रात्र वैऱ्याचीच आहे..(अजुनही :) )…..

इथे एक मुख्य पात्र (ज्याचा उल्लेख ’मुपा’ असा करणार आहे मी पोस्टेत… ) आणि तीन साईड पात्र आहेत…. सगळीच मंडळी एकसे एक ’पात्र’ असल्यामुळे ’पात्रं’ हे नाव हा नाटकाचा अंक बिंक असला कुठलाही विचार मनात न ठेवता पात्रतेनुसार ते पात्र या नावास पात्र आहेत….. मुपा म्हणगे गौराई हे आमचे साडेतीन वर्षाचे ’पात्र’ असुन बाकि पात्र इथे नाममात्र आहेत J

उल्लेखानुसार :

मोठी चादर- मुपाचे आई-बाबा (कोणिही एक , प्रसंगानुसार)

छोटी चादर- ईशान

——————————————–

—गुडनाईट मम्मा…

—गुडनाईट बाबा…

—गुडनाईट ईशान…

(’गुडनाईट गं बये!!! किती वेळा गुडनाईट म्हणशील , झोप ना आता…’ गेल्या निदान अर्ध्या तासाची मुपाची चुळबूळ सहन करणाऱ्या ईतर तीन पात्रांपैकी कोणितरी एक वैतागून म्हणेल!!!)

—गुडनाईट गौई sss ….

(आता सदर मुपा स्वत;लाच रोज गुडनाईट म्हणतं हे माहित असले तरी उर्वरीत तीन पात्रांपैकी कोणितरी एकजण अजाणतेपणे खुदकन हसेल…… संसर्गजन्य रोग हा, त्वरीत लागण होऊन उरलेले दोन पात्रही दबक्या आवाजात हसतात….. त्या पिकलेल्या खसखशीचा वास मुपाच्या जाणत्या नाकाला लगेच लागतो…. आणि मग सुरू होते तीन नॉट सो फ्रेश [जवळपास अर्धझोपे {अर्धमेले तसे अर्धझोपे} ] मेंबर्स Vs एक ताजातवाना मेंबर अशी बॅटिंग!!! )

— हा कोणाचा हात आहे ????

(चढ्या आवाजात एक निरर्थक प्रश्न!! मुपाचा अंधारातला तीर….. )

—माझा !!! (तिघांपैकी एक!!)

— माझा म्हणजे कोणाचा ???

(एरवी अगदी चाहुलीवरून माणूस  नक्की ओळखणारं मुपा आता वेड पांघरून बसलेय…. परिस्थितीची गरज ओळखणे म्हणतात याला!! J )

–’बाब’ चा!!!!

(इथे ’बाब’ म्हणजे मुपाचा बाबा {मुपीचा ’बाबा’ नाही… सुज्ञ ओळखतीलच तसे 😉 } असे असते…. कारण शाळेतल्या मित्रमंडळींमधे कोणा एका डॅडी नावाच्या प्राण्याचा डॅड झालेला मुपाला नुकतेच समजलेले असते त्यामुळे त्याच जातीच्या आपल्या घरातल्या प्राण्याचे नुकतेच ’बाबा’ वरून ’बाब’ असे बारसे झालेले असते!! हे कमी की काय म्हणून कहर म्हणजे ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर हॅज अ डॉंकी ’ ह्या गाण्याचा अपभ्रंश होऊन ते , ’ ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर ईज अ डॉंकी’ असे नुकतेच आमच्या कानावर पडलेले असते. बाबाची ढोर मेहेनत अक्षरश: सार्थ ठरवण्याकडे मुपाचा कल असावा…. मुलांचे कल शाळेत दिसतात हेच खरे!! 😉 )

— अरे पण ’बाब’ म्हणजे कोण??

What is your name, BABY???

(अच्छा म्हणजे प्रस्तूत ’हात कोणाचा’ ह्या प्रश्नाचे उत्तर ’या व्यक्तीचे मुपाशी नाते काय’ असे द्यायचे नसुन ’सदर व्यक्तीने आपले नाव सांगावे’ असे आहे होय!! हे बहुतेक आपल्या बापाला समजले नसावे असे मुपाला वाटल्यामुळे प्रश्नात स्पष्टीकरणरूपी भर हा ईंग्लिश उपप्रश्न असावा…. बरं या उपप्रश्नाच्या शेपटाला ’BABY’ नावाचा झुपकाही होता… )

— यांच्या या नर्सरीतल्या बाया ते उगाच पन्नासवेळा लाडं लाडं बेबी बेबी करतात कशाला??? मला ना अजिबात आवडत नाही हा प्रकार!!!! ( ’बाब’ आता नावं न सांगता भलतचं बोलत होता पण सुर चढा लागल्यामुळे मी ’कुल ईट baby’  हा माझ्या मनात आलेला डायलॉग मनातल्या मनातच बोलते …. उरलेल्या दोन चादरी [ म्हणजे दोन पात्रं] चादरीत तोंड खुपसून सौम्य आवाजात जरा खि-खि करतात.. )

—तुम्हारा नाम क्या है BABY ??? (मुपा अजून प्रश्नावर ठाम J )

— अss मि ss त ssss….. झोपतेस का आता, का मारू दोन रट्टे??? (आवाजात वाढीव राग!!! )

—ऐसे क्यूँ करते हो BABY??? मै तुम्हारी बहन हूँ ना!!!

(मुपा आता फुल्ल फॉर्मात येतयं हळूहळू… हिंदी रूळतयं नुकतच जिभेवर त्यामूळे ’बेटी’ ला ’बहेन बिहेन’ घोळ मनापासून अगदी….. उरलेल्या दोन चादरींमधली खसखस वाढतेय….. “मम्मा ती बेटीला बहेन म्हणतेय…. ती काही सिस्टर आहे का बाबाची, डॉटर आहे ना!!!” लहान चादर मोठीला [चादरीतल्या चादरीत—बाहेर तोंड काढायची सोय नाही ] “गप बस!! लहान आहे ती…. चालू दे त्यांचे…. तू झोप सकाळी शाळा आहे ना!!! “ मोठी चादर लहानीला कुजबुजत… )

—अंगात येतं का गं रोज रात्री तुझ्या??? गौरे झोपतेस आता का बोलावू पालीला??? येss गं पालं sss

( बाब भडकलाय आता…. डायरेक्ट पालीची धमकी…. भात्यातले साधे बाण कामाचे नाहीत हे उमगलेय त्याला… ब्रम्हास्त्र बाहेर….)

