हरियाली… अर्थात घासफूस-२..

टिव्हीवर असा मस्तपैकी ’हम आपके है कौन ’ लागलेला असावा…. आपण हा सिनेमा कितव्यांदा पहातोय हे मी आणि नवऱ्याने एकमेकांना चढाओढीने सांगणे बंद केल्यानंतर पाचव्या-सहाव्यांदा केव्हातरी पुन्हा एकदा तो लागलेला असावा…. समदी शीन-शीनरी-डायलॉगं-बिगं समदं पाठ असावं (ईंजिनीयरिंगला पाठ केलेले DDLJ, हम आपके सिनीमे कसे आयूष्यभर साथ देताहेत… ईलेक्ट्रॉनिक्स काय आठवत नाय बगा!!! 😉 ) …. गुलाबी रंगाचा ड्रेस घालून माधूरी (स्वत:च्या हाताने स्वैपाक करून 🙂 ) सलमानची वाट पहात असावी…. लक्ष्मीकांतने टफीला सीनमधून उचलून नेलेले असावे, सलमानचे जेवण संपलेय असे गृहीत धरले जावे ….. खरकटी भांडी घेऊन माधुरीने ठुमकतं वगैरे ती किचनमधे नेऊन ठेवावीत , तिच्या मागून श्रीयूत प्रेममहाराज तिथे यावेत त्यांनी तिला ’हम आपके है कौन’ हा कळीचा प्रश्न विचारावा…. समदा वाचकवर्ग कसा आत्तापर्यंत माझ्यासोबत हा शीन आठवतोय की नाही…. आता काय अपेक्षा आहे की अगम्य डान्सश्टेपांचं ’पहला पहला प्यार’ सुरू व्हावं……

पण आत्ताच्या प्रश्नापर्यंत सगळा सिनेमा नेहेमीप्रमाणे चाललेला असतानाच यावेळेस माझ्या चाणाक्ष नजरेने एक बारकावा टिपला आणि मी चित्कारले… “काय ताजी भाजी ठेवलीये तिथे बाजूला टेबलावर !!!!!!!! 😉 ”

नवराच काय पण मुलानेही कपाळावर हात मारून घेतला….. खरं सांगते हा बारकावा टिपला नसेल तर पुन्हा पहा तो प्रसंग…. ईतकी वर्ष माझ्या नजरेला माधूरी- सलमान टवटवीत आणि त्यांच पहिलं प्रेम ताजं दिसत होते यावेळेस बाजी मारली त्या हिरव्या सोन्याने 🙂 …. मनात वैषम्य वगैरे भरलं अगदी ईतकी वर्ष कसं लक्ष गेलं नाही माझं भाजीकडे ??? ( आणि लगेच दुसरं वैषम्य की वय वाढलं की काय ??? 😦 ) ….

तर समझे आजचा मुद्दा काय आहे… मुद्दा आहे भाजी प्रेम ,नुसते भाज्यांवरचे प्रेमच नव्हे तर सहसा कोणाला न आवडणाऱ्या भाज्यांवरचेदेखील प्रेम 🙂 …. मराठी सिरियलवाल्यांचेही भाजीप्रेम भलते असते बरं…. सिरियलमधल्या ज्या ज्या कोण काकू-आजी-आया असतील त्यांची कर्तव्यतत्परता दाखवायची असली की सोपा पर्याय म्हणजे द्या तांदळाचं ताट निवडायला, ते ही नसेल तर पालकाची हिरवीगार जुडी द्यायची त्यांना निवडायला…..किंवा या बाया पिशवी हातात घेऊन भाजी बाजारात जातात आणि तिथे मस्त रंगीबेरंगी भाजी असते…. माझा जीव थोडा थोडा होतो असले सिरियल्स पहाताना….

