गोठलेली नाती…

एक स्वप्न …. त्या स्वप्नात , माझी एक मैत्रीण नुकतीच आई झालेली आहे…. तिचं ते काही तासाचं असलेलं पिल्लू मी डोळे भरून पहातेय… मधेच एखादी नजर त्या मैत्रीणीकडे जातेय…. तिच्या चेहेऱ्यावरच ते तृप्त स्मित माझ्या चेहेऱ्यावर उमटतय…… मी बोलतेय काहितरी त्या मैत्रीणीच्या आईशी……

संपलं स्वप्न…. :)

सकाळी उठून नवऱ्याला सांगितलं ,म्हटल काय गंमत आहे बघ, का पडलं असावं असं स्वप्न अधेमधे एकदम!!!

“अरे वा ऐश्वर्या तुझी मैत्रीण आहे सांगितलं नव्हतस तू….. नाही कारण, तुझी कुठली मैत्रीण आहे अशी जिला मुलं नाहीयेत ??? आणि हो आता त्या स्वप्नाचा अर्थ लावत बसू नकोस…. त्याऐवजी आज आपल्या धन्य डोळ्यांना,मनाला कसं बॉम्ब, युद्ध, चोर दरोडेखोर, पिस्तुलं यापैकी काहिही न दिसता सृजनाचं स्वप्न दिसलं याचा आनंद मान :)  “

त्याच्यापुरता विषय संपलादेखील …..

मी आपली नेहेमीप्रमाणे सकाळची नेटवरची हजेरी लावायला आले तो फेसबूकावर एका मित्राचा मेसेज पाहिला…. एका मैत्रीणीला मुलगा झाल्याचे सांगणारा तो मेसेज होता!!!

निव्वळ ’योगायोग’ म्हणून मला माझे स्वप्न सोडवेना…. intuition या आघाडीवर मी बरी असले जरा तरी गेले अनेक वर्ष ज्या मैत्रीणीशी एक शब्द बोलणेही झाले नाही तिच्याबाबत मला ही अशी पुर्वसुचना का मिळाली असेल हा प्रश्न होताच मनात!!!!

प्रत्यक्ष बोलणे न होणे पण व्यक्ती मनात असणे ह्या तश्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत पुर्ण कल्पना आहे मला. माझ्या मनात अथांग ’पसारा’ आहे हे ही मी मागेच कबूल केले आहे. तरिही असे नेमक्या वेळेस नेमक्या व्यक्तीची आठवण येते याची नेहेमीच गंमत वाटते. किती आठवणी, भेटलेले लोक, दुरावलेले (शब्दश: नव्हे तर भौगोलिक अंतराने ) मित्र मैत्रीणी सतत मनात त्यांची हजेरी लावून जात असतातच…… एखादी जागा, एखादा क्षण असे अचानक चमकून जातात मनाच्या पटलावर….. ’का’ हे आठवले असावे याची कारणं शोधत बसण्यात अर्थ नसतो…..

मित्र/ मैत्रीणींबाबत तर हे नित्याचेच …. मित्र आणि मैत्रीण यात त्यांचे स्त्री/ पुरूष असणे ’मैत्री’च्या आड न येऊ देणे याकडे नेहेमीच कटाक्ष असतो माझा आणि तो तसा असावाच…. तो मुद्दा नाहीचे आत्ता!!!

मात्र माझ्या या अत्यंत लाडक्या मैत्रीणीला मी विसरले नव्हतेच म्हणजे…. विसरणारच नव्हते…. ’मैत्री’ ची व्याख्या आपण जगलेलो असतो काही जणांसोबत, आयूष्य समृद्ध करणारी मैत्री… जगात तू कुठेही जा, एकटी नाहीयेस हे सांगणारी मैत्री…. अशीच माझी ही मैत्रीण…. अंतर किती वाढले होते/ आहे आमच्यात….. मी माझ्या आयूष्यात गर्क ती तिच्या…. कॉलेजानंतरचे सुरूवातीचे काही दिवस पत्र/ मेल्स पाठवले गेले , हळूहळू सगळेच थांबले…. मनात अचानक आठवण यायची…. ती आठवण दरवेळेस चेहेऱ्यावर समाधान आणणारीच असायची!!!

