Again सहजच …. :)

हलकंफूलकं लिहायचं ठरवलं पण विषय सुचेना ….. खूप विचार केला मग भुक लागली…. बरं अति विचाराने शिणायला झालेले आधिच ( ;) ) मग म्हटलं आज काहितरी हलकंफूलकं बनवायला हवय!!

तयारी करताना विचार आला की हाच तर आहे ’पोस्टचा विषय’ :)

थोडक्यात काय… आज विशेष काही नाहिये…. ’बिशी बेळी अन्ना’ नामक माझा आवडता पदार्थ आणि त्याची पाकृ इतकेच :) (खाली लिहीलेल्या भारूडात पाकृ आहे असं माझं ’म्हणणं’ आहे ;) )

आता कर्नाटक स्पेशल वगैरे उदात्त विचाराने प्रवृत्त होऊन हा पदार्थ झालेला नाही तर सकाळी कुकर लावल्यानंतर मुलांनी जेवताना मात्र  ’तुप मीठ भात’ खाऊन वरण उरवले…. मग काय आळस + भूक + उरलेले वरण + न्युट्रिशनचा विचार (हो मग , मी जागरूक आई आहे :) ) हे सगळे रसायन जमत पदार्थ ठरला ’बिशी बेळी अन्ना’ :) …. महत्त्वाचे काय माहितीये का, सकाळचे उरलेले खपवायला जावे तर केलेला पदार्थ उरायला नको नं…. नाहितर दु्सऱ्या दिवशी शिळासप्तमी यायची!!!

   साहित्य : शिजवलेली तुरीची डाळ, तांदूळ साधारण डाळीच्या दुप्पट (माझ्याकडे सगळं माप हे अंदाजपंचे या परिमाणात असते तेव्हा हा पदार्थ करायचा ठरवलाच तर स्वयंपाकाचा किमान अनूभव असलेल्यांनीच करा ही टिप ;) ) , फोडणीचं साहित्य, कडिपत्ता, सांबार मसाला (घरी केलेला किंवा विकतचा) , भाज्या (फोटू नं.१ ), दाणे, मीठ, चिंचेचा कोळ

तांदूळ भिजवून ठेवणे आणि त्यावेळात बाकि फोडणीची तयारी …..मग नेहेमीचीच हिंगाची फोडणी ……. (फोटू नं २)

फोडणी झाली की भाज्या परतणे !!!

यात भिजवलेले तांदूळ टाकून परतून घेणे……

तांदूळ परतल्यानंतर त्यात हळद, तिखट, मीठ, सांबार मसाला (समदं अंदाजाने बरंका मंडळी ) टाकून पुन्हा हलकं परतून घेणे….. मग त्यात पाणी टाकून मिश्रण शिजायला ठेवणे :)

हे साधारण असे दृष्य दिसेल :)

उकळी आल्यानंतर शिजवलेली तुरीची डाळ (ही माझ्याकडे होती म्हणून नाहीतर तांदूळ भिजवताना डाळही भिजवून घेता येते!! ) यात टाकून , साधारण मध्यम आचेवर आता हे सगळे घटक एकत्र शिजू द्यावेत!!!

जरा बऱ्यापैकी शिजत आल्यावर चिंचेचा कोळ घालून पुन्हा भात शिजत ठेवावा!!

जवळपास शिजत आलेला भात हा असा दिसेल !!!

आता काय आच आणि मंद करून भाताला अजून थोडे शिजू द्यावे…..

आपण मऊ खिचडी करतो तसा हा साधारण मऊसर शिजला की झाला…. थोडा सरसरीत असा  हा भात गरम गरम खायचा असतो त्यामूळे मंडळी लगेच ताव मारायला तयार व्हायला हरकत नाही!! :)

बिशी- बेळी- अन्ना आणि पापड तयार!!!! :) :) :)

तळटिपा :

फोटो अजून चांगले काढले जाऊ शकले असते , मान्य आहे!!!

पण खादाड (स्वत:ला खादाड म्हणवत नसेल तर इथे ’खवय्ये’ हा सौम्य शब्द वापरला जाऊ शकतो… मी मात्र आनंदाने खादाड आहे तेव्हा….. ) व्यक्तीला समोर असा (स्वत:च केलेला :) ) आवडता पदार्थ असताना ’गार्निशिंग ’ नाही सुचत!!!

