नवी नजर आणि स्वर्गाचा रंग !!!

मराठी किंवा हिंदी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांचे चित्रपट मी पहावे असे काही ठरवून झाले नाही, माझा सगळा कारभार ’सहजच’ या सदरात मोडणारा🙂.  त्यात या दोन भाषांव्यतिरिक्त इंग्लिश सिनीमे पहाणे म्हणजे ते हिंदीत डब झालेले किंवा सबटायटल्स असलेले असेच आत्ता पर्यंत जणू ठरलेले होते. उगाच कान ताणताणून संवाद ऐकायचे कशाला, हा मुळचा आळशी स्वभावाला धरून असणारा प्रश्न पडायचा आणि मी इतर भाषिक चित्रपटांच्या वाटेला जायचे नाही.त्यामूळे पाहिलेल्या इंग्लिश चित्रपटांची यादी तशी लहानशीच होती / आहे !!

गेल्या सुट्टीत भारतातून येताना विश्वास पाटलांचं ’नॉट गॉन विद द विंड ’ पुस्तक सोबत आणलं…. इतकं अभ्यासपुर्ण नजरेने चित्रपटांकडे पहाता येतं हे नव्याने समजलं !! गणेश मतकरींचा ’आपला सिनेमास्कोप ’ हा ब्लॉगही असाच सिनेमा कसा पहावा हे शिकवणारा. आमचा आनंद पत्रेही त्याच्या सिनेमा कॅन्वासवर अधून मधून रंग भरत असतो🙂 … कोणे एके काळी हेरंब आणि विद्याधरही लिहीत असत, असे वाक्य इथे टाकण्याचा मोह आवरता घेतेय (वाक्य टाकून झाल्यावर😉 ) !!!

थोडक्यात काय आजकाल मी साहेबाच्या चित्रपटांपासून फारकत घेतल्यासारखी वागत नाही. अधेमधे एखादा चित्रपट पाहून टाकते🙂

तर याच नव्या दालनात एक लोभस दालन अचानक उघडलं माझ्यासाठी…. ’माजिद माजिदी’ नावाचं !!! एखाद्या प्रवासाला निघावं, वाट ठरलेली नसावी पण नेमक्या स्थळी जाऊन पोहोचावं असं काहिसं झालं या ठिकाणी !! माजिदीचा ’बरान’ पाहिला आणि लक्षात आलं हे वेगळं रसायन आहे…. हे झेपेल, आवडेल आपल्याला !!!

मी माजिदीबद्दल लिहावं किंवा एकूणात एखाद्या चित्रपटाबद्दल लिहावं असा काही माझा अभ्यास नाही हे माझं मत होतं, अजूनही आहे तरिही आज एक नोंद करावी वाटली म्हणून ही पोस्ट!!!

The Color of Paradise ”  …. Rang -e- Khoda … नावाचा सिनेमा पाहिला आणि पोस्ट लिहायला घेतली … हे परिक्षण नाही हे आधि नमूद करायला हवे …. हे आहे एक भारावलेपण !!

मोहम्मद हा आठ वर्षाचा मुलगा… जो पाहू शकत नाही !! तो तेहेरानच्या एका शाळेत शिकतोय . ब्रेल लिपीत भराभर लिहू वाचू शकणारा मोहम्मद हा चुणचूणीत मुलगा आहे. शहर आणि त्या अनूषंगाने येणारे टेपरेकॉर्डर, मोबाईल फोन हे बारकावे लहानश्या प्रसंगातून सामोरे येतात. शाळेला सुट्टी लागलीये, सगळ्या मुलांचे पालक येऊन मुलांना घेऊन गेलेत…. मोहम्मद एकटा आपल्या वडिलांची वाट पहातोय ….. तितक्यात बाजूच्या झाडांमधे पक्ष्याचं एक पिल्लू घरट्यातून खाली पडलय…. त्या पिल्लाला लहानसा मोहम्मद ज्या आत्मियतेने घरट्यात परत ठेवतो ते फक्त पहात रहावे. गंमत म्हणजे डोळ्यांनी सिनेमा पहाताना आपली नजर मोहम्मदच्या त्या पक्ष्यावर अलवार फिरणाऱ्या बोटांबरोबर फिरते. घरटं मोडू नये म्हणून अलगद्पणे घरट्याला तो चाचपडत शोधतो तेव्हा त्याची धडपड मनात उतरते.