— पाsssलं गुडनाईट!!! (मुपा ऐकायला तयार नाही….. आज पालीलाच झोपायला सांगितलेय….. उरलेल्या दोन चादरी जरा जोरात ख्या-ख्या!!! )

— और ये लगा सिक्सर.. नटराज फिर चॅंपियन!!! ( मोठी चादर अर्थात अस्मादिक न रहावून बोलून गेलेले…. )

— हो का!!! मग शिस्त लाव ना जरा कार्टीला तुझ्या….आईची जबाबदारी असते ही!! ( बाबाला थर्ड स्टेजमधली झोप आल्याचे चिन्ह …. मुपा काहितरी बडबडतेय् यावरही…)

—पर्र्फेक्ट!!!! शिस्त ’आईची जबाबदारी’ बद्दलच्या विधानाची ग्राह्यता गृहीत धरता तुमच्या बेशिस्तपणाचे खापर कुठे जाते याचा विचार करून उपरोक्त स्टेटमेंटात अमेंडमेंट करायची असेल तर तुझ्या त्या वर्तनाला मी बेजबाबदार म्हणणार नाही… गो अहेड!! ( सोडते की काय मी…… मी का ऐकून घेऊ???)

— झोपा रे सगळे….डिस्टर्ब नका करू!!! (लहान चादर… पेंगुळलेला आवाज )

— हो ना , हा बाब नुसती ’जागमोड’ करतोय माझी!!! (मुपा कधी कधी चुकून बरोबर बोलते ते असे…. तिची ’जागमोड’च होत असते कारण ती ९९.९९% जागी असते )

— मम्मा आपण पालीला दगडाने मारू ना!!! मी तर आता बिग होणारे… टॉल होणारे…. ( आयला ’बाब ’ सुटला…. आता गाडी माझ्यावर वळलीये….चौफेर हल्ला, नव्या दमाने आता!!! पहिल्यांदा पस्तावा गप्प न बसल्याचा…. छे छे!!! सबुरी सहनशक्ती कश्याशी खातात तो पदार्थ बनवायला हवाय आता!!!

— अनन्याssss….. अनिश ssss sit properly!!! (मुपा मधेच जोरदार…. स्वत:च्याच तंद्रीत…. पुन्हा एक मोठी आणि एक लहान चादर नाटकातल्या नव्या अनोळखी पात्रांच्या एंट्रीने गोंधळलेले….. या प्रकाराची मला दिवसात सवय असल्यामूळे, ही दोन पात्र आणि असे अनेक ही मुपाची शाळासोबती असून मुपा सध्या त्यांच्या टीचरच्या भुमिकेत आहे या माझ्या खुलाश्यावर दोन्ही चादरी गुडूप!!)

(ईकडे मुपा हवेत हातवारे करत गम्य-अगम्यच्या सीमारेषेवर ईंग्लिशमधल्या हिंदीमधल्या मराठीत काहितरी सुचना देतेय!!! ’कौन बनेगा करोडपतीच्या’ नव्या जाहिरातीतला पाय हवेत उंचावून, “पापा अकबर का बाप कौन था??” विचारणारा मुलगा आठवतोय आता मला… आणि मग ’कोई भी सवाल छोटा नही होता’ असे सांगणाऱ्या अमिताभला मुपा सांभाळायला द्यावी एक दिवस असा विचारही मनात येतो!!)

— आता ’दिन’ नाहिये ’रात’ आहे…. रातला अंधार असतो पण मला सगळे दिसतेय… (मुपा आवर आता!!!)

—हंम्प्टी डंम्प्टी फॅट ऑन अ फॉल …. (मुपा रंगलेय आता कवितेत… सॉरी पोएमांमधे….. कोणिही कुठल्याही दुरुस्त्या सुचवत नाहीये… हंम्प्टी डंम्प्टी फॅट तर फॅट, मरो मेला!!! अचानक माझ्या गळ्यात दोन नाजुक हात… मुपाचे मातृप्रेम जागृत!!! )

— आजा मेरी बेटी!! (पुन्हा हिंदीत चमत्कार…. माँला बेटी केलेले होते!!!! ’हं’ यावर माझी मजल नाही… कुठे तोंड उघडून अवलक्षण करू पुन्हा!!)

—हॉलमधलं भुत झोपलं आता!!! (अचानक भलतचं चॅनल आता हे….. बरं रिमोट मुपाकडे….  )

—अरे पिल्लू आपल्याकडे भुतं नाहिये बेटा… आपल्याकडे देवबाप्पा आहे किनई!! (बोलल्याशिवाय अगदीच रहावलं नाही मला!!!)

—अगं मम्मा!!! ते देवाचेच भुतं आहे!!! ( देवा रे वाचव रे मला….. हॉलमधलं भुतं झोपवलसं मग बेडरूममधलही झोपवं रे… रेहेम खुदा रेहेम!!)

——————————————-

(शांतता….. झोपली की काय???)

— माँ पाणी दे…. (आता ईतकी वटवट केल्यावर घसा कोरडा न पडता तर नवल!!!)

(मुपा आणि मी जागे…. उरलेल्या दोन्ही चादरी एव्हाना स्वप्नांच्या राज्यात!!! मुपाचा एकपात्री प्रयोग सुरूच!!)

पाणी—- शू— बडबड— प्रश्न— पोएमा—हातवारे— ईत्यादी ते इत्यादी….. (म्हणजे कॅपिटल ईत्यादी ते स्मॉल इत्यादी…)…….

————————————————–

(शांतता… पुन्हा एकवार …… मी गोंधळात मुपा झोपलं बहूतेक!!!)

