उशीर…..

“अगं माउ उशीर झालाय आज तूला यायला, चल आता पटापट हायपाय धूवा आणि जेवायला चला….” शाळेतून आलेल्या लेकीला माझी सल्लेबाजी सुरू झालेली होती…..

’उशीर’ ….सतत येतो हा शब्द नाही आपल्या बोलण्यात…. टाळायचा असतो ना तो, म्हणून त्याचा धाक आणि बागूलबुवा कायम!!!

मला आवरण्याची जितकी घाई साधारण तितकीच माझी लेक निवांत…. “होऊ दे उशीर, तू आधि माझं ऐक…. ” लेकीचा हुकूम!!!

शाळेतून आली ना ही की मला समोर बसवून आधि संपुर्ण दिवसाचं रिपोर्टींग करते , मग बाकि कामाला सुरूवात…. विलक्षण गोड दिसते ती तो वृत्तांत सांगताना म्हणून मी देखील बसते तिच्या समोर…. आज टिचर अमूक म्हणाली, ढमूक म्हणाली वगैरे सुरू होते मग … त्यात गाडं कुठे तरी अडतं, मग ’थांब हं मम्मा, मला याद करू दे’ वगैरे सुरू होतं…. मला समजलेलच असतं काय म्हणायचय ते, मग मी तो नेमका शब्द सांगते…. मग समोरचे डोळे एकदम विस्फारतात…. चेहेरा खुश एकदम, रोजचा प्रश्न, “अगंsssss मम्मा तूला कसं माहितं ??? तू पण माझ्याच स्कूलला जायची??? तूलापण माझीच टिचर होती ???? 🙂 ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का ??? ”

परवा इथवर सगळं रोजच्यासारखचं झालं , या मुलांना रोजचा डबा टिचरला दाखवावा लागतो…. मुलांना डब्यात सकस अन्न दिलं जावं यासाठी शाळा तशी जागरूक आहे…. परवा पिल्लूने मला सांगितले ,” मम्मा मी टिफीन दाखवला टिचरला, ती म्हणाली की गुड फूड ….. 🙂 ” ….. मग काहिसा विचार केला तिने , घरात एक चक्कर मारली आणि परत माझ्यासमोर येउन उभी राहिली नी पुन्हा विचारलं ,” मम्मा एक सांग, जर टिचर नाही म्हणाली की गुड फुड तर  ??? ” ……

खरं सांगते, मी बसल्यानंतर माझ्या होणाऱ्या उंचीपेक्षा जरा उंच किंवा साधारण तितकच उंच असं ते ध्यान असे प्रश्न विचारतं तेव्हा चेहेरा असा काही गंभीर होतो की तो पहाताना आपल्या चेहेऱ्यावर नकळत हसू उमटावे…. तरिही मी आपलं चेहेरा शक्य तितका गंभीर ठेवत, गाल फुगवून म्हटलं ,” मला ना जाम सॅड वाटतं की मी माझ्या पिल्लूला टिफीन दिला आणि तो टिचरला आवडलाच नाही 😦 ” …..

माझ्यामते विषय संपला होता, हातपाय धूणे वगैरे आटोपलं….. पुन्हा पिल्लूच्या घरात एक दोन फेऱ्या झाल्या,आणि पुन्हा धावत ती माझ्याकडे आली , घट्ट बिलगली आणि म्हणाली  “मम्मा अगं तू ते बनाना दिले होतेस ना टिफीनला, तेव्हाही टिचर ’गुड फूड’ असेच म्हणाली होती…. मी फक्त घरी येऊन तुझी गंमत केली होती…. 🙂 ” ………… 🙂 🙂 आता मात्र मला घरातल्या त्या सगळ्या वैचारिक फेऱ्यांच रहस्य उमगलं होतं ….. शाळा सुरू होऊन आता महिना होत आला आहे, आणि शाळेच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी पिल्लूला तिची लाडकी केळी टिफीनमधे दिली होती…. आणि त्यादिवशी टिचरने विचारले होते की तुझ्या आईने केळं का दिलेय टिफीनला ???? ….. त्या एका वाक्याला मी काही तसे लक्षात ठेवलेले नव्हते , पण त्या वाक्याने आपली आई दुखावली असेल का हा प्रश्न किती भेडसावतोय या चार वर्षाच्या डोक्याला…..

