चौकट बदलताना…

आई, मी आणि माझी  लेक अश्या तीन पिढ्या गप्पा मारत बसलेल्या…. मधेच केव्हातरी लेकीने माझ्या गळ्यातले मंगळसुत्र घेऊन स्वत: ते घातलेले… नुकताच माझ्या पर्सवर तिने हात मारलेला असल्याने, वेगवेगळ्या टिकल्या, मी नुसतीच ठेवलेली लिपस्टीक वगैरे लावून आणि माझ्या एका ओढणीला साडी म्हणुन गुंडाळून ती बाकि संपुर्ण सजली असली तरी मंगळसुत्राशिवाय, मम्मा- टिचर वगैरे भुमिका पुर्ण होत नसल्याने भुमिकेची गरज म्हणून ते माझ्या गळ्यातून काढून घेऊन तिने स्वत: घातले होते!!! 🙂 ईतका वेळ नातीकडे कौतूकाने पहाणारी आई चटकन म्हणाली, “असले लाड नको करूस… दागिने का कोणी देतं खेळायला!!! ”

मुद्दा योग्य असला आणि मी काळजीने लेकीकडून ते मंगळसुत्र परत घेणार वगैरे असलं तरी आईतल्या आजीला पहाताना गंमत येत होती…. आमची आजी अगदी अशीच रागवायची, ” मुली मोठ्या केल्यात आम्हीही पण असले लाड नाही पाहिले… तुमच्या बाबांना सांगणार आहे मी की नका करू मुलींचे लाड ” वगैरे पेटंटेड वाक्यं ती आमच्या दरसुट्टीत न विसरता बोलायची  … 🙂 पण आमच्या लाडाकोडाचे त्यानंतर कधी रेशनिंग झाल्याचे मलातरी आठवत नाहिये…. आणि मुख्य मुद्दा असलेलं मंगळसुत्र, ते तर मी ही आईचं घेऊन घालायचेच… सगळ्याच मुलींना आईसारखं दिसायचं असतं… लहानपणी एकतर आई नाहितर शाळेतल्या बाई  ही रूपांतरं मुली करतातच… आजची करमणुक मात्र माझ्या आईचे आजी हे रुपांतर होते 🙂 …. मातोश्री ’आई’ च्या चौकटीतून ’आजीच्या’ चौकटीत गेलेल्या मी ’आई’ या चौकटीतून पहाणे हा विचारच खूप सुंदर होता 🙂

टिव्हीवरच्या एका मालिकेतल्या नायिकेची आई तिच्या होणाऱ्या सासुरवाडी गेलीये… घरात सगळेच पुरूष, अगदी सासूही नाही… त्यांचं घरं, रहाणं एकूणातच सगळा गलथान कारभार पहाता आपल्या लाडाकोडात वाढवलेल्या लेकीचं इथे कसं निभावणारं या विचाराने धास्तावलेली आई असा काहिसा भाग सुरू असतानाच, अचानक माझा नवरा म्हणाला, “काकू (माझी आई)-काका  जेव्हा आमच्या घरी पहिल्यांदा आले तेव्हा त्यांच्याही मनात असेच विचार आले असतील ना… ” त्यावेळी तो फक्त एक जावई या चौकटीत नव्हता तर सध्या चार वर्षाची मुलगी वाढवणारा एका मुलीचा बाबाही होता….. नवरोजी मुलगा, भाऊ, जावई, मित्र वगैरे जुन्या नात्यांबरोबर भविष्यात सासरी जाणाऱ्या लेकीचे वडिल या चौकटीत अलवार शिरताना मी पहात होते… 🙂

खूपसे काही वेगळे घडावे लागत नाही, निव्वळ एका चौकटीची कक्षा ओलांडुन दुसरीत जावे लागते…. म्हटले तर सहज सोपे पण आधिच्या चौकटीची फ्रेम आपण इतकी पक्की घट्ट आवळून धरतो की सहसा मन या चौकटी ओलांडायला तयार होत नाही….. स्वत:हून स्वत:भोवती कुंपण घालणे हा गुण आहेच तसा माणसाकडे 🙂 …. नातेसंबंधातल्या चौकटीत काही गमतीच्या रंजक चौकटी आहेत नाही…. कळलं की नाही मी कोणाबद्द्ल बोलणार आहे… द फेमस सासूबाई-सुनबाई चौकटं (किंवा नुसतीच कटकट ;)) … मजेमजेच्या आयूष्याच्या रुचकर भेळेतली चवं वाढवणारी कैरी वगैरेची भुमिका या चौकटीची 🙂 …. आईच्या चौकटीतली बाई एकदा का सासूच्या चौकटीत गेली की आधिची मऊसूत फ्रेम सहसा काटेरीपणा कडे झुकते… तेच लेकीची हळवी, लाघवी वगैरे फ्रेम टाकून मुलगी सुनेच्या फ्रेमेत गेली की आधिची सुखद रंगाची चौकट जरा गडद होते 🙂 …..

