एक ‘अर्थपुर्ण ‘ साठवण…..

किती तो पसारा टाकलाय मुलांनी म्हणून चिडचिड करत तो आवरायला घ्यावा आणि त्यात एखादी अत्यंत मौल्यवान गोष्ट हाती लागावी…..

सहज म्हणून उचलला खाली पडलेला एक कागद !! माझ्या सहा वर्षाच्या पिल्लाचं अक्षर पहाताक्षणी भरकन् त्या कागदावरचा मजकूर वाचला….

Abu Dhabi-20131119-00179

“Love Earth ” …. वाचून वाटले कुठल्यातरी अभ्यासाबद्दल काही लिहिले असावे …. पुढच्या शब्दांतून मात्र जाणवले , ही Earth म्हणजे धरती वगैरे नाहीये तर माझ्या बाळाला World हा शब्द ऐनवेळी न आठवल्याने तिथे Earth  या पर्यायी शब्दाला जागा मिळालेली आहे  :)

साधा सोपा आणि लहानसा मजकूर !!

Love Earth ….. My Earth 

My Mother cooks lovely . My father works very hard . My brother is very lovely . My grandFATHER is v. good and clever . My grandMother is V.good . the end .

:) :)

पिल्लूच्या शब्द्खजिन्यातल्या मोजक्या विशेषणांनी प्रेमाने लिहीलेले लहानसे पत्र ….
छोट्याश्या बाळाचा छोटासा प्रयत्न …. जरा दोन तीन वेळा वाचल्यावर जाणवलं माझ्या बाळाचं ‘विश्व ‘ म्हणजे फक्त आम्ही सगळेजण …. Very Good शब्दाचं शाळेतली शिक्षिका देते तसं V.Good हे रूप  :)

सगळ्यांबद्दल लिहून झाल्यानंतर स्वत:च नावंही न लिहिणारी निरागसता …. आणि सरतेशेवटी , माझं विश्व हे इतकंच आहे हे ठाम सांगणारं “the end ” :)

जपून ठेवायच्या वस्तूंमधे एका सुरेख सुंदर अनमोल वस्तूची भर !! :) :) ….

आठवणींच्या साठवणी आणि मग त्या साठवणी पाहून येणार या कोवळ्या नाजूक आठवणी :)

हे असं आहे म्हणून आणि आहे तोपर्यंत आमच्याही जगण्याला खरा ‘अर्थ’ आहे हे सांगावं म्हणतेय पिल्लूला आता  ……. :)

मायलेकं :)

“आई झोपलीयेस का ? “

“काय गं ? झोपले नाहीये … पडलेय थोडा वेळ ….. “

“मी पण पडू का इथे माझ्या बाळाला घेऊन ?? “

” हो… ये.. फक्त बडबड करू नकोस…. झोपू दे त्या बाळालाही…”

” बघता बघता तीन महिन्यांच झालं बघ आई माझं बाळं “

” हं  … झोपा आता …”

“हो हो !! अगं झोप येतेच आहे बाळाला पण झोपायचं म्हणून नाही त्याला… झोपायचं हं पिल्लू आता ’आजीशेजारी’ :)  “

(तुझ्यावरच गेलय तुझं बाळ हे अगदी ओठांवर आलेलं वाक्य आईने गिळून टाकलं !! )

” आई अगं याचं स्किन बघ कसं गुलाबी गुलाबी दिसतय !! “

” त्याचं स्किन गुलाबी दिसलं तर दिसू दे आणि आम्हाला तू जरा वेळ झोपू दे !! “

“अगं दिसू काय दे ??? बघ की जरा उठून … “

“अगं लहान मुलांच स्किन गुलाबीच असतं … “

“माझं पण होतं का लहानपणी गुलाबी स्किन ?? “

” हो होतं “

“बघ माझं बाळ माझ्यासारखंच आहे :)

…………

…………

(शेजारी अगदी शांतता पाहून आईला वाटलं झोपलं की काय बाळ ?? … पहाते तर तिची मुलगी आणि बाळ गायब !!)

“अगं कुठे गेलीयेस त्या बाळाला घेऊन ?? “

“कुठे नाही बाळाला टॉयलेटमधे आणलं होतं …”

“टॉयलेट ??? तुझा आवाज बेडरूममधून येतोय … “

“अगं हो बाळं आहे टॉयलेटमधे, मी बेडरूममधेच आहे “

( तीन महिन्यांच बाळ टॉयलेटमधे ??? एकटं ??? आईला प्रश्नच पडला तसा …. पण आईने ठरवले होते की या मायलेकरांमधे आपण पडायचे नाही… घालू दे काय गोंधळ घालायचा ते !! )

(एकदाचं ते टॉयलेटमधलं बाळ आणि त्याची आई परत आली… आता यांचे कपडे बदलणं , पावडर लावणे, सोबत झालेच तर अखंड बडबड करणे वगैरे सव्यापसव्य चालेल या विचाराने त्या बाळाच्या आईच्या आईने अगदी डोळे मिटले…. मनात विचार केला हे ’प्रकरण काही थोडक्यात आटोपणारं नाही, नको आता यांची लामण पहायला !!’ … तसंही या गदारोळात डोळ्याला डोळा लागणं मुश्किलही नही नामूमकिन आहे !! )

“आई ssssssss  गं  !!!”

“कायेsssss   गं ???? “

“अगं ओरडतीयेस कशाला ?? तूला नाही हाक मारली “

“म्हणजे इथे तुझी दुसरी कोण आई आहे मग.. तूच बेंबीच्या देठापासून ओरडलीस नं आईssss गं म्हणून ?? “

” अगं ते ’हाक’ मारायचं आईssss गं नव्हतं…. ते आपल्याला ’दुख’ झालं की ओरडतो नं आपण ते वालं होतं “

(बाळाच्या आईच्या भाषेतला बदल पहाता ती तिच्या खऱ्या वयात म्हणजे वर्षे पाचच्या भाषेकडे झुकायला लागली होती :) )

” हे वालं नं ते वालं …. दुख नाही आणि दु:ख असतं ते !! सॅड वाटलय का तूला, तसं सांगत जा गं बाई …. काय झालं आणि सॅड वाटायला ??? “

“अगं बाळाचं स्किन बघ !!! “

“सांगितलं नं एकदा असू दे ते स्किन गुलाबी म्हणून “

“अगं ते नाही …. बाळाचं स्किन बघ पुर्ण फाटलय पाठीकडे :(

“स्किन फाट्लं ????? फाटलं का एकदाचं …. बघू …. “

(खरच की गुलाबी टेडी बेअर बाळाच्या पाठीला चांगलीच चीर गेली होती .)

“आई स्किन फाटून आतून कापूस बाहेर आलाय बघ “

“हं दिसला… “

“आता काय करायचं गं ’मम्मा’ ??? “

(चिमुकली आई प्रचंड केविलवाणी झाली होती !! )

“आता काही नाही… सुई दोरा घ्यायचा आणि शिवायचं ते बाळं “

” हा सगळा कसूर दादाचा आहे, त्याला कितीदा सांगितलेय की टॉयबॉक्समधे माझ्या बाळांच्या अंगावर त्या रिमोटच्या कार टाकत जाऊ नकोस… त्यांचे ऍंटीना माझ्या बाळांना ’फाडतात’ “

(छोट्या आईच्या तक्रारीत तथ्य होतं … ;) )

“मी सांगते हं दादाला…”

“तू कशाला मीच बघते बेत त्याचा , बाळ माझं फाटलय “

(छोट्या आईच्या डोळ्यात टपोरे थेंब आणि त्या थेंबांआड निग्रह होता …. बरोबरच आहे लेकरांवर बेतलं की आई रणरागिणीचा अवतार घेणारच … )

” कुठेय तो दादा ??? “

” हॉलमधे गेलाय… व्हिडिओ गेम खेळणार म्हटला होता थोडा वेळ “

“ए दादाsssss ….. गेम खेळतोयेस तू ??? “

(दादाचं काही खरं नाही आता !! )

“दादा sssss … मला का नाही बोलावलंस रे.. जा कट्टी !! “

(व्हिडिओ गेमने सध्या बाळाच्या काळजीवर मात केलेली होती ….. :) हातातलं गुलाबी स्किनचं बाळ त्या आईने स्वत:च्या आईकडे हवेतून भिरकावलं आणि ओरडली …)

“मम्मा कॅच ..  तू सांभाळ आता बाळाला थोडा वेळ “

:) :)

(बाळाला असं उडायला शिकवून चिमणी आई स्वत:ही उडाली होती !!  )

खऱ्या आईला खुदकन हसू आलं…. मगाचा आजीचा ’रोल’ बदलून आता आईला ’टेलरचा’ रोल मिळाला होता !!

तीने झोपेला राम राम ठोकला आणि सुई दोरा हातात घेतला…. त्या बाळाच्या फाटलेल्या स्किनला शिवायला सुई टोचली खरी पण कुठल्याही बाळाला अश्या वेदना झाल्या की आईला होणारा त्रास झाल्याशिवाय राहिला नाही !! ती सुई बाळाबरोबरच आईच्या मनाला टोचून गेली….

