कवितेचं गाव…

ते रस्ते, ती वळणं सगळं जूनं जूनं होत गेलं ,
कित्येक वर्षात तिथे जाणं झालच नाहीये खरंतर….
आणि
माझी कविता मात्र तिथेच सापडतेय ….

ऋतू बदलणं सवयीचं झालं कधीतरी ,
वाऱ्यापावसाचा कोवळा शहारा जरा फिकटलाच तसा…
तू आणि मी तसे भेटत नाही हल्ली हल्ली,
तरीही
माझी कविता मात्र तिथेच रहातेय ….

नव्या बदलांचं वावडं नाही तिला तसं,
माझ्याकडे येते ती अधेमधे… पाहुण्यासारखी …
नव्या गावी करमत नाही सांगणाऱ्या वडिलधाऱ्यासारखी,
परतून जाते मग आठवणींच्या गावी….

आपल्या पाउलखूणांचा मागोवा काढत ,
पावलांचे उमटलेले पुराण ठसे सांगत….
पुनश्च एकदा
माझी कविता तिथेच रमतेय  ….

देवळाच्या पायरीवर,
हात हातात घेऊन आपण पुढे निघालो….
चिरेबंदी दगडाची ती पायरी आहे जिथे ठाम,
तिथेच…
माझी कविता ’अजूनही’ तिथेच रहातेय !!

मायलेकं :)

“आई झोपलीयेस का ? ”

“काय गं ? झोपले नाहीये … पडलेय थोडा वेळ ….. ”

“मी पण पडू का इथे माझ्या बाळाला घेऊन ?? ”

” हो… ये.. फक्त बडबड करू नकोस…. झोपू दे त्या बाळालाही…”

” बघता बघता तीन महिन्यांच झालं बघ आई माझं बाळं ”

” हं  … झोपा आता …”

“हो हो !! अगं झोप येतेच आहे बाळाला पण झोपायचं म्हणून नाही त्याला… झोपायचं हं पिल्लू आता ’आजीशेजारी’ :)  ”

(तुझ्यावरच गेलय तुझं बाळ हे अगदी ओठांवर आलेलं वाक्य आईने गिळून टाकलं !! )

” आई अगं याचं स्किन बघ कसं गुलाबी गुलाबी दिसतय !! ”

” त्याचं स्किन गुलाबी दिसलं तर दिसू दे आणि आम्हाला तू जरा वेळ झोपू दे !! ”

“अगं दिसू काय दे ??? बघ की जरा उठून … ”

“अगं लहान मुलांच स्किन गुलाबीच असतं … ”

“माझं पण होतं का लहानपणी गुलाबी स्किन ?? ”

” हो होतं ”

“बघ माझं बाळ माझ्यासारखंच आहे :)

…………

…………

(शेजारी अगदी शांतता पाहून आईला वाटलं झोपलं की काय बाळ ?? … पहाते तर तिची मुलगी आणि बाळ गायब !!)

“अगं कुठे गेलीयेस त्या बाळाला घेऊन ?? ”

“कुठे नाही बाळाला टॉयलेटमधे आणलं होतं …”

“टॉयलेट ??? तुझा आवाज बेडरूममधून येतोय … ”

“अगं हो बाळं आहे टॉयलेटमधे, मी बेडरूममधेच आहे ”

( तीन महिन्यांच बाळ टॉयलेटमधे ??? एकटं ??? आईला प्रश्नच पडला तसा …. पण आईने ठरवले होते की या मायलेकरांमधे आपण पडायचे नाही… घालू दे काय गोंधळ घालायचा ते !! )

(एकदाचं ते टॉयलेटमधलं बाळ आणि त्याची आई परत आली… आता यांचे कपडे बदलणं , पावडर लावणे, सोबत झालेच तर अखंड बडबड करणे वगैरे सव्यापसव्य चालेल या विचाराने त्या बाळाच्या आईच्या आईने अगदी डोळे मिटले…. मनात विचार केला हे ’प्रकरण काही थोडक्यात आटोपणारं नाही, नको आता यांची लामण पहायला !!’ … तसंही या गदारोळात डोळ्याला डोळा लागणं मुश्किलही नही नामूमकिन आहे !! )

“आई ssssssss  गं  !!!”

“कायेsssss   गं ???? ”

“अगं ओरडतीयेस कशाला ?? तूला नाही हाक मारली ”

“म्हणजे इथे तुझी दुसरी कोण आई आहे मग.. तूच बेंबीच्या देठापासून ओरडलीस नं आईssss गं म्हणून ?? ”

” अगं ते ’हाक’ मारायचं आईssss गं नव्हतं…. ते आपल्याला ’दुख’ झालं की ओरडतो नं आपण ते वालं होतं ”

(बाळाच्या आईच्या भाषेतला बदल पहाता ती तिच्या खऱ्या वयात म्हणजे वर्षे पाचच्या भाषेकडे झुकायला लागली होती :) )

” हे वालं नं ते वालं …. दुख नाही आणि दु:ख असतं ते !! सॅड वाटलय का तूला, तसं सांगत जा गं बाई …. काय झालं आणि सॅड वाटायला ??? ”

“अगं बाळाचं स्किन बघ !!! ”

“सांगितलं नं एकदा असू दे ते स्किन गुलाबी म्हणून ”

“अगं ते नाही …. बाळाचं स्किन बघ पुर्ण फाटलय पाठीकडे :(

“स्किन फाट्लं ????? फाटलं का एकदाचं …. बघू …. ”

(खरच की गुलाबी टेडी बेअर बाळाच्या पाठीला चांगलीच चीर गेली होती .)

“आई स्किन फाटून आतून कापूस बाहेर आलाय बघ ”

“हं दिसला… ”

“आता काय करायचं गं ’मम्मा’ ??? ”

(चिमुकली आई प्रचंड केविलवाणी झाली होती !! )

“आता काही नाही… सुई दोरा घ्यायचा आणि शिवायचं ते बाळं ”

” हा सगळा कसूर दादाचा आहे, त्याला कितीदा सांगितलेय की टॉयबॉक्समधे माझ्या बाळांच्या अंगावर त्या रिमोटच्या कार टाकत जाऊ नकोस… त्यांचे ऍंटीना माझ्या बाळांना ’फाडतात’ ”

(छोट्या आईच्या तक्रारीत तथ्य होतं … ;) )

“मी सांगते हं दादाला…”

“तू कशाला मीच बघते बेत त्याचा , बाळ माझं फाटलय ”

(छोट्या आईच्या डोळ्यात टपोरे थेंब आणि त्या थेंबांआड निग्रह होता …. बरोबरच आहे लेकरांवर बेतलं की आई रणरागिणीचा अवतार घेणारच … )