सासू-सुनं, किंवा माहेर-सासरं या मुद्द्यांचा जेव्हा जेव्हा विचार करते मला लहानपणी पाहिलेल्या एका मालिकेचा एक भाग आठवतो नेहेमी…. काश्मिरमधल्या हाऊसबोटमधे चित्रीकरण झालेल्या, परिक्षीत सहानी वगैरे मंडळी असलेल्या या मालिकेचे नाव नाही आठवत पण त्याचा एक भाग कायम लक्षात राहिलाय…. त्या मालिकेतले कुटूंब जेवायला बसलेले असताना कोणा तरी एकाच्या पानातल्या अन्नात एक केस येतो ….. हा त्या घरातल्या सुनेचा अक्षम्य वगैरे अपराध असल्याने तिला घराबाहेर काढण्याची तयारी सुरू होते…. तिच्या अनेक क्षमायाचना, आर्जवं यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि तिला बाहेर घालवण्यासाठी दार उघडले जाते…. तर…. त्या दारात प्रस्तूत कुटूंबाची सासरी गेलेली लेक रडत उभी असते….. तिच्या रडण्याचे कारण विचारता ती सांगते की ’तिने केलेल्या स्वयंपाकात केस निघाल्यामूळे तिला तिच्या सासरच्यांनी माहेरी पाठवून दिलेले आहे… ’ ……… .त्या मुलीला पाहून घरातली मंडळी गडबडतात .. आपणही अशीच एक चूक करायला निघालोय अशी जाणिव झाल्याची सुचक अबोल शांतता खूप काही बोलणारी होती!!!!!पुढे काय होते या मालिकेत ते अजिबात आठवत नाहिये  एक मात्र नक्की की या चौकटींची ओळख मनात रुजली ती त्या दिवशी…. तिचं माणसं तीच ना्ती आणि चौकटीही त्याच, फक्त त्या त्या चौकटीतल्या त्यांच्या जागा बदलल्या की बहूतेक घटनांना बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो….

चौकटींचे अस्तित्व तसे नेहेमीच जाणवणारे…..व्यथा सांगणारा कसा नेहेमी म्हणतो ,” तूम्हाला नाही समजायचे ते… माझ्याजागी असता तर तूम्हाला कळले असते … वगैरे…” किंवा मग “त्यासाठी आधि स्वत:ला माझ्याजागी ठेवून बघा…” किंवा एखादी सा्सू सुनेला म्हणते, ” अगं तुझाही लेक हातातून गेला की कळेल तूला माझे दु:ख 😉 ” ….. सगळ्यांची वाक्यं वेगळी पण मागणी एकच की सोडा हो कधितरी तुमची चौकट आणि बघा आमच्या चौकटीतून जगाकडे… तुम्हालाही नक्की तसेच दिसेल जग जसे आम्हाला वाटतेय…..

लहानसेच असतात खरं तर सारे प्रसंग पण विचाराला खाद्य देऊन जाणारे…. मग म्हटलं एक चौकोनी विचार करावा या सगळ्याचा….. तर असे वाटते की एक देणाऱ्याची चौकट असते … एक घेणाऱ्याची….. देणाऱ्याने घेणारे व्हावे नी घेणाऱ्याने देणारे…..  बोलणाऱ्याने ऐकून पहावे नी अबोल ऐकणाऱ्याने बोलून पहावे…. या चौकटींच्या राज्यात कायम नाही पण कधीतरी तळ्यात मळ्यात करून पहावे…. त्या चौकटीचे कानेकोपरे, दुखरे खुपरे अंग तपासण्यासाठीच नाही तर आपल्या चौकटीवर धूळ तर नाही ना चढलेली ते अलिप्तपणे , त्रयस्थपणे दुरून पहायलाही….

