‘तो’ का म्हणे उगीच करावे….

साडेआठ वर्षाचा इशान आणि आठ वर्षाचा त्याचा मित्र यांच्यातले माझ्या कानावर पडलेले संभाषण…

–” हे इशान ईज ’अ’ युअर फ्रेंड ?? “….

— ……

–” हे इशान ईज ’ब’ युअर फ्रेंड ?? “….

— ……

–” हे इशान ईज ’क’ युअर फ्रेंड ?? “….

— ……

–” हे इशान ऍम ’आय’ युअर फ्रेंड ?? “….

— ……

–” हे इशान डू यू गो टू टेंपूल  ?? “…. (मित्र तामिळमधे ईंग्लिश बोलतोय )

— येस

— “डू यू गो देअर एव्हरी वीकएंड ???”

— नो

— ” व्हाय?? यू आर नॉट अ हिंदू ???”

— ……

(प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मंदिरात गेले नाही की आपण हिंदू नाही असे ठरते का ??? असावे…. आई वडिल अनेक कल्पना भरवत असतात मुलांच्या मनात….

पुढे… )

— “हे इशान व्हाय यू पर्चेस्ड ’ह्युंदाई’ कार??? ”

— …..

— “इशान माय कार ईज बिगर दॅन युअर्स …”

— ……

येव्हढा वेळ नुसतीच गंमत म्हणून मी हे संभाषण ऐकत होते… माझ्या किचनमधल्या कामाला या गप्पांची जोड येव्हढाच काय तो त्यात मला रस होता, पण आता मी जरा लक्ष देत होते .. कारण सायकल खेळायला म्हणून बाहेर गेलेली ही मुलं, नक्की काय करताहेत असा मला प्रश्न पडला होता…. त्यात माझे चिरंजीव चि.इशान कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नसतानाही हा ’मित्र’ नामक मुलगा पुढची प्रश्नपत्रिका सेट करणं काही थांबवत नव्हता…. आपलं सोडून लोकांच्या भानगडींमधे लक्ष घालणं हे या  ’मित्र बाळाचे’ पाय मला आत्ता सायकलवर दिसत होते…. 🙂

— ” हे इशान व्हाय यू डॊंन्ट गो टू टेंपूल एव्हरी वीकएंड??? ”

— ….

— “इशान विल यू गो टू हेवन ?? ”

— …

(मला आता त्या लहानग्याने विचारात टाकले होते… किती विचार आहेत याच्या डोक्यात… विचारांचा गोंधळ आहे नुसता…. स्वर्ग, मंदिर, हिंदू वगैरे सगळ्या कल्पना लहान मुलांच्या डोक्यात टाकणं खरच कितपत गरजेचं आहे??? …. माझीही मुलं रोज देवासमोर उभी रहातात, नमस्कार करतात आणि प्रसंगी देवाशी गप्पाही मारतात…. पण आपण मंदिरात गेलं नाही तर देव रुसेल रागावेल वगैरे कल्पना त्यांना शिवतही नाही…. एकीकडे मला इशानचं कौतूक आणि दया वाटत होती… कारण ‘प्रश्नपत्रिका ‘ काही त्याला खेळू देत नव्हती निवांतपणे, पण इशान मात्र आपल्याच नादात सायकल चालवत होता शांतपणे….)

— “हे इशान व्हाय युअर मम्मी वॉंन्ट्स AC ऑल द टाईम ??? ”

— …..

(मी तर ना खरच विचारले असते की ’बिल काय तूला पाठवते का रे ?? ” … माझं पिल्लू शांत ….)

