मन एके मन….

मन नं बेटं हाफमॅड असतं बरं….

दारूबिरू माझ्यासाठी नाय, वाईनबिइनही जमली नाय ब्वॉ…

भविष्यात कधी जमायचं नाही …

हे बेटं झिंगतं कसं राम जाणे पण ??

काय तर म्हणे ’आठवणींचीही’ नशा असते ….

कायपण !!

कधी इथे कधी तिथे… याच्या पायालाच भिंगरी ….

धरू गेलं नं आपण , बरं का … बेशिस्तासारखं डोलतं ते !!

बरं आता आठवणी चांगल्या निवडाव्या किनई….

याचं मेलं सिलेक्शनच बकवास …. समदी हाणामारी च्यामारी!!

जुगारबिगार आपलं काम नाय ब्वॉ….

भविष्यात कधी ….. नाय ना राव!!

हे मन आहे नं मन….

ह्याला गॅंबलिंगचा नाद ना पण …. नवनव्या मैत्रीची रिस्क आणि नव्या माणसांचा जूगार…..

इथे फसतं , तिथे हरतं …. पुन्हा पुन्हा सगळं पणाला लावतचं ना पण ..

बिनडोक लेकाचं … जग चांगलं असतय म्हणे ..

येडचे !!

माझ्याच्याने नं दगदग होत नाही बरं का ….

भविष्यात करायची इच्छाही नाही…..

हे मन आहे नं मन ….

याचा मेला स्टॅमिनाच जबरीये पण ….

बेणं इथे आपटतं तिथे धडकतं… सोडत नाय पण कुठलीच गल्ली बोळ ….

याचा एरिया कव्हरेज पहाल नं …. सॉलिड एकदम…

सगळा घोळे घोळ  !!

फसवणूकीचा धंदा आपलं काम नाय ब्वॉ …

भविष्यात कधी जमायचं नाय ….

हे मन आहे नं मन ….

येडचॅपच आहे बरं का … जगाला सोडतं आणि स्वत:लाच फसवतं नं  ….

घरघालू उद्योग बिनबूडाचे नं काय …

आहे बेअक्कलच ये !!

काल नं गाठलचं या मनाला ….

म्हटलं बाबारे तुझा होतो खेळ आणि मला का वैताग …. तुझा मॅडनेस तुझाच प्रॉब्लेम इथून पुढे …

माझ्यापर्यंत मॅटर आणायचं नाय ….आठवणींचं व्यसनं नाय की मैत्रीचा जुगार नाय ….

कुठलीही ’मन’ मानी खपणार नाय !!

बांधलं त्याला पक्कं … वाटलं वैतागेल चिडेल बेणं …..

कसचं काय नं कसचं काय.. मुकाट नं ते.. त्रागाबिगा काय नाय…

ते बेटं हसतं होतं ….

नीट पाहिलं आणि समजलं नं … एकदम रिअलायजेशन….

सगळी व्यसनं परवडली ,अगदी सगळीच….

ह्या खोट्या हसण्याच्या जहराला उतारा नाय ….

बिघडलंय हो मन…. हातातून गेलयं पार ….

खोट्या हसण्याच्या नादात ’ खरं ’ रडायलाही विसरलं हाय !!!

हरवलेले शब्द …

 

रोजच्यासारखाच उगवलेला अजून एक दिवस संपतो ,

डोळे अलवार मिटतात, रात्र होते …

एक एक चांदणी एक एक तारा डोळे चोळत उठतो ,

जागेपणीचा आभास त्यांना हळूच गाठतो …

प्रत्येकाची वेगळी गाऱ्हाणी – प्रत्येकाची वेगळी मागणी,

हा चमकतो – तो लकाकतो … माझं ऐक माझं ऐकचा घोषा लावतो…

मी त्यांच्यावर रागावतेय,

ते माझ्यावर रुसताहेत….

त्यांनी सांगितलेली गोष्ट मी लिहीत नसते ,

मुद्दा हा त्यांचा चपखल असतो….

मला लिहीता येत होते तेव्हा यांनी मूळी सांगितलेलेच नसते ,

माझाही मग काही दोष नसतो….

तू काही कोणी खूप मोठी वगैरे नाहीस हं ,

ते माझ्यावर डोळे रोखतात….

माझ्या लहानखूऱ्या अस्तित्त्वाचे फासे,

भांबावून अजूनच घट्ट दाटतात…

विचारांची गुंफण होते – हातात हात ,

सप्तर्षी कधी तर कधी त्यावर व्याधाची मात ….

धृवबाळाला कधीचीच सांगितलीये मी व्यथा ,

दिवसा नाही मला ताऱ्यांच्या प्रांगणातच सुचते रे कथा….

विचारांची पाखरं  स्वैर स्वैर आकाशात ,

समजत नाही कुठे दडतात ही प्रकाशात ???

चांदण्या फेर धरून माझ्याभोवती नाचतात ,

गोल गोल रिंगणाचा आकार घेतात ….

तांबडे, गुलाबी, केशरी नी मोतीया ,

रूपेरी कपड्यांचे रंग बदलू लागतात …..