शेवटी काय तर जन्म झाल्या झाल्या येणारी पाळण्याची चौकट ते आय़ूष्याच्या रंगमंचावरून गच्छंती झाल्यावर येणारी फोटोची चौकट….. पहिलीपासून दुसरीपर्यंतचा अनेक चौकटींच्या वाटेने केलेला प्रवास सारा….. पहिल्या चौकटीला खुळखूळ्यांनी सजवायला अनेक हात धावतात….. शेवटच्या चौकटीतल्या फोटोकडे ओली नजर घेऊन पहाणारे कोणी असेल तर चौकोन पुर्ण होतो नी प्रवासाला अर्थ मिळतो….. नाही का ???

Advertisements

53 thoughts on “चौकट बदलताना…

  • Thank u पियू 🙂

   हो रे बेटा ती सिरीयल गुल गुलशन गुलफामच होती…. बघ नेहेमीप्रमाणे मी नाव विसरले आणि तू ते लक्षात ठेवलेस 🙂

 1. सुंदर लिहिलं आहेस तन्वी, नेहेमीप्रमाणेच.

  ती मालिका ‘गुल गुलशन गुलफाम’ का? मी टीव्ही बघायचे त्या जमान्यातली माझी ती आवडती मालिका होती.

  • आभार गं गौरी 🙂

   अगं बघ सगळ्यांना ती मालिका नावासहित आठवतेय, मला पोस्टमधे लिहीलेला एक प्रसंग तेव्हढा लख्ख आठवतोय … बाकि माझ्या आठवणींचा उजेड काही पडत नाही 🙂

 2. शेवटी काय तर जन्म झाल्या झाल्या येणारी पाळण्याची चौकट ते आय़ूष्याच्या रंगमंचावरून गच्छंती झाल्यावर येणारी फोटोची चौकट…

  वाह.. काय लिहलयस…अप्रतिम..सुपर्ब 🙂

 3. शब्दच नाहियेत प्रतिक्रियेसाठी.
  >>सोडा हो कधितरी तुमची चौकट आणि बघा आमच्या चौकटीतून जगाकडे… तुम्हालाही नक्की तसेच दिसेल जग जसे आम्हाला वाटतेय…..
  हे सगळ्यात सही. आणि हे असं प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या जागेवरून पहा म्हणजे कळेल.
  मुलगी जेव्हा सूनेच्या चौकटीतून आईच्या चौकटीत प्रवेश करते , तेव्हा तिला तिची आई नव्याने कळायला लागते.

  • प्रज्ञा आभार गं… 🙂

   >> मुलगी जेव्हा सूनेच्या चौकटीतून आईच्या चौकटीत प्रवेश करते , तेव्हा तिला तिची आई नव्याने कळायला लागते. …. पटलं…. 🙂

 4. अफलातुन लिहिलेस गं….

  शेवटी काय तर जन्म झाल्या झाल्या येणारी पाळण्याची चौकट ते आय़ूष्याच्या रंगमंचावरून गच्छंती झाल्यावर येणारी फोटोची चौकट. 😦
  फार भावली !!!
  एक आठवले..परवाच प्रवाह वर भांडा सौख्य भरे पहात होते..त्यात एक सुन सासु बद्दल बरच काही सांगत होती…सगळ झाल्यावर ती सुद्धा हेच म्हणाली..” माझं हा कार्यक्रम बघणार्‍या प्रत्येक सासुला फक्त एकच सांगण आहे…तुम्ही दुसर्‍याची मुलगी घरी आणता मग तीला ही मुली सारखे का नाही वागवु शकत??तीला मुलीसारख स्थान द्या..थोडं चौकटेच्या पलिकडे जाउन बघा….मग ती पण एका घराचे दोन घरं करणार नाही……वगैरे वगैरे….”
  ह्या चौकटी आपण च उभ्या केल्यात..नाही का???

  • आभार गं माऊ 🙂

   होय गं प्रत्येकाने आपल्या चौकटी सोडायची निदान जरा वेळ तरी तयारी दाखवली तर आयूष्य किती सुंदर होईल ना अजून 🙂 … आपणच उभ्या करतो गं या चौकटी, कुंपण घालून घ्यायची आणि ते अगदी पक्के ठेवायची खूमखूमी माणसालाच….

