घरटं….

 

 

(वेळ –  संध्याकाळ पाच वाजलेले … )

 

— जायचय का तुला आज मॉलमधे ??? बघं मुलं घरी यायला वेळ आहे अजून… तुझी खरेदी आटोपेल तेव्हढ्यात….

 

— नको रे, आज राहू देऊ या का मॉल ?? मुलं असताना जाऊ या…. तसेही ती वाढदिवसाची पार्टी कधी संपेल कल्पना नाही… नेमके आपण जायचो आणि मुलं यायची…

 

— अजब आहेस तू ….. अगं आपण जाणार आहोत ना त्यांना घ्यायला… वेळही ठरलीये… त्याआधी कसे येणार ते ??? मुलं असली सोबत मॉलमधे की का वैतागतेस मग, की वर्षानुवर्षे राहीलं इथे तरी मेलं मॉलांमधे कोणकोणत्या गोष्टी मिळतात समजायचच नाही…. मुलं मला काही सुचू देत नाहीत …. एकदा मला मुलं नसताना घेऊन ये तू मॉलमधे… वगैरे वगैरे!!!!

 

— कळंsssssलं …. गाडी घराकडे ने गुपचुप !!!!

 

–ठीक आहे….. आणि बाई आज शक्य आहे तर लाव ना तुझी लाडकी जुनी गाणी गाडीत….. एरवी मुलं त्यांची आवडती गाणी लावतात तर करवादतेस की काय धांगडधिंगा आहे म्हणून ….

 

— राहू दे… असू दे हीच गाणी … कुठे शोधू आता माझ्या लाडक्या गाण्य़ांचा पेन ड्राईव्ह…. चालू दे आपलं काहीतरी….

 

— 😊

 

— माऊ असती गाडीत तर या गाण्याला ओरडली असती, “आवाज वाढवा …  ” ….

 

— विचित्र बाई आहेस तू . इतकच समजलेय मला आता….  … सांगणार आहे मी आज मुलांना मम्माने तुमची आवडती गाणी ऐकली…

 

— मी काही ऐकत नाही रे ही गाणी… गप्पा मार बघू माझ्याशी… बोलायचं राहून जातं म्हणतोस ना एरवी…  आता बोल ना मग !!!!

 

…………….

 

……………

 

( संध्याकाळ -साडे सहा )

 

— किती वाजले रे…. घरं कसलं शांत असतं नाही मुलं नसली की!!! शाळेत जातात ती वेळ माझी कामात जाते पण नंतर ते नसले की शुकशुकाट होतो घरात नुसता….

 

— हो का!!! अगं पण पसारा घालतात ना ते …..  … तुच ओरडतेस….

 

……………

 

…………..

 

(संध्याकाळ – सव्वा सात )

 

— बरं जेवून घेऊ या का पटकन… मग निघू या मुलांना आणायला… .

 

— हो चालेल…. किती किती वेळ ठेवतात नाही लोक वाढदिवस….. फोन करू का त्यांना की आम्ही येतो लगेच मुलांना घ्यायला…

 

—  … अरे बातम्या बघ की… जगात किती घडामोडी घडताहेत ना… एरवी कुठे मुलं ऐकू देतात तुला …. एकतर आवाज तरी करतात नाहीतर पोगो किंवा कार्टून पहातात  …. मी नाही हं म्हणत हे तुच म्हणतोस मुलांना…..

 

—  … डाव उलटवलास 😊

 

 

— श्या आपण दोघेच जेवतोय एकटे , मजा नाही येत… मधे मधे ताटात लूडबूड नाही तर करमत नाहीये….

 

—  … ओ महाराज दोघं ’एकटे’ कसे असतात हो….. खरं सांगू आपण दोघं आत्ता आहोत आपल्या आई वडिलांसारखे… ते पण तर हल्ली असतात दोघेही ’एकटेच’ …. आपण निदान काही वेळाने मुलांना घरी आणणार हे माहीतीये आपल्याला…..

