जो मुंतजिर न मिला वो…

शाळेत प्रांगणात शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने दहावी बारावीतल्या गुणवंतांच्या लागलेल्या मोजक्या फोटोंमध्ये तुझाही फोटो आहे हे आनंदाने सांगणारी मित्रमंडळी फोन – मेसेज करू लागली आणि ‘सोहळ्याला जायला जमणार नाही’ ह्या माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून लेक मला शाळेत घेऊन गेला…

२०२२ ची अखेर… आत्तापर्यंतचं वर्ष काही वेदनेचं, काही आनंदाचं, अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे बरंच थकव्याचं, रुटीन, मोनोटोनस वाटावं असं असतानाच शाळेतला फोटो आणि माझ्या फोटोबरोबर मित्रमंडळींनी अभिमानाने स्वतःचे काढलेले फोटो येऊ लागले तसं घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. तब्येत बिघडली तर बघू, मी आहे ना असं म्हणून लेक हट्टाने आईला गावी घेऊन गेला… फोटो पाहिला, शाळेत, मित्र-मैत्रिणींसोबत, शाळेत मिरवणाऱ्या फोटोसह कौतुकाने फोटोसेशन झाले… सगळ्या शिक्षकांचे मनातल्या मनात ऋण मानले… आपला फोटो इथे असण्यात त्या सगळ्यांचा किती मोलाचा वाटा आहे ह्या जाणीवेची समृद्धी मनभरून उतरली…

नासिकला परत निघताना दुपार झाली आणि मनापासून इच्छा असूनही शिंदे बाईंना भेटायचं टाळलं… पुन्हा कधीतरी निवांत येऊया असं स्पष्टीकरण का कोण जाणे पण त्या गाफील क्षणी मनाला दिलं… “बाईंना तुला भेटायची खूप इच्छा आहे. तुझ्या पुस्तकांबद्दल त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे… गावातून फार दूर निघालेली नसशील तर आत्ताही परत फिर आणि जा बाईंना भेटून ये…” मित्राचा फोन आला… नाही फिरले परत… दुपारी बाईंना त्रास द्यायचा नाही आणि सवडीने भेटायला यायचं हे पुन्हा मनात ठरलं…

डिसेंबर अर्धा सरताना मित्राचा पुन्हा मेसेज आला, ‘जायला हवं होतंस परत त्यादिवशी… बाई गेल्या आपल्या…’ …

आमच्या शिंदे बाई… बाईंच्या वर्गातली मुलं चौथीपर्यंतच एकत्र पण बाईंबदलच्या आदरयुक्त प्रेमाने आजतागायत जोडलेली… आजही भेटताना आमच्या असण्याचा, संवादाचा बाई एक महत्त्वाचा भाग… बाई गेल्या म्हणजे नेमकं काय वाटतंय, काय निसटून गेलं हे उमजून यायला मग खूप वेळ गेला… दिवस त्याच्या गतीने पुढे सरकत असताना मुलांना सहजपणे बोलले, “मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवायला हवी तुमची मस्ती… अभ्यास करताना लक्ष एका ठिकाणी का नसतं तुमचं?”

दिवस संपला आणि आठवली बाईंची दुर्बीण. कितीतरी वर्षांनी पुन्हा आठवली… आजकाल सगळ्यांकडेच असते ती कॅमेऱ्यात वगैरे… पण बाईंच्या दुर्बीणीचा धाक होता, ती ‘भारी’ होती…

इयत्ता तिसरीचा वर्ग, बाई सांगत होत्या, ”माझ्याकडे नं एक वेगळीच मस्त अशी दुर्बीण आहे, त्यातून मला तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरात डोकावता येते. तुम्ही अभ्यास करता की नाही, नीट जेवता का, आईला त्रास देता का, गृहपाठ करता का, शाळेतून घरी गेल्यावर घरात पसारा करता का? वगैरे सगळं मला दिसत असतं….. रोज काही मी प्रत्येकाच्या घरी पहात नाही हं… पण लक्ष असतं माझं…”

’बाई आम्हाला पहायचीये ती दुर्बीण…’ म्हणणाऱ्या आम्हा प्रत्येकाला मग सांगितलं गेलं की तुमच्यापैकी जो कोणी चौथीत वर्गात पहिला येणार त्यालाच ती दुर्बीण पाहायला मिळणार…

मला पहायचीच होती ती दुर्बीण… बाईंच्या घरात गोदरेजचे कपाट होते एक. त्या कपाटात होती ती दुर्बीण, बाईंनीच सांगितलं होतं तसं… त्या कपाटासमोरून जातानाही आतली दुर्बीण आपल्याकडे पहातेय असे वाटायचं… बाईंच्या मुलीला आम्ही सगळे ताई म्हणायचो, ताईला हळूच सांगून पाहिलं होतं एकदा की दुर्बीण दाखव नं आम्हाला. ‘चौथीत वर्गात पहिली ये… आईच दाखवेल तुला दुर्बीण’, म्हणून ताईने पळवून लावल्याचं आजही स्पष्ट आठवतंय 🙂.

