बिछडना है तो झगडा क्यूॅं करे हम…

The problem is that She thinks he will change
No… He won’t
And
The problem is that He thinks she won’t leave
No… She will

कधीतरी वाचलेलं हे वाक्य वारंवार मनाच्या पार्श्वभूमीवर उमटत होतं The Threshold पाहताना. नीना गुप्ता आणि रजत कपूर, दोन्ही अतिशय लाडके कलाकार असलेला चित्रपट. साधारण साठीतलं एक जोडपं. रूढार्थाने चित्रपटाची म्हणून असलेल्या भाषेचे सगळे संकेत बाजुला ठेवत ह्या जोडप्याच्या आयुष्यातला केवळ एक दिवस पडद्यावर दिसत जातो. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न नुकतंच पार पडलेलं आहे आणि त्यानंतर तिने ते घर सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केल्यानंतरचा तो एक दिवस… अत्यंत महत्त्वाचा निर्णायक दिवस. कथानक संथपणे पुढे सरकणारं आणि त्या संथपणातलं प्रवाहीपण जाणवत जाणारं. कथा केवळ एका दिवसापूर्ती असली तरी संपूर्ण आयुष्याचा पट त्या दिवसामागे घेऊन उभी असलेली.

दिवसभर ते बोलताहेत फक्त एकमेकांशी. कुठलाही नाट्यमय आविर्भाव नसलेलं, अभिनिवेश नसलेलं एका कुटुंबातलं बोलणं… वाद-संवाद. अश्या प्रसंगी कोणातरी एकाची चूक सापडावी, एकाकडे झुकतं माप असावं, बाजू ’जस्टिफाय’ व्हाव्यात आणि आपणही कथानकाचा नकळत एक भाग व्हावे ही मुभा सामान्य प्रेक्षक म्हणून मिळावी असं कुठेतरी वाटून जातं, मात्र threshold beautifully manages to keep us at the threshold…  समोरच्या कधी हिंदी कधी इंग्लिशमध्ये होणाऱ्या संवादांकडे आपण संवाद म्हणून पाहत जातो आणि कलाकृतीने केवळ दर्शनीय नसावं तर तिने अनुभवातून मनापर्यंत उतरत जावं हा दिग्दर्शकाचा आग्रह मनोमन पटत जातो. एक बाजू घेता येत नाहीही आणि लहानसहान वाक्यांतून, आठवणींतून, प्रसंगांतून स्पष्ट होणाऱ्या ह्या दोहोंच्या वैवाहिक जीवनातल्या इतिहासाच्या दाखल्यांतून ती कधीतरी घेतलीही जाते. 
बॅकग्राऊंड म्युझिक, लाईटिंग, मोठमोठे पल्लेदार संवाद, नाट्यमयता ह्या साऱ्या पलीकडे प्रत्यक्ष आयुष्य असतं आणि ते नेमकेपणाने व्यक्त होणारे संवाद मनात उतरत जातात. कधी शब्दांतून तर कधी देहबोलीतून, कधी मूकपणे पुढे जाणारी भाषा… मागे वाहणाऱ्या नदीचा आवाज ह्यातून प्रसंग पुढे सरकतात तेव्हा, ’अरे हे तर रोजचेच आहे की’ असं सहज वाटून जातं आणि हेच कलाकृतींचं बलस्थान ठरतं. आपल्या सगळ्यांच्या घरात असतात ही दोघं. आपले काका-काकू, आजी- आजोबा, आई-बाबा… फॅमिली फोटोंच्या दोन टोकांना उभे असतात ते. कधी ठाम तर कधी बावरलेले, गोंधळलेले. एकमेकांच्या लहानमोठ्या, आवडत्या नावडत्या सवयींची सवय करून घेतलेले. आयुष्याचा मोठा भाग कर्तव्यपूर्तीसाठी देऊन टाकणारे…एकमेकांशिवाय राहणे हा पर्याय असू शकतो हे विचारातही नसलेले आणि एकमेकांसोबत राहण्याचा कंटाळाही आलेले. ह्यापेक्षा वेगळं आयुष्य असू शकतं प्रसंगी हे ही विसरून गेलेले. आपणही हळूहळू त्यांच्यासारखे होत असतो. त्यांच्या आयुष्याच्या, अस्तित्त्वाच्या, वैवाहिक जीवनाच्या विशिष्ट टप्प्यांवर त्यांना पडणारे प्रश्न आपल्यालाही पडणार असतात. 
अखेरच्या फ्रेममध्ये रजत कपूर एकटाच बसलेला आहे… सारं तसंच आहे जसं आदल्या दिवशी होतं… नदीचा आवाज येतो आहे आणि तरीही अमाप अपार शांतता आहे… ती नाहीये… तिच्या नसण्याची केवळ एक जाणीव आहे.
Threshold – सुरुवातThreshold – सीमारेषा