मोहम्मदचे वडील (हाशेम ) येतात , ते मात्र त्याला परत नेण्यास उत्सूक नाहीत …. शाळा मोहम्मदला ठेवून घ्यायला तयार नाही… तिथे सुरू होतो मोहम्मदचा घरचा प्रवास. वाटेत बसने, घोड्याने होणारा प्रवास अखेर एका निसर्गरम्य प्रदेशात येतो…. बसमधल्या खिडकीतून मुठीत हवा पकडू पहाणारा मोहम्मद अत्यंत निरागस दिसतो. या प्रवासात जाणवते मोहम्मदचे निसर्गाशी असलेले नाते…. पाण्याच्या प्रवाहातल्या गोट्यांमधे त्याला अक्षरं सापडतात. पक्षी त्याला साद घालतात… डोळ्यांनी पाहू न शकणारा मोहम्मद निसर्गाशी मनमूराद संवाद साधतो.

मोहम्मदचं गाव, घर , त्याच्या विलक्षण सुंदर दिसणाऱ्या लहानश्या बहिणी (हानये आणि बहारें ) , त्याची कष्टाळू आजी सगळच अतिशय मोहक आहे. गावातल्या शाळेत डोळस मुलगा चुका करत वाचतोय एक धडा, आणि मोहम्मदने मात्र ब्रेललिपीत तोच धडा न चुकता खणखणीत वाचलाय…. त्यावेळेस शिक्षकाच्या चेहेऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव पहाण्याजोगे. शिक्षकाबरोबरच आपण आधिच मोहम्मदच्या हुशारीच्या, जिवंतपणाच्या प्रेमात पडलेलो असतो. त्याच्या नजरेने जग पहायला लागलेलो असतो.

मोहम्मदच्या आजीची त्याच्यावर असलेली माया ठायीठायी दिसते…. तिचे सुरकुतलेले हात मोहम्मदला जगातले सगळ्यात सुंदर हात वाटतात. नातवासाठी राबणारे ते हात खरोखरीच खूप सुंदर आहेत. पुढे ही आजी जेव्हा घरातून निघून जाते तेव्हा रस्त्यात पाण्याबाहेर पडलेल्या तडफडणाऱ्या मासोळीला उचलून पुन्हा पाण्यात टाकते. हा प्रसंग चटकन विसरला जाणारा नाही…. सुरूवातीच्या एका प्रसंगात मोहम्मद चिमणीच्या पिल्लाचे प्राण वाचवतो आणि त्याची प्राणप्रिय आजी इथे तसाच एक जीव वाचवते…. त्या दोघांचं ते घट्ट नातं पहाताना paradise या शब्दाची महती समजते.

चित्रपटात एक महत्त्वाची किनार अजून आहे….

मोहम्मदच्या वडिलांना , हाशेमला दुसरं लग्न करायचं आहे …. त्यांना मात्र हा मुलगा ही या लग्नातली अडचण वाटतेय. एका साध्या कामगाराची  ’मुलगा ’ आणि  ’वैयक्तिक स्वार्थ ’ यातली घुसमट साध्या साध्या प्रसंगातून आणि वाक्यातून पुरेपुर उतरलीये. लग्नाची वेळ जवळ येते म्हणून मोहम्मदला दुसऱ्या गावातल्या एका सुताराकडे त्याचे वडिल सुतारकाम शिकायला पाठवतात. हा सुतार स्वत:ही अंध आहे. या सुताराला मोहम्मद सांगतो , “देवाचं माझ्यावर प्रेम नाही नाहितर त्याने मला डोळे दिले नसते का ?? ” एका लहानश्या मुलाचे ते प्रश्न, समज अस्वस्थ करून टाकतात. हाशेमच्या नजरेत वारंवार दिसणारी स्वत:बद्दलची ’दया’ आणि मोहम्मदचा राग करण्याबद्दल स्वत:ची वाटणारी लाज आणि चिड जाणवतात अगदी!!

मोहम्मदची आजी जग सोडून जाते तेव्हा तिच्यासमोर क्षणभर एक दिव्य प्रकाश चमकतो…. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत मोहम्मदचे वडिल त्याला परत आणायला पोहोचतात. येताना एका प्रचंड वेगाने वहाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ ते येतात. प्रवाहावरचा लाकडी पुल ओलांडताना अचानक तो पुल खचतो आणि मोहम्मद त्या पाण्यात पडतो. त्यानंतरचे त्याच्या वडलांच्या चेहेऱ्यावरचे भाव  अतिशय सुंदर उमटले आहेत. एका क्षणासाठी थबकलेले , ही आपली मोहम्मदपासून सुटका आहे का अश्या विचारात पडलेले वडिल पुढच्या क्षणी प्रवाहात वेगाने वहाणाऱ्या मोहम्मदच्या मदतीला धावतात. चेहेऱ्यावरची ती अगतिकता स्पष्टच सांगते वडलांच्या मनातलं मोहम्मदबद्दलचं प्रेम…. अक्षरश: खिळवणारा क्षण …..

