भारी

  इतरांनी एवढ लिहील आहे अजून काय लिहू
  मला वाटत होत कि तुमच्या या भांडणात मी तुझ्या सोबत मिस्टर इंडिया बनून चालत होतो.
  सगळ सगळ डोळ्यासमोर उभ राहील .
  अन खास आवडलं ते दुकानात ज्या दुकानात तू प्रत्त्यक्ष अन मी मिस्टर इंडिया बनून गेलो होतो

  • सागर आभार रे प्रतिक्रीयेसाठी… आणि मनापासून सॉरी उत्तर द्यायचे राहिल्यामूळे….

   अरे तुझी कमेंट वाचली मी आणि गडबडीत राहिले असेल उत्तर द्यायचे, पण त्यात तुझे लिहायला काही चुकले असे मुळीच नाही…. 🙂 उलट हा मि.ईंडिया सोबत असल्यामूळेच कदाचित मी बिंधास्त फिरत असावे 🙂

   पुन्हा एकदा आभार आणि सॉरी रे 🙂

 10. अप्रतिम पोस्ट झालीये.. काय आवडलं हे इथं पेस्ट करायचं तर जवळपास ८०% लेख इथे चिकटवावा लागेल.. एका महिन्यात मलाही हे असं बरंच सहन(?) करावं लागतंय…

  >>> दुकानात नुसतं शिरायचं आणि काहीच विकत घ्यायचे नाही हे त्याला आवडत नाही
  हे मात्र अगदी माझ्यासारखंच.. 🙂

  एकदम आवडेश….

  • >>>>एका महिन्यात मलाही हे असं बरंच सहन(?) करावं लागतंय…

   याबाबत आम्हाला मिसेस आप चे मत हवेय 🙂

   आभार रे…

   >>>>>> दुकानात नुसतं शिरायचं आणि काहीच विकत घ्यायचे नाही हे त्याला आवडत नाही
   हे मात्र अगदी माझ्यासारखंच.. 🙂

   मऱ्हाटवाडा ईफेक्ट 😉

 11. तन्वी,
  एकदम मस्त पोस्ट.
  वाचल्यावर खूप गंमत वाटली, म्हणजे सगळीकडे थोड्याफार फरकाने असेच चालते तर 🙂
  आणि मीराताईंची कमेंट वाचून तर पुरती करमणूक झाली.

  • सोनाली आभार गं…. आहे की नाही सगळीकडेच असे थोडेफार…. 🙂

   अगं असावेच नाही का तसे, गौरीने बघ कशी मस्त कमेंट टाकलीये… माझी संपुर्ण पोस्ट दोन ओळींमधे लिहून टाकलीये तिने…. 🙂

 12. ब्लॉग छान आहे. भाषेवर छान प्रभुत्व , नेहमीच्याच घरोघरी घडणा-या गोष्टी रंजकपणे मांडल्या आहेत.
  management चा फंडा “extra ordinary output from ordinary resources” चा प्रत्यय आला (साध्यासुध्या घटना,अनुभवांवर इतका अप्रतिम लेख)

  झालंच तर संसार,जॉब वगैरे व्याप सांभाळून लिहिता त्याबद्दल विशेष अभिनंदन.

  – अमित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s