जिंदगीची पहेली…..

प्रिय पिल्लू….

गंमत वाटतेय न तूला की मम्मा अचानक पत्र का लिहायला घेतेय याची…. असू दे, गंमत वाटू दे पण मला बोलायचंच आहे…. म्हणजे नेहेमीच बोलायचं असतं तुझ्याशी….पण तुझ्याबाबतही तुझ्या बाबासारखंच होतं, कितीही बोललं तरी वाटतं आणि थोडा वेळ बोलायचं आहे मला…. बरं बाबाच एक बरय मी बोलताना तो ऐकतो शांतपणे, तुझ्याबाबत ते ही नाही, तू भलता मधे मधे करतोस… का नाही करणार म्हणा, तू माझाच मुलगा… सगळ्या दुर्गूणांबाबत तर अगदी ’सख्खा’ आणि खरं सांगू माझा ’सखा’ही 🙂 ….. तुझ्याशी कायम संवाद होतो माझा…. बोलता येतं तुझ्याशी मला खूप खूप, भरभरून….. तुझा चेहेरा, हावभाव सगळं पहायचं असतं मला मग….. आपण हसतो, बोलतो, कधी कधी आपलं आपलं म्हणूनचं गुपित बाबापासुन आणि जगापासून लपवतो….. मग तू काहितरी बोलतोस आणि गुपचूप डोळा मारतोस, बाबा सतत विचारतो मग तूला की सांग ना मलापण काय गंमत आहे तुमची दोघांची , तू मात्र जाम सांगत नाहीस त्याला….. खरं सांगू बच्चू तू बघत नसताना बाबा हळूच मला डॊळा मारतो मग नी पटकन हसतो कारण त्याला मी सांगितलेली असते ती गंमत….

परवा परवापर्यंत अगदी माझं हेच मत होतं … होतं म्हणू की आहे म्हणू रे बाळा…. ’आहे’च म्हणते तेच छान आहे….

तुम्ही शाळेत जाता ना मग माझी सुरू होते आवरासावर….रोजच्या आयुष्यात घर आवरणे हा एक महत्त्वाचा मुद्दा, तू रागावतोस मला नेहेमी माझ्या या सवयीबद्दल, हो ना!!!  तुमच्या पसरलेल्या वस्तू कधी रागवायला लावणाऱ्या, कधी तुमची आठवण वाढवणाऱ्या….. बरं पुन्हा जेव्हा  तुम्ही “आमचं अमूक ढमूक सामान कुठे ठेवलयेस? ” हे हक्काने विचारायला येता तेव्हा तो एक अनूभव वेगळाच सुखावणारा असतो रे माझ्यासाठी…. आपलं एक ’कुटूंब’ आहे , ज्यातल्या व्यक्ती ’आमच्याकडे किनई हे असं असतं, ते तसं असतं ’ असं काही अधिकारवाणीने सांगू शकतात, त्यातल्या घटकांना घराकडे परतायची ओढ वाटते वगैरे विचार कसे मस्त वाटतात नाही!!! तूला समजत नाहीये ना मम्मा काय बडबडतेय ते…. समजेल तूला मला खात्री आहे, कारण हे पत्र आत्ता लगेच कुठे देणार आहे मी तुझ्या हातात….

तर परवा काय झालं घर आवरत असताना काहितरी कचरा फेकायला म्हणून मी डस्टबीनकडे गेले आणि अचानक माझी नजर बाजूच्या कोपऱ्यात गॅस सिलेंडरच्या मागच्या बाजूला गेली…. तिथे एका तुटलेल्या टॉर्चचे तुकडे पडलेले , ठेवलेले किंवा लपवलेले होते…. ’हा टॉर्च कधी तुटला ?? ” हा प्रश्न पडला मग….. बरं हा तुझा अत्यंत आवडता टॉर्च, मग हा तुटलाय याबद्दल कुठे वाच्यता होऊ नये ….

खरं सांगते बच्चा ते तुकडे पाहिले नी आधि रागावले मी…. तो टॉर्च तूटला हा त्रागा कमी होता बहूतेक त्या रागात, पण तू मला सांगितलं नाहीस हा होता….. तू मला फसवलंस किंवा तू माझ्याशी खोटं बोललास ह्या विचाराने जास्त त्रास होत होता मला….. ते सगळे तुकडे गोळा केले नी व्यवस्थित ठेवले रे मी पण विचार येतच होते बघ मनात… हे सगळं कधी नी कसं झालं की होतय??? मला पत्ता लागू नये साधा….. माझं मुलं माझ्यापासून काहितरी लपवतय.. नव्हे त्याला माझ्यापासून काहीतरी लपवावसं ’वाटतय’ ही गोष्ट विचारात घ्यायला हवी ……

