देऊळ…. तू झोप मी जागा आहे…..

अबूधाबी फिल्म फेस्टिवल मधे मराठी सिनेमा, तो ही उमेश आणि गिरीश कु्लकर्णी या जोडगोळीचा….. प्रथमच परदेशात असं थिएटरमधे जाऊन मराठी चित्रपट पहायला मिळणार होता….. नाना पाटेकर, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, सोनाली कु्लकर्णी, खुद्द गिरीश कु्लकर्णी, ज्योती सुभाष सगळे दिग्गज त्यात अतिशा नाईक, विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, किशोर कदम वगैरे तमाम मस्त मंडळी आणि पहिल्यांदाच मराठीत नासिरूद्दीन शहा 🙂 ….. मराठी मने धावत हा चित्रपट पहायला न गेली तरच नवल!!!

प्रत्यक्ष सिनेमाची वेळ …… ओपन थिएटर…. अरबांनी मराठी माणसाचं मराठी सिनेमासाठी केलेलं स्वागत ….. खुर्च्या मांडलेल्या ,समोर भव्य भव्य स्क्रीन, एका बाजूला सुप्रसिद्ध Grand Mosque मधे संथ वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि एकीकडे मराठी मंडळी काही आंतरराष्ट्रीय पाहूण्यांसोबत पहात होती त्यांच्या मातृभाषेतलं ’मराठी देऊळ’ 🙂

चित्रपटाची ओळख करून देण्यात आली…. अभिजीत घोलप बोलले आणि मग ’उमेश विनायक कुलकर्णी’ आले बोलायला…. ’नमस्कार’ म्हणून केलेली सुरूवात आणि  “भारताच्या सिनेमाची ओळख मुख्यत्त्वे बॉलीवूड अशी होते पण प्रांतिय भाषांमधेही उत्तम कामगिरी होतेय आणि तसाच माझा एक प्रयत्न की माझ्या mother tongue मधे ’मराठीमधे’ आणतोय ’देऊळ’ ” हे मत दोन्ही आवडलं !!!

भव्य पडद्यावर वाळूच्या कलाकृतीतून साकारणाऱ्या श्रेयनामावलीतून सिनेमाची सुरूवात!!! हळुहळू उलगडू लागलेली कथा….. कधी चेह्ऱ्यावर लहानसं तर कधी जरासं मोठं हास्य, हलक्याफूलक्या पद्धतीने विषय मांडला जातोय याची खात्री देणारे….  ’दमदार’ अभिनय, ताकदीचे कलावंत , सशक्त कथा, त्यासाठी घेतली गेलेली मेहेनत, अत्यंत सुंदर वस्त्रावर बारिक जरीकामातून अप्रतिम नक्षी उमटावी इतक्या तन्मयतेने टिपलेले बारिक तपशील , अगदी नेमकी वातावरणनिर्मिती या सगळ्याचा परिपाक एक खिळवून ठेवणारी कलाकृती असते याचं उदाहरण समोर होतं जणू….. हे जे काही आपल्या समोर घडतय ते इतकं खुसखूशीत आहे की आपण काय अगदी ’शुन्य मिनिटात’ याबद्दल लिहू असे वाटू देणारी सहजता समोर…..

’देऊळ’ ….. देवळाचं राजकारणं…. राजकारणी, दांभिक खोटी, पापभिरू, प्रसंगी स्वार्थी, संधीसाधू माणसं आणि जोडीला गुरूदेव दत्त ,पिंजऱ्यातला देव…..गावातल्या लोकांचा भोळेपणा आणि बेरकेपणा यातला फरक सुक्ष्मतेने टिपत तो तंतोतंत उभा करणं हा ’उमेश कु्लकर्णींचा’ हातखंडा!!! इथे तर जोडीला ’नाना पाटेकर’ , भाऊ असा काही उभा केलाय नानाने की विचारता सोय नाही…. दिलीप प्रभावळकरांचा ’अण्णा कुलकर्णी’ अतिशय संयत, संवेदनशील ….. देवळाच्या राजकारणाला विरोध असणारे अण्णा , सगळा ’बाजारूपणा’ सहन न होणारे अण्णा….. अभिनय हा अंगात मुरलेला असणं, कसं असतं याची ही सगळीच विद्यापीठं!!! ’मोहन आगाशे’ , का कोण जाणे पण असं वाटलं की त्यांच्या वाट्याला आलेली भुमिका त्यांच्या कुवतीच्या मानाने लहानशी होती का?? अर्थात ती चपखल चोख झाली यात वादच नाही…..