— “हे इशान व्हाय यू हॅव अ सिस्टर??? आय डोन्ट लाईक युअर सिस्टर … ”

— 🙂

(अरे इशान हसतोयेस काय नुसता दे की उत्तर त्याला…. माझा पारा आपलं मुळ स्थान सोडतोय असं वाटायला लागलय मला आता…. जरा जरा पारा चढलाय … किती ’नकारार्थ’ भरलाय या मित्रात… सतत करकर करणारे, नेहेमी नकारार्थी बोलणारे लोक मला थोड्यावेळाने त्रास द्यायला लागतात…)

— “इशान डू यू हॅव अ पुजा रूम ??? ”

— नो

— “इशान यू डोंन्ट हॅव अ पुजा रूम ??? वुई हॅव ईट…. ”

— ……

(आता वरचाच प्रश्न तीन वेळा…. पुन्हा… पुन्हा…. देवा अरे आवर रे याला…. मी हॉलमधे जाउन खिडकी उघडली आणि मुलांना बोलावलं, येता येताही प्रश्नचिन्ह शांत नाहीये… )

— “”इशान, आंटी … व्हाय यू डोंन्ट हॅव अ पुजा रूम ??? वुई हॅव ईट…. यू आर नॉट अ हिंदू ???”

गेला जवळपास अर्धा तास बिल्डींगचे ’हे टोक’ ते ’ते टोक’ अनेक अनेक प्रश्नांनी माझ्या पिल्लाला छळल्यानंतर या मुलाने मोर्चा माझ्याकडे वळवला… बरं या अश्या लोकांना एका प्रश्नाला उत्तर द्यावं तर ते दुसरा निर्माण करतात…. माझं डोकं तापलं होतं जरासं हे मात्र सत्य…. त्यात मित्राने नुकताच एक गुगली टाकलेला माझ्या लक्षात आला होता की आमच्या घरात पुजा रूम आहे…. आता आमच्याच बिल्डिंगमधे असलेल्या कुठल्याही घरात ’पुजेसाठी’ वेगळी खोली असण्याचा प्रश्नच येत नव्हता… मुळात या अरब देशात आपल्याला देवपुजेला बंधन नाही हेच वेगळेपण , पण म्हणून अरब आता पुजेला खोल्या बांधायला घेतील , कल्पनाच नको!! हं आता एखाद्याने आहे त्याच घरात एखादी रूम देवासाठी ठेवली तर वेगळा मुद्दा पण याच्या घरात असे काही नाही हे मला नक्की माहित… कारण ज्य़ु. प्रश्नचिन्हाची सि. प्रश्नचिन्ह आई माझी मैत्रीण (!!??) 🙂 ….

प्रश्नांची ईतकी मोठी सरबत्ती सहन केल्यावर मात्र मी मुलांना रागावले … लहान मुलं म्हणून मी एरवी सगळे सहन केलेही असते आणि दुर्लक्षही केले असतेच… मात्र इथे नसत्या प्रश्नांच्या नादात माझ्या मुलाच्या डोक्यात नको त्या कल्पना शिरायला नको वगैरे काहितरी भिती मनात आली आणि मी मुलांना सांगितले की खेळायला गेला आहात बाहेर तर गुपचूप खेळा आणि उगाच वटवट करत बसण्यापेक्षा जरा नजर फिरवा चौफेर , बरेच काही छान छान पहायला आणि शिकायला मिळेल…आणि पुजारूम, हिंदुत्त्वाचा दर्जा वगैरे मुद्दे सोडा मोठ्यांना चर्चेसाठी, देवाला तुम्ही लहान मुलं खूप आवडता त्यामूळे तुम्ही नाही गेलात मंदिरात तरी तो तूम्हाला आशिर्वाद देतोच …..  (आता माझी बडबड प्रश्नचिन्हाच्या डोक्यात शिरली की नाही हे तो ’टेंपूलमधला गॉडच ’ जाणे … सध्या तरी माझा चढलेला आवाज कारणीभूत ठरला असावा पण प्रश्नचिन्हाचं रुपांतर पुर्णविरामात झालं होतं आणि तो जरा शांत होता!!! )

थोड्या वेळाने इशान पाणी पिण्यासाठी म्हणून घरात आला….. पाणी चटकन पिउन खेळायला निघाला , जाताना मला म्हणाला, “मम्मा का रागावलीस?? ” … त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं, “सॉरी रे बाळा…. तुमच्या दोघांच्या गप्पांमधे मला नव्हतच बोलायचं पण नाही रहावलं रे शेवटी … ”

पिल्लू शांतपणे म्हणालं ,”पाणी हवय का तूला मम्मा ?? …. डोन्ट वरी गं….. अगं हे बघ तो जाम पकाउ बडबड करतो मला माहितीये ….. पण मग मी नाही उत्तर देत , त्यापेक्षा मी मनात म्हणतो ,” अपने दोस्त की पकाउ बातों सें कैसे बचे!!!! ” मग मी खोटं खोटं स्प्राईट पितो आणि मग सरळ दुर्लक्ष करतो त्याच्याकडे 🙂 ” …..

