मन थिर रहे नं….

अस्वस्थता येते…. येते म्हणजे ’येते आपली ’ …. बिनबुलाया मेहेमान आहे ती…. कारण न विचारता, न सांगता हजर होते…. ’घालवल्याशिवाय’ जात नाही सहसा!!! कोळ्याच्या जाळ्यासारखी आपल्याला वेढणारी ….. आपल्या आत असते न बाहेरही, काहीच रमवू शकत नाही मग!!! थकायला होतं…. घाबरायला होतं… अस्वस्थ होतं!!!

समोर कोणी विचारणारं , आपल्या अस्वस्थतेत अस्वस्थ होणारं माणूस काळजीने विचारतं , काय झालय??? … आपल्याचकडे नसणारी उत्तरं देता येत नसतात!!! कागदाची फिरकी असते नं, ती अशी उंचावरून खाली सोडली की गोलाकार भिरभिरत जमिनीवर येते , तसं हलकं होतं मन , त्याच्या फिरकीला भिरभिरायला भरभक्कम कारण लागत नाही !! आपल्या मनाची अशी बेछूट भिरभिरलेली फिरकी आपल्याला उचलून आणताना मात्र जड वाटते बरेचदा …. पेलेनासं होतं कधी कधी सारं!!! ’आधार’ हवा हवा वाटतो….

आपल्यात अनेक बाबतीत सुधारणेला वाव आहे , किती बडबड करतो आपण, नेमकं हवय काय आपल्याला…. ’ सुख बोचतं ’ अशा यादीत आपणही आहोत का ???

सपशेल हार मानायची वेळ …. आपलं ओझ कुणाच्या खांद्यावर द्यायची वेळ …..मनात काहीतरी उमटतं…

बूडत ही भव के सागर में,

बहियाँ पकरि समुझाए रे , फकिरवा!

आणि मग येते त्या फकिराची आठवण !!! समजते लगेच,  आता हा उचलणार आपले ओझे…. जिगसॉ पझल चे विखुरलेले भाग हा रचणार आता सुबक!! शांत बसावे पुन्हा आपण , अनेकदा याच्या समोर बसून समाधि लावतो तसेच ….तो बोलू लागतो… त्याला काही सांगावं लागत नाही, ’काय कशी काय वाट चुकलीस ? ’ तो मुळीच विचारत नाही…. वाट सापडेनाशी झाल्याशिवाय मी येणार नाही तो जाणून आहे जसा!!!

पानी बिच मीन पियासी,

मोंही सुन सुन आवै हाँसी ;

घर में वस्तु नजर नहिं आवत ,

बन बन फिरत उदासी ;

आतमज्ञानविना जग झूठा ,

क्या मथूरा क्या कासी ?

आत्मज्ञान :) … अरे बाबा ते मिळवता आले असते तर तुझं दार ठोठावलं असतं का रे ?? आणि हा पहा कसा म्हणतोय,  ” मोंही सुन सुन आवै हाँसी  ” !! कबिराला देता येतो हा अधिकार…. हस बाबा तू हवा तर माझ्यावर, पण तारून ने मला !!! तो मग एक एक शब्द हलका हलका उच्चारत आपल्याला थोपटतो…. एका दमात काही सांगायची त्याला घाई नाहीये, बरं तो सांगेलही त्याची आहे ती क्षमता… आपल्याला झेपायला हवं नं पण!!! एक दिशाही नकोय उपदेशाची… कबिरा तू सांगत रहा मी ऐकतेय…..

मला अनेक व्यथा नं ताप आहेत… खूप नाही पण काही मोजक्या , तुझ्याचकडे करता येतील अशा तक्रारीही आहेत….

मुसा खेवट नाव बिलइया,

मींडक सोवै साप पहरइया ;

सगळेच शब्द नाही कळत पण हे जे काय आहे ते उलटसुलट आहे…. झोपलेल्या बेड्काला साप राखतोय….विरोधाभास सारा!!  हो अशाच अर्थाच्या तर असतात नं तक्रारी, सगळं तिरपांगडं असतं रे !! मार्ग दाखव रे….

बोलना का कहिये रे भाई,

बोलत बोलत तत्त नसाई ;

बोलत बोलत बढै बिकारा,

बिनबोल्या क्यूँ होइ बिचारा ?

संत मिले कछू कहिये कहिये ,

मिलै असंत मुष्टि करि रहिये ;

ग्यानी सूँ बोल्या हितकारी ,

मूरिख सूँ बोल्या झष मारी ;

कहै कबीर आधा घट डोलै ,

भरया होइ तो मूषा न बोलै!!

