एक खून माफ…..

“सुख हे मानण्यावर असतं नाही ” …गुळगुळीत वाक्य आहे हे… अनेकदा ऐकलेलं…. जोवर प्रत्यय येत नाही तोवर ही अशी वाक्यं quotes म्हणून बरी वाटतात, अर्थ मात्र झिरपत नाही…. कधी तरी अचानक सामना होतो या वाक्यांच्या अर्थाशी, मग ती पटायला लागतात…. आपल्या मनाचं प्रतिबिंब कुठल्या तरी अनोळखी मनात पडल्यासारखं वाट्तं…. मग या वाक्यांचे फेसबूकचे स्टेट्स बनते… चार दोन मस्त व्यस्त लोक मग ते लाईक वगैरे करतात….

आज तिला म्हणावं वाट्लं, “सुखं बिख सब झूट… च्यायला दु:ख झालय मला ” … राग राग करायचाय… सगळ्याचा…. ब्रम्हदेवाच्या ते या राज्यकर्त्यांच्या सिस्टिमचा… हवापाण्यापासून ते माणसांपर्यंत सगळ्याचा….

लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आठवताहेत मग तिला…. कोणाची लबाडी, कोणी केलेली फसवणूक असो की जिव्हारी लागलेल्या अनेक जखमांवर धरलेल्या खपल्यांची पुटं असो ….. आज कारणीभूत व्यक्तींची भले नावं गावं आठवत नाहीत पण बिनचेहेऱ्याच्या त्या सारख्याच मनोवृत्तीच्या लोकांची आठवण होतेय…. अनेक हक्क हिरावलेले, अनेकदा गरजेच्या हाकेला ओ न दिलेले काही बाही एकामागे एक आठवणींच्या रांगेत येतेय….

काल मग ती जेव्हा म्हणत होती की ती सुखी आहे तेव्हा कुठे होत्या या आठवणी ???? आज आठवताहेत भराभर म्हणजे त्यांचं अस्तित्व कालही होतच की, म्हणजे “मी सुखात आहे ” या भावनेच्या बांधाने यांना अडवलं होतं जणू…. आज जरा वाटले तिला की इतर कुठे नाही पण आपल्या मनाशी प्रामाणिकपणे कबूल करावे की आजवरच्या आयूष्यात मी ही कधी एकटी होते, खचले होते, निराश होते.. दु:खी होते!!!! जरा असं वाटू द्यायचा अवकाश की कटू आठवणींची ’टोळधाड’ मेंदूत !! टपलेल्या होत्या त्या बांधावर जश्या….

काहिही आणि कोणिही त्रास देऊ शकतं आज… एरवी ज्यांना ’मुर्ख’ म्हणून सोडून द्यावे असे लोकही काही काळ मनात डॊकावतात…. लोक असे का वागतात??? मी नाही असे वागू शकत ??? लोक फक्त मलाच असे त्रास देतात का?? वगैरे अपेक्षित प्रश्नांचे टप्पे येतात, आणि दु:ख एक एक मजला वर चढतं… कीव करावी वाटणं हा आणि भोज्जा शिवावा लागतो या प्रवासात…. कधी स्वत:ची कीव कधी जगाची… जगाची असेल तर काम सोपे… स्वत:ची असेल तर मदत लगेच नाही मिळत…. मनात एक आवर्त पुर्ण होइपर्यंत सहन करावे लागते ते वाईट वाटणे!!!

साधं मॉलमधे जावं तर आपल्याकडॆ एखादीच वस्तू असते… काउंटरवर मारूतीच्या शेपटायेव्हढी रांग…. कोणालातरी ’प्लीज’ म्हणून काम भागू शकते, नंबर आधि लागू शकतोही…. पण मग तिच्या मनात ’एथिक्स’ नावाचं खूळ डोकं काढतं…. मग रांगेत ताटकळा किंवा वस्तू ठेवून बाहेर पडा…. आपल्याआधिची मंडळी रांगेत उभी आहेत ना आधिपासून, त्यांनाही घाई असू शकते ना हे सत्य आहे…. मग ’सत्याची’ कास वगैरे विचार !!! आपल्याला नाही बूवा जमत काही गोष्टी हे आणि एक दु:ख…..