पदार्थाच्या चवीबाबत मात्र खात्रीने सांगते… जमली होती मस्त रेशिपी … वर्थ आहे!!! :)

आता सगळ्यात महत्त्वाचे हा ’श्रीताईचा’ ब्लॉग नाही त्यामूळे पाककृती ही ’चाचपडत ’ लिहीलेली आहे :)

फिर भी…. इतनाच कहेंगे …  खाते रहो!!! :)

नाळ….

संध्याकाळचे जेवण झालेले…. काहिबाही लहानमोठी कामं उरकल्यावर फिरायला जाण्याची टूम निघालेली…. निवांत संध्याकाळ …. रस्त्यातला निवडलेला शेवटचा बेल्ट… घाईच नाही त्यामूळे उगाच जोरात गाडी दामटायचीही गरज नाही…. मुलांची मस्ती मंदावलेली असली तर बडबड मंदावणे शक्यच नाही त्यामूळे त्यांची बडबड सुरू ……

नेहेमीचेच प्रसंग, रस्ते, वातावरण ….. तितक्यात जोरात आवाज करून शेजारून वेगाने एक रूग्णवाहिका गेली….. मी क्षणभर डोळे मिटले….. त्या गाडीतून जो कोणी जात असेल त्याच्या आरोग्यासाठी नकळत गाडीतल्या गणपतीच्या मुर्तीकडे नजर टाकली गेली…. माझी नजर मुर्तीकडे असली तरी नवरा माझ्याकडे पहात होता….. मी काय मागितले असावे देवाकडे याची पुर्ण कल्पना असल्यामूळे तो हसून ’आमेन’ म्हणाला  …. :)

प्रसंग संपावा न येव्हढ्यावर तोच मागून चिरंजीव बोलते झाले, “मम्मा अशी ऍंब्यूलन्स लाईट लावून फास्ट जाताना दिसते तेव्हा तू काय करतेस?” ….. “अं??? काय रे बेटा ???” प्रश्न कळलाच नाही मला आणि मी तो समजून घेते तितक्यात मागून पुढचे वाक्य आले, “ मम्मा अश्या वेळी मी काय करतो सांगू , मी देवाकडे मागतो की जो कोण आत असेल त्याला पटकन बरं वाटू दे!!!”

नवरा हसला आणि म्हणाला ’नाळ’ पक्की जोडलेली आहे या मुलाची त्याच्या आईशी…. :)  ….. खरच गंमत वाटली मलाही , मी जी काही कृती केली होती त्याचा त्यापुर्वी कधिही उल्लेख झालेला नव्हता आणि आत्ताही माझ्यात आणि नवऱ्यात शब्देविनू संवाद झाला होता, म्हणजे पिल्लू जे काही बोललं ते मनानेच बोललेलं होतं…… छोटूसाच प्रसंग पण आज माझं पिल्लू पुन्हा एकदा आवडून गेलं मला!!!

वरचा प्रसंग विसरलेही असते मी पण माहेरी आल्याच्या तिसऱ्याच दिवशी आई-बाबा एका लग्नाला जावून आले….. बाहेरून कुठूनही आले की तिथला तपशीलवार वृत्तांत देण्याची बाबांची सवय…. त्या वृत्तांताला कोपरखळ्यांची मस्त खमंग फोडणी देण्याची आणि एक उपसवय असल्याने सगळे आवडीने त्यांच्या गप्पा ऐकतात… लग्न झाल्यावर जे दिव्य फोटोसेशन चालते त्याबद्दल बाबा सांगत होते …. ज्या दोघांच लग्न होतय त्यांच्याव्यतिरिक्त बाकि किती जणांना या फोटोसेशनमधे रस असतो हा मुद्दा गौण…. त्या फोटोसेशनमधे एका वयस्कर आजी-आजोबांना स्टेजवर बोलावले गेले, ते कसेबसे आधार घेत तिथे पोहोचल्यावर त्यांना आधि वर- वधू शेजारी उभे केले गेले…. ही पोज फोटोग्राफर महाशयांना पटली नसावी मग आजी आजोबांना खुर्चीवर बसवण्यात आले….. यातही काहितरी कमतरता असावीच कारण मग आजी- आजोबा खुर्चीवर आणि वर-वधू त्यांना वाकून नमस्कार करताहेत असा सीन पटला सगळ्यांना…. सगळा जामानिमा होत आजी दमल्या असाव्या बहूतेक… तोच फोटोग्राफरचा आदेश आला , “डोक्यावर हात ठेवा!!!” … आजींनी गोंधळून चटकन स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला…. आणि मग म्हणे सगळे हसायला लागले…..

