दक्षिणायन -एक प्रवास !!

मी मागे माझ्या एका पोस्टमधे म्हटले होते की सुट्टीत फिरायला जायचे आम्ही ठरवलेले अनेक बेत माझ्या आजारपणापायी रद्द करावे लागले , आणि या गोष्टीची एक बोच मनाला लागून होती माझ्या. मी बहूधा विसरले होते सुट्टीतल्या पिकनिक स्पॉटसारखा एक Sunrise point माझ्या घरात आहे. गेल्या वर्षी आम्ही या सनराईज पॉइंटचा मनसोक्त आस्वाद घेतला होता.

नेमेची येते मग पुन्हा दक्षिणायन, हो किनई…. तसे ते यावर्षीही आले. सूर्यराव दक्षिणेला सरकले आणि त्यांचं रोज सकाळी आमच्या घराच्या दोन्ही बेडरूम्सच्या खिडक्यांमधून मनोहारी दर्शन होऊ लागलं. आता आम्हाला कोणाला ’उठवावं’ लागत नाही…. अगदी मुलांनाही ‘लवकर उठा नाहितर sun निघून जाईल’ इतकाच हाकारा पुरतो. रोजचा ’सूर्योदय’ आदल्या दिवशीपेक्षा नवा आणि मोहक कसा असतो हे कोडं पडलं तरी ते सोडवण्यापेक्षा ’निसर्गाची किमया’ मान्य करून अनुभवण्यात जास्त सुख असतं नाही का 🙂

आत्ता टाकलेले फोटो वेगवेगळ्या दिवशी काढलेले आहेत.

गेल्या वर्षीच्या दक्षिणायनात या सूर्याला पाहून, रात्रीच्या प्रसवकळांच्या या सोनेरी सुटकेला पाहून काही ओळी लिहील्या होत्या :

काळ्या काळ्या रात्रीला ,
सोनेरी स्वप्न पडलं….
पहाटेचंच स्वप्न ते ,
तेजस्वी सत्यात उतरलं !!

002

002

आपली माणसांची मोठी गंमत असते नाही, आपल्यामते सूर्य ’उगवतो’ आणि ’मावळतो’ !! तो तर एखाद्या ध्यानस्थ , व्रतस्थ ऋषीसारखा युगानूयूगे एक प्रखर तप करत बसलाय. भिरभिर , गरगर लागलीये ती आपल्या प्राक्तनी. पण हिंमतवान आम्ही, स्वत: फिरणार आणि त्यालाच म्हणणार की हा आत्ता ’उगवलाय’ . एखाद्या माणसाला म्हणा बरं , ’की का रे आत्ता उगवलास ? ’ 🙂 . नाही नं ,माणसं असं काही ऐकून घेत नाहीत आणि सूर्य या म्हणण्याचा राग मानत नाही. हेच तर मुळी आपलं न्यून आणि त्याचा मोठेपणा !!

016

017

मला लिहीण्याची खूमखूमी आहेच नं , त्यात असा रोज सूर्य़ नजरेसमोर पडणार आणि त्यानिमित्ताने मी ’पहाटे’ साताच्या सुमारास ( 😉 ) उठणार असेन तर काव्यच स्फुरतं अगदी …. 😉 !! माझं काव्य (?) टाकणारही होते मी पण तितक्यात अमृताबाई आल्या मदतीला ….त्यांनाही सूर्याने असेच मोहात पाडलेय हे पाहून मला विलक्षण आनंद झालाय!!

त्या लिहीतात…

पूरब ने चूल्हा जलाया, पवन फूंके मार रही,
किरने ऊंची हुईं, जैसे आग की लपटे !!

हा असला काही विचार माझ्याच्याने स्वतंत्रपणे पेलेल तो दिवस सोनेरी 🙂

पुढे त्या लिहीतात,

नींद के होंठों से जैसे सपने की महक आती है
पहली किरन रात के माथे पर तिलक लगाती है
हसरत के धागे जोडकर शालू-सा हम बुनते रहे
विरह की हिचकी में भी हम शहनाई को सुनते रहे!!

