फ्रेम….

सुट्टी ….. वर्षभरानंतर मिळणारी सुट्टी…. अगदी विचारपुर्वक प्लॅन आखून घालवायची असं ठरवलेली सुट्टी….. आम्हीही ठरवली होती… जुलैमधे सुरू होणारी सुट्टी, त्यासाठी जानेवरी- फेब्रूवारीतच ठरवलेली ठिकाणं….

मुळात ही सुट्टी म्हणजे  ’वर्षभराच्या कामाच्या शिणवट्याला घालवण्यासाठीचा वेळ’  हा एक मुद्दा आणि तसेच पुढच्या वर्षाच्या कामासाठीचा उत्साह साठवण्याचाही वेळ…. इथे जाऊ- तिथे जाऊ वगैरे चर्चा …. इंटरनेट्वरची शोधशोध ….. सगळं पार पडत असताना एक मस्त सकाळ आली आयूष्यात …. सकाळी उठायला गेले आणि कळलं आपल्याला उठताच येत नाहीये… मान-पाठ- खांदे वगैरे अवयवांनी पक्का असहकार पुकारला आहे. त्यादिवशी कशीबशी वेळ निभावली खरी …. पण साधारण महिन्याने आणि एक सकाळ पुन्हा अशीच आली….. यावेळेस तर उठता न येण्यासोबतच कमालीच्या चक्कर येण्याचीही सोबत होती…. दवाखान्यात गेले तर ते ही थेट ऍंब्युलन्समधून अगदी सायरनच्या दणदणाटात ….

हे आजारपण काय आहे वगैरे शोधाशोधात गेले २-३ महिने ….. सरळ भारत गाठला मग त्यासाठी, गड्या आपला देश बरा म्हणत…

एक म्हण वाचली होती पुर्वी , Life is what happens to you when you are busy planning other things !!!  😦 🙂

मुळात ज्या म्हणी पटतात त्या लक्षात रहातात ….. आणि त्यांचा प्रत्यय आला की त्या जास्त पटतात …. मग ते सुट्टीचे प्लॅन्स वगैरे राहिले कागदावर ….. आणि सुट्टी लागण्यापुर्वीच भारतात जावे लागले. एक नाही दोन नाही , तीन तीन डिस्क स्लिप झाल्या आहेत मानेत , माझ्या मानेचा मला न समजणारा MRI माझे डॉक्टर मला समजावत होते …..नुसत्या सरकून थांबल्या तर त्या माझ्या डिस्क कुठल्या , त्यांनी बिचाऱ्या स्पाईनची पार गळचेपी केली…. “गळयात होणारी गळचेपी ” ही कोटी तेव्हा मनात आली नाही इतपत दु:खी मी  नक्कीच झाले होते …. आजारपण स्वत:ला येतं म्हणून त्याचा जितका त्रास होतो त्यापेक्षा कित्येक पट जास्त आपण ज्या वर्तूळाच्या केंद्रस्थानी असतो त्या वर्तूळाच्या परिघावरच्या लोकांना होणाऱ्या यातना छळ मांडत असतात.

डॉक्टरांनी सांगितलेले ऑपरेशन टाळायला मग सेकंड, थर्ड वगैरे ओपिनियन घेणे आले…. ते तसे घेतले गेलेही ….. मनात एक सततचा प्रश्न  होता , ’हे का झाले ? ’ आणि  ’हे मलाच का झाले ?’ 🙂 …. मग आमच्या हेरंबाने एक सल्ला दिला, ” आधि Why me ? ” हा प्रश्न विचारणं बंद कर …. तो बंद करायचा ठरवलंही लगेच, आचरणात आणणं नाही म्हटलं तरी तितकसं सोप्प नव्हतं…. आपल्या आयूष्यात काही छान-भन्नाट घडतं नं, ते चटकन स्विकारलं जातं…. पण मेलं हे आजारपण तितकसं वेलकम होत नाही ….. त्यात आई-बाबा, आजी-मामा-मामी, माझी पिल्लं, बहिण आणि खंबीरपणाचा उसना आव आणलेला नवरा यांचा विचार सगळंच अवघड करत होता!!!

