कोंबडी आणि उपवास….

कोंबडीची शंकरावर भलती भक्ती….. तशी ती होतीच देवभोळी…. शंकरभगवान, गणपतीबाप्पा, सगळ्या देवी-देवता सगळेच तिचे लाडके…. तिचे वागणे, बोलणे ही स्वच्छ असायचे तिच्या पांढऱ्या शुभ्र रंगासारखे….

कोंबडा तसा तापटच… तो रागावला की ती म्हणे, “अहो का तांडव करताय ??? ” … पण कोंबडीही कधी वैतागायची मग कोंबडा म्हणायचा, “अगं आज माझ्या पार्वतीने दुर्गेचं कालीमातेचं रुप का हो धारणं केलेय… ” …. कोंबडीचा राग तो कुठला… क्षणा दोन क्षणात राग पळून जाई… मग ती खुदकन हसे नी तुरूतूरू खुशीत इकडुन तिकडे पळे…. पंखांची उघडझाप करत तिने केलेला नाच पाहिला की कोंबड्याला कोण आनंद होई…. सकाळ आहे की दुपार तो विसरून जाई .. तो आपला जोरदार ललकारे “कुकूचsssssss कू !!!!” 🙂

कोंबडी त्या कुटूंबाची लाडकी… चिमणी सात आठं पिल्लं सतत तिच्या अवती भोवती बागडतं… आई म्हणेल ती पुर्वदिशा होती त्यांच्यासाठी…..

अशातच आली महाशिवरात्र…. कोंबडीने नवऱ्याला आणि पिल्लांना स्पष्ट बजावले, ’उद्या शंभो महादेवाचा दिवस…. समोरच्या घरातल्या काकू काय दाणे घालतील ते तेव्हढे खायचे पण किडा मुंग्यांवर ताव मारायचा नाही…. पवित्र दिवस आहे उद्याचा… 🙂 ’ …. चिमूकली पिल्लं हसली…. 🙂 .. कोंबड्याने मान तुकवली!!!!

महाशिवरात्र आली… पिल्लं उठली…. आईचा कुठे पत्ता आहे ते त्यांना कळेना… ती जरावेळ घूटमळली नी खेळायला पळाली….. दुपारची भूक लागली तर काकूंच्या अंगणात जाऊन कलकलाट करू लागली…. काकू आल्या त्या उशीरानेच… आल्या त्या फणकाऱ्यातच… बडबड करत होत्या काहितरी… कोंबडीच्या पिल्लाला काही कळेना…. त्या सगळ्यांनी दाणे खाल्ले…. आपली आई कुठे गेलीये या प्रश्नाने भंडावले आता पिल्लांना….. होता होता संध्याकाळ झाली…. पिल्लू कोंबड्याकडे आलं आणि म्हणालं ,” बाबा आई कुठेय ?? काकू काहितरी बडबडत होत्या आज…. म्हणाल्या या चॅनलवाल्यांना काही विधीनिषेध नाही उरलेला आजकाल…… मेलं शिवरात्रीच्या फराळाचं ताटं घेऊन बसावं तर चॅनलवर चिकनच्या रेसिप्या दाखवताहेत….. तो शेफ मस्त खाऊन स्वस्थ झोपला असेल आता… 😦 😦 …. पण बाबा एक सांगा ’विधीनिषेध’ म्हणजे काय हो ???? ” …. पिल्लू निरागसपणे विचारत राहिलं…

“विधीनिषेध!!!!! ” ………….. “विधीलिखीत!!!!! ” …. कोंबडा अस्पष्ट पुटपूटला आणि मंद पावलं टाकत दुर निघून गेला….त्याच्या चालीतला नेहेमीचा डौल पिल्लू शोधतं राहिलं…..

पिल्लू बिचारं “विधीनिषेध” आणि “विधीलिखीत ” च्या घोळात अडकलं…………………

तिकडे कोंबडीचा उपास, महाशिवरात्र वगैरे गोष्टींशी सोयरं सुतकं नसलेल्या मस्त खाऊन स्वस्थ झालेल्या शेफने कॅमेरा बंद झाल्यावर विचार केला की आजच्या कोंबडीला काही चव आली नाही गड्या……..