“कूल यार मम्मा…. तो नेहेमी आपल्या गाडीपेक्षा त्याची गाडी बिग म्हणतो… पण मी चेक केलेय पेपरमधे … अगं सेम प्राईज आहे दोन्ही गाड्यांची …. 🙂 ” …ईति इशान …

मी चकित… कधी केलेय हे याने….

“आणि ऐक, आपली गौरी त्याला नाही आवडत… पण ती ’आपली’ माउ आहे ना, आपल्याला आवडते ना….. ”

“अरे पण बाळा कधी कधी विरोधही करावा रे आयूष्यात , ते ही गरजेचं असतं रे… समजेल रे तूलाही हे… ” … माझी आपली अनूभवाची मतं ….

“मम्मा …………… तू काय सांगितलं होतं मला की देवळात पायऱ्या उतरताना देवाला पाठ दाखवू नये पण म्हणून त्या नादात धडपडायचंही नाही… हो ना!!! कारण देवबाप्पा सगळीकडे असतो…. आपण कुठेही पहात असलो तरी तो आपल्या समोर आणि पाठीमागे असतोच 🙂 … मग मम्मा तू सांग, देव फक्त पुजारूममधेच असतो का ???  आणि मला सांग तू नाही का बाबाला म्हणालेलीस की काय तरी ते ” तो का म्हणे उगीच करावे “ त्या आंटीच्या घरून आपण निघालो तेव्हा…. सो आता कूल गं मम्मा… चल बाय मी जातोय खेळायला….. ”

समोरचं पात्र गेलं खेळायला निघून पण माझ्या मनात एकापाठी एक विचार नुसते…. माझ्या समोर वाढणारं पिल्लू माझ्या नकळत ’घडतंही’ आहे ही पहिली जाणीव 🙂 …. आपण जे जे काही बोलत असतो ते रुजतं आहे हे दुसरं 🙂

कळीचा प्रश्न हा पण की मी कधी म्हणाले नवऱ्याला की ” तो का म्हणे उगीच करावे “????  कधी कधी ??? व्हेन व्हेअर ??? …. आठवलं आठवलं , दिमाग की बत्ती पेटली एकदम…..

एका ओळखीच्यांच्या घरी गेलो होतो आम्ही, २९ मार्चच्या संध्याकाळी… स्टार माझावर ब्लॉग माझाचे सकाळी प्रसारण झाले होते त्या दिवशी….. तिथे गेल्यानंतर तिथल्या हुशार स्त्रीने जणू आमच्या चेहेऱ्यावर ’यांच्या गेल्या सात पिढ्या एकतर नापास किंवा निव्वळ पासक्लासात पास झालेल्या आहेत ’ असे काही वाचले असावे अश्या थाटात मला चौफेर व्याख्यान दिले होते… त्यात मला जर माझ्या मुलांबाबत वगैरे काहिही अडचण आली तर या ’गोल्ड मेडलिस्ट ’ (तिनेच सांगितले 😉 ) काकू नक्की मदत करणार होत्या…. 🙂 वर त्यांनी मुलांनाही आश्वासन दिले होते की त्या आहेत, सो डोन्ट वरी !!! (आता आम्हाला खरच नक्की काय अडचण आहे किंवा अडचण आहे की नाही वगैरे काही आम्ही न सांगताच काकूंना समजले होते हा भाग निराळा!! 😉 ) … मला दोन प्रकारची माणसं नेहेमी कोड्यात टाकतात… एक ज्यांना inferiority complex आहे आणि एक ज्यांना superiority complex आहे, यांच्यामूळे माझ्यात नेहेमी भलताच गंड निर्माण होतो की मेला आपल्यात complex सुद्धा मिडल क्लास आहे 😉 …. तेव्हा त्या काकूंच्या घरून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा नवरा म्हणाला, “ऐकून का घेतेस नेहेमी , सांगायचे ना की स्टार माझावर आजच्या कार्यक्रमात तू होतीस 🙂 अगदीच काही ’ढ’ नाहियेस तू म्हणून 😉  …. ”  ….. तेव्हा मी त्याला म्हटले होते “तुका म्हणे उगी रहावे ….. जे जे होइल ते ते पहावे  ” 🙂 …..