असो, ते ऑपरेशन टळलं एकदाचं…. पण आराम मागे लागला….  सुट्टी गेली दवाखान्यांच्या फेऱ्यांमधे…. अधे मधे चिडचिड वगैरे सुरू होतीच माझी…. आणि माझ्या चिडचिडीचा जराही अनूभव नसलेले माझे आई-बाबा कावरेबावरे होत होते….. एकदा सकाळी उठले तर पाहिलं बाबा खिडकीतून येणारे उन अडवण्यासाठी पडदे सारखे करत होते…. ही सावली त्यांनी कायमच दिलीये आम्हाला. नेहेमी ते असे हलकेच पडदे सरकवून जातात तेव्हा आम्ही झोपलेलो असतो इतकेच…. उठून त्यांच्या मागेच गेले तर स्वयंपाकघरात ते डोळ्यातलं पाणी आवरत आईला सांगत होते , “घेऊन टाकता आलं ना तिचं दुखणं तर लगेच घेऊन टाकेन मी!!! ” 😦 …. त्यादिवशी नुसती उठलेच नाही तर झोपेतून जागीही झाले….

बाबा सकाळी पुजेनंतर रामरक्षा म्हणतात आणि मग झाडांची फुलं काढायला जातात हा क्रम सहसा न चुकणारा…. त्यादिवशी मी फुलांची परडी हातात घेतली आणि अंगणात गेले…. स्वत:ला एकच बजावले , असाध्य काही झालेले नाहीये, पुरे आता ही सहानूभूती….  जे जमेल ,जितके जमेल,  जसे जमेल तसे सुरू झालेच पाहिजे आता….

घेतली फुलांची परडी हातात आणि अंगणाला प्रदक्षिणा घालायला लागले…. एक एक फुल हातात येताना त्यांचा टवटवीत तजेला मला देत होते जसे…. लहानपणी असेच मी फुलं आणून द्यायचे बाबांना…. या निमित्ताने पुन्हा लहान होता येत होतं…. कळीला धक्का लागू द्यायचा नाही असं स्वत:च्याच मनाला बजावत होते मी… म्हटलं तर खूप विशेष काही नव्हतं घडतं, पण मला खूप शांत वाटत होतं !! सकाळच्या एकूणातच कोवळ्या स्वच्छ्तेने मन निवांत विसावत असावं बहूधा…. माझ्या आजारपणाने माझ्या संपुर्ण कुटूंबाचे किती महिने असे काळजीत जाताहेत ही खंत विसरले मी काही काळ…. ’सुट्टी’ चे आखलेले बेत आठवले मग, वाटलं सुट्टी घेणार होते ती हा निवांतपणा मिळवण्यासाठीच की…..

मग कॅमेरा आणला घरातून, आपण हेच करतो नं फिरायला गेल्यावर, भरपूर असे फोटो काढतो…..

हा मग विरंगूळाच झाला एक , जमेल तेव्हा बागेत जायचे आणि फोटो काढायचे…..आज ते फोटोच टाकतेय एकामागोमाग एक….

मी फोटो काढायचे , आपल्याच बागेत फिरायचे ठरवले आणि तो आनंद साजरा केला आमच्या ब्रम्हकमळाने…. एक नाही दोन नाही सात फुलं आली त्याला यावेळेस…..

ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालेलो असतो , कोणे एके काळी जिथे बाहेरून कोणी ’काकू’ म्हणून हाक मारली की ती आईसाठीच असणार हे ठरलेले असते, तिथे ’ओ काकू बाहेर एक गंमत आहे, पहायला या ’ ही माझ्या मुलाच्या मित्रांनी मारलेली हाक मला नेहेमी वय वाढल्याची जाणीव करून देते…. 😉  बच्चेकंपनीला मी म्हणजे एक ’रिकामटेकडी’ काकू मिळाले होते त्यामूळे त्यांच्या विश्वातल्या लहानमोठ्या घडामोडींमधे ते मला सामील करून घेत होते , त्या मुलांनीच दाखवलेली ही एक गोगलगाय 🙂

कितीही प्रकारची फुलं माहित झाली तरी गुलाबाचं फुलं आवडतंच…. नाही का??

गुलाब जसा आवडता तसेच अत्यंत आवडते म्हणजे गणेशवेल, गोकर्ण आणि गुलबक्षी ….. गुलबक्षीचं एक बरं असतं पाऊस आला की ही रोपं आपली आपण येतात…. बहरतात , रंगांची उधळण करतात…. सगळा सौम्य कारभार…..

एक नाजूकशी गोगलगाय जशी दिसली तसे बाकि प्राणी-पक्षीही हजेरी लावत होते ….. कधी कॅमेरा हातात असताना सापडायचे तर कधी आठवणीत जागा पटकवायचे…..

चांदणीची फुलं काढताना सापडलेले सुरवंट….

तर हा अचानक दिसलेला सरडा….

ही जवळपास तीन इंच मोठी गोगलगाय….. कुठून आली होती देव जाणे, मी मात्र पहिल्यांदा इतकी मोठी गोगलगाय पाहिली…..

मुळात पावसाळा सगळं कसं स्वच्छ लख्ख करत होता….. हळूहळू घराच्या अंगणातच मी मनापासून रमत होते 🙂

पानावरून ओघळणारे थेंब असोत ….

की स्वस्तिकाची आठवण करून देणारे पपईचे फुल असो…..

की अगदी भुछत्र असो….

की अगदी गुलाबी लालबुंद डाळिंब असोत…. सगळ्यांनी मला उभारी दिलीये हे नक्की!! 🙂

मनावरची काळजी हटणं किती महत्त्वाचं असतं नाही…..अंगणाची एक नवी व्याख्या समजली मला त्या दरम्यान एक…. अंगण नं एक ’फ्रेम’  असतं….. सुंदर फोटोभोवती तितकीच सुरेख, रेखीव नाजूकशी फ्रेम असली की मुळचा फोटो कसा उजळून निघतो नं.. तसं प्रेमाने भरलेल्या घराभोवतीचं अंगणं, त्यातली झाडं-पानं -फुलं अशीच मुळच्या घरातल्या भावभावनांचं सौंदर्य वाढवणारी असतात..असावीत … 🙂

फोटोला सुरक्षित ठेवणारी, त्याला धक्का लागू न देणारी ’फ्रेम’ ….. फोटोतल्या व्यक्तीच्या स्वभावाचे वैशिष्ट्य पहाणाऱ्याला अलगद , गुपचूप सांगणारी ….. तसेच या अंगणाने मला सुरक्षित ठेवले…. मनाला (मानेला 😉 ) घड्या पडल्याच होत्या , त्यांना हळुवार सांभाळले, फुंकर घातली…..

कधी कधी वाटतं सुट्टीला कुठेतरी गेले असते तर मनात इंद्रधनूष्य साठवायलाच नाही का ? आकाशाची ती सप्तरंगी उधळण मनात साठवायलाच नं…. मनमोराचा पिसारा वगैरे फुलवायलाच नं …..

यावेळेस मात्र जरासा ’काखेत कळसा’ असल्याचा प्रत्यय आला मला 🙂

इंद्रधनूष्यही अगदी हाक मारल्यासारखे हजर झाले 🙂

मन उजळले मग चटकन…..

माझ्यापायी घरच्यांचाही सुट्टीच्या भटकंतीचा विरस झालाय ही बोच आहेच तशी, पण निदान आजारपण सुसह्य झाल्यामूळे त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद तरी वाढला!!!