शांत बसले रे बाळा मी …. मग विचार आला की तुला जर खरच माझ्यापासून ही गोष्ट लपवायची असती तर ते तुकडे सिलेंडरच्या मागे जाण्याऐवजी सरळ त्या डस्टबीनमधेच नसते का गेले…. तू ते तसे टाकले नाहीस याचा अर्थ तूला ती बाब माझ्या निदर्शनास आणायची तर आहे पण बहूधा हिंमत होत नाहीये तुझी!!! होतं बाळा असं…. माझंही व्हायचं, आई रागावेल का ही भिती आणि आपलं तर चुकलय काहितरी ही जाणीव कधी आपल्याला खोटं बोलायला लावते वा लावू शकते….. आता पुढचा मुद्दा रे की तूला माझी ’भिती’ वाटतेय….. वाटायला हवी का???? थोडीशी हवी ना… की नको…. विश्वास वाटायला हवा!! ’आदर’ वगैरे शब्द मी आणत नाहीये मधे बाळा….. हो पण ’विश्वास’ या मुद्द्याबाबत विचार हवाच…. की माझ्याकडून काही चूक झाली तर मला माझे पालक समजून घेतील…… ज्याअर्थी ते तुकडे घरात आहेत त्याअर्थी तो ’विश्वास’ आपलं अस्तित्व राखून असावा ना…..

तू शाळेतून आलास….. रोजच्या दिवसासारखाच हा ही एक दिवस गेला…. तुम्ही खेळायला जाऊन आलात….. आल्या आल्या दोघं बहिण भाऊ बडबडत होता एकीकडे नी मी मनात भुमिका बांधत होते….. मग मी तूला विचारलं ,” पिल्लू तुझा टॉर्च कुठेय रे, मला दे ना जरा…. ”

तू गांगरलास, म्हणालास , ” का हवाय तूला ?? ”

“अरे बेडखाली ना काहितरी पडलेय ते दिसत नाहीये, तुझा टॉर्च भारी आहे म्हणतोस ना तू मग म्हटलं तो बघूया येतो का उपयोगात आज … 🙂 ”

तू आलास नी मला घट्ट मिठी मारलीस, म्हणालास ,” मम्मा तूला न मला काहितरी सांगायचं आहे…. तो टॉर्च तुटलाय…. पण गॉड प्रॉमिस मी नाही तोडला… मी त्यादिवशी खेळायला जाताना तो सोबत नेला होता न तेव्हा माझ्या मित्राने तो पाडला…. मी तूला तेव्हाच सांगणार होतो पण वाटलं तू रागावशील…. सॉरी मम्मा!!!! थांब मी तूला दाखवतो कुठे ठेवलेत मी पार्ट्स…. ”

……..

ते पार्ट्स मी ठेवलेत उचलून ,मी तूला सांगितलं …..

तसं तुझ्या डॊळ्यात पाणी आलं , तू म्हणालास ,” तुझं ऐकलं नाही ना मी, तू नेहेमी सांगतेस आवडत्या वस्तू, नाजूक वस्तू जपुन वापरा पण मी हट्ट केला आणि मला पनिशमेंट मिळाली… सॉरी मम्मा खरच सॉरी, टॉर्चसाठीपण आणि तूला सांगितलं नाही म्हणून पण!! ” … तुझे वहाणारे टपोरे डोळे खरं बोलत होते बाळा दिसत होतं मला, माझ्या पाणावलेल्या डोळ्यांअडूनही….

विषय खरं तर संपला नाही का हा तिथे…. मी तूला समजवलं मग काहिबाही , मुख्य म्हणजे तुझा हात घट्ट धरून ठेवून तुला सांगितलं की आई रागावली तरी जवळही ती घेणार असते वगैरे….

रात्री झोपताना तू म्हणालास मम्मा आता टॉर्च तर गेलाच पण माझा…. आता मात्र हसले मी, म्हटलं लबाडा नाही घेणार मी नवा टॉर्च तूला आता, ती गुरुदक्षिणा दिलीये आपण देवाला एक नवा ’धडा’ शिकवल्याची!!! 🙂

मनात मात्र विचार आला बाळा की आज मला वेळ होता सारासार विचार करायला… एक वस्तू तुटली , तसेच काहि पुढेही होणारच की… माझ्या मनात पहिला विचार तूला रागवायचाच आला होता की…. मग आयुष्य दरवेळेस मला विचाराची संधी देणार असा तर काही नियम नाही ना…. तेव्हा हे पत्र जितके तुझ्यासाठी तितकेच माझ्यासाठी …. की आयूष्य नित्य नव्या पहेल्या घालणार आहे तेव्हा सोपे पर्याय उपलब्ध असताना उगा त्रागा त्रागा करून आपण ’गुंता’ वाढवायचा नाही….. लगेच बोलले पाहिजे, रागावले पाहिजे असा काही नियम नाहीये….. छोट्या प्रसंगांना उगा मोठं करायचं नसतं लक्षात ठेवायचं आता …..