वळून पाहिल्याशिवाय रहावत नाहिये…. मुपा गाढं झोपलयं!!!! प्रचंड प्रचंड गोड दिसतयं!!!! देवाच्या भुतासारखं!!!! लंबे लंबे बाल फेसवर आलेत…. मुपाला आवडत नाहीत ते तसे आलेले….. मी हलक्या हाताने ते मागे सारतेय….. उघड्या चिमुकल्या हातावर हळूवार गाल टेकवतेय….. पिल्लू जागरण होते रे!! तूझाही आराम होत नाही, बाकिच्यांचीही ’झोपमोड’ वगैरे काहीबाही मनात येतेही…… पुन्हा जाणवते ती शांतता…. देवाचे ते भुतं, शाळेतले ते सवंगडी सगळेच गायब एकदम होतात मग!!! नको वाटतेय ही शांतता….. पिल्लू तू अशीच रहाशील ना… अशीच रहा गं!! मोठेपणी ना ’रात’ झाली की नाही दिसत सगळं…. देवाचे भुतं पण सोडून जाते मग…. चिवचिवणारी चिमणी आहे तोवर घरटे जागे आहे माझे….. रात म्हणं दिन म्हणं, बाब म्हण, बहेन म्हण काहिही म्हणं…. आणि हो बच्चू कुठलीही पाल बाबा कधीही येऊ नाही देणार तुझ्याजवळ!! घाबरू नकोस कधिही!!! मी आहे ना तुझी ’बेटी’ तूला जपायला…. डोळे पाणावतात बघ तुझ्यापायी नेहेमी…

मग मुपाच्या कपाळावर ओठ टेकवत मी हलकेच म्हणते….

—–गुडनाईट बच्चा!!!

—-गुडनाईट तन्वी!!!

( याआधिची वैऱ्याची रात्र इथे आहे….)

Advertisements

घासफूस…..

 माझ्यासारख्या शुद्ध शाकाहारी 🙂 (अभिमानाने.. ) असणाऱ्या माणसाच्या खादाडीचे आणि काय वेगळे नाव असणार …. खरे तर या नावामागे मोठा ईतिहासही आहे…कळेलच…पोस्ट संपत असताना ’घासफूस’ हेच नाव का तेही कळेल 🙂

साधारण ८ दिवसापुर्वी रोहणाला सांगितले होते की खादाडी पोस्ट ’सहजच’ पर आ रही है!!! पण जातीचा खादाड व्यक्ती किंवा खादाड जातीचा व्यक्ती खादाडीवरचा विचारही थोडक्यात कसा करेल…….  तेव्हा या पोस्टचा (जी की एका भागात आवरायची नाही माझ्याच्याने… हो मी आहे बऱ्यापैकी खादाड…. 😀 ) विचारच करतेय गेले काही दिवस !!!!

मला आणि माझ्या मामाला आमची आजी नेहेमी रागावते…… ’अन्न समोर दिसले की लागली यांना भूक!!! ’ ही तिची आमच्याबाबत कायम तक्रार!!! स्वयंपाकघरात चक्कर मारली की समोर दिसतात तिने करून ठेवलेल्या लोणच्याच्या बरण्या….. लालबुंद रंग आणि त्यावर तेलाचा मस्त तवंग…. भूक न लागते तर जाते कुठे , मग आम्ही दोघे ईमाने ईतबारे दोन ताटं घेतो आणि फन्ना उडवतो!!! यात आमचा काहिही दोष नाही (आमच्यामते!!!)….. एक मात्र खरे की उगाचच म्हणजे भूक अगदी लागलेली नसतानाही केवळ मोहापायी आम्ही खाऊ शकतो 🙂

माझे लग्न होण्यापुर्वी आजीने मला दहावेळा बजावले होते, आता सासरी जायचेय तेव्हा एका बैठकीत जेवायची सवय लावून घे!! उगा आपले दर दोन तासाने हातात ताट….. दरवेळेस चिमणीसारखे  उष्टावायचे की लगेच पुन्हा ’मला भूक लागली’ म्हणायचे 🙂 ई. ई. ….. आता हेच सगळे माझा नवरा मला म्हणत असतो!!!

लहानपणापासूनची खादाडी आठवायची म्हटली तर आईच्या हातचे अनेक पदार्थ हीच सुरूवात होते!!

पण या पदार्थांबरोबर मला आठवते ते ’पिंटी’चे घर…. आमच्या कॉलनीतल्या सगळ्या बंगल्यांसमोर असणारे हे लहानसे कौलारू घर!! त्यातली धाकटी लता (तिचे खरे नाव मला आमच्या दहावीत समजले 🙂 ) माझी मैत्रीण!!! तिच्या घरी किती वेळा जेवले असेन मी हिशोब नाहीये… काकू कायम त्यांच्या तिनही मुलांच्या ताटाशेजारी माझे ताट घ्यायच्या….. जेवण व्हायचे पण आमचा खरा ईंटरेष्ट होता घराबाहेर….. त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या चिंचेच्या झाडाचा कोवळा पाला खाणे ही खरी पोटभरी होती…… तो पालाही हिरवा नव्हे पोपटी रंगाचा , आहाहा!!! बरं हायजिन वगैरे विचार मनालाही शिवायचे नाहीत…. पाला धुवून खाणे म्हणजे त्याची चव घालवणे सरळसरळ….त्यामुळे तो तसाच कोंबला जायचा!!! वर जमिनीत रोवलेल्या ’रांजणातले’ थंडगार पाणी….. मला पिंटीचे बाबा ’बकरी’ म्हणायचे 🙂 … मला मात्र ते ऐकू यायचे नाही कारण मी तो आंबटगोड पाला खाण्यात मग्न!!!! 

अर्थात बकरी हे माझे नाव माझ्या बाबांनीही ठेवलेले होते ,(सतत बडबड म्हणजे बॅ बॅ करणे हे त्याचे कारण असावे )…. पण त्यांच्याबरोबर भाजीबाजारात जाण्याचा माझा मात्र कायम हट्ट असायचा!!! सगळीकडे वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांच्या पाट्या घेऊन बसलेले शेतकरी आणि बाजारातला तो कोलाहल…सगळ्या भाज्यांचा, फळांचा संमिश्र वास….. भाजीबाजार हे प्रकरण मला सोनाराच्या दुकानापेक्षा किंवा साड्यांच्या दुकानापेक्षा जास्त आवडते!!! सगळा कसा जिवंत मामला असतो इथे!!!

चिंचेचा पाला जसा खायला आवडायचा (आता आवडतो की नाही हा खरचं एक प्रश्न आहे….. किती लहानसहान गोष्टी मागे रहातात नाही मोठे होताना….अचानक एक दिवस मागे वळून पहावे तर वळणावळणावर किती जागा सापडतील जिथे आपण आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आनंदाने क्षणभर रेगांळलेलो असतो……) तसेच आणि एक आवडता प्रकार म्हणजे ’गुलमोहोराचे फुल’…….

