गहन बुडबुडे..शेंडा ना बुडूख…

गाढ झोपलेय मी….

माझ्या डोक्यात कोण्या एका कथेतली दोन पात्र बोलताहेत आत्ता…. ते नवरा-बायको आहेत, भाऊ भाऊ आहेत, भाऊ बहिण आहेत की मित्र मैत्रीण आहेत मला समजत नाहीये…. असुदे!!! काहितरी नातं आहे दोघांत आणि मनातलं सगळं एकमेकांना सांगताहेत तेव्हा मैत्री नक्कीच आहे त्यांची….. एकजण आपल्या आई वडिलांवर किंबहूना साऱ्या जगावरच हा काही कारणाने जरासा नाराज वाटतोय….आणि दुसरा जो कोण आहे तो पहिल्याचे म्हणणे शांतपणे ऐकतोय, त्याला मोकळं होऊ देतोय असा काहिसा त्या कथेतला प्रसंग घडतोय….

पहिला म्हणतोय, ” नको नको होतात कधी कधी या आठवणी अगदी…. त्रास देतात नुसत्या… मनाच्या दारावरच्या त्यांच्या वारंवार येणाऱ्या धडका नकोश्या होतात आताशा… वाट्तं साऱ्या घराची जशी साफसफाई करतो ना आपण तसा या मनाचा कानाकोपरा स्वच्छ लख्ख घासुनपुसून साफ करावा….. जुन्या आठवणींची लोंबकळलेली कोळीष्टक पार काढून फेकावीत…..इतकच काय तर चक्क व्हॅक्युम फिरवावं मनात, काय अडकलेल्या,साठलेल्या, मुरलेल्या त्रासदायक आठवणी असतील तर त्यांचही समूळ उच्चाटन झालं पाहिजे!!! मग त्या अगदी जन्मदात्यांच्या असोत की भावंडांच्या…”

दुसरा किंवा दुसरी म्हणतेय, ” मान्य आहे रे मला… समजतेय तुझी घालमेल… पण आईवडिल म्हणजे काही आठवणींची धुळ का रे वेड्या…. अरे त्या तर उन्हापावसापासूनच नव्हे तर जगातल्या अनेक प्रकारच्या धूळीपासुन आपल्याला वाचवणाऱ्या संरक्षक भिंती आणि छतं नाही का….. भिंती आणि छप्परच ओढून काढणारे कोणते रे व्हॅक्य़ुम असते??? ”

पहिला पुन्हा एकदा, ” बरोबर आहे तुझे…. अरे पण आईवडिल म्हणजे संरक्षक भिंती म्हटलं तर जेव्हा आम्ही आईवडिल झालो तेव्हा आमच्या मुलांसाठी आम्हिही याच भुमिकेत शिरणार की नाही…. मग तेव्हा आधिच्या भिंतींनी ताठपणा सोडून जरा मागे नको का सरकायला?? की रहाणार ते तिथेच तसेच, त्याच भुमिकेत ?? अडचण नाही का होणार त्यामुळे….. अरे आधिच्या भिंती मागे सरकल्या, विस्तारल्या तरच मोकळेपणा येणार नाहितर घुसमटच ना सगळी!!!!”

माझी झोप उडतेय हळूच…. जराशी जाग आल्यासारखी वाटतेय…. मगाच्या संभाषणातले काही दुवे हाती लागताहेत…. स्वच्छता, व्हॅक्य़ुम…. भिंती… घुसमट ऐसाच कुछ तो याद आ रहा है!!!