” कुठेय तो दादा ??? ”

” हॉलमधे गेलाय… व्हिडिओ गेम खेळणार म्हटला होता थोडा वेळ ”

“ए दादाsssss ….. गेम खेळतोयेस तू ??? ”

(दादाचं काही खरं नाही आता !! )

“दादा sssss … मला का नाही बोलावलंस रे.. जा कट्टी !! ”

(व्हिडिओ गेमने सध्या बाळाच्या काळजीवर मात केलेली होती ….. :) हातातलं गुलाबी स्किनचं बाळ त्या आईने स्वत:च्या आईकडे हवेतून भिरकावलं आणि ओरडली …)

“मम्मा कॅच ..  तू सांभाळ आता बाळाला थोडा वेळ ”

:) :)

(बाळाला असं उडायला शिकवून चिमणी आई स्वत:ही उडाली होती !!  )

खऱ्या आईला खुदकन हसू आलं…. मगाचा आजीचा ’रोल’ बदलून आता आईला ’टेलरचा’ रोल मिळाला होता !!

तीने झोपेला राम राम ठोकला आणि सुई दोरा हातात घेतला…. त्या बाळाच्या फाटलेल्या स्किनला शिवायला सुई टोचली खरी पण कुठल्याही बाळाला अश्या वेदना झाल्या की आईला होणारा त्रास झाल्याशिवाय राहिला नाही !! ती सुई बाळाबरोबरच आईच्या मनाला टोचून गेली….

आईच्या लेकीने त्या टेडीरूपी बाळात प्राणप्रतिष्ठा केलेली होती !!

आईने ते बाळं हळूवार शिवून टाकलं… उगाचच आणि नकळत त्याला जोजावलं !!

ते ’टेडीरूपी’ बाळ कायम रहाणार नव्हतं… हा प्रसंग आईची मुलगी विसरणार होती तरिही आपण काय धरू पहातोय हे आईला समजत नव्हतं …. एक एक धागा, एक एक शिवण प्रेमाची विश्वासाची असावी का ?? की मुलांबाबत काहिही उसवलं तरी ,बिनसलं तरी ते जोडण्याचं सामर्थ्य आई पडताळून पहात होती … असेल काहितरी किंवा काहीच नसेलही , आईला सवय आहे असं विचार करत बसण्याची  !!

कदाचित आयूष्याच्या गांभीर्यावरचा हा पिल्लूसा ’उतारा’ आपल्याकडे आहे, असे वेगवेगळे रोल आपण करू शकतो की नाही याबाबत जग साशंक असलं तरी ते आपल्याइतके चांगले कोणीही करू शकत नाही असा विश्वास बाळगणारी मुलं आपल्याभोवती आहेत हे सोप्पंसं सत्य लक्षात ठेवावं आणि आनंदी व्हावं इतकंच !! :)

अनायसे आज ’World Daughters Day’ आहे आणि माझ्याकडे अशी एक चिमूकली आई आहे म्हणून ’मोठी आई’ खुश आहे !! :)

चिमण्या आईच्या चोचीतल्या गोष्टी विसरू नये म्हणुन ही एक पोस्ट !! :)

ता.क. समस्त आई-बाबांना आणि त्यांच्या चिमण्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा!! :)

(याविषयी आधि लिहीलेली पोस्ट ’लेकीच्या माहेरासाठी’ इथे आहे .)

अपनी तो पाठशाला…..

’शाळा सुटली पाटी फुटली’ म्हणण्याचे दिवस सरून २५ वर्ष झाली…. पाचवीपासून पुढे या गाण्याची आणि पाटीचीही साथ सुटली… कॉलेज शिक्षण संपूनही साधारण दशक उलटतेय… जीवन की पाठशाला मात्र नित्यनेमाने नवनवे धडे गिरवून घेतीये…. गमतीचा भाग असा की इथे अभ्यासाचा काही भाग ऑप्शनला टाकायचा ऑप्शन नाहीये!!! किंबहूना काही बाजूला टाकावेसे वाटत नाही…

ऑप्शनच्या प्रश्नाला मी घाटातले रस्ते म्हणते… त्यालाही एक कारण आहे …. शाळेतला एक तास कायम लक्षात राहिलाय माझ्या, सर काही तरी तोंडी परिक्षा घेत होते आणि अचानक म्हणाले, ” कुलकर्णी तू सांग घाटातले रस्ते वळणावळणाचे का असतात??? ” दचकले होते मी…. मनात आले हाय रे दैवा बाकि हजार प्रश्न सोडून सरांनी मला नेमका हाच प्रश्न विचारावा…. ’ हा एकच प्रश्न मला आवडलाच नाहीये…. मला नाही आवडत याचे उत्तर लिहायला… आता लगेच “का” असे विचारू नकोस… मलाच माहित नाही,पण मी हा प्रश्न ऑप्शनला टाकलाय हे खरे!! ” हे ज्या मैत्रीणीच्या कानात मी नुकतेच कुजबूजले होते ती गालातल्या गालात हसत असलेली तशीच्या तशी आठवते मला :) शाळा कॉलेजात एखादा प्रश्न/ धडा ऑप्शनला टाकल्याने विशेष काही फरक पडत नाही येव्हढे माफक शैक्षणिक चातुर्य आपल्यात आलेय याचे मला कोण कौतूक :)

या शाळेबाहेरच्या पाठशाळेत मात्र न चुकता कितीतरी गोष्टी कधी आवर्जून तर कधी नकळत यायला लागतात… कोणाचे अक्षर सुरेख तर कोणाची वही नीटनेटकी, मग आपण का नाही तसे असे वाटते…. लहानसहान ते मोठ्या गोष्टी मनात रुजत जातात… कधी चूकताना, कधी सुधरवताना एक तळ्यातून मळ्यातला क्षण येतो मग…. आपल्याला आपलं अक्षरं, वही ठेवण्याची पद्धतच नव्हे तर अस्तित्वं , व्यक्तिमत्त्व गवसतं!!! वय वाढतं आणि आणि शिकायच्या गोष्टींची व्याप्तीही….एक आई, पत्नी, स्त्री म्हणून असो की त्याचबरोबरचा एक स्वतंत्र व्यक्ती असो या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावरच्या पेपरमधे मात्र सगळेच गणितं सोडवायला लागतात….