“मम्मा चल ना किती ’उशीर’ करतेस , भूक लागलीये … जल्दी जल्दी!!! ” या तिच्या वाक्याने भानावर आले खरे पण खरच किती ’उशीर’ करते मी बऱ्याच गोष्टी समजून घ्यायला…..टिचर ’गुड फुड’ म्हटली की पिल्लूसारखीच मी ही खुश होते, पण जर एखाद दिवस ती तसे नाही म्हटली तर काय यासाठी मी कुठे माझ्या बाळाला तयार करतेय….. बरं समजा तसं झालच तर त्यासाठी माझ्या मुलीने कसं react व्हायचय हे मला तिला शिकवावसचं वाटलं नाहीये…. पिल्लू लहान असलं तरी ते विचार करतय, करू शकतय हेच मला ’उशीरा’ समजलं तर ????

चालतं नाही काही ठिकाणी ’उशीर’ केलेला…. ट्रेनसाठी, बससाठी, नौकरी ऑफिसेसमधे आपण धावत पळत पोहोचतो…. वेळ गाठतो…. ’लेट मार्क’ नकोच बाबा… पुन्हा आपण कसे ’वक्तशीर’ की punctual असा दावा करतो….. पण काही छोटे छोटे ’उशीर’ आपण किती नकळत करतो नाही!!!!

असाच आणि एक प्रसंग… संध्याकाळची मुलं खेळून घरी आली, जेवणं झाली …..माझा रोजचा वाक्यांचा रतीब सुरू झाला…. “चला चला शाळेच्या बॅगा आवरा आता…. पसारे जागच्या जागी ठेवा…. आवरा भराभर…. झोपा चटकन… उद्या शाळा आहे…. झोपायला ’उशीर’ झाला की उठायला ’उशीर’ होतो …. ”

नॉर्मल पट्टीत सुरू झालेल्या घोषणा हळूहळू वरच्या पट्टीत जाइपर्यंत माझी पटाईत पोरं काही दाद देत नाहीत हा अनूभव आता नवा नाही, त्यामूळे मी हल्ली सुरूवातच एकदम जोषात करते…..

त्यादिवशी मुलंही ऐकेनात…. माझं किचनमधलं काम संपायच्या आत मुलांनी झोपायला जावं असा वटहूकूम मी काढला आणि मुलं तसं वागताहेत की नाही याकडॆ एक नजर ठेवली….. ’उशीर’ व्हायला नको या मतावर मी ठाम होते अगदी….. शेवटी मुलं वैतागली आणि म्हणाली, “अगं हो हो… जातोय आम्ही बॅग आवरतोय… पेन्सिल्स ठेवायच्या आहेत आत!!! ”

छे छे पण ….. ’उशीर’ झालाच….. मी ओरडले ,”नकोय काहीच नाटकं , एका सेकंदात मला तुम्ही दोघंही बेडरूममधे गेलेले पाहिजे… मी आवरेन तो पसारा… ” ….. मुलं किचनमधे पाणी प्यायला आली, मला म्हणाली हॉलमधे ये ना थोडा वेळ….. म्हटलं अजिबात नाही, उगाच थोडा वेळ थोडा वेळ करत ’उशीर’ होतो मग झोपा होत नाहीत पुर्ण……

किचन आवरलं, मुलं एव्हाना बेडरूममधे पोहोचली होती…. तिथल्या मस्तीचा आवाज मंदावला होता….. बाबाबरोबर खिदळून झाले असावे त्यांचे असा अंदाज बांधला मी….. घड्याळाकडे नजर टाकली , मस्त वेळेत आवरलय सगळं….. अजिब्बात ’उशीर’ नाही झालेला…… हॉलमधे गेले, पेन्सिलींचा पसारा आवरायचा होता ना……

समोर आले ते हे पेन्सिलींचे पिरॅमिड….. 🙂

ते पाहिले आणि पहातच राहिले…. मुलं धांगडधिंगा घालताना एकमेकांशी संवाद साधताहेत , असं काही रचू पहाणाऱ्या दादाला त्याची धाकटी बहिण मदत करतेय….. त्यांच्या डोक्यात कल्पना येताहेत… आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण जितके ज्ञान पुरवतो किंवा पुरवू शकतोय त्या पलीकडे झेप घेण्याचे सामर्थ्य दर पुढच्या पिढीत असते…… हे समजायला मला ’उशीर’ होतोय हेच काय ते सत्य!!!