हे देखील चवीला आंबटगोड…..लाल केशरी पाकळ्यातल्या ज्या पाकळीवर पांढरे नक्षीकाम तो राजा बाकिच्या राणी पाकळ्या…… हे एक माझे अत्यंत आवडते झाडं!!! विलक्षण सौदर्य आहे या झाडात….. हिरवेगार झाड त्यावर तलवारीसारख्या शेंगा आणि कहर म्हणजे लालभडक केशरी फुलांचे मुकुट….. अजुन काय हवे!!! असेच आणि एक आवडते झाडं म्हणजे पळसाचे ….. तेदेखील म्हणजे एकदम दिल के करीब बिरीब…. हं पण त्याचे काही पानं फुलं कधी मी खाल्लेले नाही बरं…नाहितर म्हणाल या बकरीने ते ही चाखलेय का!! नाय बा!!!

आजच्या पोस्टमधे मी किचनमधे शिरणारच नाहीये…. ती लामण नंतर लावते…. आज मुक्तपणे भटकायचेय मला माझ्या बालपणात…. त्याच नाना उचापती पुन्हा आठवायच्या आहेत नव्याने!!!!! तेच क्षण पुन्हा जगायचेच स्वत:साठी….. (तेव्हा तुम्ही न घाबरता हे चऱ्हाट वाचायला हरकत नाही 🙂 )……

शाळेच्या मधल्या सुट्टीत मला रोज २० पैसे मिळायचे , नंतर ते ५० पैसे झाले…पण पुरायचा तो खिसामनी!!!  डबा कसाबसा कोंबला की आम्ही धूम पळायचो ते चिंचोके विकणाऱ्या मावश्यांकडे !!!! भाजलेले चिंचोके, आणि उकडलेले चिंचोके …… आई गं !!! आठवणी तरी किती आहेत या!! मधल्या सुट्टीतल्या चिंचोक्यांचा स्टॉक  उरलेल्या तासांना संपायचा…काय कला होती ती…. सरांचे लक्ष आपल्याकडे आहे समजले की अजिबात तोंड हलवायचे नाही आणि पाठ वळली की खाऊ गट्टम!!! शाळा सुटल्यावर घरी जाताना पुन्हा चिंचोके घ्यायचे स्पेशल आईसाठी!!!!  चिंचोके विकणाऱ्या मावशी हे प्रस्थ होते….. नववारी पातळातले भारदस्त व्यक्तीमत्व छप्पर असलेल्या हातगाडीवर मांडी घालून बसलेले असायचे…. (आताही असेल… आता त्या मावशीची सुन किंवा लेक असेल..पहायला हवे एकदा!!!)……

 चिंचेचे झाड हे बहूगूणी आहे हे माझे मत आहे….. मस्तपैकी गाभूळलेल्या चिंचा, दोन्ही प्रकारच्या म्हणजे पोपटी गर असलेल्या किंवा लाल गर असलेल्या !!!!चिंचेबरोबर तिखट आणि मिठाचे मिश्रण या मावश्या द्यायच्या ते प्रमाण सुगरणींनाही साधत नाही… खारट तरी होईल नाहितर तिखट तरी!!!  😉 तेच सत्य आवळ्याबाबत… पण आवळे कोणते तर ते पण झाडावरचे… ताजे ताजे!!!!!

याच खादाडी सत्रात (म्हणजे डायरेक्ट फ़्रॉम झाडं, विदाऊट प्रोसेसिंग…… तोडो…खाओ…..) पुढचा प्रकार म्हणजे फुलं खाणे….

यात फुलांचा राजा गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या…. ’गुलकंद’ वगैरे होईपर्यंत इथे धीर कोणाला!!!!!! आणि एक म्हणजे झेंडूचे फुलं…. याच्या सगळ्या पाकळ्या उपटून त्या झाडात टाकायच्या (तेव्हढचं झाडाला खतं…आणि आपल्याला पुण्य!!!) आणि मग त्यातलं खोबरं खायचं!!!!!

परिक्षेला जाताना तुळशीचं पानं खायचं… परिक्षाच का आणि मी एरवीही बरेचदा तुळशीला शरण जायचे!!!!!! ’गुढीपाडव्या’ला कडूनिंब आणि गुळाचा जो छोटासा लाडु मिळायचा तो देखील मी आवडीने खायचे!!!!!! भाज्यांमधेही पालेभाज्या म्हणजे फ्येव्हऱ्येट……त्याबरोबरच नुसता परतलेला मुळ्याचा पाला, फ्लॉवरचा पाला हे पण चालते!!!!!!! 🙂 ही डाएट पोस्ट होत चाललीये हळूहळू…….

याच उचापतींमधे एकदा मी आणि माझ्या मामेभावाने कण्हेरीच्या पानामधे

खायचे गंध मिसळून तो ’विडा’ खाल्ला होता, दादाने तर खाण्याचे नाटक केले पण आम्ही तो गिळंकृत केला….. आणि मग जे आजारपण काढले ते ८ दिवस दवाखान्यात राहून संपवले!!!!  😦

त्याच्या भरपायीसाठी आम्ही खुपशे बदाम फोडून त्यातला गर खाल्ला आणि शेजाऱ्यांच्या झाडाचे काजुगर (चोरून) खाल्ले…….

थोडक्यात काय (मोठ्ठी पोस्ट लिहायची आणि शेवटी ’थोडक्यात” असे लिहायचे…हेहे) तर माझे लहानपणचे खेळ हे झाडावर चढणे, गवतात फिरत फुलपाखरं पकडणे हे असल्यामुळे ’घासफुस’ या प्रकाराशी सख्य असायचेच!!!!

तसेही रोपटी असो, गवत असो की मोठे वृक्ष असो…. झाडाझाडाच्या बुंध्यात, पानांच्या आकारात, विविध रंगात, फुलांत (आणि चवीत) ईतके वैविध्य असते की नतमस्तक व्हावे!!!! मी तासनतास झाडांचे सौंदर्य पहात बसू शकते….. निसर्गाची ही मनसोक्त उधळण मानवनिर्मीत ईतर कोणत्याही मनोरंजनाच्या साधनापेक्षा जास्त मनमोहक आणि खिळवून ठेवणारी……..

