✍🏻 तन्वी अमित
मोराची चिंचोली, सहज म्हणून निवडलेलं एक ठिकाण. रोजच्या धावपळीतून प्रयत्नपूर्वक निसटलेला एक दिवस आणि मुलांनाही जरा विरंगुळा असा साधासा विचार. तिथे पोहोचलो आणि शांत वातावरणात सहज रुळलो. मुळात आपली जी प्रवृत्ती असते तिला साजेसा सभोवताल असला की मन मनाकडे परततं आणि घरी आल्याची एक आश्वासक भावना मनावर अलवार पदर धरते. मन निवतं, विसावतं.
गर्दी फार नसली तरी अगदीच नव्हती असं नाही… आणि होती तिला आपण मोरांच्या नैसर्गिक आवासात आहोत तेव्हा आपण शांततेने त्यांना त्यांचं असू द्यावं ह्या विचाराशी फारकत घेऊन वावरत होती. साहजिकच, केकारव ऐकताना मोर अवतीभवती मोठ्या संख्येने आहेत हे जाणवत असलं तरी ते आमच्या असण्याला सरावले नाहीत आणि चटकन समोर आले नाहीत. सुदैवाने काही वेळातच ही मंडळी, “मोर नाहीत” म्हणून निघून गेली आणि नसलेल्या मोरांनी दर्शन द्यायला सुरूवात केली. आम्ही जिथे होतो त्याच्या जवळच स्वत:चा मळा असणारी एक ताई तिथे होती. आता स्वछंद बागडणारे मोर, ती ताई, तिचा मुलगा आणि मी असेच तिथे होतो. “गर्दी गेलीये ना, आता येतील बघा ते”, ती माझ्याकडे बघून समजूतीने सांगती झाली.
सगळे गेले तरी मी तिथेच होते. ज्या शांततेच्या शोधात मन ठायी ठायी धाव घेत असतं ती अशी स्वत:हून मनात येती होत होती. माझ्या ह्या नव्या मैत्रीणीने एकतर्फी पक्की मैत्री एव्हाना करून टाकली होती. ती पुन्हा बोलती झाली, “आमच्या मळ्यात तर हे असे भरपूर असतात बघा… काही म्हणून पिकू देत नाहीत. पण नसले तर करमतही नाही. आपण आपलं काम करावं, त्यांनी त्यांचं. तू आली ना रहायला तर त्यांनाही तू सवयीची होशील. नाच म्हटलं की नाचून दाखवतात मग ते…” तिच्या चेहेऱ्यावर ती माहिती देताना विलक्षण आनंद नाचत होता. साधंच सगळं पण छानसं… तिथे तिच्या बोलण्याने माझ्या आणि मोरांच्या नुकत्या रूजू लागलेल्या नात्याची लय न मोडणारं काहीसं. ती मग पुन्हा हसली… काही उमजून म्हणाली, “तुला शांत बसायचं आहे ना… बैस… त्यांना चालतंय तू इथे असलेलं…”… जाताना स्वत:कडची मोराची पिसं मला भेट म्हणून देऊन, पुन्हा येशील तेव्हा माझ्याकडे नक्की ये सांगून ती गेली.
समोर स्वत:च्या तालात, डौलात चालणारे मोर, लांडोर… आसपास नि:शब्द शांतता. पक्ष्यांचा, पानांचा, निसर्गाच्या अस्तित्त्वाचा तोच तितका आवाज. माझ्या मनात आता एक एक विचार पावलांचा आवाज न करता हळूच उतरता होऊ लागला…” कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे”, जाताना गाडीत लागलेल्या गाण्याच्या ओळी आठवू लागल्या. विचाराचा एक नेमका धागा हाती लागला की सहज सुटते ही विचारांची गाठ ह्याचा पुन:प्रत्यय येत होता… श्वासांची लय जाणवणं, श्वासाचा नाद ऐकू येणं साधलं की मनमोराची पावलं नकळत लयबद्ध होतात हे मला माहीत नाही असं नाहीच की… पण ह्या विचारापाशी मन पुन्हा जाऊ शकतंय हे ह्या क्षणाचं देणं… मी मोरांना पुन्हा पहातेय आता. त्यांच्यापैकी एखादा मान उंचावून माझी दखल घेतल्या न घेतल्यासारखं करतोय… छान चाललंय आमचं.
माझ्या मनात आता रेग्यांची सावित्री डोकावून जातेय. लच्छीचा मोर अट घालतोय, ती नाचली तरच तो येईल. “पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकुमी नाचायचं, तर मनहि तसंच हवं.”… लच्छी मग आनंदीच राहू लागलीय. आनंदभाविनी. “मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचंहि तिला भान राहत नसे.”…. “मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं ते ते आपणच व्हायचं”… लच्छीच्या गोष्टीचं तात्पर्य पुन्हा आठवतंय.
माझ्या समोर असलेल्या मोराला हे समजतंय की काय… हा का असा पिसारा फुलवून छानशी गिरकी घेतोय… घेवो अर्थात. तो त्याच्या आयुष्यात, मी माझ्या. माझं असणं त्याने स्विकारलंय… त्याचं असणं मी. आमचं असणं निसर्गाने. वारा आता छानसा वाहतोय, शेजारच्या जुईच्या वेलीकडून सुगंधाचा मंद सांगावा येतोय. हे असंच तर आहे… इतकंच सोपं, इतकंच अलवार, इतकंच सुटसुटीत. हे असंच असायला हवं…हे उमगलंय, उमगत रहायला हवं.
संध्याकाळ उतरायला लागलीये. मोर आता दाट झाडांकडे परत वळताहेत… मलाही शहराकडे परतायला हवं. घराकडून घराकडे प्रवास होत रहायला हवा !!
Wow Tanvi, You took me to my encounters with these majestic species. I was in posted in Jaipur, Rajashan and people there are inherently friendly with these. After some days about a dozen of them used to give us enthralling dance performances in our spacious garden around dusk and then retire to the highest branches of the Eucalyptus trees for the night!! We were indeed lucky to have that etheral and unforgettable experience of our life for almost close to years.
That’s great Sir…
Your comments, especially on the blog posts encourage me to write n express more… Thank you so much 🙂