या जन्मावर …..

गेला पुर्ण महिना आधि मुलगा आजारी आणि मग तिच्या मानेचं दुखणं , ती वैतागली होती अगदी . मुलाला बरं नाही मग मन अगदी हळवं झालेलं, त्यातच एरवी अगदी दुर्लक्ष करावे इतपत मुर्ख असे काही भलेबुरे अनूभव…. तिने जशी हार मानली .

मानेच दुखणं आलं काय म्हणायचं…. हाहा म्हणता वाढलं प्रचंड!! अगदी बसवेना आणि उठवेना…. बरं मानेला झटके न देता आपल्याला बोलताच येत नाही हा नवा साक्षात्कार त्या दरम्यान झाल्याने, तीची बोलती बंद झाली अगदी 🙂 … या संधीचा तसं पहाता घरच्यांना आनंदच झाला असता पण तीची परिस्थीती पहाता तो त्यांनी खूप बडबडून व्यक्त केला नाही इतकेच 🙂

हळवं मन वेडेपणा करण्यात पटाईत… कशाला महत्व द्यावं नं कशाला  “खल्लीवल्ली ” (आमच्या अरेबिक मधे  “गेले उडत” 🙂 )म्हणावं याचं भान विसरलेलं 😦 …. मळभ मनावर आलेलं…. आवसं जशी सारी !!! काळी काळी… कुंद कुंद वातावरण….

डॉक्टरांच्या वाऱ्या आणि औषधांच्या वेळा आलेच मग ओघाने !!

एक सकाळ, उठताना तिला अंमळ उशीरच झाला… होणारच होता… उठून लागली ती तयारीला, मुलं जायची होती नं शाळेत…. तोच ’सरप्राईज’ चा नारा कानावर पडला… मुलं शाळेची तयारी करून कधीचीच तयार बसलेली 🙂 एरवी हाका मारूनही लवकर न उठणारी मुलं, आज बाबाच्या एका हाकेत उठून अजिबात आवाज न करता आवरून तयार होती…. हा गोड धक्का कमी वाटावा तर काही वेळातच ऑफिसला गेल्यानंतर, दर दोन तासानी नवरोजींचे येणारे फोन सुरू झाले. गोळ्या घ्यायची आठवण नवरोजी न विसरता देत होते.

“तू मला फोन करत तर नाहीसच पण मी केला तर घेतही नाहीस, येव्हढं काय काम असतं ऑफिसमधे ???  ” हा बायकोमंडळाचा सार्वजनिक मुद्दा तिच्याहीकडे आहेच… पण या आजारपणाच्या दिवसात तो पार धुवून निघत होता. सकाळी सगळं काम आवरून बाहेर पडणारे घरातले बाकिचे मेंबर्स , ’तुम्हाला माझ्या कामाची कदर नसते ’ वगैरे तिचे स्वत: दमल्यानंतरचे आरोप बिनबूडाचे ठरवत होते 🙂

नेहेमी ’चटपटं आणि यम्मी ’ जेवायला दे हा हट्ट असणारी मुलं , “मम्मा आम्हाला वरण भात खायचाय ” असे समजूतदारपणे सांगून आईच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होती.

सगळं तसच चाललं होतं जे एखाद्या साध्या ’सुरळित’ चालणाऱ्या घरात चालायला हवं !!! पण हे ’सुरळित’ चालणंच यावेळेस तिला विचारात पाडत होतं …. किती गृहित धरलेलं असतं ते आपणं …. लहानशी पिल्लं ,आईला काम पडू नये म्हणून स्वत: स्वत:च काम आवरताना पहाणं हा भाग्ययोग असावा, हा सोप्पा विचार मनात डॊकावत होता !!!

होता होता बरी झाली ती… मित्रमंडळाने एकटं पडू दिलं नाही आणि जपण्यात घरचे कमी पडले नाहीत 🙂

मनावरची आवस दुर होतं चंद्राची कोर आकार वाढवत होती….

महिनाभर घराबाहेर न पडता आलेले तीचे कुटूंब मग किराणा घ्यायच्या निमित्ताने मॉलच्या आवारात शिरले… तिला आता मान हलवता येत असल्याने, बोलताही येउ लागले होते…. 🙂

सगळं ’सुरळित ’ …. म्हणजे अगदी आपल्याला गाडी पार्क करायची असल्याने कोणी तरी त्यांची गाडी अगदी हुकूमी रिव्हर्स घेत असावे, पार्किंगची समस्या हा प्रश्न आपल्याला न पडण्याची खबरदारी घेतल्यासारखे ….. बाहेर सुरेख गार हवा असावी…. आपल्या मनातले त्रासदायक  विचार तीने होळीच्या आगीत मनातल्या मनात टाकलेले असावे….