ओळखीचाच हा कट आहे मी जागी होते ,

विचारचांदण्यांचे शब्द लिहायला लेखणी सरसावते….

तेच नकोय व्हायला जे अव्याहत होतेय,

मुठीत सापडलेले शब्द मग मी घट्ट पकडू पहातेय ….

काळ्या ढगाआड सुर्याचं कारस्थानं ,हळूच तो येतो – मंद मंद हसतो,

माझ्या समोरचा कागद झगझगीत स्वच्छ कोरा दिसतो !!!

या जन्मावर …..

गेला पुर्ण महिना आधि मुलगा आजारी आणि मग तिच्या मानेचं दुखणं , ती वैतागली होती अगदी . मुलाला बरं नाही मग मन अगदी हळवं झालेलं, त्यातच एरवी अगदी दुर्लक्ष करावे इतपत मुर्ख असे काही भलेबुरे अनूभव…. तिने जशी हार मानली .

मानेच दुखणं आलं काय म्हणायचं…. हाहा म्हणता वाढलं प्रचंड!! अगदी बसवेना आणि उठवेना…. बरं मानेला झटके न देता आपल्याला बोलताच येत नाही हा नवा साक्षात्कार त्या दरम्यान झाल्याने, तीची बोलती बंद झाली अगदी :) … या संधीचा तसं पहाता घरच्यांना आनंदच झाला असता पण तीची परिस्थीती पहाता तो त्यांनी खूप बडबडून व्यक्त केला नाही इतकेच :)

हळवं मन वेडेपणा करण्यात पटाईत… कशाला महत्व द्यावं नं कशाला  “खल्लीवल्ली ” (आमच्या अरेबिक मधे  “गेले उडत” :) )म्हणावं याचं भान विसरलेलं :( …. मळभ मनावर आलेलं…. आवसं जशी सारी !!! काळी काळी… कुंद कुंद वातावरण….

डॉक्टरांच्या वाऱ्या आणि औषधांच्या वेळा आलेच मग ओघाने !!

एक सकाळ, उठताना तिला अंमळ उशीरच झाला… होणारच होता… उठून लागली ती तयारीला, मुलं जायची होती नं शाळेत…. तोच ’सरप्राईज’ चा नारा कानावर पडला… मुलं शाळेची तयारी करून कधीचीच तयार बसलेली :) एरवी हाका मारूनही लवकर न उठणारी मुलं, आज बाबाच्या एका हाकेत उठून अजिबात आवाज न करता आवरून तयार होती…. हा गोड धक्का कमी वाटावा तर काही वेळातच ऑफिसला गेल्यानंतर, दर दोन तासानी नवरोजींचे येणारे फोन सुरू झाले. गोळ्या घ्यायची आठवण नवरोजी न विसरता देत होते.

“तू मला फोन करत तर नाहीसच पण मी केला तर घेतही नाहीस, येव्हढं काय काम असतं ऑफिसमधे ???  ” हा बायकोमंडळाचा सार्वजनिक मुद्दा तिच्याहीकडे आहेच… पण या आजारपणाच्या दिवसात तो पार धुवून निघत होता. सकाळी सगळं काम आवरून बाहेर पडणारे घरातले बाकिचे मेंबर्स , ’तुम्हाला माझ्या कामाची कदर नसते ’ वगैरे तिचे स्वत: दमल्यानंतरचे आरोप बिनबूडाचे ठरवत होते :)

नेहेमी ’चटपटं आणि यम्मी ’ जेवायला दे हा हट्ट असणारी मुलं , “मम्मा आम्हाला वरण भात खायचाय ” असे समजूतदारपणे सांगून आईच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होती.

सगळं तसच चाललं होतं जे एखाद्या साध्या ’सुरळित’ चालणाऱ्या घरात चालायला हवं !!! पण हे ’सुरळित’ चालणंच यावेळेस तिला विचारात पाडत होतं …. किती गृहित धरलेलं असतं ते आपणं …. लहानशी पिल्लं ,आईला काम पडू नये म्हणून स्वत: स्वत:च काम आवरताना पहाणं हा भाग्ययोग असावा, हा सोप्पा विचार मनात डॊकावत होता !!!

होता होता बरी झाली ती… मित्रमंडळाने एकटं पडू दिलं नाही आणि जपण्यात घरचे कमी पडले नाहीत :)

मनावरची आवस दुर होतं चंद्राची कोर आकार वाढवत होती….

महिनाभर घराबाहेर न पडता आलेले तीचे कुटूंब मग किराणा घ्यायच्या निमित्ताने मॉलच्या आवारात शिरले… तिला आता मान हलवता येत असल्याने, बोलताही येउ लागले होते…. :)

सगळं ’सुरळित ’ …. म्हणजे अगदी आपल्याला गाडी पार्क करायची असल्याने कोणी तरी त्यांची गाडी अगदी हुकूमी रिव्हर्स घेत असावे, पार्किंगची समस्या हा प्रश्न आपल्याला न पडण्याची खबरदारी घेतल्यासारखे ….. बाहेर सुरेख गार हवा असावी…. आपल्या मनातले त्रासदायक  विचार तीने होळीच्या आगीत मनातल्या मनात टाकलेले असावे….