विचारामागून विचार येताहेत मनात…. काही सुसंगत काही विसंगत वाटावे असे… काही असले तरी इथे मांडायचे हा नियम मोडायचा नाही म्हणून सरळ टाईप करतेय….आत्तापर्यंतची पोस्ट कधीचीच ड्राफ्ट्स मधे टाईप करुन ठेवलेली होती,जेव्हा लिहीली तेव्हा त्यात पुढे काय लिहायचे ते ही खरं तर विसरलेय मी … :) आज जिथून वाटले तिथून पुढे टायपायची सुरूवात केलीये, कारण या पाठशाळेतल्या दोन नव्या टिचर्सनी नुकताच एक एक तास घेतलाय विचारांचा….

नेटवरच्या भटकंतीमधे नुकतचं हाती लागलं ते अनिल अवचटांचं पुस्तकं “सुनंदाला आठवताना..”

अनिल अवचटांबद्दलचे पैलू त्यांच्या लिखाणातून, कलेतून, पुस्तकांमधून सामोरे आले होते पण  सुनंदाताईंबद्दल तितकेसे माहीत नव्हते…. अनिल अवचटांच्या पुस्तकातले त्यांच्याबद्दलचे उल्लेख, त्या ’मुक्तांगण” या व्यसनमुक्तीच्या संस्थेशी निगडीत आहेत वगैरे झाली जुजबी ओळख ….  डॉ.आनंद नाडकर्णींच्या ’शहाण्यांच्या सायकियाट्रीस्ट ’ मधे सुनंदाताईंबद्दल उल्लेख मैत्रीण- आई म्हणून आहे!! त्या खऱ्या सामोऱ्या आल्या त्या मात्र अनिल अवचटांचा ’सुनंदाला आठवताना..’ हा लेख वाचताना…. मनात स्थान मिळवलेल्या अनेक लेखांपैकी हा एक उत्तम लेख…. त्यात अवचटांचे सहज लिखाण भावले त्याहीपेक्षा कित्येक पट अधिक भावल्या त्या सुनंदाताई….

वाक्यावाक्यागणिक थक्क व्हायला होते कधी कधी…. एका आयुष्यात किती किती गोष्टी केल्या जाऊ शकतात याची प्रचिती आली!!! आयुष्य सार्थकी लावणे म्हणतात याला…. सहानुभुती दाखवणे तसे सोपे असते पण एखाद्या कार्याला वाहून घेणे म्हणजे काय हे सुनंदाताईंच्या वागण्यातून दिसून येते!!! शेवटच्या आजारपणाच्या काळात त्यांनी दाखवलेले धैर्य, चिकाटी, खचून न जाण्याची जिद्द सगळेच स्मरणात ठेवावे असे!!! मन नकळत झूकले सुनंदाताईंना सलाम करण्यासाठी!!!

असं काही वाचलं की नकळत आपल्याही मनात सकारात्मक विचारांचे तरंग उमटतातच…. मान्य जगात बरचं काही वाईट आहे, आपल्या आजूबाजूला चुकीचेही काही ना काही घडतेच आहे तरीही त्या सगळ्यावर आपल्यापुरती तरी मात केली जाऊ शकते….. आयुष्यात , जगण्यात अर्थ असू शकतो… एक निश्चित सकारात्मक ध्येय नक्कीच असू शकते वगैरे विचार दाटीवाटी करतात मनात….

असाच अजून एक ताजा अनुभव म्हणजे कौन बनेगा करोडपती मधली पहिली करोडपती महिला, राहत तस्लीम…. शिकायची खूप ईच्छा होती पण शिकता आले नाही असं म्हणणारी…. आयुष्यभर गृहिणीची भुमिका पार पाडलेली ही महिला जेव्हा अनेक अवघड वाटणारे प्रश्न लीलया पेलत होती तेव्हा खरचं कौतूक वाटलं तीचं…. केवळ गृहिणी आहोत म्हणून जगापासून फारकत घ्यावी लागत नाही… संधी मिळताच सामान्यातले असामान्यत्व जगासमोर येतेच… किंवा तूम्ही स्टार असालच तर कधी ना कधी चमकल्याबिगर रहाणार नाही ई. धडे कसे सहज मिळतात असे काही पाहिले ऐकले की….

राहत ला पाहिले आणि वाटले पडद्याआडूनही जग ईतके सजगतेने पहाता येऊ शकते…. आम्हाला तर ईथे अडचणींचा पाढा वाचायची सवय… यांना येत नसतील का त्या??? की यांना शिकवलेय परिस्थितीने लढायला…. पुन्हा एक असे व्यक्तिमत्त्व जे आपल्या आयुष्यात नकळत एक आशेचा किरण देते!!

हे धडे गिरवले की मग वाटेवर चालताना, विचार करताना केव्हा तरी एक विचार असाही चमकतो की नसेलही कदाचित माहित की घाटातले रस्ते का असतात वळणावळणाचे, ती वळणं मात्र न चूकता न थकता जिद्दीने जोमाने तरिही पार करता येतीलच की…. नाही का????

निकाल….

स्टार माझा चे निकाल नुकतेच जाहीर झालेत….

’सहजच’ ला विजेत्यांच्या यादीतले सहावे स्थान मिळालेय!!! खरं तर सकाळी जी-मेलला लॉगईन केले तेव्हा सगळ्यांचे अभिनंदनाचे मेल्स पाहिल्यावर या निकालाची आठवण झाली, आणि प्रत्यक्ष निकाल पाहून मनापासून आनंद झाला!! :)

संपुर्ण यादी इथे आहे…

ब्लॉग माझा-३ स्पर्धा : निकाल आणि विजेते ब्लॉग्स

स्टार माझा तर्फे,ब्लॉग लेखकांसाठी,प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धा घेण्यात आली होती. नुकतेच याचे विजेते जाहीर करण्यांत आले असून विजेत्यांची नावे व ब्लॉग्स खालील प्रमाणे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे.http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

दिड दोन वर्षाचा ब्लॉग कारकिर्दीत, मला लॅपटॉपवर काम करताना बघूनही चिडचिड न करणाऱ्या माझ्या नवऱ्याचे आज मला आभार मानायचे आहेत!! मला सातत्याने विषय पुरवणारी माझी मुलं , कायम प्रोत्साहन देणारे माझे आई-बाबा, बहिण,आजी, मामा सगळ्यांचे आभार!! स्टार माझाचे आणि परिक्षकांचेही विशेष आभार!!

या ब्लॉगवर प्रेम करणारे (किंबहूना या खर्डेघाशीला सहन करणारे) वाचक आणि ब्लॉगमूळे मिळालेले अनेक मित्र-मैत्रीणी यांचे मनापासून आभार!! तुम्ही सगळे आहात म्हणून ब्लॉगचा कोंबडा त्याचा तूरा मानाने मिरवतोय!!