आता आशिर्वादासाठी समोर वाकलेल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवावा हे नसावे सुचले आजींना, गोंधळल्या त्या!! कशाला दमवावे म्हाताऱ्या जीवांना, लोक हसले असतीलही पण मला खटकतोय हा प्रसंग… किंबहूना वाईट वाटतय, असा विचार माझ्या मनात आला आणि आई बोलली, “ ताई अगं लोक हसले खरे पण मला वाईट वाटलं गं त्या म्हाताऱ्या जीवासाठी…. कावरीबावरी झाली गं ती बाई!!! :(

तेच शब्द , तोच विचार फक्त माझ्या मनातला आणि आईने प्रकट केलेला…. काही दिवसांपुर्वीचा माझा आणि माझ्या लेकाचा असाच प्रसंग आठवला मग मला…. माझिही ’नाळ’ पक्की जोडलेली आहे माझ्या आईशी म्हणजे!!!

एक नाळ जन्माने जोडली जाते आणि एक सहवासाने असे असावे का असाही एक प्रश्न पडला मग….. तसे नसते तर दत्तक गेलेली मुलं त्यांच्या नव्या आई वडिलांसारखी नसती वागली कदाचित….. पण मग एकाच आईची मुलं जेव्हा वेगळी वागतात तेव्हा पुन्हा नवनवे प्रश्न निर्माण होतात!!! वागणं असेल वेगळं पण विचारांचा पाया सारखा असावा का?? एक आईच्याच रस्त्याने निघालेलं मुल नी एखादं वाट बदललेलं…..

जरा सखोल विचार करावा तर वाटतं की असं असेल तर आपली जबाबदारी वाढते का?? पुढच्या पिढीचा पाया घडायला हवा…. ’नाळ’ जन्मानंतर शरिरावेगळी झाली तरी तिचं अस्तित्वं काही संपत नाही….

अवयव वेगळे होऊ शकतात पण जन्मल्या जीवाचे विचार, आचार, संस्कार हे काही  कापण्याची प्रथा नाही नं, ते शक्यही नाही  …..  मनाची मनाशी मग जोडली जाते ’नाळ’ ….. आई-वडिल, बहिण-भाऊ यांच्याशी जन्माने असावी पण चांगल्या प्रत्येक गोष्टीशी अनूभवाने ती जोडली जाते….. नाळ या शब्दातला ’ळ ’ अंतर्धान पावून त्या जागी ’तं’ येत असावा बहूधा आणि मग उरत असावं ते ’नातं’ ….. आईच्या कुशीतून ’नाळेतून ’आलेल्या विचारांना ’नात्यातल्या’ विचारांची जोड देउन पुढचं व्यक्तिमत्त्व घडतं,  नाही का!!!!!!

म्हणजे  एक ईल्लू पिल्लू सत्य असे की , “ जन्मानंतर ’नाळ’ कापली जाते खरं तर पण ती तूटत नसावी ” …. ती तशी शक्यतो तूटू देऊ नये … किनई!!!

……………………….

या पोस्टला शेवट सुचतच नव्हता, आजही सुचत नाहीये, किंबहूना या विचारांची पुढची दिशा ठरवावी इतपत त्यांना वेळ दिला गेलेलाच नाही तरिही आज हे पोस्टायचे आहे मला…. कारण माहितीये….

ब्लॉगहिट्स पहा एक लाखाला भिडताहेत…… ते भिडले की मला जाम आनंद होइल…… मग मी आईला फोन करेन तेव्हा ती म्हणेल , “ताई अगं लाखाला इतकेच कमी आहेत… आज उद्यात लाख पुर्ण होतील… माझे आणि बाबांचे लक्ष आहे हं ब्लॉगकडे….. ” …. मग ती नुकत्या प्रकाशित केलेल्या पोस्ट्सबद्दल बोलत राहील आणि मग म्हणेल , ” मनापासून अभिनंदन तुझे ताई ….. आत्ता मला काय आठवतेय माहितीये,  तुझा पहिलीचा रिझल्ट…. आठवतय तूला बाळा तूला कांजण्या आल्या होत्या, सगळे म्हणत होते वर्ष राहू देत…. पण तू दिलीस परिक्षा आणि रिझल्टच्या दिवशी तुझ्या वर्गशिक्षिकेने दुरूनच मला खुणेने तुझा ’पहिला नंबर’ आहे असे सांगितले….. बाळा तो आनंद मी कधिही विसरणार नाही!!! ” …… ती रडेल आणि मला रडवेल मग…. पुन्हा मलाच समजावेल हळवेपणा बरा नाही म्हणून…..