खूप खूप लिहू शकतेय मी… लिहायचेही आहे मला , पण आत्ता नाही…. माझ्या डॉक्टरांनी मला सध्या ’शिपायाचं’ काम कर असं सांगितलेय… एका जागी बसायचं नाही…. हातातली कागदपत्र वाटत असल्यासारखं सतत एका जागेवरून दुसरीकडे जायचं 🙂 … तेव्हा एका बैठकीत खूप कमी लिहीता येतेय मला ….

ही पोस्ट बिस्ट काही खरच  नाहीये तशी… जाता जाता एक छोटा प्रयत्न करावा वाटतोय एक ….

गेल्या सहा महिन्यात ’ मला उत्तरं द्यायला जमत नसल्याचा ’ कुठलाही राग मनात न आणता मला सतत मेल्स, मेसेजेस, फोन करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मंडळींचे आभार मानण्याचा…. मला भेटायला येणाऱ्या, माझे रिपोर्ट्स डॉक्टरांना वैयक्तिक नेऊन दाखवून सल्ले घेणाऱ्या अनघा ,राजीवजी , सुनीतचे आभार मानण्याचा…..

कमेंट्स टाकत रहाणाऱ्या आणि ब्लॉगवर काहिही नवे नसतानाही चक्कर टाकणाऱ्या नव्या आणि जुन्या वाचकांचेही आभार!! 🙂

आणि काय लिहू, तुम्ही सगळे हातात हात घालून माझ्याभोवती एक कडं उभारलेलं दिसतय तोवर कशाला भीत नाही ब्वॉ मी …. एक अत्यंत सुंदर फ्रेम आहे किनई माझ्याभोवती , नाजूकशी तरिही अत्यंत भक्कम……

बस फिर और कुछ नही, आजके लिये इतनाही …. जशी जमेल तशी पुढची ’पोस्ट’ टाकतेच!!!

47 thoughts on “फ्रेम….

 1. संगणकाचा वापर मर्यादित करायचा ही एक चौकटही आखून घ्यायला लागेल. अर्थात त्याने काही बिघडत नाही .. बरचं जग संगणकाबाहेर आहे अजून – त्याचा फायदा नक्कीच होईल 🙂

  • हो गं ताई संगणकाचा वापर मर्यादितच करण्याचं बंधन घालून घेतलेय स्वत:ला ….

   >>>बरचं जग संगणकाबाहेर आहे अजून … अगदी खरं!!

   प्रतिक्रीयेसाठी मन:पुर्वक आभार गं!!

  • >>>I thought, you will stop writing further,

   अवघड आहे रे….. इथे लिहिणं बंद केलं तर घरी बडबडत राहीन…. 😉 … कोण ऐकून घेइल सांग इतकं 🙂

   आराम सुरूच आहे…

   बाकि तूझ्याशी बोलत नाहीये मी…थापाडा कोणिकडचा …. म्हणे नासिकला येतोय!!! खरच येइपर्यंत ’किंचित कट्टी ’ 🙂

 2. कड्याची उपमा जाम भारी आहे. आपल्या सगळ्यांभोवतीच असं एकेक कडं आहे, आपल्या सगळ्यांचं बनलेलं कडं :))

  रच्याक, एक वाक्य आठवलं.

  If you want to make God laugh, tell him about your plans.
  -Woody Allen

  असो.. काळजी घे.

  • >>>If you want to make God laugh, tell him about your plans.
   -Woody Allen

   🙂

   देवावर रागावले नाहीये रे अजूनही …. संकट दिलं तरी , सावरणारी माणसंही दिलीच नं त्याने 🙂 .. माझ्या या बड्डेचं गिफ्ट सांगितलेय नं तूला…. 🙂

   असो… काळजी घेतेच आहे… किंबहूना दुसरा पर्यायही दिसत नाहीये….

