एक ‘अर्थपुर्ण ‘ साठवण…..

किती तो पसारा टाकलाय मुलांनी म्हणून चिडचिड करत तो आवरायला घ्यावा आणि त्यात एखादी अत्यंत मौल्यवान गोष्ट हाती लागावी…..

सहज म्हणून उचलला खाली पडलेला एक कागद !! माझ्या सहा वर्षाच्या पिल्लाचं अक्षर पहाताक्षणी भरकन् त्या कागदावरचा मजकूर वाचला….

Abu Dhabi-20131119-00179

“Love Earth ” …. वाचून वाटले कुठल्यातरी अभ्यासाबद्दल काही लिहिले असावे …. पुढच्या शब्दांतून मात्र जाणवले , ही Earth म्हणजे धरती वगैरे नाहीये तर माझ्या बाळाला World हा शब्द ऐनवेळी न आठवल्याने तिथे Earth  या पर्यायी शब्दाला जागा मिळालेली आहे  :)

साधा सोपा आणि लहानसा मजकूर !!

Love Earth ….. My Earth 

My Mother cooks lovely . My father works very hard . My brother is very lovely . My grandFATHER is v. good and clever . My grandMother is V.good . the end .

:) :)

पिल्लूच्या शब्द्खजिन्यातल्या मोजक्या विशेषणांनी प्रेमाने लिहीलेले लहानसे पत्र ….
छोट्याश्या बाळाचा छोटासा प्रयत्न …. जरा दोन तीन वेळा वाचल्यावर जाणवलं माझ्या बाळाचं ‘विश्व ‘ म्हणजे फक्त आम्ही सगळेजण …. Very Good शब्दाचं शाळेतली शिक्षिका देते तसं V.Good हे रूप  :)

सगळ्यांबद्दल लिहून झाल्यानंतर स्वत:च नावंही न लिहिणारी निरागसता …. आणि सरतेशेवटी , माझं विश्व हे इतकंच आहे हे ठाम सांगणारं “the end ” :)

जपून ठेवायच्या वस्तूंमधे एका सुरेख सुंदर अनमोल वस्तूची भर !! :) :) ….

आठवणींच्या साठवणी आणि मग त्या साठवणी पाहून येणार या कोवळ्या नाजूक आठवणी :)

हे असं आहे म्हणून आणि आहे तोपर्यंत आमच्याही जगण्याला खरा ‘अर्थ’ आहे हे सांगावं म्हणतेय पिल्लूला आता  ……. :)

गट्टी ..

ताप आला होता मधे दोन दिवस. हे म्हणजे ’दुष्काळात तेराव्या महिन्या’सारखे झाले होते. कधी नाही ते देवाला जरा रागे भरावे वाटले, की बाबारे आधि जे काय दुखवून ठेवलेस त्याबद्दल नाहीये नं माझी तक्रार, अभी और नही मंगताहे भाई… पुरे कर की आता वगैरे!!!

सतत काहितरी शोधावे वाटत होते, काय ते ही समजेना. विचार केल्यावर लक्षात आलं काहितरी वाचायला हवय आपल्याला… त्यासाठीची ही शोधाशोध आहे.  वाचायचे काय , समोर पाउलो कोएलो होता खरा पण ते काही वाचावे वाटेना. अचानक आठवलं आपण भारतातून बरीच पुस्तकं पाठवली होती खरी, ती गेली कुठे ? जरा चौकशी केली ’अहोंकडे’ आणि सापडली ती पुस्तकं. अहोंना म्हटलं सरळ की आधिच का नाही दिली मला माझी पुस्तकं,  गेले सहा महिने मी अगदी घराबाहेरही पडत नाहीये. काहीच करता येत नाहीये, साध्या साध्या हालचालींवरही अनंत बंधनं आहेत… तरिही मला ’बोअर’ होतय , मी दमलेय असा उच्चार नाही करावासा वाटत . मला वाचत असलं की बरं वाटतं , त्याने वेदना संपतात असे नसले तरी!!!

त्या पुस्तकांमधून दुर्गाबाई भागवतांच ’पैस’ घेतलं हातात. खरं सांगू तर मी दुर्गाबाई भागवत अजून वाचलेल्या नाहीत, का? माहित नाही… एक आदरयुक्त दरारा वाटत आलाय कायम त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल. हे त्यांचं आणलेलं पहिलं पुस्तकं. ते निवडण्याची प्रक्रियाही अगदी वेगळी, हॅंडमेड पेपरचं कव्हर पाहिलं, त्याचा स्पर्श हाताला जाणवला आणि मग पुस्तक पुन्हा ठेवलंच नाही. अजिबात न चाळता घेतलेलं बहुधा हे पहिलं पुस्तक!!

दुर्गाबाईंच लिखाण वाचलेलं नसलं तरी अनोळखी नव्हतंच…. आपल्या गोंधळलेल्या अवस्थेत शरण जाण्याच्या हक्काच्या जागांमधे जशी अमृता प्रीतम वाटते तश्याच दुर्गाबाई आहेत हे स्पष्टच होते , पण त्यांच्याशी गट्टी जमायची राहिलेली होती .

’स्वच्छंद’ हा पहिलाच लेख वाचायला सुरूवात केली . अपेक्षेप्रमाणे पहिल्याच वाक्याने पकड घेतली. वाचायला लागले आणि वाचतच गेले. असं खूप कमी वेळा होतं नाही, की वाचताना आपलं असं वेगळं अस्तित्व जाणवेनासं होतं. आपली संवेदना ही फक्त त्या शब्दांभोवतीच गुंफली जाते. ते शब्द, ती अक्षरं इतकीच जाणिव उरते…

वाचता वाचता एका ठिकाणी तर थबकलेच मी ….

दुर्गाबाईंनी लिहीलं होतं ….

” मी अंथरूणाला खिळलेली असताना जीव उबगला होता. तास, दिवस, महिने, ऋतू व वर्षे त्यात त्या निरानंद तऱ्हेने फार मंदमंद अशी उलटत होती. प्रत्येक दिवस आपले पाऊल माझ्यावर रोवून मगच नाहिसा होत होता, आणि आपल्यासारख्याच जड निष्ठुर दुसऱ्या दिवसाला, ” तुही ये ” म्हणून साद घालित होता. कंटाळा क्षणाक्षणातून ठिबकत होता . जीवनाधार दिवसेंदिवस क्षीण होत होता.”

अगदी अगदी ओळखीचे वाटले हे…. नेमके आणि थेट , हेच तर म्हणायचेय नं मला…. प्रत्येक दिवस त्याचं ’घेणं’ असल्यासारखी दुखण्याची वसूली केल्याशिवाय काही उलटत नाही.  :( ….. जोडली गेले मी अक्षरश: इथे त्या वाक्यांशी ….

” पण याही दिवसांना भेदून त्यांच्या वाकोल्या बंद पाडणारी फाल्गुनाची अखेरच्या वाऱ्याची एक झुळूक दक्षिणेकडून एक दिवस आली. मला ती चक्क भासली. संस्कृतातल्या दक्षिणानिलाला मी हसत असे. पण उन्हाळ्याच्या तप्त वातावरणात , पान नी पान स्तब्ध उभे असताना, ही मंदशीतळ झुळूक आली आणि ती सरळ माझ्या अधरात शिरली. केवळ भावनावेगानेच स्पंदन पावणारा अधर आता आपोआपच फुलल्यासारखा भरला ; त्यात जोराने रक्त वाहू लागले. काही क्षणांचाच हा अनूभव; पण सुख सुख म्हणजे काय असे मला कोणी विचारले तर वाऱ्याची झुळूक हळूवारपणे अधराला अनाहूत स्पर्श करते नि त्यात खेळते ते खरे सुख असे मी सांगेन. “

ओळख पटतं होती इथे या वाक्यांशी. खरच येते अशी एक मंद झुळूक की त्यानंतर सुख वेगळं शोधावं लागत नाही. माझ्याच मागच्या पोस्टची आठवण झाली मला…

पण हे सगळं इतक्यावर थांबत नव्हतं, माझ्यासाठीची खरी गंमत तर पुढे होती …..