कभी तो हसाए… कभी ये रुलाए … असं असेल आयुष्याचं रूप तरच खरी खुरी गंमत आहे होय किनई….. पण मग सपनोंका माझा हा छोटासा राही….. एक दिवस जेव्हा खरच ’सपनोंके आगे’ जाईल तेव्हा त्या रस्त्यावर त्याला आईने आपल्या ’विश्वासाची शिदोरी’ द्यायला हवीये, नाही का…. 🙂 …. गोष्टीतली आई देते ना तशीच… जगातही अनेक राक्षस असतात लपलेले, आपल्याला लढायचं असतं तेव्हा निदान घरात तरी लुटूपूटूच्याच लढाया असाव्या हे आईला पण हळूहळू समजतय रे बाळा… जसा तू मुलगा म्हणून साडेआठ वर्षाचा आहेस नं तसं आईचंही आई म्हणूनच वय तितकचं रे!!! पण आता एक ठरवूया आपण दोघेही एकत्र मोठे होऊया… मस्त फ्रेंडशीप करूया 🙂 … शक्य तितकं पारदर्शक नातं असावं हे मला समजलेय , तूलाही समजेल…. अजून एक मैत्रीण येइपर्यंत तुझी मैत्रीण व्हायला हवेय मला….. 🙂

हो ना जमेल ना… की तुझ्या भाषेत विचारू ’What say ?? 🙂 ”

तुझीच…

मम्मा .

ता.क. हे खरं तर मी माझ्या लेकाला लिहीलेले एक साधे पत्र….आयूष्य नित्य नवे कोडे घालत असते माणसाला, आपण आपापल्या परीने उत्तरं ्शोधत असतो….. त्याच्या काही नोंदी झाल्याच पाहिजेत असे मला नेहेमी वाटते!! पत्र लिहायला कधीही मागे फिरू नये…. अगदी घरातल्या घरातही बोटभर चिठ्ठी जर आपल्या नावाने कोणी ठेवली तर आनंदच होती की!!! तसेच हे ही एक पत्र….

ब्लॉगविश्वाने काय दिले, याचे उत्तर मी नेहेमी मैत्रीवरचा विश्वास वाढवणारी मित्रमंडळी असे देते. त्यानूसार माझ्या मनातली ही आंदोलन मी विद्याधर आणि हेरंब कडे व्यक्त केले…. हे पत्र पोस्ट म्हणून ब्लॉगवर मी नसतेही टाकले, कारण ’काय ही बाई सतत मुलांबद्दल बोलत असते’ असे काहीसे वाचणाऱ्याच्या मनात येइल वगैरे काही माझ्या मनात आले… पण मग सत्यवानांनी निवाडा केला की आत्ताच्या आत्ता लिहीलेले पत्र पोस्ट कर…. आता न्यायाधिशांच्या आज्ञेबाहेर कोण न कशाला जाईल!! 🙂 ….

52 thoughts on “जिंदगीची पहेली…..

 1. काय प्रतिक्रिया देऊ कळत नाहीये..

  अप्रतिम !! बेस्ट पत्र आहे हे. खूप ताकदवान लिखाण आहे हे.. बिलीव्ह मी ! एकेका वाक्यात (माझ्यासारख्या) होतकरू, शिकाऊ पालकांसाठी मोठमोठे धडे आहेत !!

  >> सगळ्या दुर्गूणांबाबत तर अगदी ’सख्खा’ आणि खरं सांगू माझा ’सखा’ही

  हे सगळ्यात बेस्ट !!

  जिओ तन्वे……….!!

  • हेरंबा अरे होतकरू , शिकाऊ 🙂 …. अरे मीच शिकतेय हळूहळू …. कालचे उपाय आज चालत नाहीत या मुद्द्यावर खर तर आणि एक पोस्ट होऊ शकतेय…..

   तरिही ही पोस्ट किंवा हे पत्र पोस्ट म्हणून टाकलेय तेच तुझ्या म्हणण्यावर , तेव्हा आभार रे!!!

 2. आई एकाच वेळी अतिशय ताकदवान अन मृदु दोन्ही कसे असु शकते हे कदाचित देवाला पण त्याच्या आईबद्दल पडलेलं कोडं असेल ताई….. हे प्रोफ़ेशल सिक्रेट आहे “आईलोकांच”… :)….. तुमच्या लेखाबद्दल काय बोलु अजुन!!!! नेहमी प्रमाणे आमच्या कॉमेंट मधे एक तर असणारच “वाचुन आई आठवली!!!!!”….. झोपली असेल आत्ता….. तुमचे अन पिल्लु चे जे जग आहे न ते खरेच तुम्ही ब्लॉग वर जपुन ठेवताय वाचुन मस्त वाटते. वेटींग फ़ॉर मोर…..

  • गुरूनाथ अरे मी पण शिकतेय ते ’प्रोफेशनल सिक्रेट’ हळूहळु… त्यातला काही भाग ईन बिल्ट असतो आणि काही शिकावा लागतो… कारण सिलॅबस दर पिढीनूसार बदलतोय 🙂

   आभार रे!!!

