“आई झोपलीयेस का ? ”
“काय गं ? झोपले नाहीये … पडलेय थोडा वेळ ….. ”
“मी पण पडू का इथे माझ्या बाळाला घेऊन ?? ”
” हो… ये.. फक्त बडबड करू नकोस…. झोपू दे त्या बाळालाही…”
” बघता बघता तीन महिन्यांचं झालं बघ आई माझं बाळं ”
” हं … झोपा आता …”
“हो हो !! अगं झोप येतेच आहे बाळाला पण झोपायचं म्हणून नाही त्याला… झोपायचं हं पिल्लू आता ’आजीशेजारी’ ”
(तुझ्यावरच गेलय तुझं बाळ हे अगदी ओठांवर आलेलं वाक्य आईने गिळून टाकलं !! )
” आई अगं याचं स्किन बघ कसं गुलाबी गुलाबी दिसतय !! ”
” त्याचं स्किन गुलाबी दिसलं तर दिसू दे आणि आम्हाला तू जरा वेळ झोपू दे !! ”
“अगं दिसू काय दे ??? बघ की जरा उठून … ”
“अगं लहान मुलांचं स्किन गुलाबीच असतं … ”
“माझं पण होतं का लहानपणी गुलाबी स्किन ?? ”
” हो होतं ”
“बघ माझं बाळ माझ्यासारखंच आहे ”
…………
…………
(शेजारी अगदी शांतता पाहून आईला वाटलं झोपलं की काय बाळ ?? … पहाते तर तिची मुलगी आणि बाळ गायब !!)
“अगं कुठे गेलीयेस त्या बाळाला घेऊन ?? ”
“कुठे नाही बाळाला टॉयलेटमधे आणलं होतं …”
“टॉयलेट ??? तुझा आवाज बेडरूममधून येतोय … ”
“अगं हो बाळं आहे टॉयलेटमधे, मी बेडरूममधेच आहे ”
( तीन महिन्यांचं बाळ टॉयलेटमधे ??? एकटं ??? आईला प्रश्नच पडला तसा …. पण आईने ठरवले होते की या मायलेकरांमधे आपण पडायचे नाही… घालू दे काय गोंधळ घालायचा ते !! )
(एकदाचं ते टॉयलेटमधलं बाळ आणि त्याची आई परत आली… आता यांचे कपडे बदलणं , पावडर लावणे, सोबत झालेच तर अखंड बडबड करणे वगैरे सव्यापसव्य चालेल या विचाराने त्या बाळाच्या आईच्या आईने अगदी डोळे मिटले…. मनात विचार केला हे ’प्रकरण काही थोडक्यात आटोपणारं नाही, नको आता यांची लामण पहायला !!’ … तसंही या गदारोळात डोळ्याला डोळा लागणं मुश्किलही नही नामुमकिन आहे !! )
“आई ssssssss गं !!!”
“कायेsssss गं ???? ”
“अगं ओरडतीयेस कशाला ?? तुला नाही हाक मारली ”
“म्हणजे इथे तुझी दुसरी कोण आई आहे मग.. तुच बेंबीच्या देठापासून ओरडलीस नं आईssss गं म्हणून ?? ”
” अगं ते ’हाक’ मारायचं आईssss गं नव्हतं…. ते आपल्याला ’दुख’ झालं की ओरडतो नं आपण ते वालं होतं ”
(बाळाच्या आईच्या भाषेतला बदल पहाता ती तिच्या खऱ्या वयात म्हणजे वर्षे पाचच्या भाषेकडे झुकायला लागली होती )
” हे वालं नं ते वालं …. दुख नाही आणि दु:ख असतं ते !! सॅड वाटलय का तुला , तसं सांगत जा गं बाई …. काय झालं आणि सॅड वाटायला ??? ”
“अगं बाळाचं स्किन बघ !!! ”
“सांगितलं नं एकदा असू दे ते स्किन गुलाबी म्हणून ”
“अगं ते नाही …. बाळाचं स्किन बघ पूर्ण फाटलय पाठीकडे ”
“स्किन फाट्लं ????? फाटलं का एकदाचं …. बघू …. ”
(खरच की गुलाबी टेडी बेअर बाळाच्या पाठीला चांगलीच चीर गेली होती .)