झोपेचा अंमल अंमळ आणि थोडा कमी होतोय…. वरचे सगळे शब्द हे उद्या करायच्या घर साफसफाईबद्दल नाहित…. तर मी न लिहिलेल्या पण माझ्या नकळत कधितरी डोक्यात शिजत असलेल्या कुठल्या तरी कथेतली अनोळखी पात्रांच्या संवादातली आहेत इतपत समजतेय आता…. गहन आहेत की हे संवाद 🙂 ….. मी हे संवाद वगैरे भानगडीत अडकलेय आणि माझ्या स्वत:च्या घरातले इतर पात्र मात्र गाढ झोपलेले आहेत आत्ता, त्यांच्या वाट्याची स्वप्न पहात 🙂 …. या दोन अनोळखी लोकांनी आणि त्यांच्यातल्या संवादाने माझ्या झोपेचे खोबरे केलेय आता…. म्हणजे त्यांचे संवाद गहन बिहन ठीके पण हे असले जडं संवाद बोलणारी पात्र माझ्याच स्वप्नात का, एरवीही खून, मारामाऱ्या चोऱ्या होतातच स्वप्नात, पण आज हे प्रकरण नवे ??? क्यूँ??? या प्रश्नाचा ससेमिरा लागलाय आता…कूस बदला आणि विचार करा आता….. मला झोपायचेय परत….. नो जागरण!!!

असे ना रात्रीचे किती वाजलेत हे ही माहित नसते … अर्धवट जाग आणि बऱ्यापैकी पेंगलेले डोके आणि मन, मग स्वस्थ बसावे ना….. ते नको… कुठल्या तरी विचाराचा उंदीर उगाच डोक्यात खूडखूड करणार…. त्या उंदराचा मग स्पायडरमॅन होणार… विचारांच्या धाग्यांना लोंबकळणार….

काहितरी कुठलं तरी जुनपानं अडगळीतलं काहितरी अंधूक आठवतय  …. तेव्हा कोणितरी दिलेला आधाराचा हात आठवतोय…. झोपेत मग वाटणार , औदासिन्याच्याही अनेक छटा असतात नाही, कधी आपण आपले सावरतो कधी इतर कोणी आपल्याला सावरते… मळभं हटतं हे मात्र खरं…. प्रकाशाची तिरीप साऱ्या काळ्या सावल्यांना वाकोल्या दाखवत आत झिरपतेच…. दरवेळी ती तिरीप शोधायची, इतकं सोप्प आहे सगळं!!! (हाय की नाय गहन षटकार… 🙂 )

पुढे….. (म्हणजे झोपेतल्या झोपेतच गाडी पुढे 🙂 )

आज एक नवा शोध लागलाय… गेले आठ वर्ष मी ओरड ओरड ओरडतेय, की मुलांना चप्पल घालताना आपण एक चप्पल पुढे करावी आणि मुलं नेमका दुसरा पाय पुढे करतात….. नेहेमी मग आपण ओरडावे “नेमका चुकीचा पाय पुढे करतात ही मुलं, अगदी कायम…..हा नाहीsss तो पाय” किंवा मग सरळ आपण हातातली चप्पल खाली ठेवून दुसरी उचलावी….. आज एकदम विचार चमकला, मुलं माझंच तर प्रतिबिंब आहेत…. ते चूकीचा पाय पुढे करत नाहीत तर ते माझ्या समोर असल्यामूळे माझी उजवी बाजू त्यांच्या डावीकडे असते इतकेच…. मग ते जेव्हा उजवाच पाय पुढे करतात तेव्हा मला ते उलट वाटते…. मज्जा आहे, म्हणजे मुलांचे मुद्दे पहायला मला निदान मनाने तरी समोरच्या बाजूला जायला हवे…. म्हणजे मलाही त्यांचे उजवे उजवेच दिसेल…. य्ये… आवडला हा शोध… 🙂

झोपेतच कष्टाने डोळे उघडावे आणि मुलांच्या अंगावर चादर व्यवस्थित करावी….

आता झोपेचा अंमल अजून कमी झालाय असा जो समज झाला होता तो खोडून काढलाय कष्टाने नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी, कारण ते चटकन मिटताहेत… विचारांचे कनेक्शन तेव्हढे काढले की डोक्यातही अंधार होईल…. अंधारात कसे झाडं बिडं हलत असतातच, वारा वहातच असतो .. आपल्याला पडतो का काही फरक… आपल्याला कसे ’आप मरे दुनिया डूबी’ अवस्था असते ना ती… तसेच पडू देत मेली काही स्वप्न बिप्न, हमको कुछ लेना देना नही उनसे….

तेव्हा झोपायसाठी डोळे मिटलेत…. आता पुढे…..