प्रवाहाच्या प्रचंड वेगापुढे हाशेम आणि मोहम्मद हारतात ….. बऱ्याच वेळाने हाशेम शुद्धीत येतो , समुद्रकिनारी  काही अंतरावर त्याला मोहम्मद निश्चल पडलेला दिसतो….. त्याची हालचाल बंद आहे आणि तितक्यात पक्ष्यांचे आवाज येताहेत… आपल्याकडे, कॅमेऱ्याकडे हाशेमची पाठ आहे , त्याच्या कुशीत मोहम्मद विसावलाय…. मोहम्मदचा हात, त्याची बोटं आपल्या दिशेला आहेत…. पक्ष्यांच्या त्या आवाजाला मोहम्मद पहातोय , त्याची बोटं हलताहेत…. एक सुरेख सोनेरी प्रकाश त्याच्या हातावर चमकतोय ….. The Color of Paradise , निसर्गाच्या इतका जवळ असणारा मोहम्मद आता नंदनवनातल्या पक्ष्यांशी बोलतोय!!!

.

.

आपण स्तब्ध… शांत !!!

का आवडला हा सिनेमा इतका की पोस्ट लिहावी वाटली ???

मला वाटतं माजिदीचं अत्यंत साधेपणाने कथा सांगणं हे महत्त्वाचं कारण आहे !! आपली आजी लहानपणी परिची कथा सांगते नं, खूप आवाज नसतो त्यात…. आजीच्या उबेत विसावलेले आपण आणि हळूवार कानावर येणारा तिचा आवाज ….. त्या आवाजाची आठवण माजिदी करून देतो आपल्याला आणि जिंकतो !!! उगाच मोठमोठे संवाद नाहीत, रडारडी नाही… हाणामारी तर नाहीच नाही….. मोहम्मद नकोसा वाटण्याचा , आणि त्याचबरोबर या नकोश्या वाटण्याबद्दल अपराधीपणाने मन पोखरलं जाण्याचा त्याच्या वडलांचा संयत अभिनय असो की मोहम्मदला दुर नेलं तेव्हा मला त्याची नाही पण तुझी काळजी वाटतेय हे त्राग्याने स्वत:च्या मुलाला सांगणारी त्याची आजी असो , अभिनय जेव्हा अभिनय वाटत नाही तिथे आपण गुंतत जातो. लहानश्या प्रसंगातून मोठी कथा सांगण्याची या दिग्दर्शकाची हातोटी खरच वाखाणण्याजोगी आहे.

मोहम्मदला दिसत नाहीये तरिही तो खूप काही पहातो त्याच्या हाताने, कानांनी !!! आपण ते सगळं अनूभवू शकतो अगदी त्याच्याबरोबर… परंतू त्याचवेळेस सभोवतालचा हिरवागार सुरेख परिसर, फुलांचे, झाडांचे, पानांचे , पक्ष्यांचे , आकाशाचे अप्रतिम रंग पडदा व्यापून मनात उतरतात. Paradise ’नंदनवन ’ हा शब्द लागू पडतो इथे. फुलांपासून बनवलेल्या रंगाचे धागे , अनेकरंगी गालिच्यांची आठवण करून देतात. इराणचे गालिचे इतके सुरेख का असतात हे पटतं !!

हा संपुर्ण चित्रपटच एखाद्या कुशल हाताने विणलेल्या रंगीबेरंगी गालिच्यासारखा आहे…. मोहम्मदच्या नजरेने म्हणजे त्याच्या हाताने पाहिल्यासारखा तो आपल्याला तितकाच तरल , हळूवार जाणवतो ….  “दिसतो  ” !!!  भावभावनांचा गालिचा !!! ही नजर नक्कीच मिळवण्याजोगी….. त्याने स्वर्गाचे, नंदनवनाचे रंग पहायला हरकत नाही!!

माजिद माजिदीच्या चित्रपटांच्या, दिग्दर्शनाच्या प्रेमात पडलेय मी सध्या …. एक नवी नजर मिळतेय, एका जुन्या ओळखीच्या माध्यमाची एक नवी ओळख होतेय …. तसेही कोणाला नकोय सांगा बरं वाऱ्याची अलगद, मंद झुळूक , पकडता न येणारी तरी जाणवणारी आणि मोहात पाडणारी … !!!🙂

(फोटो जालावरून साभार !! )

30 thoughts on “नवी नजर आणि स्वर्गाचा रंग !!!

