चौकट बदलताना…

आई, मी आणि माझी  लेक अश्या तीन पिढ्या गप्पा मारत बसलेल्या…. मधेच केव्हातरी लेकीने माझ्या गळ्यातले मंगळसुत्र घेऊन स्वत: ते घातलेले… नुकताच माझ्या पर्सवर तिने हात मारलेला असल्याने, वेगवेगळ्या टिकल्या, मी नुसतीच ठेवलेली लिपस्टीक वगैरे लावून आणि माझ्या एका ओढणीला साडी म्हणुन गुंडाळून ती बाकि संपुर्ण सजली असली तरी मंगळसुत्राशिवाय, मम्मा- टिचर वगैरे भुमिका पुर्ण होत नसल्याने भुमिकेची गरज म्हणून ते माझ्या गळ्यातून काढून घेऊन तिने स्वत: घातले होते!!! 🙂 ईतका वेळ नातीकडे कौतूकाने पहाणारी आई चटकन म्हणाली, “असले लाड नको करूस… दागिने का कोणी देतं खेळायला!!! ”

मुद्दा योग्य असला आणि मी काळजीने लेकीकडून ते मंगळसुत्र परत घेणार वगैरे असलं तरी आईतल्या आजीला पहाताना गंमत येत होती…. आमची आजी अगदी अशीच रागवायची, ” मुली मोठ्या केल्यात आम्हीही पण असले लाड नाही पाहिले… तुमच्या बाबांना सांगणार आहे मी की नका करू मुलींचे लाड ” वगैरे पेटंटेड वाक्यं ती आमच्या दरसुट्टीत न विसरता बोलायची  … 🙂 पण आमच्या लाडाकोडाचे त्यानंतर कधी रेशनिंग झाल्याचे मलातरी आठवत नाहिये…. आणि मुख्य मुद्दा असलेलं मंगळसुत्र, ते तर मी ही आईचं घेऊन घालायचेच… सगळ्याच मुलींना आईसारखं दिसायचं असतं… लहानपणी एकतर आई नाहितर शाळेतल्या बाई  ही रूपांतरं मुली करतातच… आजची करमणुक मात्र माझ्या आईचे आजी हे रुपांतर होते 🙂 …. मातोश्री ’आई’ च्या चौकटीतून ’आजीच्या’ चौकटीत गेलेल्या मी ’आई’ या चौकटीतून पहाणे हा विचारच खूप सुंदर होता 🙂

टिव्हीवरच्या एका मालिकेतल्या नायिकेची आई तिच्या होणाऱ्या सासुरवाडी गेलीये… घरात सगळेच पुरूष, अगदी सासूही नाही… त्यांचं घरं, रहाणं एकूणातच सगळा गलथान कारभार पहाता आपल्या लाडाकोडात वाढवलेल्या लेकीचं इथे कसं निभावणारं या विचाराने धास्तावलेली आई असा काहिसा भाग सुरू असतानाच, अचानक माझा नवरा म्हणाला, “काकू (माझी आई)-काका  जेव्हा आमच्या घरी पहिल्यांदा आले तेव्हा त्यांच्याही मनात असेच विचार आले असतील ना… ” त्यावेळी तो फक्त एक जावई या चौकटीत नव्हता तर सध्या चार वर्षाची मुलगी वाढवणारा एका मुलीचा बाबाही होता….. नवरोजी मुलगा, भाऊ, जावई, मित्र वगैरे जुन्या नात्यांबरोबर भविष्यात सासरी जाणाऱ्या लेकीचे वडिल या चौकटीत अलवार शिरताना मी पहात होते… 🙂

खूपसे काही वेगळे घडावे लागत नाही, निव्वळ एका चौकटीची कक्षा ओलांडुन दुसरीत जावे लागते…. म्हटले तर सहज सोपे पण आधिच्या चौकटीची फ्रेम आपण इतकी पक्की घट्ट आवळून धरतो की सहसा मन या चौकटी ओलांडायला तयार होत नाही….. स्वत:हून स्वत:भोवती कुंपण घालणे हा गुण आहेच तसा माणसाकडे 🙂 …. नातेसंबंधातल्या चौकटीत काही गमतीच्या रंजक चौकटी आहेत नाही…. कळलं की नाही मी कोणाबद्द्ल बोलणार आहे… द फेमस सासूबाई-सुनबाई चौकटं (किंवा नुसतीच कटकट ;)) … मजेमजेच्या आयूष्याच्या रुचकर भेळेतली चवं वाढवणारी कैरी वगैरेची भुमिका या चौकटीची 🙂 …. आईच्या चौकटीतली बाई एकदा का सासूच्या चौकटीत गेली की आधिची मऊसूत फ्रेम सहसा काटेरीपणा कडे झुकते… तेच लेकीची हळवी, लाघवी वगैरे फ्रेम टाकून मुलगी सुनेच्या फ्रेमेत गेली की आधिची सुखद रंगाची चौकट जरा गडद होते 🙂 …..