“आई स्किन फाटून आतून कापूस बाहेर आलाय बघ ”
“हं दिसला… ”
“आता काय करायचं गं ’मम्मा’ ??? ”
(चिमुकली आई प्रचंड केविलवाणी झाली होती !! )
“आता काही नाही… सुई दोरा घ्यायचा आणि शिवायचं ते बाळं ”
” हा सगळा कसूर दादाचा आहे, त्याला कितीदा सांगितलेय की टॉयबॉक्समधे माझ्या बाळांच्या अंगावर त्या रिमोटच्या कार टाकत जाऊ नकोस… त्यांचे ऍंटीना माझ्या बाळांना ’फाडतात’ ”
(छोट्या आईच्या तक्रारीत तथ्य होतं … )
“मी सांगते हं दादाला…”
“तू कशाला मीच बघते बेत त्याचा , बाळ माझं फाटलय ”
(छोट्या आईच्या डोळ्यात टपोरे थेंब आणि त्या थेंबांआड निग्रह होता …. बरोबरच आहे लेकरांवर बेतलं की आई रणरागिणीचा अवतार घेणारच … )
” कुठेय तो दादा ??? ”
” हॉलमधे गेलाय… व्हिडिओ गेम खेळणार म्हटला होता थोडा वेळ ”
“ए दादाsssss ….. गेम खेळतोयेस तू ??? ”
(दादाचं काही खरं नाही आता !! )
“दादा sssss … मला का नाही बोलावलंस रे.. जा कट्टी !! ”
(व्हिडिओ गेमने सध्या बाळाच्या काळजीवर मात केलेली होती ….. हातातलं गुलाबी स्किनचं बाळ त्या आईने स्वत:च्या आईकडे हवेतून भिरकावलं आणि ओरडली …)
“मम्मा कॅच .. तू सांभाळ आता बाळाला थोडा वेळ ”
(बाळाला असं उडायला शिकवून चिमणी आई स्वत:ही उडाली होती !! )
खऱ्या आईला खुदकन हसू आलं…. मगाचा आजीचा ’रोल’ बदलून आता आईला ’टेलरचा’ रोल मिळाला होता !!
तीने झोपेला राम राम ठोकला आणि सुई दोरा हातात घेतला…. त्या बाळाच्या फाटलेल्या स्किनला शिवायला सुई टोचली खरी पण कुठल्याही बाळाला अश्या वेदना झाल्या की आईला होणारा त्रास झाल्याशिवाय राहिला नाही !! ती सुई बाळाबरोबरच आईच्या मनाला टोचून गेली….
आईच्या लेकीने त्या टेडीरूपी बाळात प्राणप्रतिष्ठा केलेली होती !!
आईने ते बाळं हळूवार शिवून टाकलं… उगाचच आणि नकळत त्याला जोजावलं !!
ते ’टेडीरूपी’ बाळ कायम रहाणार नव्हतं… हा प्रसंग आईची मुलगी विसरणार होती तरीही आपण काय धरू पहातोय हे आईला समजत नव्हतं …. एक एक धागा, एक एक शिवण प्रेमाची विश्वासाची असावी का ?? की मुलांबाबत काहीही उसवलं तरी ,बिनसलं तरी ते जोडण्याचं सामर्थ्य आई पडताळून पहात होती … असेल काहीतरी किंवा काहीच नसेलही , आईला सवय आहे असं विचार करत बसण्याची !!
कदाचित आयुष्याच्या गांभीर्यावरचा हा पिल्लूसा ’उतारा’ आपल्याकडे आहे, असे वेगवेगळे रोल आपण करू शकतो की नाही याबाबत जग साशंक असलं तरी ते आपल्याइतके चांगले कोणीही करू शकत नाही असा विश्वास बाळगणारी मुलं आपल्याभोवती आहेत हे सोप्पंसं सत्य लक्षात ठेवावं आणि आनंदी व्हावं इतकंच असावं हे… !!
टेडीबाळ बरं होतं आणि ते आणि त्याची आई पुन्हा छानसं हसतात. आपल्याकडे अशी एक चिमुकली आई आहे म्हणून ’मोठी आई’ खुश होते.. आणि चिमण्या आईच्या चोचीतल्या गोष्टी विसरू नये म्हणून ती स्वत:च्या मनात त्यांची पक्की नोंद करून ठेवते…