दुर्गाबाई सांगत होत्या,

 ” तेव्हापासून मला आकाश बदललेले दिसले. वसंत येत होता. आता मला बिछान्यावरूनच खूप दुर न्याहाळता येऊ लागले. जग मला आता दूर लोटीत नव्हते; ते मला आपल्या विशाल मिठीत फार हळुवारपणे सामावून घेत होते. आता घर, आंगण, दिसेल ते झाड, पान , पाखरे, उन , पाऊस, वारे, धूळ, किडे, सारे काही मला रिझवणारे वाटू लागले. मी रोज सृष्टीचा अभ्यास करू लागले. आता कितीतरी चमत्कार आमच्या अंगणातच घडू लागले. मी बरी होऊ लागले. कुठलेही बरेवाईट दृष्य मौजेने न्याहाळू लागले. पैसे व शक्ती खर्च केल्याशिवाय मी रिझत होते, शिकत होते. “

या वाक्यावाक्यासरशी अंगावर शहारा येत होता.

अगदी हीच मोजकी वाक्यं माझ्या गेल्या संपुर्ण पोस्टचा , त्यामागे माझ्या असलेल्या विचाराचा आशय अलगद नेमकेपणानं समजावताहेत , सगळा सगळा सार उलगडताहेत . अचानक ’गट्टी’ जमली माझी दुर्गाबाईंशी. आजीने मायेनं डॊक्यावरून हात फिरवून सांगावे की बाळा काही चुकत नाहीये तुझे , जसा विचार करतेय आयूष्याचा तो बरोबर जमतोय. आपला प्रवास योग्य दिशेने नेण्यासाठी जसा हात धरलाय मोठ्यांनी…. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल होतेय आपली….

मग ओरडले , ’आईशप्पथ , दुर्गाबाई u too!! ’ …. जरा भानात येत पुन्हा म्हणाले ,” बावळट आहेस तन्वे… अगं त्यांना कुठली u too विचारते आहेस …. त्या आहेतच. असणारच… आश्चर्य हे आहे की तन्वे u too!!!!! ” … आजारपणाचा असा विचार त्यांनी करणं यात नवल नव्हतेच, पण आकाशायेव्हढ्या त्या व्यक्तीमत्त्वाकडे अत्यंत आदराने पहाणाऱ्या कोणा एका माझ्यासारख्या ’किंचित” व्यक्तीनेही तोच तसाच विचार केला !! निदान एका विचारापुरतंच असलेलं ते साम्य किती बळ देतय आता मला….

आता मात्र दुर्गाबाई तुमच्याशी गट्टी पक्कीच पक्की .

मला आता एकूणातच डरनेका नही- डगमगनेका तर नहीच नही….. गट्टी करत हात कोणाचा धरलाय शेवटी ??  :)

फ्रेम….

सुट्टी ….. वर्षभरानंतर मिळणारी सुट्टी…. अगदी विचारपुर्वक प्लॅन आखून घालवायची असं ठरवलेली सुट्टी….. आम्हीही ठरवली होती… जुलैमधे सुरू होणारी सुट्टी, त्यासाठी जानेवरी- फेब्रूवारीतच ठरवलेली ठिकाणं….

मुळात ही सुट्टी म्हणजे  ’वर्षभराच्या कामाच्या शिणवट्याला घालवण्यासाठीचा वेळ’  हा एक मुद्दा आणि तसेच पुढच्या वर्षाच्या कामासाठीचा उत्साह साठवण्याचाही वेळ…. इथे जाऊ- तिथे जाऊ वगैरे चर्चा …. इंटरनेट्वरची शोधशोध ….. सगळं पार पडत असताना एक मस्त सकाळ आली आयूष्यात …. सकाळी उठायला गेले आणि कळलं आपल्याला उठताच येत नाहीये… मान-पाठ- खांदे वगैरे अवयवांनी पक्का असहकार पुकारला आहे. त्यादिवशी कशीबशी वेळ निभावली खरी …. पण साधारण महिन्याने आणि एक सकाळ पुन्हा अशीच आली….. यावेळेस तर उठता न येण्यासोबतच कमालीच्या चक्कर येण्याचीही सोबत होती…. दवाखान्यात गेले तर ते ही थेट ऍंब्युलन्समधून अगदी सायरनच्या दणदणाटात ….

हे आजारपण काय आहे वगैरे शोधाशोधात गेले २-३ महिने ….. सरळ भारत गाठला मग त्यासाठी, गड्या आपला देश बरा म्हणत…

एक म्हण वाचली होती पुर्वी , Life is what happens to you when you are busy planning other things !!!  :( :)

मुळात ज्या म्हणी पटतात त्या लक्षात रहातात ….. आणि त्यांचा प्रत्यय आला की त्या जास्त पटतात …. मग ते सुट्टीचे प्लॅन्स वगैरे राहिले कागदावर ….. आणि सुट्टी लागण्यापुर्वीच भारतात जावे लागले. एक नाही दोन नाही , तीन तीन डिस्क स्लिप झाल्या आहेत मानेत , माझ्या मानेचा मला न समजणारा MRI माझे डॉक्टर मला समजावत होते …..नुसत्या सरकून थांबल्या तर त्या माझ्या डिस्क कुठल्या , त्यांनी बिचाऱ्या स्पाईनची पार गळचेपी केली…. “गळयात होणारी गळचेपी ” ही कोटी तेव्हा मनात आली नाही इतपत दु:खी मी  नक्कीच झाले होते …. आजारपण स्वत:ला येतं म्हणून त्याचा जितका त्रास होतो त्यापेक्षा कित्येक पट जास्त आपण ज्या वर्तूळाच्या केंद्रस्थानी असतो त्या वर्तूळाच्या परिघावरच्या लोकांना होणाऱ्या यातना छळ मांडत असतात.

डॉक्टरांनी सांगितलेले ऑपरेशन टाळायला मग सेकंड, थर्ड वगैरे ओपिनियन घेणे आले…. ते तसे घेतले गेलेही ….. मनात एक सततचा प्रश्न  होता , ’हे का झाले ? ’ आणि  ’हे मलाच का झाले ?’ :) …. मग आमच्या हेरंबाने एक सल्ला दिला, ” आधि Why me ? ” हा प्रश्न विचारणं बंद कर …. तो बंद करायचा ठरवलंही लगेच, आचरणात आणणं नाही म्हटलं तरी तितकसं सोप्प नव्हतं…. आपल्या आयूष्यात काही छान-भन्नाट घडतं नं, ते चटकन स्विकारलं जातं…. पण मेलं हे आजारपण तितकसं वेलकम होत नाही ….. त्यात आई-बाबा, आजी-मामा-मामी, माझी पिल्लं, बहिण आणि खंबीरपणाचा उसना आव आणलेला नवरा यांचा विचार सगळंच अवघड करत होता!!!

