चाकोरीबाहेर खरडलेले कागद….

मस्कतमधे येउन दोन वर्ष झालेली, साधारण सगळं मार्गी लागलेलं…. मोठ्या मुलाची शाळा आणि दोन वर्षाच्या धाकट्या लेकीची प्रगती सगळं सुरेख सुरू होतं. तृप्त समाधान देणारं चौकोनी कुटूंब माझं , आणि तरीही पोकळीची एक हलकीच जाणीव मनात डॊकावू लागली होती. रिकामा वेळ हाती लागत होता…. आणि त्याचा सकारात्मक वापर नक्की काय आणि कसा करावा हे उत्तर मिळत नव्हतं !!

चळवळ्या मनाला आणि स्वभावाला मधेच अचानक , आपण दिवसाचे रकाने भरून  ’चाकोरीचे कागद खरडतोय ’ की काय अशी शंका वाटू लागली होती…. त्या सगळ्या गुंत्यात एक दिवस हाती लागला महेंद्रजींचा ब्लॉग.  मग वाटलं आपणही का लिहू नये ? …. झालं, ब्लॉग सुरू करायला इतकंच कारण पुरेसं वाटलं आणि लिहायला सुरूवातही केली .

एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि चक्क चार वर्ष लिहीत गेले. :) . ब्लॉगबाळ आज ’चार वर्षाचं’ पुर्ण झालय !! :) :) …. माझ्या ब्लॉगबाळाचा आज हॅपी बड्डॆ आहे !! :)

wordpress anniversary

पोस्टमागे पोस्ट करता करता कधी मी ’चाकोरीबाहेरचे कागद खरडायला ’ लागले हे मलाही समजू नये इतका सहज सुंदर प्रवास झाला. चाकोरीबाहेरेचे म्हणजे काही भव्यदिव्य नाही तर माझ्या रोजच्या आयूष्याच्या ’चाकोरीबाहेरचे ’ बरं :)

चार वर्षात काय नाही मिळालं इथे …. अनेक मित्र मैत्रीणी, नाती, वाचक , आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, कृषीवल ,सकाळ पेपरमधली दखल , चारचौघी मासिकात लिहीण्याची संधी , स्टार माझाच्या ब्लॉग माझामूळे टिव्हीवर चमकून येण्याची संधी !! :) . मात्र या सगळ्या सगळ्या पलीकडे मला ब्लॉगने काय दिलं तर माझ्या आजारपणाच्या गेल्या पुर्ण वर्षात माझ्या पाठीशी खंबीर उभी रहाणारी नाती. ’हरायचं नाही ’ सांगणारे भाऊ . एअरपोर्टला दहा मिनीटाची धावती भेट होणार ही कल्पना असली तरी धावणारे भाऊ. ’तन्वे तुझी काळजी वाटतीये ’ म्हणणाऱ्या माझ्या मैत्रीणी, बहिणी …… तर एकीकडे,  ’तायडे प्रेमात पडलोय/ पडलेय ’ हे आवर्जून सांगणारी चिल्लर पार्टी ….. :) . ॠणानूबंधांबाबतची माझी श्रीमंती हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय , तो अधेमधे ब्लॉगवर न डॊकावला तर नवल.

सतत रडता येत नाही मला…. ’संकटं’ आली होती, येताहेत आणि येतीलही. डगमगायलाही होतं … मात्र दु:खाचा पुरस्कार नकोच वाटतो.  कधी कधी डोळे भरून येतात, नकळत वहायला लागतात. अश्या वेळी एखाद्या जीवलगासारखा माझा ब्लॉग अश्रॄंना अडवणाऱ्या बांधाचे काम करतो. जुन्या पोस्ट्स, त्यावरच्या कमेंट्स आधार देणाऱ्या ठरतात !!

नवं काही लिहून होत नसलं, मनातले विचार मांडता येइनासे झाले की कधीतरी वैतागून ब्लॉग बंद करायचा विचार मनात येतो आणि नेमकी त्याचवेळी एखादी मैत्रीण सहज बोलून जाते , “तुझं ठीक आहे गं, तू निदान तुझे विचार ब्लॉगवर मांडून मोकळी होतेस ’ … !! मग ब्लॉग बंद करायला निघालेल्या ’माझे’ डोळे उघडतात आणि मी पुन्हा ब्लॉगकडे प्रेमाने नजर टाकते :)

सुरूवातीच्या पोस्ट्स आणि आत्ताचं लिहीणं यात फार फरक मला स्वत:लाच जाणवतो. त्या त्या परिस्थीतीला अनूसरून, मानसिकतेनूसार आणि त्या त्या वयाच्या भुमिकेला अनूसरून मी व्यक्त होत गेले….. आणि हे असं , इतकं सोपं सहज लिहीणं व्हावं याला कारण वाचकांचा सततचा पाठिंबा , तेव्हा या सहजच प्रवासाचे श्रेय त्यांचे!!

ब्लॉग लिहीणं मला मनापासून आवडतं…. खूप काही लिहीता येत नसलं तरीही :) . जवळपास १६० पोस्ट्स लिहून झाल्या आहेत. पुष्कळ लिहीणं होतय… इथे मांडले अनेक अनूभव, आठवणी आणि मतंही !! मात्र ओंजळ अजूनही रिकामी वाटत नाहीये…. अजूनही खूप बोलायचं आहे….. ब्लॉगवर लिहायचं आहे !!

गुरूनाथ सामंतांची नुकतीच एक कविता वाचली….

आकाश तुझ्यासाठी वेडं होइल ….

खाली वाकेल आणि तू नीळा होशील ..

असं लिही ….

आकाश पेलण्याची माझी कुवत नाही , आणि विचारांची तशी काही क्षमताही नाही ….. पण म्हणूनच अजून अजून समृद्ध होता यावं यासाठी तरी वाचायला/ लिहायला हवंय !!

पोस्ट लिहून पुर्ण होताना समाधान लाभतयं तोपर्यंत लिहायला हवंय…. ड्राफ्ट माझा असतो, एकटीचा…. पोटातून आईला नाजूक लाथ मारणाऱ्या बाळासारखा…. तो ड्राफ्ट , पोस्ट होऊन बाहेरच्या जगात कसा वावरतोय हे पहाताना तो मला आणि मी त्याला सांभाळतेय तोवर लिहिण्याला अर्थ आहे !!

(त्याच  कवितेच्या पुढच्या ओळी : )

शाई , कागद, शब्द आणि तुही

निमित्तमात्र आहेस

तुझ्यातली चेतना ही भवतालच्या अखंड चैतन्याची

ॠणी आहे

याची सजगता ठेवून लिही…..

हे ॠण मान्य आहे तोवर , या अखंड चैतन्याच्या झऱ्याला सामोरे जावे म्हणतेय ….. चाकोरीबाहेरच्या माझ्या या कागदांना खरडावे म्हणते, आकाशाला वाकवता आले नाही तर निदान दिलखुश गगनाशी उदार गप्पा तरी माराव्याच म्हणते……. वेड्यावाकड्या उमटणाऱ्या, धडपडणाऱ्या, सावरणाऱ्या , स्वत:चेच गीत गाऊ पहाणाऱ्या अक्षरांचं बोट धरत ’सहजच’ म्हणून जे जसे लिहीता येइल ते लिहावे म्हणते !!!   :)

to be or not to be!!

आयूष्यात काय काय समस्या येतील काही सांगता येत नाही ….

मला एक समस्या तर ठराविक कालांतराने पुन्हा पुन्हा येत असते… त्रिशंकू अवस्था तिचे नाव … मी बरेचदा आकाशाकडे पाहून या अवस्थेला कारणीभूत असलेल्या त्रिशंकूला  रागावतही असते… त्यातच माझा फक्त ’त्रिशंकूच’ होतो इतक्यावर ही समस्या आटोपत नाही, राजा त्रिशंकूचा एक आप्त होता शेक्सपियर नावाचा  आणि शाळेत आम्हाला पाचवीनंतर ईंग्लिशही शिकवले गेले त्यामूळे त्रिशंकूच्या या नातेवाईकाबद्दल माहिती मिळाली आणि मग माझ्या मनाच्या अवस्थेचे to be or not to be असेही नामकरण झाले !! बरं वारंवार या अवस्थेत अडकून अडकून ज्ञानात एक मौलिक भरही पडली की असं काही होतं असलं नं की गप्प बसावं च्यामारी …. “मौनं सर्वार्थ साधनम ” चा नारा लावावा. … पण तोंड बंद केलं तरी मनातले विचार थांबवण्याइतकी अध्यात्मिक सिद्धी अजून प्राप्त झाली नसल्यामूळे आणि भविष्यात प्राप्त होण्याची शक्यताही धूसर असल्यामूळे खरी गोची होत असते.

तर या अश्या ’गोची’ करणाऱ्या प्रसंगांमधे मी अधेमधे अडकत असते….

होतं काय की माझ्या एखाद्या मैत्रीणीच्या निमंत्रणाला मान देत मी तिच्याकडे पोहोचते…. इथे फॉरेनात ( ;) ), “तू ये बाकिच्यांशीही ओळखी होतील” असं सांगितलं की लोकं येतातच या नियमाला अपवाद नसल्याने मी ही जाते . सगळ्या बायका अश्या गोलाकार बसलेल्या असतात… , समोर टिव्हीवर कुठल्यातरी दिदी (दादा, गुरू) किंवा तत्सम कुठल्याही नावाचे गुरू (बंधू, माऊली, सखा ) प्रवचन देत असतात …. मलाही तिथे जागा शोधून बसावे लागते… आजूबाजूला संमतीच्या, आनंदाच्या किंवा प्रसंगी डुलकीच्या माना डोलत असतात . समोर अर्धवट हिंदी -इंग्रजीत जे चाललय ते अगदी बाळबोध आहे की बाळबोध वाटत असलं तरी गुढ गहन आहे हा निर्णय माझ्या मनात होत नसतो…. आणि मला समजतं की आपण फसलेलो आहोत …. शेक्स्पियर हसतो विचारतो to be or :) ”  …. माझ्या मनातल्या अधांतरी निर्णयांशी काहिही घेणदेणं नसलेला जथ्था डोलत असताना अचानक ते व्याख्यान वगैरे संपत …. मला अचानक पुलंचं आधुनिक अध्यात्म आठवतं !! आणि तितक्यातच सगळ्यात आधि माझा अनूभव या इरेला पेटलेल्या एक काकू माझा ताबा घेऊन सांगतात , ” आमच्या मठाची नं eligibility परिक्षा असते. मला अभिमान वाटला हो की एका वर्षात तिन्ही परिक्षा पास होणारी मी एकटीच असेन … काय झालं असेल सांगा ?? ” … मी ’माहित नाही बुवा’ ची मान हलवते . काकू चटकन सांगतात ,” चमत्कार बघा , मी झाले नं नापास ” … आता ’पास’ होणं हा चमत्कार असू शकतो , हा ’नापास’ होण्याचा चमत्कारच मला चमत्कारिक वाटतो….. माझ्या मठ्ठपणाची खात्री पटलेल्या काकू सांगतात , अहो माझा अभिमान कसा क्षणात विरघळून टाकला बघा गुरूंनी !!  मी चकित वगैरे होत असताना दुसऱ्या बाजूच्या काकू विचारतात, “काय शहारा आला किनई अंगावर ?? ” …

माझा पुन्हा त्रिशंकू व्हायला लागतो…. माझी श्रद्धा असू शकते, इतरांच्या श्रद्धेबद्दल आदरही असू शकतो पण अशी भाबडी अंधश्रद्धा मी नाही बाळगू शकत ….मला नक्की काय खटकतंय हे कधी कधी सापडतं नं कधी कधी नुसताच विचारांचा गोंधळ होतो. स्वत:ची श्रद्धा आहे म्हणून अनेक लोकांना बोलावून त्यांनाही आपल्या ’पंथात’ सामिल करून घेणे तितकेसे स्वागतार्ह नसते बहूधा. खऱ्या श्रद्धेला जाहिरातींची गरज नसावी . नेहेमीचं द्वंद्व मनात घेऊन मी घर गाठते!!