अभिनय हा कणाकणातून येतो , नाना (भाऊ) टोलनाक्यावर टोल देतानाचा प्रसंग आवर्जून सांगावा वाटतोय इथे…. टोल ’देऊ का’ यावर गावातल्याच पण त्या टोलनाक्यावर काम करणाऱ्या मुलाने ’नका देऊ’ म्हटल्यावर ’देतो नाss!! ’ म्हणतानाचा चेह्ऱ्यावर अत्यंत बेरकी हावभावांसह पैसे घेतलेल्या हाताचं पुढे-मागे होणं, निव्वळ अप्रतिम….. वळूतला प्रसंग आठवतोय, डॉक्यूमेंट्रीला तुम्ही नाही जायचं, डॉक्यूमेंट्रीच इथे येइल सांगितलं जात असताना ’मोहन आगाशे’ धोतराच्या निऱ्या घालताहेत आणि म्हणताहेत ’अस्सं ss ‘ !!! ’कसं काय जमतं बुवा हे असं इतकं भुमिकेत समरस होणं ??? ’ असं सामान्यांना विचारात टाकणारे प्रसंग हे!!! केश्याला ताप भरलाय त्याला पहायला गावातल्या बायका येताहेत , त्यांच्या जागा कश्या बदलतात हे ही पहाणं रंजक, सरपंच (अतिशा नाईक) आल्यानंतर बाकिच्यांनी सरकून तिला जागा करून देणे वगैरे अनेक अनेक ’बाप’ प्रसंगांची रेलचेल आहे नुसती!!!

इरसाल तरूण मंडळी…. नोकऱ्या न करणारी… कुठल्याही रस्त्यावर गावकुसाबाहेर असू शकणारी एक टपरी हा त्यांचा अड्डा…. त्यांच्यातला एक कवी, त्याला दिले गेलेले ’पोएट्या’ हे नावं, प्रसंगी दिशाहीन वाटणारी ही मंडळी आणि त्यांच्या चर्चा त्यांची पात्र अगदी उभी करतात…. गावातल्या स्त्रीयांच रटाळ मालिकांमधे गुंतलेलं असणं, त्यासाठी त्यांचं घरातल्या लोकांनाही विसरणं, वातावरणनिर्मीतीत उणीव राहिलेली नाहिये!!!!

सोनालीची ’वहिनी’ , अतिशा नाईकची ’सरपंच’ , उषा नाडकर्णीची ’सासू’ , ज्योती सुभाष यांची ’केशाची टिव्हीत आकंठ बुडालेली आई ’ सगळंच मस्त एकदम!!

कोणा एका प्रसंगावर लिहू म्हटलं तर संपुर्ण सिनेमाच फ्रेम बाय फ्रेम लिहावा लागेल….. राजकारण्यांचे बदलते रंग, देवाची महती सांगणारे प्रसंग द्या नाहितर घडवा सांगणारा पत्रकार ’महासंग्राम’ (किशोर कदम) , देवळापुढची रांग, देऊळ होण्याआधिच देवाचं सुरू झालेलं राजकारण, वहात्या गंगेत हात धूऊन घेण्याची माणसाची वृत्ती…. देऊळ झाल्यानंतर घरांमधे बदललेल्या फर्निचर, आणि अंगावर बदललेल्या कपड्यांसहित मनाचीही रंगरंगोटी झालेली माणसं…… नितिमत्ता, मुल्यं सगळ्यात सहजी बदल घडवू शकणारी माणसं!!!!