असो, ते ऑपरेशन टळलं एकदाचं…. पण आराम मागे लागला….  सुट्टी गेली दवाखान्यांच्या फेऱ्यांमधे…. अधे मधे चिडचिड वगैरे सुरू होतीच माझी…. आणि माझ्या चिडचिडीचा जराही अनूभव नसलेले माझे आई-बाबा कावरेबावरे होत होते….. एकदा सकाळी उठले तर पाहिलं बाबा खिडकीतून येणारे उन अडवण्यासाठी पडदे सारखे करत होते…. ही सावली त्यांनी कायमच दिलीये आम्हाला. नेहेमी ते असे हलकेच पडदे सरकवून जातात तेव्हा आम्ही झोपलेलो असतो इतकेच…. उठून त्यांच्या मागेच गेले तर स्वयंपाकघरात ते डोळ्यातलं पाणी आवरत आईला सांगत होते , “घेऊन टाकता आलं ना तिचं दुखणं तर लगेच घेऊन टाकेन मी!!! ” :( …. त्यादिवशी नुसती उठलेच नाही तर झोपेतून जागीही झाले….

बाबा सकाळी पुजेनंतर रामरक्षा म्हणतात आणि मग झाडांची फुलं काढायला जातात हा क्रम सहसा न चुकणारा…. त्यादिवशी मी फुलांची परडी हातात घेतली आणि अंगणात गेले…. स्वत:ला एकच बजावले , असाध्य काही झालेले नाहीये, पुरे आता ही सहानूभूती….  जे जमेल ,जितके जमेल,  जसे जमेल तसे सुरू झालेच पाहिजे आता….

घेतली फुलांची परडी हातात आणि अंगणाला प्रदक्षिणा घालायला लागले…. एक एक फुल हातात येताना त्यांचा टवटवीत तजेला मला देत होते जसे…. लहानपणी असेच मी फुलं आणून द्यायचे बाबांना…. या निमित्ताने पुन्हा लहान होता येत होतं…. कळीला धक्का लागू द्यायचा नाही असं स्वत:च्याच मनाला बजावत होते मी… म्हटलं तर खूप विशेष काही नव्हतं घडतं, पण मला खूप शांत वाटत होतं !! सकाळच्या एकूणातच कोवळ्या स्वच्छ्तेने मन निवांत विसावत असावं बहूधा…. माझ्या आजारपणाने माझ्या संपुर्ण कुटूंबाचे किती महिने असे काळजीत जाताहेत ही खंत विसरले मी काही काळ…. ’सुट्टी’ चे आखलेले बेत आठवले मग, वाटलं सुट्टी घेणार होते ती हा निवांतपणा मिळवण्यासाठीच की…..

मग कॅमेरा आणला घरातून, आपण हेच करतो नं फिरायला गेल्यावर, भरपूर असे फोटो काढतो…..

हा मग विरंगूळाच झाला एक , जमेल तेव्हा बागेत जायचे आणि फोटो काढायचे…..आज ते फोटोच टाकतेय एकामागोमाग एक….

मी फोटो काढायचे , आपल्याच बागेत फिरायचे ठरवले आणि तो आनंद साजरा केला आमच्या ब्रम्हकमळाने…. एक नाही दोन नाही सात फुलं आली त्याला यावेळेस…..

ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालेलो असतो , कोणे एके काळी जिथे बाहेरून कोणी ’काकू’ म्हणून हाक मारली की ती आईसाठीच असणार हे ठरलेले असते, तिथे ’ओ काकू बाहेर एक गंमत आहे, पहायला या ’ ही माझ्या मुलाच्या मित्रांनी मारलेली हाक मला नेहेमी वय वाढल्याची जाणीव करून देते…. ;)  बच्चेकंपनीला मी म्हणजे एक ’रिकामटेकडी’ काकू मिळाले होते त्यामूळे त्यांच्या विश्वातल्या लहानमोठ्या घडामोडींमधे ते मला सामील करून घेत होते , त्या मुलांनीच दाखवलेली ही एक गोगलगाय :)

कितीही प्रकारची फुलं माहित झाली तरी गुलाबाचं फुलं आवडतंच…. नाही का??

गुलाब जसा आवडता तसेच अत्यंत आवडते म्हणजे गणेशवेल, गोकर्ण आणि गुलबक्षी ….. गुलबक्षीचं एक बरं असतं पाऊस आला की ही रोपं आपली आपण येतात…. बहरतात , रंगांची उधळण करतात…. सगळा सौम्य कारभार…..

एक नाजूकशी गोगलगाय जशी दिसली तसे बाकि प्राणी-पक्षीही हजेरी लावत होते ….. कधी कॅमेरा हातात असताना सापडायचे तर कधी आठवणीत जागा पटकवायचे…..

चांदणीची फुलं काढताना सापडलेले सुरवंट….

तर हा अचानक दिसलेला सरडा….

ही जवळपास तीन इंच मोठी गोगलगाय….. कुठून आली होती देव जाणे, मी मात्र पहिल्यांदा इतकी मोठी गोगलगाय पाहिली…..

मुळात पावसाळा सगळं कसं स्वच्छ लख्ख करत होता….. हळूहळू घराच्या अंगणातच मी मनापासून रमत होते :)

पानावरून ओघळणारे थेंब असोत ….

की स्वस्तिकाची आठवण करून देणारे पपईचे फुल असो…..

की अगदी भुछत्र असो….

की अगदी गुलाबी लालबुंद डाळिंब असोत…. सगळ्यांनी मला उभारी दिलीये हे नक्की!! :)

मनावरची काळजी हटणं किती महत्त्वाचं असतं नाही…..अंगणाची एक नवी व्याख्या समजली मला त्या दरम्यान एक…. अंगण नं एक ’फ्रेम’  असतं….. सुंदर फोटोभोवती तितकीच सुरेख, रेखीव नाजूकशी फ्रेम असली की मुळचा फोटो कसा उजळून निघतो नं.. तसं प्रेमाने भरलेल्या घराभोवतीचं अंगणं, त्यातली झाडं-पानं -फुलं अशीच मुळच्या घरातल्या भावभावनांचं सौंदर्य वाढवणारी असतात..असावीत … :)

फोटोला सुरक्षित ठेवणारी, त्याला धक्का लागू न देणारी ’फ्रेम’ ….. फोटोतल्या व्यक्तीच्या स्वभावाचे वैशिष्ट्य पहाणाऱ्याला अलगद , गुपचूप सांगणारी ….. तसेच या अंगणाने मला सुरक्षित ठेवले…. मनाला (मानेला ;) ) घड्या पडल्याच होत्या , त्यांना हळुवार सांभाळले, फुंकर घातली…..

कधी कधी वाटतं सुट्टीला कुठेतरी गेले असते तर मनात इंद्रधनूष्य साठवायलाच नाही का ? आकाशाची ती सप्तरंगी उधळण मनात साठवायलाच नं…. मनमोराचा पिसारा वगैरे फुलवायलाच नं …..

यावेळेस मात्र जरासा ’काखेत कळसा’ असल्याचा प्रत्यय आला मला :)

इंद्रधनूष्यही अगदी हाक मारल्यासारखे हजर झाले :)

मन उजळले मग चटकन…..

माझ्यापायी घरच्यांचाही सुट्टीच्या भटकंतीचा विरस झालाय ही बोच आहेच तशी, पण निदान आजारपण सुसह्य झाल्यामूळे त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद तरी वाढला!!!

खूप खूप लिहू शकतेय मी… लिहायचेही आहे मला , पण आत्ता नाही…. माझ्या डॉक्टरांनी मला सध्या ’शिपायाचं’ काम कर असं सांगितलेय… एका जागी बसायचं नाही…. हातातली कागदपत्र वाटत असल्यासारखं सतत एका जागेवरून दुसरीकडे जायचं :) … तेव्हा एका बैठकीत खूप कमी लिहीता येतेय मला ….

