कं ची बाधा……….

कालच्या पोस्टला मी  सगळ्या कमेंटला एकच उत्तर दिले… खरं तर प्रत्येकच उत्तरात आभार मानायचे होते. आणि मग तेच ते सगळ्यांना लिहायचे तर त्यापेक्षा एकत्रच एकच उत्तर टाकले……

त्या माझ्या महान चातुर्यावर हेरंब आणि अपर्णाने अजुन दोन कमेंटस टाकल्या…… हेरंबच्या मते मला ’कं’ ची लागण झाली आहे आणि त्याला अपर्णाचा दुजोरा 🙂  होता. थोडा वेळ मला गंमत वाटली या दोघांची…. एकूणातच आता ब्लॉगर्सची जी टीम झाली आहे, त्यात असे संवाद नेहेमीच घडतात. आणि काही वेळ चेहेऱ्यावर हसू फुलवून जातात……….

काही समजत नाहिये ना ही पोस्ट कश्याबद्दल आहे… 🙂 ….. नमनाला बरेचसे तेल ओतले गेलेले आहे तेव्हा आता मुख्य मुद्द्याला सुरूवात…………..

मुळ मुद्दा आहे माझ्या ’कं’ च्या बाधेचा…… काल मी सहज विचार करत होते की आयूष्यात मला आलेला पहिला ऐतिहासिक कंटाळा कोणता???? मग काय ईतिहासच खणला……….. माझा तो अतिमहत्वपुर्ण शोध पोहोचला थेट साडे एकतीस वर्षापुर्वीच्या अस्मादिकांच्या जन्मवेळेशी……. जन्मल्या जन्मल्या मला पहिला जाहीर कंटाळा आला होता आणि तो मी ’न रडून’ साजरा केला होता !!! (प्रस्तुत माहितीचे सौजन्य आमच्या मातोश्री…… 🙂 ) मग मला फटके मारून रडायला भाग पाडले होते असेही आईनेच पुढे सांगितले होते……. आणि आपल्या पहिल्या अपत्याला झाल्या झाल्या मार बसलेला आहे तेव्हा आपण मात्र कधी मारायचे नाही हा तिचा निर्धार कोणा एका ३१ डिसेंबरला आमच्या महान कर्तूत्त्वाने मोडला होता….. (तारिख कायम लक्षात रहाण्याजोगी आहे आणि तो पहिला आणि शेवटचा नॉनशाब्दिक मार असल्यामुळे आणि या मारातले हत्यार कुंचा असल्यामुळे आठवण अगदी पक्की आहे……..या मारानंतरचे अनेक शाब्दिक मार व्हाया कान मनाला लागत, मात्र हाच एकमेव मार व्हाया पाठ मनापर्यंत पोहोचला होता :D… या आठवणीवरचे आईचे मत असे की नेहेमीच बडवायला हवे होते म्हणजे नसते डिटेल्स लक्षात राहिले नसते 🙂 )  असो आज महत्वाचा मुद्दा हा की माझ्या आयुष्यातला पहिला कंटाळा जन्माला आल्यावर रड्ण्याचा होता…. खरं तर माझी वैचारिक बैठक (!!!) पहाता , जन्माला येणे हा सुंदर फिनॉमिनॉ रडून मला साजरा करायचा नसावा……

मात्र हा कंटाळा माझ्याबरोबर वाढतोय…… शाळेत येणारे लहानसहान कंटाळे, माध्यमिक- उच्चमाध्यमिक वर्षात प्रगत होत गेले…….मला तीन तास एका जागी बसून पेपर लिहिण्याचाही भयंकर कंटाळा होता. मग मी पेपर अर्धा लिहीला की स्वत:च स्वत;ला मार्क देउन पहायचे… ते एकदा का ३५ भरले की मी उत्तरपत्रीका देउन मोकळी व्हायचे…… माझ्या या अतिहुशारीची कल्पना माझ्या शाळेतल्या शिक्षकांना फारच लवकर आल्याने मी पेपर दिला की ते तो आधि तपासून पहात आणि जर पुर्ण लिहीलेला नसेल तर मला पुन्हा माझ्या जागेवर दामट्त……. P.T. चा तासही एक असाच महाकर्मकठीण कंटाळ्याचा होता…..मला स्वत: कवायती करण्याचा कंटाळा यायचा मग मी ईतरांकडे पहात उभी रहायचे……. यावर रागावून मला आमच्या मॅडमनी एक संपुर्ण वर्ष टेबलवर उभे राहुन P.T. करायला लावले होते……. सारी शाळा पुर्वेला तोंड करून उभी असेल तर मी एकटी त्यांच्यासमोर पश्चिमेला तोंड करून उभी असायचे , ते देखील टेबलवर :)…… अश्या आळशी विद्यार्थ्याला आमचे शिक्षक लाडकी का म्हणत हा खरचं एक प्रश्न आहे……