देवाचा, देवस्थानाचा, देवाच्या वस्तूंचा बाजार,धर्माचाच बाजार आपल्याला नवा नाही…. असे अनेक जागृत ’देवस्थानं’ आपल्या गल्लीबोळातही आहेत…. त्यामागच्या माणसांची, तिथल्या मंडळींची,देवळांबाहेर पुजेचे साहित्य, प्रसाद, देवाच्या गाण्य़ांच्या कॅसेट्स विकणाऱ्या लोकांची मानसिकता, त्यांच्यातल्या हरवलेल्या भक्तांचा , एकूणातच हरवत चाललेल्या ’निस्वार्थ भक्तीचा’ शोध पुढच्या अनेक प्रसंगांमधे येतो….. ’देवा तूला शोधू कुठं’ गाणारी गावातली साधी भजनी मंडळी ’थ्री इडियट्स’ च्या चालीवर देवाची गाणी बसवत असताना पाहिली की ,देवाचा बाजार करू शकणारी माणसं समोरून पहाताना कितीही बोचली तरी कुठे न कुठे आपणही त्या ’सिस्टीम’चा भाग आहोत ही खंत मनात दाटते…..

अण्णा सगळं असह्य होऊन मुलाकडे निघतात, भाऊ (नाना) त्यांना भेटायला येतात तेव्हा त्या दोघांमधला संवाद अत्यंत बोलका आहे…. तुम्ही अनेक गोष्टी बेकायदेशीर करता आहेत, कायदा एक न एक दिवस तुमच्यापर्यंत पोहोचेल या अण्णांच्या मताला नानाने दिलेले उत्तर खूप काही सांगून जाते,  “अलिकडे आम्ही आहोत पलीकडे कायदा आणि आमच्या मधे भक्तांची रांग आहे!!! कायद्याने आम्हाला गाठायचे ठरवले तर भक्तांच्या भावना दुखावतील!!! ” हे वाक्य परिपाक आहे सगळ्याचा….. आपल्या ’भावना’ इतक्या अलवार झाल्या आहेत की त्याचा गैरफायदा लोक आपल्या स्वार्थासाठी घेतात हे लक्षात येउनही आपण उपाय शोधायला तयार नाही, हे कटू सत्य!!!!

केश्या (गिरीश कु्लकर्णी), दत्ताचा ‘साक्षात्कार’ झाल्यापासून ते देऊळ उभं रहाण्यापर्यंतचा एक प्रवास आणि आधि अण्णांच म्हणणं पटलं असलं तरी त्यातला अर्थ समजल्यानंतरचा, ’ करडी’ गायीच्या मृत्यू नंतरचा , देवळात देवालाच शोधायला निघालेला, गोंधळलेला ,त्रागा करणारा केश्या हा एक प्रवास…. गिरीश कुलकर्णींने अक्षरश: अत्यंत सहज पेललाय हा प्रवास….. वळू,गाभ्रीचा पाऊस, गंध, विहीर नंतर पुन्हा एकदा गिरीशचा अत्यंत दमदार अभिनय आहे इथेही!!

’करडी’ गायीला रानोमाळ शोधणारा , स्वत:च हरवलेला केश्या आता पडद्यावर असतो, इथवर येत एक प्रश्न पडतो , नासिरूद्दीन शहा कुठेय??? चित्रपट कोणाचा आहे हे माहित असल्यामूळे अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलेला शेवट असेल ही कल्पना असते पण प्रत्यक्षात तो शेवट काय असेल याचा अंदाज मात्र अजिब्बात बांधता येत नाही…. काय असेल कलाटणी??? प्रेक्षक अस्वस्थ होतात मग कुठेतरी आणि चित्रपटाचा शेवट होतो….. गुंतवून ठेवणारा शेवट… आपण थक्क, आवाक, सुखावलेले की सुन्न झालेले ….हा शेवट हा ’देवळाचा’ ’कळस’ आहे!!!!

यातली गाणीही निश्चितच आवडणारी आहेत….. ’दत्त दत्त’ तर एक सत्य अत्यंत सोप्पं करून सांगणारं आहे!!!

एक सत्य सांगून गेलेला चित्रपट , झोपलेल्यांना जागं करू पहाणारा….. कोणासाठी आहे हा सिनेमा तर देवळांच्या रांगांमधे उभे रहाणाऱ्यांसाठी, मुर्तीत देवाला शोधू पहाणाऱ्यांसाठी, ’दुपारी देवळाचं दार बंद’ पाहून कधीतरी वैतागलेल्यांसाठी, आपण रांगेत असताना कोणितरी व्हीआयपी आल्यावर आपला अजून खोळंबा झालेल्यांसाठी, इथे चपला ठेवा म्हणून देवळाबाहेर अंगावर येणाऱ्या लोकांचा कधितरी देवदर्शनात अडसर वाटलेल्यांसाठी, देवाची गाणी सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर आलेली आम्हाला पटत नाही असे घरच्या चर्चेत सांगणाऱ्यांसाठी , देवाचा बाजार झालेला असून त्यात सहभागी होणाऱ्यांसाठी, इंटरनेटद्वारे देवदर्शन करून पुण्य कमावणाऱ्यांसाठी ….. थोडक्यात ’देव’, ’देऊळ’ , ’भक्ती’, ’श्रद्धा’ म्हणजे नक्की काय हे विसरलेल्या आपल्या सगळ्यांना हवीये अशी एक ’सणसणीत’ चपराक त्यामूळे आपल्या सगळ्यांसाठीच!!!!

