उचलली जीभ….

“आपल्या जिभेचं साधारण वजन किती असेल बुवा??? ”

काल अचानक हा प्रश्न पडला…. म्हणजे ते मुन्नाभाई टाईप ’जिंदगी में कई चीजें पहिली बार होती है मामू सारखं माझ्या जिंदगीत मला पहिल्यांदाच हा सिरियस प्रश्न पडला (प्रश्न पहिल्यांदा हं… मी भलती सिरियस आहे बुवा )….. याला कारणीभूत झाले ती निर्बुद्ध तासातली हाताची बोटं, डोळे, रिमोटची बटनं यांच्यातली जुगलबंदी….. समोर कैच्याकै सदरात मोडणारं काहितरी आपलं चाललेले, आणि सामोरे आले अमिताभ बच्चन आणि जया भादूरी (मी हिला बच्चन म्हणत नाही… नोंद घ्यावी!! ) …. आले तर आले, त्याचा विचारलेल्या प्रश्नाशी संबंध काय??? आला होता किनै प्रश्न मनात… सांगते…

होतं काय माहितीये का…… जेव्हा आपण एखाद्या माहितीतल्या व्यक्तीचा, कोणी बोललेल्या वाक्यांचा विचार करतो , आणि आपण अगदी कानसेन नसलो तरी बरं ऐकणारे असलो ना आपल्याला ते आठवलेले वाक्यं त्या व्यक्तीच्या आवाजात आठवता येते…. म्हणजे आपल्या कुटूंबातल्या व्यक्तींची वाक्यं कशी आपल्याला ते समोर नसले तरी ऐकता पहाता येतात… किंवा अगदी लतादिदी असं असं म्हटल्या असं पेपरात वाचलं तरी त्या आपल्याला ऐकू येतात (इथे आपल्याला म्हणजे निदान मलातरी 🙂 ) वगैरे!!! तर ही जया भादुरी नामक व्यक्ती विचारात जरी आली ना तरी मला तिचा तो हसू की नको हसू या द्वंद्वात अडकलेला चेहेरा, आणि तितकेच अवघडून जडशीळ जिभेने म्हटलेले डायलॉग्स कानावर यायला लागतात… म्हणजे ना पिडा एकदम…. त्या DDLJ मधे कशी ती सिमरन अगदी कानावर घट्ट हात ठेवते तरी तिला शाहरूखचे तुणतूणे ऐकायला येते तसा उपद्रव….  आता राखी गुलजार (नावात तेव्हढा गुलजार शब्द बाकि आनंद ) नामक व्यक्तीचा याच गटात समावेश होतो…. तिचं ते ’मेरेsss करण अर्जून आsssssssयेंगे!!!! ” ऐकलं ना की वाटतं फार नाही पण निदान एक अर्धा पाऊण किलो नक्कीच वजन या जिभेचे……

आता जयाबाईंना , अमिताभने केलेली चूक म्हणून सोडून दिले आणि राखीबाईंना (गुलजारांच्या असो की सावंतांच्या ) नुसतेच कुठल्याही कारणाविना सोडले तरी मुद्दा तोच, “माणसाच्या जिभेचे वजन कित्ती गडॆ?? ”

मेडिकलचे आणि माझे कायमचे वाकडे …. त्यामूळे मी ईंजिनीयर झाले (मेडिकलला मिळत होती का ऍडमिशन, वगैरे खोचक मुद्दे काढायचं काम नाय हं… माझं मुळात PCM ग्रुपमधे झालेय बारावी ;)) …. साध्या टंग च्या स्पेलिंगने मला बरेच टांगलेले होते….तर टंग, प्सायकॉलॉजी, पॅक्रियाज, न्युरो बिरो वगैरे तमाम अवयवांचे स्पेलिंग मला अजूनही नाय बॉ येत… सरळ म्हटलं होतं मी नगं मला म्येडिकल…. ईंजिनीयरिंग ला गेले खरे पण तिथे मेला विषय आला ’मेडिकल ईंजिनीयरिंग’ … खरं सांगते माझ्या जिभेपासून ते पार घश्यापोत्तर कोरड पडलेली….. तिथे आम्हाला BP मोजायला लावायचे…. मला जन्मात ते दोन वेळा ’ठक’ ऐकू आले नाही…. म्हणजे मी ’गोंगाटात नसेल हो  ठक ठक ऐकू येत ’ म्हणून समाधान करून घ्यायचे स्वत:चे, हो नाहितर नसता न्युनगंड यायचा, बाकि अख्ख्या वर्गाला ’ठक’ ऐकायला येते मलाच नाही….. मला ना माझं स्वत:चं इतरांनी मोजलेलं BP पण चुकलयं असच वाटतं नेहेमी… होतं कसं आता आपलं BP मोजलं जाणार या विचाराने माझा हार्टरेट वाढलाय किंवा श्वसन नॉर्मल ठेवण्याच्या नादात आपण श्वास न घेतल्यामूळे शरिरात नेमका घोळ झालाय त्या क्षणी वगैरे विचार येतात…. वैताग नुसता!!!