दु:ख …..दु:ख ….. छोटं दु:ख ….. मोठं दु:ख ….. सगळ्या दु:खाचं मूळ परावलंबन असावे का??? आर्थिक, वैचारिक की मानसिक ???? छोटं दु:ख हे वैयक्तिक…. नी मोठं दु:ख हे सामाजिक … की याउलट हा क्रम…… मोठ्या दु:खात ’सल’ हा एक भलता प्रकार मोडतो…. चॅनलवरच्या ब्रेकिंग न्य़ुज वगैरेंपासून सुरू होणाऱ्या या सलात दादोजींचा रातोरात हटवलेल्या पुतळ्याला स्थान द्यावे, की लोक तर ही घटना विसरून IPL पहाताहेत ला द्यावे ???? मोदीने केलेले घोटाळे आठवावे, आदर्श बिदर्श गाठावे की आपण पार हर्षद मेहेता, तेलगी वगैरे प्रभुतींना आठवावे…. दु:खाला किती कारणं असू शकतात याचे प्रत्यय येत होते तिला…… 😦

मुळ मुद्दा असा मग की आपण ’सुखी’ आहोत हे म्हणताना समोर पहातो का फक्त…. डोळ्यांना झापडं लावून….. मागे असते बहूधा ही दु:खाची बाजू….. म्हणजे ती सुखात असताना दु:खातही असते…… किंबहूना सुख आणि दु:खाच्या मधे असते …. जे हवे त्याच्याकडे नजर ठेवायची आणि नको त्याच्याकडे पाठ….. आज ती बहूधा उलट्या दिशेला तोंड करून ’उभी’ आहे ….. शाळेतली कविता आठवतेय तिला आत्ता ‘Never admit your sorrows’ …… वर्षानूवर्षे कटाक्षाने पाळलीये ही ओळ….  कधीतरी आज ती म्हणतेय, “होय मी जरा दु:खी’ आहे गड्या…..

तिला वाटतेय आपण ना मनाला एक घट्ट ड्रेस शिवायचा…. उन वारा वगैरे चटक्यापांसून होरपळ अडवायची या मनाची…. पण मेला या मनाचा आकार सतत बदलतो…. कधी सुईच्या भोकाइतकं क्षुद्र तर कधी समूद्रासारखं विशाल…. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत सतत आकार बदलणाऱ्या चंद्रासारख्या हे ’मना’ घे मग तूला दु:खाची शिक्षा!!!!

…………..

…………………

…………………………

—  अगं हे काय बारा वाजलेत रात्रीचे, तू जागीच अजून ???? आणि चेहेरा का हा असा केलायेस??? … तिचा नवरा विचारतोय!!

— काही नाही झालयं , मला जाम वाईट वाटतय, बोअर होतय… ईन शॉर्ट मी दु:खी आहे….. ती

— “दु:खी” आणि तू … हळू बोल कोणि ऐकेल…. कसलं दु:ख झालय, आणि काय लिहीलयेस येव्हढं तावच्या ताव??? …. थांब मी आलोच मग वाचून दाखव…. नवरा

——–

आलाय तो परत, हातात कॉफीचे मग… (हो कप नाही… ’मग ’…. तिला कपात कॉफी नाही आवडत प्यायला… त्याला काहीही चालतं, त्याच्यामते कंटॆंट महत्त्वाचा 🙂 …. वेलदोडा घातलेला दिसतोय… मस्त सुगंध … वाफाळलेली कॉफी…. )

— हं हे घे… आणि आता वाचून दाखव..…… मला सांगा दु:ख म्हणजे नक्की काय असतं ..       ईति नवरा…

ती आपलं वरं लिहीलेलं सगळं पुराण वाचते एका दमात….