आईच्या लेकीने त्या टेडीरूपी बाळात प्राणप्रतिष्ठा केलेली होती !!

आईने ते बाळं हळूवार शिवून टाकलं… उगाचच आणि नकळत त्याला जोजावलं !!

ते ’टेडीरूपी’ बाळ कायम रहाणार नव्हतं… हा प्रसंग आईची मुलगी विसरणार होती तरिही आपण काय धरू पहातोय हे आईला समजत नव्हतं …. एक एक धागा, एक एक शिवण प्रेमाची विश्वासाची असावी का ?? की मुलांबाबत काहिही उसवलं तरी ,बिनसलं तरी ते जोडण्याचं सामर्थ्य आई पडताळून पहात होती … असेल काहितरी किंवा काहीच नसेलही , आईला सवय आहे असं विचार करत बसण्याची  !!

कदाचित आयूष्याच्या गांभीर्यावरचा हा पिल्लूसा ’उतारा’ आपल्याकडे आहे, असे वेगवेगळे रोल आपण करू शकतो की नाही याबाबत जग साशंक असलं तरी ते आपल्याइतके चांगले कोणीही करू शकत नाही असा विश्वास बाळगणारी मुलं आपल्याभोवती आहेत हे सोप्पंसं सत्य लक्षात ठेवावं आणि आनंदी व्हावं इतकंच !! :)

अनायसे आज ’World Daughters Day’ आहे आणि माझ्याकडे अशी एक चिमूकली आई आहे म्हणून ’मोठी आई’ खुश आहे !! :)

चिमण्या आईच्या चोचीतल्या गोष्टी विसरू नये म्हणुन ही एक पोस्ट !! :)

ता.क. समस्त आई-बाबांना आणि त्यांच्या चिमण्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा!! :)

(याविषयी आधि लिहीलेली पोस्ट ’लेकीच्या माहेरासाठी’ इथे आहे .)

गट्टी ..

ताप आला होता मधे दोन दिवस. हे म्हणजे ’दुष्काळात तेराव्या महिन्या’सारखे झाले होते. कधी नाही ते देवाला जरा रागे भरावे वाटले, की बाबारे आधि जे काय दुखवून ठेवलेस त्याबद्दल नाहीये नं माझी तक्रार, अभी और नही मंगताहे भाई… पुरे कर की आता वगैरे!!!

सतत काहितरी शोधावे वाटत होते, काय ते ही समजेना. विचार केल्यावर लक्षात आलं काहितरी वाचायला हवय आपल्याला… त्यासाठीची ही शोधाशोध आहे.  वाचायचे काय , समोर पाउलो कोएलो होता खरा पण ते काही वाचावे वाटेना. अचानक आठवलं आपण भारतातून बरीच पुस्तकं पाठवली होती खरी, ती गेली कुठे ? जरा चौकशी केली ’अहोंकडे’ आणि सापडली ती पुस्तकं. अहोंना म्हटलं सरळ की आधिच का नाही दिली मला माझी पुस्तकं,  गेले सहा महिने मी अगदी घराबाहेरही पडत नाहीये. काहीच करता येत नाहीये, साध्या साध्या हालचालींवरही अनंत बंधनं आहेत… तरिही मला ’बोअर’ होतय , मी दमलेय असा उच्चार नाही करावासा वाटत . मला वाचत असलं की बरं वाटतं , त्याने वेदना संपतात असे नसले तरी!!!

त्या पुस्तकांमधून दुर्गाबाई भागवतांच ’पैस’ घेतलं हातात. खरं सांगू तर मी दुर्गाबाई भागवत अजून वाचलेल्या नाहीत, का? माहित नाही… एक आदरयुक्त दरारा वाटत आलाय कायम त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल. हे त्यांचं आणलेलं पहिलं पुस्तकं. ते निवडण्याची प्रक्रियाही अगदी वेगळी, हॅंडमेड पेपरचं कव्हर पाहिलं, त्याचा स्पर्श हाताला जाणवला आणि मग पुस्तक पुन्हा ठेवलंच नाही. अजिबात न चाळता घेतलेलं बहुधा हे पहिलं पुस्तक!!

दुर्गाबाईंच लिखाण वाचलेलं नसलं तरी अनोळखी नव्हतंच…. आपल्या गोंधळलेल्या अवस्थेत शरण जाण्याच्या हक्काच्या जागांमधे जशी अमृता प्रीतम वाटते तश्याच दुर्गाबाई आहेत हे स्पष्टच होते , पण त्यांच्याशी गट्टी जमायची राहिलेली होती .

’स्वच्छंद’ हा पहिलाच लेख वाचायला सुरूवात केली . अपेक्षेप्रमाणे पहिल्याच वाक्याने पकड घेतली. वाचायला लागले आणि वाचतच गेले. असं खूप कमी वेळा होतं नाही, की वाचताना आपलं असं वेगळं अस्तित्व जाणवेनासं होतं. आपली संवेदना ही फक्त त्या शब्दांभोवतीच गुंफली जाते. ते शब्द, ती अक्षरं इतकीच जाणिव उरते…

वाचता वाचता एका ठिकाणी तर थबकलेच मी ….

दुर्गाबाईंनी लिहीलं होतं ….

” मी अंथरूणाला खिळलेली असताना जीव उबगला होता. तास, दिवस, महिने, ऋतू व वर्षे त्यात त्या निरानंद तऱ्हेने फार मंदमंद अशी उलटत होती. प्रत्येक दिवस आपले पाऊल माझ्यावर रोवून मगच नाहिसा होत होता, आणि आपल्यासारख्याच जड निष्ठुर दुसऱ्या दिवसाला, ” तुही ये ” म्हणून साद घालित होता. कंटाळा क्षणाक्षणातून ठिबकत होता . जीवनाधार दिवसेंदिवस क्षीण होत होता.”

अगदी अगदी ओळखीचे वाटले हे…. नेमके आणि थेट , हेच तर म्हणायचेय नं मला…. प्रत्येक दिवस त्याचं ’घेणं’ असल्यासारखी दुखण्याची वसूली केल्याशिवाय काही उलटत नाही.  :( ….. जोडली गेले मी अक्षरश: इथे त्या वाक्यांशी ….

” पण याही दिवसांना भेदून त्यांच्या वाकोल्या बंद पाडणारी फाल्गुनाची अखेरच्या वाऱ्याची एक झुळूक दक्षिणेकडून एक दिवस आली. मला ती चक्क भासली. संस्कृतातल्या दक्षिणानिलाला मी हसत असे. पण उन्हाळ्याच्या तप्त वातावरणात , पान नी पान स्तब्ध उभे असताना, ही मंदशीतळ झुळूक आली आणि ती सरळ माझ्या अधरात शिरली. केवळ भावनावेगानेच स्पंदन पावणारा अधर आता आपोआपच फुलल्यासारखा भरला ; त्यात जोराने रक्त वाहू लागले. काही क्षणांचाच हा अनूभव; पण सुख सुख म्हणजे काय असे मला कोणी विचारले तर वाऱ्याची झुळूक हळूवारपणे अधराला अनाहूत स्पर्श करते नि त्यात खेळते ते खरे सुख असे मी सांगेन. “

ओळख पटतं होती इथे या वाक्यांशी. खरच येते अशी एक मंद झुळूक की त्यानंतर सुख वेगळं शोधावं लागत नाही. माझ्याच मागच्या पोस्टची आठवण झाली मला…

पण हे सगळं इतक्यावर थांबत नव्हतं, माझ्यासाठीची खरी गंमत तर पुढे होती …..

दुर्गाबाई सांगत होत्या,

 ” तेव्हापासून मला आकाश बदललेले दिसले. वसंत येत होता. आता मला बिछान्यावरूनच खूप दुर न्याहाळता येऊ लागले. जग मला आता दूर लोटीत नव्हते; ते मला आपल्या विशाल मिठीत फार हळुवारपणे सामावून घेत होते. आता घर, आंगण, दिसेल ते झाड, पान , पाखरे, उन , पाऊस, वारे, धूळ, किडे, सारे काही मला रिझवणारे वाटू लागले. मी रोज सृष्टीचा अभ्यास करू लागले. आता कितीतरी चमत्कार आमच्या अंगणातच घडू लागले. मी बरी होऊ लागले. कुठलेही बरेवाईट दृष्य मौजेने न्याहाळू लागले. पैसे व शक्ती खर्च केल्याशिवाय मी रिझत होते, शिकत होते. “

या वाक्यावाक्यासरशी अंगावर शहारा येत होता.

अगदी हीच मोजकी वाक्यं माझ्या गेल्या संपुर्ण पोस्टचा , त्यामागे माझ्या असलेल्या विचाराचा आशय अलगद नेमकेपणानं समजावताहेत , सगळा सगळा सार उलगडताहेत . अचानक ’गट्टी’ जमली माझी दुर्गाबाईंशी. आजीने मायेनं डॊक्यावरून हात फिरवून सांगावे की बाळा काही चुकत नाहीये तुझे , जसा विचार करतेय आयूष्याचा तो बरोबर जमतोय. आपला प्रवास योग्य दिशेने नेण्यासाठी जसा हात धरलाय मोठ्यांनी…. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल होतेय आपली….