माझ्या मुलांच्या शाळेत आपापल्या मुलांना सोडायला आलेल्या बायका मुलं शाळेत गेली की शाळेच्या आजूबाजूला कोंडाळं करतात. एक अमराठी बायकांचा गृप मला सापडतो. ’मला त्यांची भाषा बोललेली समजते’ असं काहीसं मी बोलून बसल्यामूळे या बायका राष्ट्रभाषेत न बोलता, राज्यभाषेत बोलताहेत असा माझा समज होतो. आणि हा समज भलताच ’गैर’ आहे हे ही लवकरच समजतं. माझ्या लक्षात येतं की या अमराठी अड्ड्याची स्वत:ची अशी एक त्रिज्या आहे आणि त्या त्रिज्येच्या वर्तूळाच्या परिघावर मावतील इतके त्यांचे स्वभाषीय बिंदू आहेत तिथे आधिच त्यामूळे माझ्यासारख्या नवख्यांसाठी तिथे जागा नाहीये. मी बाजूला वळून पहाते तर तिथे एक असाच दुसरा अमराठी परिघ उभा असतो… अड्ड्यांच्या गोल आकारावरून हे म्हणजे इकडे आड न तिकडे विहीर झालेले असते. बरं मराठी बिंदू शाळेत नाहीत असं नसतं पण तमाम मराठी आयांनी आपापल्या लहानपणी सचिनचा ’हा माझा मार्ग एकला’ पाहिलेला असतो. तो पहाताना आलेल्या अश्रॄंशी प्रामाणिक रहात त्या मुलांना सोडले की एकल्याच आपापल्या घरी परतत असतात. मी ही हार मानत नाही . ’मी मराठी ’ चा नारा देत मराठी बायकांना गाठते आणि मला एक शोध लागतो.  ’युरेका’ – यांचाही गृप असतो :) . त्याला त्या ’किटी’ असं सांगतात. ते ’किटी’ नाव कितीही अंगावर आलं तरी त्याकडे दुर्लक्ष करत मी त्या गृपमधे पोहोचते…. गप्पा रंगलेल्या असतात. आणि मला एक ’उपयुरेका’ होतं. “लास्ट’ कसं लिस्ट नसतं तर हे ’उपयूरेकाच’ अधिक महत्त्वका ठरतं… या किटीवाल्यांपैकी सहसा कोणाला पुस्तकं, वाचन किंवा तत्सम जरा जड (त्यांच्यामते ) विषयात फारसा रस नसतो !! माझं तारू ’I should be in a group’ वरून ‘ should I really be in this group’ वर डोलायला लागतं !!

गृप असावा तो भाषेवर, प्रांतावर ठरावा की स्वभावावर, आवडींवर या प्रश्नावर माझी डोलकाठी डोलते…. कोणीतरी समविचारी सापडेपर्यंत माझा त्रिशंकू लटकायला मोकळा होतो !!

माझ्या एका शेजाऱ्यांकडे त्यांनी आम्हाला ’गंमत’ पहायला बोलावलेलं असतं . ती गंमत पहायला आम्ही पोहोचल्यानंतर अपेक्षेने घरभरं शोधतो की त्यांनी सांगण्याआधिच गंमत काये ते दिसतेय का पहावे , मात्र तसे काही होत नाही कारण इतका गोतावळा जमलेला पाहून बिचकलेली ती गंमत स्वत:च एका खुर्चीखाली दडलेली असते . माझ्याबरोबरचा सगळा जथ्था जेव्हा ’अय्या, अभिनंदन नवा मेंबर घरात आलाय ’ , ’ अगं बाई आली का स्वारी , कधी आली ? ’ , ’झालं हो एकदाचं स्वप्न पुर्ण’ ,’ नाव छानसं ठेवा हं’ वगैरे चित्कारत असताना मी अभावितपणे विचारते , ” अगं बाई म्हणजे हा कुत्रा ही गंमत आहे होय ?? ’ …. यावर शेजीबाई वसकन माझ्या अंगावर धावून येत ओरडतात ’कुत्रा आहे का तो ???? आमचा फ़ॅमिली मेंबर आहे तो !! “

आता माझ्या आयूष्यातला आधिचाच सगळा गदारोळ आयूष्याला पुढे ढकलत असताना एक नवा प्रश्न उभा ठाकतो सामोरी ,” कुत्र्याला कुत्रा म्हणावे का ?? आणि म्हटले तर नेमके काय चुकले ??? माणसाला नाही का आपण माणूसच म्हणत !!! ” .. अर्थात शेजीबाई ज्या त्वेषाने धावून आलेल्या असतात ते पहाता ते फॅमिली मेंबरबाबतचं वाक्य गांभीर्याने घ्यायलाच हवं अशी परिस्थिती असते !! नाही मुद्दा काये की याच फॅमिलीतल्या कुठल्याही मेंबरला या नव्या मेंबरच्या प्राणीनामाने (खऱ्या) हाक मारली तर चालेल का अशी शंका माझ्या मनात डोकावते …. म्हणजे मला प्रश्न पडतातच नं, एरवीही माझा गोंधळ होतो, त्रिशंकू होतो . अश्यावेळी  मात्र माझाच  ’धोबी का कुत्ता’ झाल्यासारखे वाटते …. !! मी माझा रामबाण उपाय अमलात आणते ’मौन’ धारण करते. एका कोपऱ्यात तो नवा फॅमिली मेंबर आणि दुसऱ्यात मनूष्यसमाजाने नुकतीच वाळीत टाकलेली मी अशी रवानगी होते.

मौन बोलण्याचे असू शकते , विचारांना म्य़ूट करता येत नाहीच नं… आणि तसेही या शेजारच्या काकूंना द्यायच्या प्रतिउत्तरांच अक्षरश: पीक येतं डोक्यात मग !! माझा राग त्या प्राण्यावर कधीच नव्हता , नसणारच…. खोडी काढल्याशिवायही धावून येणारी जमात माणसाची हे मान्यच आहे मला. मी काही श्वानद्वेष्टी वगैरे नाही. कुत्रा हा माणसाचा सच्चा मित्र असतो. माणसांकडे दुर्मिळ असणारा ’इमान’ हा गुण कुत्र्यांमधे मुबलक असतो. कुत्री भुंकून चोरांना घाबरवतात. पोलिसांची मदत करतात. ’हम आपके’ वगैरे सिनेमांमधे हिरो हिरॉईनला भेटवतात सगळ सगळं मान्य. पण मला कुत्रा पाळायला नाही आवडत, म्हणून काही कोणी कुत्रा विशेष राग करत नाही माझ्यावर. …खरं सांगते डोक्याच्या शेतीत पीक आलं नं की काय उगवेल सांगणं कठीण… पीकावरून वाटलं शेतात नाग, साप, गांडूळं वगैरे पण तर शेतकऱ्याचे मित्र असतात मग त्यांना आपण त्याच नावाने हाक मारल्यावर कोणी शेतकरी असा फावडं, कुदळ घेऊन आपल्याला खणत नाही. मग एका प्राण्याला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा , हे का ???? … मी लगेच ठरवते सगळे मुद्दे आपणही गुरगूरत काकूंसमोर मांडावे पण काकूंचा मगाचा आवेश आठवतो आणि मी ते वळवळणाऱ्या विचारांचे साप, गांडूळ शेतात परत पाठवत गप्प बसते .

तिकडे जथ्था नव्या मेंबरचं ’बारसं’ करत असतो . मला या विषयात गती नाही हे जथ्थ्याच्या लक्षात आल्यामूळे मी आणि कितीही रस असला तरी बायकांच्या ’चर्चेत’ भाग घॆऊ शकत नसल्यामूळे तो नवा ’अनामिक’ मेंबर दुर्लक्षित होतो. ’टॉमी’ , ’ग्रेसी’, ’जॅकी’ वगैरे नावांबाबत मतं मांडली जातात . ही नावं ठेवण्याची टूम म्हणजे गोऱ्या साहेबाच्या दिडशे वर्षांच्या अत्याचाराचा सुड घेण्याच्या उद्देशाने निघाली असावी की काय असाही विचार येतो मनात माझ्या.  ’पेट नेम’ घरासाठी असलं तरी हे नेम दिलेलं पेट घेऊन फिरायला जाणारी, पेट ओढेल त्या दिशेला वहावत जाणारी मंडळीही आठवतात मला अचानक.

सगळ्या विचारांच्या गर्तेत मी मनातच गुपचूप हसते जराशी .

काहितरी नावं ठरलेलं ते पिल्लू कोपऱ्यात निवांत पहूडलेलं असतं. त्याच्या चेहेऱ्यावर अखंड शांतता असते. क्षणभर हेवा वाटतो मला त्याचा…. वाटतं हा काय विचार करत असेल आता ?? कितीही फॅमिली मेंबर झाले तरी ते माणसाला ’माणूसच’ म्हणत असतील का ?? ….  तो कुत्रा डोळ्यांच्या कोनातून माझ्याकडे पाहून खट्याळ हसतोय की काय भास व्हायला लागतो मला . अनेक प्रश्न पडलेली मी आणि संतपदाला पोहोचलेला तो.

तिथून घराकडे यायला निघते मी . वाटतं अश्या काका काकू अनेक असतात , आपली मत लादणारेही कमी नसतात.

पण माझी चिडचिड इतकीच नाहीये/ नसावी आणि काहितरी आयाम आहे तिला नक्कीच. काय खटकतय नेमकं ???…. दादोजीं आणि वाघ्यालाही तोच न्याय लावला जातो .. असावे आपण सगळे खरच एकाच फॅमिलीतले :( …. आपलं नेहेमीचं अन्यायाविरुद्ध लढावं की आपल्या मनातल्या निष्ठा, श्रद्धा अश्या मुर्खपणाने ढळत नाहीत म्हणुन दुर्लक्ष करावं ?? … पुन्हा तेच, तेच प्रश्न त्याच डोलकाठ्या ….. काथ्याकूट नुसता माझा.

त्रिशंकूला शोधायला मी चिडून हताशपणे पुन्हा एकवार आकाशाकडे पहाते , ढगांआड एक व्यक्ती गोड हसते ….म्हणते , “अगं किती विचार करशील ??? बाकि एक सत्य अंतिम असतं की आपण स्वत:ला इतकं गांभीर्याने घेऊ नये कारण तितकं गांभीर्याने आपला विचार करायला इतर कोणाला वेळ नसतो …. की मग  इतर कोणी घेत नाहीच नं गांभीर्याने मग निदान आपण तरी घ्यावं स्वत:ला ???? …. हे करावं की ते ??? झाला झाला बघ माझाही ’त्रिशंकू’ झाला … मोठ्यामोठ्यांचा अजूनही होतो , तू तर लहान आहेस अजून . !!! “

” माझा सल्ला ऐकणार असशील तर एक कर , तू एकदा in tune with the tune वाचच  ;) :)  …. मला पटलय ते तत्त्वज्ञान , या सगळ्या यूनिवर्सल केयॉस मधून कॉसमॉस वगैरे वगैरे …. थोडक्यात काय कशात काही अर्थ नसतो तेव्हा त्रास करून घेऊ नकोस…. मौनं सर्वाथ :) :) … कसें !!! ” …. दोन दात लखकन पुढे चमकतात …..

आता मात्र माझ्या अंगावर खरच शहारा आलेला असतो !!

बीजं….

 

मनात काहितरी विचार आले आणि अलगद ते कागदावर उतरले…. मी जे लिहीले होते ते वाचून आश्चर्य वाटण्याची माझ्यावरच वेळ आली होती ….

तेव्हा वाटलं :

लेखणीने सात्त्विकतेचा
बुरखा उतरवून ठेवला
अन
पडद्यामागच्या शब्दांनी
कागदावर प्रकट डाव मांडला !!

आधि परके वाटलेले माझेच शब्द पुन्हा वाचले आणि आपलेसे वाटू लागले ते मग….

वेदनेनं वांझोटं असू नये
आणि वैफल्यानेही षंढ नसावं,
एकत्र येऊदे दोघांनाही
त्यातूनच आशेचं  ’बीज ’ रूजावं !!