’ती’ कितीतरी दिवसांनी मनापासून हसली :)

नवरोजी आणि मुलं , “आम्ही आलोच ” म्हणून कुठेतरी गेली तिची …. ती आपली सामानाच्या रांगामधून फिरत होती… स्वत:च स्वत:शी संवाद साधत… “महिला दिन”शब्दाचा , स्त्रीमूक्ती वगैरे उहापोहाचा अर्थ स्वत:शी लावत तीने नेहेमीची खरेदी केली.

गाडीपाशी परत पोहोचली ती, नवरा आणि मुलं अचानक कुठूनतरी प्रकटले…. तीने हसून विचारलेही, “काय टपून बसले होतात का कुठे मी यायची वाट पहात ?? ” :)

मुलं गाडीत बसली आणि ती तिच्या जागेकडे वळली… तिथे असलेली सामानाची पिशवी पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने त्या तिघांकडे पाहिलं , ते पुन्हा ओरडले  “सरप्राईज “ :) ….त्या पिशवीत काय होतं, सोन्याचा हार बिर …छे, मुळीच नाही … त्यात होतं एक सरप्राईज :) .. या फोटोतलं …..

खूप मोठं नाही… छोटसं…. त्या मॉलमधल्या गेल्या दोन तीन चकरांमधे तिने उचलून उचलून पाहिलेलं आणि  किंमत पाहून नेहेमीप्रमाणे परत ठेवलेलं. :) … साधीशी आवड तिची, तिने न उच्चारलेली न उल्लेखलेली ….. तिच्या घरच्या मंडळींनी कधी तरी लक्षात ठेवलेली :) …. ती खुश होत होती ….. ती पुन्हा ’ती’ होत होती… हसणारी, खुश होणारी आणि हो मान हलवत बोलणारीही :)

गाडीमधे गाणं लागलं तितक्यात , “तेरे जैसा यार कहा “  ….. सगळं ठरलेलं म्हणजे … गाणं ठरलेलं, गिफ्ट ठरलेलं …. मुख्य म्हणजे ती आपली आहे , सध्या नाराज आहे, तिला हसवायलाच हवं हे पक्कं ठरलेलं :) ….

“मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगाके

बैठा दिया फलकपें, मुझे खाक से उठाके….

यारा तेरी यारी को, मैने तो खुदा माना ” …….. :)

तिचा नवरा गात होता….तिच्यासाठी :)

एकही शब्द खोटा नव्हता … सगळं साधंस, प्रामाणिक :)

गाडी घराकडे धावत होती…. गाणी एकापाठोपाठ एक बदलत होती…. मुलं बोलत होती, हसत होती, खेळत होती, दंगा करत होती…..

एक  ” स्त्री ” एक महिला वगैरे विचारांच्या पुढे ती एक व्यक्ती, एक बायको, एक आई म्हणून क्षणोक्षणी तृप्त होत होती…. घरच्यांनी गिफ्ट दिले म्हणून का, ते आजारात काळजी घेत होते वगैरे म्हणून का ? तर नाही…. पण त्यांना तसे करावेसे वाटले म्हणून :)

मोठ्या मोठ्या वल्गना करताना , छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि जीवनातला आनंद हरवून जातो हे सत्य तिला पुन्हा सापडले होते.  मनात आनंद तृप्त असेल तरच तो ओसंडतो आणि ज्यांच्याकडे दु:ख असते ते दु:खच वाटणार जगाला, हा विचार मनाच्या कोपऱ्यात हरवलेला जणू :( … तोच विचार तिला पुन्हा गवसला आज …..”आयडियल” म्हणजे काय याचा नेमका हिशोब चोख समजला पुन्हा  :)

गाडी तिच्या मार्गाने घराकडे निघाली होती… ती पुन्हा परतत होती तिच्या घरी :) ….

खिडकीच्या काचेतून पौर्णिमेचा तेजस्वी पुर्ण चंद्र तिच्यासोबत निघाला होता :) …. मनात एक सुर निनादत होता….. “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ” :)

पसारा…..

परवा पाहूणे येणार म्हणून आधि घर आवरलं…… “सगळं जागच्या जागी ठेवा, अजिबात ” पसारा “ दिसता कामा नये!!! “चा  नारा लावत काही घरच्यांकडून आवरून घेतलं पण ’यांचा ” पसारा ” आवरणं म्हणजे फक्त तो फक्त एका जागेवरून उचलून दुसरीकडे ठेवणं’  ची तक्रार करत बरचसं स्वत:च आवरलं!!!  ……

सगळं घर मनाजोगतं जागच्या जागी (म्हणजे मुलंही निदान देखाव्यापुरते आणि दोनेक मिनिटच एका जागी बसलेले) असल्याची खात्री करत पाहूण्यांना दार उघडलं गेलं…. पाहूण्यांच स्वागत झालं, त्यांना घरं दाखवताना सवयीने डायलॉग उच्चारला गेला ,” पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा हं, घरात दोन लहान मुलं आहेत नं!!! ” …. आमची आई जेव्हा असं काही बोलायची तेव्हा किती राग यायचा, वाटायचं सगळा पसारा काय आम्हीच घातलाय??? …. ” हे घर आहे हॉटेल नाही… सतत तुझं पसारापुराण सुरू असतं….. कोणाकडून घरी आलं की हिचं सुरू होतं  ’बघा त्यांच घर कसं लख्ख आवरलेलं असतं नाहितर आपल्या घरात तुम्ही कायम पसारा घालता ’…. ” वगैरे वाक्यांकडे मी हल्ली दुर्लक्ष करायला शिकलेय….. नाही सहन होत आपल्याला घर पसारलेलं म्हटल्यावर नाईलाज होतो बरेचदा….