 

 

—  … सध्या आपण पिल्लांना चोचीने दाणा भरवणाऱ्या फेजमधे आहोत नाही…. पिल्लं अवतीभोवती चिवचिवताहेत….. मग ती हळूहळू मोठी होतील… नव्हे त्यासाठी आपणही धडपडू….. उंच आकाशातल्या त्यांच्या भराऱ्यांची स्वप्न पाहू…. ते उडतील त्याकडे कौतुकाने पाहू….

 

—  …. ते ’उडतील’ आणि मग उडून जातील…. वेगळी घरटी बांधतील….. त्याचं काय मॅडम ???

 

—  बांधू दे…. उलट मी म्हणेन बांधू दे…  जमवू दे एक एक काडी…. पहिल्या काही काड्या पुरवायच्या हव्या तर तू न मी…. आणि ठेवायचं हलकसं लक्ष घरट्याच्या मजबूतीकडे…. त्यांच्या नकळत हं!!! त्यांच्या पंखातली ताकद, जिद्द वाढती ठेवायची….

 

 

— मग पिल्लं त्यांच्या घरट्यात बसतील नी हलकेच मागे वळून पहातील… आई- वडिलांचं घरटं असेल ना नीट असा विचार करतील…. दमले थकले की येतील इथे विसावायला…..

 

— …. आवरा…. लेडी शेखचिल्ली…. माझं झालय जेवणं…. तुमचा खयाली ’पुलाव’ शिजवा आता गाडीत… मी फोन करून येतो… मुलांना आणायला जाऊया….

 

— कुचकट … 😊

 

………………..

 

………………..

 

( संध्याकाळ – आठ वाजलेले )

 

— य्येssssss….. मम्मा बाबा …. आम्ही आलो!!!!!

 

—  मजा केली ना पार्टीत….. आम्ही तुमची वाट पहात होतो…..

 

— जाम जाम मजा आली रे बाबा …  आणि मम्मा वाट कशाला पहायची…. आम्ही येणारच ’असतो’ ना!!!

 

— हो रे… मम्माला सांग हेच पुन्हा एकदा आता …😊

 

………….

 

(वेळ रात्रीचे साठे आठ पावणे नऊ ….)

 

— अरे त्या रिटर्न गिफ्टांच्या पिशव्या नका रे फेकू इथे तिथे….. कपडे बदला…. हात पाय धूवा… आवरा रे….. ते फुगे तर सरळ डस्टबिनमधे जाऊ द्या… कोणी खेळत नाही… लोळतात नुसते घरभरं….. पसारा घालू नका sssssss !!!! मी काय बोलतेय…. कानात शिरतेय का तुमच्या ???

 

—- पीं sssssssss!!!!!

 

— बंद करा रे त्या ’पिपाण्या’ ….. लोक पण ना का देतात ही डोकेदुखी देव जाणे….काय एक एक खूळ निघतं नवं नवं …..

 

— मम्मा आपणही माऊच्या बड्डेला दिल्या होत्या हं या … उगाच बोलू नकोस….😊

 

— हो ना, दिल्या होत्या ना… नाही दिल्याचं होत्या… लोक माझं डोकं दुखवतील मग मी का त्यांचे कान किटवायचे नाहीत!!! तुम मेरे बच्चे को पिपाणी दो मै वहीच म्हणजे वैसीच दुसरी तुम्हारे बच्चे को दुंगी…. मराठी बाणा आहे हा!!!

 

— मम्मा तू पण ना …😊

 

— कळलं ना मम्मा पण काय ते… चला झोपायला…..

 

— नशीब तुझं बाळा, कळली तुला तुझी मम्मा… मला अजूनही कोड्यात टाकते ती…..  मुलं असली की त्यांच्यावर रागवते आणि नसली की कधी येतील याची वाट बघते…. चालू दे माते तुझे अखंड 😊

 

 

— चूप रे तू…. असेच असते हे,  पिढ्यानूपिढ्या हेच घडणार असते…. उगा मला बोल लावू नकोस!!!

 

………………

 

 

(वेळ रात्रीचे दहा )

 

— मम्मा जून कधी येईल ????