काय वाटतय मला भविष्य कळतं….. अजिब्बात नाही, पण माझी ’नाळ ’ जोडली गेलीये आईशी….. आणि ती तशी आहे हे माझे बळ आहे!!!

आई-बाबांसाठी मुलांनी काय करायचं असतं हे आता स्वत: आई झाल्यावर कळतय मला….. कूठलीही भेटवस्तू वगैरे जो आनंद देत नाही तो मिळतो मुलांच लहानसं का होइना यश पहाताना…. सो मातोश्री ऍन्ड बाबाश्री आणि आजीबाई पुन्हा एक संधी मिळतेय तुम्हाला हे सांगण्याची की माझे गुण तुमचे आणि जे काही न्य़ून आहे ते माझे!!! :) ….. अमित, इशानू आणि गौरा ,पियू तुम्ही मला नित्यनेमाने पोस्टला विषय पुरवताहात ;) !!! गंमत जाऊ दे, पण तुम्ही चौघं माझा पाया आहात…… मनाला येइल तसं ’मनस्वी’ मला वागू देण्यात अमित तुझ्या मनाची श्रीमंती कारण आहे :) …. (याचा अर्थ मी आता कटकट करणार नाही असा नाही हं…. हे आपलं उगाच जरा इमोशनल वगैरे ;) )

हिट्स महत्त्वाचे नाहीचेत , नसावेतच पण म्हणून ते ’लाख’ झाले याचा आनंद व्यक्त करू नये असे कुठेय ….. आणि मला खरच मनापासून आनंद झालाय , कसला सांगू, गेले अडिच वर्ष मी तग धरलाय …. ब्लॉग बंद करण्याची हुक्की माझ्या लहरी स्वभावाला अनेकदा आली तरी तो बंद केला गेला नाही याला कारण इथली मित्रमंडळी आणि व्यक्त होणारे आणि न होणारे वाचकही……

नात्यांमधे चूका मलाही सापडतात, मी स्वत:ही अनेकदा चूकते….. फक्त त्या चुकांच्या मुक्कामावर खुपसे रेंगाळणे माझ्या स्वभावात नाही… याउलट एखादा लहानसा आनंदाचा क्षण असला तरी त्याला मुठीत ठेवून त्याचा ’उत्सव’ करण्याची संधी सहसा मला चुकवायला आवडत नाही… म्हणूनच असेल की ब्लॉगवर ’मी-माझे घर’ वगैरे मुद्दे जास्त येतात…..

ब्लॉगर मित्र मैत्रीणी, वाचक मित्र-मैत्रीणी यांच्याशी जुळलेले नाते, त्यांच्या आठवणी यांच्यात मी मनापासून रमते… नाइलाज आहे माझा स्वभाव आहे तो…. स्वभावाला औषधं नसते  :) !!! म्हणून ब्लॉगचे नाव ’सहजच’ असे आहे… खूपसा विचार न करता सहज जे मनात येइल ते उतरवायची मनमोकळी जागा !!!! ’साहित्यिक मुल्य’ (  ;) ) वगैरे मुद्दे विचारात न घेता  पुन्हा पुन्हा इथे डोकावणारे , न कंटाळता मत कळवणारे आणि मनापासून वाचणारे, तरिही मत टाइप करायचा कंटाळा करणारे :) सगळ्यांचे मन:पुर्वक आभार!!!!!

आणि काय लिहिणार ……

जय ब्लॉगिंग!!!!

पसारा…..