किती सहज आहे हे…. संतासमोर असाल तर बोला नक्की मात्र असंत असेल समोर तर उगी रहा!!!  जमणार कितपत शंका आहे मात्र :).. जरा प्रयासाने जमवलं नं पण तर मनस्ताप संपलाच सारा!!!

कबीराच्या पुस्तकाची पानं उलगडत जायची आहेत… क्रम न ठरवता… इथे क्रम नसणं आणि तरीही आधाराची हमी वाटणं किती महत्त्वाचं आहे नं!!! कुठलंही पान उघडा , कबीर खंबीर उभा आहे समजावयाला…. आयूष्याच्या पुस्तकाची किती पान आपण उलटलीत यावर आपलं शहाणपण ठरतं नाही, गोंधळायला होतंच ….. हा मात्र  ’ मस्तमौला ’ स्वत:च्याच धुंदीत गातोय…. एका अनाहत नादात स्वत:ही रमतोय आणि जगाला रमवतोय!!! ’बळ ’ मिळतं या सावलीत!!!

तू आहेस बाबा अमर … आमची तितकी कुवत नाही… मर्त्य असू दे आम्हाला!!!

हरि मरिहै तो हमहू मरिहैं

हरि न मरै , हम काहेकू मरिहैं ?

:) आहे किनई मुद्दा बिनतोड…. ही वल्ली बिनतोडच आहे…. ’अवाक’ होऊ दे मला… थक्क होऊ दे!! आजकाल खुपसे थक्क होणे होत नाही…. माझे ज्ञान वाढले भलतेच असे  काहीही नाही तरीही पूर्वीसारखं हरखून जाणं फारसं जमत नाही!!  ही हार की जीत कोणाला माहित रे!!! ’हार’ असावी कदाचित…. नवनवं काही मन शोधत असतं मात्र…. त्याला आवडतं चकित व्हायला!!!

तू बाळगतोस ते सामर्थ्य…. गेल्यावेळी वाचल्या होत्या की मी या ओळी… तरीही त्याच पुन्हा वाचताना ’बोध’ होतो !!!

दरियाव की लहर दरियाव है जी,

दरियाव और लहर में भिन्न कोयम ?

उठे तो नीर है, बैठे तो नीर है ,

कहो जो दुसरा किस तरह होयम ?

उसीका फेरके नाम लहर धरा,

लहर के कहे क्या नीर खोयम ?

जक्त ही फेर जब जक्त परब्रम्ह में,

ज्ञान कर देख कबीर गोयम .

नावं बदला, जागा बदला… तरिही एक आहे सारं!! असचं ’तादात्म्य ’ पावायला होतं कबीराशी….   ’तादात्म्य ’ कधी वापरेन हा शब्द वाटलंच नव्हतं!!! इथे तोच येतोय पण मनात….

किती वाचलं , किती समजलं , किती उमगलं :) …. शंका येतच नाहीत मनात….. चुळबुळणा-या मनाला कान पकडून एका जागी निवांत बसवण्याइतपतं समर्थ आपण आहोत असं वाटतं!!! पुढचे निदान काही दिवस तरी बेटं सरळ चालेल असं वाटतय…. आणि कबीर कुठे जातोय मला सोडून… तो सखा आहेच सोबत!!! :)

मै कहता तू जागत रहियो , तू जाता है सोई रे ,

मै कहता निरमोही रहियो, तू जाता है मोहि रे !!

नाईलाज आहे रे कबीरा, ’मोह ’ कमी केले जाऊ शकतील पण निर्मोह व्हायचा नाही त्यामुळे तुला पुन्हा पुन्हा गाठावे लागते बघ!!!

सध्या तूला अलविदा म्हणते… पुन्हा भेटेनच… आणि काय लिहू, तू जाणतोच सारे!! पुन्हा डोळे मिटायला लागतील , तेव्हा  ” जागत रहियो ” असं दटावून घ्यायला तुझ्याचकडे येणार मी!!!

मागे ’ विसाव्याच्या वळणावर ’ भेटला होतास… आज तुझ्याकडे वळून विसावलेय!!! हे असेच होत रहाणार , की हे व्हावे असे मलाही वाटते  :) … काहिही असो,

कहै कबीर ताको भय नाहीं , निर्भय पद परसावै!!!  :)

आणि काय हवे!!!!!

थीम सॉंग….