 

— मम्मा झालं हिचं सुरू….. आधी विचारायची आपण इंडियाला कधी जाणार?? तू सांगितलस जून महिन्यामधे तर आता सारखी विचारते ’जून कधी येणार ??? ’ …

 

— आता लगेच येणार हं जून … लवकरच…. झोपा बघू आता….

 

— मम्मा मला नानीची आठवण येतीये….

 

— मम्मा मलापण, मी पण मिस करतोय त्यांना…. ते पण आमची आठवण काढत असतील ना…. कधी येइल जून असे वाटतेय मलापण…

 

—  हं….

 

— पण मम्मा आपण सगळे असे वेगवेगळे का रहातो…. ते पण दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमधे ??? सगळ्यांना एकाच ठिकाणी जॉब का नाही करता येत???

 

— मोठं होणं म्हणतात बाळा याला….. असू दे, नंतर सांगेन सगळं … झोपा आता… उद्या शाळा आहे!!!!

 

— ए मम्मा नानीच्या घरामागच्या नारळाच्या झाडावर सुगरणीने घरटे बांधले असेल ना…. ती खाऊ आणत असेल आतल्या पिल्लांसाठी…. मम्मा, मागच्या वर्षीची पिल्लं आता मोठी झाली असतील ना… धमाल!!

 

—  हो रे बाळा झालीयेत पिल्लं मोठी…. आता ती वेगळी रहातात…. सुगरणीच्या पिल्लाने मात्र पुन्हा एकवार सुंदर ’घरटं’ विणलय ., तसच अगदी मऊसूत, उबदार… मस्त झोका असणारं ..मन लावून , जिद्दीने. काडी काडी पारखून जमवून…. माहीतीये तिला पिल्लंं मोठी होणार मग भुर्र्कन उडून जाणार एक दिवस… तरीही….

 

आणि आता मोठ्या सुगरणीची पिल्लं उडत उडत त्या घरट्याकडे धाव घेणारेत , विसावायला… जगण्याची , उडण्याची जिद्द पुन्हा पंखात साठवायला!

 

—- अहो मिसेस. सुगरण झोपा आता !!!  😊

 

— गुडनाईट मि.सुगरण 😊

 

…Tanvi Amit

 

#Monday_memories 🙂

#blogging_not_gone_with_the_wind

Advertisements

चांदणसय…..

अंधाराची सावली आकाशाने पांघरण्यापूर्वीच मनात दाटून यायला लागणार … सांजवेळ अन  हुरहूरीचं नातं तसं जुनं ….. तो आता बॅगा आवारायला घेणार …. दिसणारं सामान भरणार आणि त्याच्यामाझ्या नकळत माझा श्वास त्या बॅगांच्यात गूंतून जाणार….. ” झालं ना सगळं आवरून , काही राहिलं का बघतो ” तो म्हणणार,  तेव्हा मात्र ती सांजसावली तिच्या मनाभोवती अजूनच गडद होऊ लागणार….निरोपाचा क्षण लांबवू नये म्हणतात …. तो तसा त्या क्षणाला चटकन आटोपतं घेणार …. ” दारापर्यंतच ये तू , रात्रही बरीच झालीय आणि घरात मुलंही झोपलीयेत ” …. त्याचं म्हणणं ती निमूट ऐकणार…

हे असं सगळं होणार हे तिच्या सवयीचं झालं होतं एव्हाना ….. कंपनीने त्याच्या अचानक केलेल्या बदलीचा राग पुन्हा पुन्हा मनात  येत होता तिच्या !! त्याच्या लिफ्टने जमीन गाठली आणि तिने धावतच घराची खिडकी गाठली मग ….क्षणाक्षणाला दूर जाणारी गाडी दिसेनाशी झाली तरी ती बघत राहिली …..  निरोपाचा क्षण प्रत्यक्षात संपला तरी मनात तो संपता संपत नाही…. त्या क्षणाला मुठीत घट्ट पकडल्यासारखी किंवा स्वत:च त्या क्षणाच्या मुठीत घट्ट सापडल्यासारखी ती तिथेच थांबली…. थिजल्या , गोठल्यासारखी , वार्‍यासह येणार्‍या एकटेपणाच्या जाणिवेला मनाच्या कानाकोपर्‍यावर पेलत…..त्याच्या मागे हरवलेल्या मनाच्या परतीची वाट पहात…..तो दूर जातोय …. काही तासातच त्याच्यामाझ्यामधे एक संपूर्ण समूद्र उभा राहील …. विचारांच्या आवर्तनाचेही हे नेहेमीचेच , नाही विचार करायचा ठरवलं तरी ते तसे जमेलच याची शाश्वती नाही…. सगळा समुद्र आता डोळ्यात उतरायला लागला तिच्या !!