अच्छा म्हणजे चिरंजीवांना ’तुकाराम महाराज’ नाहियेत ओळखीचे अजून पण त्यांच्या सांगण्यातले मर्म निश्चित समजले आहे तर 🙂 …. सगळीकडेच नसते बोलायचे…. दिसेल त्याला आपले मुद्दे नसतात पटवायचे हे ’स्प्राईट’ वाल्या माझ्या पिल्लाला माहितीये तर, पुन्हा त्या मित्राबद्दल मनात कुठलाही आकस नाहीये …. खूप मस्त वाट्लं एकदम!!! एखादी मस्त गाण्याची लकेर कानावर पडावी आणि मन एकदम ताजतवानं व्हावं ना तसं काहिसं…. 🙂

उगाच करावे असे चिरंजीव सांगून गेलेच होते म्हणून उगाच पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिले….. ड्रिंक्स ब्रेकनंतर ’प्रश्नचिन्ह’ही ताजं झालं होतं पुन्हा मस्तपैकी …. ’Wh’ questions चा रतीब पुन्हा एकवार सुरू झाला होता…..

मला समोरच्या दृश्यात ’जुदाई’ मधल्या परेश रावलच्या कपाळावरचं ठळक प्रश्नचिन्ह आणि स्प्राईट पिणारे ’तो का’ राम महाराज दिसत होते आत्ता 🙂 …. पुढच्या वेळेस असा काही प्रसंग आला तर मी ’तो का ’ रामांकडून स्प्राईट मागणार आहे प्यायला….. 🙂

Advertisements

58 thoughts on “‘तो’ का म्हणे उगीच करावे….

 1. सहसा तुझ्या पोस्टींमध्ये गौराबाईंपुढे दादा, सेहवाग फॉर्मात असताना द्रविडनं एक बाजू धरावी तसा असतो.. अन प्रत्यक्षातही तो तसाच आहे.. आणि ह्या पोस्टीत मात्र, जसा तोच द्रविड ऍडलेडची टेस्ट दोन डावात शतकं(त्यात एक द्विशतक) करून एकहाती जिंकून देतो तसाच दादा फॉर्मात आहे.. 🙂
  लहान मुलं तेच करतात जे त्यांचे पालक करतात, त्यामुळे प्रश्नचिह्नामुळे प्रश्नचिह्न आणि तुकारामांमुळे तो का राम निर्माण होतच राहतात! 😀

  • बा प्रॉफेटा तू त्याला ’द्रविड’ म्हटलास हेच खूप आवडले रे मला 🙂 …. मला कायम द्रविड आवडतो , एक खेळाडू म्हणूनही आणि एक व्यक्ती म्हणूनही… अनेकांशी वाद घातलेत मी या मतामूळे 🙂

   >>>लहान मुलं तेच करतात जे त्यांचे पालक करतात, त्यामुळे प्रश्नचिह्नामुळे प्रश्नचिह्न आणि तुकारामांमुळे तो का राम निर्माण होतच राहतात! 😀

   हाहा… बाबा अमितकडून तूला पार्टी 🙂 …. पण आमच्याकडचे निदान इशानूसाठीचे ’तुकाराम’ म्हणजे माझे बाबा आणि अमित स्वत : 🙂

 2. यांच्यामूळे माझ्यात नेहेमी भलताच गंड निर्माण होतो की मेला आपल्यात complex सुद्धा मिडल क्लास आहे..>>> हा हा हा… 🙂
  मलाही थोडं “तो का रामां”कडुन स्प्राईट हवंय… 🙂
  पोस्ट मस्त झालीय…

  • हो ना रे आनंदा… बघ ना आपण कायम equilibrium ला असतो, म्हणजे मूळात मध्यम वर्ग त्यातही उच्च नाही की कनिष्ठ नाही, मध्यम मध्यम वर्ग 😉

   ’तो का’ रामांच स्प्राईट आवडलं ना 🙂 …. आभार रे!!