   पोस्ट वाचून आई आठवली हे जेव्हा जेव्हा म्हणतोस ना तेव्हा माझी पाठ मीच थोपटून घेते 🙂

 3. अजुन एक, बाबा पासुन लपवणे, पिल्लु च्या जनरेशन मधे ” ए बाबा” आपल्या जनरेशन मधे “अहो बाबा” आधीच्या जनरेशन मधे “अण्णा, आप्पा, दादा, नाना”…… पण आईसोबतचा बॉंड पोरांचा कायम असतो वेगळाच. मी तर बदमाशच इतका होतो की आदरयुक्त भितीने सुद्धा बाबांसमोर उभा राहणे ही मुष्किल असायचे मला. आई च्या गळ्यात पदराला लटकले की आम्ही एकरुप व्हायचो किंवा होतो अजुनही!!!!!…. माझे अवलोकन आहे मुले आईवेडी जास्त असतात अन मुली बाबा बाबा करतात जास्त… का काय माहीत, अगदी असेच आहे असे नाही व्यक्तिपरत्वे बदलु पण शकते, पण जनरलायझेशन आहे हे एक आपले उगाच…….

  • >>>>माझे अवलोकन आहे मुले आईवेडी जास्त असतात अन मुली बाबा बाबा करतात जास्त… का काय माहीत, अगदी असेच आहे असे नाही व्यक्तिपरत्वे बदलु पण शकते, पण जनरलायझेशन आहे हे एक आपले उगाच ….

   अगदी बरोबर…. माझ्या लहानपणी किंवा अजूनही बरेचदा मी बाबांशी जास्त गप्पा मारते … 🙂

 4. सुंदर तन्वे….
  शक्य तितकं पारदर्शक नातं असावं हे मला समजलेय , तूलाही समजेल…. अजून एक मैत्रीण येइपर्यंत तुझी मैत्रीण व्हायला हवेय मला….. 🙂 हे अगदी बरोबर बोललीस बघ..पटलं…:)
  काल मी तुला म्हटले नं पिल्लु मुंबई ला गेल्यापासुन मन रमत नाही…ज्याम मिसतेय मी त्याला…आमच तर अस नातं आहे..तुझं माझं पटेना तुझ्या वाचुन करमेना !!!:P पक्की खडुस मैत्रिण आहे मी त्याची…:P

  • 🙂 …. आभार राणी ….. अगं तुमच्या अनूभवातूनही तर अजून शहाणी होतेय मी… तू आणि श्रीताई जोवर सोबत आहात तोवर हम नही डरते, कारण जरा कुठे खूट झालं की लगेच तूम्हाला सल्ला मागायला गाठता येतं मला 🙂

 5. तन्वीताई……….
  निव्वळ अप्रतिम…..पार मनात जाऊन रूतल एकदम कारण लहानपणच आठवत नाही पण आज माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे.
  ही पोस्ट जास्तीतजास्त लोकांनी वाचावी म्हणजे त्यांच्यातली नाती सुधारतील.

  • आभार रे रोहित …..:)

   आई आपली बेस्ट फ्रेंड असतेच नाही … मी माझ्या मुलांना मोठ करताना मला माझी आई जास्त समजतेय खरं तर…. ती कधी रागावली की तेव्हा आलेला राग आता विनाकारण नाही वाटत!!!

 6. ताई ,
  एकदम नितळ , पारदर्शक …..

  (ताई , खर म्हणजे तुझ्या प्रत्येक पोस्ट ला कमेंट काय द्यावी हाच नेहमी प्रश्न असतो …. कारण या सगळ्या पोस्ट आम्हाला खूप काही शिकवून आणि मार्गदर्शन करून जातात.
  अगदी म्हणजे तू आमच्यासाठी रस्ता बनवत चाललीयेस आणि आम्ह्नी तुज्यामागून यायचं आहे फक्त 🙂 )

  • सचिन आभार रे 🙂

   अरे मार्गदर्शन करणारा शहाणा लागतो…. इथे मीच गोंधळ घालत असते , बरं गोंधळ घालते तर घालते ते लगेच ब्लॉगवर टाकते 🙂 … तरिही आभार रे!!!

