गृहित…

माझ्या धाकट्या पिल्लूच्या शाळेचा म्हणजे नर्सरीच्या मुलांच्या वर्गाचा बक्षीस समारंभ नुकताच संपला होता….. शाळेने अजून एका रंगाच्या युनिफॉर्मच्या बंधनात न अडकवलेली ती चिमणी रंगीबेरंगी फुलपाखरं कार्यक्रम संपल्याचे लक्षात येताच टिचर रागावण्याच्या आत चौफेर उधळली होती….. त्यांच्या दोन्ही तिन्ही शिक्षिका सगळ्यांना रांगेने वर्गाकडे नेण्याच्या प्रयत्नात होत्या…. त्यांच्या प्रयत्नाला काही चिमूरडी साथही देत होती…. दोन तीन धिटुकली मात्र एव्हाना झोके, घसरगुंडीवर पोहोचलीही होती…..सगळाच गोंधळ होतोय की काय असे वाटत असताना त्या टिचर्सनी सफाईने मुलं रांगेत उभी केली आणि पिल्लं निघाली वर्गाकडे….. तिथून दप्तरं उचलायची आणि घरी पळायचं इतकचं काम आता बाकि होतं…… रांगेत कुठेही ढकलाढकली नाही , बेशिस्त नाही….. मोहक दृष्य़ असते ते एक…. अगदीच नाही म्हणायला दोन -तीन मुलं दांडगाई करण्यात मग्न असल्यामूळे त्यांना रांग वगैरे बंधनं नको होती बाकि सगळं व्यवस्थित अगदी ….

तितक्यात माझ्या बाजूने एक गोरा गोरा छोटा दोस्त पळाला…. उन्हाकडे निघालेला तो मुलगा आपल्याच नादात हाताची गाडी चालवत धावत होता….. त्याला उन लागतयं म्हणून न रहावून मी ओरडले शेवटी की बाबा रे तुझी टिचर बोलावतेय वर्गात जा बघू आधि….. कसलं काय नी कसलं काय….. त्याची गाडी काही थांबेना…. शेवटी त्याच्या मागे गेले आणि त्याला जरा रागावूनच विचारलं की ऐकू येत नाहिये का तूला मी ओरडतेय केव्हाची , काही गरज नाहिये उन्हात खेळण्याची जा वर्गात….. पिल्लू गोड हसलं, मी वर्गाकडे जा म्हणून हाताने खूण केली तर चटकन वळलं आणि त्या दिशेला धावलं….

त्याच्या शर्टवर मानेजवळ लोंबकळलेलं काहितरी क्षणभर चमकलं  …… त्याच्या कानातलं लहानसं ’हियरिंग एड’ निघालेलं होतं….. ती लोंबकळलेली वस्तू नेमकी काय ते जाणवलं आणि काय बोलावे मला सुचेना, सुन्नं व्हायला झालं होतं….. माझं बोलणं त्या चिमूरड्याला खरच ऐकू येत नव्हतं…..

’हियरिंग एड’ वगैरे वस्तू ही वृद्धापकाळातली खरेदी हे माझ्या मनाने ’गृहित’ धरलेलं होतं….

सुट्टी सुरू आहे सध्या माझ्या मुलांच्या शाळेची…. नाही म्हटलं तरी पसारा आलाच ओघाने… आपणच वेगवेगळ्या प्रसंगांना घेउन दिलेली खेळणी घरभर पसरतात मग… मुलं एखाद दिवस अशी शहाणी होतात की सारं घरं खेळून झाल्यावर लख्ख आवरूनही ठेवतात पण एखाद दिवस असा काही असतो की मुलांना काहीच ऐकायचं नसतं….. असाच एखादा दिवस मग नेमकी आपलीही काही निमित्ताने चिडचिड झालेली असावी….. नवऱ्यालाही नेमके खूप काम असावे ऑफिसात, अगदी घरी येताना भरपुर ट्रॅफिक वगैरे लागलेले असावे…. मणिकांचन योग सारे जुळून यावे नी त्यात मुलांनी एकमेकांशी फुटकळ कागदाच्या चिटोऱ्यावरुन वगैरे वाद घालावे…. ठिणगी पुरते मग ती …. आई किंवा बाबा कोणितरी एकाने रागवायला सुरूवात करायची, एरवी दुसऱ्याचे काम असते असे प्रसंग निभावून न्यायचे पण आज तो ही फॉर्मातच … मग काय वाक्यांची आतषबाजी नुसती, “सगळं मिळतयं ना यांना म्हणून कसली किंमत नाहीये…. इतकी खेळणी आहेत तर कागदांचे चिटोरे पुरताहेत वादावाद्यांना….. नाही आता ना खेळणी बिळणी काही मिळणार नाहीयेत इथून पुढे…. जास्त मिळालं ना की गृहित धरलं जातं सगळं….इ.इ. ” …

मुलांना कितपत समजतेय, खरचं किती बोलायला हवेय अश्या वेळी वगैरे एरवी शांत डोक्याने करायच्या चर्चा झाल्या……  कधी कधी बोललं जातं हे मात्र निश्चित….  नवऱ्याने ’गृहित’ शब्द वापरला खरा पण मला तो तसाच बोचत राहिला…. वातावरण जितक्या पटकन तापलं तितक्याच चटकन शांतही झालं, आणि मग रागावलेल्या बाबाला सोबत घेउन, आपल्यामूळे बाबा ’sad’ झालाय वगैरे चर्चा करत मुलांनी त्यांचा पसारा आवरलाही…. त्यांच्या पुरता तो प्रसंग संपला आणि आम्ही फिरायला म्हणून बाहेर पडलो…..