भारतात असताना बरं होतं, असला जळफळाट झाला की टिव्हीतल्या पेक्षा ताजी भाजी मी नाकावर टिच्चून आणू शकत होते, पण जशी या गल्फात रहायला आलेय ना, माझं सुखं हिरावलयं…. म्हणजे अगदी भाजी मिळतच नाही असं नाही, पण गार्डन किंवा शेत फ्रेश नाही ना……नवरे लोकांना कशी ’देखणी बायको दुसऱ्याची’ वाटते तशी मला मॉलांमधे गेल्यावर ’ताजी भाजी दुसऱ्याच्या ट्रॉलीतली’ असे वाटते…. माझं आपलं मॉलात शिरल्यानंतर पुर्णवेळ लक्ष ईतरांच्या वाटच्या भाजीकडे असतं…. लोकांना ताजी भाजी मिळतेय आणि आपल्यालाच नाही अश्या भयगंडाने पछाडलेले असते मला…. अश्यावेळी नवरा साउथ ईंडीयन ब्यूट्य़ा बघतोय की ओमानी सुंदऱ्या मला काहीही घेणे देणे नसते 🙂 ….. समोरं धरतीमायनं बहाल केलेलं हिरवं वाण पहाणे हेच माझे एकमेव लक्ष असते तेव्हा…. एक मात्र नेहेमीचं आहे की मॉलवाल्यांनी कितीही सुबकं भाजी मांडली तरी ती घेऊन निघताना मी मनात म्हणतेच … आणा हो अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातले भाज्यांचे प्रकार आणा, पण दररोज संध्याकाळी चाराच्या सुमारास आमच्या नाशकात शेतकरी भाज्यांच्या गाड्या घेऊन येतात, त्या भाजीच्या देठाचीच काय पण मुळाची सर नाही यायची कशाला… चवीबद्दल बोलायलाच नको…. ताज्या ताज्या मेथीच्या, पालकाच्या, माठाच्या, कोथिंबीरीच्या, तांदूळक्याच्या, कांद्याच्या पातीच्या, अंबाडी, शेपू (सुद्धा ;)) जे लोक तिथून घेतात त्यांना प्रेमात पाडतील अश्या भाज्या सहसा कुठे मिळत नाहीत…. पुन्हा ’पाचला दोन पाचला दोन’ वगैरे ओरडणाऱ्या भाजीवाल्या दादाला ’सहाला तीन ’ दे ना रे म्हणण्याची सोय असते…..

माहेरची आठवणं या सदरात मला भाजीबाजारातला हा टवटवीत, रसरशीत, तजेलदार प्रसन्न मामला आठवतोच नेहेमी!!!!

अमुक तमुक भाजी मला आवडत नाही या सदरात माझ्यासाठी शक्यतो कुठलीच भाजी मोडत नाही….. ’पानात वाढलेले खाण्यासाठी असते’ ह्या मुद्द्यावर मातोश्री ठाम असल्यामुळे निसर्गाचे हे वैभव मनसोक्त चाखायला मिळालयं भरभरून 🙂 …. आमच्याकडे अगदी मुळा, फ्लॉवर या भाज्यांचा पालाही भाजीत घातला जातो…. ह्या पाल्याच्या वापराबद्दल तसं दुमतं फार , भाजीवालेही हा पाला काढून टाकतात …. ’अय्या तो पाला भाजीत घालतात???? ’ हे प्रश्नचिन्ह अनेकदा पाहिलयं मी 🙂 … भाजीवाल्या/वालीकडून हा पाला जेव्हा मी किंवा आई मागतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना ” यांच्या घरी बकऱ्या पाळलेल्या दिसताहेत ” वगैरे शंका येत असाव्यात…. हाच प्रकार एकदा दुधी भोपळ्याबाबत घडला होता…. भाजीवाल्याकडून अवघ्या ५ रुपयात मी मोठा ताजा दुधी भोपळा घेतला होता आणि तो तसाच हातात घेऊन मंदिरात गेले तर तिथे बसलेल्या एका काकूंनी प्रश्नावली मांडली, “तुम्ही याची भाजी करता??? ते काय डाळं  घालून करता तसं…” माझे अर्थातच उत्तर ’हो’ असे होते… ते ऐकल्यावर काकू शेजारच्या काकूंना म्हणाल्या ,” काहिही खातात नाही लोक 😉 “…. माझ्यासमोर चक्क… 🙂 शेजारच्या काकूचं लाजल्या केविलवाण्या 🙂 …. हातातल्या त्या पोपटी ताज्या दुधी भोपळ्याची किमया की मी काकूंना ,”गाढवाला गुळाची… ” म्हणून सोडून दिले नाहितर माझ्या भाजीप्रेमाच्या आड येणाऱ्यांना शेवग्याच्या शेंगांच्या छड्यांनी बडवावेसे वाटते मला 🙂