तर  आलेले पाहूणे गेले…. रात्र होता होता घरं पुन्हा आवरलं गेलं…. हॉल किचन पुन्हा एकवार नजरेखालून घातले गेले…. किचनचा ओटा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो…. तो किती वेळा पसारतो न किती वेळा आवरला जातो याचा हिशोब मांडायचाच नसतो, पण तो जर स्वच्छ आवरलेला सकाळीच दिसला की दिवसाची सुरूवात मस्त होते यावर तमाम स्त्रीवर्गाचं एकमत होईल…… तर सगळी आवराआवर आवरून  ” देहाचा पसारा ” निद्राधिन झाला….

मधे केव्हातरी जाग आली , लेकीला तहान लागली होती ती पाणी मागत होती!!! जाग आल्यावर क्षणभर अजिबात समजेना आपण कुठे आहोत….मेंदूच्या आठवणींच्या राज्यात दूरचे कुठलेतरी चॅनल लागलेले असावे…… इथला रिमोट कंट्रोल काही आपल्या ताब्यात नसतो गड्या या विचाराने हसत लेकीला पाणी दिले… आईच्या अंगावर हात टाकून कन्यारत्न तर निर्धास्त झोपलं पण माझ्या मनात विचारांचा ” पसारा ” ठेवून….

विचारांचा ” पसारा ” :) …. नुसता शब्द आला मनात आणि गंमत वाटली….. खरचं कुठे होते मी, जून्या कुठल्यातरी गावात, आमच्याच एका घरात …. गणपतीचेच काहितरी विचार होते मनात बहूधा!!! आठवलं तर आपण कुठे हरवलेलो होतो….. नेहेमी तर तीच एक पंचाईत होते, उठण्याआधि नक्की कोणता विचार मनात होता ते ही आठवत नाही….. बरं मनातल्या मनात आपण नक्की कुठे होतो पेक्षा तिथे “का” होतो हा ही एक उपप्रश्न असतो खरं तर, जो की मी हल्ली स्वत:लाच विचारत नाही. आपलं मन केव्हाही कुठेही असू शकतं हे एकदा स्वत:शीच मान्य केल्यावर “concentration ” नावाची ब्याद आपल्याच्याने होत नाही हा वैताग कमी होतो!!!

मजा आहे पण नाही…..  मन कुठेही असतं  म्हणजे  “कुठे असतं??? ” …. मूळात कुठेही जाऊ शकणारं हे मन बेटं नक्की कुठे असतं हेच ज्याला माहित नाही ती व्यक्ती मन त्याच्या निर्धारित जागेवर नसून इतरत्र भटकतय हा दावा कसा ठोकते……

बरं समजा आज मी “मनाचे भटकणे ” (कसलं आत्म्याचे भटकणे टाईप वाटतयं न्ं!!) यावर मनोवैज्ञानिक चर्चा करायची नाही असं ठरवलं (म्हणजे तसंच ठरवावं लागणार , कारण तशी चर्चा करायची ठरवलं तरी इथे तेव्हढा वकूब कोणाचा आहे, तेव्हा मला नाही बूवा करायची चर्चा!! ;) ) तरी मनाने मनातच किती   ” पसारा “ घातलाय याचा अंदाज आला मला….. आईशप्पथ म्हणजे हा पसारा माझ्या पाचवीला पुजलाय की काय…. घरातला आवरला की मनात “उभा” की हा!!!

गेल्या तेहेतीस वर्षातली पहिली तीन सोडली समजा तरी उरलेल्या तीस वर्षांचा पसारा…. स्वत:ला न्हाऊमाखू घालणाऱ्या मावश्यांपासून ते माझ्या मुलांच्या मावश्यांपर्यंतच्या प्रवासातले “रिश्तों का ईल्जाम” दिलेलीही आणि न दिलेलीही तमाम मंडळी ते आजवरच्या आयूष्याच्या प्रवासातली अनेक गावं असोत की तिथली घरं असोत की अनेक अनेक प्रवास असो…… वस्तू, खेळणी, कपडे, पदार्थ त्यांच्या रेंगाळलेल्या चवी….. स्वत:ची,  इतरांची आजारपण….. स्वत:च्याच काय पण लोकांच्याही सवयी ( :( )…..  सुखाचे क्षण…..अनेक मतं,भलेबूरे अनूभव…… अरारारा आठवू पाहिलं तर जाणवलं मनात काय कमी पसारा नाय बा माझ्या…. उलट तिथं जास्त घोळ आहे!!!