मग ओरडले , ’आईशप्पथ , दुर्गाबाई u too!! ’ …. जरा भानात येत पुन्हा म्हणाले ,” बावळट आहेस तन्वे… अगं त्यांना कुठली u too विचारते आहेस …. त्या आहेतच. असणारच… आश्चर्य हे आहे की तन्वे u too!!!!! ” … आजारपणाचा असा विचार त्यांनी करणं यात नवल नव्हतेच, पण आकाशायेव्हढ्या त्या व्यक्तीमत्त्वाकडे अत्यंत आदराने पहाणाऱ्या कोणा एका माझ्यासारख्या ’किंचित” व्यक्तीनेही तोच तसाच विचार केला !! निदान एका विचारापुरतंच असलेलं ते साम्य किती बळ देतय आता मला….

आता मात्र दुर्गाबाई तुमच्याशी गट्टी पक्कीच पक्की .

मला आता एकूणातच डरनेका नही- डगमगनेका तर नहीच नही….. गट्टी करत हात कोणाचा धरलाय शेवटी ??  :)

फ्रेम….

सुट्टी ….. वर्षभरानंतर मिळणारी सुट्टी…. अगदी विचारपुर्वक प्लॅन आखून घालवायची असं ठरवलेली सुट्टी….. आम्हीही ठरवली होती… जुलैमधे सुरू होणारी सुट्टी, त्यासाठी जानेवरी- फेब्रूवारीतच ठरवलेली ठिकाणं….

मुळात ही सुट्टी म्हणजे  ’वर्षभराच्या कामाच्या शिणवट्याला घालवण्यासाठीचा वेळ’  हा एक मुद्दा आणि तसेच पुढच्या वर्षाच्या कामासाठीचा उत्साह साठवण्याचाही वेळ…. इथे जाऊ- तिथे जाऊ वगैरे चर्चा …. इंटरनेट्वरची शोधशोध ….. सगळं पार पडत असताना एक मस्त सकाळ आली आयूष्यात …. सकाळी उठायला गेले आणि कळलं आपल्याला उठताच येत नाहीये… मान-पाठ- खांदे वगैरे अवयवांनी पक्का असहकार पुकारला आहे. त्यादिवशी कशीबशी वेळ निभावली खरी …. पण साधारण महिन्याने आणि एक सकाळ पुन्हा अशीच आली….. यावेळेस तर उठता न येण्यासोबतच कमालीच्या चक्कर येण्याचीही सोबत होती…. दवाखान्यात गेले तर ते ही थेट ऍंब्युलन्समधून अगदी सायरनच्या दणदणाटात ….

हे आजारपण काय आहे वगैरे शोधाशोधात गेले २-३ महिने ….. सरळ भारत गाठला मग त्यासाठी, गड्या आपला देश बरा म्हणत…

एक म्हण वाचली होती पुर्वी , Life is what happens to you when you are busy planning other things !!!  :( :)

मुळात ज्या म्हणी पटतात त्या लक्षात रहातात ….. आणि त्यांचा प्रत्यय आला की त्या जास्त पटतात …. मग ते सुट्टीचे प्लॅन्स वगैरे राहिले कागदावर ….. आणि सुट्टी लागण्यापुर्वीच भारतात जावे लागले. एक नाही दोन नाही , तीन तीन डिस्क स्लिप झाल्या आहेत मानेत , माझ्या मानेचा मला न समजणारा MRI माझे डॉक्टर मला समजावत होते …..नुसत्या सरकून थांबल्या तर त्या माझ्या डिस्क कुठल्या , त्यांनी बिचाऱ्या स्पाईनची पार गळचेपी केली…. “गळयात होणारी गळचेपी ” ही कोटी तेव्हा मनात आली नाही इतपत दु:खी मी  नक्कीच झाले होते …. आजारपण स्वत:ला येतं म्हणून त्याचा जितका त्रास होतो त्यापेक्षा कित्येक पट जास्त आपण ज्या वर्तूळाच्या केंद्रस्थानी असतो त्या वर्तूळाच्या परिघावरच्या लोकांना होणाऱ्या यातना छळ मांडत असतात.

डॉक्टरांनी सांगितलेले ऑपरेशन टाळायला मग सेकंड, थर्ड वगैरे ओपिनियन घेणे आले…. ते तसे घेतले गेलेही ….. मनात एक सततचा प्रश्न  होता , ’हे का झाले ? ’ आणि  ’हे मलाच का झाले ?’ :) …. मग आमच्या हेरंबाने एक सल्ला दिला, ” आधि Why me ? ” हा प्रश्न विचारणं बंद कर …. तो बंद करायचा ठरवलंही लगेच, आचरणात आणणं नाही म्हटलं तरी तितकसं सोप्प नव्हतं…. आपल्या आयूष्यात काही छान-भन्नाट घडतं नं, ते चटकन स्विकारलं जातं…. पण मेलं हे आजारपण तितकसं वेलकम होत नाही ….. त्यात आई-बाबा, आजी-मामा-मामी, माझी पिल्लं, बहिण आणि खंबीरपणाचा उसना आव आणलेला नवरा यांचा विचार सगळंच अवघड करत होता!!!

असो, ते ऑपरेशन टळलं एकदाचं…. पण आराम मागे लागला….  सुट्टी गेली दवाखान्यांच्या फेऱ्यांमधे…. अधे मधे चिडचिड वगैरे सुरू होतीच माझी…. आणि माझ्या चिडचिडीचा जराही अनूभव नसलेले माझे आई-बाबा कावरेबावरे होत होते….. एकदा सकाळी उठले तर पाहिलं बाबा खिडकीतून येणारे उन अडवण्यासाठी पडदे सारखे करत होते…. ही सावली त्यांनी कायमच दिलीये आम्हाला. नेहेमी ते असे हलकेच पडदे सरकवून जातात तेव्हा आम्ही झोपलेलो असतो इतकेच…. उठून त्यांच्या मागेच गेले तर स्वयंपाकघरात ते डोळ्यातलं पाणी आवरत आईला सांगत होते , “घेऊन टाकता आलं ना तिचं दुखणं तर लगेच घेऊन टाकेन मी!!! ” :( …. त्यादिवशी नुसती उठलेच नाही तर झोपेतून जागीही झाले….

बाबा सकाळी पुजेनंतर रामरक्षा म्हणतात आणि मग झाडांची फुलं काढायला जातात हा क्रम सहसा न चुकणारा…. त्यादिवशी मी फुलांची परडी हातात घेतली आणि अंगणात गेले…. स्वत:ला एकच बजावले , असाध्य काही झालेले नाहीये, पुरे आता ही सहानूभूती….  जे जमेल ,जितके जमेल,  जसे जमेल तसे सुरू झालेच पाहिजे आता….

घेतली फुलांची परडी हातात आणि अंगणाला प्रदक्षिणा घालायला लागले…. एक एक फुल हातात येताना त्यांचा टवटवीत तजेला मला देत होते जसे…. लहानपणी असेच मी फुलं आणून द्यायचे बाबांना…. या निमित्ताने पुन्हा लहान होता येत होतं…. कळीला धक्का लागू द्यायचा नाही असं स्वत:च्याच मनाला बजावत होते मी… म्हटलं तर खूप विशेष काही नव्हतं घडतं, पण मला खूप शांत वाटत होतं !! सकाळच्या एकूणातच कोवळ्या स्वच्छ्तेने मन निवांत विसावत असावं बहूधा…. माझ्या आजारपणाने माझ्या संपुर्ण कुटूंबाचे किती महिने असे काळजीत जाताहेत ही खंत विसरले मी काही काळ…. ’सुट्टी’ चे आखलेले बेत आठवले मग, वाटलं सुट्टी घेणार होते ती हा निवांतपणा मिळवण्यासाठीच की…..

मग कॅमेरा आणला घरातून, आपण हेच करतो नं फिरायला गेल्यावर, भरपूर असे फोटो काढतो…..

हा मग विरंगूळाच झाला एक , जमेल तेव्हा बागेत जायचे आणि फोटो काढायचे…..आज ते फोटोच टाकतेय एकामागोमाग एक….

मी फोटो काढायचे , आपल्याच बागेत फिरायचे ठरवले आणि तो आनंद साजरा केला आमच्या ब्रम्हकमळाने…. एक नाही दोन नाही सात फुलं आली त्याला यावेळेस…..

ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालेलो असतो , कोणे एके काळी जिथे बाहेरून कोणी ’काकू’ म्हणून हाक मारली की ती आईसाठीच असणार हे ठरलेले असते, तिथे ’ओ काकू बाहेर एक गंमत आहे, पहायला या ’ ही माझ्या मुलाच्या मित्रांनी मारलेली हाक मला नेहेमी वय वाढल्याची जाणीव करून देते…. ;)  बच्चेकंपनीला मी म्हणजे एक ’रिकामटेकडी’ काकू मिळाले होते त्यामूळे त्यांच्या विश्वातल्या लहानमोठ्या घडामोडींमधे ते मला सामील करून घेत होते , त्या मुलांनीच दाखवलेली ही एक गोगलगाय :)

कितीही प्रकारची फुलं माहित झाली तरी गुलाबाचं फुलं आवडतंच…. नाही का??