गोळ्या औषधं पण डॉक्टरांच्या सल्ल्याने नाही आवडत घ्यायला मला … हा एक मानसिक आजार असावा का अशी शंका येते उगाच मनात, मात्र मी माझ्या औषधांचे डोस सोयीने विसरते 😉 …. मुलं झाल्यापासून तर डॉक्टरांकडे जायचे आणि ’गेल्या वेळेस हे हे औषधं दिले होते’ वगैरे विलक्षण बडबड करण्याची माझ्या जिभेला खोडच आहे…. माझा वैद्यकिय ज्ञानाविष्कार तसा मर्यादितच पण…. जगातले ९९% आजार हे एकट्या क्रोसिन आणि कॉम्बिफ्लामच्या कॉम्बिनेशनने बरे होऊ शकतात हे माझे मत ठाम एकदम….. माझी मतं तशी ठामच…..

तेव्हा मी विकीमातेला शरण जाउन ’जिभेवर ’ रिसर्च करण्याचा मुद्दा अलाहिदा….निदान विचारांची वाट आज जिभेच्या वाटेला….

मरो त्या मेडिकल टर्मा त्याऐवजी अवयवांचे साहित्यिक मुल्य हा मुद्दा आवडीचा…. तर बॅक टू ’जीभ’ …. जिभेला पाणी सुटणे, जिभेला हाड नसणे, जीभ हातभर लांब असणे, जीभ काळी असणे, जिभेवर सरस्वतीचा वास असणे, जिभेवर साखर असणे, जीभ कडू असणे, जीभ टाळ्याला चिकटणे वगैरे मुद्दे कसे अर्थपुर्ण अगदी… जीभ म्हटली की दुसरा आवडता मुद्दा येतो तो म्हणजे ’चोचले’ …. खादाड्यांच्या राज्यात कसलं महत्व या चोचल्यांना…… जिभेचे काहिही वजन असो ना मरो , खा आधि चटकन वगैरे विचार येतात समोर खाद्यपदार्थ आले की….. किती म्हणी , वाक्प्रचार या जीभेच्या वाट्याचे…. ’रसना’ नाव कसे मस्त वाटते या जीभेचे….

खरं सांगते जयाताईंच्या दर्शनाने आणि त्यांची वाक्यं ऐकू येण्याच्या जाचामूळे जीभेचा विचार होतोय आज….. कबीराच्या दोह्यात एक उल्लेख आहे  ” बकवास करें जीभ….. जूते खाये सिर” ….. 🙂 …. जिभेवर ताबा सर्वार्थाने असणे कसे गरजेचे असते नाही, नाहितर उचलायची जीभ नी लावायची टाळ्याला….. जीभ जीभ पडजीभ वगैरे यमकं करणारे गाणे मनात तयार होतेय… एकूणात आज ही माझ्या ’जिव्हा’री लागलीये असे दिसतेय…..

विचार करतेय मी नी काहितरी अचानक मनात येतय….. हे असेच होते ही आठवण आली की….. डोळे नकळत मिटले जाताहेत….. अनेकदा वाचलेल्या पुस्तकातली काही पानं त्यातली अक्षरं नजरेसमोरून सरकायला लागताहेत…. शब्द न शब्द साठलाय मनात…

आठवणं जसजशी वाढतेय, हात पाय गारठल्यासारखे होतात…. सगळं काही थिजल्यासारखं….. एक एक वाक्यं जिवंत होऊन समोर येतय…. मिटलेले डोळे पाणावताहेत… कुठल्याही क्षणी अश्रू ओघळणार आता….. एक एक प्रसंग मनात उमटतोय, जसा समोर घडतोय माझ्या….. ते धारदार अंगार ओकणारे डोळे रोखलेत शत्रूवर…. नाही सहन होत कोणाला त्या डोळ्यांचा दाह…. तापलेल्या सळया गेल्यात आरपार…. हुंकारही नाहीये वेदनेचा साधा मुखातून…… डोळे काढलेत म्हणुन काय, हात बांधलेत म्हणून काय… ती जिव्हा आहे ना धारदार तलवारीच्या पात्यासारखी…. त्या मुखातून येणाऱ्या वाक्यांनीही त्रेधा उडतेय लोकांची …… आणि …. आणि….