कधी कधी वाटतं… कधी कधी काय कायमच वाटतं, रात्री झोपेत ज्या विचारांच्या साखळ्या होतात त्यांची पोस्ट होऊ शकते…. झोपेतेच ती होतेही… सकाळी सुर्य उगवतो आणि पोस्ट मावळते…. अ की ठ आठवत नाही…मग जाम दु:ख होतं एकदम ….. आजचं तसं होत नाहिये…. मला अंधूक आठवताहेत विचार…. मगर म्येरेको झोपनेका है…. क्या करू???  असे विचार करणाऱ्यांचं बरं असतं नाही , कुठला तरी बुडबूडा येतो विचाराचा त्यालाच पकडायचं…. त्यावरच आणि थोडा विचार करायचा… आणि बनवायचा ’वैचारिक बुडबूडा’ …. मग तो असा मस्तपैकी द्यायचा सोडून वाचणाऱ्याच्या डोक्यात… बसं म्हणायचं तू पण विचार करत 🙂

हाहाहा… हा वरचा बिनडोक विचारही एक ’वैचारिक बुडबूडा’ नाही तर काय आहे दुसरं….. ’बुडबूडा’ हा शब्द तसा अजिबात सुंदर नाहिये….. पण असा मस्त साबणाचा फेस असावा, त्यातून अनेक बुडबूडे निघावेत….. लहानमोठे… चौफेर वहावेत…. वेगवेगळ्या दिशांना…. एखादा अलगद हाताच्या तळव्यावर विसावावा….. एखाद्यातून सुर्याच्या किरणाने आरपार लखलखावे तर एखाद्यात क्षणभर इंद्रधनू चमकावे…. एखाद्याच्या मागे मात्र कितीही धावले तरी त्याने मात्र आपल्याला सफाईदार चूकवावे…. आनंदाच्या उकळ्या म्हणा की दु:खाचे कढ , सगळ्याचेच बुडबूडे…..

हाय रे कर्मा आज हे असे काय विचार येताहेत…. फूंकर घालते या बुडबूड्यांवर… आणि झोपते आता……

……………………………………………………………..

…………………………………………………………………..

सकाळ…..

सुर्य उगवलाय, पोस्ट अर्धीमुर्धी हाती लागलीये…… आज अजून एक गैरसमज दूर होतोय, कारण कधी नाही ते गाढ झोपेतले गु्ढगंभीर असे (माझ्यामते 😉 )काही विचार आठवताहेत….. म्हणजे ज्या ’विचारांच्या’ पोस्ट कराव्या अशी माझी भ्रामक कल्पना होती, ते जरा जास्तच गहन बुडबूडे निघाले…. 🙂 हे असलं शेंडा बुडूख नसलेलं काही टाईप करणं म्हणजे वाचणाऱ्याची सोशिकतेची मर्यादा तपासणं आहे….. काहितरीच अगम्य, अतर्क्य, अलंकारिक (कोण आहे ते जे ’चमत्कारिक’ असं वाचतयं !!! 🙂 ) आहे हे प्रकरण……

छे छे छे…. इथून पुढच्या पोस्ट्स व्यवस्थित जागेपणी लिहिणार, म्हणजे ’अपने पुरे होशोंहवास में ’ वगैरे….. उद्याला काही हलकंफूलकं सुचलं तरच लिहीन आता (तोवर सहन करा ही पोस्ट 😉 ) ……

30 thoughts on “गहन बुडबुडे..शेंडा ना बुडूख…

 1. मला तो मुलांच्या डाव्याउजव्याचा विचार प्रचंड आवडला.. 🙂
  आणि शेवटचा परिच्छेद
  >>पण असा मस्त साबणाचा फेस असावा, त्यातून अनेक बुडबूडे निघावेत….. लहानमोठे… चौफेर वहावेत…. वेगवेगळ्या दिशांना…. एखादा अलगद हाताच्या तळव्यावर विसावावा….. एखाद्यातून सुर्याच्या किरणाने आरपार लखलखावे तर एखाद्यात क्षणभर ईंद्रधनू चमकावे…. एखाद्याच्या मागे मात्र कितीही धावले तरी त्याने मात्र आपल्याला सफाईदार चूकवावे…. आनंदाच्या उकळ्या म्हणा की दु:खाचे कढ , सगळ्याचेच बुडबूडे…..