तडक उठले आणि मुलांकडे गेले…. कधी नाही ते मी पोहोचण्याआधिच दोन्ही पिल्लं एकमेकांच्या कुशीत गाढं झोपली होती….. त्यांनी घातलेला ’पसारा’ मला खूप आवडलाय हे सांगायला जायला मला ’उशीर’ झाला होता ……

लहान सहान प्रसंग सतत डोळे उघडतात , पण मेली आपली झापडं भलती गहिरी … आपण सताड उघडेच नाही ठेवत डोळे… त्यांना पुन्हा पुन्हा मिटण्याचा चाळा…. नात्यांमधे, मैत्रीमधे, आयूष्यामधे हा ’उशीर’ चालत नाही हे का मला माहित नाहीये….

किचनमधले काम आणि मुलं यांच्यात निवड करणे ही साधि दिसणारी बाब तशी….’उशीर’ कुठे चालेल आणि कुठे नाही ही निवड जरा ’उशिरा’ केली की आलाच पश्चाताप ओघाने!!!

प्रत्येक ’उशीरा’ला कारणं देतोच नाही आपणं ….. असतात तय्यार आपल्याकडे कारणं …. प्रेमाचे चार शब्द बोलायला ’उशीर, चुकलं तर माफी मागायला ’उशीर’ , कोणी माफी मागितलीच तर माफ करायचा ’उशीर’  , कौतूकाचे शब्द बोलायला ’उशीर’ ……

काय करावे नी कसे करावे….. का मग Better late than never म्हणावे आणि जरा विचाराने वागावे….ह्योच करना पडॆंगा ऐसा लगता है!!!! 🙂

नाही यमाकडे म्हणे ’लेट मार्क’ची सोय नसते , त्याचे दुत त्यांचे काम चोख बजावतात वेळच्या वेळी….. ’उशीर’ न करता.. तेव्हा त्यांनी गाठायच्या आत ’जागो रेssss ‘… 😉

41 thoughts on “उशीर…..

 1. तुमची गुडफ़ुड गाईड भारी वाटली मला!!!!, हा हा हा, शिक्षण कुठे अन कसे विकसित होतंय ते पाहुन न्यारे वाटले!!. आम्ही तर शाळेत डबे फ़क्त पोरींनी आणायचे अन पोरांनी कुळाचार जेवल्यागत बर्फ़ाचे गोळे अन भेळ चापायची असले होतो!!!!!, एखाद्याने डबा आणला की त्याला हसुन हसुन आम्ही रडवायचो!!!!. पण तुकाराम महाराज “स्ट्रक्चरल इंजिनियर” झालेत की चक्क!!!!. सही पसारा आहे!!!

  • काय रे डबा आणणाऱ्यांना चिडवायचास 🙂 … तसा कुळाचार आमच्याकडेही होता म्हणा, अगदीच नाही असे नाही 🙂
   अरे ईशान नाव आहे ना त्याचे, पण तारें जमीन पर मधल्या ईशान अवस्थीसारखेच हे महाराजही स्वत:च्याच नादात, तालात आणि विश्वात असतात…. मोठेपणी काय होणार याचे त्याने आजवर ज्या ज्या लोकांना उत्तर दिले आहे त्यांनी मला नाही वाटत पुन्हा कोणाला असा काही प्रश्न विचारला असेल 🙂 … बरं आज सकाळी दिलेले उत्तर दुपारीही तेच असेल असे अजिबात नाही… ते हमखास बदललेले असते….

   आभार रे!!

   • मला माझे बालपण अन आई आठवते!!!!, तुमच्या पोस्ट्स वाचुन आभार तर तुमचे मानले पाहीजेत, बरेच से डायलॉग आई अन बाळाचे सारखेच असतात अगदी अमेरीका ते जपान अन रशिया ते ऑस्ट्रेलिया, उत्तम कांबळेचा एक लेख होता “धर्मनिरपेक्षते चे महातिर्थ :आई” जमल्यास मिळवुन वाचा….. मी तर सगळीकडे “ममाज बॉय” म्हणुन ओळखला जातो इतका आईवेडा आहे, अन नुसता वेडा नाही तर कधी कधी कडाकडा भांडतो पण तिच्याशी!!!! पण आई आई करत अजुनही घरी गेल्यावर लिटरली तिचा पदर धरुन अख्खा बंगला फ़िरल्याशिवाय आमची होमट्रीप सार्थकी लागतच नाही!!!!