तरिही यादीत स्वत:चे नाव शोधताना नकळत श्रीताई, हेरंब, रोहन, विद्याधर कुठे आहेत ते आधि शोधले जात होते…. श्रीताईचे नाव दोन्ही याद्यांमधे नाही हे पाहून सखेद आश्चर्य वाटतेय!!! हेरंब, रोहन , विद्याधर, नचिकेत उत्तेजनार्थ म्हणून पाहून देखील आनंद की आश्चर्य ह्या संमिश्र भावना मनात आहेत!!

परिक्षकांचे मतं आणि आपले वैयक्तिक मत यात अंतर असणारच असे जरी मान्य केले तरी माझ्या यशात काहितरी सुटलेय हा विचार मनात कायम रहाणार आता!!

सगळ्या विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन!!!

अ ब क ड ई…. किंवा दळण… किंवा काहिेही….

काल आठवलेला दिवाळीतल्या दिवसातला एक प्रसंग, आम्ही एका ओळखीच्यांकडे त्यांच्याच निमंत्रणानूसार गेलो होतो. नेहेमीप्रमाणे स्वागत छान पार पडले आणि गप्पा रंगायला लागल्या….. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकायला लागला तसा एक अस्वस्थपणा पसरत होता तिथे….. आम्हाला दिलेली वेळ आम्ही पाळलेली होती, मग चुकतेय काय ते समजेना….. घरातली लोकं घड्याळ पहात होते आणि मी चिडून नवऱ्याकडे पहात होते कारण सद्य मंडळी त्याच्या ओळखीची होती :) तेव्हढ्यात त्या घरातलं २२-२३ वर्षाचं शेंडेफळ मित्रांकडचा फराळ आटोपून घाईघाईने घरात प्रवेशलं….. त्याने आल्या आल्या आमची दखलही न घेता आधि टिव्ही लावला आणि त्याच्याकडे आनंदाने पहाणाऱ्या त्याच्या आईकडे पाहून विचारले, “सुरू नाही ना झालं अजून?? ” माँसाहेब उत्तरल्या, “नाही जरा आहे वेळ अजून!!!”

अजूनही आम्हाला उलगडा होत नव्हता की असे काय आहे ज्याबद्दल सारे घर टिव्हीकडे ईतके आतूरतेने पहातेय!! टिव्ही पहाण्याला माझा विरोध कधीच नाही, मी स्वत: भरपुर टिव्ही पहाते… अगदी सगळ्या सिरियलांची अपनेको लिंक होती है!!! पण निदान कोणिही आले तर टिव्ही बंद ठेवावा हा नियम मी पाळते, त्यात जर आपणच निमंत्रण केले असेल तर मुलांनाही सांगितलेले असते की टिव्हीसमोर बसायचे नाही!!! लेकिन कुछ साल पहलेके किस्से मे बात अलग थी….. आता मला राग न येता उत्सूकता वाटत होती की ये राज है क्या?? माझे प्रश्न बहुधा चेहेऱ्यावर दिसले असावेत कारण त्या घरातल्या काकांनी कसंनूसं हसत सांगितलं आज किनई अवंतिकाचा शेवटचा भाग आहे, यांना फार नाद हो सिरियलांचा….. आता आज ती अवंतिका काय निर्णय घेते हा प्रश्नच आहे बघा, जाते परत सौरभकडे की नाही राम जाणे!!!  :)

त्यादिवशी त्या फ्यामिलीचा जरा राग आला होता…. ठीक आहे पहायचाय ना तुम्हाला अवंतिकाचा शेवट मग आम्हाला का बोलावलतं वगैरे !!!! नंतर हा प्रसंग विसरलेही ….. काल मी स्वत:च टिव्ही पहात होते, कुठली एक सिरियल असे नाही सांगू शकत सॉरी….. म्हणजे मी पोळ्या आटोपल्यावर टिव्ही लावला तेव्हा लावला झी टिव्ही , हल्लीचं माझं आवडतं च्यानल….. पुर्वी नुसतं झी नसून ते झी मराठी होतं पण असंभवच्या वेळेसचं चऱ्हाट पाहिलं आणि सध्या मी माझा मराठी बाणा त्यागून भारतीयत्व स्विकारलयं….. आजकल हम बहूत हिंदीच देखते है, वैसे मधे कधीतरी आम्ही सारे खवय्ये देखते है, उसमेकी अट अभी भी वहीच है की प्रशांतबाबू दामलेच पाहिजे सुत्रसंचालन मे….. शेफ निलेश होंगे तो हम शेफली च्यानलवा बदलते है!!! रानी गुनाजीजी अगर कम बोलनेका गुन अपनावे तो हम शायद गुरूवार/शुक्रवार को भी मराठी देखेंगे!!! लेकिन सध्यातरी हिंदीच….

तश्या मराठीवर लज्जा सारख्या वेगळ्या विषयांवरच्या मालिका आहेत म्हणा, लेकिन हम हिंदीच देखते है ना आजकाल :)…. मधे कुठल्यातरी एका ब्रेकात (हो हे ब्रेक प्रकरण जाम सहीच आहे… च्यानलवाले कितीही पोटतिडकीने ओरडले की कुठेही जाऊ नका आम्ही आलोच बिलोच तरी मी का त्यांच ऐकू??? तेव्हा ब्रेकात रिमोट नक्कीच शिव्या घालत असणार एकूणातच तमाम प्रेक्षकांना, ब्रेकात रिमोटच्या बटनांवर तबला खेळला जातो अक्षरश:  ..) मी ’माझिया प्रियाला..” नावाचा प्रकार पाहिला होता , चकचकीत वातावरण आणि डायलॉग्स, आणि कटकारस्थाने का जाणे पण ओळखीची वाटली जरा मग उलगडा झाला हिंदी-मराठी बहेन बहेन हा नारा पुकारत एकता ताई इथेही दाखल झाल्यात!!!! हिंदी च्यानलांवर मराठी कुटूंब दाखवत त्या मराठीला सरावल्या असाव्या किंवा त्या सिरियलांचा टिआरपी पहाता मराठी लोक जास्त रिकामटेकडे आहेत हा निष्कर्ष त्यांच्या चतूर मनाने काढला असावा…. कारण काहिही असो मला हे प्रकरण पटले नाही तेव्हा नकोच ती सिरियल म्हणून ती बंद झाली!!!

