महाराष्ट्र टाईम्स, 22.03.2018
(सुख़न -12)
’इश्कज़ादे’ सिनेमातले ’मैं परेशान परेशान’ पहिल्यांदा ऐकले तेव्हाच त्याच्या शब्दांमधले, मांडणीमधले वेगळेपण जाणवले होते. त्यानंतर ’सुनो ना संगेमरमर’ किंवा ‘डियर जिंदगी’मधली गाणी ऐकली, त्यामधे चाललेली वाट नवी आहे हे स्पष्ट होतं. ही गीतं तरूणाईसाठी होती त्यामुळे ती हळवी, तरल, प्रेमभावनेच्या अविष्कारांची होती. ती मीटरमधे बांधली जाणार हे गृहीत पण इथे मुक्तछंदाच्या अंगाने जात एक वेगळा पायंडा पडलेला दिसत होता. सहज शोध घेतला ही गाणी लिहिणाऱ्या व्यक्तीचा. आणि हा शोध मला “कौसर मुनीर” नावाच्या कवयित्री पर्यंत घेऊन आला. ’माना के हम यार नहीं’ नावाच्या गाण्याचं गारूड तर बराच काळ टिकलं;
माना के हम यार नहीं
लो तय है के प्यार नहीं
फिर भी नजरें ना तुम मिलाना
दिल का ऐतबार नहीं
कौसरची ओळख झाली की यातल्या ’दिल का ऐतबार नहीं’ मधे ती स्पष्ट दिसते, दिलेल्या एका प्रसंगानुसार गीत लिहिताना त्यावर स्वत:चं अदृष्य नाव कोरणारी. कौसरचा एक व्यक्ती म्हणून प्रवास मला खूप जवळचा वाटावा असे अनेक शब्द किंवा अर्थांची वळणं सापडत गेली सतत. चित्रपटांसाठी लिहीलेली गाणी आवडली म्हणून तिच्यापर्यंत पोहोचले पण मीटरच्या, चालींच्या बंधनात न अडकता गद्य आणि पद्याच्या सीमारेषेवर म्हणाव्या वाटणाऱ्या मुक्तशैलीतल्या तिच्या अर्थपूर्ण प्रवाही कवितांच्या मनापासून प्रेमात पडले. हिंदी, उर्दू, इंग्लिशचं अजब कडबोळं करत कौसर कविता लिहीते आणि त्या तिच्याच अश्या आत्मविश्वासाच्या वहात्या लयीत वाचते तेव्हा ती कविता एकदा ऐकून थांबणं होत नाही.
स्त्रीस्वातंत्र्य वगैरे व्याख्येच्या पुढे जाऊ पहाणाऱ्या, शिकलेल्या, संसाराचे उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या, मुलांच्या वाढींचे टप्पे पार करून जरा सुखावलेल्या, करियरमधे स्थिरावलेल्या, सगळी देणी देत स्वत:ला विसरलेल्या पण आता पुन्हा स्व पाशी येऊ पहाणाऱ्या आणि या वळणावर आरश्यात दिसणारं स्वत:चं आमुलाग्र बदललेलं रूप पाहून गोंधळलेल्या सगळ्यांच्या वतीने ती बोलते. ही स्त्री दु:खी नाही किंबहुना समाजमान्य निकषांवर ती अत्यंत सुखी आहे. तिने केलेली तक्रार ही ’सुख बोचणे’ सदरात मोडणारी आहे. चाळीशीच्या उंबरठ्यावरच्या पिढीचे म्हणणे ती मांडते. ’सच है’ नावाच्या कवितेत ती म्हणते ;
सच है, मेरी मानिंद खुशी का हर सामान है
वो हर लुत्फ़, हर तफरीह, हर तौर, हर तजुर्बा
जो मुझे दरकार था, आबाद है
फिर भी साहिर याद आता है,
’ये दुनिया मिल ही गयी तो क्या?’
मुझे गालिब ने बर्बाद किया
जो दिमाग रह गया वो फ्रॉईडने खराब किया
या इलाही ये माजरा क्या है?
अवतीभोवती स्त्रीमुक्तीच्या नावाने असलेल्या गोंधळात आधुनिकता म्हणजे सोशल मिडिया किंवा किटी पार्टी नव्हे हे जाणून वैयक्तिक पातळीवर स्व चा ठाम शोध करू पहाणाऱ्यांसाठी कौसर बोलते. आपल्याला अजून खूप काही करायचे आहे सांगताना ती म्हणते, ’अभी भी स्वर्णमंदीर जाना है, महाभारत पुरी निपटाना है’ तेव्हा ही ध्येयं व्यावहारिक बाबींच्या पुढे बुद्धीच्या थांब्याकडे जातात.
ये जिंदगी खुशनुमा भी हैं
ये जिंदगी बदनुमा भी हैं
इसे मिटाने की नही
निभाने की जरूरत बडी है !
असं सहज लिहीणारी कौसर कविता आणि शायरीच्या प्रांतात तुलनेनं नवी असली तरी तिच्या प्रसन्न, प्रगल्भ, सशक्त लेखणीची वाट मोठी आहे. प्रयोगशीलता असणारं सद्य जीवनानुभवांना सामोरं जात केलेलं अत्यंत सगुण सावरं तिचं लेखन त्याचं अवकाश निर्माण करेलच. तिची कविता थेट आहे पण ती बोचरी नाही, कौसरच्या रंगपेटीत अगदी नव्या प्रसन्न आजच्या रंगांच्या विविध छटा आहेत. दिग्गजांच्या मांदियाळीत स्वत:चं स्थान निर्माण करू पहाणाऱ्या, ’ये कविता अभी शुरू नही हुई’ नावाची वेगळीच मार्मिक कविता लिहिणाऱ्या कौसरची नोंद आजच्या सुख़नमधे!