गुलाब जसा आवडता तसेच अत्यंत आवडते म्हणजे गणेशवेल, गोकर्ण आणि गुलबक्षी ….. गुलबक्षीचं एक बरं असतं पाऊस आला की ही रोपं आपली आपण येतात…. बहरतात , रंगांची उधळण करतात…. सगळा सौम्य कारभार…..

एक नाजूकशी गोगलगाय जशी दिसली तसे बाकि प्राणी-पक्षीही हजेरी लावत होते ….. कधी कॅमेरा हातात असताना सापडायचे तर कधी आठवणीत जागा पटकवायचे…..

चांदणीची फुलं काढताना सापडलेले सुरवंट….

तर हा अचानक दिसलेला सरडा….

ही जवळपास तीन इंच मोठी गोगलगाय….. कुठून आली होती देव जाणे, मी मात्र पहिल्यांदा इतकी मोठी गोगलगाय पाहिली…..

मुळात पावसाळा सगळं कसं स्वच्छ लख्ख करत होता….. हळूहळू घराच्या अंगणातच मी मनापासून रमत होते :)

पानावरून ओघळणारे थेंब असोत ….

की स्वस्तिकाची आठवण करून देणारे पपईचे फुल असो…..

की अगदी भुछत्र असो….

की अगदी गुलाबी लालबुंद डाळिंब असोत…. सगळ्यांनी मला उभारी दिलीये हे नक्की!! :)

मनावरची काळजी हटणं किती महत्त्वाचं असतं नाही…..अंगणाची एक नवी व्याख्या समजली मला त्या दरम्यान एक…. अंगण नं एक ’फ्रेम’  असतं….. सुंदर फोटोभोवती तितकीच सुरेख, रेखीव नाजूकशी फ्रेम असली की मुळचा फोटो कसा उजळून निघतो नं.. तसं प्रेमाने भरलेल्या घराभोवतीचं अंगणं, त्यातली झाडं-पानं -फुलं अशीच मुळच्या घरातल्या भावभावनांचं सौंदर्य वाढवणारी असतात..असावीत … :)

फोटोला सुरक्षित ठेवणारी, त्याला धक्का लागू न देणारी ’फ्रेम’ ….. फोटोतल्या व्यक्तीच्या स्वभावाचे वैशिष्ट्य पहाणाऱ्याला अलगद , गुपचूप सांगणारी ….. तसेच या अंगणाने मला सुरक्षित ठेवले…. मनाला (मानेला ;) ) घड्या पडल्याच होत्या , त्यांना हळुवार सांभाळले, फुंकर घातली…..

कधी कधी वाटतं सुट्टीला कुठेतरी गेले असते तर मनात इंद्रधनूष्य साठवायलाच नाही का ? आकाशाची ती सप्तरंगी उधळण मनात साठवायलाच नं…. मनमोराचा पिसारा वगैरे फुलवायलाच नं …..

यावेळेस मात्र जरासा ’काखेत कळसा’ असल्याचा प्रत्यय आला मला :)

इंद्रधनूष्यही अगदी हाक मारल्यासारखे हजर झाले :)

मन उजळले मग चटकन…..

माझ्यापायी घरच्यांचाही सुट्टीच्या भटकंतीचा विरस झालाय ही बोच आहेच तशी, पण निदान आजारपण सुसह्य झाल्यामूळे त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद तरी वाढला!!!

खूप खूप लिहू शकतेय मी… लिहायचेही आहे मला , पण आत्ता नाही…. माझ्या डॉक्टरांनी मला सध्या ’शिपायाचं’ काम कर असं सांगितलेय… एका जागी बसायचं नाही…. हातातली कागदपत्र वाटत असल्यासारखं सतत एका जागेवरून दुसरीकडे जायचं :) … तेव्हा एका बैठकीत खूप कमी लिहीता येतेय मला ….

ही पोस्ट बिस्ट काही खरच  नाहीये तशी… जाता जाता एक छोटा प्रयत्न करावा वाटतोय एक ….

गेल्या सहा महिन्यात ’ मला उत्तरं द्यायला जमत नसल्याचा ’ कुठलाही राग मनात न आणता मला सतत मेल्स, मेसेजेस, फोन करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मंडळींचे आभार मानण्याचा…. मला भेटायला येणाऱ्या, माझे रिपोर्ट्स डॉक्टरांना वैयक्तिक नेऊन दाखवून सल्ले घेणाऱ्या अनघा ,राजीवजी , सुनीतचे आभार मानण्याचा…..

कमेंट्स टाकत रहाणाऱ्या आणि ब्लॉगवर काहिही नवे नसतानाही चक्कर टाकणाऱ्या नव्या आणि जुन्या वाचकांचेही आभार!! :)

आणि काय लिहू, तुम्ही सगळे हातात हात घालून माझ्याभोवती एक कडं उभारलेलं दिसतय तोवर कशाला भीत नाही ब्वॉ मी …. एक अत्यंत सुंदर फ्रेम आहे किनई माझ्याभोवती , नाजूकशी तरिही अत्यंत भक्कम……

बस फिर और कुछ नही, आजके लिये इतनाही …. जशी जमेल तशी पुढची ’पोस्ट’ टाकतेच!!!

एक छोटीशी मोठीशी नोंद :)

‘ताई’ :)

‘तायू’ :)

‘तायडे’ :)

माझ्या ब्लॉगने मला दिलेली नावं ….. नुसती हाकच नाही तर ‘ताई’ मानून मनापासून प्रेम करणारी अनेक भावंडही दिली या ब्लॉगने …..

विद्याधर भिसे …माझा असाच एक भाउ :) ….. सगळ्या ब्लॉंगांवर ‘प्रॉफेट’ नावाने येणारे कमेंट्स पाहून मी २०१० मधे शोध घेतला, म्हटलं कोण बूवा हा ‘प्रॉफेट’ ??? :)

या बाबाच्या भिंतीवर पोहोचले शोध घेता घेता …. आणि मग एक सकस, प्रगल्भ वगैरे लिहिणारा मुलगा अशी ओळख पटली …. सुरूवातीला कमेंट्स मधून झालेली ओळख वाढत जाऊन , विद्याधरशी धाकट्या भावाचं नातं जुळलंही आणि वाढलंही :)

आजची नोंद आहे या भावाला Thank You म्हणण्यासाठी …. आता आभार मानले तर मला माझा भाऊ रागावणार आहे याची कल्पना आहे मला…. तरिही मी हे नोंद करतेय!!! माझ्या या भावाकडून काल मला एक गिफ्ट मिळालेय …..माझं आवडतं गिफ्ट … एक पुस्तक :)

 

 

Flipkart कडून असे गिफ्ट वगैरे आले नं मला भलताच आनंद झाला … पुर्वी माझ्या नावाने पुकारा करत पोस्टमन आला की मला असाच आनंद व्हायचा … कित्ती दिवसांनी ‘मजा आली ‘ असं सहज म्हट्लं गेलं ….

पुस्तक पढके होने के बाद मेरा मत मांडती हूँ  :)

 माझे अनेक सहब्लॉगर्स मला ताई म्हणतात , आणि ते मला मनापासून आवडते. एक नातं जुळलेय आम्हा सगळ्यांचे… एकाचा आनंद सगळ्यांचा असतो आणि तसेच एखादा नाराज असेल तर त्याच्यासोबत सगळे उभे असतात ….. मस्त चाललेय आम्हा ब्लॉगर्सचे….

खरं सांगू का आणि तसेही ताईलाच मिळते नं राखीपौर्णिमेचं गिफ्ट ;)

खूप काही लिहीत नाही, माझे आपले नेहेमीचे की हे ऋणानूबंध असेच राहूदेत :)

बाकि काय तेच आपले ‘ जय ब्लॉगिंग’ :) ….

… लिहीत राहूया…. वाचत राहूया आणि असेच सगळे सोबत राहूया :)

 

या जन्मावर …..

गेला पुर्ण महिना आधि मुलगा आजारी आणि मग तिच्या मानेचं दुखणं , ती वैतागली होती अगदी . मुलाला बरं नाही मग मन अगदी हळवं झालेलं, त्यातच एरवी अगदी दुर्लक्ष करावे इतपत मुर्ख असे काही भलेबुरे अनूभव…. तिने जशी हार मानली .

मानेच दुखणं आलं काय म्हणायचं…. हाहा म्हणता वाढलं प्रचंड!! अगदी बसवेना आणि उठवेना…. बरं मानेला झटके न देता आपल्याला बोलताच येत नाही हा नवा साक्षात्कार त्या दरम्यान झाल्याने, तीची बोलती बंद झाली अगदी :) … या संधीचा तसं पहाता घरच्यांना आनंदच झाला असता पण तीची परिस्थीती पहाता तो त्यांनी खूप बडबडून व्यक्त केला नाही इतकेच :)

हळवं मन वेडेपणा करण्यात पटाईत… कशाला महत्व द्यावं नं कशाला  “खल्लीवल्ली ” (आमच्या अरेबिक मधे  “गेले उडत” :) )म्हणावं याचं भान विसरलेलं :( …. मळभ मनावर आलेलं…. आवसं जशी सारी !!! काळी काळी… कुंद कुंद वातावरण….