माझ्या नवऱ्याचा मुद्दा बरोबरच होता , माझ्या साधारण समवयस्क सगळ्याच मैत्रीणींच्या घराचं गोकूळ कधीचेच झालेले होते…..मग माझ्या या मैत्रीणीबाबत अजून हे गोकूळ व्हायचे बाकि आहे ही जाणिव मला होती का ?? कधीतरी वाटलेही तिला फोन करावा आणि विचारावे… पण हे वाटणं अगदीच स्पष्ट नसतं बरेचदा, उदबत्तीचा धूर कसा दिसावा न विरून जावा तसे विचार मनात येतात न वलयांकित असे अस्पष्ट होत विरूनही जातात…. तसेही काही प्रश्न विचारू नयेत, ते वैयक्तिक असतात म्हणून नव्हे कारण मैत्रीत अनेक अधिकार असतात किंबहूना  समोरच्याला दुखावले जाऊ नये या उद्देशाने…..

असे काही घडले की एकूणातच मैत्री या शब्दाचा अर्थ आणि व्याप्ती जाणवू लागते…. एक ’तरल’ संवेदनशील नातं….. एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखं…. ’प्रवाह’ हा शब्द यासाठी की…. हा नितळ, स्वच्छ असू शकतो…. काही मित्र/मैत्रीणींबाबत तो आटूनही जातो…. काही वेळा दिशा बदलतो…. तर काही वेळा चक्क दुषित होतो……प्रवासात या प्रवाहाला अनेक लहान मोठे प्रवाह येऊन मिळतात… मित्रपरिवार वाढत जातो…. एखाद्या वाटेला आपण होऊन बांध घालतो, अडवतो मुख्य प्रवाहात येणारा एखादा लहानसा नकोसा प्रवाह …. अव्याहत चालते हे सारे चक्र!!!

प्रवाहाच्या सगळ्याच शक्यता गृहित धरल्या तर मग ही अशी वर्षानूवर्षे बोलणे नसलेली तरी आजही मनातली प्रत्येक आंदोलनं न संकोचता बोलता येऊ शकणारी मैत्रीची स्थानं कश्यात टाकावी समजेना…. वाटलं हे नातं ’गोठलेलं’ असतं नाही त्या प्रवाहात…. तिथेच थांबलेलं तरी स्वत:च अस्तित्व राखलेलं….. आयूष्यातले आनंदाचे दु:खाचे कढ त्या गोठलेल्या नात्याला पार विरघळून टाकू शकतात…. प्रवाह पुर्वीसारखा वहातो काही काळ, पुन्हा गोठण्यासाठी….. एक खात्री देऊन जातो मात्र की ’जिवंत झरा’ आहे मैत्रीच्या तळाशी खोल एक …..

प्रेम, आधार, धडपडायची मुभा, चुकायची मुभा, त्या चूका सुधरवण्यासाठी वेळ देण्याची तयारी, अपेक्षांचं ओझं नसलेली, आपल्याला आपण आहोत त्या रूपात स्विकारणारी , खंबीर पाठिशी उभी रहाणारी एखादी मैत्री, आपल्याला प्रश्न पडतो नं कधी कधी की ’दुनिया पागल है या फिर मै दिवाना/नी’ तेव्हा ठामपणे दुनियेला पागल ठरवणारी मैत्री …… त्या मैत्रीबाबत अनेक आठवणी असतात मनात…. त्यात अशी एखादी भर आणखी पडते मग….. काही काळ आपण थबकतो त्या गोठणं विसरून वाहू लागलेल्या प्रवाहाशी….हिमनग आठवतो मग असा… वरकरणी स्तब्ध, अंतर्यामी कितीतरी दडवून ठेवलेला…..

गोठणं हे काहीवेळा अपरिहार्य असतं याची कल्पना असते पण ती सल नसते आता…. खात्री पटते मनाची कारण हा प्रवाह आटणार नाहीये कधीच!!! :)

अंतर वाढतं पण काही हात सुटत नसतात आणि काही नाती तुटत नसतात हेच खरं :)