कोंबडा हळूहळू चालतं शंकराच्या देवळाशी पोहोचला तेव्हा पहाट होत होती….. पुर्वेचा दूत रोजच्यासारखा देवाचे निरोप घेऊन येता झाला…. कोंबड्याच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला सगळे धुसरं दिसत होते…. कोंबड्यासमोर यायचे आज सुर्या्चेही धाडसं होइना….बराचवेळ तो ढगांआड लपला…. शेवटी सुर्याने हिंमतीने पाठवलेला एक किरण कोंबड्याकडे पोहोचला आणि म्हणाला ,” कोंबड्या तुझं ’पांढरं ’ फूल महादेवाला मिळालं रे!!!!!!!!!!!!!!!!!! ”

ता.क.

मी स्वत: शुद्ध शाकाहारी असले तरीही ही पोस्ट मांसाहाराच्या विरोधात टाकलेली नाही. अर्थात पोस्टमधे दिलेली लिंक पाहिली की माझा मुद्दा स्पष्ट होइलच 🙂 …. कुठल्याही कार्यक्रमाचे चित्रीकरण आधिच झालेले असते आणि त्यात शेफचा काहीही दोष नाही असे गृहित धरले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी ’चिकन’  शिकवणे खटकले … आणि त्या अनूषंगाने आलेले विचार इथे मांडलेले आहेत!!!

Advertisements

34 thoughts on “कोंबडी आणि उपवास….

 1. तन्वीताई मस्त लिहिलं आहेस.. एक लेख म्हणून ता.क. आधी उत्तम…
  महाशिवरात्रीच्या दिवशी चिकन रेसिपीज दाखवू नये हे काही पटलं नाही…
  त्याचा काहीच संबंध नाही असं माझं स्वतःच मत आहे…. पण आधीचा लेख उत्तम.. वेगळं छान लिहिलंस…

  • आनंदा आभार रे!!

   >>>महाशिवरात्रीच्या दिवशी चिकन रेसिपीज दाखवू नये हे काही पटलं नाही…

   अरे मुळात सगळे सणं/ऋतू त्या त्या सणाच्या/ महिन्यांसाठीच्या ठराविक पाककृती दाखवत कॅश करण्याच्या च्यानलवाल्यांच्या मानसिकतेमुळे मुळात ’महाशिवरात्री’ला हे कार्यक्रम पहायला मी बसले तेच मुळात ’उपवासाच्या नाविन्यपुर्ण रेसिपी’ शिकायला… पण समोर जेव्हा उपवासाचे चिकन 😉 आले तेव्हा गडबडले रे चक्क!!!

   आणि मी म्हटलंच आहे रे की मांसाहार करा वा करू नका अश्यासाठी नाहिचे ही पोस्ट… तरिही माझ्या माहितीतले तरी मांसाहार करणारे लोक हे काही दिवस ’पाळताना’ पाहिलेत रे मी…

   अर्थात मी स्वत: देखील उपवास हा दिवसासाठी नव्हे तर त्यामागच्या शास्त्रांसाठी पाळते त्यामूळे तुझ्याही मताचे स्वागत 🙂

 2. कार्यक्रमाचे चित्रीकरण आधिच झालेले असते आणि त्यात शेफचा काहीही दोष नाही असे गृहित धरले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी ’चिकन’ शिकवणे खटकले

  मी जरी हे सर्व पाळत नसलो तरी ह्या विचारांशी सहमत.

   • 🙂
    मी ही गेल्या वर्षी चिकन तंदुरी बद्दल बझ वर लिहिले होते. लोकांनी भरपूर शिव्या घातल्या कारण तेव्हा आषाढी एकादशी होती.
    झाले असे की एक तर मी ते पाळत नाही. एकादशीबद्दल माहितही नव्हते. मी अमेरिकेत होतो आणि लिहिले तेव्हा तिकडे आदला दिवस होता.
    पण तरी मी श्रावण महिना संपेपर्यंत (खात असलो तरी) मांसाहारावरील लेखन लिहिण्याचे टाळत राहिलो.
    गणपतीच्या आदल्या दिवशी (ईदही असल्याने) अनुदिनीवर वेगळे लिहिले तर पुन्हा हरितालिका असल्याच्या कारणाने टिप्पणी मिळाली 🙂