पानं, फुलं, फळं, बिया सगळ्या प्रकाराचे खाद्य आहे :D……….आजची पोस्ट ही पालापाचोळ्याची उद्या फळांवर हल्ला!!!!!  🙂

(फोटो जालावरून साभार!!!!)

I’ll get back to u on this…………..

‘मम्माssssss’..चिरंजीव

’ओ रे….’ अस्मादिक किचनमधे कुकर लावताना..

’इज करिना कपूर सेक्सी??????’ ..चिरंजीव

’हं.. कायsss ?’ ..गरगरणे या प्रकाराच्या पहिल्या स्टेजमधली मी.

तीनताड उडाले होते मी…हातातले तांदुळाचे भांडे सुटून गेले तर नंतर बरचं निस्तरावं लागेल येव्हढा विवेक शाबुत राहिल्यामुळे ते वाचले.. सध्यातरी या अनपेक्षित प्रश्नाची उकल करावी या हेतूने ते भांडे ओट्यावर आदळून आमची स्वारी लेकाकडे…त्याला गाठून आधी त्या प्रश्नाचं उगमस्थान शोधलं..त्यांच्या कुठल्यातरी लाडक्या गाण्याच्या यू-ट्युबवरील व्हिडिओ खाली म्हणे ही   उपरोक्त ’शंका’ उपस्थित करण्यात आलेली होती. आता दचकण्याची वेळ पुन्हा माझी होती…(लहान मुलांच्या कुठल्यातरी सिनेमाच्या गाण्यात हे असले आगाउ प्रश्न विचारणाऱ्या महाभागाला गाठावे असेही वाटले क्षणभर!!!!

बरं ’हो ’ म्हणू की ’नो ’?? हा ’मम्मीकी सुनू या टम्मीकी’ छाप प्रश्नही मनात आला…त्यातही काहीही उत्तर दिले तरी ’सेक्सी’ म्हणजे काय गं मम्मा????? ही शंका चिरंजीव विचारणारच होते लगेच. ’गोची’ म्हणजे काय याचा प्रत्यय येतो बरेचदा…

प्रत्यक्षात माझी हे असले काही स्वत:शीही विचारायची प्राज्ञा आजवर झालेली नाही… असल्या संदर्भाला 1/ Cos C वर माझी मजल गेलेली नाही… पण आज म्हणजे!!!
’आहे का ती सुंदर किंवा छान?? ” मी त्याला विचारले..
’She is not so beautiful Mumma….तुला पण नाही ना आवडतं…”तो म्हणाला.

श्रावण बाळं ते माझं..तात्पुरती सुटका झाली होती…पण वरवरच्या मलमाने मुळ प्रश्नाला फक्त बगल दिलेली होती.

आजकाल हे प्रसंग वरचेवर येताहेत…स्वैर सुटलेला मिडीया, शाळेत अठरापगड ठिकाणची ’हुशार’ मुलं…टि.व्ही.,ईंटरनेट, पेपर्स…कश्याकश्यापासून वाचवणार आपण मुलांना…बरं ही पिढी अतिशय ’ज्ञानी’ आहे… प्रत्येकच पालकांपेक्षा मुलांची पिढी बदललेली असणार, प्रगत, आधुनिक असणार हे मलाही समजतेय…फक्त हा प्रश्नांचा ’सामना’ मात्र नुकताच जरा जास्तच हातघाईचा व्हायला लागलाय.. एक विचार असाही येतोय की आपणच विचारपूर्वक व्यवस्थित मुलांच्या वयाचे भान ठेवत, त्यांना झेपेलसे सांगावे म्हणजे उगाच मित्रवर्यांकडून मिळणाऱ्या माहितीची खरी बाजू त्यांना समजेल… त्यांचा आपल्यावर विश्वास असतो तेव्हा त्याच आधारावर आपण त्यांना चर्चेत घ्यायला हवेय.. मगर इस थेअरी का प्रॅक्टिकल उतना इझी नही है!!! अचानक जेव्हा असे हल्ले होतात तेव्हा त्यांना त्याच सफाईने तोंड देण्याइतका माझा सराव अजून झालेला नाहिये..

3 Idiots मधला सीन आठवतोय बोमन इराणी ऍस्ट्रोनॉट्स पेन दाखवतो आणि त्याची महती गातो…आमिर कमाल भाबडा चेहेऱ्याने त्याला विचारतो की स्पेसमधे पेन नाही चालत तर पेन्सिल्स का नाही वापरत…त्यानंतर बोमनच्या चेहेऱ्यावर जे भाव येतात तसलेच काहिसे भाव माझ्या चेहेऱ्यावर आजकाल वारंवार येतात आणि मग मी म्हणते…’I’ll get back to u on this…’

मध्यंतरी कधीतरी देवापुढे दिवा लावत होते आमचा ’रांचो’ बाजुला उभा होता हात जोडून…आणि अचानक म्हणाला, ” मम्मा काड्यापेटी ला Sticks Box किंवा Fire Box न म्हणता मॅचबॉक्स का म्हणतात…” ..मला खरचं त्यापुर्वी नव्हता पडला हा प्रश्न…मग उत्तर शोधले की ’मॅच’ या शब्दाचा अर्थ ’असे काही तरी की ज्यामुळे आग लावता येते” असाही आहे…………तोवर मात्र माझ्या चेहेऱ्यावर ’I’ll get back to u on this…’ चेच भावं होते…

आजकाल तर मुलांबरोबर टि.व्ही. बघण्याचीही माझी हिम्मत होत नाही…सॅनिटरी नॅपकिनच्या चपला किंवा छत्र्या पहाण्यापेक्षा नकोच ते !!!!! तरीही सुटका नसतेच, मागे याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला काहीतरी असेच वेळ काढू उत्तर देउन मी स्वत:साठीच खड्डा खणला होता… मग उलट त्याने तो भुंगा जास्त लावला, शेवटी पुन्हा ये रे माझ्या मागल्या होण्यापेक्षा त्याला झेपेल असे समजावले…आणि जादुची कांडी फिरल्यासारखी तो प्रश्नही गायब आणि ते कुतूहलही…अनेक जाहिराती येतात तश्या याही येतात आणि जातात… पण मूळ मुद्दा रहातोच की अडलय का काही या जाहिरातदारांचेच, उगाच नसत्या माहित्या अगदी सखोल दाखवणे खरचं कितपत गरजेचे आहे???? लहान मुलांच्या रिऍलिटी शो मधले ऍंकररूपी आगाउ बडबडीचे यंत्र पाहिले की तर हे प्रश्न अजूनच वाढतात…बरं त्यांच्या त्या बेफाम वटवटीला दाद देण्यात त्यांचे जन्मदातेही असतात.. मग मेले आम्हीच का असे चिकित्सक असेही वाटते कधीतरी!!!