दूरवर पसरलेल्या आकाशाकडे नजर गेली तिची… निषेधाची काळीशार शाल पांघरून ते ही अबोल मौनात हरवलेले होते अगदी….
रितं रितं आकाश
चांदणही फितूर सारं
अथांग पट एक
अनं काळोख काळा …..

दूरवर तो गेला आणि ती स्वत:लाच सापडेनाशी  झाली….झोपलेल्या मुलांच्या अंगावर पांघरूण सारखे करत ती तिथेच रेंगाळली ….. अस्तित्वाचे सुटे सुटे भाग जोडत राहिली ….

माझ्या अस्तित्त्वाचं
असणं नसणं तुझ्यात सारं
आसमंतातून झेपावलेला
थेंब टपोरा तू
अनं
मृद्गंधाचं वलय शोधणारी मी !!

‘ मृद्गंध ‘  शब्दाभोवती विचारांची साखळी थबकली क्षणभर …. त्या सुवासिक वलयाने  तिच्या  मनावरल्या काजळसावलीला हलकीच मात दिली !! एक हसरी सुगंधी चांदणी डोकावून गेली मनात ….  सुगंधाशी तिचं नातं घट्ट अगदी …. तिला अंगण हवं होतं एक , मोगरा, जाई, जुई, निशीगंध , रातराणी , सोनकळ्यांच्या सोनचाफ्याने बहरलेलं …. मध्यभागी पारिजातकाचा सडा घालणारं …. एका कोपर्‍यात लबाड लपलेल्या हिरव्या हिरव्या मारव्याचं ….

” हवय ना तुला ते सुगंधाचं अंगण , मग मी न जाऊन कसे चालेल बरं …. ” त्याचा नेहेमीचा प्रश्न आठवला तिला . ”हं …. मग नको मला ते अंगण , पण तू जाउ नकोस… ” तिचे ठरलेले उत्तर यायचे…

” मूलांनाही हेच सांगायचे का आणि वेडाबाई ? तुम्हा तिघांची स्वप्न ही एखाद्या कॅलिडोस्कोपसारखी पहातो मी …. तुम्ही तिघे असे उभे आणि स्वप्नांचे नवनवे आकार …. त्यांना मूर्त स्वरुप देण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा मी …. “

” अच्छा ….. आठवतय लग्नानंतर मी पहिल्यांदा माहेरी गेले होते , सकाळचे बारा नाही वाजले जेमतेम तो पाच फोन केले होतेस तू… सगळे रागावले होते माझ्यावर , तरी तू बोलावून घेतलेस मला…. धावत्या रेल्वेत चढला होतास आणि माझा हात घट्ट धरून म्हणालास की पुन्हा जाऊ नकोस वगैरे …. आणि आता मी म्हटले तर मलाच समजावतोयेस !! “

” अरे देवा , तुम्ही मनाने तिथेच का अजुन ? उतरा आता त्या ट्रेनमधून मॅडम … तसंही मी सांगतो सगळ्यांना आमच्या मॅडम आठवणींच्या खुंट्याला बांधलेल्या आहेत …. “

हसरी पैंजण झंकारत आलेल्या आठवणीने मनात एक प्राजक्तचांदणी अजुन फुलवली …… आठवणी …. एकेकट्या येत नाहीत या कधी …. एक आली की तिच्या पाठोपाठ दुसरी हजर ….  अंधाराचे राज्य यांचे आवडते …. गनिमी कावाच मग …. मनाच्या राज्यावर धावा आणि ताबा !!

