क्लब 60

एकाच फ्रेममध्ये दोन अतिशय आवडती माणसं. फारुख शेख आणि सारिका. क्लब 60 नावाचा हा सिनेमा लागलेला दिसतो तेव्हा तो दर वेळी पाहिला जातो याचं कारण ही दोन माणसं. अभिनेत्यांचं म्हणून मनात पक्कं स्थान असणं वगैरे मागे सुटून गेल्यानंतरही काही मोजके लोक मनात ठामपणे राहिलेत त्यातलेच हे दोघं.

या सिनेमापाशी पहिल्यांदा थांबले यातली एक गज़ल ऐकली तेव्हा…

रुह में फासले नहीं होते
काश हम तुम मिले नहीं होते

या शेरने सुरुवात होणारी गोड गज़ल. टिनू आनंदला संपूर्ण करियरमध्ये मिळालेलं इतकं सुरेख गीत हे एकमेव असावं असं क्षणभर वाटलं. चित्रपट काहीसा रुळलेल्या वाटेवरचा असला तरी ह्या फ्रेममधली ही दोन माणसं, ही प्रेम आहेत… यांना डावलून पुढे कसं जावं.

“मला फारुख शेख आवडतो”, असं आम्ही लहान असताना एक भाऊ म्हणाला होता. सिनेमाच्या मुख्य प्रवाहातली इतर नावं सगळे घेत असताना त्याने हे नाव घेतलं आणि संपूर्ण सुट्टीभर इतरांनी त्याला चिडवलं. भाऊ खरंच शहाणा होता, आम्हाला शहाणपण यायचं बाकी होतं. घरंदाज, खानदानी वगैरे शब्द व समंजस, सहज, सौंदर्याची ओळख व्हायला आयुष्य बरेचदा पुढे जायला लागतं. सुदैवाने माझं ते तसं गेलं असावं आणि मला फारुख शेख नावाची व्यक्ती समजू लागली. दीप्ती नवलची आणि त्याची मैत्री, त्या आश्वासक मैत्रीचे अनेक कंगोरे त्यांच्या मुलाखतींमधून, एकत्र कामांमधून उलगडले तेव्हा या दोघांच्याही अजून अजून प्रेमात पडत गेले.

‘जिंदगी धूप तुम घना साया’, म्हणजे नेमकं काय हे समजलं. कथा, साथ-साथ ते लिसन अमाया सारं पाहून झालं. त्याच्या जमीनदार असण्याविषयी, गर्भश्रीमंत व्यक्तिमत्त्वाविषयी दीप्ती जेव्हा जेव्हा बोलली तेव्हा त्यातलं सत्य मनाला स्पर्शून जात होतं. ‘गर्म हवा’ पाहिला तो बलराज साहनींसाठी, कैफी आजमींसाठी मात्र फारूखही ठळक लक्षात राहिला होता. असेच माया मेमसाब बद्दलही…

‘जिंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें’ च्या सुर्ख फुलांच्या वाटेवरून ‘बात फुलों की’ पर्यंत येताना फारुख नावाच्या ह्या विलक्षण ठहरावाची ओळख पक्की झालेली होती… उर्दू अदब आणि लहेजातलं बोलणं आणि त्याचं ते अलवार अस्पष्ट हास्य… “मला फारुख शेख आवडतो”, ये जवानी है दिवानी पाहणाऱ्या माझ्या लेकाला आता मी सहज सांगितलेलं असतं. रणबीर कपूरच्या वडिलांच्या लहानशा भूमिकेत तो फारुख शेखला पाहत असला तरी त्याने माझ्याच वाटेवरून का होईना पण ह्या अभिनेत्यापर्यंत पोहोचावं असं मला मनापासून वाटत जातं…

प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी
मेरे हालात की आंधी मे बिखर जाओगी

ह्या खरंतर फारुखच्या असलेल्या ओळी पण ‘हालात की आंधी’ वगैरे सारिका या अभिनेत्रीसाठी जास्त योग्य ठरेल असं काहीसं शापित राजकुमारी सारखं आयुष्य जगलेली ही विलक्षण सुंदर स्त्री. तिच्या डोळ्यांमधली काहीशी गूढ, वेदनेने पूर्ण, काही हरवून निसटून गेल्याची भावना, तिच्या चेहऱ्यावरची औदासीन्याची छटा, हसण्यात उमटणारी वेदनेची किनार सारं समजून येतं तिच्या आयुष्याचा प्रवास पाहताना. बालकलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षापासून सिनेसृष्टीत दाखल झालेली ही मुलगी कधीही शाळेत तर जाऊ शकली नाही पण सिनेमाचे सेट हेच आपले घर झाले असं सांगणारी. लग्नापूर्वीच स्वीकारलेलं मातृत्व, लग्नानंतर नव्हे तर दोन्ही मुलींमध्ये समाजाने भेदभाव करू नये म्हणून दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर लग्न करण्याचा तिने घेतलेला निर्णय सारंच मुख्य प्रवाहापासून खूप वेगळं. पुढे कमल हसनपासून विभक्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणारी ही धीराची आई.

एखाद्या विवाहित पुरुषाच्या आयुष्यात असणारी दुसरी स्त्री असणं म्हणजे वेदनेला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे आहे वगैरे ती बोलते तेव्हा तिच्या स्वरापेक्षा तिचे डोळे खूप काही सांगून जाणारे… अर्थात आयुष्याने आपल्या वाटेवर चालायला भाग पाडलेलं असलं तरी तिने न हरवलेली ‘ग्रेस’, किंबहुना वेदनेच्या समंजस स्वीकारातून, वाचनाच्या लक्षणीय वेडातून घडलेलं एक संयमित प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणजे आताची ती…

खोकर मैंने आज तुम्हे पाया हैं
फिर से मेरे साथ मेरा साया हैं

क्लब 60 मधल्या गाण्यातल्या ह्या आवडत्या ओळी ऐकते तेव्हा विचारांच्या प्रवाहातून मी पुन्हा चित्रपट पुढे पाहू लागते, पण या दोघांची ही फ्रेम पुन्हा पुन्हा मनात डोकावत जाते.

…. तन्वी