ही पोस्ट बिस्ट काही खरच  नाहीये तशी… जाता जाता एक छोटा प्रयत्न करावा वाटतोय एक ….

गेल्या सहा महिन्यात ’ मला उत्तरं द्यायला जमत नसल्याचा ’ कुठलाही राग मनात न आणता मला सतत मेल्स, मेसेजेस, फोन करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मंडळींचे आभार मानण्याचा…. मला भेटायला येणाऱ्या, माझे रिपोर्ट्स डॉक्टरांना वैयक्तिक नेऊन दाखवून सल्ले घेणाऱ्या अनघा ,राजीवजी , सुनीतचे आभार मानण्याचा…..

कमेंट्स टाकत रहाणाऱ्या आणि ब्लॉगवर काहिही नवे नसतानाही चक्कर टाकणाऱ्या नव्या आणि जुन्या वाचकांचेही आभार!! :)

आणि काय लिहू, तुम्ही सगळे हातात हात घालून माझ्याभोवती एक कडं उभारलेलं दिसतय तोवर कशाला भीत नाही ब्वॉ मी …. एक अत्यंत सुंदर फ्रेम आहे किनई माझ्याभोवती , नाजूकशी तरिही अत्यंत भक्कम……

बस फिर और कुछ नही, आजके लिये इतनाही …. जशी जमेल तशी पुढची ’पोस्ट’ टाकतेच!!!

बाकी शून्य ……

अंक, बाराखडी, गणित, भाषा, इतिहास, भुगोल, विज्ञान, मग जीव नी भौतिक त्यात रसायनाचा घोळ….. बीजगणित, भूमिती, ट्रिगनॉमेट्री नं बिट्री…. साईन न कोसाईन, टॅन न बिन …… ईंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हज…. डबल नं ट्रिपल…. काळ काम न वेगही त्यात….आपली भाषा, साहेबाची भाषा… हिंदी बिंदी मधेमधे….व्याकरणं बिकरणं, नुसतंच प्रकरण….. प्रोजेक्टाईल नी सरळ , रिलेटिव्ह बिलेटिव्ह मोशन की बिशन ….. हालचाल नुसत्याच नावाची नी खरं तर सगळं थबकवणारी …… व्हेक्टर्स बिक्टर्स , डोक्यावरचे बाण….. वर्तूळ नि चौकोन….. इकडे रेषा,  तिकडे किरण….. वाकड्यात शिरले की डिगीटल नं ऍनालॉग….. डेटा न फेटा…. बायनरी बियनरी ….. मेकॅनिक्स नं ग्राफिक्स …. कंडक्टर नं नॉनकंडक्टर भलती धुडं … मधे सेमी वाल्यांच रिजर्वेशन चं लफडं ….. मिली सेंटी डेसी मिटर …  डेका हेक्टो किलो मिटर… नसती पाठांतर… त्यात मैलाची गणितं …. आर्टस न कॉमर्स…..आम्ही सुखी न तुम्ही दु:खी….. उभ्या दोन रेषा समोरासमोर की कपॅसिटर …आडवं पाडा त्यांना वेड्या वाकड्य़ा ओढा झाली की रेजिस्टर…. डायोड न ट्रायोड, इन्व्हर्टर नं बिन्व्हर्टर ….

आमचं सायन्स तुमचं सायन्स….. तुम्ही डॉक्टर, तुम्ही वकील .. तुमची जात वेगळी आणि आमची वेगळी !!! तुमचे विषय सोप्पे आणि आमची मेली ब्रॅंचच अवघड…… तुम्ही करा मज्जा नं आम्हाला सजा….

एकाचे एक विषय नं एकाचे एक…. तुमचा अभ्यास आमचा अभ्यास… तुमची डिग्री नं आमची डिग्री…… तुमची वर्ष गेली नं आमचीही गेली……

आम्हाला नोकरी मिळते तुम्हाला नोकरी मिळते….. कधी कधी आमचं नं तुमचं ऑफिसही एकच ….. तुमच्या डिपार्ट्मेंटला काम कमी नं आमच्यावर जबाबदारी भारी…… तुमचं लग्न होतं नं आमचं ही लग्न होतं…. तुम्हाला पोरं होतात नं आम्हालाही पोरं होतात… आयुष्याच्या वेव्हज एकाच दिशेला वहातात…. ए सी असो नं डि सी असो… त्यांचा रस्ता ठरलेला  …..

नाती नं गोती जपा फार….. लोकांच्या वागण्याचा भलता भार….. एक न धड चिंध्याच फार …. आमचं माहेर तुमचं सासर ….. आमची घरं तुमची घरं…. आमचा किराणा, तुमचा किराणा ….. आमच्या मुलांचे रिजल्ट नं तुमचे ते निकाल…..आम्ही घरं घेतो तुम्हीही घेता घरं …. आमचं महाबळेश्वर नं तुमचं माथेरान… लंडन बिंडनला तिकीटं फार…..

दमछाक करताना तुम्हीही दमता… दमछाक करताना आम्हालाही थकवा….. आयुष्याचा अर्थ शोधतो आम्ही…. अर्थात आयूष्याला शोधताना रमताय तुम्ही….

आयुष्याची गणितं म्हणे तुम्ही सोडवता… आयूष्याची गणितं मग आम्हिही सोडवतोच….

गणितात असतं काय काय…. अधिक नं उणे….भागाकार नं गुणाकार…. बालपणीच्या वर्गात शिकवतात बाई…. त्यांच्यावर विश्वासायची आपल्याला घाई….

प्रत्येक जण एक अंक असतो खरा…. पूर्णांक असो किंवा अपूर्णांकच बरा…. काही गोष्टी जोडतो काही वजा करतो….. घातांक बितांक शोधायचेच नसतात… पुस्तकाच्या बाहेर सांगा ते तसेही कुठे दिसतात??? वर्गमूळ नं घनमूळ की नुसतं खूळ …..

प्रश्न पडतात आम्हाला बरं , वाटतं तुमचंही असचं असतं हेच एक खरं…..

आयुष्यात गणिताला एकच फुटते वाट…. भागाकाराच्या रस्त्याचा भलताच थाट …..

आयुष्य स्वत:च होतो मग भाज्य एक…  भाजक म्हणजे आपणच अंक नेक….. अंक जितका मोठा भागाकार तितका सोपा… खूप पायऱ्या उतरायच्या नाहीत, उधाऱ्या उसनवाऱ्या करायच्या नाहीत……

अंक असू देत कुठलाही म्हणा….. नियम हाच गणिताचा कणा… पायऱ्यांना इथे मार्क असतात….. चुकारपणाच्या वाटा नसतात ….

काहीतरी भाग मग आम्ही देतो….. वजाबाक्या बिक्या करत असतो…. एक दरी पार की पुढची खाई ओढायची…. सारं बळ्ं एकवटत पुन्हा उडी मारायची…. आमचं ते असं नं तुमचंही असंच….. भागाकारात गुणाकार.. … गुणाकाराचा एक साक्षात्कार…. आम्ही नं तुम्ही रस्ते तेव्हढे वेगळे, आकडेच काय ते नवे …… तुमचं तेच नं आमचंही तेच की …..

गुणाकाराची वजाबाकी …. हे बाकि नं ते ही बाकि…..

आयुष्याचं संचित वर हळूहळू साठत जातं …..स्वत:लाच स्वत:ने भागायचं वळणं येतं….. हा भाग असतो एक भोग बरं का ….. त्याला चुकवणं आपल्याच्याने खरय का????