मला कळतयं हा काही ’भारत-पाक’ मुद्दा नाहीये…..पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ना ती गतं आहे…… हळूहळू पिल्लू मोठं होतय, प्रश्नांच स्वरुपही बदलतय…आज प्रश्नपत्रीकेच्या गट ’अ’ मधे असणाऱ्या मला गट ’ड’ ही सोडवायचा आहे…आणि नुसतं पास न होता नंबरही काढावा लागेल… तेव्हा मन कसून कामाला आणि विचाराला लागावं लागणार आहे…

काल लेकीचा तिसरा वाढदिवस…परवा झोपण्यापुर्वी अचानक माझ्यावर चिरंजीवांनी पुन्हा प्रश्नहल्ला केला…’मम्मा आता माउ तीन वर्षाची झाली …मग आता पुन्हा बाळ कधी होणार … :)’. क्षणभर राग आला मग तो गेला पण विचार आला की या प्रश्नाला काहीबाही उत्तर देउन सुटका होइल खरी पण या प्रश्नोत्सर्गी प्राण्याबाबतचे एक सत्य असेही आहे की प्रश्न आणि उत्तर यांची चेन रिऍक्शन असते…म्हणजे एका प्रश्नाचे उत्तर पुढचे २/३ प्रश्नांचे जनक असते…तेव्हा मी त्याला म्हटले, ” झोप बाळा तू आता…I’ll get back to u on this……..” 🙂

थोडक्यात काय तर हे ’पार्सल ’ त्याच्या बायकोच्या ताब्यात देण्यापूर्वी मेऱ्येको बहूतच बडे बडे प्रश्न सोडवणेके है ऐसा दिखता है!!!!!!!!!!!!!!!

ता.क. करिना कपुरच्या नावाला दिलेली लिंक ही तिच्याबद्दल अधिक काही माहिती (!) देणारी असेल असे वाटून तिला क्लिक केल्यावर जर भ्रमनिरास झाला… I can get back to u on that …कारण त्यात माझा दोष नाही .. (कोणे एके काळी तिचा उल्लेख असलेली एक पोस्ट मी टाकली होती ती ज्यांनी वाचलेली नाही त्यांनीही ती वाचावी हा एकमेव उदात्त 😀 हेतू माझ्या मनी होता..)

रात्र वैऱ्याची आहे……………..

रात्रीचे साधारण पावणे अकरा वगैरे………………..नवरा नेहेमीप्रमाणे, ’ मला दिवसभर पीसी ला डॊळे लावून बसावे लागल्यामुळे माझे डोळे शिणले गं!!!!!!!!!!!!!!!!!!!’ चा नारा पुकारून कधीच गुडूप झोपलेला…………….मी मात्र दोन्ही मुलं कधी झोपतील याची वाट पहात त्यांना दटावत पडलेली……………..याच सीनच रोज रिपीट टेलिकास्ट होतय हल्ली आमच्याकडे……………..

मग मुलाला आणि लेकीला ,”हळू बोला रे बाबा उठेल”………….. ही तंबी देत देत त्यांच्या अनेक शंका कुशंकांना (यात लघू आणि दीर्घशंका देखील) मी तोंड देत असते…………….अश्या वेळची माझी हतबलता लक्षात घेता मुलाने चाणाक्षपणे ओळखलेले असते की ही बाई काही रागावत नाही आता………….मग त्याची जिज्ञासूवृती अगदी भरात येते!!!!!!!! आणि सुरु होते अखंड प्रश्नावली……………….

परवाचा सगळ्यात गहन प्रश्न होता, “जगात सगळ्यात पहिल्यांदा Good morning, good night , good afternoon, good evening…असे कोण म्हणाले?” आता हे कोणाला तरी माहितीये का?……मी सांगितले की चांगली लोक असे एकमेकांना म्हणतात. मग उपप्रश्न आला की जसे good morning म्हणजे सुप्रभात,good night म्हणजे शुभरात्री तसेच दुपारला म्हणायचे किंवा संध्याकाळला तर शुभदुपार की सुदुपार वा सुसंध्याकाळ का शुभसंध्याकाळ…..मुळात Good’ हा एकच वर्ड आहे ना मग हा ’सु’ आणि ’शुभ’ चा घोळ कशाला?ते पण फिक्स नाही..कधी म्हणायचे ते!!! काय म्हणुन उत्तर देणार…..उगाच रागावले काहितरी आणि झोपवला दामटून………………..

असाच येतो मग गोष्टीचा तास………बरं या गोष्टींच्या सुरूवातीला श्रावण बाळ अगदी पेटंट…….ही गोष्ट ऐकल्याशिवाय माझा श्रावण बाळ पुढे सरकत नाही…….श्रावणबाळ, दशरथ, शाप, वनवास वगैरे स्पष्टीकरण सुरु असते………….’कावड’ या शब्दाने तर मला ईतके पिडलेय की विचारता सोय नाही…..श्रावणाला उद्योग नव्हता…..आजवर अनेकदा मी त्या कावडीचे चित्र काढलेय…..शेवटी एकदाचा राजा दशरथ श्रावणाला बाण मारतो…तो त्याच्या हार्ट्ला लागतो and then he died……………अशी ती गोष्ट सोप्पी वाटत असताना लेक सांगते, “मम्मा बिचारा श्रावण आपण त्याला vaselline द्यायचे का?”

मग आम्ही हळुहळू लाकुडतोड्या, हिरण्यकश्यपु वगैरे फिरत असताना……मधेच लेक म्हणतो, ” OK आता आजची न्यू स्टोरी सांग…………………..” मग एक न्यु स्टोरी कशीबशी त्याच्या कानात ओतली की तो खुश आणि मीही या विचाराने की हुश्श!!!! सुटले एकदाची!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! पण नाही ना मुळात रात्रच वैऱ्याची आहे नं मग………कुठल्याही बाबतीत आपण दादापेक्षा कमी नाही हे पटवण्याच्या अट्टहासाला पेटलेली माझी लेक दवंडी देते ,” मम्मा आता मला ’डॉगची’ गोष्ट सांग!!!!!!!!!!!!!!!!!!!”