मनभर आठवणींचा आता
काहूर पसारा
यात ‘तू’ त्यात ‘तू’
तुझ्यामाझ्यात व्यापलेला तूच ‘तू’ !!

रूसलेल्या , रागावलेल्या , हसलेल्या, लाजलेल्या , अवखळ खट्याळ …. क्षणभर चमकणार्‍या तर क्षणात अंधाराच्या ओंजळीत चेहेरा लपवणार्‍या … लुकलुकणार्‍या चांदण आठवणी ….

नाजुकश्या , अलवार , हळव्या चांदणसेनेने मनावरचं मळभ मागे हटवत त्यावर मात केली जशी …. रात्रीचा अंधाराचा पदर आता कोरा , रिकामा नव्हता …. चमचमणार्‍या चांदणखडीची नक्षी आता उमटली होती त्यावर …. प्रत्येकीचं स्वतंत्र अस्तित्व आणि प्रत्येकीची आगळी गुपितगोष्ट …

पहाटेचा प्रहर आणि ” मी सुखरूप पोहोचलो ” असा त्याचा निरोप एकत्रच आले …. मनावरचा आळस झटकलेलाच होता, उठून तिने खिडकीचा पडदा सरकावत सूर्याला घरात बोलावलं तेव्हा अथांग आकाशभर विखूरलेली तिची चांदणपाखरं सूर्यकिरणांच बोट धरून तिच्या कुशीत परतली …. उजाडलं , उजळलं पुन्हा सारं ….

मुलं उठून आता बाबाविषयी विचारायला लागली होती… रडारडी न करता पटकन आवरायचं असं  त्यांना सांगताना , ” आम्ही ठीक आहोत , काळजी करू नकोस ” असं ती बाबाला लिहीत होती….

अंधार आणि कातरवेळ , एकटेपणाची गडद सावली पुन्हा येणार नव्हतीच असं नाही …. पण  आठवणींचा पटाचा मनाच्या मधोमध रूजलेला पारिजातक  ….. नाजुक एक एक चांदणसय ,तो केशराचा देठ आणि टपटप होणारी सुगंधाने भारलेली स्वर्गीय चांदणपाखरण ….. काळोखाचा पडदा पुन्हा दिवसाला घेरेपर्यंत ती आता उभी होती … ठाम …. खंबीर आणि समर्थ…. !!

शंकऱ्या….

काल तुझी जाम आठवण आली …. जाम म्हणजे जामच…. आता म्हणशील ना ’हा जाम शब्द कुठला??’ … हा आम्ही तेव्हाही वापरायचो, तू होतास तेव्हा… तुझ्यासमोर त्याला ’फार’ असे म्हणायचो…. शब्द महत्त्वाचा नाहिये रे….. काल ’जाम’ आठवण आली , नेहेमीच येते पण काल खरचं I missed u…. काल तुझा वाढ्दिवस होता….. गेलास सहा वर्षापुर्वी तेव्हा बहुतेक ७४ वर्षाचा होतास तू….. काल ८०चा झाला असतास…..

शंकऱ्या…. शंकर रामचंद्र घमंडी…. किती चिडवायचे मी या ’घमंडी’ आडनावावरून, म्हणायचे तुमच्या नावातच घमंड आहे…. तूझ्या ऐवजी मामा उत्तर द्यायचा नेहेमी, ’कुळकर्णी’ कुठलं चांगलयं … चौकात ’ए कुळकर्णी’ असं ओरडलं तर दहा जण धावतील, आडनाव हवं आमच्यासारखंच….. 🙂 … तू बोलायचा नाहीस तेव्हाही , मिश्किल भाव चेहेऱ्यावर ठेवत तू चालू द्यायचास आमची जुगलबंदी!!!! मग काहितरी एक भन्नाट मार्मिक वाक्य बोलायचास की सगळे्च गप्प व्हायचे!!