 1. मजिदी मजिद हा अप्रतिम डायरेक्टर आहे. याच्याच एका चित्रपटावर हिंदी सिनेमा काढला होता ( भ्रष्ट नक्कल) शाबास बच्चे नावाचा.. ओरिजिनल सिनेमा मधे प्रत्येक फ्रेम पकड घेते. म््युझिकचा अवाजवी वापर न करता केवळ अ‍ॅक्टींग मुळे इम्पॅक्ट एस्टअ‍ॅब्लिश करण्यात मजिद मजिदी चा हात कोणीच धरू शकणार नाही. आता हा सिनेमा लावतो डालो करायला.

  • >>>हा सिनेमा कसा पहावा हे अगदी योग्य शब्दात लिहिलं आहेस. …. आनंदा🙂

   तुझे नाव कसे मानाने लिहीलेय बघ … तुम्ही गुरू आहात… आम्ही लिंबूटिंबू🙂

 2. मजिद मजिदी हा इराणमधल्या आणि एकंदरच जगातल्या कंटेम्पररी दिग्दर्शकांमध्ये ‘वन ऑफ द बेस्ट’ म्हणून गणला जातो. पण दुर्दैवाने मी त्याचा एकही सिनेमा अजून पाहिलेला नाही.. तुझ्या सजेशनने सुरूवात करतो!🙂

  • बाबा अरे मी आपली सहज पोहोचले माजिदी या नावापर्यंत… मुळात माझी माहिती जेमतेम, ती ही वाचिव किंवा ऐकिव … पण पाहिलेल्या मोजक्यांपैकी एक ’शिडलर्स लिस्ट ’ आणि आता माजिदीचे चित्रपट मनात रेंगाळताहेत !!

   कर कर सुरूवात…. बाकि पोस्टमधला ’टोमणा ’ पचवलास वाटतं …. पोस्टस लिहा रे !!

  • नक्की बघ सुहास , अतिशय शांत रसायन आहे… आवडायला मुळीच हरकत नाही … मला उलट वाटत होते की मी आंतरराष्ट्रीय सिनीमे पहाण्यात शेवटचा नंबर पटकावूनही पोस्ट लिहीतेय खरे पण इथे बघ चक्क इटलीकरांनी माजिदीचा अजून एकही सिनेमा पाहिलेला नाही🙂

   मी लिहीलेल्या पोस्टला तू कौतूकाचे शब्द बोललास खरा पण मला तितकेसे समाधानकारक नाही वाटलेले हे लिहीणे… नाही रे तितकी कुवत आपली की आपण माजिदीला शब्दात उतरवू !!! आभार रे!!

 3. काय योगायोग आहे नाही!
  आपल्या ब्लॉग च नाव ‘सहजच’ असाव. माजिदी चा सहजसुंदर पिक्चर सहजच हातात यावा, आपणही तो वाट वाकडी करून सहजच बघावा. बघितल्यानंतर कधी एकदा ते समाधान सगळ्यांना शेअर करते म्हणत वेळ न घालवता सहजच (साहजिक आहे) एक सुंदर पोस्ट लिहिली जाते… आणि आम्ही पण ती सहजच वाचायला घेतो… खरंच काय योगायोग आहे!
  खर सांगायचं तर असा माजिदी आमच्या(ही) नशीबी नाही आलाय अजून. पण त्याचे प्रभाव असणारे काही भारतीय बनावटीचे चित्रपट पहाण्यात आले (दर्शील सफारीचा ‘बम बम बोले’, माजिदी काकांच्या Children of Heaven ची भारतीय बनावट). रात्री ११ वाजता झोपण्याची पूर्ण तयारी झाली आहे आणि टीव्ही च्या रिमोट वरून शेवटचा हात मारता मारता एक फ्रेम दृष्टीस पडावी, उत्सुकता वाटावी आणि शेवटपर्यंत नावही माहित नसलेल्या चित्रपटाने The End होई पर्यंत एक समाधानी हासू चेहऱ्यावर, डोळ्यात हलकंस् कौतुक मिश्रित पाणी आणि २ तासांच्या आत्मिक शांततेचा लाभ देत एक सलीलसुंदर अनुभव द्यावा. हातात रिमोट तसच रहाव, बहुतेक त्याला पण चित्रपटाने मोहिनी घातलेली असते तेवढा काळ. प्रियदर्शन काकांनी ते ‘शिव’ नव्हे ‘इंद्र’धनुष्य बरच बर संभाळल असणारे, अस आपल् मत. (यावरून मी आपला माजिदी मोजतोय)
  ही पोस्ट तशीच उत्सुकता जागवते! शेवटचा प्रसंग तर डोळ्यासमोर उभा राहिला. त्यात वर्णनात्मक शब्द तर असे शोधून शोधून (सहजच) वापरलेत की वाचन अर्धे सोडायची सोय नाही… चॉकलेट तर संपल पण स्वाद कायम आहे!🙂