डॉक्टरांच्या वाऱ्या आणि औषधांच्या वेळा आलेच मग ओघाने !!

एक सकाळ, उठताना तिला अंमळ उशीरच झाला… होणारच होता… उठून लागली ती तयारीला, मुलं जायची होती नं शाळेत…. तोच ’सरप्राईज’ चा नारा कानावर पडला… मुलं शाळेची तयारी करून कधीचीच तयार बसलेली :) एरवी हाका मारूनही लवकर न उठणारी मुलं, आज बाबाच्या एका हाकेत उठून अजिबात आवाज न करता आवरून तयार होती…. हा गोड धक्का कमी वाटावा तर काही वेळातच ऑफिसला गेल्यानंतर, दर दोन तासानी नवरोजींचे येणारे फोन सुरू झाले. गोळ्या घ्यायची आठवण नवरोजी न विसरता देत होते.

“तू मला फोन करत तर नाहीसच पण मी केला तर घेतही नाहीस, येव्हढं काय काम असतं ऑफिसमधे ???  ” हा बायकोमंडळाचा सार्वजनिक मुद्दा तिच्याहीकडे आहेच… पण या आजारपणाच्या दिवसात तो पार धुवून निघत होता. सकाळी सगळं काम आवरून बाहेर पडणारे घरातले बाकिचे मेंबर्स , ’तुम्हाला माझ्या कामाची कदर नसते ’ वगैरे तिचे स्वत: दमल्यानंतरचे आरोप बिनबूडाचे ठरवत होते :)

नेहेमी ’चटपटं आणि यम्मी ’ जेवायला दे हा हट्ट असणारी मुलं , “मम्मा आम्हाला वरण भात खायचाय ” असे समजूतदारपणे सांगून आईच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होती.

सगळं तसच चाललं होतं जे एखाद्या साध्या ’सुरळित’ चालणाऱ्या घरात चालायला हवं !!! पण हे ’सुरळित’ चालणंच यावेळेस तिला विचारात पाडत होतं …. किती गृहित धरलेलं असतं ते आपणं …. लहानशी पिल्लं ,आईला काम पडू नये म्हणून स्वत: स्वत:च काम आवरताना पहाणं हा भाग्ययोग असावा, हा सोप्पा विचार मनात डॊकावत होता !!!

होता होता बरी झाली ती… मित्रमंडळाने एकटं पडू दिलं नाही आणि जपण्यात घरचे कमी पडले नाहीत :)

मनावरची आवस दुर होतं चंद्राची कोर आकार वाढवत होती….

महिनाभर घराबाहेर न पडता आलेले तीचे कुटूंब मग किराणा घ्यायच्या निमित्ताने मॉलच्या आवारात शिरले… तिला आता मान हलवता येत असल्याने, बोलताही येउ लागले होते…. :)

सगळं ’सुरळित ’ …. म्हणजे अगदी आपल्याला गाडी पार्क करायची असल्याने कोणी तरी त्यांची गाडी अगदी हुकूमी रिव्हर्स घेत असावे, पार्किंगची समस्या हा प्रश्न आपल्याला न पडण्याची खबरदारी घेतल्यासारखे ….. बाहेर सुरेख गार हवा असावी…. आपल्या मनातले त्रासदायक  विचार तीने होळीच्या आगीत मनातल्या मनात टाकलेले असावे….

’ती’ कितीतरी दिवसांनी मनापासून हसली :)

नवरोजी आणि मुलं , “आम्ही आलोच ” म्हणून कुठेतरी गेली तिची …. ती आपली सामानाच्या रांगामधून फिरत होती… स्वत:च स्वत:शी संवाद साधत… “महिला दिन”शब्दाचा , स्त्रीमूक्ती वगैरे उहापोहाचा अर्थ स्वत:शी लावत तीने नेहेमीची खरेदी केली.

गाडीपाशी परत पोहोचली ती, नवरा आणि मुलं अचानक कुठूनतरी प्रकटले…. तीने हसून विचारलेही, “काय टपून बसले होतात का कुठे मी यायची वाट पहात ?? ” :)

मुलं गाडीत बसली आणि ती तिच्या जागेकडे वळली… तिथे असलेली सामानाची पिशवी पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने त्या तिघांकडे पाहिलं , ते पुन्हा ओरडले  “सरप्राईज “ :) ….त्या पिशवीत काय होतं, सोन्याचा हार बिर …छे, मुळीच नाही … त्यात होतं एक सरप्राईज :) .. या फोटोतलं …..

खूप मोठं नाही… छोटसं…. त्या मॉलमधल्या गेल्या दोन तीन चकरांमधे तिने उचलून उचलून पाहिलेलं आणि  किंमत पाहून नेहेमीप्रमाणे परत ठेवलेलं. :) … साधीशी आवड तिची, तिने न उच्चारलेली न उल्लेखलेली ….. तिच्या घरच्या मंडळींनी कधी तरी लक्षात ठेवलेली :) …. ती खुश होत होती ….. ती पुन्हा ’ती’ होत होती… हसणारी, खुश होणारी आणि हो मान हलवत बोलणारीही :)

गाडीमधे गाणं लागलं तितक्यात , “तेरे जैसा यार कहा “  ….. सगळं ठरलेलं म्हणजे … गाणं ठरलेलं, गिफ्ट ठरलेलं …. मुख्य म्हणजे ती आपली आहे , सध्या नाराज आहे, तिला हसवायलाच हवं हे पक्कं ठरलेलं :) ….

“मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगाके

बैठा दिया फलकपें, मुझे खाक से उठाके….

यारा तेरी यारी को, मैने तो खुदा माना ” …….. :)

तिचा नवरा गात होता….तिच्यासाठी :)

एकही शब्द खोटा नव्हता … सगळं साधंस, प्रामाणिक :)

गाडी घराकडे धावत होती…. गाणी एकापाठोपाठ एक बदलत होती…. मुलं बोलत होती, हसत होती, खेळत होती, दंगा करत होती…..

एक  ” स्त्री ” एक महिला वगैरे विचारांच्या पुढे ती एक व्यक्ती, एक बायको, एक आई म्हणून क्षणोक्षणी तृप्त होत होती…. घरच्यांनी गिफ्ट दिले म्हणून का, ते आजारात काळजी घेत होते वगैरे म्हणून का ? तर नाही…. पण त्यांना तसे करावेसे वाटले म्हणून :)

मोठ्या मोठ्या वल्गना करताना , छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि जीवनातला आनंद हरवून जातो हे सत्य तिला पुन्हा सापडले होते.  मनात आनंद तृप्त असेल तरच तो ओसंडतो आणि ज्यांच्याकडे दु:ख असते ते दु:खच वाटणार जगाला, हा विचार मनाच्या कोपऱ्यात हरवलेला जणू :( … तोच विचार तिला पुन्हा गवसला आज …..”आयडियल” म्हणजे काय याचा नेमका हिशोब चोख समजला पुन्हा  :)

गाडी तिच्या मार्गाने घराकडे निघाली होती… ती पुन्हा परतत होती तिच्या घरी :) ….

खिडकीच्या काचेतून पौर्णिमेचा तेजस्वी पुर्ण चंद्र तिच्यासोबत निघाला होता :) …. मनात एक सुर निनादत होता….. “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ” :)

सहजच ब्लॉगिंगची तीन वर्ष :)

५ मार्च २००९ …… ’सहजच’ सुरू केलेलं ब्लॉगिंग !!

५ मार्च २०१२ ……. या प्रवासाला होता होता तीन वर्ष पुर्ण झाली. :) :) :)

ब्लॉगच्या पहिल्या वाढदिवसाला एक पोस्ट लिहीली .

दुसऱ्या वाढदिवसालाही एक पोस्ट लिहीली. :)

नेहेमीचाच डायलॉग आजही पुन्हा म्हणावा लागेल ….

खरं तर माझा आरंभशुर स्वभाव पहाता हा ब्लॉग गेले तीन वर्ष टिकाव धरून आहे याचेच मला कधी कधी आश्चर्य़ वाटते. पण एक खरेय की अधून मधून मला येणारे कंटाळ्याचे लहानमोठे झटके वगळता ब्लॉगाची तब्येत ठीकच किंवा उत्तमच आहे म्हणावी लागेल.

गेल्या वर्षभरात ब्लॉगर्स आणि वाचकांच्या रुपात जोडली गेलेली बरीच नवी नावं/ नाती , देउळ या पोस्टची कृषीवलच्या कलासक्त पुरवणीतली दखल ह्या काही विशेष बाबी …. :) …. नवी नाती जोडली जातानी जुनी तशीच टिकून आहेत याचा आनंद खरच भरपुर आहे.