शुन्य मिनिटातच काय पण मोठा वेळ घेऊनही मनातलं ’देऊळ’ असं कागदावर, स्क्रीनवर उतरवणं शक्य नाहीये ….. भारतात, महाराष्ट्रात हा सिनेमा अजून यायचाय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सांगून समजणारी ही गोष्ट नव्हे, तिची अनूभूतीच घेतली पाहिजे…. त्यामूळे तुर्तास सल्ला फक्त एक की ’देऊळ’ पहायला विसरू नका!!!! 🙂

46 thoughts on “देऊळ…. तू झोप मी जागा आहे…..

    • दिलीप प्रभावळकरांपासून सात-आठ खुर्च्या सोडून असलेल्या खुर्चीवर बसून मला हा चित्रपट पहायला मिळाला!! चित्रपट संपल्या संपल्या धावत त्यांच्यापर्यंत पोहोचले…. ’उंच’ व्यक्तीमत्त्व असलेला तो ’माणूस’ चष्म्याआड डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाला ,”वेगळाच आहे ना अनूभव!!! ” त्यांची सही घेण्यासाठी बराच वेळ हातात ठेवलेला कागद नी पेन त्यांच्याकडे देता येइना, ” तुम्ही लोक आमच्या मनावर लिहिता, आणि आम्हाला कागदावरच्या सहीचं कौतूक” वगैरे काहिसं बोलले मी बहूतेक….. माझ्या हातातला कागद घेऊन त्यांच ते पेटंटेड स्माईल करत त्यांनी सही केली…. Yes it was a moment worth cherishing!!! 🙂

      आनंदा नक्की पहा आवडेल तूला 🙂

    • अपर्णा मनापासून आभार गं, नक्की पहा देऊळ !!!

      खरं सांगू समिक्षण लिहीणे हा माझा प्रांत नव्हे पण कलाकारांसोबत, आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी सिनेमा ही गोष्ट मनात घर करून गेली मग काय घेतला किबोर्ड आणि केलं मत टाईप 🙂

  1. सुंदर परीक्षण … वाचून अजूनच तुझा हेवा वाटतोय. मला पुण्यात राहून मराठी सिनेमा बघायला मिळायची मारामार असते. कधी माझा मुहुर्त लागेपर्यंत नशीबाने तो थेटरात टिकलाच, तर तो मला बघायला मिळतो … पण पार शिळा झालेला. नवा कोरा सिनेमा, कलाकारांसोबत बसून बघायला मिळाला तुला .. मस्तच!

    • गौरे अगं म्हणूनच तर परिक्षण/ मत मांडायला धजावलेय मी 🙂 …. तुम्हा सगळ्यांच्या आधि मी पाहिलाय त्यामूळे काही चूक केलेली असली तरी खपेल नं ती :)मराठी सिनेमाने कात टाकलीये पण हे नक्की….. आणि तो बराचसा ’बोल्ड’ही झालाय….

      >>>>कलाकारांसोबत बसून बघायला मिळाला तुला .. मस्तच! …. अविस्मरणीय अनूभव गं अगदी… त्यात काल चक्क अबूधाबीला गार हवा होती , शेजारी खाडी त्यावरून येणाऱ्या झुळूका आणि बाजूला उमेश कुलकर्णी आणि दिलीपजी वगैरे मंडळी आहेत ही जाणिव… लय भारी बघ एकदम !!!