 4. माजिदीच्या चित्रपटांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी सरळ साधेपणा, छोट्या गोष्टी, साधी माणसं, त्यांचे तुलनेने साधे पण त्यांच्यासाठी जीवनमरणाचे असणारे प्रश्न.. पण हे तिऱ्हाईताच्या नजरेने बघताना.. प्रत्यक्ष चित्रपट बघताना हा त्रयस्थपणा आपल्याला सोडून दूर पळून जातो आणि चित्रपटांतल्या पात्रांचे प्रश्न आपला जीव टांगणीला लावतात.

  Children of Heaven तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेच. पण त्याचा Songs of Sparrows पण नक्की बघ. आणि मी The Color of Paradise बघेन🙂

  >> कोणे एके काळी हेरंब आणि विद्याधरही लिहीत असत

  इसकी सजा मिलेगी… बराबर मिलेगी :PPP

  • >>>>>माजिदीच्या चित्रपटांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी सरळ साधेपणा, छोट्या गोष्टी, साधी माणसं, त्यांचे तुलनेने साधे पण त्यांच्यासाठी जीवनमरणाचे असणारे प्रश्न.. पण हे तिऱ्हाईताच्या नजरेने बघताना.. प्रत्यक्ष चित्रपट बघताना हा त्रयस्थपणा आपल्याला सोडून दूर पळून जातो आणि चित्रपटांतल्या पात्रांचे प्रश्न आपला जीव टांगणीला लावतात.

   Exactly , precisely हेच लिहायचे होते मला🙂
   मला आता Songs of Sparrows बघायचा आहे !!!

   बाकि
   >>>इसकी सजा मिलेगी… बराबर मिलेगी😛 PP
   समस्त वाचकवर्गाकडुन या सजेसाठी ’ मोगॅंबो खुश हुआ🙂 .तिडदिक तिडदिक (बोटं आपटल्याचा आवाज😉 ) ’

 5. माजिद माजिदीचा ’बरान’ मी http://www.mimarathi.net/node/4665 ही पोस्ट वाचल्यानंतर शोधून पाहीला होता. खूप सुंदर आहे तो ही. त्याच वेळी केलेला माजिदीचे सगळे चित्रपट नक्की पाहायचेच , हा निश्चय अजूनही तसाच कायम आहे😦 आता मात्र नक्कीच पाहीन …… आणि माजिदीची पुन्हा आठवण करून देणारी ही अप्रतिम पोस्ट लिहील्याबद्दल आभार्स !🙂

  • गौरे अगं यादी तुझ्याकडचीच काय माझ्याकडचीही प्रचंड मोठी आहे…. त्यात पोरं (घरातली नव्हे, ब्लॉगविश्वातली ) अजून अजून भर घालताहेत🙂

   माजिदीचे चित्रपट सोडू नकोस पण खरच मनापासून सांगतेय…. एक प्रकारची शांतता आहे त्यात !!

 6. आता जरा ढिशूमढिशूम, गूढ, क्राईम मधून बाहेर येऊन लगेच हा सिनेमा पाहते. उत्कंठा वाढवली आहेस तू.🙂 मला आठवतेय मी माजिदीचा ’ फादर ’ ’ बरान’ आणि ’ सॉंग्ज ऑफ स्पॅरोज ’ पाहीले होते. अप्रतिम सिनेमे आहेत.

  • बयो मला आता Father आणि Songs Of Sparrows पहायचे आहेत …..

   बाकि ते ढिशूमढिशूम, गूढ, क्राईम मधून बाहेर ये पटकन आणि हा सिनेमा बघ पटकन🙂 … खरोखर अप्रतिम सिनीमे आहेत!!

 7. तू पोस्ट का लिहिली हे अजून वाचलेच नाहीये तायडे.
  चित्रपटाची कथा वाचूनच भारावून गेलोय.
  …..
  थोडा अवकाश हवा पुढे वाचायला.
  …..
  मजिदीचा ‘कश्मीर अफ्लोट’ येतोय. त्याची वाट बघेल आता.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s