तुला का लिहावसं वाटतं किंवा कविता का करावीशी वाटते?
जे सुचतं ते कसं सुचतं?
केव्हा सुचतं?
का सुचतं?
जे सुचतं ते असं एकटाकी उतरतं का?
किंवा जे उतरलय ते नेमकं तसंच सुचलं होतं का?
लिहायला गर्दीत सुचतं की एकांतात?
अश्या कितीतरी प्रश्नांची उत्तर हवी असतात सगळ्यांना आणि बहुतेकवेळा ती नसतातच लिहिणाऱ्यांकडे. किंवा असा काही सगळ्यांसाठी म्हणून सर्वसमावेशक असा नियम नसतो. प्रत्येकाची उर्मी वेगळीच. प्रत्येकाची कविता जशी वेगळी तशीच लिहावसं वाटण्य़ाची जाणीव आणि नेणीवेच्या पातळीवरची कारणंही वेगवेगळी. अज्ञातातून का येतात हे शब्द आपल्या भेटीला, का असते ही भेट इतकी तोकडी की नाही दिला लगेच न्याय या आलेल्या शब्द पाहुण्य़ांना तर गुढ रहस्यमय, न हाती येणाऱ्या अवकाशाच्या विस्तीर्ण पोकळीत ते परत का निघून जातात याचं पृथ:क्करण करण्य़ापेक्षा आलेल्या शब्दांना आंजारावं, गोंजारावं. त्यांना सावरता सावरता त्यांच्याच समर्थ हातात द्यावं आपलं सुकाणू आणि निर्मितीच्या सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावं हे जास्त संयुक्तिक ठरतं.
मला नसते कल्पना,
परतून याल कधी ते…
किती क्षणांचा,
किती जन्मांचा,
फेरा पार कराल ते…
आणि
तुमच्या पुनर्जन्मापर्यंत,
मी भटकते,
अस्वस्थ असते,
इच्छा अपूर्ण असलेली मी
तिष्ठत मुक्तीची वाट पाहते …
आहात सामोरे तोवर,
मला तुम्हाला भेटू दे…
माझ्या शब्दांनो,
तुम्ही परतण्यापूर्वी,
मला तुम्हाला गाठू दे!!
हाती आलेल्या शब्दांचे सहज सादरीकरण करणारे प्रतिभावंत कमीच कारण येणारे शब्द उलटसुलट क्रमाने मनात येतात आणि या अवखळ मुलांची मोट बांधून त्यांना शिस्तीत उभं करत कविता उभी राहते.
एखाद्या आठवणीची, भावनेची, घटनेची, अनुभवाची, निसर्गाची नोंद हे कवितेचं ढोबळ रूप पण याच आठवणीतली, अनुभवातली न बोलली गेलेली, प्रकट न जाणवलेली एखादी शब्दांपलीकडली सूक्ष्म नाजुक नक्षी कविता अलवार तोलून धरते आणि हे तिचे सामर्थ्य असते. बडबडगीतं, शाळेतल्या कविता, चित्रपटांमधली गाणी असं होता होता प्रवास होतो खऱ्या कवितेपर्यंत. अर्थात ही वाट तशी अनवट, इथे सगळेच येतात असे नाही. मग पुन्हा वर्गीकरण होत जातं ते वाचणारे आणि लिहीणारे असं. बरेचदा कविता वाचता वाचता लिहीलीही जाते.
मुळात कविता येते ती एकट्या कवीच्या भेटीला, ती लिहीलीही जाते ती स्वत:साठी. मनात असं काहीसं साठून येतं आणि ते कागदावर उमटत जातं. त्याची पुनर्र्चना किंवा त्यात बदलाचे संस्कार होतात ते ती रसिकांसमोर येण्याआधी. कवीच मग पुन्हा पुन्हा भेटत जातॊ आपल्या कवितेला रसिकांच्या माध्यमातून. कित्येकदा कवितेचा भावार्थ अधिक गडद होत जातो तो ती कविता रसिकांनी स्विकारल्यानंतर. एक दोन दिवसांनंतर गाढ रंगत जाणाऱ्या मेंदीसारखी रंगत जाते कविता.