यावेळेस खूप काही बोलणार नाही ( खरं तर गेल्या ३-४ दिवसात मानेने पुकारलेल्या असहकारामूळे डॉक्टरांनी लॅपटॉपला हात लावायला देखील मनाई केलेली आहे… मगर आजका दिन खास है ना :) ) … छोटीशी पोस्ट आणि नोंद एक …..

मंडळी या ब्लॉगवर , इथल्या धडपडणाऱ्या कधी जमणाऱ्या अक्षरांवर प्रेम करणाऱ्या माझ्या कुटूंबियांचे, ब्लॉगर मित्र मंडळींचे, कमेंटणाऱ्या आणि न कमेंटणाऱ्या वाचक मंडळींचे सगळ्यांचे मन:पुर्वक आभार!!!!

तुम्ही सगळे नसता तर मी खरच टिकले नसते इथे ….. :)

जय ब्लॉगिंग !!!!!!!!!!!!! :) :) :)

फुलपाखरू….. (भाग १)

सगळी कामं चटाचट आवरती घेऊन रमा निघाली, दाराला कुलूप लावताना एकीकडे पिल्लूला सुचना देत होती ती… डबा नीट संपव, टिचरचं ऐक…. शाळा सुटली की तिथेच थांब , मी येतेच आहे घ्यायला….पिल्लूला त्याच्या शाळेच्या बसमधे चढवून रमा चटकन सरिता मॅडमच्या घरी पोहोचली.

मॅडम तिची वाटच पहात होत्या…. रमा जरा विसावली क्षणभर. मॅडमनी दोघींसाठी चहा मागवला आणि रमाच्या हातात एक पत्ता दिला.  पुढचे पंधरा दिवस रमाला जायचे होते तिथे. उशीर करून तसेही चालणार नव्हतेच…. पिल्लूची शाळा संपायच्या आत रमाला पुन्हा परतायचे होते.

रोजचे हे हक्काचे तीन तास रमाचे असायचे. या नव्या शहरात सुरूवातीचे काही दिवस रमाला अगदी कठीण गेले… नवी जागा, पिल्लू लहान , ही अडचण नं ती समस्या पण रमा रुळली तिथे… आणि अभयची साथ होतीच तिला. पिल्लू आता शाळेत मस्त एंजॉय करत होते :) … हे रमाचे नव्हे पिल्लूचे मत होते त्यामूळे रमा मात्र सुखावली होती ….. पिल्लूच्या शाळेत एंजॉय करण्याने रमा तिच्या आवडत्या समाजसेवेकडे वळली होती पुन्हा.

सरिता मॅडमची संस्था एक प्रकारे आधारगट चालवत होती, मात्र हे काम जरा वेगळे होते. एकटे रहाणारे वृद्ध किंवा वृद्ध जोडप्यांना काही वेळ देणे आणि तो ही त्यांच्या रहात्या घरातच हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. तिथे जाउन त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांची औषधं आणून देणे, त्यांच्यासाठी पुस्तक वाचणे, त्यांना बॅंकांमधे वगैरे नेणे असली जिकीरीची कामंही त्यात असतं कधी कधी, ही सगळी कामं रमा आणि तिच्या नुकत्याच झालेल्या मैत्रीणी आनंदाने करत.

मॅडमने दिलेला पत्ता वाचताना रमा चमकली क्षणभर…. ’श्रीकृष्ण नगर’ ….ऐकलेले आहे हे नाव तिने याआधि खात्रीने…. कुठे पण?? तसे खूप नाविन्य नाहीये नावात म्हणजे याच गावाचा असेल संदर्भ कश्यावरून…..या शहरात आल्यानंतर खरं तर अधे मधे ते नाव तिच्या मनात डोकवून जायचे…. आज अवचित तेच नाव सामोरे आले अनं रमा गोंधळली.  अर्थात दवडण्यासाठी वेळ होताच कुठे तिच्याकडे… तिने पत्ता पर्स मधे कोंबला आणि गाडी वळवली…. एक अनामिक हुरहूर मनात दाटली तिच्या . आयुष्य रमाला याचसाठी कायम आवडायचे… सकाळी उठताना आपण कामाची यादी करू भलेही पण त्यातली होणार कुठली कुठली हे आपण ठरवूनही भागत नाही :) …आयूष्याचं unpredictable असणं अत्यंत मोहक असतं असं तिला कायम वाटायचं…. गाडीच्या वेगाबरोबर तिचे विचार आज धावत नव्हते तसे, आणि ते धावले असतेही तरी तिने त्यांना रोखून धरले होते……

श्रीकृष्ण नगरच्या पाटीपाशी थांबून तिने पत्ता पुन्हा एकदा वाचला….

पत्त्यातलं घर एक सुरेख बंगली होती…. इथल्या काकुंकडे रमाला यायचं होतं आता, वयाने सत्तरीच्या पुढच्या या काकू खरं तर ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलाकडे रहातात. सध्या महिनाभरासाठी एकट्याच भारतात आल्या आहेत ही सरिता मॅडमने दिलेली माहिती रमा आठवत होती. घाईत आपण त्यांचे नाव वाचलेच नाही या विचाराने रमा स्वत:शीच हसली…. यात नवे काय होते म्हणा, हे असे घोळ घालणं रमासाठी कायम होतं…. नावं न विचारणे आणि चुकून विचारलेत तर विचारल्याच्या पुढच्या क्षणी ते विसरण्याचा तिचा हातखंडा होता.

दारावरच्या पाटीवरचं आडनाव पाहून मात्र रमाची खात्री पटली आजचा दिवस काही वेगळा दिसतोय…. तोच भाग आणि तेच नाव, किती वर्षांपुर्वी ऐकलेलं…. कितीही विसराळू म्हटलं तरी काही नावं कोरलेली असतात की काय अश्या विचारातच रमाने दार वाजवलं. तसेही काही आडनावं काही भागात अत्यंत कॉमन असतात , आपण उगा गुंते घालायचे नाहीत असा विचार तिच्या मनात आला…..

या घरात आणि या काकूंकडे आपलं पटेल याची खात्री तिला पहिल्या काही मिनिटातच पटली . स्वच्छ , नीटसपणा आणि साधं पण कल्पकतेने सजवलेलं घरं ही रमाची अत्यंत आवडती बाब, आणि या घरात नेमकं तेच रमाला खूप आवडलं. कामवाल्या बाईकडून घर आवरून घेणं हे एक मोठं काम असतं वगैरे मुद्दे आले आणि तिचं काकूंशी जमून गेलं…. दोन गप्पिष्ट बायका एकत्र आल्या होत्या…

पुढचे तीन चार दिवस भराभर गेले….

त्यांना काय हवेय काय नकोय वगैरे रमा जाणून घेत होती.दोघींच एकमेकींशी ’जमलं’ मनापासून… काही घरात रमाला जमवून घ्यावं लागत असे , इथे अलगद सुर जुळत होते. ’रमा’ तुझं नाव मला कायम आवडायचं … काकू सहज तिला सांगत होत्या. त्यांच्या बालपणीचे किस्से ऐकत, त्यांच्या औषधांची यादी समजावत घड्याळाचा काटा रोज चटाचट पुढे सरकत होता. ” ’चहाचा कप’ आणि गप्पा  ” हे काकूंनी त्यांच्या गप्पांच नाव ठेवलं होतं….

“रमा,  गेल्या कित्येक वर्षात इतकं बोलले नव्हते गं मी, काका होते नं तेव्हा त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या माझ्या , तुझी ती सरिता ओळखते नं मला…. तिला मी म्हटलं होतं तुझ्याकडची बडबडी मुलगी पाठव , तिने लगेच तुझे नाव सुचवले…. मला ’रमा’ नाव आवडतेच आणि, माझ्या फार आठवणी आहेत या नावाशी निगडित….. ” काकूंच्या बोलण्याचा ओघ सुरूच असे.

रमादेखील असं खळखळून किती दिवसानी हसली होती. काकूंच्या बोलण्यात बरेचदा उल्लेख व्हायचा, ’लहान आहेस गं पोरी अजून … ” … रमाला मजा वाटायची तेव्हा. लग्न झाल्यापासून  ती अचानक खूप मोठी झाल्यासारखे वाटवणारे दडपण ती विसरून जायची मग. रमाच्या मनातलं फुलपाखरू मोकळं वाटायचं तिला तेव्हा….

