महाराष्ट्र टाईम्स, संवाद,
रविवार 19 नोव्हेंबर 2017
मस्कतमधली पाच वर्ष आणि अबुधाबीतली दोन वर्ष, आखातात रूळले होते मी एव्हाना… एरवी भारतात कधीही करावी न लागलेली घरकामं भारताबाहेर प्रसंगी करावी लागतात हे ही सवयीचं झालं होतं. “घरकामाला बाई हवी” अशी तोंडी जाहिरात देऊन तिची वाट पहाणे हे नित्याचे काम सुरू होते…
अशातच एक दिवस, केरवारे आटोपल्यानंतर , घरातली धूळ झटकताना ती निम्मी कपड्यांवर आणि निम्मी चेहेऱ्यावर, केसांमधे मुक्कामाला वसवल्यानंतर मी आता मोर्चा भांडी घासण्याकडे वळवणार तोच दार वाजलं, तश्याच अवतारात दार उघडले तर समोर व्यवस्थित कपड्यांतली, मेक अप केलेली बाई मला विचारत होती की माझ्याकडे मेड हवीये असं समजलं…. ती श्रीलंकन होती आणि आमच्या बिल्डिंगच्या वॉचमनने पाठवलेली होती .
स्कर्ट घातलेली, व्यवस्थित आवरली आटोपलेली ती आणि अजागळ अवतारातली मी, सगळा विरोधाभास होता. नाकापेक्षा जड असलेल्या त्या मोत्याला मी दारातूनच परत पाठवलं….
एका मैत्रीणीशी गप्पा मारताना सहज बोलले , पूर्वी आमच्याकडे बिल्डिंगला बांग्लादेशी वॉचमन होता तेव्हा येणाऱ्या मेडही बांग्लादेशीच होत्या आणि आता श्रीलंकन वॉचमन आलाय तर येणाऱ्या मेडही श्रीलंकन असतात !!
मैत्रीण अगदी सहज बोलली , “अरे सेटिंग होता है इन लोगोंका !! ” …
’सेटिंग’ शब्दावरचा जोर आधी सामान्य वाटला पण त्याच्या नेमक्या अर्थाचा बोध झाला आणि कसंसं झालं क्षणभर ….. काही गोष्टींबाबत एकतर मी मठ्ठ तरी आहे किंवा जाणूनही दुर्लक्ष करत असते…. बरेचदा या गोष्टी माझ्या खरच लक्षात येत नाहीत किंवा जाणवल्यातरी आपला नेमका अश्या बाबतीत काय संबंध हे न उमगून मी त्याबद्दल चर्चा करायचे टाळत असते.
असे एकेकटे रहाणारे वॉचमन, येणाऱ्या मेड यांच्याशी माझी होणारी चर्चा म्हणजे, “घरची आठवण येते का ? ” ,”कधी जाणार परत ? ” वगैरे स्वरूपाची असते. त्यापुढे जाउन काही बोलायचे, विचार करायचा तर त्यांना काही मदत हवीये का वगैरे इतपत माझी मजल जाते. या सगळ्यांशी गप्पा मारणे होते माझे नहेमी, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या काही कोपऱ्यांबाबत एक अलिप्त तटस्थता असते कायम !!
माझ्या त्या मैत्रीणीशी गप्पा (?) आटोपल्या पण काहीतरी सतत सलत राहिले. एखादी जुनी जखम ठसठसावी तसे…. खपली निघाली होती कुठलीतरी !! नक्की काय ते हाती लागल्याशिवाय मनाची तगमग थांबणार नव्हती ….. मैत्रीणीचे मत हे ’तिचे’ मत होते आणि ते असण्याचा तिला पूर्ण अधिकार होता त्यामुळे त्या मताने मला दुखावले नव्हते. अशी सरळसोट जनरलाईज्ड विधानं मला पटली नाहीत तरी ते करू शकणाऱ्यांचं कौतुक मात्र नक्की वाटतं. बरेचदा असंवेदनशीलतेला जोपासत केलेली धडक विधानं काहीशी बोचतात , आश्चर्यात टाकतात हे नक्की .