  सुभानल्लाह!
  Proud to be your brother! 🙂

  बाकी – ती तळटीप काढून टाकलीस तरी चालेल!

  • >>> सुभानल्लाह!

   तुझं विमानं येता-जाताना दुबईला थांबत ना त्याचा परिणाम आहे हा 🙂

   >>>>Proud to be your brother! 🙂

   🙂 …. आहेसच तू माझा लाडका भाऊ … (आयला हा ’लाड’ शब्द वापरायची धास्तीच घेतलीये मी 😉 )

   हौसला अफजाई के लिये हम आपके शुक्रगूजार है!!

 2. मला काय प्रतिक्रिया द्यायची आहे बरे ?…कळतच नाहीय्ये ! त्यापेक्षा जागेपणी लिहीलेल्या पोस्टवरच का न द्या ?
  तो पर्यंत छानशी ताणूनच द्यावी हे बरे !

  • ओंकार आभार आणि स्वागत ब्लॉगवर… 🙂

   ही पोस्ट टाकताना वाटत होतं, हा जो काही प्रकार आहे तो समजेल का कोणाला… पण माझ्यासारखे हुशार आहेत बघा बरेच जण 🙂

 3. मुलांच्या डाव्याउजव्याचा सेम पिंच. ( हा प्रत्येक आईबापाला असणारच म्हणा. ) 🙂

  स्वप्नातही तू विचारांच्या बुडबुड्यांशी मस्त खेळली आहेस. कुठे चमचम तर कुठे तगमग.. सहीच! बाकी ते गहन षटकार कधी हुलकावणी देतात तर कधी ओव्हरला सहाची खैरात करून जातात… त्यावेळी मात्र किती साचवू असे होऊन जाते.

  बेहोशी के आलम में सुझे खयाल हमे तो भा गये बहना… 🙂 ( गौराची हवा लागलीये मला पण. 😛 )

  • मुलांच्या डाव्या उजव्याचा घोळ पटला ना ताई… 🙂

   >>बेहोशी के आलम में सुझे खयाल हमे तो भा गये बहना… 🙂 ….. आवडलं 🙂 अगं आजकाल तर गौराबाई ’सबक’ शिकवतात, त्यांच्या हातातून वस्तू ’छूटतात’… 😉 परवा राष्ट्रगीत पाठ केले आणि त्यावर तिचा तो फेमस ’डायनासोर’ डान्स केला तिने…. 🙂 … नुसता मजेशीर धूमाकूळ आहे (कुठल्या तरी मावशीवर गेलीये ती 🙂 ) !!

   >>>>बाकी ते गहन षटकार कधी हुलकावणी देतात तर कधी ओव्हरला सहाची खैरात करून जातात… त्यावेळी मात्र किती साचवू असे होऊन जाते.

   मला ना दरवेळेस माझ्या पोस्टप्रपंचापेक्षा तू एका ओळीत जे मस्त लिहीतेस ना कमेंटमधे ते जाम आवडते… आभार गो बयो!! 🙂

  • नाही रे रणजित, ’इन्सेप्शन’ नाही पाहिलेला मी ….. पण हे असे झोपेतल्या झोपेत आणि स्वप्नातल्या स्वप्नात सफरी घडतात बऱ्याचदा…. 🙂

  • आहे की नाही ती व्हॅक्यूम ची आयडिया मस्त… पण माझी नाहिये ती, कोण होती ती दोन ’पात्रं’ राम जाणे, भलते गहनं होते पण संवाद…. माझ्याच स्वप्नात मीच त्रयस्थ होते… 🙂

   चप्पलचा घोळ तर खरचं अगदी घरोघरी तसाच…

   आभार गं… 🙂

 4. बरेच दिवस मनात हा प्रश्न आहे म्हणून विचारते – नाही आवडला तर दुर्लक्ष करा त्याकडे.

  प्रश्न आहे – तुम्ही सगळीकडे ‘ई’ वापरता ते जाणीवपूर्वक की चुकून? म्हणजे त्यामागे काही वेगळा विचार आहे का तुमचा?

