हे भलते अवघडं असते……

नुकताच सलील कुलकर्णी- संदीप खरेंना भेटायचा योग आला.

खरं तर या दोघांची अप्रत्यक्ष ओळख तशी खूप जुनी…… सलीलला मागे लिहीलेल्या एका मेलमधे मी लिहीले होते की तुमच्या ’दिवस असे की’ ते ’दमलेल्या बाबाच्या कहाणी’ पर्यंतच्या प्रवासातले आम्ही सगळे अदृष्य सहप्रवासी आहोत….. एक अत्यंत सुरेल सुखद प्रवास करायचे तुम्ही ठरवलेत… त्या वाटेवर निघालात आणि त्याच वाटेवर नकळत आम्हीही चालायला लागलो…… त्याच आनंदयात्रेचे आम्ही वाटसरू झालो!!!!! या मेलला सलीलचे उत्तर आले आणि आमच्या घरात सगळेच भलते खुश झाले…… त्या मेलमुळे सगळ्यात जास्त आनंद झाला होता तो ईशानला…..सलील-संदीपचा तो मोठा भक्त!!! त्याच्या बरोबरच गौरीही ’आताशा मी फक्त लकाने दिवसाचे भलते’ वगैरे काही काही गात असते……. ईशान गौरीला भेटायला मी मस्कतला येतोय असे सलीलने लिहील्यावर एरवीचा ’सलील कुलकर्णी’ आता त्यांचा ’सलील काका’ झाला होता…… खरं तर त्यांचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि ते त्यासाठी येताहेत असे उगाच काही सांगून आम्ही मुलांच्या आनंदावर विरजण पाडणार नव्हतो आणि सलीलचे मेल पाहून आम्हालाही आनंद झालाच होता!!!!!’अग्गोबाई- ढग्गोबाई’, ’मी पप्पाचा ढापून फोन’ म्हणणारा काका कधी येणार हा प्रश्न आता दिवसाला एकदा येत होता!!!! जशी मुलं वाट पहात होती तशीच आम्ही मोठेही……

   कितीक हळवे कितीक सुंदर

किती शहाणे आपूले अंतर

    त्याच जागी त्या येऊन जाशी

माझ्यासाठी माझ्या नंतर

ऐकले की नकळत आम्हीही एकमेकांकडे बघतोच की!! संदीपच्या शब्दांची हीच खरी जादू आहे की ते अगदी आपले वाटतात…… आपल्याच मनाच्या कुठल्या तरी भावनेला तो न्याय देत असतो…… जे काही अगदी मनातले सांगायचे असते पण नेमके शब्द सुचत नसतात तिथे संदीपला गाठावे…… प्रत्येक प्रश्नाचे त्याने सुंदर शब्दात गुंफून उत्तर दिलेले असते, अगदी समर्पक, विलक्षण सौंदर्य असलेल्या उपमा तो ज्या सहजतेने देतो की ऐकत रहावे!!!!  गाण्याच्या जश्या जागा असतात, लय असते, तान असते तशीच त्याच्या काव्यातही अश्या काही सुंदर नक्षीकाम केलेल्या जागा असतात की अरसिक माणसानेही ’व्वाह!!!!’ म्हणावे!!!! आपल्याला आपलीच ओळख नव्याने पटत जाते…. सोप्या शब्दात तो ’आयूष्यावर काही बोलत’ जातो आणि एरवी अवघड वाटणारे प्रश्न आपल्याला सुटत जातात 🙂

प्रश्न मला जो पडला नाही

त्याचेही तुज सुचते उत्तर…..

या मग केवळ ओळी रहात नाहीत.

’मेघ नसता वीज नसता” असो की ’लव लेटर’ असो संदीप आपल्या मनाचा ठाव घेत असतो……. पावसाचे गाणे तो गातो आणि त्याच्या रसिक मनाचे आपल्याला दर्शन होत जाते. ’आयूष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम यापुर्वी पाहिला होता तो टिव्ही वर, पण यावेळेस तो अनुभवायचा होता प्रत्यक्ष.

भर पहाटे मी फुलांनी

दृष्ट काढून टाकली

पाहती स्वप्नी तुला जे

भय तयांचे वाटले…….

ह्या प्रचंड आवडलेल्या ओळी खुद्द संदीप गाताना ऐकायच्या होत्या!!!

कधीतरी आपल्याला अचानक साक्षात्कार होतो की आजकाल आपण फार काही कंस्ट्रक्टिव्ह करत नाहीये, उगाच उदास रिकामे वाटते. आणि सलील- संदीप गातात …

व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे

उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे

या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला

मी न छळावे त्याना त्यांनी छळू नये मजला……….

आताशा मी फक्त रकाने दिवसाचे भरतो……. किती सोपे, सहज रोजच्या वापरातले शब्द पण केव्हढा अर्थ त्या कवितेत!!!

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मंडळाच्या काही कुटुंबांना सलील-संदीपला भेटायला मिळणार होते…… डिनर त्यांच्याबरोबर… कोण सोडतय ही सुवर्णसंधी 🙂 …… मनात मात्र विचार होते आपण बोलू शकू का व्यवस्थित, ते बोलतील का आपल्याशी???? आपल्याला सलीलचे लोकसत्तामधले जे लेख आवडतात त्यांची नावं ऐन वेळेवर विसरायला तर नाही ना होणार 🙂 …… उगाच टेन्शन मला आपले!!!