ही प्रक्रिया मोठी गमतीदार वाटते मला. कधी कधी अशी झरकन पाचेक मिनिटात पानभर भेटणारी कविता कधी कधी हट्टी मुलासारखी अर्ध्यात जी म्हणून अडून बसते की विचारता सोय नाही. कधी लिहून झाल्यानंतर हवा तो अर्थ हाती लागतो आणि कधी शब्द मोठे सुरेख येतात गाठीला पण अर्थ हवा तसा प्रकट होत नाही,
रामदासांनी म्हटलय,
कवित्व शब्द सुमन माळा
अर्थ परिमळ आगळा…
हा अर्थाचा सुगंध भलता महत्त्वाचा. शब्दांत व्यक्त झालेल्या कवितेला शब्दांच्या पलीकडचे अर्थ वाहून नेता यायला हवे आणि तसे साधले की कविता फार लांबचा पल्ला गाठते. कवीच्याही फार पुढे निघून जाते मग ही कविता, सामर्थ्यवान बनते ती. सरळ साधं, सोप्पं काही, ते आशयगर्भ, दुर्बोध काही, या कवितेवर लयबद्धतेचे, वृत्ताचे, यमकांचे, प्रवाहीपणाचे, रुपकांचे आणि न जाणो कसले कसले ओझे असते. ती ते पेलते किंवा ते झुगारून मुक्त वाहत जाते… दोन्ही रूपात खुलून दिसते हे मात्र नक्की.
कविता…नॉट माय कप ऑफ टी ते हल्ली कधीकधी ग्रेसही थेट समजतात, पोहोचतात असा झाला माझा प्रवास. ही प्रगती फार मस्त आहे, हा प्रवास न होता तर फार काही राहून गेले असते. अमृता प्रीतम, गुलज़ार,अरूणाताई, पु शी रेगे, इंदिरा संत, अश्या कित्येकांनी बांधलेल्या ’सुमन माळा’ आहेत या वाटेवर. या वाटेवरच्या प्रवासात शब्द आले भेटायला आणि आपणंही लिहावं असं वाटत गेलं…
नसलेल्या कवीकडे,
शब्दांनी भेटीला यावे….
निष्पर्ण फांदीवर कोण्या,
पाखराने अवचित उतरावे….
ही पाखरं कोण्या कोण्या देशाची भटकंती करून येतात आणि मग तिथली गाणी कानात गुणगुणतात. या गाण्यांना कागदावर उतरवले की कवितेला वाट फुटत जाते… पुढचा प्रवास मात्र ही कविता स्वत:च स्वत:चा पार करते. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या निरनिराळ्या कथा सांगत जाते कविता.
कवितेच्या वाटेवरचा हा प्रवास न संपणारा आहे. गवताच्या पातीपासून अंतराळापर्यंतचा अवकाश व्यापते ही कविता. “मी आज एक कविता लिहीणार ” असं ठरवून काही लिहीता येत नाही कविता. तीच निवडते आपल्याला. “का लिहावसं वाटतं किंवा कविता का करावीशी वाटते?” याचं उत्तर तितकंच कठीण जितकं हा शोध घेणं की का वाटलं कवितेला आपल्याला निवडावसं. मात्र ती येते भेटीला आणि समृद्ध करून जाते. त्यादिवशी रोजचाच सूर्य अजून आवडतो, चांदणंही अधिकच टिपूर वाटतं.
कवितेला म्हणावसं वाटतं :
तू नसताना
किती गं काय काय करावं लागतं
मला एका पूर्णत्वासाठी,
आणि तू असताना,
हा गं काय प्रश्न??
तुझं “असणं ” हेच पूर्णत्व की!!
मैत्रीणीसारखी वाटणारी एकच कविता पुन्हा पुन्हा वाचताना दरवेळी नव्याने भेटत जाते, आपल्याला पूर्णत्व देत जाते. आपल्या सुगंधी अर्थाचे गंध आपल्या आयुष्याला देऊन जाते आणि मला वाटतं तेच कविता वाचण्याचं आणि लिहावीशी वाटण्याचं कारण आहे. कवितेचे, तिच्या शब्दांचे , शब्दांमधल्या अर्थाचे आणि त्या अर्थाच्या जीवनातल्या प्रतिबिंबांचें बिलोरी कवडसे जगण्याच्या आजच्या कॅलिडोस्कोपमधे!!!