आपण म्हणतो नं , When the going gets tough the tough gets going :)

(पुन्हा एकवार तेच म्हणेन की असलं काही मनात उमटणं किंवा मनात येतं ते शब्दापर्यंत पोहोचणं यात मला अमृता प्रीतम सापडते !!)

फारश्या सोवळ्या नसलेल्या शब्दांचं इतकं प्रकटं माझ्या मनात येणं हे मलाच नवीन असल्याने अर्थातच अगदी भीत भीत पोस्टतेय हे!! :)

फ्रेम….

सुट्टी ….. वर्षभरानंतर मिळणारी सुट्टी…. अगदी विचारपुर्वक प्लॅन आखून घालवायची असं ठरवलेली सुट्टी….. आम्हीही ठरवली होती… जुलैमधे सुरू होणारी सुट्टी, त्यासाठी जानेवरी- फेब्रूवारीतच ठरवलेली ठिकाणं….

मुळात ही सुट्टी म्हणजे  ’वर्षभराच्या कामाच्या शिणवट्याला घालवण्यासाठीचा वेळ’  हा एक मुद्दा आणि तसेच पुढच्या वर्षाच्या कामासाठीचा उत्साह साठवण्याचाही वेळ…. इथे जाऊ- तिथे जाऊ वगैरे चर्चा …. इंटरनेट्वरची शोधशोध ….. सगळं पार पडत असताना एक मस्त सकाळ आली आयूष्यात …. सकाळी उठायला गेले आणि कळलं आपल्याला उठताच येत नाहीये… मान-पाठ- खांदे वगैरे अवयवांनी पक्का असहकार पुकारला आहे. त्यादिवशी कशीबशी वेळ निभावली खरी …. पण साधारण महिन्याने आणि एक सकाळ पुन्हा अशीच आली….. यावेळेस तर उठता न येण्यासोबतच कमालीच्या चक्कर येण्याचीही सोबत होती…. दवाखान्यात गेले तर ते ही थेट ऍंब्युलन्समधून अगदी सायरनच्या दणदणाटात ….

हे आजारपण काय आहे वगैरे शोधाशोधात गेले २-३ महिने ….. सरळ भारत गाठला मग त्यासाठी, गड्या आपला देश बरा म्हणत…

एक म्हण वाचली होती पुर्वी , Life is what happens to you when you are busy planning other things !!!  :( :)

मुळात ज्या म्हणी पटतात त्या लक्षात रहातात ….. आणि त्यांचा प्रत्यय आला की त्या जास्त पटतात …. मग ते सुट्टीचे प्लॅन्स वगैरे राहिले कागदावर ….. आणि सुट्टी लागण्यापुर्वीच भारतात जावे लागले. एक नाही दोन नाही , तीन तीन डिस्क स्लिप झाल्या आहेत मानेत , माझ्या मानेचा मला न समजणारा MRI माझे डॉक्टर मला समजावत होते …..नुसत्या सरकून थांबल्या तर त्या माझ्या डिस्क कुठल्या , त्यांनी बिचाऱ्या स्पाईनची पार गळचेपी केली…. “गळयात होणारी गळचेपी ” ही कोटी तेव्हा मनात आली नाही इतपत दु:खी मी  नक्कीच झाले होते …. आजारपण स्वत:ला येतं म्हणून त्याचा जितका त्रास होतो त्यापेक्षा कित्येक पट जास्त आपण ज्या वर्तूळाच्या केंद्रस्थानी असतो त्या वर्तूळाच्या परिघावरच्या लोकांना होणाऱ्या यातना छळ मांडत असतात.

डॉक्टरांनी सांगितलेले ऑपरेशन टाळायला मग सेकंड, थर्ड वगैरे ओपिनियन घेणे आले…. ते तसे घेतले गेलेही ….. मनात एक सततचा प्रश्न  होता , ’हे का झाले ? ’ आणि  ’हे मलाच का झाले ?’ :) …. मग आमच्या हेरंबाने एक सल्ला दिला, ” आधि Why me ? ” हा प्रश्न विचारणं बंद कर …. तो बंद करायचा ठरवलंही लगेच, आचरणात आणणं नाही म्हटलं तरी तितकसं सोप्प नव्हतं…. आपल्या आयूष्यात काही छान-भन्नाट घडतं नं, ते चटकन स्विकारलं जातं…. पण मेलं हे आजारपण तितकसं वेलकम होत नाही ….. त्यात आई-बाबा, आजी-मामा-मामी, माझी पिल्लं, बहिण आणि खंबीरपणाचा उसना आव आणलेला नवरा यांचा विचार सगळंच अवघड करत होता!!!

असो, ते ऑपरेशन टळलं एकदाचं…. पण आराम मागे लागला….  सुट्टी गेली दवाखान्यांच्या फेऱ्यांमधे…. अधे मधे चिडचिड वगैरे सुरू होतीच माझी…. आणि माझ्या चिडचिडीचा जराही अनूभव नसलेले माझे आई-बाबा कावरेबावरे होत होते….. एकदा सकाळी उठले तर पाहिलं बाबा खिडकीतून येणारे उन अडवण्यासाठी पडदे सारखे करत होते…. ही सावली त्यांनी कायमच दिलीये आम्हाला. नेहेमी ते असे हलकेच पडदे सरकवून जातात तेव्हा आम्ही झोपलेलो असतो इतकेच…. उठून त्यांच्या मागेच गेले तर स्वयंपाकघरात ते डोळ्यातलं पाणी आवरत आईला सांगत होते , “घेऊन टाकता आलं ना तिचं दुखणं तर लगेच घेऊन टाकेन मी!!! ” :( …. त्यादिवशी नुसती उठलेच नाही तर झोपेतून जागीही झाले….

बाबा सकाळी पुजेनंतर रामरक्षा म्हणतात आणि मग झाडांची फुलं काढायला जातात हा क्रम सहसा न चुकणारा…. त्यादिवशी मी फुलांची परडी हातात घेतली आणि अंगणात गेले…. स्वत:ला एकच बजावले , असाध्य काही झालेले नाहीये, पुरे आता ही सहानूभूती….  जे जमेल ,जितके जमेल,  जसे जमेल तसे सुरू झालेच पाहिजे आता….

घेतली फुलांची परडी हातात आणि अंगणाला प्रदक्षिणा घालायला लागले…. एक एक फुल हातात येताना त्यांचा टवटवीत तजेला मला देत होते जसे…. लहानपणी असेच मी फुलं आणून द्यायचे बाबांना…. या निमित्ताने पुन्हा लहान होता येत होतं…. कळीला धक्का लागू द्यायचा नाही असं स्वत:च्याच मनाला बजावत होते मी… म्हटलं तर खूप विशेष काही नव्हतं घडतं, पण मला खूप शांत वाटत होतं !! सकाळच्या एकूणातच कोवळ्या स्वच्छ्तेने मन निवांत विसावत असावं बहूधा…. माझ्या आजारपणाने माझ्या संपुर्ण कुटूंबाचे किती महिने असे काळजीत जाताहेत ही खंत विसरले मी काही काळ…. ’सुट्टी’ चे आखलेले बेत आठवले मग, वाटलं सुट्टी घेणार होते ती हा निवांतपणा मिळवण्यासाठीच की…..

मग कॅमेरा आणला घरातून, आपण हेच करतो नं फिरायला गेल्यावर, भरपूर असे फोटो काढतो…..

हा मग विरंगूळाच झाला एक , जमेल तेव्हा बागेत जायचे आणि फोटो काढायचे…..आज ते फोटोच टाकतेय एकामागोमाग एक….

मी फोटो काढायचे , आपल्याच बागेत फिरायचे ठरवले आणि तो आनंद साजरा केला आमच्या ब्रम्हकमळाने…. एक नाही दोन नाही सात फुलं आली त्याला यावेळेस…..

ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालेलो असतो , कोणे एके काळी जिथे बाहेरून कोणी ’काकू’ म्हणून हाक मारली की ती आईसाठीच असणार हे ठरलेले असते, तिथे ’ओ काकू बाहेर एक गंमत आहे, पहायला या ’ ही माझ्या मुलाच्या मित्रांनी मारलेली हाक मला नेहेमी वय वाढल्याची जाणीव करून देते…. ;)  बच्चेकंपनीला मी म्हणजे एक ’रिकामटेकडी’ काकू मिळाले होते त्यामूळे त्यांच्या विश्वातल्या लहानमोठ्या घडामोडींमधे ते मला सामील करून घेत होते , त्या मुलांनीच दाखवलेली ही एक गोगलगाय :)

कितीही प्रकारची फुलं माहित झाली तरी गुलाबाचं फुलं आवडतंच…. नाही का??

गुलाब जसा आवडता तसेच अत्यंत आवडते म्हणजे गणेशवेल, गोकर्ण आणि गुलबक्षी ….. गुलबक्षीचं एक बरं असतं पाऊस आला की ही रोपं आपली आपण येतात…. बहरतात , रंगांची उधळण करतात…. सगळा सौम्य कारभार…..

एक नाजूकशी गोगलगाय जशी दिसली तसे बाकि प्राणी-पक्षीही हजेरी लावत होते ….. कधी कॅमेरा हातात असताना सापडायचे तर कधी आठवणीत जागा पटकवायचे…..

चांदणीची फुलं काढताना सापडलेले सुरवंट….

तर हा अचानक दिसलेला सरडा….

ही जवळपास तीन इंच मोठी गोगलगाय….. कुठून आली होती देव जाणे, मी मात्र पहिल्यांदा इतकी मोठी गोगलगाय पाहिली…..

मुळात पावसाळा सगळं कसं स्वच्छ लख्ख करत होता….. हळूहळू घराच्या अंगणातच मी मनापासून रमत होते :)

पानावरून ओघळणारे थेंब असोत ….

की स्वस्तिकाची आठवण करून देणारे पपईचे फुल असो…..

की अगदी भुछत्र असो….

की अगदी गुलाबी लालबुंद डाळिंब असोत…. सगळ्यांनी मला उभारी दिलीये हे नक्की!! :)

मनावरची काळजी हटणं किती महत्त्वाचं असतं नाही…..अंगणाची एक नवी व्याख्या समजली मला त्या दरम्यान एक…. अंगण नं एक ’फ्रेम’  असतं….. सुंदर फोटोभोवती तितकीच सुरेख, रेखीव नाजूकशी फ्रेम असली की मुळचा फोटो कसा उजळून निघतो नं.. तसं प्रेमाने भरलेल्या घराभोवतीचं अंगणं, त्यातली झाडं-पानं -फुलं अशीच मुळच्या घरातल्या भावभावनांचं सौंदर्य वाढवणारी असतात..असावीत … :)

फोटोला सुरक्षित ठेवणारी, त्याला धक्का लागू न देणारी ’फ्रेम’ ….. फोटोतल्या व्यक्तीच्या स्वभावाचे वैशिष्ट्य पहाणाऱ्याला अलगद , गुपचूप सांगणारी ….. तसेच या अंगणाने मला सुरक्षित ठेवले…. मनाला (मानेला ;) ) घड्या पडल्याच होत्या , त्यांना हळुवार सांभाळले, फुंकर घातली…..

कधी कधी वाटतं सुट्टीला कुठेतरी गेले असते तर मनात इंद्रधनूष्य साठवायलाच नाही का ? आकाशाची ती सप्तरंगी उधळण मनात साठवायलाच नं…. मनमोराचा पिसारा वगैरे फुलवायलाच नं …..

यावेळेस मात्र जरासा ’काखेत कळसा’ असल्याचा प्रत्यय आला मला :)

इंद्रधनूष्यही अगदी हाक मारल्यासारखे हजर झाले :)

मन उजळले मग चटकन…..

माझ्यापायी घरच्यांचाही सुट्टीच्या भटकंतीचा विरस झालाय ही बोच आहेच तशी, पण निदान आजारपण सुसह्य झाल्यामूळे त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद तरी वाढला!!!

खूप खूप लिहू शकतेय मी… लिहायचेही आहे मला , पण आत्ता नाही…. माझ्या डॉक्टरांनी मला सध्या ’शिपायाचं’ काम कर असं सांगितलेय… एका जागी बसायचं नाही…. हातातली कागदपत्र वाटत असल्यासारखं सतत एका जागेवरून दुसरीकडे जायचं :) … तेव्हा एका बैठकीत खूप कमी लिहीता येतेय मला ….