असे तरी गप्प करायचास नाहितर रागावून तरी…. काय टाप होती कोणाची तू रागावलास की बोलायची??? तुझा तो जमदग्नीचा अवतार पाहिला की भले भले गप्प व्हायचे…. मग आजी म्हणायची ,” अगं आतातरी निवळलेत, पुर्वी तर आणि कडक होते हे!!!”सगळे तूला घाबरून असायचे असे नाही म्हणणार पण मी, आम्हा सगळ्यांना विलक्षण आदर आणि प्रेम होते तुझ्याबद्दल…. ’होते’ म्हणू की ’आहे’ म्हणू….. आहेच म्हणते….. हो आहेच!!! आम्ही सगळे जमलो की, “आठवतं तेव्हा बापू असे म्हणाले होते.. ” हे वाक्यं दर दोन-तीन वाक्यांनंतर पुर्णविरामासारखं येतचं!!!

सगळे तूला ’बापू’ म्हणायचे, म्हणतात…. ’शंकऱ्या’ म्हणायला धजावणारी मीच….. मला तू दिला होतास तो अधिकार…. पुलं चे असामी पहिल्यांदा ऐकले ते तुझ्याच पलंगावर बसून…. इथे “तुझ्याच पलंगावर” हे महत्त्वाचे…. ईतर कोणी निदान तुझ्यासमोर तरी हा पराक्रम करायचे नाही…. ईगतपुरीला लहानपणी मी झोपायलाही बरेचदा तुझ्या मच्छरदाणीत यायचे… तू येऊ द्यायचास, ’ताई वळवळ करत नाही झोपली की..’ असे तू ईतर नातवंडांना सांगायचास, मग मी त्यांना तू झोपण्याआधि मला एकटीला सांगितलेली तुझ्या लहानपणीची आठवण सांगायचे….जाम स्पेशल आहोत आपण असं वाटायचं मला तेव्हा!!! अनेकदा वाटलं , “बापूसाहेबांची नातं का तू!!!” असं लोक विचारायचे तेव्हा दरवेळेस वाटलं तसं….असामि ऐकल्यानंतर तूला मी एकदा ’शंकऱ्या’ अशी हाक मारली होती आठवतं, आजीच्या हातातून भांड निसटायचं बाकि राहिलं असावं किचनमधे….. तू हसून म्हणालास, ” कर्ट नव्हे बेबी शरयू स्कर्ट स्कर्ट 🙂 ” तेव्हापासूनची आपली मैत्री पक्की होती….. तुझा कप्पा आवरणे हा एक काय नाद होता मला राम जाणे… मी आवरणार, तुझी कागदपत्र हरवणार हे नित्याचे…. ’झंडू बाम’ हा प्रकार तर किस्सा आहे, रोज न चुकता ते हरवायचे, मग तू रागावायचास आणि मी तुझ्यावर रागावायचे!!!

तुझा राग कित्येकदा आलाय तसा, मामाने दिलेले फटाक्याचे पैसे तू काढून घेतलेस तेव्हा रागावले होते मी तुझ्यावर… प्रचंड त्रागा केला होता,  मी जे जे बोलले ते घरी समजले आणि आश्चर्य म्हणजे मला कोणीच रागावले नाही…. प्रतिकूल परिस्थीतून शिकत तू एका शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंतचा केलेला खडतर प्रवास, त्यामूळे पैसे जपून वापरावेत असे असणारे तू्झे विचार असो…. की राजकारण, समाजकारण, कायदे, ईतिहास, साहित्य अनेक अनेक क्षेत्रातला तूझा व्यासंग असो आम्हा नातवंडांना हळूहळू जाणवणार, समजणार, उमजणार आहे हे तूम्ही ओळखून होतात…. काहिही असो, पण जशी मी मोठी होत गेले, तूझ्या स्वभावाचे बारकावे समजत गेले!!! लहानपणी तूझा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून जो काही धाक कधी वाटला असेल पुढे तो ही वाटला नाही… उरला तो आदर!! तूझ्या स्वभावात दरारा आहे पण त्याचबरोबर एक अत्यंत मिश्किल, खोडकरं मुलं लपलेलं आहे तुझ्यात , एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि अत्यंत हळव्या मनाचा तू मालक आहेस हे उमजत वयाची २० वर्ष पार करावी लागली मला!!!