अंकातून अंक वजा मग होतो…. संचिताला एक अंक जोडला जातो….. ह्याचं संचित , त्याचं संचित…. आमचं वेगळं … तुमचं पुन्हा वेगळं….

तळाशी उरतं त्याला मग ’बाकी’ म्हणतात…… भेदाभेदाची गणितं इथे येऊन विरतात…..

गोल गोल आकडे फेर धरतात…. शुन्यातून विश्व उगाच का म्हणतात !!!!! :)

दोर…..

स्वत:वरून जग पाहू नये माणसानं…. म्हणजे चांगलही नाही नं वाईटही नाही….. आपण चांगले म्हणून जग चांगलं असं वाटलं की अपेक्षाभंग आलाच…. आणि तुम्ही वाईट असाल तर बोलायलाच नको नाही का!!!!

चांगलं वागलं कोणी नं की लगेच नको असतं पाघळायला…. तूला खोडच ती भारी… जरा कोणी दोन शब्द गोड बोललं की लागली पुन्हा भजनी…. मग घालतात लोकं लाथा….

जुनं कसं गं विसरतेस पटकन… सोडून देणं सतत अगदी….. लोक गैरफायदा घेतात नं!!!

नसता भोळसटपणा नसतो कामाचा….. लोकं ओळखतात सगळं… घडाघडा बोलू नये….

मदत करताना समोरच्याला खरच गरज आहे का, जाणिव आहे का विचार करावा…..

काही पटलं नाही तर बोलावं ….. मनात मनात ठेवू नये…. कोणाला नाहीये वेळ, तुमच्या मनातं आत्ता नक्की काय हे कोडं सोडवत बसायला…. स्वत:चच समजेना लोकांना तुमची कोण कशाला करेल पर्वा….

ओळखीची लोकं ओळखी देत नाहीत… कशाला  खी खी करून परक्यांशी हसायचं…. नाही पडत त्याला पैसे हा युक्तीवाद नकोय…. लोकांना हल्ली कडवट चेहेरे करून बसायला आवडतं…

जग बदललय, स्वार्थी बाजार आहे सगळा…. माणुसकी हरवलीये…गुन्ह्यांच प्रमाण वाढतय…. नाकासमोर चालणारे लोक आहेतच कुठे???

एक ना दोन….. आपण ऐकतो नं की सल्ले नावाच्या वाक्यांचे धबधबे वहातात अगदी!!!!!सगळेच काही मनात कुठला हेतू ठेवून कुठे दिलेले असतात… बरेचदा आपल्यालाही कळकळ पटतेच… आपण अडलेलो असतो , चिडलेलो असतो , हरलेलो असतो….. कुठेतरी रुजतात  हे सल्ले मग, हो ना , देव जाणे …. मनाचा गोंधळ उडतोच ……’तुम्हाला अक्कलच नाहीये कसं वागावं’ हे वाक्य खरं वाटायला लागतं!!  त्यात सगळे सल्ले पटावे, खरे वाटावे अशी माणसं आजूबाजूला गर्दी करून असतात….. त्यांच्यातून काढायची असते वाट…. घाबरायला होतं !!!

एक दिवस मग कोणितरी अनोळखी माणूस हसतं, उगाच…. ओळखं काय तर चेहेऱ्यावर चेहेरा पडतो आपला लागोपाठ एक दोन दिवस नुसता…. आणि अचानक आपलाच चेहेरा साथ सोडल्यासारखा, एरंड प्यायल्यासारखा हसतच नाही….. समोरचा चुकल्यासारखा निघून जातो नं आपल्याला प्रश्न पडतो…. हे असे का???

सल्ल्यांनी घेतला की काय मेंदूचा ताबा??? आपला चेहेरा आता आरश्यात आपल्याला अनोळखी वाटणार…. धूळ साठायला लागली आता प्रतिबिंबावर!!!

लोकांचा ढोंगीपणा सापडायला लागलाय… बोलतात एक करतात वेगळं हे प्रकर्षानं लक्षात येतं हल्ली… तोंडावर साखरेत घोळून बोलतात पण मागे तितकेसे चांगले मत नाही आपल्याबद्दल हा ही साक्षात्कार…. मतलबाचा मागोवा काढता येतो आता…. सगळं समजतं आताशा…. फसवायचं नाही हं, भाबडेपणाला हळुहळू तिलांजली देण्यात येतीये!!! आनंद का नाहीये मग, तो कुठे लोपलाय…. ही प्रगती की अधोगती मग…. बोध, आत्मज्ञान वगैरे की गूंते वाढताहेत नुसते….

त्याच रस्त्यावर आपल्याच विचारात पुढे जावं ,समोर असतात शाळेत जाणारी चिंटीपिंटी पिल्लं, त्यांच्या त्या मोठ्या बॅगा…. जिना चढताना मुलं बॅगा पुढे ओढताहेत नं बॅगा त्यांना खाली खेचताहेत…. नकळत त्या बॅगला आपल्या हाताने मागून आधार दिला जातोय….. जिना संपतो, ते पिल्लू मागे वळुनही न पहाता शाळेत पळतं!!! मगाशी आपल्या चेह्ऱ्यावरच हरवलेलं हसू पुन्हा नकळत उमटतं!!!

काहितरी उमलतं…..

पुढे यावं दुकानात जावं….. दुकानातलं दुध नेमकं संपलेलं असतं…. अकरा वाजता येइल दुकानदार सांगतो….. देवा रे, चहाचा दुसरा कप गेला की रे माझा…… दुसरे अनेक ब्रॅंड्स आहेत दुधाचे पण ते नको मला…..मनाशी चुचकारतच दुकान सोडलं जातं….. घरातली कामं सुरू मग,  ते सुटताहेत होय….. आपण कामांना लागतो आणि दारावरची बेल वाजते…. कोण आलय सकाळी सकाळी ….. मगाच्या दुकानातला माणूस, त्याच्या हातात दुधाचा कॅन ….. चेह्ऱ्यावर स्मितहास्य…. म्हणतो दुध घेऊन येणारी गाडी लवकर आली आज, मग म्हटलं तूम्हाला घरीच आणून द्यावं दुधाचं कॅन ….. किती आनंद होतो मला…. खूप मोठी नाहीये बाब नाही का… पण स्वत:हून आला ना हा , मला मिळणार नं माझा लाडका चहाचा दुसरा कप आता….

काय म्हणतील लोकं आता ’बिझीनेस स्ट्रॅटेजी’ …नाहितर कोण कशाला असं वागतय….

तरिही, साधा किराणामालाचा दुकानदार तो, त्याला कशाला हवीये स्ट्रॅटेजीची समीकरणं आणि भलेमोठे शब्द असले!! म्हणजे हा अनूभव ’माणूसकीच्या’ खात्यात टाकावा किनई… म्हणजे मला तरी तेच वाटतय, पटतय!!!