 3. तो का राम महाराजांचा विजय असो !!
  थोरांसही प्रसंगी न समजणारे तत्वज्ञान पोरास समजले… !!
  ईशान …तुसी ग्रेट हो….!!

  • राजिवजी आभार माझ्याकडून आणि इशानकडुनही 🙂

   आपण काही वेगळे केलेय याची अजिबात जाणिव नसल्यामूळे इशान मात्र मस्त निवांत आहे ….
   किती छान वाटते ना आपल्या मुलांचे कौतूक होते तेव्हा 🙂 मन:पुर्वक आभार!!

 4. तुकारामाच्या रांगेत बसलाय.. इतका समजूतदारपणा काही चांगला नाही रे बाबा इशान..
  काही लोकांना खरंच लोकांच्या घरात नाक खुपसायची सवय असते. विनाकारण इतरांना लहान लेखायचं, की आपण मोठे होतो हे असे वाटत असते त्यांना. ही अशी मंडळी पुढे आयुष्यभर भेटतच रहाणार. त्यांना कसं ट्रिट करायचं हे मोठमोठ्या माणसांना समजत नाही. इशानला ते या वयातच समजतंय, म्हणजे मोठेपणीचं आयुष्य सोपं जाणार तर…

  • महेंद्रजी 🙂

   अगदी खरय तुमचं ..
   >>>विनाकारण इतरांना लहान लेखायचं, की आपण मोठे होतो हे असे वाटत असते त्यांना. ही अशी मंडळी पुढे आयुष्यभर भेटतच रहाणार.

   मला इशानूची गंमत ही वाटली की हा असा ’मित्र’ रोज सहन करूनही त्याच्याबद्दल याच्या मनात राग नाही… कधी तरी वैतागला तरी तो त्रागा किती भरकन विसरतो तो 🙂 ….

   मन:पुर्वक आभार महेंद्रजी…. तुकाराम महाराजांचं असो की एकूणात संतसाहित्य असो हळूहळू मुलांना त्याची ओळख व्हायला हवीये , त्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करायला हवेत असे वाटायला लागलेय मला आता …..त्यानिमित्ताने माझीही उजळणी होइल 🙂

 5. दर विकांताला टेंपूलमध्ये जाणार्‍या कुटुंबाची Curiosity फार खाजरी आहे. पोरगं पुढे जाऊन धर्म प्रचारक होणार. त्या मुलाला तुम्ही अयोध्या निकालाबाबत त्याचे मत विचारायला हवे होते 😉

  बाकी ’स्प्राईट’धारी दादाला आमच्याकडून जबरदस्त दाद. एकदम कडक.

  • सिद्धार्थ आभार रे 🙂 … अशी मस्त दाद आपल्या पिल्लांसाठी आली की आईलाच कसलं मस्त वाटतं ना… 🙂

   स्प्राईटधारी दादा निवांत आहे अरे… त्याच्या मते वेगळे काही घडलेच नाहीये 🙂

   >>>>त्या मुलाला तुम्ही अयोध्या निकालाबाबत त्याचे मत विचारायला हवे होते 😉

   हाहा अरे नको ’आ बैल’ होइल ते… त्याच्या आईचा लेटेस्ट डायलॉग ऐक ,”म्हणे मुलगा विचारत होता की अश्या कोणत्या दहा गोष्टी आहेत ज्या केल्या की आपण हेवन मधे जातो ?? ” …. खरं सांगते माझ्या मनात आलं होतं की सांगावं , “बाबा रे अश्या शंका मनात आणणं बंद केलस तर हेवन इथेच उपस्थित होइल 🙂 ” …एकीकडे हेल नी हेवनच्या गप्पा आणि एकीकडे तुम्ही कसे माझ्यापेक्षा लहान असा गोंधळ… दया येते रे कधी कधी अश्या बालपणाची….