ही पोस्ट बिस्ट काही खरच  नाहीये तशी… जाता जाता एक छोटा प्रयत्न करावा वाटतोय एक ….

गेल्या सहा महिन्यात ’ मला उत्तरं द्यायला जमत नसल्याचा ’ कुठलाही राग मनात न आणता मला सतत मेल्स, मेसेजेस, फोन करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मंडळींचे आभार मानण्याचा…. मला भेटायला येणाऱ्या, माझे रिपोर्ट्स डॉक्टरांना वैयक्तिक नेऊन दाखवून सल्ले घेणाऱ्या अनघा ,राजीवजी , सुनीतचे आभार मानण्याचा…..

कमेंट्स टाकत रहाणाऱ्या आणि ब्लॉगवर काहिही नवे नसतानाही चक्कर टाकणाऱ्या नव्या आणि जुन्या वाचकांचेही आभार!! :)

आणि काय लिहू, तुम्ही सगळे हातात हात घालून माझ्याभोवती एक कडं उभारलेलं दिसतय तोवर कशाला भीत नाही ब्वॉ मी …. एक अत्यंत सुंदर फ्रेम आहे किनई माझ्याभोवती , नाजूकशी तरिही अत्यंत भक्कम……

बस फिर और कुछ नही, आजके लिये इतनाही …. जशी जमेल तशी पुढची ’पोस्ट’ टाकतेच!!!

एक छोटीशी मोठीशी नोंद :)

‘ताई’ :)

‘तायू’ :)

‘तायडे’ :)

माझ्या ब्लॉगने मला दिलेली नावं ….. नुसती हाकच नाही तर ‘ताई’ मानून मनापासून प्रेम करणारी अनेक भावंडही दिली या ब्लॉगने …..

विद्याधर भिसे …माझा असाच एक भाउ :) ….. सगळ्या ब्लॉंगांवर ‘प्रॉफेट’ नावाने येणारे कमेंट्स पाहून मी २०१० मधे शोध घेतला, म्हटलं कोण बूवा हा ‘प्रॉफेट’ ??? :)

या बाबाच्या भिंतीवर पोहोचले शोध घेता घेता …. आणि मग एक सकस, प्रगल्भ वगैरे लिहिणारा मुलगा अशी ओळख पटली …. सुरूवातीला कमेंट्स मधून झालेली ओळख वाढत जाऊन , विद्याधरशी धाकट्या भावाचं नातं जुळलंही आणि वाढलंही :)

आजची नोंद आहे या भावाला Thank You म्हणण्यासाठी …. आता आभार मानले तर मला माझा भाऊ रागावणार आहे याची कल्पना आहे मला…. तरिही मी हे नोंद करतेय!!! माझ्या या भावाकडून काल मला एक गिफ्ट मिळालेय …..माझं आवडतं गिफ्ट … एक पुस्तक :)

 

 

Flipkart कडून असे गिफ्ट वगैरे आले नं मला भलताच आनंद झाला … पुर्वी माझ्या नावाने पुकारा करत पोस्टमन आला की मला असाच आनंद व्हायचा … कित्ती दिवसांनी ‘मजा आली ‘ असं सहज म्हट्लं गेलं ….

पुस्तक पढके होने के बाद मेरा मत मांडती हूँ  :)

 माझे अनेक सहब्लॉगर्स मला ताई म्हणतात , आणि ते मला मनापासून आवडते. एक नातं जुळलेय आम्हा सगळ्यांचे… एकाचा आनंद सगळ्यांचा असतो आणि तसेच एखादा नाराज असेल तर त्याच्यासोबत सगळे उभे असतात ….. मस्त चाललेय आम्हा ब्लॉगर्सचे….

खरं सांगू का आणि तसेही ताईलाच मिळते नं राखीपौर्णिमेचं गिफ्ट ;)

खूप काही लिहीत नाही, माझे आपले नेहेमीचे की हे ऋणानूबंध असेच राहूदेत :)

बाकि काय तेच आपले ‘ जय ब्लॉगिंग’ :) ….

… लिहीत राहूया…. वाचत राहूया आणि असेच सगळे सोबत राहूया :)

 

फुलपाखरू….. (भाग १)

सगळी कामं चटाचट आवरती घेऊन रमा निघाली, दाराला कुलूप लावताना एकीकडे पिल्लूला सुचना देत होती ती… डबा नीट संपव, टिचरचं ऐक…. शाळा सुटली की तिथेच थांब , मी येतेच आहे घ्यायला….पिल्लूला त्याच्या शाळेच्या बसमधे चढवून रमा चटकन सरिता मॅडमच्या घरी पोहोचली.

मॅडम तिची वाटच पहात होत्या…. रमा जरा विसावली क्षणभर. मॅडमनी दोघींसाठी चहा मागवला आणि रमाच्या हातात एक पत्ता दिला.  पुढचे पंधरा दिवस रमाला जायचे होते तिथे. उशीर करून तसेही चालणार नव्हतेच…. पिल्लूची शाळा संपायच्या आत रमाला पुन्हा परतायचे होते.

रोजचे हे हक्काचे तीन तास रमाचे असायचे. या नव्या शहरात सुरूवातीचे काही दिवस रमाला अगदी कठीण गेले… नवी जागा, पिल्लू लहान , ही अडचण नं ती समस्या पण रमा रुळली तिथे… आणि अभयची साथ होतीच तिला. पिल्लू आता शाळेत मस्त एंजॉय करत होते :) … हे रमाचे नव्हे पिल्लूचे मत होते त्यामूळे रमा मात्र सुखावली होती ….. पिल्लूच्या शाळेत एंजॉय करण्याने रमा तिच्या आवडत्या समाजसेवेकडे वळली होती पुन्हा.

सरिता मॅडमची संस्था एक प्रकारे आधारगट चालवत होती, मात्र हे काम जरा वेगळे होते. एकटे रहाणारे वृद्ध किंवा वृद्ध जोडप्यांना काही वेळ देणे आणि तो ही त्यांच्या रहात्या घरातच हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. तिथे जाउन त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांची औषधं आणून देणे, त्यांच्यासाठी पुस्तक वाचणे, त्यांना बॅंकांमधे वगैरे नेणे असली जिकीरीची कामंही त्यात असतं कधी कधी, ही सगळी कामं रमा आणि तिच्या नुकत्याच झालेल्या मैत्रीणी आनंदाने करत.

मॅडमने दिलेला पत्ता वाचताना रमा चमकली क्षणभर…. ’श्रीकृष्ण नगर’ ….ऐकलेले आहे हे नाव तिने याआधि खात्रीने…. कुठे पण?? तसे खूप नाविन्य नाहीये नावात म्हणजे याच गावाचा असेल संदर्भ कश्यावरून…..या शहरात आल्यानंतर खरं तर अधे मधे ते नाव तिच्या मनात डोकवून जायचे…. आज अवचित तेच नाव सामोरे आले अनं रमा गोंधळली.  अर्थात दवडण्यासाठी वेळ होताच कुठे तिच्याकडे… तिने पत्ता पर्स मधे कोंबला आणि गाडी वळवली…. एक अनामिक हुरहूर मनात दाटली तिच्या . आयुष्य रमाला याचसाठी कायम आवडायचे… सकाळी उठताना आपण कामाची यादी करू भलेही पण त्यातली होणार कुठली कुठली हे आपण ठरवूनही भागत नाही :) …आयूष्याचं unpredictable असणं अत्यंत मोहक असतं असं तिला कायम वाटायचं…. गाडीच्या वेगाबरोबर तिचे विचार आज धावत नव्हते तसे, आणि ते धावले असतेही तरी तिने त्यांना रोखून धरले होते……

श्रीकृष्ण नगरच्या पाटीपाशी थांबून तिने पत्ता पुन्हा एकदा वाचला….

पत्त्यातलं घर एक सुरेख बंगली होती…. इथल्या काकुंकडे रमाला यायचं होतं आता, वयाने सत्तरीच्या पुढच्या या काकू खरं तर ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलाकडे रहातात. सध्या महिनाभरासाठी एकट्याच भारतात आल्या आहेत ही सरिता मॅडमने दिलेली माहिती रमा आठवत होती. घाईत आपण त्यांचे नाव वाचलेच नाही या विचाराने रमा स्वत:शीच हसली…. यात नवे काय होते म्हणा, हे असे घोळ घालणं रमासाठी कायम होतं…. नावं न विचारणे आणि चुकून विचारलेत तर विचारल्याच्या पुढच्या क्षणी ते विसरण्याचा तिचा हातखंडा होता.

दारावरच्या पाटीवरचं आडनाव पाहून मात्र रमाची खात्री पटली आजचा दिवस काही वेगळा दिसतोय…. तोच भाग आणि तेच नाव, किती वर्षांपुर्वी ऐकलेलं…. कितीही विसराळू म्हटलं तरी काही नावं कोरलेली असतात की काय अश्या विचारातच रमाने दार वाजवलं. तसेही काही आडनावं काही भागात अत्यंत कॉमन असतात , आपण उगा गुंते घालायचे नाहीत असा विचार तिच्या मनात आला…..

या घरात आणि या काकूंकडे आपलं पटेल याची खात्री तिला पहिल्या काही मिनिटातच पटली . स्वच्छ , नीटसपणा आणि साधं पण कल्पकतेने सजवलेलं घरं ही रमाची अत्यंत आवडती बाब, आणि या घरात नेमकं तेच रमाला खूप आवडलं. कामवाल्या बाईकडून घर आवरून घेणं हे एक मोठं काम असतं वगैरे मुद्दे आले आणि तिचं काकूंशी जमून गेलं…. दोन गप्पिष्ट बायका एकत्र आल्या होत्या…

पुढचे तीन चार दिवस भराभर गेले….

त्यांना काय हवेय काय नकोय वगैरे रमा जाणून घेत होती.दोघींच एकमेकींशी ’जमलं’ मनापासून… काही घरात रमाला जमवून घ्यावं लागत असे , इथे अलगद सुर जुळत होते. ’रमा’ तुझं नाव मला कायम आवडायचं … काकू सहज तिला सांगत होत्या. त्यांच्या बालपणीचे किस्से ऐकत, त्यांच्या औषधांची यादी समजावत घड्याळाचा काटा रोज चटाचट पुढे सरकत होता. ” ’चहाचा कप’ आणि गप्पा  ” हे काकूंनी त्यांच्या गप्पांच नाव ठेवलं होतं….

“रमा,  गेल्या कित्येक वर्षात इतकं बोलले नव्हते गं मी, काका होते नं तेव्हा त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या माझ्या , तुझी ती सरिता ओळखते नं मला…. तिला मी म्हटलं होतं तुझ्याकडची बडबडी मुलगी पाठव , तिने लगेच तुझे नाव सुचवले…. मला ’रमा’ नाव आवडतेच आणि, माझ्या फार आठवणी आहेत या नावाशी निगडित….. ” काकूंच्या बोलण्याचा ओघ सुरूच असे.

रमादेखील असं खळखळून किती दिवसानी हसली होती. काकूंच्या बोलण्यात बरेचदा उल्लेख व्हायचा, ’लहान आहेस गं पोरी अजून … ” … रमाला मजा वाटायची तेव्हा. लग्न झाल्यापासून  ती अचानक खूप मोठी झाल्यासारखे वाटवणारे दडपण ती विसरून जायची मग. रमाच्या मनातलं फुलपाखरू मोकळं वाटायचं तिला तेव्हा….