माझीच हरवलेली ओळख  कुठे सापडेल तो रस्ता सापडल्यासारखं वाटतय…… आरश्यातल्या प्रतिबिंबावरची धूळ झटकावी असं काहिसं अचानक वाटावं अश्या वेळी :)

दिवाळी सुरू आहे….. यावर्षी काहिही नवे घ्यायचे नाही हा मनाशी केलेला संकल्प…. पण मुलांना जरा सैलावलीयेत बंधनं…. खूप काही नाही पण त्यांच्या गरजेसाठीचीच एखादी वस्तू घ्यावी म्हणून गाठलेला मॉल….. एक लहानसं दुकानं, मोठ्या मॉलच्या जिन्याच्या बाजूला असलेलं….. हसतमुखाने होतं इथे स्वागत…. माझा जीव इथे जास्त रमतो…. आत मॉलात जास्त वस्तू असतीलही पण त्या घ्या असा आग्रह कोण करणार, घ्यायची तर घ्या नाहितर राहूद्या चा परकेपणा नुसता….. मुलाचा जरा हिरमोड होतो पण…. त्यांचा दोष नाही झगमगाट आणि ’खरी चमक’ यातला फरक समजण्याचं त्यांच वय नाही…. पटलं इथे तुझं घड्याळ तर घे नाहितर मॉल आहेच हा दिलेला पर्याय त्याला…. एक दुकान झालं, मग दुसरं , मग दुसऱ्यातून पुन्हा पहिलं….. बरीच झाली घड्याळं पाहून… त्याला काय हवय त्याला नक्की माहिते…. तो हळूच विचारतो आई तुझं बजेट कितीये? आई आणि दुकानदार यांची नजरानजर होते , दोघेही हसतात…. आई सहज विचारते, “भय्या पाकिस्तान से हो ? ” …. नाही म्हणतो तो, सांगतो मी केरळचा आहे आणि महाराष्ट्रातच जन्म झालाय…. गप्पा होतात मग जरा आपूलकीने…. मुलाला एक घड्याळ आवडतं, आईचं बजेट ओलांडतं आता…. दुकानदाराची ओळख आहे नं आता :) …. खरेदी आटोपते, मुलगा पुढे निघतो दुकानदार मागून मुलाला हाक मारतो , घड्याळ्याच्या किमतीतून काही पैसे काढून मुलाच्या हातात ठेवतो आणि सांगतो मामाकडून दिवाळीची भेट आहे, काहितरी घे स्वत:ला……

कुठल्यातरी गावचा, कोणाचंतरी दुकान सांभाळणारा कोणितरी अनामिक ’मामा’ पण भाच्याची दिवाळी उजळवून गेला!!! ही सुद्धा ’बिझीनेस स्ट्रॅटेजी’ म्हणायची का आता??? असेलही पण त्या भाच्याला नाही माहिती हा शब्द, तो तर खुश आहे अगदी…. अज्ञानात सुख असावं ते खरं!!!

पुढच्यावेळी याच दुकानात जाणार का आपण…. मग वाटतं कदाचित हो किंवा नाहीही…. एक धडा शिकायला मिळालाय पण की वस्तू विकत मिळतीलही पण ’आनंद’ असा सहज देता येतो….किती असतील हे असे वस्तू विकणारे नं आनंद फुकट देणारे लोक, एकूणातच प्रमाणाने कमी… पण आहेत हे नक्की!!! अकारण चांगलं वागू शकतात लोकं….. स्वार्थाविना एखादा चेहेरा हसवू शकतात लोक!!!

मग त्या समस्त स्वार्थी, शिष्ट वगैरे वगैरे लोकांच काय??? त्यांच काय त्यांच काही नाही… वाट चूकलेले पांथस्त सारे….. अधोगती, अध:पतन वगैरे शब्द असेच आले असतील का??? आणि आता आलेच आहेत तर ते सार्थ ठरवण्याची जबाबदारी खांद्यावर असल्यासारखी वागतात लोकं, झालं!!!! एक खोल खोल दरी असते त्यात कमीअधिक रसातळाला असतात हे, मग खेचतात बाकिच्यांना खालती!!!

सल्ले देणारे ,सावरणारे धरून ठेवतात आपल्याला उतरणीवर , नाठाळाच्या माथी काठी हाणायला सांगतात!!!

चांगले लोक काय मग? त्यांच कार्य काय??? :) :) ….. आपल्यासारखे असतात नं, गोंधळणारे, खाली उतरणारे….. त्यांना दोर टाकून वर ओढण्याचे काम करतात हे चांगले लोक!!! त्यांच काम त्या दोराचं… एखाद्याची घसरण थांबवण्याचं….

माझ्याकडचा आरसा आता मात्र लख्ख होतोय…. ’निर्हेतूक ’ हा शब्द पुन्हा येतोय डिक्शनरीत!!! स्थिर असल्यासारखं वाटतय…. घसरण थांबवलीये नं….

चटकन हसू शकतो चेहेरा आता….. रस्ता आहे अर्थात पुन्हा ठेच लागेलही, खड्डाही यायचाच एखादा…. घसरायला झालं की नवा दोर शोधायचा फक्त… सोप्पय… आपल्यासारख्या काठावरच्यांना हाच पर्याय उरतो तसाही!!!

एक जुनं आवडतं गाणं पुन्हा मनात येतय…..

No matter what they tell you,

What you believe is true!!!

No matter where they take us  ला मात्र जोरात ओरडावसं वाटतं   we’ll find our own way back!!!! :)

कारणं , I can’t deny what I believe…. I can’t be what I’m not !!!!!!

घरटं …

(वेळ -  संध्याकाळ पाच वाजलेले … )

– जायचय का तूला आज मॉलमधे ??? बघं मुलं घरी यायला वेळ आहे अजून… तुझी खरेदी आटोपेल तेव्हढ्यात….

– नको रे, आज राहू देऊ या का मॉल ?? मुलं असताना जाऊ या…. तसेही ती वाढदिवसाची पार्टी कधी संपेल कल्पना नाही… नेमके आपण जायचो आणि मुलं यायची…

– अजब आहेस तू ….. अगं आपण जाणार आहोत ना त्यांना घ्यायला… वेळही ठरलीये… त्याआधि कसे येणार ते ??? मुलं असली सोबत मॉलमधे की का वैतागतेस मग, की वर्षानूवर्षे राहिलं इथे तरी मेलं मॉलांमधे कोणकोणत्या गोष्टी मिळतात समजायचच नाही…. मुलं मला काही सुचू देत नाहीत …. एकदा मला मुलं नसताना घेऊन ये तू मॉलमधे… वगैरे वगैरे!!!!

– कळंsssssलं …. गाडी घराकडे ने गुपचूप!!!!

–ठीक आहे….. आणि बये आज शक्य आहे तर लाव ना तुझी लाडकी जुनी गाणी गाडीत….. एरवी मुलं त्यांची आवडती गाणी लावतात तर करवादतेस की काय धांगडधिंगा आहे म्हणून ….

– राहू दे… असू दे हीच गाणी … कुठे शोधू आता माझ्या लाडक्या गाण्य़ांचा पेन ड्राईव्ह…. चालू दे काहितरी….

:)

– माऊ असती गाडीत तर या गाण्याला ओरडली असती, “आवाज वाढवा … :) ” ….

– विचित्र बाई आहेस तू . इतकच समजलेय मला आता…. :) … सांगणार आहे मी आज मुलांना मम्माने तुमची आवडती गाणी ऐकली…

– मी काही ऐकत नाही रे ही गाणी… गप्पा मार बघू माझ्याशी… बोलायचं राहून जातं म्हणतोस ना एरवी… बोल बोल आता बोल!!!!

…………….

……………

( संध्याकाळ -साडे सहा )

– किती वाजले रे…. घरं कसलं शांत असतं नाही मुलं नसली की!!! शाळेत जातात ती वेळ माझी कामात जाते पण नंतर ते नसले की शुकशूकाट होतो घरात नुसता….

– हो का!!! अगं पण पसारा घालतात ना ते ….. ;) … तूच ओरडतेस….

……………

…………..

(संध्याकाळ – सव्वा सात )

– बरं जेवून घेऊ या का पटकन… मग निघू या मुलांना आणायला… .