 2. भारीच आवडल…

  >>नात्यांमधे, मैत्रीमधे, आयूष्यामधे हा ’उशीर’ चालत नाही हे का मला माहित नाहीये….+१

  >>जितके ज्ञान पुरवतो किंवा पुरवू शकतोय त्या पलीकडे झेप घेण्याचे सामर्थ्य दर पुढच्या पिढीत असते……

  हेच सत्य असाव

  आयला…ह्या वेळी तरी कमेंटला उशीर नको 😉

  • बघ यवगेशा उशीर न करता कमेंटलास किनई 🙂 …

   होय रे हेच सत्य आहे ना, बरेचदा साध्या बाबींमधेही उशीर होतो आपल्याला 😦 …..

   आभार रे…

 3. >> डबा टिचरला पण आवडायला पाहिजे…
  भूतनाथ चित्रपटातला हेडमास्तर आठवला 🙂

  पेन्सिलींचे पिरॅमिड छानच. तुमच्या पोस्टच्या शिर्षकावरून आणि Better late than never वरुन मला माझे इंजिनीयरींग असतानाचे माझे सकाळच्या पहिल्याच लेक्चरचे Better Late than Absent हे ब्रीदवाक्य आठवले 😉

  • बँकू टिफीन में सॅंडविच है के कटलेट 🙂 … भुतनाथचं नावही काढत नाही मी माझ्या घरातल्या भुतांसमोर… त्यांच्यापायी मलाही तोंडपाठ झालाय तो सिनेमा (आणि आवडतोही 🙂 )

   >>>तुमच्या पोस्टच्या शिर्षकावरून आणि Better late than never वरुन मला माझे इंजिनीयरींग असतानाचे माझे सकाळच्या पहिल्याच लेक्चरचे Better Late than Absent हे ब्रीदवाक्य आठवले 😉 🙂 … तुझ्या या कमेंटवरून मला ईंजिनीयरिंगची चार वर्ष आठवली 🙂 (अनेक स्वतंत्र पोस्ट्स होऊ शकतात त्यावर 🙂 )

   आभार रे!!

 4. पोरं लय भारी डोक्याची दिसताहेत ताई तुझी :P…मस्तच आहे!
  ईशान a.k.a. Rancho बद्दल तर वाचलंच होतं मी आधीच्या post मध्ये…लहानी पण कमी नाही आहे…मला माझं लहानपण आठवतंय आत्ता…मी आणि माझा लहाण भाऊ, आम्ही पण दोघंच भावंडं…असेच खेळायचो दोघंच आम्ही…तो दादा दादा म्हणत माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवायचा…मी पण स्वतःला मोठा समजून त्याची जबाबदारी घायची :P… मस्त वय असतं ना ते पण!
  post भारीच आवडली बघ!

  >> “प्रत्येक ’उशीरा’ला कारणं देतोच नाही आपणं ….. असतात तय्यार आपल्याकडे कारणं …. प्रेमाचे चार शब्द बोलायला ’उशीर, चुकलं तर माफी मागायला ’उशीर’ , कोणी माफी मागितलीच तर माफ करायचा ’उशीर’ , कौतूकाचे शब्द बोलायला ’उशीर’ ……”
  >>”नाही यमाकडे म्हणे ’लेट मार्क’ची सोय नसते , त्याचे दुत त्यांचे काम चोख बजावतात वेळच्या वेळी….. ’उशीर’ न करता.. तेव्हा त्यांनी गाठायच्या आत ’जागो रेssss ‘… ”
  झकास लिहिले आहे….सगळी pending कामं डोळ्यासमोर उभी राहिली बघ…:)

  • वैभव आभार रे….. 🙂

   पोरं ना आहेत बघ अशीच जरा साधी आणि जरा स्पेशल 🙂 …
   >>>मस्त वय असतं ना ते पण! … अगदी रे….. पुन्हा न मिळणारं…. तो निरागसपणा तेव्हाचाच आणि तेव्हासाठीच 🙂