 7. तन्वी, तुझ्या या लेखावर काय प्रतिक्रिया देऊ तेच कळत नाही. श्रेयस आता १३ वर्षाचा असल्याने या नात्यापलिकडे जाऊन थोडा आक्रमक झालाय. आईचा आणि बाबांचा नेमका फायदा केव्हा करून घ्यायचा या वयातला. सध्या तो त्याच्या चुलत भावाकडे रहायला गेलाय…चारच दिवस झाले…पहिल्यांदाच अश्या घरातल्या कोणालातरी सोडून तो असा रहायला गेलाय त्यामुळे थोडी काळजी वाटतेय. आठवण तर येतेच आहे. तो नाही म्हणून त्याच्या आवडीचे पदार्थ सध्या घरात बंद. पण एरवी त्याच्या पसार्‍यावर रागावणारी….त्याच्या आळशीपणावर त्याला ओरडणारी.. आता ९वी-१० वीची महत्वाची वर्षे आहेत तेव्हा सारखा अभ्यास कर म्हणून कटकट करणारी ;-( अशी आई त्याला आठवत असेल की आईचं काही वेगळं रूप त्याला आठवत असेल…. की आठवतही नसेल… ;-( कोण जाणे.
  तू म्हणतेस तसं माझं आणि त्याचंही खास असं गुपित असंतच……बर्‍याचश्या इतरांशी बोलू न शकणार्‍या अनेक गोष्टींचा तो माझा हक्काचा श्रोता आहे.क्वचित सल्लागारही.आपल्याला वाटतं त्यातलं मुलांना काय कळतयं पण अनेकदा मला पडलेले प्रश्न त्याने त्याच्या विचारांनी सोडवूनसुद्धा दिले आहेत. मी ही ठरवलं होतं की… त्याच्या-माझ्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टींचं विवेचन पत्रांनी करायचं…..पण राहूनच गेलं ;-( . तो मात्र त्याला हवी असलेली गोष्ट मागण्याकरता पत्राद्वारे मला इमोशनल ब्लॅकमेल मस्तपैकी करतो. त्याला माहित आहे. कदाचित एखादी गोष्ट तोंडी मागितली तर मिळायचे चान्सेस कमी. शिवाय बाबापर्यंत जाईल. पत्राने मखलाशी करता येते आणिमुख्य म्हणजे आई ते वाचून विरघळते. 😉
  लेखातलं “आईचंही आई म्हणूनच वय तितकचं रे!!! ” वाक्य सहीच गं !

  • श्रेया ताई आभार गं ….. 🙂

   अगं हो गं मुलांच वय वाढतय तश्या पहेलीच्या प्रश्नपत्रिकेतही बदल होणार आहेत…. तुम्ही जात्यात तर आम्ही सुपात आहोत ……

   >>>पत्राने मखलाशी करता येते आणिमुख्य म्हणजे आई ते वाचून विरघळते. 😉

   हे अगदी खरं!!!! 🙂

 8. तन्वी कसलं जीवघेणं लिहितेस गं….. !! अगदी प्रत्येक आईच्या मनातलं, प्रत्येक मुलाच्या मनातलं……..सगळं अगदी तस्संच उतरवतेस तुझ्या लिखाणातून……!! ह्या छोट्या छोट्या गोष्टी जपून ठेवतेस….खूप खूप कौतुक वाटतं तुझं !! अशीच लिहिती रहा गं……. !! डोळे झरतांना सगळं धूसर होतं ना गं…. पुढे कसं लिहू……

 9. हेरंब +२
  अधिक २ ह्या साठी कि त्यांच्या मुळे आज हे वाचायला मिळतंय! आणि त्याने जे मत मांडलाय त्याशी पूर्ण सहमत (+ रजनीकांत लिहायचा मोह टाळतोय!)
  मला तर लेख (पत्र) खूप खूप आवडलं … एकदम भावस्पर्शी! अजून काय लिहू! वरच्या भाष्य साम्राज्यापुढे माझे ईवलेशे शब्द अजून खुजे वाटतात 🙂
  हे वाक्य एकदम भारी (innovative) …
  “ती गुरुदक्षिणा दिलीये आपण देवाला एक नवा ’धडा’ शिकवल्याची!!” 🙂

 10. ताई,
  हल्ली इतकं हळवं लिहू लागलीयस… भारताकडे जायचे दिवस आले की तुझं सुरू होतं बघ.. 🙂
  डोळ्यांत पाणी आणतेस आणि मुखातले शब्द मात्र हरवून जातात!

  • 🙂 … बाबा …. होय रे नेहेमीचं झालय नाही का हे…. मला पण हल्ली वाटत्य खूप स्मायली असलेली एक पोस्ट ’हलकीफुलकी’ यायला हवीये आता…. 🙂

 11. sundar. malahee asha psuedo-lapavalelya eka goshTeechee aThavaN zalee, ek favorite swaeater maitrineela paraspar na vicharata dila aNee to tichyakadun usawala , agadee punha ghalta yeNar nahee itaka. mee tenva asach to aaichya najarela padel asa tichya room madhye thevun dila hota. kitee taree divas vaat pahat hote, atta ragavel, mug ragavel, shevatee ghabarat vishay kaDhala- tee fakta “ho pahila” mhaNAlee aNee je kahee “hushsha” vaTala, at the same time dho dho radayala suruvat.
  chanach lihilayas patra.. Ishan will cherish this. aNee tuzya mulanchyabaddlachya likhanachee tar mee vaaT pahat asate, koN mhaNel kitee lmulanbaddalach bolte, ihite, mala tar kameech vaTata. kitee vachala taree.

  • 🙂 ….आपण आई झाल्यावर समजतं ना की कधी कधी मुलांना अपेक्षित प्रतिक्रीया न दिल्यानेही प्रश्न सुटतात …. तुझ्या आईने केले तसेच अगदी 🙂

   आभार गं!!!!

