ना रुक्मिणी ना भामा,
ना राधा ना मीरा….
प्राजक्त होत धरेस मिळावे,
असे वाटते रे कान्हा….
तिन्ही लोकांची सुरेल दाद,
पंचप्राणात व्हावी सहज जमा….
तुझ्या वेणूची धून व्हावे,
असे वाटते रे कान्हा….
तुझ्या श्वासात जन्मावे मी,
तुझ्याच गंधाने दरवळावे….
वाऱ्याच्या लाटेवर विहरत जावे,
असे वाटते रे कान्हा….
रेशीमपट उलगडत जाता,
तुझाच नाजुक सुरेख शेला ….
मोरपिशी तो स्पर्श व्हावे,
असे वाटते रे कान्हा….