ठरल्या प्रमाणे ते दोघे आले….. सगळ्यांना भेटल्यानंतर काही वेळातच जाणवलं की हे वातावरण अजिबात औपचारिक नाहीये!!! इथे मनमोकळं बोलता येतेय आपल्याला…… पटकन सलीलला सांगून टाकले की त्याने लिहीलेले लेख मी फक्त वाचतच नाही तर नवऱ्याला वाचूनही दाखवते!!! त्याबद्दलचे मत मी कळवते ह्याची त्याला आठवण आहे हे पाहून पटकन आपली कॉलर ताठ करून घेतली 🙂 . मुलंही खुश होती कारण एकतर सलील-संदीप काकांनी त्यांना जवळ बसवून फोटो काढले होते आणि मनाजोगत्या गप्पा मारल्या होत्या.  ईशानच्या डायरीतली दोघांची सही पहाणे हा तर सध्या त्याचा आवडता छंद झालाय!!! गौरीने सहीसाठी डायरी पुढे केल्यावर मात्र संदीपकाकाने तिला अट घातली की ती जर एक गोड पापा देणार असेल तर तो सही करेल……. एकूणातच एक सुंदर अनुभव आम्हाला मिळाला होता!!!! एक असा अनुभव की जो येणारे अनेक दिवस मन प्रसन्न करत राहील.

आजवर कलाकार म्हणुन हे दोघे आम्हा रसिकांना आवडत होते पण एक माणूस म्हणूनही ते आमच्या मनात जागा करून गेले. त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक गाण्यांतून दिसतेच…. पण त्यातही ’दुर देशी गेला बाबा’ आणि ’दमलेल्या बाबाची कहाणी’ हे तर कळस आहेत!!!!! संदीप चे शब्द आणि सलीलचे संगीत आणि आवाज आणि काय हवे 🙂 !!!!!

जपत किनारा शीड सोडणे -नामंजूर

अन वाऱ्याची वाट पहाणे- नामंजूर

मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची

येइल त्या लाटेवर झुलणे -नामंजूर

किती जणांना प्रेरणा दिली असेल या गाण्याने!!! 🙂  ‘मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो’ असो की ’खरा खुरा नास्तिक’ असो आपल्याला कुठेतरी नक्कीच भेटलेली असतात ही माणसं… फक्त त्यांच्या ईतक्या नेटक्या काव्यमय व्याख्या या जोडगोळीने केल्यात की बस आता कोणी यापुढे यावर काही बोलुच नये!!!  ’नसतेस घरी तू जेव्हा’ ऐकून मला वाटतयं काही घरातले वाद तरी नक्कीच मिटले असते 🙂 (ईन्क्लुडिंग आमचे घर 😉 )

संदीपप्रमाणेच सलीलही पट्टीचा लेखक आहे हे लोकसत्तामधल्या त्याच्या लेखांतून जाणवते. चतुरंग पुरवणीतले ’म्युझिकली युवर्स’ हे सदर अतिशय सुंदर असते. ’अर्पणपत्रिका’ , ’दमलेल्या बाबाची कहाणी’ ,’ कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो’ ते ’नातलग’ आणि ’मी म्हणालो बरं’ असो….. संवेदनशील मनाला माध्यमाचा अडथळा येत नाही हे त्याने सप्रमाण सिद्ध केले आहे…… 🙂 ’सारेगमप’ चा परिक्षक म्हणून जेव्हा तो सामोरा आला तेव्हा स्वयंपाकघरातले एक से एक दाखले देउन त्याने सुगरणींना तोंडात बोटे घालायला लावली होती!!!!!

मस्कतला झालेला कार्यक्रमही असाच मस्त रंगला…. तीन तास केव्हा गेले खरच कळले नाही!!! यातली किती तरी गाणी कित्येकदा ऐकलेली. ’आयूष्यावर बोलू काही’ चे निवेदनही पुर्वी ऐकलेले काहीसे…. पण नाविन्य राखून तो कार्यक्रम अतिशय रंजक करण्यात या दोघांना सहज यश मिळालेले होते!!!! पुढच्या वेळेला येऊ तेव्हा सहा तासाचा कार्यक्रम करू असे सलील-संदीप म्हणाले तेव्हा ही सुरेल मैफल आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळणार याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता!!!!!

मराठी साहित्य मुळातच अतिशय श्रीमंत आहे त्यात या दोघांसारखे सातत्याने उत्कृष्ट योगदान करणारे कवी-संगीतकार पाहिले की मराठी पाऊल नक्की पुढे पडतेय याची खात्री पटते!!!

या दोघांची मी मोठी चाहती आहे हे तर एव्हाना तुम्हाला समजले असेल 😉 पण त्यांच्या संपुर्ण काव्यमय प्रवासाला एका लेखात बांधण्याची क्षमता माझ्या प्रतिभेत नाही याची मला पुरेपुर जाणिव आहे……. म्हणून लेखाचे नावच दिलेय ’हे भलते अवघड असते!!!!! ’ 🙂

संदीप-सलील तुम्हा दोघांना अनेक अनेक शुभेच्छा आणि मनापासून सलाम!!!  गेले अनेक वर्ष तुम्ही आम्हाला नव्या नव्या गाण्यांची ओळख करून देत आहात , यापुढेही द्याल….. आम्ही अदृष्य असलो तरी सहप्रवासी आहोत हे निश्चित 🙂

Advertisements