 6. वर्डस्वर्थ ने म्हटले आहे ना’child is the father of man.’ कधि कधि आपल्याला लहान मुलांकडून खूप शिकायला मिळतं. आणि ईशान ची समज खरच एकदम mature वाटते.
  आपला कॉम्प्लेक्स पण मिडल क्लास -जबरदस्त पटले.
  सुंदर ब्लॉग.

  • अरूणाताई मन:पुर्वक आभार 🙂

   खरय लहान मुलांकडून आपल्याला खूप शिकायला मिळते आणि आधि शिकलेले जे जे आपण विसरलोय त्याचीही उजळणी होते …..

 7. तन्वी! पोस्ट एकदम आवडली.मुलांचे पालक काय काय भरून ठेवतात मुलांच्या मनात की ही मुलंच एवढी, एवढे प्रश्न विचारण्याइतकी विचार करणारी झाली आहेत असा संभ्रम निर्माण करणारा हा अनुभव.त्याच बरोबर ज्याची मानसिकता योग्य प्रकारे विकसित झाली आहे तो मुलगा खरोखर इतक्या ’कूल’ली हॅंडल करतो सगळं.एक चांगला अनुभव दिलात.विचार करायला लावणारा.मोठ्यांनाही.:)

  • विनायक मन:पुर्वक आभार 🙂

   >>>त्याच बरोबर ज्याची मानसिकता योग्य प्रकारे विकसित झाली आहे तो मुलगा खरोखर इतक्या ’कूल’ली हॅंडल करतो सगळं. …..

   खरय अगदी… आपली जबाबदारी वाढल्यासारखी वाटते ना अश्या प्रसंगानंतर 🙂

 8. काय बोलु तेच कळत नाही!!!!!, तुमचा मुलगा खरेच खुप मॅच्युअर्ड आहे, मागे एकदा सचिन तेंडूलकरच्या आई श्रीमती.रजनी.र.तेंडूलकरांची मुलाखत पाहीली होती,

  तो :- तुम्ही सचिनवर संस्कार कसे काय केलेत की तो इतक्या उंचीवर पोहोचुन सुद्धा जमिनीवर असतो
  तें ची ममा :- “संस्कार करावे लागत नसतात ते आपोआप होत असतात, घरात आपण जसे असतो बोलतो, खातो वागतो तशीच मुले पण होतात, नुसता सचिनच नाही तर माझा अजितपण तसाच आहे!!!!!”

  तुमच्या ह्या अनुभवातुन ते बोल समजले, तुम्ही “डेलिबरेटली” संस्कार “केले” असते तर कदाचित चित्र वेगळे असते, पण तुमच्या बाळु वर संस्कार होतायत हे फ़ार उत्तम आहे!!!!

  • गुरूनाथ किती छान वाटलेय तुझी कमेंट वाचून सांगू 🙂

   खुप खूप आभार ….. जेव्हा जेव्हा एखादी पोस्ट टाकते मी, आणि तुम्हा सगळ्यांच्या अश्या सुंदर प्रतिक्रीया येतात , जबाबदारी खुप वाढल्यासारखी वाटते….

   >>>तुमच्या ह्या अनुभवातुन ते बोल समजले, तुम्ही “डेलिबरेटली” संस्कार “केले” असते तर कदाचित चित्र वेगळे असते, पण तुमच्या बाळु वर संस्कार होतायत हे फ़ार उत्तम आहे!!!!

   🙂 …. संस्काराचं मलम नसतं ना रे …. खरं सांगते अत्यंत सुंदर असतं हे आई-बाबा होणं …. रोजचा नवा पेपर रोजची नवी परिक्षा, पण असे काही प्रसंग घडतात आणि वाट्तं जमतोय जरासा तो अभ्यासक्रम आपल्याला 🙂

 9. खरंच सुंदर !! (तुझ्या लेखांना प्रतिक्रिया देताना माझ्याकडची विशेषणं संपली असल्याने रिपीट झाल्यास त्याला तूच जवाबदार आहेस 🙂 )

  ‘झालेले’ संस्कार हे ‘केलेल्या’ संस्कारांपेक्षा कधीही चांगले. आणि ईशानदादा एवढ्या लहान वयात इतका समंजस, हुशार, मॅच्युअर, समजूतदार झालेला बघून तर खरंच कौतुक वाटलं !!