’फुलपाखरू’ … नाजुकसं, सुंदरसं…. रमाने गुपचूप ठेवलेलं होतं त्याला मनात लपवून…. बाहेर काहिही चालू दे , मनात मात्र राज्य त्या फुलपाखराचंच….. :)

रमाला या चहाच्या कपाबरोबरच्या गप्पा खूप आवडल्या होत्या. तिची खूप लहानशी स्वप्न होती नेहेमी,  त्यातलं एक म्हणजे अश्या गप्पा मारणारी सासू… अभयच्या आईला असली स्वप्नाळू कल्पना ऐकवणं जरा अवघडंच होतं.  रमा एका वेगळ्या पातळीवर विचार करणारी आणि अभयची आई एका वेगळ्या… दोघींचे सुर इतर अनेक सासू सुनांसारखे वेगळे असले आणि त्यांच्यात वाद नसले तरी रमाची लहानशी स्वप्न मात्र तिला नेटाने मागे सारावी लागली होती. “सुनेने सुनेसारखेच वागायचे ” हा नियम ऐकून ऐकून रमा नित्य नेमाने गोंधळत जायची….. सुनेकडे फुलपाखरू नसावं बहुतेक , हळुहळू रमाला वाटायला लागलं मग!!! फुलपाखराला बरणीत कोंबलं होतं जणू… मलूल पडलेलं असायचं ते तिथे….. सगळं सुख असलं तरी मोकळ्या हवेत उडणाऱ्या, रंगांची, ताजेपणाची सय व्हायची फुलपाखराला, त्या जिवाची घुसमट व्हायची !!!

” रमा तुझ्या बालपणाबद्दल सांग गं, कुठली आहेस तू?? ”  काकूंचा अचानक आलेला प्रश्न होता खरं तर हा !! त्यांच्या आधारगटाचा तसा  अलिखीत नियम होता की जिथे जाल तिथली माहिती विचारायची नाही आणि सहसा आपल्याबद्दल फारसे काही सांगायचे नाही. आज त्या नियमाला मुरड घालून रमाने गप्पा मारल्या….  तिच्या कॉलेजचे नाव काकूंनी परत विचारले, आणि त्या मंदश्या हसल्या. रमा अभयबद्दल, पिल्लूबद्दल भरभरून बोलत राहिली. ती घरी जायला निघाली तेव्हा काकूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशिर्वाद दिला. तिच्या पाठीवर त्यांची बोटं हळूवार फिरली…. त्यांच्या मायेनं भारलेल्या अनपेक्षित कृतीने रमा सुखावली. आज काकू बोलल्या नाहीत फारश्या, उलट मन लावून आपलं बोलणं ऐकत होत्या असं वाटलं तिला.

पंधरा दिवस चटकन संपले … काकूंचा निरोप घेणं रमाला जड गेलं. शेवटच्या दिवशी काकूंनी आग्रह केला म्हणून अभय आणि पिल्लूही त्यांना भेटायला आले. तिघांनी वाकून काकूंना नमस्कार केला. किती बोललं गेलं असलं तरी गप्पा कितीतरी मारायच्या राहिल्याच होत्या, काकूंबद्दल अजून किती जाणून घ्यायचे होते, त्या गप्पा पुढच्या भेटीत असे दोघींनी ठरवले :)

पुढच्या दिवशी काकूंचा मुलगा, सुन आणि नात येणार होते. ते सगळेच परत त्यांच्या मुक्कामी परतणार होते.

रमाला आता एखाद दोन दिवस सुट्टी आणि मग पुढच्या काकू किंवा काका-काकूंकडे जायचे होते. :)

……………………

 

फुलपाखरू भाग २ इथे आहे !!

फुलपाखरू….. (भाग २ )

(पहिला भाग इथे आहे. )

पुढचे काका- काकू , आणि मग त्याच्या पुढचे काका किंवा नुसत्या काकू …. दिवस पुढे सरकत होते. पिल्लूच्या शाळेतला अभ्यास वाढत होता…. अभयच्या ऑफिसमधलं कामंही छान चाललं होतं. रमाला निवांत वेळ हाताशी कमीच लागत होता तसा . कधीतरी चहाचा कप आणि जरा सवड हातात एकत्र आली की त्याबरोबर काकूंची आठवण मनात आल्याशिवाय रहायची नाही. सरिता मॅडमला काकूंबद्दल विचारू हा विचार मनात यायचा आणि मग घाईत ते राहून जायचे…..

त्यात पिल्लूच्या शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर रमाच्या सासूबाई तिच्याकडे रहायला आल्या…. ’समाजाची कशाला हवीये सेवा , त्यापेक्षा एखादी नोकरी करावी ’ हा विचार रमाला येता जाता कानी पडायला लागला. रमाने त्यांचे बोलणे मनावर न घेता त्यांच्याशी संवाद साधायचा नेहेमीचा प्रयत्न चालवला होता. सगळं म्हणायला सुरळीत चाललेले होते.

एक दिवस मग ते सगळे या भागातल्या प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात गेले होते…. या शहरात आल्यापासून अभय रमाला कित्येकदा तिथे चलण्याबद्दल म्हणत होता, रमाने ते कायम टाळले होते. आज सासूबाईंची इच्छा म्हटल्यावर रमाला जावेच लागले….. अनेक साड्यांची खरेदी झाली…. एकीकडे ती स्वत:, मधे अभय आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई बसलेल्या होत्या…..  रमाला वाटले नात्यांची ही एक साडीच आहे ही, सासूबाई मुख्य साडी , अभय जोडणारा धागा आणि आपण काठाला उभे आहोत….

साड्यांच्या राशीतून एक बेंगनी रंगाची, हिरवे सुरेख नाजूक काठ असलेली साडी रमा हातात घेउन पहात होती. तिच्या मनातल्या फुलपाखराचे आवडते रंग….जांभळा रंग आणि हिरवे काठ असलेलं जरतारी फुलपाखरू….  तिच्या सासूबाई फणकारल्याच तितक्यात, काय तरी साडी निवडलीस गं रमा, वेगळच काहितरी शोधतेस नेहेमी ….. भिरभिरणारे फुलपाखरू बिचकले, पुन्हा कोषात गेले :(

” ती साडी घेऊयात तूला “, असे अभयने म्हटल्यावर मात्र तिने नकार दिला….

रमाच्या मनात एक विचार चमकला परत येताना , जुनी रमा असते नं मी तर आत्ताच्या आत्ता सासूबाईंना अर्धा तास डिवोर्स दिला असता … बोललेच नसते… बालिश इलाज होता तिचा हा… कट्टी नाही म्हणायची ती, डिवोर्स म्हणायची …. तिच्या कॉलेजमधे सगळे हसायचे तिला या शब्दाबद्दल. जुन्या आठवणी तरळल्या मनात आणि तिला वाटलं ’लहान आहोत आपण .. पिल्लूयेव्हढे किंवा जरासे मोठे ’ …. अधेमधे असे बालिश वागता येण्यासाठी तरी काकूंसारखी सासू हवी होती मला…. वयानेच नाही तर खरंखूरं मोठेपण असणारी….  मनात विचार आला खरा पण त्या विचारासरशी रमा चपापली. तिने सासूबाईंच्या हातातले सामान घेतले आणि ते सगळे घराकडे निघाले…. नाजुकश्या पंखाची उघडझाप झाली क्षणभर मनात आणि पुन्हा ते उदास मिटले ……

सासूबाई गावी गेल्यानंतर पुढचे जवळपास आठ -दहा दिवस रमाला सरिता मॅडमकडून फोन आला नव्हता… पिल्लूच्या शाळेची सुट्टी संपून शाळा सुरु झाली. रूटिन सुरू….

रमा घरातली कामं आवरत असताना बेल वाजली , सरिता मॅडमकडून तिच्यासाठी काही सामान आले होते.

पार्सलमधल्या एका पाकिटात एक पत्र होते रमासाठी…. रमा पत्र वाचू लागली आणि नकळत डोळे भरून वहायला लागले तिचे….तिच्या काकूंचे पत्र होते ते…

रमा वाचत गेली ओळींमागे ओळी…..

” प्रिय रमा, …….तुझ्या काकांनी निवडलेली आणि मी तुझ्यासाठी खरेदी केलेली भेट पाठवतेय…. काका म्हणू की सर म्हणू गं… तू सर म्हणायचीस नं त्यांना… तुझे लाडके सर… आणि सरांची लाडकी विद्यार्थीनी तू. आधि तू हरहून्नरी मुलगी म्हणून आवडायचीस त्यांना, मग त्यांना तुझ्यात त्यांची सुन दिसली म्हणून तू अजून लाडकी झालीस. मला घरी तुझ्याबद्दल सतत सांगत ते.  एकूलता एक मुलगा त्यांचा आणि अनेक स्वप्न… सतत म्हणत मी आणि माझी सुन मस्त पेपर वाचन करणार सकाळी , एक चहाचा कप हातात हवा आणि भरपुर गप्पा. मला सुन नकोय , मुलगी हवीये…. मला तर सक्त ताकिद होती, सुनं म्हणायचं नाहीस कधिही तूला…. तू मुलगी आमची. :)  तूला पहायला येऊ असे ठरवलेही मी पण राहूनच गेले ते…. मग आमची आमच्याच गावी पुन्हा बदली झाली … तुझं शिक्षण पुर्ण झाल्यावर तुझे सर निघालेही होते तूला मागणी घालायला पण तोपर्यंत तुझे आणि अभयचे लग्न तुम्ही ठरवलेले होते. ते हिरमूसले , म्हणाले मी आधि बोलायला हवे होते….