माझी आई तुझी सगळ्यात लाडकी, ती श्रीदेवीसारखी दिसते असं तू म्हणाला होतास आठवतयं , काय हसलो होतो आम्ही सगळे…. मग मी तूला हळूच विचारले होते, “बापू श्रीदेवी कोण माहितीये ना तुम्हाला?” 🙂 चाट पडले होते मी तूझे उत्तर ऐकून,” ती गं मि.ईंडियातली नटी :)” …. तूझे हे रूप नवे होते…. मोजकचं बोलायचास तू…. आयूष्यच आखिव रेखीव होतं तुझं…. अलिप्त असायचास तरी आमच्यात असायचास….. की तूझ्यातल्या विद्वत्तेची जाण असल्यामूळे आम्ही एक अंतर राखायचो तुझ्याशी राम जाणे!!! आजीशी अजूनही मनमोकळं बोलतो आम्ही, तुझ्याशी संवाद व्हायचा मात्र हे नक्की!! नुसता नावाचा ’बापू’ बाकि गांधिजींशी कूठलेही साम्य नव्हते तूझे, राजकारण हा शब्द आला आणि, “एकजात हरामखोर सगळे.. ” अशी तू सुरूवात केलीस की फार आवडायचे मला, कारण या सुरूवातीनंतर तू शिवाजी महाराज, औरंगजेब, ज्ञाने्श्वरी, पासून ते आजकालचे कायदे, राजकारण, राजकारणी, ईतिहास भुगोल अश्या अनेक अनेक विषयांवर बोलत रहायचास…. आम्ही ऐकत रहायचो, कोण सोडतेय ती मेजवानी!!!

आठवण येते तूझी खरचं खरचं खूप….. माझी ही भारतवारी होण्याआधि तू स्वप्नात आला होतास माझ्या, म्हणालास मामाला सांग काळजी करू नकोस!!!… गेल्या सहा वर्षात दुसऱ्यांदा स्वप्नात आलास, तू गेलास असे कधी वाटतच नाही रे पण!!मामाला सांगितले तर मामा म्हणाला, “मनी वसे ते स्वप्नी दिसे” म्हटलं असेलही तसेही असेल पण तू मनात तसाच आहेस हे पक्कं, आणि रहाशीलही तसाचं!!! तू लहानपणी सांगितलेल्या ध्रूवबाळाच्या गो्ष्टीसारखा, अढळ आम्हा नातवंडांच्या मनोराज्यात…..

तूला आठवतेय एकदा मला गावाहून यायला उशीर होणार होता, मी नासिक-रोडला जाण्यापेक्षा गावात उतरले आणि तूझ्या घरी आले रहायला…. रात्री दिड वाजला असावा पोहोचायला, तू चादर झटकून मच्छरदाणी लावून ठेवली होतीस, मी तूला विचारलेही, “वर्षानूवर्षे बघतेय बापू , मच्छरदाणी लावायचा कंटाळा नाही का हो येत तूम्हाला? ” आता जाणवतेय…. तूझी मायेची, प्रेमाची पद्धत होती ती…. न बोलता, न जाणवू देता छत्र धरलेस तू आमच्यावर सतत!!! माझ्या दहावी- बारावीच्या रिझल्ट्स नंतर तू लिहीलेली पत्रं आहेत अजूनही माझ्या नासिकच्या पेटीत, दर सुट्टीत वाचते मी ते…. शब्द दिसतात ते डोळ्यांना आणि डोक्यावर मायेचा हात फिरतो तूझा!! कोणाला काही बोलत नाही मी…. किंबहूना आम्ही कोणीच कोणाला काही सांगत नाही, बहुधा आम्हा सगळ्यांच्या अस्तित्वातले तूझे असणे आम्हाला सगळ्यांना आकळलेय…..