विश्वाच्या अनंत  “पसाऱ्यातलं “ माझं अणूरेणूपेक्षा लहान मन, स्वत:मधे एक स्वतंत्र “विश्व ” थाटून बसलय…… विदाउट तिकीट फिरतं मग बेटं स्वैर कुठेही…..

रात्रीपासून सकाळपर्यंत लौकिकार्थाने झोपलेलं हे त्रासदायक “मनं” घेऊन खरच आपण कितीवेळा निवांत झोपलोय हा एक नवा प्रश्न आहे!!! ” सकाळ कधी झाली कळलचं नाही ” या सदरात मोडणारी झोप रोज कुठे असते??? ….. आणि रात्र कशाला , दिवसाही कामाच्या व्यापात असो की कोणाशी बोलताना असो हे ’मन’ तिथेच असेल कश्यावरून ??? आणि जर माझं मन कोलांटउड्या मारत असेल तर समोरच्याचं मन “घसरगुंडी’ खेळत नसेल कश्यावरून ????  का त्या बापड्याच्या मनात त्याच्या वाटचा ’पसारा ’ नसेल???? :)

का मग हा मनात असा ” पसारा ” असणं ….. मनाला फिरायला जागा असणं , कधी कधी इतकी की त्या गुंत्यात मनाने हरवून जात असावं …घरात कसा ” पसारा “ आवराताना कधीकाळी एखादी डाव्या हाताने ठेवलेली वस्तू अचानक सामोरी येते आणि आपण विचारात पडतो ,’इथेच होती की ही :) ’ …. तसं एखादी मागे पडलेली लहानशी मस्त आठवण मनाच्या पसाऱ्यात अलगद वर यावी आणि आपण “दिन बन गया’ म्हणावं…… भटकायला नव्या जागांना “जागा ” देण्याची मनाची तयारी असणं हेचतर जिवंतपणाचं, आयूष्याला समरसपणे भिडण्याचं लक्षण नसावं :)

और वैसे भी आपण ढीग मनाची स्वच्छता मोहीम आखू, तिथला ” पसारा ” आवरू पण त्यासाठी हा अदृष्य अवयव हाती तर लागायला हवा!!!

असतो किनई विचारांचा ” पसारा ” , आठवणींचा ” पसारा ” , मतमतांतरांचा ” पसारा ” , रागाचा ” पसारा ” , लोभाचा ” पसारा ” ….. षडरिपूनामक भारदस्त नाव असलेल्या भावभावनांचा ” पसारा ” …… सामान्य़ माणूस तरी निदान हावरटच नाही का , नव्या वस्तूंची खरेदीही संपत नाही नी नव्या ओळखीही थांबत नाहीत….. मग नवे अनूभव नी जुन्या ” पसाऱ्याला ” भर :)

विचार खूप येतात नाही माणसाच्या मनात (बाईच्याही मनात … नाही तर माझ्या मनात नसते आले :) … पांचट आहे जोक, दुर्लक्ष करूया!!!! ) …… एक विचार मग असा आला की एक सुर्य, एक पृथ्वी न एक चंद्र पुरेसे होते की पण साक्षात ब्रम्हदेवाला तरी कुठे आवरलाय विश्वाचा पसारा …. हजारो सुर्य आहेत ’म्हणे’ !!!! अगणित ग्रह नी चंद्रही असावेत….. आपल्यासाठी त्यांचे अस्तित्व चांदण्यांयेव्हढे….. तसंच आहे की मनाच्या पसाऱ्यातही…… प्रत्येकजण एक ’सुर्य’ नी त्याची त्याची स्वतंत्र ग्रहमालिका….. त्यापलीकडे सगळे चांदण्यांसारखे  कमीअधिक लु्कलूकणारे तारेच की…. म्हणजे जोवर आपलं अस्तित्व आहे तोवर आपल्या कक्षेत इतरांनी फिरायचं नी त्याच वेळेस कोणाच्या तरी कक्षेत कमीअधिक अंतरावर फिरत आपणही स्ट्रॉंग पसारा मटेरियल व्हायचं!!!

आयला शिंपल हाय की लॉजिक….. :) ….. शेवटी काय आपला दोष नं कश्यातच नसतो म्हणजे कोणामूळे तरी आपण काहितरी चूकतो वगैरे….. वैसाच है पसारेके बाबतीत  आपण आहोत “ब्रम्हदेवाचे वंशज ” ….. तेव्हा ह्यो प्रॉब्लेम है अनुवंशिक !!!!

हुश्श चर्चा समाप्त….. घर कितीही आवरलं तरी मन माझ्या ताब्यात नाही…. ते तसे नसतेच आणि त्यावर ताबाबिबा मिळवण्याच्या भानगडीत मेरेको पडनेका नही है (सुलेखासारखं नाही, मी स्वत:च्या मनाबद्दल बोलतेय ;) ) ……. मनात “पसारा” होणारच आणि वाढता वाढता वाढणारच !!!!concluded!!!