नुकतीच छाटलेली एक विलक्षण धारदार ’जिव्हा’ जमिनीवर पडतेय….. क्रुरकर्मा विकट हसतोय…..

मैत्रीच्या नात्याने बांधलेले दोन जीव तसाच अबोल मुक संवाद साधताहेत……………………………………………………..

आठवणीनेही सुन्नं व्हायला झालय, नेहेमीच होतं….. दाटलेला कंठ… स्तब्ध सारे काही…. माझी ’जीभ’ कोरडी…. एकीकडे त्या शंभूबाळाचा अभिमान, गर्व वगैरे नी दुसरीकडे त्याच राज्यातला षंढपणा, नाकर्तेपणा,जळजळीत वास्तव, भ्रष्टाचार वगैरे जाणिवा …. फोल वाटतं सगळचं…..

लिहीलेली पोस्ट आज टराटर फाडून टाकाविशी वाटतेय……..

24 thoughts on “उचलली जीभ….

 1. आमच्या टाईमझोनात लिहिल्याने आज माझी प्रतिक्रिया सगळ्यात पहिली (बहुतेक…. !)

  >> जगातले ९९% आजार हे एकट्या क्रोसिन आणि कॉम्बिफ्लामच्या कॉम्बिनेशनने बरे होऊ शकतात

  अगदी अगदी 🙂

  जिभेच्या फटकार्‍यांचं वर्णन हाताच्या सहज फटकार्‍यासरशी उत्तम जमलं आहे. आवडली पोस्ट आणि कळली/पोचलीही !!!

  • हेरंबा आभार रे….

   >>>आवडली पोस्ट आणि कळली/पोचलीही !!!

   खरं सांगते ही पोस्ट म्हणजे हा विचार प्रवाह पोहोचेल की नाही हेच मला समजत नव्ह्ते…. आधि अगदी हलकाफूलका मूड, शंभूराजांच्या आठवणीने पार ढवळला…. मग जाणवलं कोणाचे वंशज आहोत
   आपण, आणि काय करतोय…. कसलं उत्तूंग व्यक्तिमत्त्व , करारी कणखर व्यक्तिमत्त्व होतं या लोकांचं, आणि त्याच राज्यात आज काय चाललय…. आपण तरी कोणते वेगळे आहोत, आपणही तर डोळे झापडं लावून मिटून बसलोच आहोत की….

   आधिचे माझेच विचार असलेले पॅरा पुन्हा पाहिले नी वाटलं किती वरवरचं आहे हे सगळं… अथांग डोह आहे कामासाठी खरा पण आपल्याला हात पाय ओले करायचेच नाहियेत….

   असो!!

   क्रोसिन , कॉम्बिफ्लाम पटलं ना…. मग 🙂 …. मी तर फक्त स्वत:च या गोळ्या लिमलेटसारख्या घेत नाही तर त्यांच्या उपयुक्ततेचा जमेल तसा प्रचार करते, मला या गोळ्यांच्या कंपन्यांनी महिन्याला दहा गोळ्या फुकट द्यायला हव्यात खरं तर… I deserve it 🙂

 2. तन्वी, मस्त! शेवटी एकदम

  ‘झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
  कलंक असला धुवुन टाकणे शिवरायांच्या राष्ट्राने!’

  ची आठवण झाली.

  • >>>‘झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
   कलंक असला धुवुन टाकणे शिवरायांच्या राष्ट्राने!’

   ची आठवण झाली.

   🙂
   गौरे तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स वाचायला मिळाव्यात म्हणून तरी काही बाही खरडत रहाणार बघ मी नक्की 🙂

   आभार गं….

  • बाबा 🙂

   >>> मला खूपच आवडला जिव्हेचा प्रवास… 🙂

   म्हणून तर टाकली पोस्ट …. नाहितर माझा आपला घोळ/गोंधळ नेहेमीचाच 🙂

 3. काय तन्वी,आज वेगळाच सूर लागलाय.लाईट मूड मधे सुरु झालेली पोस्ट एकदम गंभीर होऊन गेली अणि अंतर्मुख पण करून गेली.
  बकी जया आणि राखी बद्दलचे निरीक्षण एकदम सही!

  • अरूणाताई आभार!!