  • 🙂 …. महेंद्रजी खरं तर श्रेय जातं हेरंबाला… मी आपलं त्याच्याशी बोलताना सहज बोलले होते की मुलांना आपली खूप गरज असते….. त्याच विचारात ईशानूला हे पत्र लिहीलं…. मग ते हेरंबला आणि विद्याधरला वाचायला पाठवलं सहज अगदी…. पण हेरंबचा हुकूम आला की लगेच पोस्ट कर…..

   प्रतिक्रीयेसाठी आभार मनापासून तुमचे!!!

 12. तायडे….
  …..
  …..
  लयी लयी आभार गं तुझे….!
  मनात खोलवर असलेल्या भावना कागदावर उतरवण्याची तुझी कला खरोखरंच अति उच्च पातळीची आहे!

  इशान बद्दल काय लिहू? पोराचं कौतुक त्याची आईच करू शकते… पण एक मुलगा म्हणून एव्हढं नक्कीच सांगू शकतो कि नशीब लागतं अशी आई मिळायला, जी त्याची मैत्रीण म्हणून त्याची साथ देणार असते…
  खरंच हे पत्र त्याला आता देऊ नकोस… एक दहा-बारा वर्षानंतर त्याच्या आयुष्यात तुझं …नव्हे … ह्या तुझ्यातल्या मैत्रिणीचं महत्व आतोनात राहणार आहे… तेव्हा दे…तुझ्या सारख्याच एका आईचा मुलगा म्हणून सांगतोय…

  आयुष्यात पुढे लागणाऱ्या सर्व सामग्रीची शिदोरी तू देशीलच त्याला आणि ती शिदोरी घेऊन तो त्याच्या मार्गावर निघून जाईल एक दिवस… त्याला सोबतचे मुलं म्हणतील कि “अरे यार हा पक्का ममाज बॉय आहे यार…सगळ्याच गोष्टी सांगतो आईला ह्याच्या…लहानच आहे अजून…” ….. कदाचित त्यालाही वाटेल क्षणापुरतं कि खरंच लहान आहोत कि काय आपण… पण तरीही तो बोलत राहील तुझ्याशी… सांगत राहील सगळं काही… सल्ले घेत राहील तुझ्याकडून … त्याची मैत्रीण राहशील तू नेहमीच… तुझी जागा घेणारी कोणी येईल तोवर…

  ती आल्यावर त्याचा तुझ्याशी संवाद कमी होईल कदाचित… पण त्यालाही वाटत राहील काही तरी चुकल्यासारखं…. जेव्हा समजेल तेव्हा त्याच्या डोक्यात नवीन मैत्रीण सोडून परत जुण्या मैत्रिणीकडे यायची पण इच्छा होईल क्षणभर … पण त्यावेळी तुझ्या आणि त्याच्या नात्यावरचा विश्वास धृढ झालेला असेल आणि त्याला माहित राहील कि माझी जुनी मैत्रीण समजून घेईल मला, जशी ती नेहमीच समजत आली आहे…

  तिथून मात्र त्याची पुढची वाटचाल तू दिलेल्या शिदोरीच्याच आधारे सुरु होईल बघ…. आजवर तुझ्या प्रेमाच्या वृक्ष्याच्या दाट छायेखाली वाढलेला तो जगाच्या जंगलातल्या रात्रीच्या अंधाराला देखील सावलीच समजेल सुरुवातीला …आयुष्याच्या धावपळीत तो कधी कुठे कमी पडेल, त्याला तुझी गरज भासेल, तुझ्यातल्या मैत्रिणीची, तिच्या सल्ल्याची गरज भासेल…कधी त्याला आठवेल कि तू ती गोष्ट त्याला शिदोरीत दिली आहेस, तो करेल तिचा वापर, पण कधी कधी तो विसरून जाईल… आणि … आणि कदाचित आयुष्याच्या परीक्षेत तो चुकेल कधीतरी, फेल होईल अगदी! …परत एक टॉर्च तुटेल, ह्यावेळी कदाचित त्याच्या कडूनच, …त्याचा … नाहीतर…. दुसऱ्याचा सुद्धा… लोकं कदाचित त्याच्या चुकांबद्दल नाव-बोटं ठेवतील त्याला, कदाचित त्याची नवीन मैत्रीणही अविश्वास दाखवेल त्याच्यावर… जगाचं भीषण रूप पहिल्यांदाच अनुभवेल तो त्यावेळी… तेव्हा तो येईल तुझ्याकडे… पण ह्यावेळी त्याला तुझी भीती वाटणार नाही… यावेळी तो टॉर्चचे ते तुकडे लपविणार नाही तुझ्यापासून… तो घेऊन येईल ते सगळे तुकडे तुला दाखवायला… सांगायला कि बघ आई चुकलोय मी… तुटला परत टॉर्च माझ्या कडून… पण हरणार नाहीये मी… त्यावेळी तुझ्या मनात काय चाललं राहील ते मी नाही ओळखू शकत… कदाचित माझी आई सांगू शकेल… पण तो नक्कीच त्याच्या जुण्या मैत्रिणी बरोबर असलेलं त्याचं नात आणिक घट्ट करायला आलेला असेल… जगाने त्याच्याप्रती दाखविलेल्या अविश्वासापेक्षा तो तुझ्या विश्वासाच्या लायक आहे कि नाही हे जास्त महत्व ठेवेल त्यावेळी त्यासाठी… तो विश्वास दिसल्यावर तुझ्या कडून परत नवीन शिदोरी बांधून घेईल तो… तूच त्याची सर्वात मोठी ताकद बनशील मग… अगदी आधी सारखी तुझ्या कुशीत झोपायची इच्छा होईल त्याला… त्यावेळी तुमचं हे नातं कधीच न तुटण्याइतकं इतका पक्क होऊन जाईल बघ…