036

043

आणि हे अजून काही मनमोहक उधळणीचे नमूने 🙂

इथे अमृताच्याच एका दुसऱ्या कवितेच्या ओळी आठवतात….

पूरब ने कुछ पाया है कौन से अम्बर को टटोलकर
जैसे हाथ में दुध का कटोरा, उसमे केसर घोल दिया है!!

008

010

खरं तर हे फोटो आणि रोज सूर्योदय पहाण्याचा सोहळा हे लिहिण्याचे नाही तर अनुभवण्याचे विषय.

ही नोंद इतकेच सांगणारी, लक्षात ठेवायला लावणारी की ज्याचा रोज ’अस्त’ होतो तो तितक्याच जोमाने पुन्हा ’उदय’ पावतो. फिर हमको कायको डरनेका 🙂 .

सध्यातरी हॅपी दक्षिणायन … बाकी काही नाही !! लवकर निजे लवकर उठे त्यास सुरेख सुरेख सूर्योदय दिसे 🙂

Advertisements

छोटा दोस्त-२ (छोटा जादूगार)

3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5

तरंग ब्लॉगवर परवा हा क्रम पाहिला पत्त्यांच्या जादूचा….यात कुठलेही एका प्रकारच्या १३ पानांना या क्रमाने लावायचे. आणि मग वन ते किंग अश्या स्पेलिंगनूसार ते ते पान काढून दाखवायचे. आपण प्रत्येकाने लहानपणी अश्या कितीतरी गमती केलेल्या असतात. आपल्याला समजलेली जादू कितीतरी वेळा करून दाखवायची आणि समोरच्याने कितीही वेळा विचारले की सांग ना कसे करायचे तरी सांगायचे नाही!!!!मग एखाद दिवशी हळूच मी तुला सांगते पण तू कोणाला सांगू नकोस, नाहीतर मजा नाही येणार करत एखाद्याला सांगायची.

या बाबतील आम्ही जाम लकी होतो कारण आमचे बाबा आम्हाला हे सगळे शिकवायचे त्यामूळे मैत्रीणींमधे आमचे नाक वर !!!!! तरंग ब्लॉगवरच्या पोस्टमूळे लहानपण आठवले आणि मग आला समोर माझा छोटा दोस्त….तर आज त्याला शिकवलेल्या काही जादू.

तूम्ही नाही शिकवल्या अजून मुलांना…मग शिकवा आणि मी ज्या विसरले त्या मला कळवा.

१.  3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5 या क्रमाला आम्ही एक गोष्ट सांगायचो.  ती अशी की ३८७ वर्षापूर्वी एक(A) राणी(Q) होती ती ६४ वर्षाची होती, तिला २ मुले होती. एकाचे नाव जॅक (J) आणिगोष्टीनूसार लावलेली पाने दुसऱ्याचे नाव किंग (K) होते. जॅकचे वय होते १९ आणि किंगचे ५. आता  गंमत पहा………….असे म्हणत ती पाने क्रमाने लावायची आणि मग तो गठठा उलटा धरून त्या त्या स्पेलिंगनूसार ते ते पान काढून दाखवायचे.

२.ही जादू अतिशय सोपी आहे…आणि नवशिक्या लहान मुलांसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी.  यात आपल्याकडच्या पत्त्यांमधील एक पान समोरच्याला बाहेर काढून लक्षात ठेवायला सांगायचे. मग ते पान आपल्या हातातल्या पत्त्यांत सगळ्यात वर ठेवायला सांगायचे.         मग आपले हात मागे घेऊन एका हाताने काळजीपुर्वक ते पहिले पान उलटे ठेवायचे. म्हणजे समोरच्याने उलट ठेवलेले ते पान आता सुलट झालेले असेल…..काळजीपुर्वक हातातले पत्ते समोर असे धरायचे की ते सुलट झालेले पान आपल्या डोळ्यासमोर यईल आणि त्याचवेळेस कॅटचे शेवटचे पान समोरच्याला दाखवून विचारायचे की हे तूझे पान आहे का????? तो मजेत ’नाही’ म्हणत असताना आपण मात्र त्याचे  पान पाहिलेले असते. हात पुन्हा मागच्या बाजूला घेउन ते पान पुन्हा पुर्वव्रत उलट ठेवून पत्ते हवे तेव्हढे पिसावे आणि मग जादूने ते पान शोधून दाखवावे.