प्रत्यक्ष कृतीत येण्यापूर्वी किती वेळा मनातल्या मनात ओलांडला असावा तिने हा उंबरठा? 
“मी तुला तेव्हा ते करू दिलं म्हणून तू करू शकलीस”… एका लहानशा प्रसंगात रजत कपूर म्हणतो आणि त्यावर, “You let me? You LET ME?” हा तिचा प्रश्न आणि हा प्रश्न हेच तर साऱ्याचं उत्तर आहे अश्या अर्थाचं क्षणभर उमटलेलं हसू… असं कितीतरी न बोललं गेलेलं, प्रखरपणे वाटलेलं, वाटूनसं गेलेलं, जाणवलेलं, न जाणवलेलं, आयुष्याच्या वाटेवर घडलेलं सारं सारं… दर वेळी मनात साठत गेलेलं तुटलेपण, एकटेपण आणि सार्‍या कर्तव्यांच्या पूर्ततेनंतर आलेला समंजस शांत निर्णयाचा क्षण. 
किती तरी तरंग उमटवून जाणारा निर्णय. “मी नातेवाईकांना तू का गेलीस म्हणून सांगू?” असं तो विचारतो तेव्हा ती नाही देत उत्तर काहीच. आपण नसतोच उत्तरदायी कोणाला. आपल्या आयुष्याची, निर्णयांची, त्यांच्या परिणामांची जबाबदारी आपली असते… काही माणसं काही नात्यांना in comparison to something and someone मोजू शकत नाहीत… बरं वाईट, योग्य अयोग्य ह्या परिभाषा स्वत:साठी मांडू शकतात. ती मांडते इथे… त्याची बाजूही असते अर्थात पण त्या बाजूत तीचं ‘असणं’ गृहीत धरलं जातं आणि तिथून गोंधळ सुरू होतो. वयाच्या पुढल्या टप्प्यांवर ती अबोलपणे फक्त मान डोलावते, कशालाच सहमती असहमती काहीच व्यक्त करेनाशी होते… शून्यपणे केवळ समोरच्या वक्तव्याची नोंद घ्यायला लागते तेव्हा वाटतं ही पाटी कोरी व्हायला सुरुवात खूप काळापासून झालेली आहे… ह्या स्थितप्रज्ञतेची अस्तित्वावरची दाटसर साय खूप खळबळ निवल्यानंतरची आहे.
ह्या निर्णयाशी कधीतरी तो ही असतो पण बहुतेक वेळा तीच असते. Feminism, Male Ego, Patriarchy, विवाहसंस्था, नाती ह्या साऱ्यांवर बोलताना टोकं गाठली जातात अनेकदा… हे विषयही नाजूक आणि विचारही सारासार होण्याची अपेक्षा. शांत प्रगल्भपणे हे विचार होताना दिसतात, मत मांडताना आक्रमक आग्रही भूमिकेचा मोह टाळला जातो तेव्हा नात्यांमधले अपेक्षांचे, अपेक्षाभंगाचे व्रण मिटून जाऊ लागतात. विशेषतः त्या दोघांनी एका ठिकाणी असणं शक्य नसतं तेव्हा उठून जाण्यातला, जाऊ देण्यातला समंजसपणा मोहक वाटतो.
आयुष्याची प्रश्नपत्रिका थोड्याफार फरकाने सारखीच असली आणि प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या कुवतीनुसार उत्तरं शोधत असला तरी काही प्रश्नांची उत्तरं कायमच अपूर्ण राहणार असतात. किती सोसायचं, कुठे थांबायचं, कधी थांबायचं, तसंच पुढे जात रहायचं की दुराव्यातून जोडलेपण राखायचं, दु:खी असायचं की शांत स्वीकार करायचा?… प्रश्न आणि उत्तरं…. प्रश्नांची अखंड मालिका आणि उत्तरांचा अव्याहत शोध…
प्रत्येक क्षण पुढल्या क्षणाची सुरूवात… The Threshold…
मला मग जौन एलिया आठवत जातो… तो म्हणतो….
बिछडना है तो झगडा क्यूँ करें हमएक नया रिश्ता पैदा क्यूँ करे हम!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s