  बाकी काय सांगू…लिहित रहा तायडे…!!

 13. जबरदस्त…शब्दचं सूचत नाहीयतं. मी अगदी लहानपणापासून ‘ममाज बॉय’ आहे. आई सर्वात जवळची. हक्काची, विश्वासाची, आपण चिडू शकतो,गृहीत धरु शकतो आणि हक्क गाजवू शकतो अशी व्यक्ती.ती जवळ असली तर फारसं काही वाटत नाही. मात्र घरापासून आईपासून लांब एकटं मुंबईत राहताना तिची आठवण सतत होत असते. ही पोस्ट मी रात्री 11 वाजता वाचली. आणि लगेच लातूरला आईला फोन केला. अगदी भरभरुन बोललो. दिवसभराच्या कटकटीनंतर आता अगदी शांत, समाधानी झोप मिळेल.
  रोहित यांनी म्हंटल्याप्रमाणे ही पोस्ट जास्तीतजास्त लोकांनी वाचयला हवी.

  • >>>>ही पोस्ट मी रात्री 11 वाजता वाचली. आणि लगेच लातूरला आईला फोन केला. अगदी भरभरुन बोललो. दिवसभराच्या कटकटीनंतर आता अगदी शांत, समाधानी झोप मिळेल.

   मी म्हणेन और क्या चाहिये….. 🙂 … तुम्हा सगळ्यांच्या मनापासून आलेल्या प्रतिक्रीया वाचल्या की हल्ली मला ब्लॉग सुरू असल्याचे समाधान वाटते!!! आभार मनापासून….

 14. तन्वे…

  बुकमार्क करून ठेवतोय बर का हे पोस्ट… माझ्यासाठी भविष्यात उपयोगी होईल ना… 🙂 सहज, सुंदर, सोपे आणि अतिशय साध्या पण ओघवत्या शैलीत लिहिलेले एक सुंदर पत्र… 🙂

  आणि हो… तुझ्या त्या सख्याला सांग…. मामा येतोय भेटायला पुढच्या महिन्यात… 😀 वेळ मिळाला की पत्र टाक.

  • रोहणा 🙂 ….

   >>>माझ्यासाठी भविष्यात उपयोगी होईल ना… 🙂 …. काय रे!!!

   अरे नक्की ये पुढच्या महिन्यात, मस्त धमाल करूया…. आपले अंकाई- टंकाई लक्षात आहे नं ….:)

 15. aNakhee ek mahatvacha : itakya varshanchy motherhood nantar suddha mala he kadheehee explicitly kaLala navat kee ek aai mhaNun apala vay he mulanchya itakach ( agadee methematically equal to) asata, ek individual mhaNun 2 decades+ plus tyachyapeksha mothe asalot taree. ya na kaLaNyamuLe mee swat:la anekada bol lavun ghetalay, “mee ashee kashee kay vagale tenva” ya type cha… tee guilt hee thodee halkee kelees, ha allowance mee swat:la kadhee dilaach navata.. abhaar manapasun.

  • स्मिता 🙂 …. अगं मला वाटतं तो guilt बाळगतानाच केव्हातरी असा वेगळा विचार मनात चमकला असावा माझ्याही!!

 16. ताई, एकदम छान,आई मुलाबद्दल किती आग्रही असते.हे छान शब्दात तुम्ही वर्णन केलेले आहे .लेख खूप आवडला .

  • प्रशांत मनापासून आभार 🙂

   खूप उशिराने देतेय उत्तर…. बरेचदा एखादं कमेंट उत्तर न देताच सुटून जातं, आणि नव्या पोस्टमधे मी अडकते… तसेच झालेय … सॉरी!!!

 17. तन्वी,
  दोघांमध्ले नाते अगदी सुंदर रित्या उलगडून दाखवले आहेस.हे खरे कि प्रत्येकाचा प्रत्येक अनुभव वेगळा असतो.पण तुझे अनुभव आणि विचार नक्कीच उपयोगी आहेत.they are a kind of guideline for the would be mothers. i suggest you continue writing and then compile the thoughts in a book. it would make a wonderful reading. will give an insight in the mother-child relationship.