— थांब थांब,  मधे जरा कॉफी पी 🙂 …. नवरा

कॉफीचा पहिला घोट पोटाआधि मनात डोकावतो….. वाफाळलेली कॉफी दुखावलेल्या मनावर हळूवार फुंकर घालतेय….. कॉफीच्या गोडव्याचा अंमल मनावरही चढतो हलकेच….. ती पुढे वाचते….

“वैयक्तिक दु:ख कधितरी मग मागेच पडतात…. समाज ते मागे पाडायला भाग पाडतो…. चार वर्षाचं मुलं घरी आलं तरी आई धास्तावल्यासारखी शहानिशा करते, त्याला न समजणारे प्रश्न विचारते… शाळेत बसमधे तूला कोणी हात तर लावत नाही ना???? कोणी काही खायला दिलं तर खायचं नाही हं… कोणी हात लावला तर रागावयचं हं…. ते मुलं बावरतं मग, ते सांगतं बसमधून उतरताना अंकल हात धरून उतरवतो, मग काय करू ???? … आईकडेही उत्तरं नसतात…. अविश्वास दाखवायला ती शिकवत असते….. एक एक ’धडे’ वाढतात… आणि दु:ख ही…. दु:खाचा डॊंगर होतो नुसता….कडेलोट…... ”

— 🙂 …. थोडक्यात आत्ता या क्षणी तुझं ’दु:ख’ एकदम टॉपला आहे म्हणजे…. हो की नाही…. टॉपला काय असतं, ’टेरेस’ 🙂 …. तिथून होतो कडेलोट…. नवरा

— हे बघ तूला गंमत वाटतेय ना…… 😦 ….. ती

(ती अजून दु:खी जरा… पण कॉफी खरच मस्त जमली होती आजची :)… दु:खाचा दोलक कमी ते जास्त वर डोलतोय……किंचित हसू चेहेऱ्यावर , म्हणजे कॉफीची चव चेह्ऱ्यावर उमटावी असे काहीसे…नवऱ्याने तिच्या आवडत्या मगमधे, तिला आवडते तशी कॉफी , तिला गरज होती त्याक्षणी आणली याचा परिणाम मनावर झाला होता हे मान्य तिलाही ….)

— आता तू मला खरच सांग या सगळ्या पानभर दु:खात, दु:खाचं मूळ काय ???? …… नवरा

— मुळ ना मुळ आहे ते माणसाच्या प्रवृत्तीत…. स्वत: सुखी होताना, स्वत:चा स्वार्थ पहाताना इतरांचा विचार न करण्याच्या वृत्तीत दु:खाचं मुळ आहे, असतं ……. ती

— झालं मग… अगं जसं charity begins at home तसं लेट सुख अल्सो बिगिन ऍट अवर होमच 🙂 …. आपण प्रत्येकाने निदान आपल्यापुरतं असा विचार केला की मी माझ्या सुखासाठी इतर कोणाला दु:ख देणार नाही, की जगावरचा बराच ताण कमी होइल नाही का…. 🙂 ”

— मॅडम अहो आशावादी वागणं हे आपलं बलस्थान आहे त्यावरून ढळू नका…..मान्य, बरच काही नसतं आपल्या हातात, पण जे आहे ते अनेकांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे , आणि मी सुखी आहे म्हणणारेच सुखी असतात आणि होतात हे स्वत:चे डायलॉग्स तू विसरते हे माझं आता दु:ख झालयं  😉 ..खाली त्या डायरीत काय बघतेयेस, समोर बघ माझ्याकडॆ.. .. आणि हो कुठे पोहोचलय तुझं दु:ख, कडेलोटाला ना… करतोच थांब त्याचा कडॆलोट, ढकलतो त्याला सरळ खोल दरीत…. खून करतो आज त्या दु:खाचा……..  .. बोला आता काय म्हणताय .. 🙂 🙂 ……. नवरा

— एक खून माफ 🙂 …. ती

(मगाच्या तिच्या विचाराप्रमाणे ’समोर’ची बाजू  तर सुखाची होती ……. हा आपल्याला ’समोर’ बघायला सांगतोय, त्याच्याकडे …. 🙂 )

(मनाची कॉफीशी घट्ट मैत्री झालीच होती आता…. मन हळूच कॉफीच्या कानात कुजबूजलं … तो जो समोर हसतोय ना तो ’सिरियल किलर’ आहे बरं, अश्या अनेक दु:खांचे त्याने खून केलेत !!!!! 🙂 )

29 thoughts on “एक खून माफ…..