  स्प्राईट पिणारे तो काराम महाराज… लोल !! 🙂

  • हेरंबा आभार रे 🙂

   >>>> ‘झालेले’ संस्कार हे ‘केलेल्या’ संस्कारांपेक्षा कधीही चांगले. … अगदी रे!!!

   किती जबाबदारी वाढते ना आपली असे वाक्य आले की… कारण मग आपणही संस्कार करो वा न करो ते ’होतच’ असतात….. मुलांच लक्ष भलेही कुठेही असो, कान आणि डोळे आई-बाबांना पहात असतात रे…. टिपकागदासारखे सगळे झिरपत असते आणि सगळेच नाही का 🙂

  • अनिता किती दिवसानी कमेंट येतेय तुझी 🙂 …. मन:पुर्वक आभार गं …

   पिल्लु गोड हे मान्य करते मी पण आम्ही ग्रेट , नको गं 🙂 ….

   • मी ब्लॉग तर वाचत होते नेहमी पण हि पोस्टच अशी होती की वाटले तुला सांगूनच टाकावे…
    ईशान इतका लहान असूनही किती जास्त समज आहे ना..आणि आपण मोठे मात्र उगाच लहान लहान गोष्टीवरुन भांडत असतो…
    खरेच शिकायला हवे त्यांच्याकडून..
    आणि तुम्ही दोघेही तितकेच ग्रेट आहात… लहान मुले म्हणजे आरसा असतात ग आपल्या घरचा…त्यांचे विचार हे घरातुनच येत असतात….आपल्या कडे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपल्या आई बाबांकडून येत असतात…
    हे तुम्हीच लावलेले रोप आहे जे अता छान बहरू लागले आहे…
    एक आई म्हणून तुला खूप भारी वाटत असेल ना आज…

   • >>>हे तुम्हीच लावलेले रोप आहे जे अता छान बहरू लागले आहे…
    एक आई म्हणून तुला खूप भारी वाटत असेल ना आज…

    🙂

    खरचं भारी वाटतय 🙂 …. आभार गं!!!

 10. खरंच, मुलं ही टीपकागदासारखी असतात. आई-बाबांचे वागणे, बोलणे, विचार करणे या गोष्टी त्यांच्यात नकळत झिरपत असतात. आणि ही पिढी त्यावर विचार करून स्वत:चे मत बनवत असते. आपल्यावरची जबाबदारी त्यामुळं खूप वाढते .
  इशानू, ग्रेट. बेटा, खूप कौतुक वाटतंय्‌ तुझं . keep it up 🙂 🙂

  • आभार गं प्रज्ञा 🙂 …. तूझा निरोप नक्की पोहोचवते मी ईशानपर्यंत 🙂

   ही पिढी खरच आपल्यापेक्षा निश्चित जास्त विचार करणारी किंबहूना करू शकणारी आहे ….

 11. ईशानदादा,
  अरे जे आम्ही मोठी माणस मिळविण्यासाठी धडपडतो ते मानसिक स्थेर्य इतक्याश्या वयातच मिळवलेस मित्रा! तुझ्याशी गप्पा मारायची ईछा होते आहे बघ. आत्तापासून मनाच्या इतक्या जवळ आहेस, तू नक्की खूप मोठा होशील बघ.Three Idiots मधल्या Rancho सारखा! 😉

  आणि लेख फारच उत्तम लिहिला आहे. पहिल्यांदा वाचतो आहे आणि प्रशंसक झालो बघा.

  • वैभव आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   >>>Three Idiots मधल्या Rancho सारखा! 😉 …. 🙂 … यासाठी तर स्पेशल स्पेशल आभार …. माझ्या पिल्लूला अशी काही प्रशंसा मिळणं हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचं आहे 🙂 ….
   पुढे जाउन तो कोण होणार वगैरे माहित नाही, हो पण सध्या आम्ही दोघंही जणं आई आणि मुलगा हे नातं भरभरून जगतोय….. पुन्हा एकदा असे म्हणेन मी, कारण माझ्या लेकीच्या जन्मानंतरची पहिली चार वर्ष धावपळीचीच गेली, आता सगळी नाती पुन्हा नव्याने मस्तपैकी जगता येताहेत 🙂