तर >>>> काल मी स्वत:च टिव्ही पहात होते, कुठली एक सिरियल असे नाही सांगू शकत सॉरी.<<<< पासुन पुढे ….. तर वाळवंटात गॅससमोर उभे राहून पोळ्या करण्याचे दिव्य पार पाडले की मी अर्धा तास किचनकडे फिरकतही नाही, मठ्ठासारखी टिव्ही समोर बसते (म्हणजे असे काही कारण हवे असेच नाही , एरवीही मी माझ्या सिंहासनावर बसू शकते… टिव्ही समोरच्या आमच्या खुर्चीला नवरा माझे सिंहासन म्हणतो ;)) अगले जनम, पवित्र रिश्ता, ज्योती, तारक मेहेता, बात हमारी पक्की है, सास बिना ससुराल, बंदिनी , राम मिलाए जोडी, बाबा ऐसो वर….वगैरे वगैरे कोणतेतरी कार्यक्रम जोडीने, तिकडीने वगैरे चाललेले असतात… आपल्याला विषेश काही करायचे नसते  एका ब्रेकात (किंवा अधेमधेही) केव्हाही दुसरे च्यानल बदलायचे आणि सिरियली पहायच्या किंवा ऐकायच्या…. दोन्ही प्रकारात काही फरक पडत नाही कारण तत्सम सिरियलींमधे ऍक्टिंग केलीच पाहिजे अशी अट सहसा नसते त्यामूळे चलता है…. अपवाद तारक मेहेता आणि अगले जनम चा….

हे करत असताना माझ्या अचानक मनात विचार आला अरेच्या त्या दो सहेलियाँ नावाच्या सिरियलीचे काय बुवा झाले शेवटी??? आणि हाच होता तो टर्निंग प्वाईंट आणि पोस्टचा विषय!! :) नमनाला टॅंकरभर तेल ओतलेय ना :) दिवाळी आहे ना सध्या तळातळी चाललीये घरात म्हणून पोस्टेवरही अंमल तेलाचा जास्त हात :)

असो, आजका घर बैठे लखपती का सवाल है बेटियाँ, काशी, देवी, अंतरा, दो सहेलियाँ… , कसोटी जिंदगी की, १२/२४ करोल बाग, कुमकूम , वहिनीसाहेब, जुन्या वैतागात बनेगी अपनी बात ….. ह्या माझ्या माहितीतल्या आणि आत्ता आठवलेल्या काही आणि असल्याच अनेक सिरियलांचा शेवट कोणी पाहिलाय का?????? मी तर नाही पाहिलेला… मग जर सिरियलवाले एखादी सिरियल शेवटापर्यंत दाखवू शकत नाहीत, या दळणाचे पीठ पाडतात आणि पोळी करत ना्हीत तर ते दळण पहायचे का?? आहे किनई सच्चा सवाल???आज मला त्या अवंतिकाचा शेवट आमच्याकडे दुर्लक्ष करूनही नेटाने पहाणाऱ्या का्कूंचे कौतूक वाटले एकदम…. म्हटलं वर्षानूवर्षे आपण ज्या पीडेला अर्धा तास देतो आयुष्यातला त्याचा शेवट दाखवणे हे सिरियलवाल्यांचे कर्तव्य आणि आपला अधिकार आहे!!! :)

हे मी ईतरांना नाही स्वत:लाच विचारले काल!!! बरं मग राग आला तो स्वत:चाच कारण किती वेळ वाया जातो आपला आणि तरिही शेवट काय ईतपत उत्सूकताही असू नये आपल्याला… की या अनादी अनंत दळणाची सवय लागलीये आपल्याला…. म्हणजे अनेक जे अघोषित अलिखीत नियम असतात तसाच एक की सिरियलांना शेवट बिवट काही असू नये….

अपवाद मगा म्हटल्याप्रमाणे अगले जनम आणि तारक मेहेताचा….. अगलेजनम केवळ ताकदीच्या अभिनयासाठी आणि कथेच्या वेगळेपणासाठी , तर तारक मेहेता बद्दल काय बोलावे , अत्यंत हलकेफूलके पण उत्तम विषयांची सुंदर मांडणी यासाठी हे सोडले तर बाकि नुसतेच विषय वेगळे पण मसाला जुना असला प्रकार येतो समोर!!! राजा शिवछत्रपती दुसऱ्यांदा दाखवल्यावरही मी पुन्हा पाहिले आणि निष्कर्ष काढला महाराज आजच्या या रटाळ टिव्हीतल्या हिरोंमधेही राजा आहेत…. एकही दिवस पुन्हा कशाला पहायचे हे असे वाटले नाही ….

दरवर्षा अखेरी मनात आपण आढावा घेतो ना वर्षभर काय तीर मारलेत याचा, मी पण घेते…. मग मला नेमेची येतो मग पुन्हा हिवाळा (कारण वर्षाखेरी हिवाळा असतो ;) ) या नियमाने आ्पण वर्षाच्या फर्स्ट हाफ मधे जरा सद्वर्तनी झालो होतो, टिव्ही आणि तत्सम गोष्टींवर कमी वेळ घालवायचो हे आठवते, त्याचबरोबर सेकंड हाफात आधिचे नियम विसरत अंगात आळशीपणा वाढवत आपण खूप टिव्ही पा्हिला वगैरे जाणीव होते …. मग मी नित्यनेमाने टिव्ही डाएट आखते….

तरिही जाता जाता मनात येतेच की पुर्वीच्या म्हणजे मला आठवतात तेव्हाच्या सिरियल्स मधल्या (ज्या १३ भागाच्या असायच्या) तलाश, एक आभाळ संपलं, पार्टनर, ईंतजार,हमराही  जरा पुढच्यांमधे हसरतें, साँस, ई.ई. आठवतात मग…. पुन्हा जाणवते ठराविक भागांचे बंधन हवेच…. आणि त्यांना नसेल ते पाळता येत तर निदान आपल्या स्वत:वर तरी बंधन हवेच … कशाला पहायच्या ईतक्या लांबलचक, अनिर्णित, अशेवट असणाऱ्या कहाण्या ??? चूकून कथा लिहीणार होते पण ’कथा’ नसतेच काही या रवंथात…. नको नको नकोच ते!!!!

थोडक्यात या दिवाळीपासून पुन्हा एक जुनाच संकल्प नव्या दमाने, ” हम अब ये सिरियल्स कमच देखेंगे!!! हमको वैताग ज्यादा नको आहे!! मोजक्या सिरियली देखेंगे… नॅट Geo, डिस्कवरी वगैरे देखेंगे…ऍनिमल प्लॅनेट मे जब किडे-माकूडे, साप, माकडं नही होंगे तो वो भी देखेंगे !!!!ब्रेकमे गप्प बसेंगे ई.ई….  ” इथे स्मायली टाकणार होते पण संकल्पाचे गांभीर्य लक्षात घेता स्मायली टाळलेला आहे…. :) आणि तो इथे टाकलेला आहे!!!