 1. तायडे,
  स्वतःशी केलेला संवाद सिरीजमधली अजून एक पोस्ट! 🙂
  इतकं छान लिहितेस ना.. प्रवाही अगदी… तुला पूर्वीही म्हटलंय.. मनात येणार्‍या विचारांच्या प्रवाहाचं वर्णन तुझ्यासारखं कुणीच नाही करू शकत..
  मस्त वाटलं.. माझीही मरगळ गेल्यासारखं वाटलं एकदम.. फ्रेश.. कॉफीची चव 🙂

  • विद्या 🙂

   अरे जाम उदास वाटत होतं रे….. म्हणजे जर्रासे वाईट वाटतेय आपल्याला हे जाणवत होतं , पण मुळात स्वभाव असा वाईट आहे ना मेला की मला “दु:ख” हा शब्दच आवडत नाही…. त्यामूळे आपल्यालाही दु:ख होतं ही जाणिव जास्त तापदायक 🙂

   पण अमितने नेहेमीप्रमाणे वेळ निभावली ती 🙂 … त्याचं बरं असतं मला वर्षातून एखाद्या वेळेस असले ऍटॅक्स येतात ते तेव्हढे सांभाळले की उरलेले वर्षभर मी ख्या ख्या करायला मोकळी 🙂

   कॉफीची चव भारीये किनई 🙂

 2. आपल्या दैनंदिन जीवनावर, मनाच्या उलट सुलट कोलांट्यांवर सुरेख भाष्य!
  किती सहजतेने केव्हढे मोठे सत्य सांगून गेलीस!

  • अरूणाताई मन:पुर्वक आभार 🙂

   अहो जरा ’Low’ वाटत होतं पण मग अचानक जाणवलं की आयुष्यात एका बाजूला दु:ख आहे नी दुसऱ्या बाजूला सुख… आपण कुठे पहातोय ते महत्त्वाचे 🙂

   • ते ही खरच. सुखाचे क्षण लवकर विसरतात, आणि आपण छोटी छोटी दुःखे पण कुरवाळत बसतो. आयुष्यात correct perspective ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.तुन्हा सगळ्यांना यची लवकर जाण आली, त्यामुळे तुमचे आयुष्य सुखी जाईल.

 3. खरंच अप्रतिम.. शब्दच नाही दुसरा… स्वतःच्या मनातलं द्वंद्व असं जाहीरपणे (आणि तेही एवढ्या ओघवत्या भाषेत) मांडायला धैर्य लागतं !!! त्यामुळे तर अजूनच ग्रेट वाटलं !!

  आणि

  “तिला वाटतेय आपण ना मनाला एक घट्ट ड्रेस शिवायचा…. उन वारा वगैरे चटक्यापांसून होरपळ अडवायची या मनाची…. पण मेला या मनाचा आकार सतत बदलतो…. कधी सुईच्या भोकाइतकं क्षुद्र तर कधी समूद्रासारखं विशाल…. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत सतत आकार बदलणाऱ्या चंद्रासारख्या हे ’मना’ घे मग तूला दु:खाची शिक्षा!!!!”

  आणि

  “आईकडेही उत्तरं नसतात…. अविश्वास दाखवायला ती शिकवत असते….. एक एक ’धडे’ वाढतात… आणि दु:ख ही…. दु:खाचा डॊंगर होतो नुसता….कडेलोट…… “

  हे दोन प्रचंड आवडले !!!

  • हेरंबा…..

   अरे हे द्वंद्व माझ्या मनातलं असलं तरी एकटीचं निश्चित नाही रे, म्हणून मांडल इथे….. खूप काही खुपणारं साचलं की ते निदान एकदा व्यक्त करून टाकावं, कधी कधी मनमोकळं रडू ही येऊ द्यावं ना रे…. तसं काहीसं….