 5. >>>शेवटी काय तर जन्म झाल्या झाल्या येणारी पाळण्याची चौकट ते आय़ूष्याच्या रंगमंचावरून गच्छंती झाल्यावर येणारी फोटोची चौकट…

  अप्रतिम….तता (तन्वी ताय – तता 😉 )लय भारी लिहल आहेस.

  • आनंदा आभार रे 🙂

   अरे हो तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखली ती सिरियल… आठवणींच्या राज्यात खंदक खोदणारी मला वाटतं मीच एकटी आहे…. काही म्हणून (विशेषत: वस्तू, जागा, व्यक्तींची नावं ) अजिबात लक्षात रहात नाहीत 😦

 6. पहिल्या चौकटीला खुळखूळ्यांनी सजवायला अनेक हात धावतात….. शेवटच्या चौकटीतल्या फोटोकडे ओली नजर घेऊन पहाणारे कोणी असेल तर चौकोन पुर्ण होतो नी प्रवासाला अर्थ मिळतो…..

 7. मॅनेजमेंटच्या हायफाय भाषेत बहुतेक ह्यालाच ‘पॅराडाईम शिफ्ट’ म्हणतात… आणि तू किती मस्त शब्दांत समजावलंस! 🙂
  शेवटचा परिच्छेद सगळ्या आयुष्याच्या परिघाला एक आडवा छेद देऊन गेला! 🙂

 8. बापरे तो प्रसंग कसला अप्रतिम होता. एकदम हृदयस्पर्शी.. मला तर काहीच आठवत नाहीये त्या सिरीयलमधलं.. फक्त नाव सोडून

  >> शेवटी काय तर जन्म झाल्या झाल्या येणारी पाळण्याची चौकट ते आय़ूष्याच्या रंगमंचावरून गच्छंती झाल्यावर येणारी फोटोची चौकट….. पहिलीपासून दुसरीपर्यंतचा अनेक चौकटींच्या वाटेने केलेला प्रवास सारा….. पहिल्या चौकटीला खुळखूळ्यांनी सजवायला अनेक हात धावतात….. शेवटच्या चौकटीतल्या फोटोकडे ओली नजर घेऊन पहाणारे कोणी असेल तर चौकोन पुर्ण होतो नी प्रवासाला अर्थ मिळतो….. नाही का ???

  अ.. प्र.. ति.. म !! जीवनाचं सार सांगून गेलीस..

  अवांतर, पांचट वगैरे वगैरे : आज मी चौकटीचौकटी (चेक्स) चा शर्ट घातला आहे. योगायोग 😛

  • हेरंबा आभार रे 🙂

   आभार याही साठी की माझ्यासारखाच आठवणींच्या राज्यात खंदक खोदलेला एक जण आहे 🙂 … मलाही तो एक प्रसंग (जो मनावर कोरला गेला आहे) सोडलं तर काहिही आठवत नाही …..

   चौकटीचौकटीचा शर्ट … कहर आहेस … 🙂 … अप्रतिम योगायोग 🙂

 9. अगदी मनातलं लिहिलत. जगरहाटी अशीच असते. आणि आपली चूक उमजते तेंव्हा बहुधा खूप उशीर झालेला असतो.मग ते रडत बसतात कि मी तेंव्हा अशी वगले नसते तर हे कर्म माझ्या वात्याला आले नसते!
  तुमचा सेकंड लास्ट परग्राफ़ मस्त जमलाय. आणि तो खरा पण आहे.
  लोकसत्ता मधील उल्लेखाबद्द अभिनंदन.

  • अरुणाताई आभार 🙂

   महत्त्वाचे… तूम्ही मला ’तू’ म्हणा बघू , तुमचा तो अधिकार आहे आणि मला असा हक्क मिळवायला जास्त आवडेल ….