विचार येतच होते… माझ्याकडच्या सगळ्या मेड्सबाबत . इथे मेड बदलण्याचे कारण म्हणजे बरेचदा आपण तरी सुट्टीवर जाणे किंवा त्यांनीतरी मायदेशी परतणे असे काहीसे जास्त असते. मात्र ज्या ज्या मेड आल्या किंवा आले ते घरचे एक होऊन गेले कायम हे नक्की !! भारतातच ठेवलेल्या लहान मुलीची आठवण येते सांगणारी हैद्राबादची ’रत्ना’ किंवा मुंबईतल्या दोन मराठी बहिणींची जोडी, बांग्लादेशची ’शेलिना’ , रशिदा…. गुढीपाडव्याला आंब्याचे, कडूलिंबाचे पानं आणून देण्यापासून ते दिवाळीतल्या साफसफाईपर्यंत सगळ्यात लूडबूड करणारे हनाभाई ….. सगळे सगळे आठवत गेले एकामागोमाग एक. बांग्लादेशातलं माश्यांचं स्वतंत्र तळं, भाताची घेतलेली शेतं, भावाचं शिक्षण वगैरे गोष्टी हनाभाई सतत सांगत.
या सगळ्या आठवणींमधे मला ’शेलिना’ आठ्वली आणि जाणवलं त्या सेटिंग शब्दाची बोच नेमकी कुठे उमटतेय. शेलिना ….. माझ्याकडे यायला लागली आणि घरचीच झाली… काम आटोपून माझ्या लहान लेकीशी खेळणे, तिला जेवू घालणे, बोबडे बोल बोलणे वगैरे अनेक कामं स्वत:च हौसेने करणारी शेलिना… दिवाळीच्या तयारीचा मोठ्ठा भाग होणारी बुटकीशी जाड शेलिना.
“चाय बनाऊँ?? आप पियेगा??”, या तिच्या प्रश्नाचा अर्थ “मला चहा हवा” हे मला समजायचं… मग मी सांगायचे मला भुकही लागलीये गं… शेलिनातली शेफ मग सरसावून कामाला लागायची, कांदा लसुण फोडणीत परतून त्यात काबुली चणे आणि भात वगैरे काहीतरी प्रयोग चालायचे… हाताला चव होती तिच्या… चहापान संपताना समंजस हसायची आणि माझ्या लेकीला सांगायची, अपना अम्मी के जैसा बनना…
’मुलूक ’ला जायचं म्हणून प्रचंड खटपट करणारी अशिक्षीत शेलिना . मुलूकमधल्या भावाबहिणींसाठी उमेदीची, तरूणाईची वर्ष आखातात कामाच्या रगाड्यात घालवणारी शेलिना . घरी जाण्याची अनावर आस असणारी शेलिना. “मॅडम मै तो ना आजकल उपरसे कोई प्लेन जाता है तो सोचती हूँ कब जाऊँगी मै इसमे बैठकर 🙂 ” … असे निरागसपणे हसत सांगणारी शेलिना. “मॅडम दुवा करना मेरे लिये…. वगैरे तिची वाक्य मनात घोळत माझ्या….
अनंत खटपटींनंतर एकदाची ती मुलुकला निघाली आणि मी पर्समधे राखलेली सगळी रक्कम बाकी रकमेसह मी तिच्या हातात दिली होती. माझा हसत हसत आणि रडत रडत निरोप घेऊन ’शेलिना’ मुलूकला गेलीही होती. आता कामाला बाई नसणार या दु:खापेक्षा शेलिनाला घरी जायला मिळालं याचाच आनंद झाला होता मला. काही दिवसात तिची मैत्रीण ’रशिदा’ यायला लागली कामाला, मात्र शेलिनाचा विषय कायम यायचा आमच्या बोलण्यात. एक दिवस रशिदाने सांगितले , “मॅडम शेलिनाका शादी हो गया !! ” …. विलक्षण आनंद झाला मला… वाटलं आता तिच्या सगळ्या ओढाताणीचा शेवट गोड होइल. ती तिच्या संसारात रमेल. रशिदाला मात्र अनेकवेळा शेलिनाचा फोन नंबर मागूनही ती देइना .