   जाम सिरियस होताहेत ना हल्ली माझ्या पोस्ट्स…. जरा ब्रेक घ्यावा असं वाटतय…. 🙂

   आभार रे!!

 4. जबरीच!!
  सुरुवातीला तर मला वाटलं झालं तरी काय तायडेला?… जिच्या निव्वळ posts वाचूनच माणूस सुखावून जातो… डोक्यातल्या त्या ताण, द्वेष, वाईट आठवणी… अन काय काय त्या फालतू गोष्टींची जागा हर्ष, प्रमोद, आल्हाद… असल्या छान छान गोष्टी घेऊन टाकतात… ती स्वतःच आज दुखाःला धरून का बसली आहे?…कंटाळा आला कि काय सुखाःचा?…मनात म्हटलं नक्की कुणी तरी दुसरीने लिहिलेलं वाचलं असेल हिने…आता उत्तर देईलच ही…पण शेवटी सगळी गोम समजली 🙂 …सुखाःच्या ह्या खळाळत वाहणाऱ्या नदीला कधी दुखाःचा पूर आलाच तर तिचा प्रवाह सांभाळणारा बांध पण आहे तर…. 😉
  मस्तच! 🙂

  • वैभव अरे काळजी नको करूस, जरावेळ झाले दु:खी तरी फार वेळ टिकत नाही माझे दु:ख….. 🙂

   आणि हे खरच कोणितरी दुसरीने लिहीलेले असावे नाही, माझ्यातलीच कोणितरी दुसरी जिला काही बाबी खूपतात आणि मग त्यांचाच विचार केला जातो….

   आभार रे!!

 5. पोस्ट वाचलं.. दुसऱ्यांदा. पहिल्या वेळेस वाचल्यावर आपण हे काय वाचतोय तेच समजलं नव्हतं.
  पोस्ट एडीट केलंस??
  असो . पटलं काय लिहिलंय ते. आणि तू जे एडीट केले आहेस ते पण!! कदाचित त्या मागचं कारण काय असावं हे तुझ्या लक्षात आलं नसेल. बरेचदा अतीशय जास्त पझेसिव्हनेसची भावना आजारपणानंतर निर्माण होऊ शकते. कदाचित तसं काहीतरी असावं.. असो..
  🙂

  • 🙂

   महेंद्रजी अहो मलाही नव्हता कळला माझ्याच मनातला हा गोंधळ…. सलग काही विचित्र अनूभव आल्यावर मरगळ येते ना तसं काहीसं झालं आणि मग हा प्रकार डायरीत उतरला…. बरं गंमत कशी होते विचित्र अनूभव येतात हे लोकांकडून , आणि मग लोकांना आपण ईतके महत्त्व देतो की त्यांच्यामूळे आपल्या मनात आंदोलन उभे रहावे ही भावना जास्त त्रास देते…..

   असो, मरगळच ती , तिचे प्राक्तन हटणे हेच आहे….. धूळ झटकलीये मनावरची… आता लख्ख लख्ख एकदम 🙂 ….

   ते जे एडिट केलेय ना त्या प्रकाराला समजून घेतलेही असते, होते पण मग खुपलेल्या यादीत त्याचा नंबर नकळत लागला 🙂 … नंतर वाटलं नको टाकायला ते, मग एडिट केलं सरळ !!! 🙂

 6. Do not have words to express what i went through while reading your post. It was just amazing, I’m a Maharashtrian by birth. Wanted to reply in marathi itself, but my computer doesnt support the unicode. Anyways…….

  I really liked the way you started the post. And then slowly and steadily the post moved towards a conversation which we generally hear in normal couples.

  Compatibility is a very crucial ingredient for a relationship to work. And the key is to read between the lines.

  Amazing.
  Thanks for such a wonderful post.