हे सुरू होते मग तन्वीउवाच डॉगपुराण……. बरं हे सगळं होत असताना ’बाबा’ नामक आमच्या खऱ्या गोष्टीतला प्राणी घोरायला लागतो……मग आमची कुजबुजही खालच्या पट्टीत जाते…………….या माणसाला स्वत:च्या घोरण्याच्या आवाजाखेरीज टाचणी जरी पडली तरी झोप disturb होते………………….

पेंगुळल्या डोळ्यांनी आणि कदाचित या गोष्टीनंतर हे दोघं झोपतील या आशेने मी सुरु करते ती कथा!!!!!!!!!!!!!!!! एक किनई डॉग असतो…………………….पण श्रावणापासून ते या डॉगपर्यंतच्या हातघाईत माझे पानिपत झालेले असते आणि मला जाम आठवत नसते की हा डॉग पुढे काय करतो…………..

पण हरायचे नाही या ईरेला मीदेखील पेटते आणि कथा पुढे रेटते, “एक किनई डॉग असतो…………………….तो एका घराच्या बाहेर रहात असतो…..त्या घरात ना एक कॅट रहात असते………………एकदा काय होते मोठ्ठा पाउस येतो मग डॉगला थंडी वाजते तो जातो घराकडे……आणि दार वाजवतो…..टक टक टक….दार उघड बाई दार उघड कॅट कॅट दार उघड………………मग ती कॅट म्हणते थांब मी माझ्या बाळाला आंघोळ घालते…………”……..मग त्या बाळाची आंघोळ, तीटं बीटं, पावडर बिवडर यच्चयावत मेक अप होईपर्यंत चिरंजीव कसाबसा धीर धरतात आणि अचानक बोलतात ,”Mummaa u r cheating her……ही चिमणीची गोष्ट आहे………………”!!!!!!!

पारा चढतो माझा…….हुशार लेकीने ओळखलेले असते आपली माय आता रुद्रावतार धारण करतीये ……ती पण ब्रम्हास्त्र काढते ,” मम्मा टॉयलेटमधे शू करायचीये!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!” लेकाला दटावून आम्ही मोर्चा वळवतो……तिथे पोहोचल्यावर तिला साक्षात्कार होतो की आपल्याला शीपण करायचीये……………..मग माझ्या, “झाली का गं????” या प्रश्नाला तिच्या ,” होतेय!!!!” या उत्तराच्या ७/८ फैऱ्या झडतात……….आणि आमचा ताफा परत युद्धभुमीवर येतो!!!!!!!!!!!!!!!!!

ईकडे लेक किलकिले डोळे करून झोपेचे सोंग उत्तम वठवत असतो…….बाबाची अर्धी झोप झालेली असते……………माझ्या मनात विचार येतो याच्या ’पिछले जन्म के राज’ उलगडत गेले तर पुर्वजन्मांची ती साखळी ’कुंभकर्णा’ वर जाउन थांबेल……………..पण मी हे उघड बोलत नाही …न जाणो कुंभकर्ण उठायचा आणि रूप बदलून शंकर व्ह्यायचा आणि तांडव सुरू!!!!! नाहीतर लेक विचारायचा, “Mumma who is Kumbhakarn???????”

माझं ना एक स्वप्न आहे की दिवसभर उनाडणाऱ्या माझ्या मुलांनी स्वत:हुन अगदी आठ वाजता नाही पण दहा वाजता तरी स्वत:हुन झोपावे किंवा मला तरी मुलं झोपली नाहीत तरीही स्वत:ला झोप लागावी……………………………….

या दोहोंपैकी एक होत नाही तोवर ’रात्र वैऱ्याचीच आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!”

जागते रहो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!निगाह रख्खो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आरसा……..

“मम्मा मी बाबाजवळ झोपणार……………….” —-कन्यारत्न

 “नाही काल ही झोपली होती आज मी झोपणार……………” —चिरंजीव

“दादू काय आहे रे बाबाजवळ……तू लहानपणी मम्माजवळच झोपायचा. मला नाही करमत तूझ्याशिवाय!!!!!!काही नको बाबा बिबा, तू ये माझ्याजवळ…………तसंही माझं शहाणं शहाणं पिल्लूच माझं आहे!!!! बरं का छकूले दादा माझा आहे……………..”—-ईति आम्ही

 “नाही दादा माझा आहे…..”—-कन्यारत्न

“माझा…”—-मी

 “झोपा रे कोणीही कुठेही…………..”—–बाबाची एंट्री.

“ए बाबा तू थांब जरा!! दादा माझा आहे………..”—-कन्यारत्न

“ए छकूले आपण भांडतोय खऱ्या, पण खरा मेंबर यईल आणि आपल्या दोघींशी वाद घालेल या मालकी हक्कावरून!!!!!!!!!!!!!!!!!!!”——मी

आता छकूली शांत…तिच्या डोक्यावरून गेलय माझं वाक्य. पण चिरंजीव आडव्याचे उभे…………..

 “म्हणजे माझी बायको ना!!!!!…”—- चिरंजीव

आता मी गार!!!!