– हो चालेल…. किती किती वेळ ठेवतात नाही लोक वाढदिवस….. फोन करू का त्यांना की आम्ही येतो लगेच मुलांना घ्यायला…

:) … अरे बातम्या बघ की… जगात किती घडामोडी घडताहेत ना… एरवी कुठे मुलं ऐकू देतात तूला…. एकतर आवाज तरी करतात नाहितर पोगो किंवा कार्टून पहातात  …. मी नाही हं म्हणत हे तूच म्हणतोस मुलांना….. ;)

:) … डाव उलटवलास :)

:)

– श्या आपण दोघेच जेवतोय एकटे , मजा नाही येत… मधे मधे ताटात लूडबूड नाही तर करमत नाहीये….

:) … ओ महाराज दोघं ’एकटे’ कसे असतात हो….. खरं सांगू आपण दोघं आत्ता आहोत आपल्या आई वडिलांसारखे… ते पण तर हल्ली असतात दोघेही ’एकटेच’ …. आपण निदान काही वेळाने मुलांना घरी आणणार हे माहितीये आपल्याला…..

:(

:( … सध्या आपण पिल्लांना चोचीने दाणा भरवणाऱ्या फेजमधे आहोत नाही…. पिल्लं अवतीभोवती चिवचिवताहेत….. मग ती हळूहळू मोठी होतील… नव्हे त्यासाठी आपणही धडपडू….. उंच आकाशातल्या त्यांच्या भराऱ्यांची स्वप्न पाहू…. ते उडतील त्याकडे कौतूकाने पाहू….

:) …. ते ’उडतील’ आणि मग उडून जातील…. वेगळी घरटी बांधतील….. त्याचं काय मॅडम ???

:) बांधू दे…. उलट मी म्हणेन बांधू दे…  जमवू दे एक एक काडी…. पहिल्या काही काड्या पुरवायच्या हव्या तर तू न मी…. आणि ठेवायचं हलकसं लक्ष घरट्याच्या मजबूतीकडे…. त्यांच्या नकळत हं!!! त्यांच्या पंखातली ताकद, जिद्द वाढती ठेवायची…. :)

:)

– मगं पिल्लं त्यांच्या घरट्यात बसतील नी हलकेच मागे वळून पहातील… आई- वडिलांचं घरटं असेल ना नीट असा विचार करतील…. दमले थकले की येतील इथे विसावायला….. :)

:) …. आवरा…. लेडी शेखचिल्ली…. माझं झालय जेवणं…. तुमचा खयाली ’पुलाव’ शिजवा आता गाडीत… मी फोन करून येतो… मुलांना आणायला जाऊया….

– कुचकट … :)

………………..

………………..

( संध्याकाळ – आठ वाजलेले )

– य्येssssss….. मम्मा बाबा …. आम्ही आलो!!!!! :)

:) ….. मजा केली ना पार्टीत….. आम्ही तुमची वाट पहात होतो…..

— जाम जाम मजा आली रे बाबा …  आणि मम्मा वाट कशाला पहायची…. आम्ही येणारच ’असतो’ ना!!!

:) … हो रे… मम्माला सांग हेच पुन्हा एकदा आता  :)

………….

…………

(वेळ रात्रीचे साठे आठ पावणे नऊ ….)

— अरे त्या रिटर्न गिफ्टांच्या पिशव्या नका रे फेकू इथे तिथे….. कपडे बदला…. हात पाय धूवा… आवरा रे….. ते फुगे तर सरळ डस्टबिनमधे जाऊ द्या… कोणी खेळत नाही… लोळतात नुसते घरभरं….. पसारा घालू नका sssssss !!!! मी काय बोलतेय…. कानात शिरतेय का तुमच्या ?????

—- पीं sssssssss!!!!!!!

— बंद करा रे त्या ’पिपाण्या’ ….. लोक पण ना का देतात ही डोकेदुखी देव जा्णे….काय एक एक खुळ निघतं नवं नवं …..

— मम्मा आपणही माऊच्या बड्डेला दिल्या होत्या हं या … उगाच बोलू नकोस….

— हो ना दिल्या होत्या ना… नाही दिल्याचं होत्या… लोक माझं डोकं दुखवतील मग मी का त्यांचे कान किटवायचे नाहीत!!! …. तुम मेरे बच्चे को पिपाणी दो मै वहीच म्हणजे वैसीच दुसरी तुम्हारे बच्चे को दुंगी…. मराठी बाणा आहे हा!!!

— मम्मा तू पण ना :)

– कळंलं ना मम्मा पण काय ते… चला झोपायला…..

– नशीब तुझं बाळा कळली तूला तुझी मम्मा… मला अजूनही कोड्यात टाकते ती…..  मुलं असली की त्यांच्यावर रागवते आणि नसली की कधी येतील याची वाट बघते…. चालू दे माते तुझे अखंड :)

– चूप रे तू…. असेच असते हे,  पिढ्यानूपिढ्या हेच घडणार असते…. उगा मला बोल लावू नकोस!!!

………………

……………..

(वेळ रात्रीचे दहा )

— मम्मा जुन कधी येईल ????

— मम्मा झालं हिचं सुरू….. आधि विचारायची आपण ईंडियाला कधी जाणार?? तू सांगितलस जुनमधे तर आता सारखी विचारते ’जुन कधी येणार ??? ’ …

— आता लगेच येणार हं जुन… लवकरच…. झोपा बघू आता….

— मम्मा मला नानीची आठवण येतीये….

— मम्मा मलापण मी पण मिस करतोय त्यांना…. ते पण आमची आठवण काढत असतील ना…. कधी येइल जुन असे वाटतेय मलापण…

:) हं….

– पण मम्मा आपण सगळे असे वेगवेगळे का रहातो…. ते पण दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमधे ??? सगळ्यांना एकाच ठिकाणी जॉब का नाही करता येत???

— मोठं होणं म्हणतात बाळा याला….. असू दे, नंतर सांगेन सगळं … झोपा आता… उद्या शाळा आहे!!!!

— ए मम्मा नानीच्या घरामागच्या नारळाच्या झाडावर सुगरणीने घरटे बांधले असेल ना…. ती खाऊ आणत असेल आतल्या पिल्लांसाठी…. मम्मा, मागच्या वर्षीची पिल्लं आता मोठी झाली असतील ना… धमाल!!!!

:) …. हो रे बाळा झालीयेत पिल्लं मोठी…. आता ती वेगळी रहातात…. सुगरणीच्या पिल्लाने मात्र पुन्हा एकवार सुंदर ’घरटं’ विणलय ., तसच अगदी मऊसूत, उबदार… मस्त झोका असणारं ..मन लावून , जिद्दीने. काडी काडी पारखून जमवून…. माहितीये तिला  पिल्लं मोठी होणार मग भुर्र्कन उडून जाणार एक दिवस… तरिही….

आणि आता मोठ्या सुगरणीची पिल्लं उडत उडत त्या घरट्याकडे धाव घेणारेत , विसावायला… जगण्याची , उडण्याची जिद्द पुन्हा पंखात साठवायला!!!!!!!!!!!! :) ….


—- :) … मिसेस. सुगरण झोप आता !!!  :)

— गुडनाईट मि.सुगरण  !!! :)

एक खून माफ…..

“सुख हे मानण्यावर असतं नाही ” …गुळगुळीत वाक्य आहे हे… अनेकदा ऐकलेलं…. जोवर प्रत्यय येत नाही तोवर ही अशी वाक्यं quotes म्हणून बरी वाटतात, अर्थ मात्र झिरपत नाही…. कधी तरी अचानक सामना होतो या वाक्यांच्या अर्थाशी, मग ती पटायला लागतात…. आपल्या मनाचं प्रतिबिंब कुठल्या तरी अनोळखी मनात पडल्यासारखं वाट्तं…. मग या वाक्यांचे फेसबूकचे स्टेट्स बनते… चार दोन मस्त व्यस्त लोक मग ते लाईक वगैरे करतात….