   Pending कामं आठवली किनई… पटापट हातावेगळी कर बघू, ’उशीर’ नको!!! … अरे जुनमधे भारतात जायचे असते ना मला, एप्रिलपासून आठवणी वाढतात , मग पोस्ट्स मधे पण हळवा रंग आपोआप यायला लागतो… मग हे असे ’मिष्टर यमांबद्दलचे तत्त्वज्ञान वगैरे सुचते 🙂

 5. वा वा सुरेख लेख.. तन्विताई. तुमचा प्रत्येक नवा लेख आधीच्या पेक्षा जास्त जास्त आवडतोय.. फार फार सुरेख जमलीय एकंदर सगळीच भट्टी…
  ईशान चांगलाच creative आहे हो तुमचा..
  मस्तच.. शब्द सुचत नाहीयेत इतका छान लेख…

  • आभार गं मधूरा 🙂

   अगं ईशान त्याच्या आईसारखा आहे जॅक बरच काही पण मास्टर ऑफ नन 🙂 … कश्यात आपण मास्टरकी मिळवावी , जरा जिद्द बिद्द असले आजार अंगाला लावून घेत नाही तो ही माझ्यासारखा…. 😉 …. निवांत कारभार चालतो मस्तपैकी 🙂

 6. मस्त झालं आहे पोस्ट. आमच्या मुलींच्या शाळेत पण भाजी पोळीचा डबा कम्प्लसरी होता, प्रायमरी मधे असे पर्यंत. रोज सकाळी उठुन सहा वाजता सगळं तयार करावं लागायचं सुपर्णाला.
  एक बाकी आहे, आमची धाकटी अजूनही टीचरने गुडगर्ल म्हंटलं की खूश होते- १२वीत सुद्धा.नुकताच ओपन हाऊस झालं ११वीचं, तिला फिजिक्स, केम , बायो मधे टॉप ३ मधे मार्कस आहेत/ टीचर जेंव्हा व्हेरी पोलाईट ऍंड वेलबिहेव्ड गर्ल म्हणाली, तेंव्हा तिचे डोळे अगदी ती पहिलीत असतांना चमकायचे, तस्सेच चमकले..
  जाउ दे, हे काय मी आपलं उगीच आपलंच पाल्हाळ लावलंय, सहज आठवलं म्हणून लिहिलं.. बाय द वे, मुलं हुशार आहेत बरं.. 🙂

  • :)…. माझ्यामते ना पोळी भाजी हा सगळ्यात सोपा टिफीन असतो पण , चटकन होणारा आणि पुन्हा आजकालचे न्युट्रीशस वगैरे भानगडी पाळणारा….. माझ्या लहानपणी शाळेत मधल्या सुट्टीत ’आज भाजी कोणती ?? ” असं विचारलं जायचं कारण पोळी भाजी असणार डब्याला हे गृहितच होतं 🙂 … हल्ली जाम कठीण होतं चाललय सगळं, पोळी भाजी द्यावी तर मुलं संपवत नाहीत…. मग विचार की असे काय काय द्यावे जे मुलांना आणि त्यांच्या टिचरलाही आवडेल 🙂

   महेंद्रजी अहो लेक खुश होतीये टीचरने गुड गर्ल म्हटलं की ही खूप मोठी बाब आहे हल्लीची मुलं बघता….. तिच्यातली निरागस लहानशी मुलगी पहाताना तूम्हाला किती आनंद झाला असेल ना 🙂

   पाल्हाळ का या कमेंटला???… आम्हाला नाही तसे वाटले अजिबात, उलट अश्याच कमेंट्स हव्यात तुमच्याकडून 🙂 ,मनापासून येणाऱ्या….

   आभार!! 🙂

 7. ताई नेहमीप्रमाणेच एकदम अंतर्मुख करणारं पोस्ट! 🙂
  गौराबाई म्हणजे ईशानदादाचंच खट्याळ व्हर्जन आहे… अगदी खट्याळ समंजस! 😀
  उशीर बरेचदा होतोच बर्‍याच बाबतींत.. पण Better late than never.. हेच खरं!