’ती’ कितीतरी दिवसांनी मनापासून हसली 🙂

नवरोजी आणि मुलं , “आम्ही आलोच ” म्हणून कुठेतरी गेली तिची …. ती आपली सामानाच्या रांगामधून फिरत होती… स्वत:च स्वत:शी संवाद साधत… “महिला दिन”शब्दाचा , स्त्रीमूक्ती वगैरे उहापोहाचा अर्थ स्वत:शी लावत तीने नेहेमीची खरेदी केली.

गाडीपाशी परत पोहोचली ती, नवरा आणि मुलं अचानक कुठूनतरी प्रकटले…. तीने हसून विचारलेही, “काय टपून बसले होतात का कुठे मी यायची वाट पहात ?? ” 🙂

मुलं गाडीत बसली आणि ती तिच्या जागेकडे वळली… तिथे असलेली सामानाची पिशवी पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने त्या तिघांकडे पाहिलं , ते पुन्हा ओरडले  “सरप्राईज “ 🙂 ….त्या पिशवीत काय होतं, सोन्याचा हार बिर …छे, मुळीच नाही … त्यात होतं एक सरप्राईज 🙂 .. या फोटोतलं …..

खूप मोठं नाही… छोटसं…. त्या मॉलमधल्या गेल्या दोन तीन चकरांमधे तिने उचलून उचलून पाहिलेलं आणि  किंमत पाहून नेहेमीप्रमाणे परत ठेवलेलं. 🙂 … साधीशी आवड तिची, तिने न उच्चारलेली न उल्लेखलेली ….. तिच्या घरच्या मंडळींनी कधी तरी लक्षात ठेवलेली 🙂 …. ती खुश होत होती ….. ती पुन्हा ’ती’ होत होती… हसणारी, खुश होणारी आणि हो मान हलवत बोलणारीही 🙂

गाडीमधे गाणं लागलं तितक्यात , “तेरे जैसा यार कहा “  ….. सगळं ठरलेलं म्हणजे … गाणं ठरलेलं, गिफ्ट ठरलेलं …. मुख्य म्हणजे ती आपली आहे , सध्या नाराज आहे, तिला हसवायलाच हवं हे पक्कं ठरलेलं 🙂 ….

“मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगाके

बैठा दिया फलकपें, मुझे खाक से उठाके….

यारा तेरी यारी को, मैने तो खुदा माना ” …….. 🙂

तिचा नवरा गात होता….तिच्यासाठी 🙂

एकही शब्द खोटा नव्हता … सगळं साधंस, प्रामाणिक 🙂

गाडी घराकडे धावत होती…. गाणी एकापाठोपाठ एक बदलत होती…. मुलं बोलत होती, हसत होती, खेळत होती, दंगा करत होती…..

एक  ” स्त्री ” एक महिला वगैरे विचारांच्या पुढे ती एक व्यक्ती, एक बायको, एक आई म्हणून क्षणोक्षणी तृप्त होत होती…. घरच्यांनी गिफ्ट दिले म्हणून का, ते आजारात काळजी घेत होते वगैरे म्हणून का ? तर नाही…. पण त्यांना तसे करावेसे वाटले म्हणून 🙂

मोठ्या मोठ्या वल्गना करताना , छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि जीवनातला आनंद हरवून जातो हे सत्य तिला पुन्हा सापडले होते.  मनात आनंद तृप्त असेल तरच तो ओसंडतो आणि ज्यांच्याकडे दु:ख असते ते दु:खच वाटणार जगाला, हा विचार मनाच्या कोपऱ्यात हरवलेला जणू 😦 … तोच विचार तिला पुन्हा गवसला आज …..”आयडियल” म्हणजे काय याचा नेमका हिशोब चोख समजला पुन्हा  🙂

गाडी तिच्या मार्गाने घराकडे निघाली होती… ती पुन्हा परतत होती तिच्या घरी 🙂 ….

खिडकीच्या काचेतून पौर्णिमेचा तेजस्वी पुर्ण चंद्र तिच्यासोबत निघाला होता 🙂 …. मनात एक सुर निनादत होता….. “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ” 🙂

Advertisements

34 thoughts on “या जन्मावर …..

 1. सुंदर गं ! डोळ्यासमोर आलं हा अगदी ! इथे आलीस की आधी आईला सांग…दृष्ट काढून टाकायला ! तुम्हां सगळ्यांची ! 🙂 🙂

 2. मनाचं असच असतं नाही… तोळामासा…. घटकेत प्रसन्न तर घटकेत उदास! त्यातून आजारपण आलं की अजूनच हळवेपणा वाढत जातो. किती छान व्यक्त केलीस भावनांची आंदोलने.