बागेत मुलं मस्ती करत होती , नेहेमीचेच खेळ सगळे घसरगुंडी, झोके, पकडा पकडी, बॉल फेकणे वगैरे….. साधी घसरगुंडी विचारात घेऊया आता, मागच्या शिडीजवळची मुलांची रांग…. आपल्याला चढायला मिळाल्यावर चटाचट वर चढणारे आणि मग सुर्र्कन हसत खाली घसरत येणारी मुलं….. विशेष काही कौशल्य लागत नाही यात हे आपले गृहितक , पण खाली घसरून येताना मुलांचे चेहेरे पहाणं किती सुंदर असते वगैरे रम्य विचार मनात येण्याची वेळ ती….. आम्ही बोलतोय एकमेकांशी, सगळी मुलं खिदळताहेत तोच एक बाई तिच्या १०-१२ वर्षाच्या मुलाला घेऊन आली….. तिने त्याचा हात घट्ट धरलेला…. कावरं बावरं ते पोरं पहातक्षणी लक्षात आलं की हे मुल गतीमंद आहे….. इतर खेळणाऱ्या मुलांकडे पाहून त्याला खेळावेसे वाटणे स्वाभाविक होते पण बॉल नेमाने फेकणे जमेना…. त्याची आई जिद्दीने खेळत होती त्याच्याशी…. त्याच्या आईचं कौतूक वाटत होतं मला तरिही काहितरी बोचत होतं….

लहान मुलांच खेळणं, आपणं बोललेलं त्यांना ऐकू येणं, ठराविक वयातली ठराविक वाढ किती किती गोष्टी आपणही गृहित धरल्या आहेत हे ’भान’ मला येत होतं….. हे सगळं असच व्यवस्थित मला मिळणार हे मी देखील ’गृहित’ धरलेलचं आहे की…. आपण हाका मारतोय लहान मुलं स्वत:च्याच नादात आहेत, लहान मुलंच का अगदी मोठी माणसंही , आपण किती चटकन म्हणतो ’ऐकायला येत नाही का? ’ …. भलेही त्याचा अर्थ लक्ष कुठेय तुमचे असा असला तरी वाक्यं किती सहजपणे बोलतो नाही आपण…. तीच वाक्यं जर खऱ्या रूपात समोरं आली की आपल्याला निभावता येतील हे प्रसंग असे आपणही गृहित धरलेले असावे….

जगात अनेकांना अनेक आजार होतात, त्याबद्दल आपल्याला कणव वाटावी इतपत सृहद आहोत आपण….. काही अघटित पाहिले की मन हेलावते वगैरे ठीक पण….. बरचं काही घडू नये असे घडतेय, सामाजिक जाणीवा वगैरे जागृत आहेत आपल्या… तरिही….

संकट येणार ते दुसऱ्यावर, आम्ही कसेही वागणार पण शिक्षा मिळणार दुसऱ्याला ही मोठमोठी गृहितकं ते अगदी रोजच्या व्यवहारातही कुठलाही चुकीचा प्रकार घडणार नाहिये हे ही तर गृहितचं की!! की बेसावध आहोत आपण….

खरं तर माझ्या आशावादी असण्याचा मला अभिमान आहे, माझे अजूनही असेच मत आहे की ’सगळे कायम चांगले आणि उत्तमच होणार’ … कुठल्याही गोष्टीआधि कामाआधि मनात निराशावाद घेऊन त्याला सुरूवात करू नये या मताशी मी ठाम आहे, तरिही का कोण जाणे या दोन प्रसंगांनतर मी ’गृहित’ हा शब्द तितकासा सहजपणे नाही वापरू शकत…. मुलांनी माझ्या बडबडीकडे दुर्लक्ष केले तरी ,”ऐकू येत नाही का” किंवा नादात चालताना ते कुठे धडकले तर ,” दिसत नाही का तुम्हाला” वगैरे वाक्यं नाही येत हल्ली माझ्या तोंडात….. मीच का, परवाच्या बागेच्या प्रसंगानंतर माझ्या दोन्ही पिल्लांना घट्ट धरून नवराही देवासमोर हात जोडून उभा होताच की…..

असे काहिसे बेसावध असणे, गृहित धरणे हे सरळ साधे सोपे आयूष्य़ जगण्यासाठी तसे खरे तर अत्यंत गरजेचे…. फक्त आपणही काही  ’गृहित’ धरतोय याचे ’भान’ तेव्हढे आता विसरायचे नाहिये….

आपल्याकडे काय काय नाही हे सांगायला जगात अनेक लोक असतात, नव्हे त्यांना तो चाळा असतोच….. आपल्याकडे काय काय आहे नी थोडेफार काय काय आपणही गृहित धरलेय याचा ताळमेळ मनात मांडला की आयूष्य अजून मस्त वाटेल का ??? अगदी त्या पॉलिसीच्या जाहिरातीमधल्या लोकांइतकं संकटांची यादी नको पण कुछ calculations तो बनते है …… नाही म्हणजे देवदयेने हातीपायी धड असणाऱ्या आपल्याला  जरा डोके आहे असे ’गृहित’ धरावे आणि ’भानात’ यावे असे आणि इतकेच…..