  • गौराला समंजस म्हणावे ना विद्याधर तर आपले तसे म्हणून होईपर्यंत नवी खोडी काढलेली असते तिने …. 🙂

   खरय पण Better late than never.. ये बात भूलनी नही है!! 🙂

   आभार म्हणायचे नाहीयेत लक्षात आहे माझ्या 🙂

 8. ‘उशिरा’ बद्दलच्या इतक्या सुंदर पोस्टला इतका उशिरा रिप्लाय देणं हा अगदी काव्यात्म न्याय असावा………… दगडाचा काव्यात्म न्याय… अख्खी च्यामारिका झोपल्यावर तुम्ही लोकं पोस्टी टाकता त्याचा परिणाम हाय यो.

  जोक्स अपार्ट.. नेहमीप्रमाणेच अतिशय अप्रतिम.. रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुंदर तात्पर्यं शोधण्याच्या तुझ्या हातोटीला तर नेहमीप्रमाणेच सलाम. अप्रतिम पोस्ट हे वेगळं सांगायची गरज नाहीच नाही का? असो. पण तरीही सांगूनच टाकतो. उगाच उशीर नको व्हायला…….. 😉 खूप खूप अप्रतिम पोस्ट !

 9. >>>रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुंदर तात्पर्यं शोधण्याच्या तुझ्या हातोटीला तर नेहमीप्रमाणेच सलाम. 🙂

  हेरंबा काही मोठं घडतच नाही बघ 🙂 … अरे मला मागे कोणितरी म्हटले होते की सतत फक्त स्वत:च्या घराबद्दल मुलांबद्दल लिहीतेस , जरा बाकि आयूष्यावर पण लिही….. 🙂 … म्हटलं क्या करे जिथे आयूष्य ही व्याख्याच घरापाशी, मुलांपाशी येते तिथे पोस्ट्स किंवा विचार म्हणू या असेच यायचे रे….

  (किती लिहीते नाही मी 😉 )

  आभार रे!!! ….. आणि बाबा रे तो ’अप्रतिम’ हा शब्द मोठा आहे रे फार, तो असा इतका सहज लिहिला जाण्याईतपत नाही रे मजल माझी अजून ….

  • 🙂 ….. बघ बरं मी बालपणाची सफर घडवली की नाही 🙂 …. अरे मुलं मोठी होताना आपल्याला चटाचट आपल्या्ही लहानपणी चक्कर मारता येते… मजा आहे किनई…

   (हे मी स्पेशली तूला आणि बाबाला सांगतेय… कृ नों घ्या 😉 )

   आभार रे!!

 10. तुझ्या ह्या ’उशीरा’ चा आवाका समजायलाच उशीर झाला बघ !
  सगळे काही वेळच्या वेळीच झाले पाहिजे असा घोश्या लावणारे आम्हीच उशीर करू लागलॊ तर… ?
  उशीराला क्षमा नाही, हे लवकर कळायला उशीर होऊन उपयोग नाही !

  • अनूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत ….

   उशीर झाला असेल का ही जाणिव झाली की उशीर करेनासा होतो माणूस, हो ना!!!

 11. आले गं बयो! 🙂 अगं, अजून डोळे भलत्या भलत्या वेळी मिटू पाहत आहेत पण जीवाला चैन नाही… तुझ्या पोस्ट वाचायच्या मगच झोप. पहिलीच पोस्ट हाती लागली ती ’ उशीर ’ 🙂 आता कमेंटायला उशीर झालाय म्हणून आधीच माफी. उगाच तू माफी द्यायला उशीर करू नकोस. ही प्रेमळ धमकी वर आहेच.

  सहीच! अगं, हे गुडगर्ल प्रकरण गौराच काय आपल्यालाही भावतेच की अजूनही. एकदम मस्त फील येतो त्याने. मधून मधून म्हणायला हवे गं एकमेकींना. 😀 😀 ( नाहीतर मेलं कोणी म्हणायचे नाही … )

  जीवनातले अनेक उशीर टाळणे सर्वस्वी आपल्याच हातात असते. अनेकदा ते कळत असूनही कृती मात्र घडत नाही…. 😦 पण प्रयत्न करतोय हे ही नसे थोडके. पोस्ट एकदम मस्तच!

  • बयो गं अगं खरय हे गुडगर्ल प्रकरणं भलतं भावतं…. तूला मीच काय सगळेच गुडगर्ल म्हणतात गं 🙂 …

   (तुझ्या कमेंटला उत्तर बघ मी किती ’उशिरा’ देतेय 🙂 )

   आभार गं!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s