   धन्य़ु रे…

 3. का?? हा प्रश्न विचारायचा नसतो,जे काही समोर येईल त्याला सामोरा जायचं असतं. ( फेसबुक काका स्टाईल मधे लिहिलं आहे)
  मला येणं जमलं नाही नाशिकला, कारण माझ्या कडे पण वेगळेच प्रॉब्लेम्स सुरु होते.असो,पुन्हा कधी भेट शक्य होते कोण जाणे.

  • महेंद्रजी अहो तुम्हाला बोलले नं मी, तुमचे अगदी अबूधाबीलाही काळजीचे फोन आले यातच सारे आले की …..

   माझ्या पुढच्या ट्रीपला नक्की भेटुया आपण सगळे….

 4. तन्वे, आजारपण त्याचा वेळ घेऊन जाते हे खरे असले तरी आपल्या मनातून त्याला हद्दपार करायला सुरवात केली की भोवतालच्या अनेक गोष्टींतून आनंद आपोआपच दिसू लागतो आणि आपल्या मनातही त्याचे पडसाद घुमायला लागतात.

  आता पुन्हा आजारी पडायचं नाहीये तेव्हां सगळेच जरा बेताने… 🙂 गोगलगायीच्या पावलाने… :):)

  फोटू एकदम मस्त!

  • हो गं बयो, मनातून हद्दपार करतेय आता हे दुखणे 🙂

   >>गोगलगायीच्या पावलाने… 🙂 🙂 …. हो गं अगदी अगदी!!

   तूझी भेट इतकी चुटपुटती झाल्याची रुखरूख लागलीये खरं तर…..

  • मॅडम मला बरं असतं तर आलेच असते नं मी तूला भेटायला… पण तू का नाही आलीस ? आता कट्टी !! 🙂

   पुढल्या ट्रीपला भेटूया, नाहितर तू ये इथे….

 5. Hiii तन्वी

  मस्त लिहिलं आहेस..आवडलं.

  आणि लिहिता लिहिता तू जे फोटो टाकले आहेस.. ते ही मस्तच आहेत.

  share केल्याबद्दल धन्यवाद..!!

  पूर्ण बागेची सफर झाली.. विशेषतः पपईचे फुल बहुदा पहिल्यांदाच पाहिले..thanx again

  तुझी तब्येत कशी आहे आता?

  take care.. and get well soon..!!

  bye.

  Tanuja

  • तनूजा आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   तब्येत ठीकच म्हणतेय आता मी …. लवकरात लवकर हे दु:स्वप्न विसरायचा प्रयत्न करतेय….

 6. सुंदर ! फोटो अगदी टवटवीत ! आणि आता बरं होण्याच्याच मार्गाला आहेस हे कसं अगदी शब्दाशब्दांतून दिसतंय ! सगळी पोस्ट त्या फुलांसारखीच हसरी, ताजी आणि टवटवीत दिसते आहे ! छान वाटलं ! डवरलेल्या फुलबागेतून फिरल्यासारखं ! 🙂

   • पोच दिलीत, धन्यवाद(माझ्या ही बाजूने, आणि पोस्टी करता ही, वरच्या मूळ कमेंट मधे धन्यवाद लिहाच राहील)

   • थांब रे… खूप दिवसाने आलेय नं ब्लॉगवर… रूळू दे बघू मला… मग ’हक्क’ असल्यासारख्या मिरवीन तुझ्या कमेंट्स 🙂

    आणि ते धन्य़ु मी ’सुरवंटा’ कडून म्हटलेय अरे 😉

   • सुरवंटरावा, फूल उमलले, रंग बहरले, छान छान तुम्हाला, आमच्या ताई साहेबांनी फ्रेम मधे पकडले… त्यांनाही आनंद दिलात, त्यामुळे खरे तर तुमचेच खूप खूप आभार

   • तायड्या, अजून पोचव ना सुरवंटरावांचे निरोप, खूप गम्मत येतीये 😉
    बाकी, तुमच्या अबुधाबीत पाउस पडतो का ग्?