आमच्या मुलाचे लग्न होइपर्यंत ते काही थांबले नाहीत बघ पण !! मी ही निघालेय आता त्यांच्याकडे…. तू अशी अचानक सामोरी आलीस, सगळे संदर्भ जुळले. त्यांची मुलगी मला भेटली हे त्यांना सांगेन न विसरता…..  “

रमाच्या मनात तिचे सर तिच्याशी बोलत होते, सरिता मॅडमने सांगितलेल्या त्या भागाच्या नावाने, त्या घरावरच्या पाटीने मनात दाटलेली हुरहूर तिचा अर्थ समजावत होती… आठवणींची दाटी होत होती…. अभयशी लग्न ठरताना मैत्रीणींची ’रमा अगं लग्न एकाशी नसतं गं होत, संपुर्ण घर येत नं त्यात , त्या घरात कशी रमशील तू ?? त्याच्या आईच्या हेकट वागण्याकडे कानाडोळा का करते आहेस ?? ”  वगैरे वाक्य रमाच्या मनात डोकावत होती….. वेडं फुलपाखरू घायाळ होत होतं…. काय कमावलं काय गमावलं हे हिशोब फुलपाखराला येतच नव्हते, आणि मांडायचेही नव्हते …. एक सल मनात उमटत होती तिला नाव मात्र त्या बिचाऱ्याला देता येत नव्हते…..

पत्र हातात ठेवून बराच वेळ रमा बसून होती… त्या पत्राबरोबर एक लहानशी चिठ्ठी होती …

” रमा, सासूबाईंनी हे पार्सल आणि पत्र तुझ्यासाठी ठेवले होते…. त्यांच्या शेवटच्या काही इच्छांपैकी एक की हे पत्र तूला पोहोचवावे. ….. तुझ्याबद्दल खूप बोलल्या त्या, अगदी आनंदी होत्या जाताना ….. “

काकूंच्या सुनेने तिचा पत्ता आणि फोन नंबर दिलेला होता. त्या कोण होत्या हे समजल्यावर,  आता त्या आपल्यात नाहीत हा विचार रमाला अजूनच कष्टी करत होता.तिचे डोळे सारखे भरून येत होते…..

सोबतचे पार्सल उघडले रमाने…. त्यात एक सुरेख साडी होती….. बेंगनी रंगाची, हिरवे नाजूक काठ असलेली……… तिचा मऊसूत अलवार स्पर्श रमाच्या हातालाच नव्हे तर मनाला झाला आणि आधिच वहाणारे डोळे अजूनच भरून येउ लागले.

त्या साडीकडे रमा एकटक पहात राहिली….. बेंगनी साडीवर त्याच रंगाचं फुलपाखरू गोल गोल फिरत राहिलं…………

बाकी शून्य ……

अंक, बाराखडी, गणित, भाषा, इतिहास, भुगोल, विज्ञान, मग जीव नी भौतिक त्यात रसायनाचा घोळ….. बीजगणित, भूमिती, ट्रिगनॉमेट्री नं बिट्री…. साईन न कोसाईन, टॅन न बिन …… ईंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हज…. डबल नं ट्रिपल…. काळ काम न वेगही त्यात….आपली भाषा, साहेबाची भाषा… हिंदी बिंदी मधेमधे….व्याकरणं बिकरणं, नुसतंच प्रकरण….. प्रोजेक्टाईल नी सरळ , रिलेटिव्ह बिलेटिव्ह मोशन की बिशन ….. हालचाल नुसत्याच नावाची नी खरं तर सगळं थबकवणारी …… व्हेक्टर्स बिक्टर्स , डोक्यावरचे बाण….. वर्तूळ नि चौकोन….. इकडे रेषा,  तिकडे किरण….. वाकड्यात शिरले की डिगीटल नं ऍनालॉग….. डेटा न फेटा…. बायनरी बियनरी ….. मेकॅनिक्स नं ग्राफिक्स …. कंडक्टर नं नॉनकंडक्टर भलती धुडं … मधे सेमी वाल्यांच रिजर्वेशन चं लफडं ….. मिली सेंटी डेसी मिटर …  डेका हेक्टो किलो मिटर… नसती पाठांतर… त्यात मैलाची गणितं …. आर्टस न कॉमर्स…..आम्ही सुखी न तुम्ही दु:खी….. उभ्या दोन रेषा समोरासमोर की कपॅसिटर …आडवं पाडा त्यांना वेड्या वाकड्य़ा ओढा झाली की रेजिस्टर…. डायोड न ट्रायोड, इन्व्हर्टर नं बिन्व्हर्टर ….

आमचं सायन्स तुमचं सायन्स….. तुम्ही डॉक्टर, तुम्ही वकील .. तुमची जात वेगळी आणि आमची वेगळी !!! तुमचे विषय सोप्पे आणि आमची मेली ब्रॅंचच अवघड…… तुम्ही करा मज्जा नं आम्हाला सजा….

एकाचे एक विषय नं एकाचे एक…. तुमचा अभ्यास आमचा अभ्यास… तुमची डिग्री नं आमची डिग्री…… तुमची वर्ष गेली नं आमचीही गेली……

आम्हाला नोकरी मिळते तुम्हाला नोकरी मिळते….. कधी कधी आमचं नं तुमचं ऑफिसही एकच ….. तुमच्या डिपार्ट्मेंटला काम कमी नं आमच्यावर जबाबदारी भारी…… तुमचं लग्न होतं नं आमचं ही लग्न होतं…. तुम्हाला पोरं होतात नं आम्हालाही पोरं होतात… आयुष्याच्या वेव्हज एकाच दिशेला वहातात…. ए सी असो नं डि सी असो… त्यांचा रस्ता ठरलेला  …..

नाती नं गोती जपा फार….. लोकांच्या वागण्याचा भलता भार….. एक न धड चिंध्याच फार …. आमचं माहेर तुमचं सासर ….. आमची घरं तुमची घरं…. आमचा किराणा, तुमचा किराणा ….. आमच्या मुलांचे रिजल्ट नं तुमचे ते निकाल…..आम्ही घरं घेतो तुम्हीही घेता घरं …. आमचं महाबळेश्वर नं तुमचं माथेरान… लंडन बिंडनला तिकीटं फार…..

दमछाक करताना तुम्हीही दमता… दमछाक करताना आम्हालाही थकवा….. आयुष्याचा अर्थ शोधतो आम्ही…. अर्थात आयूष्याला शोधताना रमताय तुम्ही….

आयुष्याची गणितं म्हणे तुम्ही सोडवता… आयूष्याची गणितं मग आम्हिही सोडवतोच….

गणितात असतं काय काय…. अधिक नं उणे….भागाकार नं गुणाकार…. बालपणीच्या वर्गात शिकवतात बाई…. त्यांच्यावर विश्वासायची आपल्याला घाई….

प्रत्येक जण एक अंक असतो खरा…. पूर्णांक असो किंवा अपूर्णांकच बरा…. काही गोष्टी जोडतो काही वजा करतो….. घातांक बितांक शोधायचेच नसतात… पुस्तकाच्या बाहेर सांगा ते तसेही कुठे दिसतात??? वर्गमूळ नं घनमूळ की नुसतं खूळ …..

प्रश्न पडतात आम्हाला बरं , वाटतं तुमचंही असचं असतं हेच एक खरं…..

आयुष्यात गणिताला एकच फुटते वाट…. भागाकाराच्या रस्त्याचा भलताच थाट …..

आयुष्य स्वत:च होतो मग भाज्य एक…  भाजक म्हणजे आपणच अंक नेक….. अंक जितका मोठा भागाकार तितका सोपा… खूप पायऱ्या उतरायच्या नाहीत, उधाऱ्या उसनवाऱ्या करायच्या नाहीत……

अंक असू देत कुठलाही म्हणा….. नियम हाच गणिताचा कणा… पायऱ्यांना इथे मार्क असतात….. चुकारपणाच्या वाटा नसतात ….

काहीतरी भाग मग आम्ही देतो….. वजाबाक्या बिक्या करत असतो…. एक दरी पार की पुढची खाई ओढायची…. सारं बळ्ं एकवटत पुन्हा उडी मारायची…. आमचं ते असं नं तुमचंही असंच….. भागाकारात गुणाकार.. … गुणाकाराचा एक साक्षात्कार…. आम्ही नं तुम्ही रस्ते तेव्हढे वेगळे, आकडेच काय ते नवे …… तुमचं तेच नं आमचंही तेच की …..

गुणाकाराची वजाबाकी …. हे बाकि नं ते ही बाकि…..

आयुष्याचं संचित वर हळूहळू साठत जातं …..स्वत:लाच स्वत:ने भागायचं वळणं येतं….. हा भाग असतो एक भोग बरं का ….. त्याला चुकवणं आपल्याच्याने खरय का????

अंकातून अंक वजा मग होतो…. संचिताला एक अंक जोडला जातो….. ह्याचं संचित , त्याचं संचित…. आमचं वेगळं … तुमचं पुन्हा वेगळं….

तळाशी उरतं त्याला मग ’बाकी’ म्हणतात…… भेदाभेदाची गणितं इथे येऊन विरतात…..

गोल गोल आकडे फेर धरतात…. शुन्यातून विश्व उगाच का म्हणतात !!!!! :)