’फुलपाखरू’ … नाजुकसं, सुंदरसं…. रमाने गुपचूप ठेवलेलं होतं त्याला मनात लपवून…. बाहेर काहिही चालू दे , मनात मात्र राज्य त्या फुलपाखराचंच….. :)

रमाला या चहाच्या कपाबरोबरच्या गप्पा खूप आवडल्या होत्या. तिची खूप लहानशी स्वप्न होती नेहेमी,  त्यातलं एक म्हणजे अश्या गप्पा मारणारी सासू… अभयच्या आईला असली स्वप्नाळू कल्पना ऐकवणं जरा अवघडंच होतं.  रमा एका वेगळ्या पातळीवर विचार करणारी आणि अभयची आई एका वेगळ्या… दोघींचे सुर इतर अनेक सासू सुनांसारखे वेगळे असले आणि त्यांच्यात वाद नसले तरी रमाची लहानशी स्वप्न मात्र तिला नेटाने मागे सारावी लागली होती. “सुनेने सुनेसारखेच वागायचे ” हा नियम ऐकून ऐकून रमा नित्य नेमाने गोंधळत जायची….. सुनेकडे फुलपाखरू नसावं बहुतेक , हळुहळू रमाला वाटायला लागलं मग!!! फुलपाखराला बरणीत कोंबलं होतं जणू… मलूल पडलेलं असायचं ते तिथे….. सगळं सुख असलं तरी मोकळ्या हवेत उडणाऱ्या, रंगांची, ताजेपणाची सय व्हायची फुलपाखराला, त्या जिवाची घुसमट व्हायची !!!

” रमा तुझ्या बालपणाबद्दल सांग गं, कुठली आहेस तू?? ”  काकूंचा अचानक आलेला प्रश्न होता खरं तर हा !! त्यांच्या आधारगटाचा तसा  अलिखीत नियम होता की जिथे जाल तिथली माहिती विचारायची नाही आणि सहसा आपल्याबद्दल फारसे काही सांगायचे नाही. आज त्या नियमाला मुरड घालून रमाने गप्पा मारल्या….  तिच्या कॉलेजचे नाव काकूंनी परत विचारले, आणि त्या मंदश्या हसल्या. रमा अभयबद्दल, पिल्लूबद्दल भरभरून बोलत राहिली. ती घरी जायला निघाली तेव्हा काकूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशिर्वाद दिला. तिच्या पाठीवर त्यांची बोटं हळूवार फिरली…. त्यांच्या मायेनं भारलेल्या अनपेक्षित कृतीने रमा सुखावली. आज काकू बोलल्या नाहीत फारश्या, उलट मन लावून आपलं बोलणं ऐकत होत्या असं वाटलं तिला.

पंधरा दिवस चटकन संपले … काकूंचा निरोप घेणं रमाला जड गेलं. शेवटच्या दिवशी काकूंनी आग्रह केला म्हणून अभय आणि पिल्लूही त्यांना भेटायला आले. तिघांनी वाकून काकूंना नमस्कार केला. किती बोललं गेलं असलं तरी गप्पा कितीतरी मारायच्या राहिल्याच होत्या, काकूंबद्दल अजून किती जाणून घ्यायचे होते, त्या गप्पा पुढच्या भेटीत असे दोघींनी ठरवले :)

पुढच्या दिवशी काकूंचा मुलगा, सुन आणि नात येणार होते. ते सगळेच परत त्यांच्या मुक्कामी परतणार होते.

रमाला आता एखाद दोन दिवस सुट्टी आणि मग पुढच्या काकू किंवा काका-काकूंकडे जायचे होते. :)

……………………

 

फुलपाखरू भाग २ इथे आहे !!

फुलपाखरू….. (भाग २ )

(पहिला भाग इथे आहे. )

पुढचे काका- काकू , आणि मग त्याच्या पुढचे काका किंवा नुसत्या काकू …. दिवस पुढे सरकत होते. पिल्लूच्या शाळेतला अभ्यास वाढत होता…. अभयच्या ऑफिसमधलं कामंही छान चाललं होतं. रमाला निवांत वेळ हाताशी कमीच लागत होता तसा . कधीतरी चहाचा कप आणि जरा सवड हातात एकत्र आली की त्याबरोबर काकूंची आठवण मनात आल्याशिवाय रहायची नाही. सरिता मॅडमला काकूंबद्दल विचारू हा विचार मनात यायचा आणि मग घाईत ते राहून जायचे…..

त्यात पिल्लूच्या शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर रमाच्या सासूबाई तिच्याकडे रहायला आल्या…. ’समाजाची कशाला हवीये सेवा , त्यापेक्षा एखादी नोकरी करावी ’ हा विचार रमाला येता जाता कानी पडायला लागला. रमाने त्यांचे बोलणे मनावर न घेता त्यांच्याशी संवाद साधायचा नेहेमीचा प्रयत्न चालवला होता. सगळं म्हणायला सुरळीत चाललेले होते.

एक दिवस मग ते सगळे या भागातल्या प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात गेले होते…. या शहरात आल्यापासून अभय रमाला कित्येकदा तिथे चलण्याबद्दल म्हणत होता, रमाने ते कायम टाळले होते. आज सासूबाईंची इच्छा म्हटल्यावर रमाला जावेच लागले….. अनेक साड्यांची खरेदी झाली…. एकीकडे ती स्वत:, मधे अभय आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई बसलेल्या होत्या…..  रमाला वाटले नात्यांची ही एक साडीच आहे ही, सासूबाई मुख्य साडी , अभय जोडणारा धागा आणि आपण काठाला उभे आहोत….

साड्यांच्या राशीतून एक बेंगनी रंगाची, हिरवे सुरेख नाजूक काठ असलेली साडी रमा हातात घेउन पहात होती. तिच्या मनातल्या फुलपाखराचे आवडते रंग….जांभळा रंग आणि हिरवे काठ असलेलं जरतारी फुलपाखरू….  तिच्या सासूबाई फणकारल्याच तितक्यात, काय तरी साडी निवडलीस गं रमा, वेगळच काहितरी शोधतेस नेहेमी ….. भिरभिरणारे फुलपाखरू बिचकले, पुन्हा कोषात गेले :(

” ती साडी घेऊयात तूला “, असे अभयने म्हटल्यावर मात्र तिने नकार दिला….

रमाच्या मनात एक विचार चमकला परत येताना , जुनी रमा असते नं मी तर आत्ताच्या आत्ता सासूबाईंना अर्धा तास डिवोर्स दिला असता … बोललेच नसते… बालिश इलाज होता तिचा हा… कट्टी नाही म्हणायची ती, डिवोर्स म्हणायची …. तिच्या कॉलेजमधे सगळे हसायचे तिला या शब्दाबद्दल. जुन्या आठवणी तरळल्या मनात आणि तिला वाटलं ’लहान आहोत आपण .. पिल्लूयेव्हढे किंवा जरासे मोठे ’ …. अधेमधे असे बालिश वागता येण्यासाठी तरी काकूंसारखी सासू हवी होती मला…. वयानेच नाही तर खरंखूरं मोठेपण असणारी….  मनात विचार आला खरा पण त्या विचारासरशी रमा चपापली. तिने सासूबाईंच्या हातातले सामान घेतले आणि ते सगळे घराकडे निघाले…. नाजुकश्या पंखाची उघडझाप झाली क्षणभर मनात आणि पुन्हा ते उदास मिटले ……

सासूबाई गावी गेल्यानंतर पुढचे जवळपास आठ -दहा दिवस रमाला सरिता मॅडमकडून फोन आला नव्हता… पिल्लूच्या शाळेची सुट्टी संपून शाळा सुरु झाली. रूटिन सुरू….

रमा घरातली कामं आवरत असताना बेल वाजली , सरिता मॅडमकडून तिच्यासाठी काही सामान आले होते.

पार्सलमधल्या एका पाकिटात एक पत्र होते रमासाठी…. रमा पत्र वाचू लागली आणि नकळत डोळे भरून वहायला लागले तिचे….तिच्या काकूंचे पत्र होते ते…

रमा वाचत गेली ओळींमागे ओळी…..

” प्रिय रमा, …….तुझ्या काकांनी निवडलेली आणि मी तुझ्यासाठी खरेदी केलेली भेट पाठवतेय…. काका म्हणू की सर म्हणू गं… तू सर म्हणायचीस नं त्यांना… तुझे लाडके सर… आणि सरांची लाडकी विद्यार्थीनी तू. आधि तू हरहून्नरी मुलगी म्हणून आवडायचीस त्यांना, मग त्यांना तुझ्यात त्यांची सुन दिसली म्हणून तू अजून लाडकी झालीस. मला घरी तुझ्याबद्दल सतत सांगत ते.  एकूलता एक मुलगा त्यांचा आणि अनेक स्वप्न… सतत म्हणत मी आणि माझी सुन मस्त पेपर वाचन करणार सकाळी , एक चहाचा कप हातात हवा आणि भरपुर गप्पा. मला सुन नकोय , मुलगी हवीये…. मला तर सक्त ताकिद होती, सुनं म्हणायचं नाहीस कधिही तूला…. तू मुलगी आमची. :)  तूला पहायला येऊ असे ठरवलेही मी पण राहूनच गेले ते…. मग आमची आमच्याच गावी पुन्हा बदली झाली … तुझं शिक्षण पुर्ण झाल्यावर तुझे सर निघालेही होते तूला मागणी घालायला पण तोपर्यंत तुझे आणि अभयचे लग्न तुम्ही ठरवलेले होते. ते हिरमूसले , म्हणाले मी आधि बोलायला हवे होते….

आमच्या मुलाचे लग्न होइपर्यंत ते काही थांबले नाहीत बघ पण !! मी ही निघालेय आता त्यांच्याकडे…. तू अशी अचानक सामोरी आलीस, सगळे संदर्भ जुळले. त्यांची मुलगी मला भेटली हे त्यांना सांगेन न विसरता…..  “

रमाच्या मनात तिचे सर तिच्याशी बोलत होते, सरिता मॅडमने सांगितलेल्या त्या भागाच्या नावाने, त्या घरावरच्या पाटीने मनात दाटलेली हुरहूर तिचा अर्थ समजावत होती… आठवणींची दाटी होत होती…. अभयशी लग्न ठरताना मैत्रीणींची ’रमा अगं लग्न एकाशी नसतं गं होत, संपुर्ण घर येत नं त्यात , त्या घरात कशी रमशील तू ?? त्याच्या आईच्या हेकट वागण्याकडे कानाडोळा का करते आहेस ?? ”  वगैरे वाक्य रमाच्या मनात डोकावत होती….. वेडं फुलपाखरू घायाळ होत होतं…. काय कमावलं काय गमावलं हे हिशोब फुलपाखराला येतच नव्हते, आणि मांडायचेही नव्हते …. एक सल मनात उमटत होती तिला नाव मात्र त्या बिचाऱ्याला देता येत नव्हते…..

पत्र हातात ठेवून बराच वेळ रमा बसून होती… त्या पत्राबरोबर एक लहानशी चिठ्ठी होती …

” रमा, सासूबाईंनी हे पार्सल आणि पत्र तुझ्यासाठी ठेवले होते…. त्यांच्या शेवटच्या काही इच्छांपैकी एक की हे पत्र तूला पोहोचवावे. ….. तुझ्याबद्दल खूप बोलल्या त्या, अगदी आनंदी होत्या जाताना ….. “

काकूंच्या सुनेने तिचा पत्ता आणि फोन नंबर दिलेला होता. त्या कोण होत्या हे समजल्यावर,  आता त्या आपल्यात नाहीत हा विचार रमाला अजूनच कष्टी करत होता.तिचे डोळे सारखे भरून येत होते…..

सोबतचे पार्सल उघडले रमाने…. त्यात एक सुरेख साडी होती….. बेंगनी रंगाची, हिरवे नाजूक काठ असलेली……… तिचा मऊसूत अलवार स्पर्श रमाच्या हातालाच नव्हे तर मनाला झाला आणि आधिच वहाणारे डोळे अजूनच भरून येउ लागले.