  Thanks & Regards
  Aashish Junghare

  PS: I read the entire post in altogether a different perspective. I understand my views do match with the one’s mentioned above. So apologies. Cheers. Would like to visit your blog again.

 7. आशिष आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

  प्रतिक्रीया मनापासून आलीये म्हणून अधिक आवडली (त्यात पोस्टच कौतूक आहे म्हणूनही आणि 😉 )…..

  Let the perspective be different, it’s always good to hear about one’s thoughts from a different point of view…. I can now make the analysis of the post again, through a diff angle.

  ब्लॉगवर पुन्हा नक्की या….

 8. तन्वि,
  खुपच छान ग…
  अगं आपल्याला माहित असते की आपण उगाच विचार करत आहोत….
  आणि याचा आपल्याला फक्त त्रास होणार आहे…तरीहि आपलिच हौस असते ना…
  माझिया मना, जरा थांब ना,
  तुझे धावणे अन् मला वेदना!!

  पण खरेच छान कि तुझ्याकड़े एक सीरियल killer आहे 😀
  नशिब हवे गं त्याला पण 🙂

  • अनिता आभार गं 🙂

   >>>माझिया मना, जरा थांब ना,
   तुझे धावणे अन् मला वेदना!!…. अगदी बरोबर गं!!!

 9. तन्वी,
  खुपच सुंदर लेख…… तसं तुझे सगळे लेख वाचत असतो. प्रतिक्रिया न देण्याचं एकचं कारण. पण आज तुझ्या या लेखानी त्यावरही मात केली.
  मनातील कल्लोळ उतरविण्यात तुझा हतखंडा आहे…

  • 🙂 स्मिता अगं मस्त गोंधळ घालते किनई मी…. माझ्याच मनात मीच भांडण मांडून बसते गं…. तूला नाही समजला हा घोळ म्हणतेस ना, तुझी चूक नाहीये… कधी कधी मलाही समजत नाही मनातली द्वंद्व 🙂

   आभार गं!!!

   • 🙂 … नक्की मॅडम… अगं कधी कधी ना ’आपण दु:खी आहोत’ ही भावना जवळ करून दु:खाला विनाकारण कुरवाळले जाते क्षणभर तसेच काही झाले होते आता ठणठणीत आहे मी पुन्हा 🙂 …तुम्ही सगळे आहात की सोबत आणि…

 10. भापो, मनातला गोंधळ योग्य शब्दात व्यक्त झाला आहे …
  >>>>मनात येणार्‍या विचारांच्या प्रवाहाचं वर्णन तुझ्यासारखं कुणीच नाही करू शकत..+११११११११
  हा असला खून नेहमीच होत राहिला पाहिजे ग … 🙂

 11. हं… ही पोस्ट पण नेहमी सारखी अप्रतिम!!! आज खूप दिवसांनी आलेय न तुझ्या ब्लॉग वर, सो, एकेक पोस्ट वाचतीये… हे असंच ताई, माझंही होतं अनेकदा… मला कळतच नाही मला कशाचा त्रास, दु:ख होत असतं… पण असंच खूप भरून आणि साचून येतं सगळं… आता हे खून प्रकरण शिकायला हवं मला पण!!!

  • 🙂
   >>पण असंच खूप भरून आणि साचून येतं सगळं… हो ना गं !!

   बाकि खून करणारा मिळो तूला… मग हे असं दु:ख पळून जातं 🙂

   • हं… फक्त मला मिळाल्यावर त्याला स्वतःचा खून करावासा वाटूदे नको म्हणजे झालं… 😀
    आणि आपल्याला असं भरून येतं, उगाचच एकटेपण येतं तेव्हा कॉफी आणि ती पण स्वत: केलेली त्याने दिली तर खरंच त्याच्यावर जान कुर्बान… 😉
    मी ‘त्याला’ तुझ्याकडे ट्युशन साठीच पाठवणार आहे ‘हो’ म्हणण्यापूर्वी… 😉

   • 🙂 🙂 दे पाठवून त्याला माझ्याकडे… मी अमितला सांगते जरा ट्युशन घ्यायला 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s