✍🏻 तन्वी अमित
कतरा कतरा जिंदगी-१०
दैनिक पुण्यनगरी, २९.०६.२०१९
भरून आलेला पाऊस. दिवस आणि संध्याकाळची हातमिळवणी. घराच्या गॅलरीत बसलेय मी, किती केव्हाची. वेळाची गणितं मिटून जावीत अशी वेळ. हवंनकोसं वाटवणारी, हुरहुरती वेळ. हल्ली ही अशीच तर असते मी, आत्ताच्या ह्या वेळेसारखी. सीमारेषेवर… ठामपणे हवंही नाही आणि नकोही नाही. काय हवं ह्याचा उमज नाही आणि काय नको त्याची स्पष्टता नाही.
संदिग्ध, धुसर वाट. पण मी चाललेय हिच्यावर किंवा वाट चालतीये. ही वाट कुठे जातेय त्याची कल्पना नसली तरी ती वाट माझी आहे हे नक्की.
भुरूभुरू पाऊस येतोय. थोडासा पाऊस तुषारांच्या चिमुकल्या हातांनी मला स्पर्श करतोय. जरा पुढे नेला हात तर तो ओंजळभर दान देईलही. मी काही हात पुढे करत नाहीये. गाठो हा पाऊस गाठेल तेव्हढा. समोरचं मोगऱ्याचं झाड कडिपत्त्याकडे झुकलंय. आता ह्याने त्याचा गंध उधार घ्यावा की त्याने ह्याचा उसना… ठरवो त्यांचे ते बापडे. मरव्याचं रोप तरी बाजूला सरकवायला हवं असं अस्पष्ट वाटून जातंय फक्त. हलका गारवा घेऊन मिरवणारा वारा सुटलाय. कणाकणाला कुठल्यातरी अज्ञात हातांनी जागं करू पहाणारा! गॅलरीतली रोपं त्याच्या येण्याची वर्दी माना डोलावून एकमेकांना देताहेत. मी तटस्थ की निर्जीव हे ही उमगू नयेच्या सीमारेषेवर पुन्हा. तिथे नुसतं असल्यासारखी, त्या ’असण्याची’ लय बिघडू नयेसं वाटतंय कदाचित.
मोबाईलला गाणी सुरू असणारं ॲपही असंच, स्वत:च्या तंद्रीत कुठलीही गाणी लावत असल्यासारखं. त्या गाण्यांचा क्रमही एकसुरी. मी नाही बदलत ती गाणी. मनतळाशी गेलेल्या उर्मीला सरसरून पुन्हा उंच नेण्याला हे पृष्ठभागावरचे तरंग असमर्थ ठरताहेत. ’सतह पर काई नहीं, बेतरतीब तैरता मौन है मेरा’, गीत चतुर्वेदी म्हणतो. ही वेळ तशीच. चटकन काही आठवावं असंही नाही आणि सारं काही विसरलं आहे असंही नाही. पुन्हा सीमारेषा.
आईना देखिये बिल्किस यहीं हैं क्या आप
आप नें बना रख्खा हैं ये अपना हुलिया कैसा
हा शेर गेल्या वेळेस आला तेव्हा अर्थांच्या वेगळ्या वाटेवरून आला होता. ह्यात वेदनेचा प्रश्नार्थक सूर होता. आज मात्र शेर वेगळा दिसतोय. हे जे रूप आहे आजचं हे निश्चित आधीपेक्षा वेगळं आहे. आणि ते असणारच की. कुठला पदार्थ आवडीचा, रंग कोणता लाडका हे जसं विरून जातं हळूहळू तसं इतरही किती काय काय काळाच्या वाटेवर पावलांच्या खुणांमधे सुटून जातं. अर्थात हे मान्य करण्याचा सूर सहज आहे हे ही नसे थोडके. नुसत्या ’असण्याची’ लय पुन्हा, काही वाटलं तर ठीक मात्र मुद्दामहून काही वाटून घ्यायचं नाही. आहे हे असं आहे. हे इतर कोणाला मान्य होण्याच्या गुंतवळ्यातून पाय सुटल्यालाही काळ लोटलेला. “फूल फुलतां एकदा पुन्हा कळीपण नाही”, इंदिरा संत आठवून जातात. मनातले तरंग मनाभोवतीच फिरू लागताहेत.
मोबाईलच्या गाण्यांकडे लक्ष जातंय तेव्हा लताचा आर्त स्वर कानी पडतोय, ऐ दिल-ए-नादाँ! पहिल्यांदा करूणेने घातलेली साद नादाँ दिलसाठी आणि त्याच्या पुढली वेदनेने ओतप्रोत,ओथंबलेली. “आरजू क्या हैं… जुस्तजू क्या है??”… संतुरची मन व्यापुन उरणारी सुरावट. जाँ निसार अख्तरांचे गहिऱ्या अर्थाचे शब्द. मनाचा ताबा सहज घेण्याची ह्या साऱ्याची हातोटी. आपल्या कोषात गेलेले मन हळूच डोकावून पहातेय. सारं काही दैवभारलं. दैवी सूर, शब्द आणि संगीतही.
एव्हाना गाणं पुढे आलंय, ’कैसी उलझन है, क्युँ ये उलझन है’ हा शोध घेत दश्त-ओ-सेहरा पार होतंय. संतुरची साथ लताच्या बरोबरीने आणि नंतर पुन्हा एकटीही. लताचा स्वर आर्ततेची सीमा गाठत वेदनेचा ठाव घेतोय,
क्या कयामत है, क्या मुसीबत है
कह नहीं सकतें, किसका अरमां है
जिंदगी जैसे खोयी खोयी है
हैरां हैरां हैं
आणि मग ती स्तब्धता. सारं काही असूनही कसलाही आवाज नसलेली शांतता. क्षण दोन क्षणांचा तो विराम… “ये जमीं चूप है, आसमाँ चूप है”.
अनाहत!
फिर ये धडकन सी चार सू क्या है?
इथे मन पुन्हा जागं होतं. भान येतं. सारं काही शांत असूनही चारही दिशांनी अस्तित्त्वाचा नादमय हुंकार भरणारी धडकन स्पष्ट जाणवते. कितीतरी अस्पष्टाचं असणंही पूर्ण जाणवून जातं. निराकारातला आकार मन सहज रेखाटतं. पावसाची रिमझिम थांबलीये आता. हवेच्या ताज्या प्रसन्न गंधाला मृद्गंधाचं वलय आहे. बंद मनाची दारं किलकिली करणारा सुगंधाचा मंत्र हा.
स्वत:पाशी स्वत:चा स्विकार. खूप घडामोडींनंतर साधलेल्या बेतरतीब तैरणाऱ्या मौनाचा साकार स्विकार. उमगून आलेलं केवळ ’असणं’. आभाळ पुन्हा भरून येतं… घुमणारा ’मनकवडा’ व्याकुळ घन सारं ओळखून पुन्हा बरसू लागतो आणि आपल्याही नकळत हात पुढे होत ओंजळ त्या जलधारांनी चिंब भजू लागते!!