✍🏻 तन्वी अमित
कतरा कतरा जिंदगी-०२
दैनिक पुण्यनगरी, १९.०१.२०१९
ज्यांच्या कविता, कवितांबद्दलची टिपणं, कथा, ललित असं अनेकांगांने समृद्ध लिखाण वाचत आपण साहित्याच्या अजून जवळ यावं. ज्यांचं साधं, निगर्वी, सात्त्विक तेज आणि अपार थक्क करून टाकणारा व्यासंग सतत मोहवत जावा, ’स्त्री’त्त्वाची सजग जाणीव, आत्मभानाची लखलखती वाट ज्यांनी सहज दाखवावी अश्या अरुणाताई बोलत होत्या, किंबहूना ’आपण छान गप्पा मारूया’ असं म्हणत संवाद साधत होत्या तेव्हा त्यांच्या भेटीसाठी जमलेलो आम्ही सगळेजण त्यांचा शब्द न शब्द मनात साठवून घेत होतो. कविता, साहित्य, पाश्चात्य आणि अगदी आपल्या मातीतला स्त्रीवाद असं अनेक विषयांच्या अनुषंगाने त्या भरभरून बोलत होत्या. किती अलवार, किती तलम, किती तरल आणि तरीही किती अर्थप्रवाही असं ते बोलणं, अदिवासी गीतं, ओव्या, वाङ्मयीन परंपरा, ताईंच्या बोलण्याचा पैस किती मोठा. काही सांगतांना अधेमधे येणाऱ्या कवितांच्या ओळी आणि संदर्भ.
अर्थात मी भारावलेलेच होते आधीपासून. माझ्या कवितांचं पुस्तक त्यांना नुकतंच दिलेलं होतं मी, वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हाताची उब मनात अजून होती. प्रत्येक क्षेत्रात आपली काही उपास्य दैवतं असतात तश्या कवितेच्या प्रांतात माझ्या आवडत्या, ज्यांना नमस्कार करावा असं वाटणाऱ्या नावांमधे ताईंचं स्थान अगदी मनाजवळ. त्यांच्या जाईजूईच्या सुगंधासारख्या मनभर रेंगाळणाऱ्या कवितांनी साद घालावी आणि आपण त्यांचं होऊन जावं, कधीतरी एखादी ओळ मनात बहरणाऱ्या नव्या फुटव्यासाठी जिवंत झऱ्यासारखी झुळझुळावी तर कधी एखाद्या ओळीने, ’अवजड मनाला पेलणारी कृष्ण करंगळी’ व्हावं. किती साधी, किती संयत, किती गोड कविता ताईंची. एक एक भाव असे रेशीमधाग्यासारखे उलगडावे ते त्यांनीच. कोवळ्या, अलवार, नाजूक, सुकोमल शब्दांसारखं मऊसुत स्निग्ध, कुठलाही अभिनिवेश नसलेलं हे व्यक्तीत्त्व आणि ज्ञानाचा आरसा ठरावा असं लिखाण. ताईंनी माझं पुस्तक उघडून पाहिलं, काही कविता वाचल्या. छानसं हसल्या आणि मग पुन्हा अर्पणपत्रिका वाचू लागल्या. अंगभूत गांभिर्याने त्यांनी एक एक शब्द वंदना अत्रेंना वाचून दाखवला,
आजी गं,
“मनातलं बोलायचं आहे”, म्हणून बोलावलस,
मी आले नाही, तू बोलली नाहीस….
आता आयुष्यभर माझ्या मनातलं बोलत राहीन,
त्यात तुझ्या मनाचा तळ शोधत राहीन!!
माझे डोळे भरून आले होते. आजीसाठीचे शब्द आजीपर्यंत पोहोचले होते. कंठ दाटून आला आणि ताईंच्या चेहेऱ्यावर खूप आतून आलेलं ओळखीचं समजूतीचं हास्य उमटलं. आता त्या पुन्हा बोलत होत्या. सगळेजण त्यांच्या मंद समईसारख्या उजळवून टाकणाऱ्या अस्तित्त्वाची साक्ष होत होते. स्त्रीविषयीच्या आंतरिक जिव्हाळ्याने ताईंची लेखणी म्हणते,
सवाष्णीनं कुंकू टेकवावं तितक्या खात्रीने
टेकवताच येत नाही शब्दांची चिमूट कित्येक दु:खांवर
कसं लिहावं हे असं जीवघेणं दरवेळेस ह्यांनी असं नेहेमी वाटत जाई मला, ताईंना पहातांना जाणवत गेली ती त्यांच्यातली सात्त्विक सोज्वळतेची प्रभा. जीवनाविषयी असलेलं कमालीचं औत्सुक्य, आलुलकी.
मिळालास मज स्पर्शनिळा तू
तुला सावळी बाधा
दिल्या तुला तळव्याच्या रेषा
शब्द मला दे साधा
लिहिणारं मन बोलतं झालं होतं आणि मला त्यांच्या लेखणीतून चित्रित झालेल्या द्रौपदी, कुंती, सीता, उर्वशी, मैत्रेयी अगदी सोमनाथाची देवदासी चौला, लोककथांमधल्या कितीतरीजणी आठवत होत्या. रोजच्या जगण्यातले असो की स्त्रीत्त्वाच्या वाटॆवरचे आदिम, चिरंतन प्रश्न असो अरुणाताईंकडे हक्काने मागावे उत्तर आणि त्यांनी त्यांच्या सहज साधेपणाने ते अलगद देऊन टाकावे असं काहीसं अगदी. “वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटणारा पुरुष हा बाईच्या जडणघडणीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे,” त्या सांगत होत्या. राधेला आणि कृष्णाला समजून घ्यावं ते ताईंनीच. कृष्ण उलगडून सांगावाच पण अनयही समजून यावा तो त्यांच्या कवितांमुळेच… अनयाच्या उल्लेखानंतर ताई सहज उच्चारत्या झाल्या …
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!
ताईंबरोबरीने नकळत आले हे शब्द माझ्याहीकडून, बोलताना क्षणभर थांबल्या आणि पुन्हा तेच ओळखीचं हसू चेहेऱ्यावर. ही ओळख त्या क्षणी आम्हा दोघींमधली जितकी तितकीच राधा-अनयाच्या नात्याची उमज पडणाऱ्यांमधली अधिक होती. कार्यक्रम संपतांना ताईंना भेटले तेव्हा कुठून सुरूवात करावी बोलायला ते कळेना. “तुझे लेख वाचतांना तुझ्या लेखनावर अरूणाताईंचा प्रभाव आहे असं कधीतरी वाटून जातं”, माझी एक मैत्रीण कधीतरी म्हणाली होती असं त्यांना सांगतांना म्हटलं, ताई मी सांगितलं तिला, “अगं मोगऱ्याच्या ओंजळभर कळ्या तुम्ही हातात ठेवाल तेव्हा हाताला येणाऱ्या सुगंधाचं श्रेय त्या मोगऱ्याचंच, ताईंचे शब्द असे मनभर असताना ते डोकावले तर तो सन्मानच माझा”… त्या माऊलीने मग मला घट्ट जीवापास घेतलं आणि म्हणाली, “कविता लिहितेस कुठली पोरी, अगं कविता जगतेस तू”.
सहज साधेपणाने ठेवता यावे मनापाशी मन
त्याने किती सोपे होते जगणे…
ताईंच्या शब्दाचे ’मंत्राक्षर’ मनापास येत मोगऱ्याचा चिरंतन गंध मग माझ्या मनात कायमचा विसावला!!