आता या असल्या पोस्टला नाव देणे म्हणजे कठीण , पण एकता मातेच्या धसक्याने हल्ली मी ’क’लाच काय तर अ ब क ड ई सगळ्यालाच घाबरते म्हणून ते, किंवा सिरियलांचे (हवे तर मालिका म्हटले तरी चालेल, मी सिरियली म्हणते म्हणून ते लिहीलेय ) दळण किंवा अक्षरश: काहिही आपल्या आवडीनूसार :)

शेवटाचे महत्त्व मला वेळीच समजले नसल्यामूळे ज्या काकुंवर मी क्षणिक राग धरला होता त्या उदार मनाने मला माफ करतील अशी आशा ( कारण वर उल्लेखलेल्या अनेक सिरियलींची त्यांना लिंक असते मग त्या माझ्याशी त्याच विषयावर बोलतात :)) मनात धरत आता या पोस्टचा शेवट इथेच…

समाप्त!!

 

अनुत्तरीत…..

सिग्नलला गाडीच्या खिडकीच्या काचेवर तिने बाहेरून टकटक केले……… पावसाचे पाणी आत येणार म्हणून वैतागत मी काच खाली केली तर ती म्हणाली, “ताई गजरे घ्या ना!!!”

म्हटलं, “नकोत गं मला आणि भर पावसात तू तरी कुठे गं बसलीयेस गजरे विकत….. जा घरी सरळ!! ” ….

तेव्हढ्यात बाजूला बसलेली माझी आई म्हणाली, “कसे दिलेस गं???”

“दहाला तीन बाई….” ती म्हणाली.

“दहाला पाच दे…” आई म्हणाली…

“आई अगं पाऊस येतोय गाडीत आवरा लवकर …” मी मधेच ओरडले..

“ठीक आहे घ्या…” ती म्हणाली……

तिने गजऱ्यांच्या गर्दीतून गजरे मोजायला सुरूवात केली आणि मी पर्समधे सुट्टे पैसे शोधायला सुरूवात केली……तेव्हढ्यात सिग्नल सुटला आणि ड्रायव्हरने गाडी काढली….. बाहेरून ती जोरात ओरडली, “भाऊ पुढे थांब मी येते!!!! “………….

काहिही कळायच्या आत ती आमच्या गाडीच्या मागे धाऊ लागली…. गाडी अर्थात पुढे गेली… पण काच खाली करून मी मागे पाहिले तर ती जिवाच्या आकांताने धावत येत होती….चर्रर्र झालं मनात… ड्रायव्हरने गाडी थांबवली….. ती धापा टाकत आली…… येव्हढा वेळ तिच्याकडे साफ दुर्लक्ष करणारी मी पहिल्यांदा तिला नीट पहात होते….. माझ्या मुलापेक्षा फार फार तर २-३ वर्षानी मोठी होते ती………….सुन्न झालो आम्ही….. “उगाच बोलावले गं ताई हिला.. ” आई म्हणाली….

ती गाडीजवळ आली….. तिच्या हातातले गजरे घेतले… ठरल्यापेक्षा जास्त पैसे तिच्या हातात कोंबले आणि मनातले अपराधीपण कमी करण्याचा एक फोल प्रयत्न केला. गजरे आता कोणिही माळणार नव्हतेच….. ते तसेच पर्समधे ठेवले…… त्या फुलांच्या येणाऱ्या सुगंधापाठोपाठ मात्र मन एका अनामिक विषण्णतेने भरून येत राहिले….. एकच प्रश्न वारंवार येत होता मनात असे १० ऐवजी ५० रुपये दिल्याने तिचे प्रश्न सुटणार होते का??? आज माझ्या गाडीमागे धावणारी ही मुलगी उद्या ईतर कोणाच्या गाडीमागे धावणार आहेच की!!!! प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच फक्त….. उत्तरे खरच नाहीत की आम्हाला ती शोधायची नाहीत????

लेकाच्या मुंजीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेलो आम्ही…..वेळ अगदी दुपारी १२- १२:३० ची……. एक म्हातारीशी बाई पैसे मागत होती रस्त्याने……तिच्या शेजारून पुढे गेलो आम्ही…..तोच नवऱ्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली…. मी हसतच त्याला विचारले ,” आजींसाठी ना!!” तो ही हसला….. लेकाच्या हातात काही पैसे दिले आणि त्याला सांगितले त्या आजींकडे जा आणि त्यांना पैसे देऊन सांग की उन्हात फिरू नका, जेवून घ्या!!! त्याने तसे पैसे दिलेही…..आणि अचानक भररस्त्यात त्या आजीने वाकून त्याच्या पायांना हात लावला….. तो गांगरून मागे सरकला आणि पळून आला आमच्याकडे…….आम्हिही आजींच्या अश्या अनपेक्षित कृतीने भांबावलेलो, काय करावे सुचेना….. क्षणभर थांबलो तिथेच, ” मम्मा आपण पैसे नको होते द्यायला! ” लेक बोलला…..म्हटलं ,” हो बेटा पैसे नकोत द्यायला ..अजुनही बरेच काही करायला हवेय!!!”

काळाराम मंदिरात समाधानाने मन तुडूंब भरेपर्यंत दर्शन घेतले आणि निघालो…… चपला घातल्या ..आता निघणार तेव्हढ्यात कोणितरी ओरडले….”अरे बाबांनो पैसे द्या की, मी काय उगाच बसलेय का इथे??? ”

बाजूच्या गाड्यावर अंधाराच्या बाजूने बसलेल्या काकू/ आजी आम्हाला दिसल्याच नव्हत्या…. हसतच म्हटले, “अहो काकू दिसलाच नाहीत हो तुम्ही, आलेच हं!!… पर्समधून दहाची नोट दिल्यावर पुन्हा ओरडल्या, “सुट्टे द्यायला काय होते आता सुट्टे कुठून आणु बाई???? ” म्हटलं,” काकु नका आणु सुट्टे, उठू नका बघू ,बसा स्वस्थ…….” तशा अस्पष्ट हसल्या, डोक्यावर हात ठेवत पुटपूटल्या, “सुखी रहा बाई!!!”

मैत्रीण आली मला भेटायला….. तिच्याशी बोलत होते सगळं…. म्हटलं बदलायला हवय ना गं हे चित्र….. थांबायला हवय हे असं केविलवाणेपण!! अस्वस्थ वाटतं मग जेव्हा आपण दागदागिने, साड्या घालून मिरवतो तेव्हा…. अपराधी ओझे मनावर असल्यासारखं वाटतं कधितरी बघ!!!