   • 🙂 🙂 🙂 ….. सुरवंटाच मौन आहे आता… 🙂

    अबूधाबीचे फोटॊ फेसबूकावर टाकते 🙂

 7. तायडे ,
  कसले भारी फोटु काढलेस …… एकदम ठणठणीत बरी झालीयेस बघ …..
  आणी हे आजारपण वैगेरे ही आपली घेतलेली “सरप्राईज टेस्ट” आहे गं.फक्त काही वेळेसाठी आपली कसोटी लागते.आणि परीक्षेला कधी घाबरलोय का आपण ? आॅ…

  • >>>>आणी हे आजारपण वैगेरे ही आपली घेतलेली “सरप्राईज टेस्ट” आहे गं.फक्त काही वेळेसाठी आपली कसोटी लागते.आणि परीक्षेला कधी घाबरलोय का आपण ? आॅ…

   अगदी अगदी रे सचिन …. फक्त मी विसरतेय नं हे सारखं , मला टपल्या मारत जा अधूनमधून…. म्हणून म्ह्टलय मी ’तुम्हा सगळ्यांचं कडं’ आहे भोवती तोवर हम नय डरते 🙂

 8. तन्वी,
  खूपच छान वाटलं बघ तुझी पोस्ट बघून. पोस्टीतल्या फोटो प्रमाणेच तुही टवटवीत झालीयेस… आनंद झाला.
  संकटं आली तरी त्यातून सावरणारा भक्कम आधारही पाठी असतोच नं….. जगणं सुसह्य व्हायला आणखी काय हवं? काळजी घे गं. आपल्या दुःखाने व्यथित होणाऱ्या आपल्याच माणसांसाठी…. 🙂

 9. आम्ही नाशिक सोडलं आणि तू आता नाशिकला आहेस !! तिकडे असते तर तुला भेटायला नक्कीच आले असते.
  कां ? हा प्रश्न विचारून स्वतःलाच नको त्रास करून घेऊ.
  आमचा सध्याचा फंडा आहे – सगळ्या गोष्टी scheduled असतात आपण फक्त साक्षी भाव ठेवून त्रयस्थाच्या भूमिकेतून त्या गोष्टी निभावायच्या असतात.
  सांगायला फार फार सोपं आहे, पण आचरणात आणायला तितकंच अवघड….
  ‘कां?’ च्या चक्रव्युहातून बाहेर पडायचा मार्ग तू शोधलायस्‌ त्याबद्द्ल तुझं मनापासून अभिनंदन !! त्यामुळेच तर आम्हाला छान छान फोटो पहायला मिळाले.
  लवकर बरी हो!!!

  • अगं हो तू चेन्नईला शिफ्ट झाल्याचे समजले होते मला…. भेटूया गं आपण नक्की… तू ये नासिकला, अबूधाबीला, नाहितर मी चेन्नई ट्रीप करेन… मलाही श्रूतीला भेटायचं आहे!! फक्त आजारपण हे कारण तेव्हढं टळू दे!! 🙂

   >>आमचा सध्याचा फंडा आहे – सगळ्या गोष्टी scheduled असतात आपण फक्त साक्षी भाव ठेवून त्रयस्थाच्या भूमिकेतून त्या गोष्टी निभावायच्या असतात. …. खरय गं अगदी!!

   बाकि छान फोटोंबद्दल म्हणशील तर मुळात आपलं नासिक सुरेख त्यात पावसातलं न्हाऊन-माखून निघालेलं नासिक तर मस्तच असतं किनई…

   >>>लवकर बरी हो!!! …. नक्की मॅडम 🙂

   धन्य़ु गं!!!