  हासत राहा गं बयो! 🙂

  • हो ना गं बयो….. >>>घटकेत प्रसन्न तर घटकेत उदास!
   कितीवेळा समजावलं तरी ऐकत नाही पठ्ठं 🙂

   तुम्ही आहात नं सगळे सोबत…. काहेको उदास होना 🙂

  • ऋता खूप आभार गं 🙂

   … बाकि हळवेपणा (प्रसंगी वेडेपणा वाटावा इतपत ) कायम आहे माझ्या जोडीला, तो इथे असा अधे मधे प्रकटतोच 🙂

  • आभार गं गौरी 🙂
   वाईट गेले गं मधे काही दिवस… नंतर वळून पहाताना वाटतय तितकसं नाराज होण्यासारखं काहीच नव्हतं, मी कधी नव्हे ते मुर्खपणाला महत्त्व देण्याचा मुर्खपणा करत होते 🙂

   अभी एकदम भला चंगा… गंमत बघ, आपल्याला रडायला जागा आहेत एकदा समजलं की रडू येइनासं होतं 🙂

 3. अप्रतिम.. दर वेळी इतके छान कसे काय जमते लिहायला तुम्हाला.. फार छान.. 🙂 नकळत डोळे कसे पाणावले कळलेच नाही.. खरच कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी केवढा ठेवा होवून जातात ना.. 🙂

  • आधि मला एक सांग हे “तुम्हाला ” काय आहे?? ’तू’ म्हणं गं 🙂

   छोट्या छोट्या गोष्टींकडेच नेमकं दुर्लक्ष करतो गं आपण आणि कष्टी होतो… हा छोटा छोटा आनंद मोठा होत होत , समाधान आणि मग तृप्ततेच्या पायरीला पोहोचतो 🙂 (जास्त होतीये नं फिलॉसॉफी 🙂 )

   प्रतिक्रीयेसाठी मन:पुर्वक आभार 🙂

 4. आयुष्याच्या हेतूवर कितीही संदेह घेतला तरी आयुष्य त्याच्या काम निर्हेतुकपणे करतच राहत.
  आणि मग कुणी अश्यातच हळूच अंतःकरणातून तृप्त व्हावं …. आणि त्याला बघून आपल्यालादेखील हळूच तृष्टतेचा अनुभव व्हावा …. असंच काहीतरी फील होतंय …
  बाकी ह्यावेळी भली मोठी कमेंट लिहून दृष्ट लावायची नाहीये ….
  तरी काढूनच घेशील माझ्या नावाची. 🙂

  • 🙂 🙂 🙂

   बाकि मला कोणितरी सांगितलेय की ताईला तिच्या भावांची दृष्ट लागत नाही, किंबहूना अश्या दृष्ट लावणाऱ्यांना भाउ चांगले ठोकून काढतात 🙂

   अरे हो ’धन्स’ म्हणतो नं आपण आजकाल 🙂 😉
   (मारणार तू आता मला 🙂 )

  • आणि मी म्हणतेय की तुझी कमेंट किंवा मेसेजही का नाहीये ? 😦

   हे वर्डप्रेस आणि ब्लॉगर दोघेही वेडे आहेत 😦

 5. तन्वी,

  गेले १० दिवस मी तुझ्या ब्लॉग ची पारायणं करत आहे. आजच संपवले सगळे. तुझ्या बऱ्याच लेखांना प्रतिक्रिया द्यायची होती पण म्हटलं शेवटीच द्यावी. खूप छान लिहितेस तू… अगदी सहजच सुचलेलं शब्दांत उतरतं आणि म्हणूनच खूप भावतंही. खूपदा वाचताना वाटायचं कि अरे हे तर आपल्यालाही म्हणायचं असतंच कि पण फक्त शब्दांत नाही मांडता येत. बेस्ट ऑफ लक तन्वी. अशीच लिहित राहा. सहजच.

  श्रद्धा

  • श्रद्धा खूप खूप आभार आणि ब्लॉगवर मन:पुर्वक स्वागत 🙂

   तू अशी मनापासून कमेंट लिहीलीस पण मलाच उत्तर द्यायला उशीर होतोय…. तब्येत जरा नरम गरम असल्याने ब्लॉगवर माझाच वावर कमीये सध्या ….

   असो, येत रहा अशीच नेहेमी…. 🙂

  • किती छान वाटलं तुझी कमेंट वाचून… कौतूक आवडतच नं माणसाला, पण आजारपण-दवाखाने- औषधं अश्या भलत्याच चक्रात गरगरत , एकूणातच जरासं निराश असताना अशी कौतूकाची पावती म्हणजे मग मज्जा एकदम 🙂

   मन:पुर्वक आभार आणि ब्लॉगवर स्वागत!!! 🙂

 6. बेस्टंय… अशी काळजी न विचारता कुणी घेतली की कसं मनाला अप्रतिम समाधान लाभतं …

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s