  • सविता प्रश्न आवडण्या न आवडण्याचा प्रश्नच नाहिये, मला वाटतं ईतपत मोकळेपणाने आपण बोलायला हरकत नाही 🙂

   तो जो ’ई’ चा मुद्दा आहे, ते नकळत होत असावे म्हणजे चुकून….

 5. वा! अति उत्तम.बुड्बूडे आवडले. आणि तो मुलांना चप्पल घालताना लगलेला शोध तर अफ़लातून आणि तितकाच खरा. झोपेत बहुधा बऱ्याच गोष्टीन्चे उत्तर सापडते.
  असे बुड्बूडे वाचायला आवडेल.

  • अरूणाताई आभार…. 🙂

   >>>झोपेत बहुधा बऱ्याच गोष्टीन्चे उत्तर सापडते…

   हे पुर्ण पटलं, कारण बहूतेक जागेपणी छळणाऱ्या गोष्टींचा झोपेत आपण जास्त विचार करतो शांतपणे!!

 6. वाचता वाचता एक विचार मनात आला की “आयला, आपल्यासारखेच झोपेत विचार करणारे, झोपेत पोस्त लिहिणारे असतात तर” वा वा.. पण पूर्ण पोस्ट वाचून झाल्यावर लक्षात आलं की आपल्या झोपेतल्या (आणि जागेपणीच्याही) पोस्ट्सची आणि या पोस्टची तुलना होणे नाही. कारण “झोपेत लिहिल्या आहेत” हे एक साम्य वगळता त्यांच्या दर्जात हिमालय आणि समुद्रसपाटी एवढा फरक आहे !! अप्रतिम..

  • हेरंबा…

   आजकी ताजा खबर काय आहे माहितीये, श्री.हेरंबबूवा ओकांनी अमेरिकेतल्या बर्फात हरभऱ्याचे यशस्वी पिक घेतले आहे… सध्या ते लोकांना त्या झाडावर बसवण्याचे काम करत आहेत… 🙂

   महाराज ज्याच्याकडे बर्फ आहे त्याचा ’हिमालय’ आणि ज्याच्याकडे समुद्र आहे त्याच्याकडे ’समुद्रसपाटी’ … आता बघ कोणाकडे काय येते 🙂

   आभार रे….

   • >>> आजकी ताजा खबर काय आहे माहितीये, श्री.हेरंबबूवा ओकांनी अमेरिकेतल्या बर्फात हरभऱ्याचे यशस्वी पिक घेतले आहे… सध्या ते लोकांना त्या झाडावर बसवण्याचे काम करत आहेत…

    हाहाहा.. लोळालोळी.. लई भारी

 7. @भानसा – मुलांच्या डाव्याउजव्याचा सेम पिंच. ( हा प्रत्येक आईबापाला असणारच म्हणा. ) +१
  तन्वी तुझी रास ‘कर्क’ नां? माझ्या नवर्‍याचीही ‘कर्क’ आहे आणि तो अशीच झोपेत स्वप्नं पहात असतो. कधी कधी ’धरा, पकडा, गोली मारो’ असं जोरात म्हणत उठतो, तेव्हा डराडूर झोपलेली मी ‘धनू’ दचकून जागी होते. 🙂
  रच्याक – रास आणि स्वप्नं यांचा संबंध शोधायला हवा.

  • अगं रास कर्क असली की झोपेतच काय, जागेपणीही स्वप्नातच जगणे सुरू असते 🙂 …. हो ना रे हेरंब आणि सोनाली 🙂

   >>>रच्याक – रास आणि स्वप्नं यांचा संबंध शोधायला हवा. 🙂 ….. शोधूया नक्की!!!

 8. माझ्या डोक्यात पण कधी कधी असे अनेक बुडबुडे येऊन वेगवेगळ्या दिशाना पसरतात आणि डोक्याला शॉट देतात …. ते व्हॅक्य़ुम फिरवायची आयडीया खरच भन्नाट ..याचा शोध लावला पाहिजे कोणीतरी…बाकी लेखा बद्दल काय बोलायचं जास्त बोललो तर आनंद म्हणेल मी पण हरभरयाच पीक घेतो आहे म्हणून …. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s