त्या साडीकडे रमा एकटक पहात राहिली….. बेंगनी साडीवर त्याच रंगाचं फुलपाखरू गोल गोल फिरत राहिलं…………

बाकी शून्य ……

अंक, बाराखडी, गणित, भाषा, इतिहास, भुगोल, विज्ञान, मग जीव नी भौतिक त्यात रसायनाचा घोळ….. बीजगणित, भूमिती, ट्रिगनॉमेट्री नं बिट्री…. साईन न कोसाईन, टॅन न बिन …… ईंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हज…. डबल नं ट्रिपल…. काळ काम न वेगही त्यात….आपली भाषा, साहेबाची भाषा… हिंदी बिंदी मधेमधे….व्याकरणं बिकरणं, नुसतंच प्रकरण….. प्रोजेक्टाईल नी सरळ , रिलेटिव्ह बिलेटिव्ह मोशन की बिशन ….. हालचाल नुसत्याच नावाची नी खरं तर सगळं थबकवणारी …… व्हेक्टर्स बिक्टर्स , डोक्यावरचे बाण….. वर्तूळ नि चौकोन….. इकडे रेषा,  तिकडे किरण….. वाकड्यात शिरले की डिगीटल नं ऍनालॉग….. डेटा न फेटा…. बायनरी बियनरी ….. मेकॅनिक्स नं ग्राफिक्स …. कंडक्टर नं नॉनकंडक्टर भलती धुडं … मधे सेमी वाल्यांच रिजर्वेशन चं लफडं ….. मिली सेंटी डेसी मिटर …  डेका हेक्टो किलो मिटर… नसती पाठांतर… त्यात मैलाची गणितं …. आर्टस न कॉमर्स…..आम्ही सुखी न तुम्ही दु:खी….. उभ्या दोन रेषा समोरासमोर की कपॅसिटर …आडवं पाडा त्यांना वेड्या वाकड्य़ा ओढा झाली की रेजिस्टर…. डायोड न ट्रायोड, इन्व्हर्टर नं बिन्व्हर्टर ….

आमचं सायन्स तुमचं सायन्स….. तुम्ही डॉक्टर, तुम्ही वकील .. तुमची जात वेगळी आणि आमची वेगळी !!! तुमचे विषय सोप्पे आणि आमची मेली ब्रॅंचच अवघड…… तुम्ही करा मज्जा नं आम्हाला सजा….

एकाचे एक विषय नं एकाचे एक…. तुमचा अभ्यास आमचा अभ्यास… तुमची डिग्री नं आमची डिग्री…… तुमची वर्ष गेली नं आमचीही गेली……

आम्हाला नोकरी मिळते तुम्हाला नोकरी मिळते….. कधी कधी आमचं नं तुमचं ऑफिसही एकच ….. तुमच्या डिपार्ट्मेंटला काम कमी नं आमच्यावर जबाबदारी भारी…… तुमचं लग्न होतं नं आमचं ही लग्न होतं…. तुम्हाला पोरं होतात नं आम्हालाही पोरं होतात… आयुष्याच्या वेव्हज एकाच दिशेला वहातात…. ए सी असो नं डि सी असो… त्यांचा रस्ता ठरलेला  …..

नाती नं गोती जपा फार….. लोकांच्या वागण्याचा भलता भार….. एक न धड चिंध्याच फार …. आमचं माहेर तुमचं सासर ….. आमची घरं तुमची घरं…. आमचा किराणा, तुमचा किराणा ….. आमच्या मुलांचे रिजल्ट नं तुमचे ते निकाल…..आम्ही घरं घेतो तुम्हीही घेता घरं …. आमचं महाबळेश्वर नं तुमचं माथेरान… लंडन बिंडनला तिकीटं फार…..

दमछाक करताना तुम्हीही दमता… दमछाक करताना आम्हालाही थकवा….. आयुष्याचा अर्थ शोधतो आम्ही…. अर्थात आयूष्याला शोधताना रमताय तुम्ही….

आयुष्याची गणितं म्हणे तुम्ही सोडवता… आयूष्याची गणितं मग आम्हिही सोडवतोच….

गणितात असतं काय काय…. अधिक नं उणे….भागाकार नं गुणाकार…. बालपणीच्या वर्गात शिकवतात बाई…. त्यांच्यावर विश्वासायची आपल्याला घाई….

प्रत्येक जण एक अंक असतो खरा…. पूर्णांक असो किंवा अपूर्णांकच बरा…. काही गोष्टी जोडतो काही वजा करतो….. घातांक बितांक शोधायचेच नसतात… पुस्तकाच्या बाहेर सांगा ते तसेही कुठे दिसतात??? वर्गमूळ नं घनमूळ की नुसतं खूळ …..

प्रश्न पडतात आम्हाला बरं , वाटतं तुमचंही असचं असतं हेच एक खरं…..

आयुष्यात गणिताला एकच फुटते वाट…. भागाकाराच्या रस्त्याचा भलताच थाट …..

आयुष्य स्वत:च होतो मग भाज्य एक…  भाजक म्हणजे आपणच अंक नेक….. अंक जितका मोठा भागाकार तितका सोपा… खूप पायऱ्या उतरायच्या नाहीत, उधाऱ्या उसनवाऱ्या करायच्या नाहीत……

अंक असू देत कुठलाही म्हणा….. नियम हाच गणिताचा कणा… पायऱ्यांना इथे मार्क असतात….. चुकारपणाच्या वाटा नसतात ….

काहीतरी भाग मग आम्ही देतो….. वजाबाक्या बिक्या करत असतो…. एक दरी पार की पुढची खाई ओढायची…. सारं बळ्ं एकवटत पुन्हा उडी मारायची…. आमचं ते असं नं तुमचंही असंच….. भागाकारात गुणाकार.. … गुणाकाराचा एक साक्षात्कार…. आम्ही नं तुम्ही रस्ते तेव्हढे वेगळे, आकडेच काय ते नवे …… तुमचं तेच नं आमचंही तेच की …..

गुणाकाराची वजाबाकी …. हे बाकि नं ते ही बाकि…..

आयुष्याचं संचित वर हळूहळू साठत जातं …..स्वत:लाच स्वत:ने भागायचं वळणं येतं….. हा भाग असतो एक भोग बरं का ….. त्याला चुकवणं आपल्याच्याने खरय का????

अंकातून अंक वजा मग होतो…. संचिताला एक अंक जोडला जातो….. ह्याचं संचित , त्याचं संचित…. आमचं वेगळं … तुमचं पुन्हा वेगळं….

तळाशी उरतं त्याला मग ’बाकी’ म्हणतात…… भेदाभेदाची गणितं इथे येऊन विरतात…..

गोल गोल आकडे फेर धरतात…. शुन्यातून विश्व उगाच का म्हणतात !!!!! :)

एक सात्विक वादळ …. अमृता प्रीतम …

अमृता प्रीतमचं तिने स्वत: लिहीलेलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही ,कधी वाचेन ते ही माहित नाही!!!  पंजाबीत असलेलं पुस्तक वाचता येणार नाही कदाचित पण समजणार नाही असं मात्र म्हणता येणार नाही….. ती मराठी नाही, मी पंजाबी नाही…. तिच्या साहित्याची ओळख होण्याच्या टप्प्यापर्यंत येइपर्यंत मूळात माझी साहित्याशी अजून ओळख नाही….  मग असे असूनही , तुटपुंज्या वाटू शकणाऱ्या ओळखीवरही त्या व्यक्तीमत्त्वातलं नक्की काय साद घालतं समजत नाही….

बरेचदा वाटतं ब्लॉगवर एक पोस्ट लिहीण्याइतकी मी नक्कीच ओळखते तीला… मग वाटतं, छे!! मला जे समजतं , जे वाटतं ते शब्दांमधे बांधण्याइतकी समर्थ मी नक्कीच नाहीये.आणि मग तिथेच वाटतं, ’युरेका ’ …. सापडलं मला की मला काय आकर्षण वाटतं तिच्या व्यक्तीमत्त्वाचं…. माझं ’दुबळं’ असणं, समाजाच्या चौकटीचं सतत भान बाळगणं आणि तिने ते सशक्तपणे झुगारणं …. नुसतं झुगारणं ही बंडखोरी नव्हे तर स्वत:तल्या प्रतिभेला जपत स्वत:च्या नियमांनूसार आयुष्य जगणं !!!

भारतातून निघताना पुस्तकं खरेदी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो माझ्यासाठी नेहेमी . एका पुस्तकाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना त्या दरम्यान सुरू होती. घेतलेल्या कुठल्यातरी पुस्तकावर एक लहानसं पुस्तक हाती आलं , मुळचं ’उमा त्रिलोक ’ या लेखिकेचं आणि  ’अनुराधा पुनर्वसू ’ यांनी मराठीत भाषांतरित केलेलं  ’अमृता इमरोज ’ एक प्रेमकहाणी  नावाचं ते पुस्तकं !!!

अमृता प्रीतम एक मोठ्या पंजाबी लेखिका होत्या इतपतच ज्ञान होते तोवर मला…. केव्हातरी सहज पुस्तक चाळायला म्हणून हातात घेतलं . मात्र जसजशी वाचत गेले तेव्हा मात्र अमृताच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडत गेले. इथे इमरोजना वेगळं काढणं शक्यच नाहीये. ते दोघे वेगळे होतेच कधी…..

एक जिगसॉ पझल येतं इश्वराकडून , आपल्यात एक अपुर्ण आपण असतो … त्या पझलचा दुसरा भाग देवाने पाठवलेला असतो ….. आणि ती दोन अपुर्णत्त्व जिथे भेटतात ते जीवन यशस्वी असते वगैरे प्रेमाच्या संकल्पना मनात कायम होत्या माझ्या , स्वत:ही तसेच काही जगण्याकडे कलही आहे पण बऱ्याच गोष्टी बोलत नाही आपण सहसा!!  ’हसं’  होइल आपलं अशी एक सुप्त भिती बाळगत आपण आपल्यातलं सामान्य असणं मान्य करतो :( …. अमृता आणि इमरोज यांच्या वयातलं ’उलटं’ अंतर आज तितकसं बोचणार नाहीदेखील पण समाजासाठी अश्या बाबींची मान्यता ५०-६० वर्षापुर्वी निश्चित नव्हती . त्यातही लग्नाच्या रूढ बंधनात न अडकता ४० वर्षापेक्षा अधिक काळाचं त्यांचं सहजीवन हा विषयच भुरळ घालणारा. अमृताला आधिच्या लग्नापासून झालेली मुलं आणि इमरोज अविवाहित , वेगळं आहे नं रसायन !!!

समाजाचा समाजानेच रचलेला एक पाया आहे…. वर्षानूवर्षे माणसांच्या अनेक पिढ्या त्या पायाला धरून जगताहेत… आमच्या पायावर आम्ही उभे आहोत हा दावाही ठोकतात…. आपण कसलातरी आधार घेतलाय ही जाणिवच जिथे नाही तिथे त्या आधाराशिवाय उभं रहाण्याचं आपल्यात सामर्थ्य असतं हे भान कुठून येणार ??? एखादा येतो मग चुकार गडी जो समाजाच्या या पायाला आव्हान करतो…. त्याच्या मजबूत भिंतींपलीकडे पहातो…. अवघड असतं हे नेहेमी …. पायाला चिकटलेली माणसं अश्या स्वतंत्र उभ्या रहाणाऱ्या माणसाचे पाय ओढतात ….. त्यात जर ती एक स्त्री असेल तर विचारायलाच नको…. जे आजही कठीण आहे ते आजपासून अनेक वर्षांपुर्वी अजूनच कठीण असणार नाही का ….

प्रस्थापिताविरुद्ध बंड करायचाय नं मग समर्थ असायला लागतं !! कणखर , मजबूत वगैरे असावं लागतं …. अमृता तश्या होत्या !! इथे मुळात ’भरकटण्याचा ’ धोका फार …. केलेल्या प्रत्येक कृतीचं समाज स्पष्टीकरण मागत फिरतो अश्या वेळेस ….. ते द्यायचं नसतं कारण ते मुळात ज्यांना समजत नाही तेच ते मागत असतात…. आपला वेगळा सुर आपण लावायचा असतो, समाज ऐकणार असतो तो सुर पण आपण यशस्वी झाल्यानंतर …. मधला काळ मात्र मोठा बाका असतो …..

काही लोक ’आवडून जातात ’ आपल्याला. सुर जुळतात, झंकार ऐकू येतो , ते होत होतं अमृताबाबत.