परवा पाहूणे येणार म्हणून आधि घर आवरलं…… “सगळं जागच्या जागी ठेवा, अजिबात ” पसारा “ दिसता कामा नये!!! “चा  नारा लावत काही घरच्यांकडून आवरून घेतलं पण ’यांचा ” पसारा ” आवरणं म्हणजे फक्त तो फक्त एका जागेवरून उचलून दुसरीकडे ठेवणं’  ची तक्रार करत बरचसं स्वत:च आवरलं!!!  ……

सगळं घर मनाजोगतं जागच्या जागी (म्हणजे मुलंही निदान देखाव्यापुरते आणि दोनेक मिनिटच एका जागी बसलेले) असल्याची खात्री करत पाहूण्यांना दार उघडलं गेलं…. पाहूण्यांच स्वागत झालं, त्यांना घरं दाखवताना सवयीने डायलॉग उच्चारला गेला ,” पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा हं, घरात दोन लहान मुलं आहेत नं!!! ” …. आमची आई जेव्हा असं काही बोलायची तेव्हा किती राग यायचा, वाटायचं सगळा पसारा काय आम्हीच घातलाय??? …. ” हे घर आहे हॉटेल नाही… सतत तुझं पसारापुराण सुरू असतं….. कोणाकडून घरी आलं की हिचं सुरू होतं  ’बघा त्यांच घर कसं लख्ख आवरलेलं असतं नाहितर आपल्या घरात तुम्ही कायम पसारा घालता ’…. ” वगैरे वाक्यांकडे मी हल्ली दुर्लक्ष करायला शिकलेय….. नाही सहन होत आपल्याला घर पसारलेलं म्हटल्यावर नाईलाज होतो बरेचदा….

तर  आलेले पाहूणे गेले…. रात्र होता होता घरं पुन्हा आवरलं गेलं…. हॉल किचन पुन्हा एकवार नजरेखालून घातले गेले…. किचनचा ओटा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो…. तो किती वेळा पसारतो न किती वेळा आवरला जातो याचा हिशोब मांडायचाच नसतो, पण तो जर स्वच्छ आवरलेला सकाळीच दिसला की दिवसाची सुरूवात मस्त होते यावर तमाम स्त्रीवर्गाचं एकमत होईल…… तर सगळी आवराआवर आवरून  ” देहाचा पसारा ” निद्राधिन झाला….

मधे केव्हातरी जाग आली , लेकीला तहान लागली होती ती पाणी मागत होती!!! जाग आल्यावर क्षणभर अजिबात समजेना आपण कुठे आहोत….मेंदूच्या आठवणींच्या राज्यात दूरचे कुठलेतरी चॅनल लागलेले असावे…… इथला रिमोट कंट्रोल काही आपल्या ताब्यात नसतो गड्या या विचाराने हसत लेकीला पाणी दिले… आईच्या अंगावर हात टाकून कन्यारत्न तर निर्धास्त झोपलं पण माझ्या मनात विचारांचा ” पसारा ” ठेवून….

विचारांचा ” पसारा ” :) …. नुसता शब्द आला मनात आणि गंमत वाटली….. खरचं कुठे होते मी, जून्या कुठल्यातरी गावात, आमच्याच एका घरात …. गणपतीचेच काहितरी विचार होते मनात बहूधा!!! आठवलं तर आपण कुठे हरवलेलो होतो….. नेहेमी तर तीच एक पंचाईत होते, उठण्याआधि नक्की कोणता विचार मनात होता ते ही आठवत नाही….. बरं मनातल्या मनात आपण नक्की कुठे होतो पेक्षा तिथे “का” होतो हा ही एक उपप्रश्न असतो खरं तर, जो की मी हल्ली स्वत:लाच विचारत नाही. आपलं मन केव्हाही कुठेही असू शकतं हे एकदा स्वत:शीच मान्य केल्यावर “concentration ” नावाची ब्याद आपल्याच्याने होत नाही हा वैताग कमी होतो!!!

मजा आहे पण नाही…..  मन कुठेही असतं  म्हणजे  “कुठे असतं??? ” …. मूळात कुठेही जाऊ शकणारं हे मन बेटं नक्की कुठे असतं हेच ज्याला माहित नाही ती व्यक्ती मन त्याच्या निर्धारित जागेवर नसून इतरत्र भटकतय हा दावा कसा ठोकते……

बरं समजा आज मी “मनाचे भटकणे ” (कसलं आत्म्याचे भटकणे टाईप वाटतयं न्ं!!) यावर मनोवैज्ञानिक चर्चा करायची नाही असं ठरवलं (म्हणजे तसंच ठरवावं लागणार , कारण तशी चर्चा करायची ठरवलं तरी इथे तेव्हढा वकूब कोणाचा आहे, तेव्हा मला नाही बूवा करायची चर्चा!! ;) ) तरी मनाने मनातच किती   ” पसारा “ घातलाय याचा अंदाज आला मला….. आईशप्पथ म्हणजे हा पसारा माझ्या पाचवीला पुजलाय की काय…. घरातला आवरला की मनात “उभा” की हा!!!

