उजळणी…..

पावसानंतर चिरंजीवांच्या फोटोग्राफीला उधाण आलेले….. म्हणे देवमामाला एक फोटो पाठवायचा आहे…. ‘दवबिंदू’ म्हणजे dew drops तर आता शक्य नाही पण तसेच दिसणारे rain drops पाठवतो त्याला….. ‘हो’ म्हणण्याला पर्याय नसतो अश्यावेळी कारण निदान त्यानिमित्ताने का होईना मुलं निसर्गाच्या जवळ जाऊ पहाताहेत 🙂

आज ईशानने चांदणीच्या फूलाचा एक फोटो काढून आणला…. म्हटलं तर त्या फोटोत विशेष असे काही नव्हते…. एक साधेसे पांढरे फूल, त्यावर पावसाचे थेंब ……

“छान आहे हं फोटो …. ” मी म्हणाले….

“मम्मा एक गंमत दाखवू ….. हा फोटो झूम केला ना की त्या फोटोच्या मधे लाईट लागल्यासारखा दिसतो बघ…..” …..

फोटो नीट पाहिला तर पिल्लू म्हणत होते ते खरं होतं …..

फूलाच्या मध्यभागी खरचं सुंदर प्रकाश दिसत होता……

__”मम्मा देवाने दिला असेल का गं फूलात प्रकाश…..”

__ “हो रे बाळा , देवबाप्पा देतो असा प्रकाश….. सगळ्यांमधेच असतो असा प्रकाश ….. एक दिवसात कोमेजणारे फूल देखील अंतर्यामी असा प्रकाश बाळगून असते तर आपल्यात किती शक्ती असेल…. वेळीच ती ओळखायला हवी ….. देवाने किती विलक्षण बनवलेय आपल्याला…… बाहेरच्या अंधाराला घाबरणारे आपण स्वत:चे स्वयंप्रकाशित असणे विसरतो…..दिखाव्याच्या झगमगाटाची आपल्याला अजिबात गरज नाहीये बाळा…. किती कार्य होऊ शकते आपल्याकडून…. स्वत:ला , स्वत:तल्या शक्तीला विसरायला नको बाळा….”

किती बडबडले मी…. ईशानने ऐकले सगळे… किती समजले त्याला देव जाणे … माझी मात्र उजळणी झाली…

मुलं मोठी होता होता आपल्याला शिकवतातही आणि प्रसंगी उजळणीही करून देतात….

किती चटकन हार मानतो आपण… निराश होतो, परिस्थितीला शरण जातो….. आज मात्र ‘चांदणीच्या’ एका लहानश्या फूलाने आणि माझ्या मुलाने मला स्वत:ची, आणि स्वत:च्या सामर्थ्याची पुन्हा ओळख करून दिली…..

Thank you बाळा!!!

Advertisements