      आणि हो, देऊळ ताजाच पहा न विसरता…. ऐक माझं मत 🙂

    • विनायक आभार , खरं सांगू पण ताजमहालासमोर उभं असणाऱ्या माणसाच्या फोटोला कोणी छान म्हटलं तर त्या कौतूकात ताजमहालाचा वाटा मोठा असतो तसं काहिसं होतय असं वाटतय मला…. मुळ कलाकृती उत्तम आहे त्यामूळे माझे आपले शब्द बांधणे आहे त्यावर 🙂
      सिनेमा नक्की बघा मात्र!!!

  2. चलो, एक अजून पिक्चर जोडला गेला यादीत! ….हो, जेव्हा पासनं दक्षिण भारतात आलोय. तेव्हा पासनं यादीच बनवतो आहे. 😛 त्यामुळे, आभार ह्या पोस्टीसाठी.
    नक्की बघेल बघ. चित्रपटांचा आधीच फार मोठा पंखा आहे मी. त्यात असल्या टीम चा चित्रपट म्हणजे मेजवानीच. बाकी दिलीप प्रभावळकर साहब को हम भी मिले हैं तायडे!!! शाळेत आले होते आमच्या. आम्हा वात्रट कार्ट्यांना ते सुद्धा नक्कीच विसरलेले नसतील. माणूस जितका मोठा तितकाच तो विनयशील असतो हे पहिल्यांदाच बघितले मी तेव्हा.
    आणि हो, चित्रपट बघितल्या नंतर, तुला पाठवेल, …माझा ‘देऊळ’तला अनुभव. 🙂

    • नक्की जोड हा सिनेमा तुझ्या ’यादीत’ 🙂
      >>>माणूस जितका मोठा तितकाच तो विनयशील असतो हे पहिल्यांदाच बघितले मी तेव्हा. …. अगदी अगदी!!!

      नक्की बघ आणि आठवणीने कळव मला कसा वाटला सिनेमा ते…. तोवर ’दत्त दत्त’ 🙂

  3. अगदी मनापासून लिहिल्यास…छान ! 🙂
    मी मनाशी ठरवलेलंच आहे…हा सिनेमा बघण्याचं ! परवा टीव्हीवर ‘विहीर’ दाखवला ! पण नाही बघता आला ! 😦

    • अनघा अगं मी परवाच ’विहीर’ बघितला…. आणि ’देऊळ’ मात्र अगदीच स्वप्नवत पहायला मिळाला…. नाही तर तुम्हा सगळ्यांच्या पोस्ट्स वाचून हळहळत रहावे लागले असते!!!

      नक्की बघ तूला आवडेल गं ’देऊळ’ 🙂

  4. या चित्रपटात नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांची अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळणार असाच काहीसा विचार डोक्‍यात घोळत होता. अर्थात “देऊळ अमूक आहे, देऊळ तमूक आहे असं बरंच काही त्यावर आलेलं वाचल्यामुळे झालेलं मते; मात्र देऊळ विषयी लिहिलेले हे स्फुट वाचून उत्सुकता जाम ताणली आहे. हा चित्रपट केव्हा एकदा अनुभवेन असं झालेलं आहे पण, त्यासाठी वाट पहावी लागणार. अजून आपल्याकडे कुठे तो प्रदर्शीत झाला आहे. बाकी अभिनयातली सगळी बाप माणसे एकत्र आली आणि भट्टी जमली की एक अप्रतिम कलाकृती आकार घेते. “देऊळ’ हा तसाच अनुभव असू शकेल असे तन्वी यांच्या लिहिण्यावरून वाटते. त्यांनी लिहिलेला अनुभव अप्रतिमच आहे. या लिखाणाच्या प्रेमात पडून तर देऊळ नक्कीच पाहू…आणि पाहिल्या पाहिल्या तुम्हालाही सांगू……खूप छान लिहिले आहे. धन्यवाद एका चित्रपटाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल.

    • नानाने अक्षरश: जगलीये भुमिका… दिलीप प्रभावळकर आणि बाकि दिग्गज यांच्याबद्दल मी काय बोलणार इथे!!! अभिनयाची विद्यापीठं आहेत ही लोकं…..

      बाकि प्रतिक्रीयेसाठी आभार आणि ब्लॉगवर स्वागत!!

      नक्की पहा देऊळ 🙂

  5. अप्रतिम अप्रतिम झालंय परीक्षण.. नाना तर आपला ATF च आहे..

    खरंच खूपच उत्सुकता लागलीये आता.. कधी एकदा बघेन असं झालंय.. बघू कधी योग येतो ते !!