 3. अगदी खरे आहे. मी स्वत: एका न्यूज चॅनेलमध्ये काम करतो. बलात्कार, खून दरोडे ह्या सारख्या बातम्या बटबटीतपणे वारंवार दाखवायला मलाही आवडत नाही. पण काय करणार ? TRP आणि बॉसचे प्रेशर यामुळे ते करावे लागते. आजकाल ज्या बातमीचा किंवा कार्यक्रमाचा जास्त धंदा होतो तेच दाखवण्याची पद्धत रुढ झालीय. शिवरात्रीला चिकन विषयक कार्यक्रम हा यातलाच प्रकार असावा.

  • ओंकार अरे हल्ली बातम्याही अगदी पहावत नाहीत… आत्ता मगाच ’जयंत नारळीकरांना’ पुरस्कार मिळाल्याचे निवेदिकेने दोन मिनीटात सहा वेळा सांगितले… काही अर्थ नसतो…

   >>>TRP आणि बॉसचे प्रेशर यामुळे ते करावे लागते. आजकाल ज्या बातमीचा किंवा कार्यक्रमाचा जास्त धंदा होतो तेच दाखवण्याची पद्धत रुढ झालीय. शिवरात्रीला चिकन विषयक कार्यक्रम हा यातलाच प्रकार असावा.

   सगळीकडे असेच व्यवसायीकरणं झालेय… मुळ आत्मा तेव्हढा हरवतोय यात…. 😦

   आभार रे!!

  • आभार रे हेरंबा 🙂

   कोंबडा/ कोंबडी म्हटलं की माझा /ईशानचा जीव अडकलाच समज त्यांच्यात …खायला नव्हे पहायला 🙂

 4. विचारधारा चांगली मांडली आहेसच. आवडली.

  बाकी, इथे इतके ’ मासखंड ’ ग्रोसरी स्टोअर्स मधे पाहून पाहून एक वि्चित्र निर्विकारता आली आहे. 😦 😦 😦

  • आभार गं बयो!!

   >>>बाकी, इथे इतके ’ मासखंड ’ ग्रोसरी स्टोअर्स मधे पाहून पाहून एक वि्चित्र निर्विकारता आली आहे. 😦 😦 😦

   अगदी खरं गं… आधि नजर गेली तरी कसेसेच व्हायचे (मुळात सवय नसल्यामूळे) आता तितकासा त्रास होइनासा झालाय…. तरिही डांगर वगैरे घेताना उगाच माझ्या मनात नसत्या शंका की सुऱ्या वेगळ्या वापरल्या असतील ना चिरायला 😉 … नाईलाज आहे गं, सवय नाहिये काही गोष्टींची!!

  • स्मिता आभार गं!! 🙂

   खटकलं ना तूलाही… अगं आपण नुसतं संस्कृती वगैरे नुसत्या गप्पाच मारायच्या की काहितरी लहानसे तरी पाऊल उचलायचे असा संभ्रम वाटतो गं अनेकदा… त्यातूनच अश्या पोस्टा येतात बघ जन्माला 🙂

 5. आनंद + १. मस्तच लिहिलं आहेस. पण कोंबडी खायची / शिकवायची असेल, तर महाशिवरात्र काय आणि दुसरा कुठला दिवस काय, काय फरक पडतो? असं मला वाटतं.

  • गौरे आभार गं …. अगं आनंदला दिलेय बघ उत्तर….

   >>>मुळात सगळे सणं/ऋतू त्या त्या सणाच्या/ महिन्यांसाठीच्या ठराविक पाककृती दाखवत कॅश करण्याच्या च्यानलवाल्यांच्या मानसिकतेमुळे मुळात ’महाशिवरात्री’ला हे कार्यक्रम पहायला मी बसले तेच मुळात ’उपवासाच्या नाविन्यपुर्ण रेसिपी’ शिकायला… पण समोर जेव्हा उपवासाचे चिकन 😉 आले तेव्हा गडबडले रे चक्क!!!