आपण दोषी नाही कळलं ना की मी एक मिनिटही वाद वाढवत नाही, शप्पथ!!! :)

तरिही ब्रम्हदेवाला भेटीन तेव्हा त्याला खणखणीत प्रश्न विचारणारच आहे मी कारण केवळ त्याच्यामूळे अनेक constructive कामं करता करता राहिले मी,नसता ना मनात हा पसारा खरच सांगते विलक्षण काहितरी केले असते प्रत्येकाने (म्हणजे काय याचा शोध वैयक्तिक घ्यावा )!!!

मी सध्यातरी मनासाठी अंगाई गीत गाऊन त्याला झोपवते…..

……….

……….

”  ती नवी मैत्रीण झालीये तिच्याकडे जायचेय उद्या…. ” …… ” नव्या फर्निचरची जागा बदलून पाहू या का??? ” ….. “मुलांना बजावावं लागणार आहे गणपतीसाठी लोक येणारेत, पसारे काढू नका!!! ” ……. “आईकडे आणि अनुस्वारवाल्या आईकडेही गौरी बसल्या असतील….. मी होते तेव्हा दोन्हीकडे जायचे गौरीला…. ” ……  “आईकडे यावेळेस गौरीच्या जेवणाच्या ताटांभोवती रांगोळ्या कोणी काढल्या असतील???  आईला माझी आठवण आली असेल….. ” …..  “नाही हे मन झोपायचं नाही असं….. …… सुरूच आहे नाही या मनाचं भटकणं… भटकू दे…. मगा केलाय की काथ्याकूट विचारांचा….

अरे हो त्या विचारांची पोस्ट केलीये तिचं काय करायचं ???? … ती मुलांपासून लपवून ठेवायची… नवऱ्यापासूनही ….. नाहितर घरातला पसारा आवरताना मलाच ’ब्रम्ह’ आठवेल…….

फिर क्या करनेका ???? हेहे… सोप्पय….बरेच दिवस झाले ब्लॉगला आरामच आहे या पोस्टने ब्लॉगविश्वातला “पसारा ” वाढवायचा!!!!! :)

गहन बुडबुडे..शेंडा ना बुडूख…

गाढ झोपलेय मी….

माझ्या डोक्यात कोण्या एका कथेतली दोन पात्र बोलताहेत आत्ता…. ते नवरा-बायको आहेत, भाऊ भाऊ आहेत, भाऊ बहिण आहेत की मित्र मैत्रीण आहेत मला समजत नाहीये…. असुदे!!! काहितरी नातं आहे दोघांत आणि मनातलं सगळं एकमेकांना सांगताहेत तेव्हा मैत्री नक्कीच आहे त्यांची….. एकजण आपल्या आई वडिलांवर किंबहूना साऱ्या जगावरच हा काही कारणाने जरासा नाराज वाटतोय….आणि दुसरा जो कोण आहे तो पहिल्याचे म्हणणे शांतपणे ऐकतोय, त्याला मोकळं होऊ देतोय असा काहिसा त्या कथेतला प्रसंग घडतोय….

पहिला म्हणतोय, ” नको नको होतात कधी कधी या आठवणी अगदी…. त्रास देतात नुसत्या… मनाच्या दारावरच्या त्यांच्या वारंवार येणाऱ्या धडका नकोश्या होतात आताशा… वाट्तं साऱ्या घराची जशी साफसफाई करतो ना आपण तसा या मनाचा कानाकोपरा स्वच्छ लख्ख घासुनपुसून साफ करावा….. जुन्या आठवणींची लोंबकळलेली कोळीष्टक पार काढून फेकावीत…..इतकच काय तर चक्क व्हॅक्युम फिरवावं मनात, काय अडकलेल्या,साठलेल्या, मुरलेल्या त्रासदायक आठवणी असतील तर त्यांचही समूळ उच्चाटन झालं पाहिजे!!! मग त्या अगदी जन्मदात्यांच्या असोत की भावंडांच्या…”

दुसरा किंवा दुसरी म्हणतेय, ” मान्य आहे रे मला… समजतेय तुझी घालमेल… पण आईवडिल म्हणजे काही आठवणींची धुळ का रे वेड्या…. अरे त्या तर उन्हापावसापासूनच नव्हे तर जगातल्या अनेक प्रकारच्या धूळीपासुन आपल्याला वाचवणाऱ्या संरक्षक भिंती आणि छतं नाही का….. भिंती आणि छप्परच ओढून काढणारे कोणते रे व्हॅक्य़ुम असते??? “

पहिला पुन्हा एकदा, ” बरोबर आहे तुझे…. अरे पण आईवडिल म्हणजे संरक्षक भिंती म्हटलं तर जेव्हा आम्ही आईवडिल झालो तेव्हा आमच्या मुलांसाठी आम्हिही याच भुमिकेत शिरणार की नाही…. मग तेव्हा आधिच्या भिंतींनी ताठपणा सोडून जरा मागे नको का सरकायला?? की रहाणार ते तिथेच तसेच, त्याच भुमिकेत ?? अडचण नाही का होणार त्यामुळे….. अरे आधिच्या भिंती मागे सरकल्या, विस्तारल्या तरच मोकळेपणा येणार नाहितर घुसमटच ना सगळी!!!!”