    • हेरंबा अरे नानाच्या अभिनयाचे इतके किस्से लिहिता लिहिता स्वत:ला अक्षरश” आवर घातलाय… भारतात यायचाय सिनेमा अजून!!! त्यामूळे बरेचसे डिटेल्स, शेवट लिहिण्याचे टाळले जरा…. फार कठीण गेले पण ते…. पाहू देत सगळ्यांना एकदा देऊळ मग करू या मस्त गप्पा 🙂
      >>>बघू कधी योग येतो ते !!
      योग लवकर यावा अशी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना 🙂 …. दत्त दत्त…..

    • सुहास देऊळ चूकवूही नकोस 🙂

      तुम्हा लोकांना शक्य आहे ते…. यावेळेस उगा माझी लुडबूड चाललीये मधेमधे 🙂

      आभार रे!!

  6. तन्वी ताई, आमच्या (न्यूज पेपर वाल्यांच्या) पट्टीच्या समीक्षकांना जमणार नाही एवढं छान लिहिलंयस तू…
    आता ‘देऊळ’ ची वाट बघत्ये. आणि हो, तुझ्या मेल ला उत्तर पाठवलंय!

    • 🙂 🙂 काय उत्तर देऊ गं भक्ती आता तूला….. सरळ चढते जाऊ दे हरभऱ्याच्या झाडावर 🙂

      अगं तूला बोलले नं मागेच मला विलक्षण आपुलकी आहे तुमच्या क्षेत्राबद्दल…..

      देऊळ नक्की बघ अगं आवडेल तूला!!!

      तुझं मेल मिळालय… उत्तर पाठवते!!!

  7. उमेश कुलकर्णी या नावासाठीच सिनेमा पाहायचा हे नक्की होतं, मग त्यात नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर आणि नसिरुद्दीन शाह म्हटल्यावर तर रीलीझची वाट पाहणं चालू आहे…

    • मनाली तूला पण तोच प्रश्न पाहिलास किनई देऊळ?? चला जा बघू थेटरात पटापट आणि मग मला कळवा आवडला का नाही सिनेमा ते 🙂

  8. पुण्यात वाट बघते बघ आता “देऊळ” ची….
    तसे movie पाहणे वगेरे माझा प्रांत नाहीये पण तरीही नक्की पाहिल आता…आणि बाकीचे “देऊळ” पाहिल्यावर 🙂

  9. कालच देऊळ पाहिला आणि मराठी चित्रपटांवर पुन्हा एकदा छाती अभिमानाने फुगून आली. मी जन्मत: उत्तर भारतीय असलो तरी पडद्यावर राजकारण आणि समाजकारण दाखवणं मराठी चित्रपटसृष्टी शिवाय इतर कोणालाही फारसे जमलेले नाही असे माझे ठाम मत आहे. आपला सामना, सिंहासन आणि वजीर केव्हाही 50 – 60 कोटी खर्चून बनवलेल्या प्रकाश झा च्या राजनीती पेक्षा शंभरपटीने चांगला आहे.

    वळू नंतर देऊळ पासून फारच मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांना हा चित्रपट पुरून उरला. ग्लोबलायझेशन,टेक्नॉलॉजी आणि बाजारीकरणाच्या ग्रामीण जनतेच्या आयुष्यावर सरळ सरळ होणारा परिणाम फारच मार्मिकरीत्या दाखविलेला आहे.

    तुमची समीक्षाही चित्रपटास साजेल अशीच आहे. अभिनंदन.

  10. देऊळ पाहिला.. आवडलाही… तू अप्रतिम लिहिलं आहेस…फक्त शेवटी अण्णा गाव सोडतानाचा प्रसंग एकेरी झाला आहे… कायदा काय मोडला देऊळ बांधताना हा प्रश्न मला पडला… अण्णांचा मुद्दा अतिशय तोकडा होता… बाकी पुर्ण सिनेमा उत्तम…

    • आवडला नं अप्पा.. अरे अतिशय विचारपुर्वक बारकावे टिपलेले आहेत …. एक एक स्वभाव विशेष मस्त अभ्यासपुर्ण उतरलाय प्रत्येक व्यक्तीरेखेचा…. 🙂

Leave a reply to Tanvi उत्तर रद्द करा.