माझे म्हणजे पहिलीत वर्गात पहिला नंबर, दुसरीत दुसरा, तिसरीत पहिला, चौथीत दुसरा….. असे सम संख्येच्या वर्गांना दुसरा नंबर आणि विषम संख्येंच्या वर्गांना पहिला नंबर यायचा. या हिशोबाने माझ्या दहावीच्या वर्षाचे काय व्हावे असे टेन्शन आमच्या मातोश्रींना आले होते…… मला हे असले टेन्शन घेण्याचाही कायम कंटाळा असल्याने मी निवांत होते. असेच काहिसे विचार माझ्या दोन शिक्षकांना पण आले असावे…… कारण सुरूवातीच्या काही दिवसातल्या माझ्या शाळेतल्या आणि शिकवणीच्या दांड्या पहाता हे दोघे जण मला घरी रोज शिकवायला यायला लागले….. ते ही नि:शुल्क…. आताची शिक्षणपध्दती पहाता या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी मला मात्र तेव्हा हा जगातला सगळ्यात मोठा उपद्रव वाटायचा…… आणि मग मी चार दारे असलेल्या आमच्या घराच्या कुठल्यातरी दाराने पळून जायचे…… मग सर घरी यायच्या आधि मला शोधून दामटून घरी आणणे हे आईचे काम असायचे……. बरं हे सर घरी आले की सगळ्या गणितांची तोंडी उत्तरे देउन मी मोकळी होत असे….. मग ’स्टेप्सला मार्क्स असतात, त्या लिहिण्याचा कंटाळा करायचा नाही!!!! ’ हे माझ्याकडून ५ वेळा लिहून घेतले जाई!!!!!!!……………… एक मात्र खरं आहे की या शिक्षकांनी मला वळण लावण्याच्या विचाराचा ’कंटाळा’ न केल्यामुळे मी दहावीत शाळेत पहिली आणि केंद्रात मुलींमधे पहिली आले……. 🙂 माझ्या या रिझल्टवर खुश होण्याऐवजी जेव्हा माझे सर म्हणाले बघ येव्हढा आळस केलास तरी पहिली आलीस…. खरचं जरा अभ्यास केला असतास तर मेरीट असे ८-१० मार्काने चुकले नसते…. :(………….. यावर आमच्या आईचे मत ’जिद्द’ म्हणजे अशी ती नाहीच, सगळ्याचा मेला कायम कंटाळा आहे या मुलीला…………..तिचे हे मत बदलणार नाही याची मात्र मी कायम ’उत्साहाने’ काळजी घेतलीये……

आठवायचा कंटाळा म्हणजे ’विस्मरण’…… कंटाळ्याच्या या उपप्रकारानेही माझ्या आयुष्यात अनेक चमत्कार घडवलेत आजवर….. आई-बाबांसाठी म्हणून मला दिले गेलेले कुठलेही निरोप मी कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचवले नव्हते…… निरोप सांगणाऱ्या काका- मावश्यांना तोंडभरून ’हो नक्की सांगते!!!’ म्हटल्या म्हटल्या मी तो निरोप विसरून जायचे………. कोणी उद्या घरी येतो वगैरे सांगितलेले असले की ते प्रत्यक्ष आल्यावरच आईला समजायचे की ते येणार होते…… मग मी आपली ’मला आज खूप गृहपाठ आहे!!! ’असले कारण सांगुन तिथून काढता पाय घ्यायचे!!!! पण ते पाहूणे गेल्यावर बाबांचे ठरलेले वाक्य यायचे, ” अगं कुठल्या तंद्रीत असतेच गं!!! कायम स्वत:च्याच नादात…..” …………… विसराळूपणा मी माझ्या मामाकडून घेतलाय. आमच्या मामाच्या विसराळूपणाचे किस्से आम्ही आजही एकत्र आलो की आठवत असतो…… आमच्या मामाने एकदा ट्रेनमधे जाताना लोणच्याचा संपुर्ण डबा वरच्या बर्थ वर ठेवला होता आणि साधारण दिड तासाच्या प्रवासात हे महाशय त्याबाबत ठार विसरले आणि तो न घेताच उतरून गेले होते….. एखाद्या ठिकाणी जाताना गाडीने जाणे आणि येताना मित्र भेटला तर गाडी तिथेच किल्लीसहित विसरण्याचे भीमपराक्रमही मामाच्या खात्यात आहेत…. 🙂 वस्तू हरवणे हे तर आमचे कॉमन आहे!!!