माझी झोप उडतेय हळूच…. जराशी जाग आल्यासारखी वाटतेय…. मगाच्या संभाषणातले काही दुवे हाती लागताहेत…. स्वच्छता, व्हॅक्य़ुम…. भिंती… घुसमट ऐसाच कुछ तो याद आ रहा है!!!

झोपेचा अंमल अंमळ आणि थोडा कमी होतोय…. वरचे सगळे शब्द हे उद्या करायच्या घर साफसफाईबद्दल नाहित…. तर मी न लिहिलेल्या पण माझ्या नकळत कधितरी डोक्यात शिजत असलेल्या कुठल्या तरी कथेतली अनोळखी पात्रांच्या संवादातली आहेत इतपत समजतेय आता…. गहन आहेत की हे संवाद :) ….. मी हे संवाद वगैरे भानगडीत अडकलेय आणि माझ्या स्वत:च्या घरातले इतर पात्र मात्र गाढ झोपलेले आहेत आत्ता, त्यांच्या वाट्याची स्वप्न पहात :) …. या दोन अनोळखी लोकांनी आणि त्यांच्यातल्या संवादाने माझ्या झोपेचे खोबरे केलेय आता…. म्हणजे त्यांचे संवाद गहन बिहन ठीके पण हे असले जडं संवाद बोलणारी पात्र माझ्याच स्वप्नात का, एरवीही खून, मारामाऱ्या चोऱ्या होतातच स्वप्नात, पण आज हे प्रकरण नवे ??? क्यूँ??? या प्रश्नाचा ससेमिरा लागलाय आता…कूस बदला आणि विचार करा आता….. मला झोपायचेय परत….. नो जागरण!!!

असे ना रात्रीचे किती वाजलेत हे ही माहित नसते … अर्धवट जाग आणि बऱ्यापैकी पेंगलेले डोके आणि मन, मग स्वस्थ बसावे ना….. ते नको… कुठल्या तरी विचाराचा उंदीर उगाच डोक्यात खूडखूड करणार…. त्या उंदराचा मग स्पायडरमॅन होणार… विचारांच्या धाग्यांना लोंबकळणार….

काहितरी कुठलं तरी जुनपानं अडगळीतलं काहितरी अंधूक आठवतय  …. तेव्हा कोणितरी दिलेला आधाराचा हात आठवतोय…. झोपेत मग वाटणार , औदासिन्याच्याही अनेक छटा असतात नाही, कधी आपण आपले सावरतो कधी इतर कोणी आपल्याला सावरते… मळभं हटतं हे मात्र खरं…. प्रकाशाची तिरीप साऱ्या काळ्या सावल्यांना वाकोल्या दाखवत आत झिरपतेच…. दरवेळी ती तिरीप शोधायची, इतकं सोप्प आहे सगळं!!! (हाय की नाय गहन षटकार… :) )

पुढे….. (म्हणजे झोपेतल्या झोपेतच गाडी पुढे :) )

आज एक नवा शोध लागलाय… गेले आठ वर्ष मी ओरड ओरड ओरडतेय, की मुलांना चप्पल घालताना आपण एक चप्पल पुढे करावी आणि मुलं नेमका दुसरा पाय पुढे करतात….. नेहेमी मग आपण ओरडावे “नेमका चुकीचा पाय पुढे करतात ही मुलं, अगदी कायम…..हा नाहीsss तो पाय” किंवा मग सरळ आपण हातातली चप्पल खाली ठेवून दुसरी उचलावी….. आज एकदम विचार चमकला, मुलं माझंच तर प्रतिबिंब आहेत…. ते चूकीचा पाय पुढे करत नाहीत तर ते माझ्या समोर असल्यामूळे माझी उजवी बाजू त्यांच्या डावीकडे असते इतकेच…. मग ते जेव्हा उजवाच पाय पुढे करतात तेव्हा मला ते उलट वाटते…. मज्जा आहे, म्हणजे मुलांचे मुद्दे पहायला मला निदान मनाने तरी समोरच्या बाजूला जायला हवे…. म्हणजे मलाही त्यांचे उजवे उजवेच दिसेल…. य्ये… आवडला हा शोध… :)

झोपेतच कष्टाने डोळे उघडावे आणि मुलांच्या अंगावर चादर व्यवस्थित करावी….

आता झोपेचा अंमल अजून कमी झालाय असा जो समज झाला होता तो खोडून काढलाय कष्टाने नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी, कारण ते चटकन मिटताहेत… विचारांचे कनेक्शन तेव्हढे काढले की डोक्यातही अंधार होईल…. अंधारात कसे झाडं बिडं हलत असतातच, वारा वहातच असतो .. आपल्याला पडतो का काही फरक… आपल्याला कसे ’आप मरे दुनिया डूबी’ अवस्था असते ना ती… तसेच पडू देत मेली काही स्वप्न बिप्न, हमको कुछ लेना देना नही उनसे….

तेव्हा झोपायसाठी डोळे मिटलेत…. आता पुढे…..