तूझ्या शेवटच्या वाढ्दिवसाला मी तूला एक बॅग दिली होती, अश्याच एका २३ नोव्हेंबरला मी ऑफिसला दांडी मारून ती तूला द्यायला आले होते, ईशानचा हात धरून चालताना पाहिले तू उभा आहेस पायऱ्यांवर…. मला पाहून म्हणालास, ” ये तुझीच वाट पहात होतो!!!” आजी म्हणालीही, ” तू कळवलं होतसं का येणार म्हणून, हे जेवायला का थांबलेत तूझ्यासाठी? ” मी नव्हतं कळवलं बापू तुम्हाला, मग तूम्हाला कसे कळले मी येणार म्हणून हे विचारायचेच राहिले तेव्हा आणि मग राहूनच गेले….. तूम्ही २६ ला निघून गेलात दुरच्या प्रवासाला… असेच अचानक न सांगता…..

ICU मधे तुमच्या पायांजवळ मी आणि दादा उभे होतो ….. तूम्ही पडलेले आहात पलंगावर म्हटल्यावर मी नकळत तूमचे पाय दाबले…. लहानपणापासूनची सवय आम्हाला ती…. तूमचे पाय कायम दूखायचे….. ते दाबायचा आम्हाला कंटाळा यायचा नेहेमी, पण तूम्ही पुरे आता थांबा असे काही म्हणायचा नाहीत…. मी ही तेच करते मग ईशान दणादण नाचतो माझ्या पायावर…. तूम्ही कायम आठवता तेव्हा!!! मग मी त्याला म्हणते, “काय करणार हेरेडिटी आहे 🙂 ” तूमच्याच स्टाईलमधे!!! त्यादिवशी तूमचे पाय हातात घेतले, किती ओळखीचा होता तो तळवा बापू आमच्या… अजूनही मला तूमचा तळपाय, नखांची ठेवणं आठवतात … ते पाय एका अत्यंत कष्टाळू माणसाचे आहेत आणि तो माणूस माझा शंकऱ्या होता….. एका अपघाताने आ्मच्यापासून अचानक हिरावलेला….

कालच्या वाढदिवसाला तू पुन्हा आठवलास, रडले मी एकटीच!!! तूझे माझे मैत्र बरेचदा जगते एकटीच तसेच पुन्हा एकदा….खूप घटना आठवतात तूझ्या आठवणीबरोबर, हळवे व्हायला होते मग!!! ब्लॉग लिहीतेय ना तेव्हापासून बरेच जण विचारतात तू आधिपासून लिहायचीस का? … मी हसून उत्तर देते, “हेरेडिटी आहे ना 🙂 ….. दोन्ही आज्या, आजोबा , आई, मावशी शिक्षक आहेत माझे!! ” कालच्या बक्षिसाचे नाव वाचले आणि शंकऱ्या तू डोळ्यासमोर आलास, तूझाच अग्रलेख वाचून दाखवणारा….. देशदूत,गांवकरीचा सहसंपादक, संपादक अशी मुशाफिरी आठवली तूझी!!! लिहायचास भन्नाट, खरं खूरं, आडपडदा न ठेवता… कधी हळवं, कधी कणखरं!!!

काल तूला सांगायचे होते रे स्टार माझाने घेतलेल्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगला, लिखाणाला मान्यता मिळालीये….. शंकऱ्या आता मला कोणी विचारेलही, कसं लिहीतेस?? काय सांगू….. सांगू खरं खरं आमच्या शंकऱ्याचा वारसा आहे हा….. त्याच्याईतके व्यासंग मिळवायला हा जन्म नाही पुरायचा मला….तरिही लिहावेसे वाटण्याची उर्मी त्याने दिलीये मला…. तू आणि बाबा दोघेही लिहीणारे, दोघांची पद्धत वेगळी, पण माझ्यावरचे संस्कार तूम्हा दोघांचे!! परवा बाबांना फोन केला, रिझल्ट सांगायला, त्यांचे पाणावलेले डोळे इथून पाहिले मी….. शंकऱ्या तूलाही झालाय ना आनंद!!!!

काल तूझ्याशी खरंच खूप बोलायचे होते रे… खरंच खरंच….तूझे पाय न कंटाळता दाबून द्यायचेत मला…. यावेळेस १-१०० म्हणेन तूझे पाय दाबताना तर आकडे गाळणार नाही मी लहानपणी गाळायचे तसे… खरचं रे!!!

शंकऱ्या, म्हणं ना बेबी शरयू…………………………………………….