“काहीतरीच काय रे…चला चला झोपा….”—-मी

“मम्मा मला माहितीये माझी बायको आली की तिचे आणि तुझे भांडण होणार…. “—-चिरंजीव

 “तूला कोणी सांगितलं रे….मी आणि आजी काही भांडतो का????आम्ही नाही का म्हणत की आपण सगळे एकमेकांचे आहोत…we are a family म्हणून…..”—–मी

 “नाही माझ्या क्लासमधे एक फ्रेंड आहे माझा, त्यानी सांगितलय की आपली वाईफ आली की तिचे आपल्या मम्माशी फायटींग होणार…”—- चिरंजीव

“अच्छा!!!!! अजून काय सांगतो हा तुझा फ्रेंड????…….”—–मी चांगलेच चपापले होते मी, पण पाणी किती खोल आहे अंदाज नको यायला……..मुले हे आपला आरसा असतात. घरात काय चाललय याचा मस्त आढावा घेतात आणि चारलोकात शोभा करतात. आणि याबद्दलची जागरूकता मी पाळतेच पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्या सासूबाई पाळतात. मुलं मोठी होताहेत…ते तुम्हालाच बघून शिकताहेत, एकटेच रहाता…..जपा त्यांना हे त्या दर फोनवर सांगत असतात. आम्हा दोघींमधे मतभेद असले तरी ते टोकाचे नाहीत….आणि त्यांना मुलगी नसल्यामूळे म्हणा किंवा मी त्या घरची सून होउन आज ८-९ वर्षे झाली म्हणा पण नातं गोडं झालय हे खरे!!!आणि आज हे पात्र माझीच शाळा घेत होते. म्हणजे माझ्या घरच्या पोळीभाजीला बाहेरच्या पिझ्झाचा गंध!!!! सरसावून बसले मी!!!!!!

“मी त्याला सांगितल की आई-आजी नाही पण मम्मा-बाबा नेहेमी भांडतात…..”—- चिरंजीव

“कधी भांडतो रे आम्ही????? काहीही आपलं!!! शाळेत अभ्यासाला जाता ना तूम्ही……तुमची ती बाई काय करते….पाढे पाठ करायला सांग त्या मित्राला तूझ्या!!!!!!”—-नवऱ्याची रिएंट्री

“अहो let me handle!!!!”—-मी

“हे बघ रात्रीचे दहा वाजलेत, झोपा आता!!!! सकाळी उठत नाही मग तुम्ही दोघं!!!! उद्या शाळा आहे त्याला…. लावलीये बडबड दोघांनी उगाच!!!!”—-नवरा

 “थांब रे जरा…..बोलू दे आम्हाला!!!!”—मी

“हे बघा झालं तुमचं भांडण सुरू!!!!!!!”— चिरंजीव

“ह्याला भांडण नाही discussion म्हणतात रे राजा…..आता तू आणि मी पण बोलतोय ना, तसेच मम्मा बाबा बोलताहेत……”—-मी

आता ही असली discussions जरा रेग्यूलर आहेत आमच्याकडे, पण कार्ट्याने तेच पहावे…कठीण आहे.

 “असो, पिल्लू मजा आहे रे तुमची. आम्ही पण लहानपणी अश्याच खूप गप्पा मारायचो स्कूलमधे!!!! अजून काय म्हणाला तूझा फ्रेंड!!!!!”……मी

आता या असल्या गप्पा मारायला आम्हाला ईंजिनीयरींगचे सेकंड ईयर उजाडले होते…लटेस्ट ट्रेंड नुसार ’बावळट’ होतो आम्ही हा भाग निराळा. एव्हाना नवरा भुवया उंचावायला लागला होता….याच्या मते मी उगाचच लहानसहान बाबी सिरीयसली घेत असते………………

 “तो फ्रेंड म्हणे त्याचे पण पॅरेंट्स भांडतात!!!!”….. चिरंजीव म्हणजे हा सार्वत्रीक गुन्हा आहे तर!!!!

“पुढे……”……मी

“झोपा रे ssssssssssss………..”—-नवरा.

मी आणि पिल्लू एका चादरीत……मी विचारात, माझ्या आरश्यात हे वेगळेच प्रतिबिंब. काय करावे????? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे व्हायचेच…..एक वेळ अशी येणारच की आई वडीलांपेक्षा मित्रांचा प्रभाव जास्त असणार. ह्या पिढीत जाणिवा गेल्या पिढीच्या आधि येताहेत….सगळं मान्य….कळतय!!!!! आता हे सगळं ’वळायलाही” हवं………

 “मी त्याला सांगितलं की I love my mumma- baba, but I like my nani-babu more than anybody else!!!!!! अरे पण मम्मा तो जाम फनी आहे माहीतीये!!!!!”—-चिरंजीव

“आता हे काय मधेच!!!!…”—मी

“तुच तर विचारलं ना आम्ही काय गप्पा मारतो ते!!!!!!! Music sir म्हणाले मी चांगला म्हणतोय but I should practice more……., तू म्हणाली होतीस नवा पेन्सिल बॉक्स घ्यायचाय ना….कधी घेणार????”—–चिरंजीव

 “झोपा बच्चा उद्या शाळा आहे……”—-मी

सकाळी नवरा म्हणाला, “काय मग डिटेक्टिव्ह ! समजली का सगळी रहस्य!!!! उगाच त्याच्या लेखी महत्व नसलेल्या गोष्टींना आपणच अवास्तव खतपाणी घाला……”

मला याचं पटतय…पण मी नाही ईतकी तटस्थ राहू शकत……, “अरे अस्ं कस्ं आपण पालक आहोत ना त्याचे, समजायला नको त्याचे भावविश्व !!!!!”

 “अगं पण त्याला अशी प्रश्नावली झाडून काय साध्य होणार आहे?????”—–नवरा

“असं नाही जमत मला…..आपण मारे संस्कार म्हणायचे आणि बाहेर असा घोळ!!!! त्याचा गोंधळ नाही का होणार????”—–मी

“होईल ना!!!! होणारच….आपला नव्हता होतं????? यासाठीच तर आपण घरात पक्के रहायचे ना….त्याची मुळं पक्की असली की येउदेत ना वादळं वारे…….हबकून जाउ नकोस!!!!!”—–नवरा

“नाही हो नाही…..मला पटतं तुझं नेहेमी पण मला वाटलं काही सिरीयस की तू घे ते एकदम लाईटली!!!!!”…..मी

“मॅडम या केसमधे converse is also true!!!!!”—-नवरा

“झालास सुरू तू !!!! एक वाक्य खाली पडू देउ नकोस….”—-मी

“आपण पुन्हा भांडतोय का!!!!!”—- हसत हसत नवरा म्हणाला. आम्ही दोघेही हसायला लागलो ……

तेव्हढ्यात पिल्लू ओरडले, “मम्मा बाबा मी उठलोय….Good Morning!!!!!”

“Good Morning!!!!!” आम्ही एकदमच म्हणालो…………

सकाळच्या कोवळ्या उन्हात माझ्या आरश्यातले प्रतिबिंब स्वच्छ दिसत होते पून्हा!!!!!!!!!!!!!!!!!!!