’ इतिहास माझ्या स्वयंपाकघरात आला आणि भुकेलाच परतला  . ’ ही ओळ असो किंवा , ’तिच्या आयुष्याचे धुमसते निखारे काळाने हलवले , त्या चटक्यांनी त्याच्या बोटांवर फोड आले. ’ असो,  जसजसे अमृताच्या साहित्याचे हलके हलके दर्शन व्हायला लागते मनाचा गोंधळ उडायला लागतो…. शब्दांची वेगळीच बांधणी असते ही…. अमृताच्याच एका पुस्तकाचं नावं आहे ’अक्षरों की रासलीला ’ … किती योग्य आहे हा शब्द तिच्या रचनांसाठीही ….. शब्दच जणू खेळताहेत एकमेकांशी आणि घडवताहेत एक अप्रतिम काव्य !!! वीज चमकते नं क्षणभर कसा लख्ख प्रकाश दिपवतो आपल्याला तशी धारदार रचना मोहात पाडते .

कधी कधी एखादं पुस्तकं वाचायला घेतलं की आवडतं पण उगाच मन साशंक होतं की आपल्या या आलूलकीला तडा तर नाही नं जाणार…. तसे न होता अमृताबाबत कुठेतरी खात्री वाटायला लागते,  इथे मुळातं नातं विश्वासाचं आहे…. निडर, बंडखोर, स्वत:शी प्रामाणिक लोकांबद्दल मला नेहेमी आदर वाटत आलाय , त्यांच्याकडे स्वत:चा विकास करण्याचंच नव्हे तर समाजाला एक सकस दृष्टिकोण देण्याचं सामर्थ्य असतं.

१२२ पानं झपाटलेली …. पुस्तकात अमृता – इमरोजच्या तरल नात्याचे अनेक सुरेख, तरल पैलू , अमृताच्या साहिर लुधियानवीबद्दल कायम वाटलेल्या प्रेमाचे रंग, तिचं प्रसंगी कणखर नं एक स्त्री म्हणून स्वत:तलं स्त्रीतत्त्वाशी प्रामाणिक असणं सगळंच आहे…. काहितरी देऊन जाणारं पुस्तकं !!! आपल्याला अंतर्बाह्य समृद्ध झाल्यासारखं वाटवणारी एक सोबत….

इमरोजसाठीची तिची ’मै तेनू फिर मिलांगी ’ कविता तशी अनेकांना परिचयाची …. गुलजारांच्या आवाजातली ही कविता इथे ऐका !!!

पुस्तक वाचून संपलं पण एक अस्वस्थता सोबतीला आली…. ती अजून खाद्य मागत होती. अमृताचा अजून शोध घे म्हणून सांगत होती….. अमृताचं लिखाणं आता शोधायचं आहे ….. काही काही अपुर्ण पानं हाती लागताहेत …..

फाळणीचं दु:ख अनूभवलेली अमृता…. त्या व्यथेला कायम मनात बाळगलेली अमृता ….. हीर ची दास्तान लिहिणाऱ्या ’वारिस शाह ’ ला फाळणी दरम्यान अत्याचार झालेल्या मुलींबद्दलही लिही रे सांगणारी , ’ वारिस शाह ’ ही  कविता लिहिणारी अमृता ….

फाळणीच्या वेळी पळवून नेलेल्या मुलींचा नंतर शोध घेतला गेला त्यातल्या अनेक मुलींच्या पोटात कोणाचं तरी बीज वाढत होतं :( …. त्या बाळांबाबत अमृता लिहीते , ” उस बच्चे की ओर से – जिसके जन्म पर किसी भी आंख में उसके लिये ममता नहीं होती , रोती हुई मां और गुमशुदा बाप उसे विरासत में मिलते हैं ….. “

” मैं एक धिक्कार हूं -

जो इन्सान की जात पर पड रही …

और पैदाईश हूं – उस वक्त की

जब सुरज चांद -

आकाश के हाथों छूट रहे थे

और एक -एक करके

सब सितारे टूट रहे थे ….

’पिंजर’ पाहिला तो केवळ अमृतासाठी …. तिच्या प्रेमात पुन्हा एकवार पडण्यासाठी !!  फाळणीपुर्वी पाकिस्तानात असलेल्या एका गावातली’पुरो ’ (उर्मिला मातोंडकर )…. तिचे लग्न ठरलेय…पुर्वजांच्या वैमनस्यातून सुडाच्या भावनेने तिला त्या गावातला रशीद नावाचा मुसलमान पळवून नेतो…. हा रशीद मनाने अतिशय चांगला आहे…. त्याच्याकडे राहून आलेल्या पुरोला घरी कोणी स्विकारायला तयार नाही… नाईलाजाने पुरोचा रशीदशी निकाह होतो, तिला त्याला स्विकारावं लागतं …. परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरिही स्वत्व जपणारी…. खंबीर, लढावू वृत्तीची पुरो … आणि शेवटी ’रशीद’ च्या चांगूलपणामूळे, त्याच्यातल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधत धावणारी , त्याच्या नावाने हंबरडा फोडणारी एक साधी , हळवी स्त्री…. खऱ्या प्रेमापुढे सहज झुकणारी, त्याची कदर करणारी स्त्री !!  उर्मिला इथे ’पुरो ’ हे पात्र जगलीये… मात्र त्या पात्रात अमृता शोधता येते इतका तिचा ठसा मनावर उमटलाय….

ही पुरो सिनेमात शेवटी म्हणते, ” चाहे कोइ लडकी हिंदू हो या मुसलमान, जो भी लडकी लौटकर अपने ठिकाने पहूँचती है समझो की उसीके साथ पुरो की आत्मा भी ठिकाने पहूँच गयी…. ” !! स्वत: अमृताचे शब्द आहेत हे….

अमृताच्या सगळ्याच नायिका एक नवा प्रश्न सजगतेने सोडवणाऱ्या आहेत…. प्रस्थापितांविरुद्ध बंड करणाऱ्या तर कधी वेगळीच वाट शोधून पहाणाऱ्या…. मात्र त्या ’चुकीच्या’ कधिही नाहीयेत . म्हणजे अमृता एक शहाणपण स्वत:च बाळगून होती म्हणावं लागेल ….. एक सुधारक विचारांनी भरलेलं सुंदर मन होतं तिच्याकडे. तिची बुद्धिमत्ता तिच्या कथेतल्या नायिकांच्या संवादातून आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेतून दिसून येते.

स्त्री आणि पुरूषाच्या नात्याबाबत अमृताने तिच्या एका कथेतल्या नायिकेद्द्वारे मांडलेले विचार खूप काही सांगणारे आहेत….

मलिका नावाची ही नायिका आजारपणात दवाखान्यात जाते आणि तिथे एक फॉर्म भरून देतेय ….

वय विचारून झालय , आता डॉक्टर तिला विचारतो ’ तुम्हारे मालिक का नाम ?? ’ .. तेव्हा ही नायिका त्याला खडसावते मी घड्याळ किंवा सायकल नाहिये मला मालिक असायला, मी एक स्त्री आहे….. चपापलेला डॉक्टर तिच्या पतीचे नाव विचारतो…  तेव्हा ती सांगते ,” मै बेरोजगार हूं ! ’”  …..

गोंधळलेला डॉक्टर पुन्हा सांगतो मी तुझ्या नोकरीबाबत विचारत नाहीये … तेव्हा ती त्याला समजावते ,” हर इन्सान किसी न किसी काम पर लगा हूआ होता है, जैसे आप डॉक्टर लगे हुए है, यह पास खडी हुई बीबी नर्स लगी हुइ है ….. इसी तरह जब लोग ब्याह करते है, तो मर्द खाविंद लग जाते है और औरतें बिवीयां लग जाती है ….. वैसे मै किसी की बीवी लगी हुइ नही हूं!!! “

आता मात्र पुरत्या गोंधळलेल्या डॉक्टरला मलिका समजावते , की जगातल्या सगळ्या व्यवसायामधे ’तरक्की’ होते, जसे आज मेजर असलेले उद्या कर्नल होतात, परवा ब्रिगेडियर होतात आणि मग जनरल !! मात्र ’शादी- ब्याह ’ च्या या पेश्यामधे तरक्की होत नाही !!!

’ यात कुठली तरक्की होणार ? ’ असा डॉक्टरचा प्रश्न येतो .

तेव्हा मलिका उत्तर देते , ” डाक्टर साहब हो तो सकती है , पर मैने कभी होती हुए देखी नही । यही कि आज जो इन्सान खाविंद लगा हुआ है , वह कल को महबूब हो जाए , और कल जो महबूब बने वह परसों खुदा बन जाए …. “

किती वेगळा विचार आहे हा…. किती खरा आणि ….. साध्या सरळ सहज शब्दात , एका गुंतागूंतीच्या नात्याला बांधू शकणारी अमृता म्हणूनच इमरोजसोबत विवाहाच्या बंधनात न अडकता एक यशस्वी सोबत करू शकली.

ध्यास घ्यावा वाटतो या लेखिकेचा आणि तिच्या साहित्याचा!!! ’वादळ ’ पेलावसं वाटतं हे ….

खूप लिहावसं वाटतं खरं तर पण आटोपतं घेतेय आता…

एक मात्र खरं की …..

अमृताचं वादळी विचारचक्राचं अत्यंत सात्विक असणं , वेदनेचं पचवणं आणि त्यावर मात करून येताना अजून परिपक्व होणं समजलं की अमृता मनापासून खूप आवडते …. ते समजण्यासाठी तिला वारंवार भेटावं लागतं … विशेष मेहेनत नाही लागत अर्थात, तीचं लिखाणं आणि विचार तशी भुरळ घालतात आपल्याला समर्थपणे  !! 

अमृताचीच एक कविता आहे …. समाजाच्या बंधनांतून स्वत:ला न जखडता स्वतंत्र जगणाऱ्यांच्या व्यथांबद्दल आणि प्रवासाबद्दलच्या तिच्या कवितेतल्या काही ओळी….

पैर में लोहा डले

कान में पत्थर ढले

सोचों का हिसाब रुकें

सिक्के का हिसाब चले ….

और लगा -

आज मैने अपने घर का नम्बर मिटाया है

गली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है

हर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है …..

गर आपने मुझे कभी तलाश करना है….

तो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ -

यह एक शाप है – एक वर है

और जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे

समझना – वह मेरा घर है !!!

And that solves the mystery … माझ्यामते जर समाजातल्या काही रुढी परंपरांविरुद्ध मी बंड करत असेन , चुकीला चूक म्हणू शकत असेन तर माझ्यात ’अमृताचा ’ एक अंश नक्कीच आहे…. तेच नातं आहे माझं तिच्याशी !!!

म्हणून वारंवार मलाही तिला म्हणावसं वाटतं असावं ’ मै तेनू फिर मिलांगी ’ :)

_ लोकसत्तामधे ’फिरूनी पुन्हा भेटेन मी ’ नावाचा रवींद्र पाथरेंचा एक सुंदर  लेख इथे आहे.

( फोटो जालावरून साभार !! )

नवी नजर आणि स्वर्गाचा रंग !!!

मराठी किंवा हिंदी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांचे चित्रपट मी पहावे असे काही ठरवून झाले नाही, माझा सगळा कारभार ’सहजच’ या सदरात मोडणारा :).  त्यात या दोन भाषांव्यतिरिक्त इंग्लिश सिनीमे पहाणे म्हणजे ते हिंदीत डब झालेले किंवा सबटायटल्स असलेले असेच आत्ता पर्यंत जणू ठरलेले होते. उगाच कान ताणताणून संवाद ऐकायचे कशाला, हा मुळचा आळशी स्वभावाला धरून असणारा प्रश्न पडायचा आणि मी इतर भाषिक चित्रपटांच्या वाटेला जायचे नाही.त्यामूळे पाहिलेल्या इंग्लिश चित्रपटांची यादी तशी लहानशीच होती / आहे !!

गेल्या सुट्टीत भारतातून येताना विश्वास पाटलांचं ’नॉट गॉन विद द विंड ’ पुस्तक सोबत आणलं…. इतकं अभ्यासपुर्ण नजरेने चित्रपटांकडे पहाता येतं हे नव्याने समजलं !! गणेश मतकरींचा ’आपला सिनेमास्कोप ’ हा ब्लॉगही असाच सिनेमा कसा पहावा हे शिकवणारा. आमचा आनंद पत्रेही त्याच्या सिनेमा कॅन्वासवर अधून मधून रंग भरत असतो :) … कोणे एके काळी हेरंब आणि विद्याधरही लिहीत असत, असे वाक्य इथे टाकण्याचा मोह आवरता घेतेय (वाक्य टाकून झाल्यावर ;) ) !!!