गेल्या तेहेतीस वर्षातली पहिली तीन सोडली समजा तरी उरलेल्या तीस वर्षांचा पसारा…. स्वत:ला न्हाऊमाखू घालणाऱ्या मावश्यांपासून ते माझ्या मुलांच्या मावश्यांपर्यंतच्या प्रवासातले “रिश्तों का ईल्जाम” दिलेलीही आणि न दिलेलीही तमाम मंडळी ते आजवरच्या आयूष्याच्या प्रवासातली अनेक गावं असोत की तिथली घरं असोत की अनेक अनेक प्रवास असो…… वस्तू, खेळणी, कपडे, पदार्थ त्यांच्या रेंगाळलेल्या चवी….. स्वत:ची,  इतरांची आजारपण….. स्वत:च्याच काय पण लोकांच्याही सवयी ( :( )…..  सुखाचे क्षण…..अनेक मतं,भलेबूरे अनूभव…… अरारारा आठवू पाहिलं तर जाणवलं मनात काय कमी पसारा नाय बा माझ्या…. उलट तिथं जास्त घोळ आहे!!!

विश्वाच्या अनंत  “पसाऱ्यातलं “ माझं अणूरेणूपेक्षा लहान मन, स्वत:मधे एक स्वतंत्र “विश्व ” थाटून बसलय…… विदाउट तिकीट फिरतं मग बेटं स्वैर कुठेही…..

रात्रीपासून सकाळपर्यंत लौकिकार्थाने झोपलेलं हे त्रासदायक “मनं” घेऊन खरच आपण कितीवेळा निवांत झोपलोय हा एक नवा प्रश्न आहे!!! ” सकाळ कधी झाली कळलचं नाही ” या सदरात मोडणारी झोप रोज कुठे असते??? ….. आणि रात्र कशाला , दिवसाही कामाच्या व्यापात असो की कोणाशी बोलताना असो हे ’मन’ तिथेच असेल कश्यावरून ??? आणि जर माझं मन कोलांटउड्या मारत असेल तर समोरच्याचं मन “घसरगुंडी’ खेळत नसेल कश्यावरून ????  का त्या बापड्याच्या मनात त्याच्या वाटचा ’पसारा ’ नसेल???? :)

का मग हा मनात असा ” पसारा ” असणं ….. मनाला फिरायला जागा असणं , कधी कधी इतकी की त्या गुंत्यात मनाने हरवून जात असावं …घरात कसा ” पसारा “ आवराताना कधीकाळी एखादी डाव्या हाताने ठेवलेली वस्तू अचानक सामोरी येते आणि आपण विचारात पडतो ,’इथेच होती की ही :) ’ …. तसं एखादी मागे पडलेली लहानशी मस्त आठवण मनाच्या पसाऱ्यात अलगद वर यावी आणि आपण “दिन बन गया’ म्हणावं…… भटकायला नव्या जागांना “जागा ” देण्याची मनाची तयारी असणं हेचतर जिवंतपणाचं, आयूष्याला समरसपणे भिडण्याचं लक्षण नसावं :)

और वैसे भी आपण ढीग मनाची स्वच्छता मोहीम आखू, तिथला ” पसारा ” आवरू पण त्यासाठी हा अदृष्य अवयव हाती तर लागायला हवा!!!