३. ही देखील आणखी एक सोपी जादू…..९ पानांची. यात हे ९ पाने ३X३ अशी मांडावी. समोरच्याला एक पान मनात धरायला सांगावे…मग आधि उभ्या आणि नंतर आडव्या कोणत्या रेषेत ते आहे विचारून ओळखावे.3X3 लावलेली ९ पाने

 

४. २१ पानांची जादू…ही शिकवायला आमचा दोस्त अजून लहान आहे……पण इथे लिहून ठेवले म्हणजे हा मागे भूणभूण लावून आज नाही तर उद्या शिकणार हे नक्की.

 

पत्त्यांचे घर....

 

 

 

 

 

५. पत्त्यांचे घर…..पेशन्सची कमाल मागणारा खेळ.

आमचे बाबा सुट्टीत आम्हाला दरवर्षी पत्त्यांचा एक नवा खेळ शिकवायचे. बदाम सात, रमी, चॅलेंज, नॉट ऍट होम,झब्बू,गुलाम चोर, मेंढीकोट……कितीतरी. याहीवेळेस ते मस्कतला माझ्या घरी आले तेव्हा आम्ही आवर्जून पत्ते आणले होते. बदाम सात सारखाच खेळ पण काय मजा यायची…कहर म्हणजे जजमेंट खेळण्याची…..माझी आई हातात पत्ते आले की पटकन किती हात होणार ते सांगायची मग अर्ध्या खेळात विचारायची अरे पण अमित हुकूम काय आहे रे??? हसून हसून दमायचो आम्ही….नवरा रोज सांगायचा काकू हात सांगण्याआधि थांबत जा ना जरा……

पत्ते खेळणे……तसे वाईट मानणारी अनेक जण भेटली. माझ्या एका मैत्रीणीच्या आजीला आमचा फार राग यायचा, तिचे मत घरात पत्ते ठेवू नये……पण मला मात्र मनापासून आवडणारा खेळ. बावन्न पान आणि कितीतरी खेळांचे प्रकार. मला सगळ्यात आवडायचे ’नॉट ऍट होम’ कारण त्यात बरेचदा मी जिंकायचे……माझे बाबा मला बोटाने नंबर दाखवून ते कोणाकडे आहे ते खुणेने सांगायचे, ही झाली लबाडी पण ती न करताही मला जमायचे ते. चॅलेंज खेळताना माझ्या बहिणीच्या आधि बसणारा नेहेमी जिंकायचा कारण ही सतत चॅलेंज करायची….मग काय खरे पत्ते लावा आणि सुटा. मामाला पत्त्यांना मस्त कैची मारता यायची…..ती आम्ही प्रयत्नपुर्वक शिकलो होतो. आजीकडे पत्ते खेळताना मामा नेहेमी लबाडी करायचा आणि ती नेमकी मामी पकडायची…..मग त्यांचे भांडण ठरलेले. आम्ही आपले दोन्ही एंजॉय करायचो, पत्ते आणि भांडणही 🙂

मला माझच आश्चर्य वाटत होतं आज…..मुलगा टि.व्ही. त रमतो याचा बागूलबूवा करत बसण्यापेक्षा आपण ह्या साध्या गोष्टी त्याला  शिकवल्या तर तो त्या आनंदाने शिकेल. पण आमची गाडी धक्का स्टार्ट….तरंग ब्लॉगने मला धक्का दिला आणि मी मुलाला हे सगळे शिकवले………त्या पठ्ठ्यानेही एकदाच शिकवल्यावर बिनचूक करून माझा हुरूप वाढवला आहे.

आता हळूहळू ईतरही लहानसहान खेळ त्याला शिकवायचे आहेत. राजा भिकारी सारखा वेळ खाउ खेळ असो की बिस्किटसारखा स्मरणशक्तीची परिक्षा घेणारा खेळ असो…..मि. बीन नावाच्या त्या कार्टून सदृश प्राण्यापेक्षा नक्कीच जास्त रंजक आहे.