खो…..

छळ मांडलाय या खो प्रकरणाने गेले काही दिवस……. म्हणजे ’मला झोप येत नाही माझे चैन गायब झाले ssssss’ अशी अवस्था झाली होती…. (वरील ओळी ’मुझे निंद ना आये मुझे चैन ना आये’ या गाण्याचे भाषांतर आहे….. 🙂

थोडक्यात पुढे वाचायचे की नाही ते इथेच ठरवा… 😉  नंतर डोके दुखायला लागल्यास , चिडचिड झाल्यास, आपला वेळ वाया गेला असली काही भावना आल्यास माझा अजिबात दोष नाही…. ईथवर आला असाल तर स्वत:च्या जबाबदारीवर पुढे वाचा!!!! शक्यतो भिंतीजवळ बसा नंतर डोके आपटावे वाटल्यास सोयीचे होईल …. 🙂

तर सुरूवात झाली ती गाणे निवडण्यावरून…. जाम सुचत नव्हते….. न्युनगंड कशाला म्हणतात ते समजले अक्षरश: ……तरी घाईघाईने श्रीताईच्या आधि उरकतेय हा प्रकार म्हणजे तिने केलेला सुंदर अनुवाद वाचून लोक इथला मानसिक छळ विसरतील 🙂

भाषांतर या शब्दाचा अर्थ निवडलेल्या गाण्यासाठी आपली ’भाषा’ आणि मुळ अर्थापासून जरासे (लक्ष द्या खूप नाही) ’अंतर’ असा सोयिस्कर लावून घेतल्यावर जरा हुश्श केले आणि म्हटलं ,”आने दो!!”   🙂

निवडलेल्या गाण्याची गायिका कू/सौ. (माहित नाही) शनाया ट्वेन आहे…. मला साहेबाच्या भाषेतली बरीच गाणी आवडतात आणि समजतात (असा माझाच समज आहे…. स्वत:बाबतीत मला कुठलाही समज असू शकतो …लोकशाही आहे!!! ) …

गाणी हा प्रकारच तूफान फ्येव्हरेट असणाऱ्या माझ्यासारख्या गद्य व्यक्तीने (मला आमच्या थेअरी सबजेक्टमधे नेहेमी बरे मार्क असायचे 🙂 ) ही असली तोडमोड करू नये खरं तर पण कभी कभी मेरे भी दिल मे खयाल येतो की ’का नाही करायचे?  करून बघू एकदा ….’

मुळ गाणे, (मुद्दाम लिरिक्स वाले गाणे टाकलेय… सगळेच माझ्यासारखे हुशार नसले मग!!! आणि खर्राखुर्रा विडिओ टाकला तर या गाण्यांमधे मधेच केव्हा काय येइल भरवसा नाय बा.. तेव्हा लिरिक्सच बरे!!!! )

आठवणींच्या राज्यातल्या त्या,

ओळखीच्या वळणावर…..

नेहेमीच मग पुन्हा विचार येतो…..

अजुनही तूच आहेस,

ज्याच्यात गुंतलाय श्वास……

सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

नात्याचीच आपल्याला आस…..

आठवतं तूला ,

प्रवाहात मन मारून धारा न होता……..

प्रवाहाविरूद्ध पोहून राधा व्हायचा,

निर्णय मी घेतला जेव्हा…….

निरूद्योगी अनेक सरसावले ,

सोपं नाहिये बरं का!!

येता जाता म्हणु लागले…..

सोपे नसतात बघ सारे रस्ते,

ओळखीच्या रस्त्यांवरही तर असतातच खड्डे……

अनोळखी रस्त्यांची खुमारी नवी,

निदान नव्या ठेचा लागतात पायी……

नियतीचे निर्णय नी प्राक्तनाची मर्जी,

यावर का ठरायचे सारे….

फसव्या कल्पना नी खुळचट भावना,

यापलीकडले आयूष्यच न्यारे!!!

आठवणींच्या राज्यातल्या त्या,

ओळखीच्या वळणावर…..

नेहेमीच मग पुन्हा विचार येतो…..

कधितरी पुन्हा घ्यावा हातात हात,

सांगावे तूला मनापासून आज…..

माझ्यातल्या मी ला,

तुझ्यातल्या तू ने जपले…..

तुझ्यातल्या तू साठी,

मी जगाशी भांडले…..

खरयं रे अगदी खरयं,

अजुनही तूच आहेस,

ज्याच्यात गुंतलाय श्वास……

सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

नात्याचीच आपल्याला आस….. 🙂

हुश्श!!! संपले … सुटले एकदाचे…….

(नेहेमी हा ब्लॉग आणि पोस्टा वाचणाऱ्यांनो ..नवे जर कोणी आले तर त्यांचा विचार करा रे!!! तुम्हाला हा अत्याचार सहन करायची सवय आहे… 😉 )

आवरा आवरा हे ’खो आवरा!!!! 🙂

(तळटीप:  अमित (अस्मादिकांचे मंगळसुत्र) बाबा रे ईतर कोणाला समजो न समजो तूला नक्की समजेल रे मला काय म्हणायचेय!!!)

माझा खो शिनूला ….

Advertisements