असतो किनई विचारांचा ” पसारा ” , आठवणींचा ” पसारा ” , मतमतांतरांचा ” पसारा ” , रागाचा ” पसारा ” , लोभाचा ” पसारा ” ….. षडरिपूनामक भारदस्त नाव असलेल्या भावभावनांचा ” पसारा ” …… सामान्य़ माणूस तरी निदान हावरटच नाही का , नव्या वस्तूंची खरेदीही संपत नाही नी नव्या ओळखीही थांबत नाहीत….. मग नवे अनूभव नी जुन्या ” पसाऱ्याला ” भर :)

विचार खूप येतात नाही माणसाच्या मनात (बाईच्याही मनात … नाही तर माझ्या मनात नसते आले :) … पांचट आहे जोक, दुर्लक्ष करूया!!!! ) …… एक विचार मग असा आला की एक सुर्य, एक पृथ्वी न एक चंद्र पुरेसे होते की पण साक्षात ब्रम्हदेवाला तरी कुठे आवरलाय विश्वाचा पसारा …. हजारो सुर्य आहेत ’म्हणे’ !!!! अगणित ग्रह नी चंद्रही असावेत….. आपल्यासाठी त्यांचे अस्तित्व चांदण्यांयेव्हढे….. तसंच आहे की मनाच्या पसाऱ्यातही…… प्रत्येकजण एक ’सुर्य’ नी त्याची त्याची स्वतंत्र ग्रहमालिका….. त्यापलीकडे सगळे चांदण्यांसारखे  कमीअधिक लु्कलूकणारे तारेच की…. म्हणजे जोवर आपलं अस्तित्व आहे तोवर आपल्या कक्षेत इतरांनी फिरायचं नी त्याच वेळेस कोणाच्या तरी कक्षेत कमीअधिक अंतरावर फिरत आपणही स्ट्रॉंग पसारा मटेरियल व्हायचं!!!

आयला शिंपल हाय की लॉजिक….. :) ….. शेवटी काय आपला दोष नं कश्यातच नसतो म्हणजे कोणामूळे तरी आपण काहितरी चूकतो वगैरे….. वैसाच है पसारेके बाबतीत  आपण आहोत “ब्रम्हदेवाचे वंशज ” ….. तेव्हा ह्यो प्रॉब्लेम है अनुवंशिक !!!!

हुश्श चर्चा समाप्त….. घर कितीही आवरलं तरी मन माझ्या ताब्यात नाही…. ते तसे नसतेच आणि त्यावर ताबाबिबा मिळवण्याच्या भानगडीत मेरेको पडनेका नही है (सुलेखासारखं नाही, मी स्वत:च्या मनाबद्दल बोलतेय ;) ) ……. मनात “पसारा” होणारच आणि वाढता वाढता वाढणारच !!!!concluded!!!

आपण दोषी नाही कळलं ना की मी एक मिनिटही वाद वाढवत नाही, शप्पथ!!! :)

तरिही ब्रम्हदेवाला भेटीन तेव्हा त्याला खणखणीत प्रश्न विचारणारच आहे मी कारण केवळ त्याच्यामूळे अनेक constructive कामं करता करता राहिले मी,नसता ना मनात हा पसारा खरच सांगते विलक्षण काहितरी केले असते प्रत्येकाने (म्हणजे काय याचा शोध वैयक्तिक घ्यावा )!!!

मी सध्यातरी मनासाठी अंगाई गीत गाऊन त्याला झोपवते…..

……….

……….

”  ती नवी मैत्रीण झालीये तिच्याकडे जायचेय उद्या…. ” …… ” नव्या फर्निचरची जागा बदलून पाहू या का??? ” ….. “मुलांना बजावावं लागणार आहे गणपतीसाठी लोक येणारेत, पसारे काढू नका!!! ” ……. “आईकडे आणि अनुस्वारवाल्या आईकडेही गौरी बसल्या असतील….. मी होते तेव्हा दोन्हीकडे जायचे गौरीला…. ” ……  “आईकडे यावेळेस गौरीच्या जेवणाच्या ताटांभोवती रांगोळ्या कोणी काढल्या असतील???  आईला माझी आठवण आली असेल….. ” …..  “नाही हे मन झोपायचं नाही असं….. …… सुरूच आहे नाही या मनाचं भटकणं… भटकू दे…. मगा केलाय की काथ्याकूट विचारांचा….

अरे हो त्या विचारांची पोस्ट केलीये तिचं काय करायचं ???? … ती मुलांपासून लपवून ठेवायची… नवऱ्यापासूनही ….. नाहितर घरातला पसारा आवरताना मलाच ’ब्रम्ह’ आठवेल…….

फिर क्या करनेका ???? हेहे… सोप्पय….बरेच दिवस झाले ब्लॉगला आरामच आहे या पोस्टने ब्लॉगविश्वातला “पसारा ” वाढवायचा!!!!! :)