माझ्या परिचयाचं गाणं… आधि बाबांचं लाडकं गाणं ही ओळख आणि पुढे जाऊन समजलं की बाबांच्या लाडक्या यादीमधली गाणी ही कुठल्यातरी चित्रपटात कोणितरी इतरांनी म्हटलेली असतात :) मात्र अजूनही ती गाणी बरेचदा आठवतात ती बाबांच्या आवाजातलीच…. त्यांची गाणी म्हणजे मुख्यत्त्वाने मुकेश किंवा रफी!!! किशोर हा प्रत्येक तरूण मनाला कुठल्यातरी टप्प्यावर गाठतोच आणि मग हळूवार सोबत करतो हे बाबांना क्लियर होते वाटतं (पुछना पडेगा एक बार )!! :) अर्थात त्यांच्या यादीत वर्ज्य कोणीच नव्हते , त्यांच्या गात्या गळ्याला अगदी आतिफ अस्लमही ’चालतो”  … आमची पिढी, हल्लीची पिढी वगैरे गुंते न घालता चांगलं गाणं या टप्प्यावर ते असतात हे मला कोण आवडतं नेहेमी. नाही म्हणजे जनरेशन गॅप नामक भानगड उरत नाही त्यामूळे!! मात्र रफी न मुकेश हे यादीतले परमनंट  बाकि सगळे कॉट्रॅक्ट बेसिसवाले… :) ….. तर वर दिलेलं गाणं हे माझ्या माहितीतलं, पाठ , आवडतं वगैरे जे काय ते हेच … रफीचं…

काही गाण्यातल्या काही ओळी मनाचा ठाव घेण्याआधि नं  ’ऐकणाऱ्या तुझं वय किती रे ? ’  असा प्रश्न विचारत नाहीत…. त्या मुकाटपणे मनात त्यांची जागा मिळवून टाकतात. तशी या गाण्यातली ’मेहेफिल क्या तनहाई मे भी लगता है जी  … तुमको चाह के ss’ या ओळीने माझ्या बऱ्यापैकी लहान वयात (जेव्हा तनहाई वगैरे समजत नव्हतं, अनूभव तर दुर) मनात टकटक केलेली होती. त्या दरम्यानच्या  अश्या आणिक दस्तका म्हणजे ’ देखो मैने देखा है” या गाण्यातली लडाईची ओळ, ह्या गाण्याने एक काय भुरळ घातली होती देव जाणे पण अजूनही ते तितकच निरागस वाटतं :) …. ’ये तो बोलो होगी कहाँ पे लडाई’ ला अमित कुमारने दिलेलं ’मैने वो जगह ही नही बनाई’ हे उत्तर ऐकताना जे वाटतं त्याला ’रोमॅंटिक’ म्हणतात हे अंमळ उशिरानेच कळलं ;) :) … ही एक स्वतंत्र मोठी यादी होइल अर्थात!!

तर….

काल झालं काय माझा नवरा गात होता ’तुम बिन जाऊँ कहा ’ :) ….. (लग्नाला अकरा वर्ष झालीत, नवरा कशाला गातोय गाणी… ह्या या बाईच्याच थापा आहेत  वगैरे वाटणाऱ्यांना प्रांजळ सुचना की तुम्हाला यात वेगळं काही वाटलं तर त्याचा अर्थ ’तुमचं आमचं सेम नसतं’ इतकाच घ्या…. नसता त्रागा नको ;) ) … मुद्दा हा की नवरा गाणं तेच गात होता माझ्या ओळखीचं पण शब्द वेगळेच…. झाला नं घोळ, ज्या बायकोला खुश करायला गेला तो, तीच रागावली :) … बरं कधी नाही ते नवराही ठाम त्याच्या मुद्द्यावर…. यूट्यूबाला शरण गेल्यावर समजलं ’प्यार का मौसम ’ नावाच्या चित्रपटाबद्दल आम्हा दोघांच्या अज्ञानामुळे आमच्या घरात हा वादळ का मौसम येऊ घातला होता.