 10. far ch chhan tai, ekdam chhan.. khar ch last paragraph far aavdla.
  pratyeka ni swata chya chaukati la itaki swachha aani itaki flexible thevli tar taiyar honarya chitrala 1st prize ch melnar…
  itak chhan kas suchata g tula… great

  • >>> pratyeka ni swata chya chaukati la itaki swachha aani itaki flexible thevli tar taiyar honarya chitrala 1st prize ch melnar…

   बोलला तुझ्यातला कलाकार/ चित्रकार…

   उदय कमेंटसाठी thanks पण उद्याला तू जर एखाद्या विषयावरची तुझी मतं लिहीलीस तर ती देखील मस्त नजाकतीच्या चित्रासारखी असतील याची मला खात्री आहे …

 11. चौकट म्हणजेच मर्यादा ! अर्थातच चौकटीच्या एका अंगा-बाजू हून द्सऱ्या बाजू कडे फरक हा असलाच पाहिजे, कारण मधे एक दार नावाचा प्राणी असतो ! आता हा फरक दार नावाच्या प्राण्यावर बेतलेला असतो. ते सताड उघडे आहे की किलकिले आहे की कडी कोयंडे लावून – प्रसंगी कुलुप घालून बंद केलंय ?
  साध्या घटनेतून महान तत्वज्ञानाचा शोध तुझ्या सारखीनेच घ्यावा !
  लेख खरंच सुंदर !

  • आभार काका 🙂

   >>> अर्थातच चौकटीच्या एका अंगा-बाजू हून द्सऱ्या बाजू कडे फरक हा असलाच पाहिजे, कारण मधे एक दार नावाचा प्राणी असतो ! आता हा फरक दार नावाच्या प्राण्यावर बेतलेला असतो. ते सताड उघडे आहे की किलकिले आहे की कडी कोयंडे लावून – प्रसंगी कुलुप घालून बंद केलंय ?

   🙂 … पटलं आणि आवडलं….

 12. बयो, चौकटिंचा उहापोह फारच सुंदर केलास गं!

  खरेयं, सगळेच जण चौकट आखतात आणि मग त्यातून साधा बाहेर डोकवण्याचाही प्रयत्न न करता दुसर्‍याला बोलतात. गंमत म्हणजे अनेकदा कळतही असते पण वळवावेसेच वाटत नाही. हे असे न वाटणे हा खरा अवरोध आहे. नेहमी हिरवे गवत दुसर्‍याच्याच अंगणात असते ही कायमची समजूत आपण करून घेतलीये झालं. 😦

  शेवटचा संपूर्ण परिच्छेदच अप्रतिम! आवडेश! 🙂

  आणि ती मालिका खरेच छान होती. 🙂 गेले ते दिन आणि गेल्या त्या सुंदर मालिकाही… 😦 आता नुसती एका हाती लोकांना मूर्ख समजणार्‍या एकताची ककाकिकी गिरी पाहायची… 😦

  • बयो आभार गं 🙂

   >>>नेहमी हिरवे गवत दुसर्‍याच्याच अंगणात असते ही कायमची समजूत आपण करून घेतलीये झालं. 😦
   बरोबर गं ….

   तर काय गं पुर्वीच्या मालिका खरच एक से एक होत्या… आता नुसता सावळा गोंधळ… बरं हिंदीच्या पावलावर पाऊल टाकत मराठीतही तेच सगळे 😦

 13. >>>शेवटी काय तर जन्म झाल्या झाल्या येणारी पाळण्याची चौकट ते आय़ूष्याच्या रंगमंचावरून गच्छंती झाल्यावर येणारी फोटोची चौकट….. पहिलीपासून दुसरीपर्यंतचा अनेक चौकटींच्या वाटेने केलेला प्रवास सारा….. पहिल्या चौकटीला खुळखूळ्यांनी सजवायला अनेक हात धावतात….. शेवटच्या चौकटीतल्या फोटोकडे ओली नजर घेऊन पहाणारे कोणी असेल तर चौकोन पुर्ण होतो नी प्रवासाला अर्थ मिळतो….. नाही का ???

  खूप मस्त ग …आज तुझ्या ४-५ पोस्ट वाचल्या त्यात ही सर्वात जास्त आवडली ….

  • आभार रे देवा 🙂 ….

   जरा उशिराने देतेय उत्तर कमेंट्सला…. सॉरी रे…. गडबड गडबड आहे सध्या घरात, मुलांना सुट्ट्या लागल्याहेत, नुसता हैदोस आहे घरात 🙂

  • आभार सानिका 🙂

   अगं तुम्ही सगळे ब्लॉगच्या ’प्रेमात पडलोय’ वगैरे अश्या भरभरून प्रतिक्रीया देताहेत तोवर हम जरूर लिखेंगे…. 🙂 … खूप छान वाटतं मनापासून आलेल्या प्रतिक्रीया वाचायला….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s