   आणि मी म्हटलंच आहे रे की मांसाहार करा वा करू नका अश्यासाठी नाहिचे ही पोस्ट… तरिही माझ्या माहितीतले तरी मांसाहार करणारे लोक हे काही दिवस ’पाळताना’ पाहिलेत रे मी…

   अर्थात मी स्वत: देखील उपवास हा दिवसासाठी नव्हे तर त्यामागच्या शास्त्रांसाठी पाळते त्यामूळे तुझ्याही मताचे स्वागत 🙂

   खटकलेले काही नुसतेच मांडायचे होते पण कोंबडा/ कोंबडी आले की माझ्या ब्लॉगच्या जिव्हाळ्याचे विषय त्यामुळे मग पोस्टच लिहीली सरळ 🙂

 6. काल अजून एक राहिलं लिहायचं. म्हणून पुन्हा कमेंटतोय.

  अग अशा कित्येक जणींचा कदाचित हिरमोड झाला असेल आणि त्या टीव्हीसमोरून उठून गेल्या असतील किंवा टीव्ही बंदही करून टाकला असेल. थोडक्यात कुठल्या दिवशी कुठल्या प्रकारची रेसिपी दाखवायची याचे अगदी कडक नियम नसले (आणि नसावेही) तरी ते विधीनिषेध पाळण्याचा कॉमन सेन्स नसलेल्या प्रोड्युसरपायी कित्येक स्पॉन्सरर्सचं लाखोंचं नुकसान झालं असणार. कारण ज्यांच्यासाठी जाहिराती दाखवायच्या ते गिर्‍हाईकच समोर नाही !! थोडक्यात प्रेक्षकांची भावना म्हणून कदाचित नाही पण स्पॉन्सरर्सच्या रेट्याने दबून जाऊन तरी असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत किंवा कमी प्रमाणात घडतील कदाचित…. ! (फार प्रॅक्टिकल झालीये प्रतिक्रिया.. पण तरीही !)

  • >>> थोडक्यात प्रेक्षकांची भावना म्हणून कदाचित नाही पण स्पॉन्सरर्सच्या रेट्याने दबून जाऊन तरी असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत किंवा कमी प्रमाणात घडतील कदाचित…. ! (फार प्रॅक्टिकल झालीये प्रतिक्रिया.. पण तरीही !)

   असू दे रे प्रॅक्टिकल…. बरोबर आहे तुझे म्हणणे… आणि ’कॉमन सेन्स’ हाच योग्य शब्द बघ…. तो नसला की टिव्हीच काय सर्वत्र असे प्रकार घडतात 🙂

 7. कुठल्याही कार्यक्रमाचे चित्रीकरण आधिच झालेले असते आणि त्यात शेफचा काहीही दोष नाही असे गृहित धरले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी ’चिकन’ शिकवणे खटकले …

  agreed… 🙂

 8. महाशिवरात्रीच्या दिवशी ते दाखवण मलाही पटलेल नाही….बाकी लेख असा लिहिलास कि काही क्षणासाठी मी खूप हळहळलो, एकदम शाकाहारी गैंग मध्येच जोइन झालो होतो …बर झाल आज गुरुवार आहे ….

  • >>> बाकी लेख असा लिहिलास कि काही क्षणासाठी मी खूप हळहळलो, एकदम शाकाहारी गैंग मध्येच जोइन झालो होतो …

   🙂

   बघं माझा (नसलेला )हेतू साध्य झाला 🙂 ….माझं शल्य नक्की पोहोचवता आलयं मला याचा आनंद वाटतोय तुझी कमेंट वाचून…..

   आभार रे देवा…

 9. कोंबड्यासमोर यायचे आज सुर्या्चेही धाडसं होइना….बराचवेळ तो ढगांआड लपला…. शेवटी सुर्याने हिंमतीने पाठवलेला एक किरण कोंबड्याकडे पोहोचला आणि म्हणाला ,” कोंबड्या तुझं ’पांढरं ’ फूल महादेवाला मिळालं रे!!!!!!!!!!!!!!!!!!
  अप्रतिम ….!!! छान लिहलय …वाचून एकदम डोळ्यात पाणी आले ग!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s