थोडक्यात काय आजकाल मी साहेबाच्या चित्रपटांपासून फारकत घेतल्यासारखी वागत नाही. अधेमधे एखादा चित्रपट पाहून टाकते :)

तर याच नव्या दालनात एक लोभस दालन अचानक उघडलं माझ्यासाठी…. ’माजिद माजिदी’ नावाचं !!! एखाद्या प्रवासाला निघावं, वाट ठरलेली नसावी पण नेमक्या स्थळी जाऊन पोहोचावं असं काहिसं झालं या ठिकाणी !! माजिदीचा ’बरान’ पाहिला आणि लक्षात आलं हे वेगळं रसायन आहे…. हे झेपेल, आवडेल आपल्याला !!!

मी माजिदीबद्दल लिहावं किंवा एकूणात एखाद्या चित्रपटाबद्दल लिहावं असा काही माझा अभ्यास नाही हे माझं मत होतं, अजूनही आहे तरिही आज एक नोंद करावी वाटली म्हणून ही पोस्ट!!!

The Color of Paradise ”  …. Rang -e- Khoda … नावाचा सिनेमा पाहिला आणि पोस्ट लिहायला घेतली … हे परिक्षण नाही हे आधि नमूद करायला हवे …. हे आहे एक भारावलेपण !!

मोहम्मद हा आठ वर्षाचा मुलगा… जो पाहू शकत नाही !! तो तेहेरानच्या एका शाळेत शिकतोय . ब्रेल लिपीत भराभर लिहू वाचू शकणारा मोहम्मद हा चुणचूणीत मुलगा आहे. शहर आणि त्या अनूषंगाने येणारे टेपरेकॉर्डर, मोबाईल फोन हे बारकावे लहानश्या प्रसंगातून सामोरे येतात. शाळेला सुट्टी लागलीये, सगळ्या मुलांचे पालक येऊन मुलांना घेऊन गेलेत…. मोहम्मद एकटा आपल्या वडिलांची वाट पहातोय ….. तितक्यात बाजूच्या झाडांमधे पक्ष्याचं एक पिल्लू घरट्यातून खाली पडलय…. त्या पिल्लाला लहानसा मोहम्मद ज्या आत्मियतेने घरट्यात परत ठेवतो ते फक्त पहात रहावे. गंमत म्हणजे डोळ्यांनी सिनेमा पहाताना आपली नजर मोहम्मदच्या त्या पक्ष्यावर अलवार फिरणाऱ्या बोटांबरोबर फिरते. घरटं मोडू नये म्हणून अलगद्पणे घरट्याला तो चाचपडत शोधतो तेव्हा त्याची धडपड मनात उतरते.

मोहम्मदचे वडील (हाशेम ) येतात , ते मात्र त्याला परत नेण्यास उत्सूक नाहीत …. शाळा मोहम्मदला ठेवून घ्यायला तयार नाही… तिथे सुरू होतो मोहम्मदचा घरचा प्रवास. वाटेत बसने, घोड्याने होणारा प्रवास अखेर एका निसर्गरम्य प्रदेशात येतो…. बसमधल्या खिडकीतून मुठीत हवा पकडू पहाणारा मोहम्मद अत्यंत निरागस दिसतो. या प्रवासात जाणवते मोहम्मदचे निसर्गाशी असलेले नाते…. पाण्याच्या प्रवाहातल्या गोट्यांमधे त्याला अक्षरं सापडतात. पक्षी त्याला साद घालतात… डोळ्यांनी पाहू न शकणारा मोहम्मद निसर्गाशी मनमूराद संवाद साधतो.

मोहम्मदचं गाव, घर , त्याच्या विलक्षण सुंदर दिसणाऱ्या लहानश्या बहिणी (हानये आणि बहारें ) , त्याची कष्टाळू आजी सगळच अतिशय मोहक आहे. गावातल्या शाळेत डोळस मुलगा चुका करत वाचतोय एक धडा, आणि मोहम्मदने मात्र ब्रेललिपीत तोच धडा न चुकता खणखणीत वाचलाय…. त्यावेळेस शिक्षकाच्या चेहेऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव पहाण्याजोगे. शिक्षकाबरोबरच आपण आधिच मोहम्मदच्या हुशारीच्या, जिवंतपणाच्या प्रेमात पडलेलो असतो. त्याच्या नजरेने जग पहायला लागलेलो असतो.

मोहम्मदच्या आजीची त्याच्यावर असलेली माया ठायीठायी दिसते…. तिचे सुरकुतलेले हात मोहम्मदला जगातले सगळ्यात सुंदर हात वाटतात. नातवासाठी राबणारे ते हात खरोखरीच खूप सुंदर आहेत. पुढे ही आजी जेव्हा घरातून निघून जाते तेव्हा रस्त्यात पाण्याबाहेर पडलेल्या तडफडणाऱ्या मासोळीला उचलून पुन्हा पाण्यात टाकते. हा प्रसंग चटकन विसरला जाणारा नाही…. सुरूवातीच्या एका प्रसंगात मोहम्मद चिमणीच्या पिल्लाचे प्राण वाचवतो आणि त्याची प्राणप्रिय आजी इथे तसाच एक जीव वाचवते…. त्या दोघांचं ते घट्ट नातं पहाताना paradise या शब्दाची महती समजते.

चित्रपटात एक महत्त्वाची किनार अजून आहे….

मोहम्मदच्या वडिलांना , हाशेमला दुसरं लग्न करायचं आहे …. त्यांना मात्र हा मुलगा ही या लग्नातली अडचण वाटतेय. एका साध्या कामगाराची  ’मुलगा ’ आणि  ’वैयक्तिक स्वार्थ ’ यातली घुसमट साध्या साध्या प्रसंगातून आणि वाक्यातून पुरेपुर उतरलीये. लग्नाची वेळ जवळ येते म्हणून मोहम्मदला दुसऱ्या गावातल्या एका सुताराकडे त्याचे वडिल सुतारकाम शिकायला पाठवतात. हा सुतार स्वत:ही अंध आहे. या सुताराला मोहम्मद सांगतो , “देवाचं माझ्यावर प्रेम नाही नाहितर त्याने मला डोळे दिले नसते का ?? ” एका लहानश्या मुलाचे ते प्रश्न, समज अस्वस्थ करून टाकतात. हाशेमच्या नजरेत वारंवार दिसणारी स्वत:बद्दलची ’दया’ आणि मोहम्मदचा राग करण्याबद्दल स्वत:ची वाटणारी लाज आणि चिड जाणवतात अगदी!!

मोहम्मदची आजी जग सोडून जाते तेव्हा तिच्यासमोर क्षणभर एक दिव्य प्रकाश चमकतो…. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत मोहम्मदचे वडिल त्याला परत आणायला पोहोचतात. येताना एका प्रचंड वेगाने वहाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ ते येतात. प्रवाहावरचा लाकडी पुल ओलांडताना अचानक तो पुल खचतो आणि मोहम्मद त्या पाण्यात पडतो. त्यानंतरचे त्याच्या वडलांच्या चेहेऱ्यावरचे भाव  अतिशय सुंदर उमटले आहेत. एका क्षणासाठी थबकलेले , ही आपली मोहम्मदपासून सुटका आहे का अश्या विचारात पडलेले वडिल पुढच्या क्षणी प्रवाहात वेगाने वहाणाऱ्या मोहम्मदच्या मदतीला धावतात. चेहेऱ्यावरची ती अगतिकता स्पष्टच सांगते वडलांच्या मनातलं मोहम्मदबद्दलचं प्रेम…. अक्षरश: खिळवणारा क्षण …..

प्रवाहाच्या प्रचंड वेगापुढे हाशेम आणि मोहम्मद हारतात ….. बऱ्याच वेळाने हाशेम शुद्धीत येतो , समुद्रकिनारी  काही अंतरावर त्याला मोहम्मद निश्चल पडलेला दिसतो….. त्याची हालचाल बंद आहे आणि तितक्यात पक्ष्यांचे आवाज येताहेत… आपल्याकडे, कॅमेऱ्याकडे हाशेमची पाठ आहे , त्याच्या कुशीत मोहम्मद विसावलाय…. मोहम्मदचा हात, त्याची बोटं आपल्या दिशेला आहेत…. पक्ष्यांच्या त्या आवाजाला मोहम्मद पहातोय , त्याची बोटं हलताहेत…. एक सुरेख सोनेरी प्रकाश त्याच्या हातावर चमकतोय ….. The Color of Paradise , निसर्गाच्या इतका जवळ असणारा मोहम्मद आता नंदनवनातल्या पक्ष्यांशी बोलतोय!!!

.

.

आपण स्तब्ध… शांत !!!

का आवडला हा सिनेमा इतका की पोस्ट लिहावी वाटली ???

मला वाटतं माजिदीचं अत्यंत साधेपणाने कथा सांगणं हे महत्त्वाचं कारण आहे !! आपली आजी लहानपणी परिची कथा सांगते नं, खूप आवाज नसतो त्यात…. आजीच्या उबेत विसावलेले आपण आणि हळूवार कानावर येणारा तिचा आवाज ….. त्या आवाजाची आठवण माजिदी करून देतो आपल्याला आणि जिंकतो !!! उगाच मोठमोठे संवाद नाहीत, रडारडी नाही… हाणामारी तर नाहीच नाही….. मोहम्मद नकोसा वाटण्याचा , आणि त्याचबरोबर या नकोश्या वाटण्याबद्दल अपराधीपणाने मन पोखरलं जाण्याचा त्याच्या वडलांचा संयत अभिनय असो की मोहम्मदला दुर नेलं तेव्हा मला त्याची नाही पण तुझी काळजी वाटतेय हे त्राग्याने स्वत:च्या मुलाला सांगणारी त्याची आजी असो , अभिनय जेव्हा अभिनय वाटत नाही तिथे आपण गुंतत जातो. लहानश्या प्रसंगातून मोठी कथा सांगण्याची या दिग्दर्शकाची हातोटी खरच वाखाणण्याजोगी आहे.

मोहम्मदला दिसत नाहीये तरिही तो खूप काही पहातो त्याच्या हाताने, कानांनी !!! आपण ते सगळं अनूभवू शकतो अगदी त्याच्याबरोबर… परंतू त्याचवेळेस सभोवतालचा हिरवागार सुरेख परिसर, फुलांचे, झाडांचे, पानांचे , पक्ष्यांचे , आकाशाचे अप्रतिम रंग पडदा व्यापून मनात उतरतात. Paradise ’नंदनवन ’ हा शब्द लागू पडतो इथे. फुलांपासून बनवलेल्या रंगाचे धागे , अनेकरंगी गालिच्यांची आठवण करून देतात. इराणचे गालिचे इतके सुरेख का असतात हे पटतं !!

हा संपुर्ण चित्रपटच एखाद्या कुशल हाताने विणलेल्या रंगीबेरंगी गालिच्यासारखा आहे…. मोहम्मदच्या नजरेने म्हणजे त्याच्या हाताने पाहिल्यासारखा तो आपल्याला तितकाच तरल , हळूवार जाणवतो ….  “दिसतो  ” !!!  भावभावनांचा गालिचा !!! ही नजर नक्कीच मिळवण्याजोगी….. त्याने स्वर्गाचे, नंदनवनाचे रंग पहायला हरकत नाही!!

माजिद माजिदीच्या चित्रपटांच्या, दिग्दर्शनाच्या प्रेमात पडलेय मी सध्या …. एक नवी नजर मिळतेय, एका जुन्या ओळखीच्या माध्यमाची एक नवी ओळख होतेय …. तसेही कोणाला नकोय सांगा बरं वाऱ्याची अलगद, मंद झुळूक , पकडता न येणारी तरी जाणवणारी आणि मोहात पाडणारी … !!! :)

(फोटो जालावरून साभार !! )