ती म्हणाली, “अगं हे आजचे आहे का… आपल्या लहानपणापासून हेच प्रसंग थोड्याफार फरकाने बघतोय की आपण?? आज काय विशेष?? आणि कसले ते मोठे शब्द ’मनावर अपराधी ओझे’ म्हणे…… देणार आहेस का तुझे दागिने कुठल्या संस्थेला???? ” हसायला लागली ती……

तिला म्हटलं, “अगं मुद्दा दागिन्यांचा नाहिये गं , पण एक लहान जाणिव सगळ्यांना असली की फरक पडेल गं!”

काहिवेळाने ती तर गेली पण  एक अनुत्तरीत प्रश्न मागे ठेवून……काय करू शकतो आपण? की नेहेमीप्रमाणे वांझोटी सहानूभूती, संताप, तगमग आणि पुढे काहीच नाही???

मागे एकदा हेरंबला म्हटले होते, ’आशूतोषचा ’ स्वदेस’ मला पुर्णत: पटत नाही म्हणुन….’ अजुनतरी पुर्ण समजलाय पटलाय का राम जाणे……. यावेळेस मात्र निघताना मनात कुठेतरी मोहन भार्गव पुन्हा डोकावत होता…. मलाच वाकोल्या दाखवत होता….. त्याने त्याच्या पुरते काही प्रश्न सोडवले होते….. माझे प्रश्न आहेत अजुनतरी ’अनुत्तरीत’………….

गाते माहेराचे गाणे…..

“मम्मा मला बाबूंबरोबर रोज रेल्वे स्टेशनला जाता येणार आता….. य्येsssssssss!!!!!!! तपोवन, नंदीग्राम, पंचवटी, गोदावरी मै आ रहा हूँ!!!!!!!!!!!!!!!!!!!” चिरंजीव आपल्याच नादात ओरडत होते…..

“मम्मा यावेळेस मी पण जाणार ना ???? ” …कन्यारत्न

“हो हो … सगळी सगळी मजा करा ठीके!!!” ….मी

एक एक बेत आखताहेत सगळे, काही बोलले सांगितले जाताहेत तर काही कागदावर.. आणि बरेचसे मनात :)

मुलांना आजोळी जायची, आजी-आजोबांना भेटायची घाई… तर मला ’माझ्या घरी’ जायची घाई झालीये!!!!

पुन्हा एकवार तो मायेचा उंबरठा ओलांडून आत जाईन मी!!  मुंबईहून नाशकात पोहोचत पोहोचत बाबा आणि मुलं एकमेकांशी गप्पा मारण्यात गुंग होतील…. मी आणि नवरा दोन खिडक्यांमधून बाहेर पहात असू!!!! ठाणे सोडल्यावर मन धावायला लागेल माझे…. बाहेरच्या प्रत्येक झाडा, पाना फूलाला आसुसून पाहीन मी… मोकळ्या आकाशाला साद घालेन….. “आले रे बाबांनो मीsssss”  त्या प्रत्येकाला सांगेन… त्यांचे माझे मुक नाते मी जपेन आणि पानांची सळसळ करून झाडंही मग मला “ये गं!!” म्हणतील……. एकीकडे “बाबा कसारा घाट मस्त झालाय हो आता…………” असे काहितरी बोलून आजोबा आणि नातवंडामधे शिरण्याचा निष्फळ प्रयत्न करेन…… ईगतपुरी, घोटी पार करत गाडी नाशकात शिरेल……

आता माझ्या मनाचा वेग गाडीपेक्षा खूप जास्त असेल…. दारात उभी असलेली आई मला आत्ताच दिसायला लागेल….. वर्षभरात बदललेले नासिक डोळ्यात साठवत घरापुढे गाडी उभी राहील……गेटजवळचा गुलमोहोर रंगीबेरंगी स्वागत करेल…. मागच्या आंब्याच्या कैऱ्या दिसताहेत का मी पटकन नजर टाकून बघेन…..मी भराभरा दाराकडे चालत जाईन आणि मग आदेश येईल, “मम्मा थांब!!!! नानी ते काय पोळी आणि पाणीने ओवाळेल आपल्याला… then u can enter the house!!!!”……….. अस्सा राग येईल मग वाटेल त्याला सांगावे, ” शहाण्या हे माझे घर आहे… माझी आई आहे ती, मला माहितीये ती काय करेल ते!!!!!”

घरात गेल्यावर आईला चहाची ऑर्डर देइन मी… किचनच्या ओट्याजवळ ती गेली की तिला मागून घट्ट मिठी मारेन मी… चहा होत होत आई भरलेवांगे,भरीत भाकरी, ईडली, आई हे आई ते अश्या सुचना देत देत तिच्या कुशीत विसावेन मी……

आता सकाळी दहा वाजताना पुन्हा एकवार किचनमधे शिरेन मी… “बाबा चहाssss”  करून ओरडेन…. “कुलकर्णी बाई तुमच्या मुली भलत्या चहाबाज!!!” बाबा आईला म्हणतील…. गेल्या वर्षभरात आईने घर काहीच बदललेले नसेल… मग मी तिला रागावेन… “ताई अगं तू कर हवे ते बदल…” आई म्हणेल…. किचनमधले ठिय्या आंदोलन आळशीपणे पेपर वाचन संपल्यावर उठेल केव्हातरी :)

मी पोहोचण्याच्या दिवसाच्या हिशोबाने आईने गहू भिजत घातलेले असतील…. सकाळी ती म्हणेल “चीक करू का खायला????” सगळे एकसुरात “होss” करून ओरडतील….. मी उगाच निरर्थक घरात फिरेन… मागच्या दाराने अंगणात जाऊन पुढच्या दाराने पुन्हा आत शिरेन…. अश्या परिक्रमा करताना अंगणातल्या झाडांना  पहात राहीन…. मागच्या टाकीच्या नळाखाली पाय सोडून धुण्याच्या दगडावर बसून राहीन थोडावेळ… जणू त्या थंडगार पाण्यात गेल्या वर्षभराचा शीण वाहून जाईल मग…. :) … किचनमधे आई-बाबा, माझा नवरा गप्पा मारत बसतील….. बहिणाबाई माझा मागोवा काढत मागच्या दारी येईल…. गप्पा सुरू होतील मग…. केव्हातरी आई हाक मारेल……

पुढच्या दारी पेपरवाल्याने पेपर टाकलेला असेल… मी तो उचलायला जाईन, तर मुलं पेपरवाल्या मामाशी गप्पा मारत असतील….. तोवर दुधवाला येइल…. ” चिक्या कसा आहेस रे?” तो मुलाला विचारेल….. मग माझ्या लक्षात येइल तो आपल्या दारी नाही आला…. मी बाबांकडे पाहीन….. यांचे रेग्युलर दुधवाला लावणे, बंद करणे सुरू आहे समजेल मला…… “अगं हा उशिरा येतो वेळा जमत नाहीत आमच्या” वगैरे परिचित कारणं बाबा सांगतील…… तोपर्यंत तो परत येईल,” कशी आहेस ताई?? दाजी कसे आहेत?? … आहेस ना आता महिनाभर….” तो कुठलाही किंतू मनात न आणता माझ्याशी आणि बाबांशी गप्पा मारत राहील….. समोरच्या बिल्डींगमधल्या गॅलऱ्यांमधे काका-काकू येतील…. मग गप्पा मोठमोठ्याने रंगतील निदान १५-२० मिनीट…… मी कधी गप्पांमधे भाग घेत कधी अलिप्तपणे त्या संवादात रमेन….. मनात कुठेतरी सुखावत राहीन पण!!!!!!!