आम्हाला कंटाळा नाहिये तो फक्त बोलण्याचा ….. डोक्याच्या मातीत विचारांची शेती आणि तोंडाच्या गिरणीत शब्दांचे दळण सतत सुरू असते……. मला आईने सांगितलेली कामं करण्याचाही एक असाच असह्य कंटाळा होता…… मग मी ’हो हो करते!!’ असे सांगायचे, थोड्या वेळाने पुन्हा आईने विचारले की , ’अगं आई ५ मिनिटाचे तर काम आहे, मी नाही म्हटले का, करते थांब!!!” हे उत्तर ठरलेले असायचे…………….. मग आई काय समजायचे ते समजून ते काम करून टाकायची. एकदा आईने मला धुतलेल्या तांदूळाचे पाणी झाडाला टाकायला सांगितले होते…मी संपुर्ण पातेले झाडात ओतून, भुमीतून आलेले तांदूळ पुन्हा भुमीत अर्पण करून आले होते. 🙂  मी आणि माझे दोन मामा (एक ज्याचा आधि उल्लेख केलेला आहे आणि एक आमच्याच कॅटेगरीतला आईचा मामेभाउ.. ) गप्पा मारायला बसलो की इतरांच्या मते ’वल्गनांना’ उत यायचे, कारण या कंटाळाग्रस्त आत्म्यांकडून प्रत्यक्षात काही घडायचे नाहिये या मतावर सगळे ठाम होते….. आमच्या या मामाला आमची मामी आजी ,” रात को बका दिन को नका!!’ असे म्हणायची………. 😀

पुढे कॉलेजमधे फाईल्स पुर्ण करायचा, लेक्चर्स अटेंड करायचा या प्रकारातले अनेक कंटाळे आले नी गेले……हा ’दिग्विजयी कंटाळा’ ( शब्दाचे सौजन्य हेरंब) माझ्या आयूष्यात नसता तर माझ्याकडून काहितरी भव्यदिव्य झाले असते या विचारावर आमची आई अजुनही ठाम आहे!!!!! अहो नुसतीच प्रखर बुद्धीमत्ता काय कामाची, काहितरी रिझल्टही तर दिसायला हवा ना, हे तिचे पेटंटेड वाक्य ती न कंटाळता नेहेमी बाबांना सांगत असते…… आणि गेली साधारण २५-२६ वर्षे (जेव्हा आईला असा बोध झाला की आपली लेक हुशार {!} आहे तेव्हापासुन पुढची वर्ष…) ते न कंटाळता मान डोलवत असतात!!!!!!!!!!!!!!! तिच्या तगमगीत काहितरी तथ्य असावे असे मला मात्र आजकाल कधीमधी वाटते जेव्हा असलाच काहिसा विचार स्वत:च्या लेकाबाबत मनात डोकावतो!!!!! 🙂

असो, तर सारांश काय आम्ही कंटाळापंथीय लोक…….. वपूंचे एक वाक्य आहे ’कंटाळ्याच्या दिवशी काय होते…… आधि कंटाळा येतो आणि मग …. आणखी कंटाळा येतो …’ तसलेच आहे आम्हा कंटाळाप्रेमींचे. कुठलीच नवी गोष्ट खूप दिवस मन रमवू शकत नाही, काही दिवसातच तिचा कंटाळा येतो आणि मन नवे काहितरी उद्योग शोधू लागते!!!!

काहिही असले तरी मला ’कंटाळ्या’ चा राग नाहीये कधीच…. कारण जसे आम्हाला स्वत:च्या आयुष्यात भव्यदिव्य कर्तूत्व करायचा कंटाळा आहे तसेच ईतर कोणाला असे काही करण्यापासून परावृत्त करायचाही कंटाळा आहेच की!!! आम्हाला गॉसिपींग, हेवेदावे, राग, मत्सर हे नसते उद्योग करण्याचाही कंटाळा आहेच की…….

तेव्हा सौ बातों की एक बात अशी की कंटाळ्याला ’टाळा’ असे काही मी म्हणणार नाही…………….. 🙂

कंटाळ्यावरचा सलील कुलकर्णींचा लोकसत्तामधला एक सुंदर लेख इथे आहे.

(यॉ डॉ खरं तर ’कंटाळा’ पुराणातला तू महर्षी व्यास पण तरिही तुझ्या टेरीटरीत केलेल्या घुसखोरीचा राग करायचा तुला कंटाळा येवो ही ईच्छा!!!!!!!!!!!!!! 🙂 )

Advertisements