मला मात्र तिच्याबद्दलचा आनंद तिच्याशी प्रत्यक्ष बोलूनच साजरा करायचा होता. शेवटी ’बांग्लादेशी’ हनाभाईंना गाठलं, म्हटलं बाबारे तिचा फोन नंबर असेल तर दे ना मला, तिचे अभिनंदन करायचे आहे !! …. हनाभाईने माझ्याकडे बघितले , हसला आणि म्हणाला ,” दिदी उसका शादी नही हुआ है….. कभी नही होगा ….. कोइ शादी नही करता इधरसे जाने के बाद ईन लोगोंसे …. मै तो कभी नही करूंगा …. ”
हनाभाई निघून गेला आणि मला विचारात टाकून गेला होता. एक धक्का जो मला एकटीने पचवायचा होता. माझ्या कुटुंबात, आयुष्यात शेलिना एक कामवाली होती . जिला जाताना मी मदत केली त्यामुळे मी तिच्या ’देण्यातून’ मुक्त होते. पण कामवालीशी माझं नातं नकळत आपुलकीचं, माणुसकीचं होतं…. स्त्रीत्त्वाने जोडल्या गेलो होतो आम्ही दोघी. त्या नात्याची वीण घट्ट होती ही मला कल्पना होती पण माझ्या डोळ्यात येऊ पहाणाऱ्या अश्रॄंना माझ्या रोजच्या आयुष्यात फारशी जागा नव्हती. हे असं दुखणं काढणं हे ’व्याह्याची घोडी ’, ’लष्कराच्या भाकऱ्या ’, ’विश्वाची चिंता ’ वगैरे सदरात मोडत होतं.
रोजच्या रामरगाड्यात शेलिना मागे पडली, तिच्यामाझ्यात दोन तीन देशांच्या हद्दी आल्या तरी ती मनातून कधीच गेली नव्हती हे पुन्हा नव्याने जाणवलं मला त्या ’सेटिंग’ शब्दाने. सेटिंग …. दोन वेगवेगळ्या लोकात होणारं सेटिंग हा माझ्या मैत्रीणीचा अर्थ होता, त्यातला एक मला ठणकावून सांगून गेला होता की अश्या बायकांशी मी लग्न करणार नाही, आणि स्वत: मात्र आखातातून आलेला श्रीमंत ’वर’ म्हणून मिरवणार होता. आजवर अगदी ’चांगल्या ’ हनाभाईचं वेगळं आणि प्रातिनिधीक रूप अचानक समोरं आलं माझ्या !!
या सगळ्या सेटिंगमधे दोष कोणाचा हे मला नेमके उमगत नव्हते 😦
अज्ञानात सुख असतं ….. फारसे फंदात नाही पडले की त्रास कमी होतो. पण आपल्या मनाचे ’सेटिंग’ तसे नसते !! शेलिना मला कधीच सापडणार नाहीये… गुगलबाहेरचे जग आहे तिचे, तिचा शोध कसा घेणार ….
आज हा सेटिंग शब्द दिवसभर बोचत रहाणार होता…. पुढचे काही दिवस जाणवणार आणि मग हलकेच मनाच्या कोपऱ्यात दडणार होता…. 😦
खिडकी उघडली आणि बाहेर पहात उभे राहिले….. पांढूरकी घरं, बिल्डिंग्स ,वाळू दिसते माझ्या खिडकीतून, फार नाही पण हे वाळवंट आहे ही जाणिव करून देणारी वाळू ….. ’वाळवंट ’ – एक आत असतं आणि एक बाहेर !! आणि मग अश्या कित्येक शेलिनांचे अश्रॄ , त्याग , कष्ट या वाळवंटाच्या आर्द्रतेत विरघळलेले असतात…. अश्या विचाराने, जाणीवेने माझा ’मोकळा श्वास’ क्षणभर घुसमटला ….. !!
अर्थात ’वाळवंट ’ मग ते वाळूचं असो किंवा भावनांचं तिथे पाझर विरळाच…..
वाळवंटात एक म्हण आहे ’ रेताड वाळवंटात फिरताना तुमच्या नजरेला जर मृगजळ दिसत नसेल तर तुमची तहान खरी नसावी ’ . आज खिडकीबाहेर पहाताना सतत असेच काहीसे वाटतेय , कुठेतरी मृगजळ असावे …. या शेलिनांच्या अश्रॄंना , अस्तित्त्वाला काहीतरी मोल असावे…. कुठेतरी कोणालातरी या सगळ्याची माझ्यापेक्षाही जास्त ’बोच’ वाटावी त्याने हे ’सेटिंग’ बदलावे…..