कधी कधी वाटतं… कधी कधी काय कायमच वाटतं, रात्री झोपेत ज्या विचारांच्या साखळ्या होतात त्यांची पोस्ट होऊ शकते…. झोपेतेच ती होतेही… सकाळी सुर्य उगवतो आणि पोस्ट मावळते…. अ की ठ आठवत नाही…मग जाम दु:ख होतं एकदम ….. आजचं तसं होत नाहिये…. मला अंधूक आठवताहेत विचार…. मगर म्येरेको झोपनेका है…. क्या करू???  असे विचार करणाऱ्यांचं बरं असतं नाही , कुठला तरी बुडबूडा येतो विचाराचा त्यालाच पकडायचं…. त्यावरच आणि थोडा विचार करायचा… आणि बनवायचा ’वैचारिक बुडबूडा’ …. मग तो असा मस्तपैकी द्यायचा सोडून वाचणाऱ्याच्या डोक्यात… बसं म्हणायचं तू पण विचार करत :)

हाहाहा… हा वरचा बिनडोक विचारही एक ’वैचारिक बुडबूडा’ नाही तर काय आहे दुसरं….. ’बुडबूडा’ हा शब्द तसा अजिबात सुंदर नाहिये….. पण असा मस्त साबणाचा फेस असावा, त्यातून अनेक बुडबूडे निघावेत….. लहानमोठे… चौफेर वहावेत…. वेगवेगळ्या दिशांना…. एखादा अलगद हाताच्या तळव्यावर विसावावा….. एखाद्यातून सुर्याच्या किरणाने आरपार लखलखावे तर एखाद्यात क्षणभर इंद्रधनू चमकावे…. एखाद्याच्या मागे मात्र कितीही धावले तरी त्याने मात्र आपल्याला सफाईदार चूकवावे…. आनंदाच्या उकळ्या म्हणा की दु:खाचे कढ , सगळ्याचेच बुडबूडे…..

हाय रे कर्मा आज हे असे काय विचार येताहेत…. फूंकर घालते या बुडबूड्यांवर… आणि झोपते आता……

……………………………………………………………..

…………………………………………………………………..

सकाळ…..

सुर्य उगवलाय, पोस्ट अर्धीमुर्धी हाती लागलीये…… आज अजून एक गैरसमज दूर होतोय, कारण कधी नाही ते गाढ झोपेतले गु्ढगंभीर असे (माझ्यामते ;) )काही विचार आठवताहेत….. म्हणजे ज्या ’विचारांच्या’ पोस्ट कराव्या अशी माझी भ्रामक कल्पना होती, ते जरा जास्तच गहन बुडबूडे निघाले…. :) हे असलं शेंडा बुडूख नसलेलं काही टाईप करणं म्हणजे वाचणाऱ्याची सोशिकतेची मर्यादा तपासणं आहे….. काहितरीच अगम्य, अतर्क्य, अलंकारिक (कोण आहे ते जे ’चमत्कारिक’ असं वाचतयं !!! :) ) आहे हे प्रकरण……

छे छे छे…. इथून पुढच्या पोस्ट्स व्यवस्थित जागेपणी लिहिणार, म्हणजे ’अपने पुरे होशोंहवास में ’ वगैरे….. उद्याला काही हलकंफूलकं सुचलं तरच लिहीन आता (तोवर सहन करा ही पोस्ट ;) ) ……

एक’क’ …..

सहज येणारे विचार काव्यात बांधणे सोपे नक्कीच नाही… माझ्यासारख्या गद्याशी सुत जमवलेल्या व्यक्तीने तर त्या वाट्याला जाऊही नये… तशी मी जातही नाही….

कधितरी असेच काहीतरी विचार गर्दी करतात जे ना पद्य असते ना गद्य…. मनात हे विचार दाटिवाटी करतात….

आज असेच काहिसे…. कविता किंवा काव्य वगैरे काहिही शोधू नका, मी ही शोधलेले नाहिये…. एकेका ओळींचे विचार म्हणूया हवे तर….

क कूचाळक्यांचा

क कौतूकाचा

क कंटाळ्याचा

क कर्तुत्त्वाचा

क कटूतेचा

क कणवेचा

क कंजूसाचा

क कर्णाचाही

क कहराचा

क कृपाप्रसादाचा

क किचकटही

क कुतूहलही

क कृतघ्नही

क कृतज्ञही

क क्रौयातही

क कारूण्यातही

क कणखरही

क कोमलही

क करडा काळा

क कांचन केशरीही

क किंचितही

क कौशल्यही

क कातरवेळही

क किरणही

क कैकेयीचा

क कौशल्येचा

क कॅब्रेतही

क किर्तनातही

क केराचाही

क केवड्याचाही

क काव-काव ही

क कुहू-कुहू ही

क कसाबचाही

क कलामांचाही

क कलमाचा

क किबोर्डचाही

क नूसता ’क’ म्हणावा की त्याला एकक म्हणावे….. कुठले परिमाण, विशेषण लावावे…. निवडु म्हणतेय आज एकच ’क’ , पहिला नव्हे दुसरा…. आवडेल मला माझ्या नावामागे तेच एक’क’…..

जाता जाता एक’क’ मग असा आठवतो जो मला सांगतो…

क कागदाचा होता

क कॉंप्यूटरचाही झालाच की…  :)

 

ता.क. ही सहजच वरची १०० वी पोस्ट :)