टेलिस्कोपसारखी ती दुर्बीण घेऊन बाई एकेकाच्या घरात पहाताहेत, हे दृष्य मीच माझ्या कल्पनेत तेव्हा कितीतरी वेळा पाहिलं होतं. घरात दंगा करताना कधीतरी दुर्बीण विसरायची. आठवली की वाटायचं भिंतीला डोळे आहेत, त्यांच्यापलीकडे बाई आहेत, पहाताहेत आपल्याकडे. स्वत:चं एकदम शहाण्या मुलीत रूपांतर व्हायचं… ती मुलगी मग अभ्यास करायची… बाईंना आनंद वाटेल असंच आपण वागलं पाहिजे असं वाटावं इतक्या बाई आवडायच्या… बाईंचा राग कधी आलाच नाही… घरात छान वागणाऱ्या मुलांना त्यांच्याकडे जास्त खाऊ मिळायचा. मला तर नेहेमीच. म्हणजे नक्की दुर्बीण होतीच हा विश्वास पक्का झाला होता…

मधली सगळी वर्ष आता डोळ्यासमोरून सरकत गेली…. या सगळ्या वर्षांच्या एका बाजूला मी आणि दुसरीकडे बाई. चौथीत पहिला नंबर आल्यावर बाईंकडे जायलाच हवं होतं. पाचवीत शाळा बदलली. तरीही जायलाच हवं होतं. आला होता नं पहिला नंबर, मग हक्काने ते कपाट उघडायलाच हवं होतं…

बाई होत्या उंचीला लहानश्या. आत्ताच्या माझ्या उंचीपेक्षा नक्कीच कमी. शाळेत त्यांच्या साडीला कायम हात लावून पहायचे मी. चिमटीत पकडली ती साडी की चूरचूर आवाज यायचा. मी तो आवाज ऐकण्यात रमले की कधीतरी बाई हसून रागवायच्या, खेळ थांबव तुझा आणि गणितं घे सोडवायला. साड्या तश्याच नेसत असतील की बदलला असावा पॅटर्न बघायला हवं होतं. चांगलं वागलं की बाई बक्षीस द्यायच्या, आयुष्याचा विचार करता ग्रॅटिट्युडच वाटतो, बाई बघतच होत्या म्हणजे माझ्याकडे. मी मात्र वळून पहायला विसरले. बाई किती बेमालूम फसवलंत आम्हाला दुर्बीणीच्या नावाने, त्यांना म्हणायला हवं होतं. त्यांना पुन्हा एकदा स्वच्छ, नितळ हसताना आपणही जुन्या निरागसतेने हसायला हवं होतं…

……………

ग्रुपवर दुसऱ्या दिवशी बाईंचा फोटो आला… तेच तसंच स्वच्छ हास्य… फोटो पाहिला आणि मनातलं मळभ दूर झालं… त्यांचं हसणं माझ्या चेहऱ्यावर उमटायचं तसं पुन्हा उमटलं. छानच वाटलं एकदम… काही माणसं जात नाहीत… ती आपल्या जगण्याचा भाग असतात. एखाद्या प्रसंगात हे प्रकर्षाने जाणवतं इतकंच. बाईंचा फोटो आणि शाळेतला माझा फोटो पुन्हा पुन्हा पाहिला… त्या सोबत आहेतसं वाटलं.

‘उशीर करू नये भेटायला, वाटलं की भेट घ्यावी…’ बाई पुन्हा रागे भरल्या… ‘पुन्हा नाही करणार बाई…’ मनानेच मनाशी कबुली देताना डोळे वहायला लागले…

……………

जो मुंतजिर न मिला वो तो हम हैं शर्मिंदा,
कि हमने देर लगा दी पलट के आने में
(मुंतजिर -वाट पाहणे)

२०२३ चा संकल्प वगैरे काही केला नाही… हो पण उशीर करायचा नाही हे तेवढं मनात ठरलंय पक्कं… बाईंची दुर्बीण पुन्हा आठवणीत आली… माझ्या हसण्यात बाई गवसल्या… काहीतरी गमावताना काय कमावलंय आठवत गेलं… दुर्बीण दिसली नाही, दिसणार नाही पण ‘नजर’ आलीये हे खरं…

#MomentsOfGratitude #सहजच

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s