भाज्या (विशेषत: पालेभाज्या) या नॉन ग्लॅमरस रूपात लहानपणापासून खाल्लेल्या असल्यामूळे त्या तश्याच जास्त मोहवतात…. सात्विक सौंदर्य असतं त्यांचं स्वत:च असं…. या ताज्या भाज्या नुसत्या परतल्या तरी त्याला पक्वान्नांची चव येते या माझ्या मताशी सहमत अनेक जण सापडलेत मला 🙂 …. नुसत्या दर्शनाने शीणवटा पळवू शकण्याचं सामर्थ्य ह्या हिरव्या पाचूत असतं…. कडधान्याचं  वेगळं महत्त्वाचं स्थान आहे पुन्हा… कडधान्य भिजवून मोड काढायला ठेवले की मी दिवसात दहा वेळा त्यांच्याकडे बघते…. सृजनं, नवनिर्मीती वगैरे माझ्या विचारांना नवरा केव्हातरी हसतो मग मी त्याचं लक्षं नसताना चोरून त्या कडधान्याकडे नजर टाकून येते 🙂 … पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या मुग-मटकीला मस्त मोड आलेले असतात तेव्हा ते विलक्षण सुंदर दिसतात….

कोशिंबीर हा एक असाच अप्रतिम प्रकार…. ड्रेसिंग, सॅलड्स वगैरे शब्द माहित नसलेल्या आया- आज्या कोशिंबीरीबाबत अतिशय जागरूक होत्या…. दही, दाण्याचं कुट वगैरे घातलेल्या आणि वर मस्त हिंगाची फोडणी दिलेल्या कोशिंबीरी असो की चिरताना करकर असा आवाज करणाऱ्या ताज्या कोबी, काकडीची पचडी असो, आवडण्याची हमखास हमी!!! 🙂 …..

हल्ली बायकांची स्वयंपाकघरं न रहाता ’किचन्स’ झालेली असल्यामूळे भाज्या त्याच पण चवी अनेक हा प्रकार तसा सर्रास दिसतो…. मी पण मोडते त्या वर्गात… पण नेहेमीच नाही, माझा कल भाज्यांच्या स्वत:च्या चवीवर ईतर चवींचा भडिमार टाळण्याकडे जास्त असतो ….. तशा वेगवेगळ्या ग्रेव्ह्या घातलेल्या भाज्या मलाही कधीतरी बदल म्हणून आवडतात…. सोज्वळ सात्विकं अश्या लतादिदी, जयश्री गडकर किंवा सुलोचनाबाईंचं केसांचा अंबाडा बांधलेलं,साध्या साड्यांमधलं सौंदर्य जितकं लोभसं तितकचं रेखा, हेमामालिनी, अगदी विद्या बालन यांच दागदागिन्यातलं,मोकळ्या केसांचं, मोठ्या काठापदराच्या कांजीवरम साड्यांमधलं ग्लॅमरसं सौंदर्यही मन मोहवणारं….. अगदी तसेच शेतकऱ्याच्या बायकोने नुसती फोडणी घातलेली भाजी आणि अगदी काजू-बदामाच्या ग्रेवीतली, अगदी मॅरिनेशन वगैरे केलेली भाजी, दोन्ही रुपं आवडणारी…. 🙂

खरं तर मागे घासफूस नावाची पोस्ट लिहीली तेव्हाच ही देखील पोस्ट लिहिणार होते…. पण “भाजी भाजी रे…. ताजी भाजी रे…. नैनोमें भर जा… ” या न्यायाने मी आपली दरवेळेस या पोस्टचा विचार करायला घ्यायचे आणि नुकतीच आणलेली एखादी जुडी मला साद घालायची… 🙂 …. निसर्गाच्या या चमत्काराने वेळोवेळी मोहात पाडलेय हेच खरे….

पोस्ट आवरती घेणार आहे आता… नाही म्हणजे बरेच दिवसात काही लिहीलं नसलं तरी उपास सोडताना अंमळ जास्त खाल्लं जातं तसं ब्लॉगोपवास किंवा पोस्टोपवास सोडताना जास्त लिहून चालायचं नाय … कसं…. 🙂 अजून एक महत्त्वाचे कारण आहेच, ओळखलतं की नाही… आमची नवरा-बायकोची चतुर्थी असली तरी चिरंजीव शाळेतून आल्या आल्या , “मम्मा भाजी कोणती?? ” असा प्रश्न विचारतील…. तेव्हा हम चले किचन गाजवनेको , गाणं कोणतं म्हणणार स्वैपाक करताना हा काय प्रश्न नाही, ठरलेलं आपलं…. काळी माती निळं पानी हिरवं शिवारं…..डिपाडी डिपांग 🙂

Advertisements