 10. तुला खूप दिवसांनी ब्लॉग वर आलेलेल पाहून मस्त वाटले एकदम…
  पटकन बरी हो गं आता …खूप साऱ्या पोस्ट वाचायच्या आहेत आम्हाला सगळ्यांना…
  बाकी तुझ्या बागेचा हेवा वाटला बघ…मी असेच काहीतरी अबुधाबी ला शोधायचा प्रयत्न करत होते आणि म्हणूनच अबुधाबी नाही आवडली फार…
  काळजी घे…

  अनिता

  • धन्यू गं राणी 🙂

   >>बाकी तुझ्या बागेचा हेवा वाटला बघ…मी असेच काहीतरी अबुधाबी ला शोधायचा प्रयत्न करत होते आणि म्हणूनच अबुधाबी नाही आवडली फार…

   अबूधाबीबाबत बोलले होते नं तूला एकदा इथे ’वास्तव्यासाठी’ म्हणून आलीस की हे शहर नक्की आवडेल तूला… एक अनामिक आपूलकी मला पदोपदी जाणवते इथे 🙂 … मी आता चांगली तीन महिने राहून आलेय नं भारतात तरी इथे आल्यावर ’कुठून आले इथे ? 🙂 ’ असे काही होत नाही बघ…. आपलं घर असलं नं की ते गाव आवडायला लागतं….

   असो… काळजी घेतेच आहे गं…. तूच कधी येतेयेस इथे पुन्हा? यावेळेस जरा निवांत भेटूया आपण….

 11. अप्रतिम फोटो आले आहेत. निसर्गाने पण तुम्हाला साथ दिली इंद्रधनुष्याच्या रुपात …

  तब्येतीची काळजी पण घ्या कारण Health is wealth ….

  New address – jemanalabhidelte.blogspot.com

  • संजिवनी आभार आणि ब्लॉगवर स्वागत ….

   तब्येतीची काळजी घेतेय… किंबहूना सध्या तोच एककलमी कार्यक्रम चाललाय म्हटलं तरी चालेल…. 🙂

   येत रहा अशीच ब्लॉगावर 🙂

 12. बरं केलंस! मन मोकळं केलंस ते! कोणत्याही आजारात मोकळं मन हे सर्वात जास्त लवकर बरं होण्याचं औषध असतं!
  आता तू बरी झालीस….काही झालं असेल ते तुझ्या मानेला…ते होईल औषधांनी,व्यायामांनी वगैरे बरं!
  अशीच आनंदी आणि म(मा)नमोकळी राहा! 🙂

 13. तन्वी ताई,
  सुंदर आणि आशावादी लेख आहे.
  दोन वर्षापूर्वी मी आजारी पडलो होतो आणि मग ते आजारपण बराच काळ चालले. तेव्हा आयुष्य असेच नैराश्य आणि औदासिन्याने भरून गेले होते.
  अर्थात त्यातही मी आजारपणाचे कौतुक करत ही पोस्ट लिहिली. –>
  http://majhyamanatalekaahee.blogspot.in/2010/06/blog-post_3374.html
  आणि त्या इंद्रधनुष्याशी तर माझे फार जवळचे नाते असल्यासारखे वाटते.
  ब्लॉगची सुरुवात केली त्यातही त्याचा उल्लेख केला होता. —>
  http://majhyamanatalekaahee.blogspot.in/2010/06/blog-post.html

  • सागर 🙂

   आजारपणाने आपल्याला जे शिकवले तेच दुर्गाबाईंनी कसे सुरेख मांडलेय म्हणूनही पोस्ट टाकलीये बघ मी…

   तू दिलेल्या दोन्ही पोस्ट्स वाचल्या… त्या बहूधा आधिही वाचल्या आहेत मी पण त्यांच्याशी जोडली गेले नव्हते… आज तुझ्या पोस्ट्स ’शब्दश:’ उमगल्या!!

   आजारपण येऊ नयेच पण त्यनिमित्ताने बरंच काही शिकतो ना आपण….

   खूप खूप आभार रे!!