   अहो जया भादूरी दिसली आणि विचार आले हे मनात, पण विचारांचा तो प्रवास शंभूराजांवर गेला आणि जाणवलं आपण रोजच्या आयूष्यात विसरलोय की काय त्यांना….

 4. खरे तर शंभूराजांच्या नावावर राजकारण खेळणारे आणि वि्द्धंसक गुंडागर्दी करणाऱ्यांनी विचार करणे जरुरी आहे. ज्या गोष्टीसाठी त्यांनी प्राण पणाला लावले, त्याच गोष्टीचा ते नाश करायला बसले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी.

  • अरुणाताई अगदी खरयं तुमचं म्हणणं…. पण हे समजण्याईतपत विचार करण्याची पात्रता किती लोकांत आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे…..

 5. खूप लहानपणी आई ‘इथे ओशाळला मृत्यू’ बघायला घेऊन गेली होती. काशिनाथ घाणेकर.
  त्याची आठवण झाली. त्या वयात देखील त्यातील भयानकता अंगावर येऊन आदळली होती.

  बाकी मला माणसांबाबत, ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ ह्याचाच अनुभव फार येतो. तेव्हा ती हलकीच असण्याचा संभव अधिक.

  छान झाली आहे पोस्ट. 🙂

  • अनघा आभार गं 🙂

   तू प्रत्यक्ष काशिनाथ घाणेकरांचे ‘इथे ओशाळला मृत्यू’ पाहिलेय… आहाहा…. अगं कसला विलक्षण अनुभव असणार गं तो….

   >>> बाकी मला माणसांबाबत, ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ ह्याचाच अनुभव फार येतो. तेव्हा ती हलकीच असण्याचा संभव अधिक. …. अगदी गं!!!

   पण ’जिव्हा’ या मुद्द्यावर जर प्रत्येकालाच शंभूराजांच स्मरण झालं तर लोकांना वाट्टेल तसे बोलताना किंबहूना बरळताना विचार करावासा वाटेल नाही का गं!!

  • आभार गं स्मिता 🙂

   अगं खरय ’जिव्हा’ या मुद्द्यावर जर प्रत्येकालाच शंभूराजांच स्मरण झालं तर किती छान होइल ना!!

   या पोस्टबाबत खरच साशंक होते गं मी….. मनात जे जसे उमटले तेच या पोस्टमधे… तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रीया वाचून खरच आनंद होतोय….

 6. आपल्याला ते आठवलेले वाक्यं त्या व्यक्तीच्या आवाजात आठवता येते…
  I totally agree with this

  तिचं ते ’मेरेsss करण अर्जून आsssssssयेंगे!!!! 🙂 he vakya athavta te rakhi cha avaazatach…. this dialogue is quite funny for me since we had used it for a skit in university during our uni cultural program…

  • सीया अगं सॉरी गं… तुझ्या कमेंटला उत्तर दिलेय असेच वाटलेले मला….

   agreed किनई 🙂 …. राखी कहर अशक्य आहे गं आणि ती जया भादूरीही 🙂

   आभार गं!!!

  • >>>>पण शेवटी हादरलोच एकदम …

   देवा अरे हे विचार जेव्हा उतरवले ना तेव्हा मी ही मनात गोंधळले होते रे…. प्रॉफेटांचा सल्ला होता की कर ही पोस्ट पब्लिश नाहितर मी ड्राफ्ट तसाच ठेवणार होते….

   पण ’जिव्हा’ हा विचार शंभूराजाशिवाय पुर्ण होणार नव्हताच बहूधा… आणि होऊ ही नाही तसे!!

   आभार रे देवा!!

 7. घरच्या बाल्कनी मधून रात्री समुद्र किनारा न्याहाळतांना एक वेगळीच शांतता जाणवते. तो मंद-गार वारा, लाटांचा तो आवाज, मनाला वेगळाच आल्हाद देतो. पण घरातून बाहेर निघाल्यावर तीच रात्र भयाण वाटायला लागते. समुद्राच्या त्याच लाटा भयावह दिसायला लागतात.

  वरवर स्वच्छ, निखळ दिसणारी नदी सुद्धा स्वतःमधे कितीतरी हझारो गुपित साठवून असते.

  विचार स्वैरा-वैरा धावताहेत बघा…. सुन्न केले तुमच्या लेखाने आणि जागविले सुद्धा.!

  • वैभव प्रतिक्रीयेसाठी मन:पुर्वक आभार….

   हा लेख मी पोहोचवू शकेन का अशी शंका होती पण तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रीया नक्कीच हुरूप वाढवणाऱ्या आहेत …..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s