गुलमोहोर एव्हाना रागाने लालबुंद होईल….. मनात म्हणेल हिच्या एकटेपणात कित्येकदा साथ दिलीये मी पण ही बदललीये आता….. आल्यापासून माझी दखल नाही घेतली हिने….. त्याला एकनजर पाहिले की  मात्र नजरबंद होइल तिथे….. त्याचे हिरवेगार शेंदरी रुप मोहावत राहील…. खुळ्यागत त्याच्या पानाफूलात रमेन मी….. मनात रागावेन मग मी देखील….. यावेळेस जरा जास्तच बहरलाय … कचरा किती होतोय रे दारात!!!!! तो हलकेच एक लकेर घेईल आणि अजुन काही फुला-पानांची बरसात करेल….. :)…. जा रे बाबा मला खूप वेळ नाहीये… आजीकडे जायचेय त्याला सांगेन मी….. तो अजूनच हसेल….थोडा पलीकडे झुकून हलकेच पावले टाकत येणाऱ्या आजीवर सावली धरेल तो!!!!  सुंदर साडी नेसलेली, नीटनेटकी आवरलेली….. बगलेत ’पाकिट’ आणि हातात छत्री  घेतलेली आजी मला दिसेल येताना….. “ये गं आई!!!!” माझी आई स्वयंपाकघरातल्या जाळीअडून म्हणेल…… अच्छा म्हणजे मी माझ्या पाउलखूणांचा ईथे मागोवा घेत बसलेय आणि जाळीअडून मातोश्री आम्हाला पहाताहेत वाटतं….. आजी हसेल….. आई हसेल… मी देखील आणि अंगणात बागडणारी माझी लेकही……………. :)

“पणजीआजी ssssss” ती धावेल आजीकडे….” छकुले किती मोठी झालीस गं!!!!!” आजी म्हणेल……. धावलेली छकुली एक असली तरी आजीच्या मात्र आम्ही तिघी छकुल्या :) तिच्याकडे पहात असतील….. “तायडे अगं काय हा अवतार???? ” आजी रागावेल मला…. “अगं म्हातारे तुझ्यावर नाही ना गेले मी”, म्हणत तिच्या कुशीत शिरेन मी….. पॉंड्स…. चिरपरिचित सुगंध पण तो माझ्या आजीची ओळख आहे, स्वत:लाच पुन्हा सांगेन मी!!!! हातातलं सोनचाफ्याचे माझ्यासाठी आणलेले फुलं आजी मला देईल मग…. तिचा हात हातात घेऊन मी म्हणेन,” काय हे चिरतरूण बाई तुमच्या हातावर सुरकुत्या???”………….. :)

माझं वजन वाढलय, यावेळेस मी योगा क्लास लावणार आहे, झालचं तर कुकरी क्लास पण ई. ई. बडबडेन मी… कोणीही दखलही घेणार नाही… मग थोड्यावेळाने बहिणाई ओरडेल,” ताई सगळ्यांना माहितीये तू घरात बसणार आहेस फक्त :( ” मी काय ऐकून घेईन वाटलं का…… “तूला होऊ दे ना दोन मुलं मग बघू किती ऍक्टिव रहातेस तू???? ” मी सुनावेन तिला…. “मला कशाला आईला बघ… आपलीच आई आहे ना ती!!!” वगैरे म्हणत वाद घालेल ती…..

माझा लाडका मामा आणि मामी येतील मग…. मी मामाला त्याच्या स्वत:च्या तब्येतीबाबतच्या हेळसांडीबद्दल व्याख्यान देत राहीन आणि तो आपलं मला चिडवत राहील या ना त्या कारणाने… लहानपणी ’ताई तुझं नाक बघ किती लहान आहे माझं कसं मोठं म्हणून’ चिडवायचा तसा….. केव्हातरी रागावेन मी आणि सरळ मामीकडे जाईन आणि ठणकावून सांगेन की मामा तुझ्यापेक्षा मला माझी मामी जास्त आवडते….. आमचं बालपण, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ गप्पा वाट फूटेल तिथे वहातील मग…. :) …. मामा हलकेच माझ्या डोक्यावर हात ठेवेल मग….. आता वाटेल आपण परतून जाऊच नाही ईतके दुर… इथेच रहावे या सगळ्यांच्या जवळ… :)

केव्हातरी मोठ्या मामीचा फोन येईल ,” बारका बाई कशी आहेस??” ती म्हणेल…… मामी अगं सुटलेय गं आता, मी कुरकुर करेन…..

एखाद्या दिवशी पहाटेच जाग येईल …. मग मी दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जाईन…. पहाटं….. एकटीनेच बसून राहीन तिथे…..वर असणारे आकाश माझे एकटीचे असेल तेव्हा…..बोटायेव्हढे नारळाचे झाडं मात्र आता ईतके वाढलेले असेल की आम्हा माहेरवासिणींना ईतक्या वरही साथ देईल….नुकतेच दव पडलेले असेल त्या पानापानावर हलकाच हात फिरवेन मी…. नारळाशी अबोल संवाद होत राहील आणि तितक्यात तो येईल …. पुन्हा एकदा मारूती चितमपल्लींचा कुकुडकोंबा आठवेल मला… तेजस्वी काळा आणि तपकिरी रंग असलेल्या भारद्वाजाला मला सांगायचे असेल की मी आल्या दिवसापासून तूला शोधतेय रे!!! तो फांदी फांदीवर बागडेल… मी लपून कधी प्रकट होत त्याला पहात राहीन…. सुगरणींचे अनेक खोपे नारळाच्या पानापानाला असतील…. एखादी सुगरण मन लावून आपला खोपा विणत असेल….. मी मग भारद्वाजाला हलकेच खूण करेन “गप्प बैस जरा” तीला मन लावून काम करू दे जरा!!! त्यादिवशीच्या सुर्योदयाचे आम्ही तिघं साक्षीदार होऊ मग……

(आज थांबतेय इथे….पण माहेरपुराणं संपलेले नाही बरं!!)