सासू-सुनं, किंवा माहेर-सासरं या मुद्द्यांचा जेव्हा जेव्हा विचार करते मला लहानपणी पाहिलेल्या एका मालिकेचा एक भाग आठवतो नेहेमी…. काश्मिरमधल्या हाऊसबोटमधे चित्रीकरण झालेल्या, परिक्षीत सहानी वगैरे मंडळी असलेल्या या मालिकेचे नाव नाही आठवत पण त्याचा एक भाग कायम लक्षात राहिलाय…. त्या मालिकेतले कुटूंब जेवायला बसलेले असताना कोणा तरी एकाच्या पानातल्या अन्नात एक केस येतो ….. हा त्या घरातल्या सुनेचा अक्षम्य वगैरे अपराध असल्याने तिला घराबाहेर काढण्याची तयारी सुरू होते…. तिच्या अनेक क्षमायाचना, आर्जवं यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि तिला बाहेर घालवण्यासाठी दार उघडले जाते…. तर…. त्या दारात प्रस्तूत कुटूंबाची सासरी गेलेली लेक रडत उभी असते….. तिच्या रडण्याचे कारण विचारता ती सांगते की ’तिने केलेल्या स्वयंपाकात केस निघाल्यामूळे तिला तिच्या सासरच्यांनी माहेरी पाठवून दिलेले आहे… ’ ……… .त्या मुलीला पाहून घरातली मंडळी गडबडतात .. आपणही अशीच एक चूक करायला निघालोय अशी जाणिव झाल्याची सुचक अबोल शांतता खूप काही बोलणारी होती!!!!!पुढे काय होते या मालिकेत ते अजिबात आठवत नाहिये  एक मात्र नक्की की या चौकटींची ओळख मनात रुजली ती त्या दिवशी…. तिचं माणसं तीच ना्ती आणि चौकटीही त्याच, फक्त त्या त्या चौकटीतल्या त्यांच्या जागा बदलल्या की बहूतेक घटनांना बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो….

चौकटींचे अस्तित्व तसे नेहेमीच जाणवणारे…..व्यथा सांगणारा कसा नेहेमी म्हणतो ,” तूम्हाला नाही समजायचे ते… माझ्याजागी असता तर तूम्हाला कळले असते … वगैरे…” किंवा मग “त्यासाठी आधि स्वत:ला माझ्याजागी ठेवून बघा…” किंवा एखादी सा्सू सुनेला म्हणते, ” अगं तुझाही लेक हातातून गेला की कळेल तूला माझे दु:ख 😉 ” ….. सगळ्यांची वाक्यं वेगळी पण मागणी एकच की सोडा हो कधितरी तुमची चौकट आणि बघा आमच्या चौकटीतून जगाकडे… तुम्हालाही नक्की तसेच दिसेल जग जसे आम्हाला वाटतेय…..

लहानसेच असतात खरं तर सारे प्रसंग पण विचाराला खाद्य देऊन जाणारे…. मग म्हटलं एक चौकोनी विचार करावा या सगळ्याचा….. तर असे वाटते की एक देणाऱ्याची चौकट असते … एक घेणाऱ्याची….. देणाऱ्याने घेणारे व्हावे नी घेणाऱ्याने देणारे…..  बोलणाऱ्याने ऐकून पहावे नी अबोल ऐकणाऱ्याने बोलून पहावे…. या चौकटींच्या राज्यात कायम नाही पण कधीतरी तळ्यात मळ्यात करून पहावे…. त्या चौकटीचे कानेकोपरे, दुखरे खुपरे अंग तपासण्यासाठीच नाही तर आपल्या चौकटीवर धूळ तर नाही ना चढलेली ते अलिप्तपणे , त्रयस्थपणे दुरून पहायलाही….

शेवटी काय तर जन्म झाल्या झाल्या येणारी पाळण्याची चौकट ते आय़ूष्याच्या रंगमंचावरून गच्छंती झाल्यावर येणारी फोटोची चौकट….. पहिलीपासून दुसरीपर्यंतचा अनेक चौकटींच्या वाटेने केलेला प्रवास सारा….. पहिल्या चौकटीला खुळखूळ्यांनी सजवायला अनेक हात धावतात….. शेवटच्या चौकटीतल्या फोटोकडे ओली नजर घेऊन पहाणारे कोणी असेल तर चौकोन पुर्ण होतो नी प्रवासाला अर्थ मिळतो….. नाही का ???