  • 🙂 अनघा आभार गं 🙂

   अगं बत्ती पेटवणाऱ्यांना कल्पनाही नाहीये त्यांनी काहितरी जरा वेगळे केलेय, ते निवांत आहेत रोजच्यासारखेच…. मस्त खेळा, मजा करा, काय काय हवेय खायला याची आईला यादी द्या .. रूटिन मस्तपैकी 🙂

   • >>>> अशा रुटीन चा हेवा वाटतोय मला :p 🙂

    पुढच्या विकांताला नक्की जाउन या/ ये गावी 🙂

 12. मस्त लिहिले आहेस. वाचताना मजा आली. ईशान बद्दल हेवा वाटतो या वयात एवढी maturity !!….पण त्याच बरोबर पालकांनी मुलांमध्ये positive गोष्टी रुजवणे किती महत्वाचे आहे हे मात्र तुझ्या कडून शिकण्यासारखे आहे. keep it up…

  • अमोल आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂
   (कमेंटला उत्तर द्यायला फार उशीर झाला ना मला…. )

   मुलांमधे +ve गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न करत स्वत:लाही तसेच ठेवण्याचा प्रयत्न करतेय ईतकेच…. मजा येते पण 🙂

 13. तन्वि

  प्रतिक्रिया देण्या साठी बर्‍याच कोल्यांट्या-उड्या घ्याव्या लागल्या पण तुझी ही पोस्ट आवडली हे सांगायचेच या जिद्दीने मी सांगतोय.

  “दत्तगुरूंनी म्हणे आयुष्यात २४ जणांना गुरु केलेले होते. (वेगवेगळ्या प्रसंगात व वेगवेगळ्या कारणांमुळे)”

  – त्याप्रमाणे जर प्रत्येकाने स्वत:ची ज्ञानेंद्रिये उघडी ठेवली तर अनेक छोट्या छोट्या घटनातून आपल्याला शिकण्यासारखे बरेच असते.

  चि. ईशान ने किती सोप्या शब्दात स्थितप्रज्ञतेचे तत्त्वज्ञान सांगितले.

  तो त्या वेळेचा गुरुच !!!
  hats off Ishan !

  रवि करंदीकर

  • रवी दादा मनापासून आभार तुमचे 🙂

   छोटेसेच प्रसंग पण शिकवण मोठी देतात बरेचदा… अगदी बरोबर आहे!!! ईशानला तुमची कमेंट दाखवते आज नक्की…. 🙂

  • अनूप संतसाहित्य किंवा एकूणातच आपले मराठी साहित्य इतके समृद्ध आहे की मुळात मुलांपर्यंत पोहोचवायला आपणच तोकडे पडू की काय अशी भिती वाटते मला कायम…. तरिही प्रयत्न मात्र करतेय….

   आभार!!!

 14. अगं, आजच्या जगात ” हाथी चाले अपनी चाल कुत्ते भोंके हजार ” प्रमाणे जर शांत वागलो नाही तर…. आता पुढचे तुला सांगायला नकोच. 🙂 पण तरीही ईशान ला म्हणाव सारखा सारखा तुका आणि राम नको. सगळेच सूर थोडे तरी लावच. गौराची शिकवणी लाव त्याला… :D:D…

  पोस्ट नेहमीप्रमाणेच, जमके! 🙂

  • होय गं बयो….. जगण्याच्या शाळेतले धडे तो का रामही गिरवेल हळूहळू…. जरा धक्के बसले, खूपलं , खरचटलं तर लावेलही वेगळे सुर कदाचित …..

   गौराची शिकवणी खरच लावायला हवी त्याने 🙂

   आभार गो!!

 15. फारच छान. सुंदर टिपले आहेत हे छोट्यांच्या मुखातील बोल. आणि खरं सांगायचे तर ह्या पोस्टवरून मी एकच सांगेल “मां से बेटा सवाई”.
  खूप आवडली हि पोस्ट. असेच लिहित रहा आणि आपल्या अनुभवाने आम्हालाही समृद्ध करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s