 14. छान आहे लेख ……
  आजाराला “दु:ख ” का म्हणतात ते स्वतः भोगल्याशिवाय नाही समजत …..
  आणि दुसऱ्याचे “दु:ख” पाहिल्याशिवाय स्वतःचे “दु:ख” किती छोटे आहे ते हि नाही जाणवत ……
  असाच एक अनुभव आठवला …..
  मी त्या वेळेस माझे पदव्यूत्तर अभ्यासक्रम ( post graduation….) करत होतो ….
  एकदा पाठीत अशी जोराची कळ आली की खालीच बसलो …तसा मी त्यावेळेस बऱ्यापैकी फिट असायचो ….व्यायाम करून कमवलेल शरीर होते ( आता बायको त्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही …. खर म्हणजे कुणीच विश्वास नाही ठेवत …… सगळे सध्य परिस्थिती बघतात ….) ..असो …..पण प्रवीणपण आजारी पडला ..आणि त्याला MRI करावे लागले हि फार मोठी खळबळजनक बातमी झाली ….. एक तर दुखणे ..त्यात अशी बातमी पसरणे …मी फारच डिप्रेस झालो ….१० दिवसांच्या विश्रांती नंतर परत काम चालू केले ….पण दुखणे बंद झाले नव्हते …..पण मला आजाऱ्या सारखे पडून राहणे आवडत नव्हते .. दिवसभर भरपूर काम होते …फार थकायला झाले .. काम रात्रीपर्यंत चालू होते …मग विचार केला आता जरा आराम करूया …पण …. जरा पाठ टेकवतोय तोच urgent call …. पेशंट आहे…. फीट येतायत …लवकर या ….. पटकन उठलो …५-६ वर्षांची मुलगी … मतीमंद …. हात-पाय जोरात झाडत होती … पट पट शिरेत इन्जेक्शन दिले ….मुलगी शांत झाली …म्हणजे फिट थांबल्या …. नंतर सर्व सोपस्कार आटोपेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली …. चेहऱ्यावर थकवा ,वेदना जाणवायला लागल्या….. नर्स म्हणाली बाकीचे काम सकाळी करा… पण कुठे काही अडू नये म्हणून सगळे संपूनच टाकू म्हणून बसून राहिलो ….. त्या मुलीचे वडील सगळा वेळ माझ्यासमोरच उभे होते …सर्व काम झाले …समोर लक्ष गेले..तिचे वडील … चाळीशीतील …. चेहऱ्यावर कृतज्ञता …. मी म्हणालो बसा …तसे संकोचून बसले ..मग सर्व फॅमिली हिस्ट्री घेतली …..आणि अचंबित झालो …… तो एक साधा रिक्षा ड्रायव्हर होता … एकूण ३ मुली …..ही पेशंट सोडून दुसऱ्या २ … हिच्यापेक्षा मोठ्या ….. सर्व मुली मतीमंद …सर्वांना फीट येते ….सर्व मुली हात पाय आकसून कडक झालेल्या …… मला म्हणाला तुम्ही फार मदत केली … मागच्या वेळेस डॉक्टर बऱ्याच वेळाने आले … म्हणाले chronic case आहे ,काही problem नाही ….. माझ्या मुली चांगल्या होतील का हो ? ..मी हवा तेवढा पैसा खर्च करीन .. डोळ्यात पाणी वाहत होते ….. मी काय सांगू ? ..हे मलाही आणि त्यांनाही माहित होते कि त्यांच्या मुली काही बऱ्या होणार नाही ……………. काहीच न बोलता त्याच्या खांद्यावर थोपटून लगेच निघालो …रूमवर आलो…. लगेच बेडवर आडवा झालो …. पण झोप काही येत नव्हती …. डोक गरगरत होते …. डोळे भरले होते…… त्या पित्याचा प्रश्न पाठ सोडत नव्हता …. पाठीच दुखणे कधीच विसरून गेलो होतो ……………………………..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s