  • अरूणाताई मन:पुर्वक आभार 🙂

   तुमच्या कल्पनेबद्दल नक्की विचार करेन मी!!

 18. तन्वीताई
  अप्रतिम सुंदर ….
  भावनांना शब्दबद्ध अतिशय समर्पक रित्या केले आहेस…
  वैभव टेकाम +100000000000000000000

 19. Hi!
  Earlier I had posted my comment on different post of yours. And you replied saying do visit again……. The good part is I did. And I came across this post of yours. Dont know whether I should comment or not. Why? You will understand when you read my experience.

  The post that you mentioned here is about a son (who for the first times “hides” something from his mum) and a mum. Well I’ll tell you something about myself or rather me n my mother.

  I have been a notorious kid whole my life ( and trust me I am still notorious). Lying has been an integral part of my childhood. (Dont ask why?) That’s how it has been with me. Maybe I failed to understand my mother’s nature. (I wont say my mother failed to understand me, though she claims so) This doesnt mean me and my mother are at loggerheads with each other.

  The point that I wish to address here is when as mother’s you try to be friends of your children what happens is a sense of invasion of privacy is felt by every child irrespective of caste creed and religion. If you are able to curb that sense. Half your battle is won. Another important factor is the behavioral pattern of your child. You need to study that strictly everyday. A slight deviation in the daily thing should trigger the alarms of caution in your mind. Also, when it means being friends with your child, i’ll tell you one more thing about me and my dad. I am super close with my dad. But he doesnt know things about me that my mother knows. Trust me till date he hasnt yet been able to make me understand that its important to get up early in the morning. And we end up having a heated discussion.

  What I wanted to highlight here is friendship with children or cosy atmosphere is very important. (tya shivay gharala gharpan yet nahi). But you will have to make your child understand the value of your friendship before he befriends others in outside world.

  Thanks & Regards
  Aashish Junghare

  PS: I value my parents. But upbringing of children has been topic of interest for me. If you wish to delete the comment you are very much welcome. Because you are a mum right now. And I am yet to be father. So the Age Gap is in picture here. Besides I have tried to give examples of my parents and me without divulging things. Reason 1) Trust me I dont want any child to be like me. 2) Every parent tries to have the best for their child, but we as children fail to grab n grasp things due to teenage and lack of exposure (This is another blooper ok, kids claim they know things or crave for exposure but its best left to time, even parents should not decide for the correct time of exposure). So the thing is there (children’s )Emotional Quotient should be in constant check.

  I might end up writing an essay over here. Right now I best feel I should say Good Bye. And hope you will say Do Visit Again.

  • आशिष मला तशी पुर्ण कल्पना नाहीये तुझ्या वयाबाबत…. तरिही एक सांगेन वयाच्या एका टप्प्यावर असे विचार सगळ्यांच्याच मनात येऊ शकतात….. आणि ते येतात तसे जातातही….. मग जाणवतं आई आपल्याला पुर्ण समजून घेत होती आणि आपण आईला समजू शकत नव्हतो!!!

   आयूष्य अत्यंत गमतीशीर असतं नाही का!!!

   तुझी कमेंट निश्चितच मनापासून आलीये… आणि हो मी नक्की म्हणेन Do visit again………

  • अनिता अगं ह्या पोस्टनंतर माझे माहेरी जाणे झाले आणि मग गडबडीत बऱ्याच कमेंट्सना उत्तर देण्याचे राहिले….

   वाचते गं तुझा ब्लॉग नक्की!!!

 20. खूप खूप मस्त आहे पत्र. खूप आवडले.
  आणि नवीन मैत्रीण मिळे पर्यंत का बर…? For ever मैत्रीण हो, ताई त्याची.
  खरे तर नवीन मित्र/मैत्रीण मिळायच्या वयातच जास्त गरज असते आई नावाच्या मैत्रिणीची. आणि ह्या मैत्रिणीची जागा कधीही कोणीही नाही घेऊ शकत. हो न…? 🙂

  • >>>खरे तर नवीन मित्र/मैत्रीण मिळायच्या वयातच जास्त गरज असते आई नावाच्या मैत्रिणीची. आणि ह्या मैत्रिणीची जागा कधीही कोणीही नाही घेऊ शकत. हो न…? 🙂

   अगदी बरोबर मॅडम 🙂

   आभार गं!!!

 21. तन्वी ताई ,खरच अप्रतिम पोस्ट आहे …. हळव करून जाते ,अनेक आठवणी मनात आणते आणि
  हेरंब सांगतो त्याप्रमाणे एका एका वाक्यात होतकरू, शिकाऊ पालकांसाठी मोठमोठे धडेही आहेत हयात ……. असाच सुंदर लिहीत रहा … इशान ला तुझा आणि तुला इशानचा नेहमीच अभिमान वाटणार ,खात्रीने सांगतो ….

  • देवा ,

   >>>इशान ला तुझा आणि तुला इशानचा नेहमीच अभिमान वाटणार ,खात्रीने सांगतो ….

   यासाठी स्पेशल आभार 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s