एकच गाणं रफी आणि किशोरदा दोघांच्याही आवाजात आहे … एका कुटूंबाचं ते थीम सॉंग आहे…. मग मिलना बिछडना वगैरे नेहेमीचा मामला आहे हे सगळं समजलं मग!!! :)

आजवर ह्या असल्या थीम सॉंगच्या प्रकाराचं मला ’ह्या असं असतं का कधी… काहिही दाखवतात ’ इतकं स्पष्टीकरण पुरेसं वाटत असे…. म्हणजे ’यादों की बारात’ , ’मेरी जंग ’ किंवा ’वक्त’ वगैरे तमाम बिछ्डों की दास्तान हे माझ्यासाठी मात्र,  कल्पनाविलास आहे नुसता , वेडं बनवायची कामं असं उत्तर होतं!!! :)

आज मात्र माझ्याकडच्या दोन पिढ्या एकच गाणं , भलेही वेगळ्या शब्दात का असेना पण गात होती माझ्या समोर!!! :) …. जरा विचारात पाडलं मला ह्या प्रकाराने…

पोस्टचा मुद्दा अजूनही आलेला नाहीये नं…. की जे काय माझ्या मनात आत्ता डोकावतोय तो काही मुद्दाच नाहीये हे आपण नंतर ठरवूया तूर्तास!!

निव्वळ एक गाणं माझे बाबा आणि नवरा यांच लाडकं असतं तर हा विषय इथेच संपू शकला असता , परंतू हे एक गाणंच नाही तर माझ्या बाबांच्या आणि नवऱ्याच्या बऱ्याच सवयींमधे मला अनेकदा साधर्म्य सापडलय!!! एखाद्या प्रसंगात ते कसे वागतील हे अनेकदा मिळतंजूळतं असतं…. अगदी ’रास’देखील एक आहे दोघांची…..

मग हे असं आहे म्हणून का ’माझा नवरा’ हाच ’माझा नवरा’ आहे ????

समजतोय का मुद्दा ???? दोनदा नाही लिहीलेला एकच शब्द… दोनदा आहेच तो …. ’प्रेमात पडतो’ नं आपण म्हणजे नक्की काय होतं मग??? की आपण आधिपासूनच काही गुणांच्या प्रेमात असतो आणि ते सापडले एखाद्यात की आपल्याला ती व्यक्ती आवडते…. आहे नं गुंता…. नाही ही चर्चा चेहेरा पाहून प्रेमात पडणाऱ्यांसाठी नाहीचे, लेट मी क्लियर मायसेल्फ, खऱ्या प्रेमाबद्दल बोलतेय , विचारतेय मी!!!!

आपण समानधर्मी माणसं शोधत फिरतोच नं…. ’स्वभाव’ सारखे असणं की ’थीम ’ एक असणं ???

की खरच एक ’थीम’ असतंच आपलं आयूष्याकडे बघण्याचं…..  आपलं आपलं एक गाणं, आपलेच शब्द आपलेच काव्य न आपली आपली एक स्वतंत्र चाल त्याला… त्याच्या तालासुरावर रमत आपण मार्गक्रमण करत असतो …… आपल्या कुटूंबाचं गाणं!!! काही मतं, अंदाज, ठोकताळे…. हसण्याची, रडण्याची एक सवय….. असतं की नाही, प्रत्येक कुटूंबाचं आणि त्या कुटूंबावर प्रेम करणाऱ्या कुटूंबातल्या प्रत्येक सदस्याचं , सगळ्यांच मिळून असतं एक ’थीम’ …. तशीच माणसं मग शोधली जातात,जोडली जातात, ती आवडतात, त्यांच्यात जीव रमतो…. त्यांच्या सहवासात जीव सुखावतो……

आमच्याकडे अमकी सिरियल पाहिली जाते, तमका पदार्थ या नाही त्या पद्धतीने होतो, गणपती  इतक्या दिवसांचा असतो, तमका रंग चालत नाही, कुलाचार-प्रथा वगैरे बोलत नाही मी त्या रुढी नको पण सोप्पंस आयूष्य जगताना एक पद्धत आपोआप ठरतेच की आपली…. तेच की एक ’थीम’ :)

अगदी फिल्मी नाही तरी या सामान्य कुटूंबाचं ’एक सुत्र’ असण्याच्या मुद्द्याने गंमत केली खरी मग….. :)

मग सिद्धता सिद्धच झाली की असे नाही आपण पटकन मैत्री करत कोणाशी… त्याला जबाबदार असते हे ’थीम’ …. एकतर ते आपल्याला आवडते तरी नाहितर नावडते तरी…. पण शोधाशोधीची दिशादर्शक तेच….. :)

कोण हवं कोण नको ठरवणारं ’थीम’ ….. असतं बरं का थीम सॉंग :)

बाकि राहू देत साध्य न सिद्धता वगैरे पण इथून पुढे मी थीम सॉंगवाले तमाम सिनीमे मात्र मन लावून पहाणार हे नक्की :)

आणि हो बाबा आणि माझे नवरोजी आज मी पण म्हणतेय ” तुम दोनों बिन जाऊ कहाँ!!! ” :)