आज तिला म्हणावं वाट्लं, “सुखं बिख सब झूट… च्यायला दु:ख झालय मला ” … राग राग करायचाय… सगळ्याचा…. ब्रम्हदेवाच्या ते या राज्यकर्त्यांच्या सिस्टिमचा… हवापाण्यापासून ते माणसांपर्यंत सगळ्याचा….

लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आठवताहेत मग तिला…. कोणाची लबाडी, कोणी केलेली फसवणूक असो की जिव्हारी लागलेल्या अनेक जखमांवर धरलेल्या खपल्यांची पुटं असो ….. आज कारणीभूत व्यक्तींची भले नावं गावं आठवत नाहीत पण बिनचेहेऱ्याच्या त्या सारख्याच मनोवृत्तीच्या लोकांची आठवण होतेय…. अनेक हक्क हिरावलेले, अनेकदा गरजेच्या हाकेला ओ न दिलेले काही बाही एकामागे एक आठवणींच्या रांगेत येतेय….

काल मग ती जेव्हा म्हणत होती की ती सुखी आहे तेव्हा कुठे होत्या या आठवणी ???? आज आठवताहेत भराभर म्हणजे त्यांचं अस्तित्व कालही होतच की, म्हणजे “मी सुखात आहे ” या भावनेच्या बांधाने यांना अडवलं होतं जणू…. आज जरा वाटले तिला की इतर कुठे नाही पण आपल्या मनाशी प्रामाणिकपणे कबूल करावे की आजवरच्या आयूष्यात मी ही कधी एकटी होते, खचले होते, निराश होते.. दु:खी होते!!!! जरा असं वाटू द्यायचा अवकाश की कटू आठवणींची ’टोळधाड’ मेंदूत !! टपलेल्या होत्या त्या बांधावर जश्या….

काहिही आणि कोणिही त्रास देऊ शकतं आज… एरवी ज्यांना ’मुर्ख’ म्हणून सोडून द्यावे असे लोकही काही काळ मनात डॊकावतात…. लोक असे का वागतात??? मी नाही असे वागू शकत ??? लोक फक्त मलाच असे त्रास देतात का?? वगैरे अपेक्षित प्रश्नांचे टप्पे येतात, आणि दु:ख एक एक मजला वर चढतं… कीव करावी वाटणं हा आणि भोज्जा शिवावा लागतो या प्रवासात…. कधी स्वत:ची कीव कधी जगाची… जगाची असेल तर काम सोपे… स्वत:ची असेल तर मदत लगेच नाही मिळत…. मनात एक आवर्त पुर्ण होइपर्यंत सहन करावे लागते ते वाईट वाटणे!!!

साधं मॉलमधे जावं तर आपल्याकडॆ एखादीच वस्तू असते… काउंटरवर मारूतीच्या शेपटायेव्हढी रांग…. कोणालातरी ’प्लीज’ म्हणून काम भागू शकते, नंबर आधि लागू शकतोही…. पण मग तिच्या मनात ’एथिक्स’ नावाचं खूळ डोकं काढतं…. मग रांगेत ताटकळा किंवा वस्तू ठेवून बाहेर पडा…. आपल्याआधिची मंडळी रांगेत उभी आहेत ना आधिपासून, त्यांनाही घाई असू शकते ना हे सत्य आहे…. मग ’सत्याची’ कास वगैरे विचार !!! आपल्याला नाही बूवा जमत काही गोष्टी हे आणि एक दु:ख…..

दु:ख …..दु:ख ….. छोटं दु:ख ….. मोठं दु:ख ….. सगळ्या दु:खाचं मूळ परावलंबन असावे का??? आर्थिक, वैचारिक की मानसिक ???? छोटं दु:ख हे वैयक्तिक…. नी मोठं दु:ख हे सामाजिक … की याउलट हा क्रम…… मोठ्या दु:खात ’सल’ हा एक भलता प्रकार मोडतो…. चॅनलवरच्या ब्रेकिंग न्य़ुज वगैरेंपासून सुरू होणाऱ्या या सलात दादोजींचा रातोरात हटवलेल्या पुतळ्याला स्थान द्यावे, की लोक तर ही घटना विसरून IPL पहाताहेत ला द्यावे ???? मोदीने केलेले घोटाळे आठवावे, आदर्श बिदर्श गाठावे की आपण पार हर्षद मेहेता, तेलगी वगैरे प्रभुतींना आठवावे…. दु:खाला किती कारणं असू शकतात याचे प्रत्यय येत होते तिला…… :(

मुळ मुद्दा असा मग की आपण ’सुखी’ आहोत हे म्हणताना समोर पहातो का फक्त…. डोळ्यांना झापडं लावून….. मागे असते बहूधा ही दु:खाची बाजू….. म्हणजे ती सुखात असताना दु:खातही असते…… किंबहूना सुख आणि दु:खाच्या मधे असते …. जे हवे त्याच्याकडे नजर ठेवायची आणि नको त्याच्याकडे पाठ….. आज ती बहूधा उलट्या दिशेला तोंड करून ’उभी’ आहे ….. शाळेतली कविता आठवतेय तिला आत्ता ‘Never admit your sorrows’ …… वर्षानूवर्षे कटाक्षाने पाळलीये ही ओळ….  कधीतरी आज ती म्हणतेय, “होय मी जरा दु:खी’ आहे गड्या…..

तिला वाटतेय आपण ना मनाला एक घट्ट ड्रेस शिवायचा…. उन वारा वगैरे चटक्यापांसून होरपळ अडवायची या मनाची…. पण मेला या मनाचा आकार सतत बदलतो…. कधी सुईच्या भोकाइतकं क्षुद्र तर कधी समूद्रासारखं विशाल…. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत सतत आकार बदलणाऱ्या चंद्रासारख्या हे ’मना’ घे मग तूला दु:खाची शिक्षा!!!!

…………..

…………………

…………………………

–  अगं हे काय बारा वाजलेत रात्रीचे, तू जागीच अजून ???? आणि चेहेरा का हा असा केलायेस??? … तिचा नवरा विचारतोय!!

– काही नाही झालयं , मला जाम वाईट वाटतय, बोअर होतय… ईन शॉर्ट मी दु:खी आहे….. ती

– “दु:खी” आणि तू … हळू बोल कोणि ऐकेल…. कसलं दु:ख झालय, आणि काय लिहीलयेस येव्हढं तावच्या ताव??? …. थांब मी आलोच मग वाचून दाखव…. नवरा

——–

आलाय तो परत, हातात कॉफीचे मग… (हो कप नाही… ’मग ’…. तिला कपात कॉफी नाही आवडत प्यायला… त्याला काहीही चालतं, त्याच्यामते कंटॆंट महत्त्वाचा :) …. वेलदोडा घातलेला दिसतोय… मस्त सुगंध … वाफाळलेली कॉफी…. )

— हं हे घे… आणि आता वाचून दाखव..…… मला सांगा दु:ख म्हणजे नक्की काय असतं ..       ईति नवरा…

ती आपलं वरं लिहीलेलं सगळं पुराण वाचते एका दमात….

– थांब थांब,  मधे जरा कॉफी पी :) …. नवरा

कॉफीचा पहिला घोट पोटाआधि मनात डोकावतो….. वाफाळलेली कॉफी दुखावलेल्या मनावर हळूवार फुंकर घालतेय….. कॉफीच्या गोडव्याचा अंमल मनावरही चढतो हलकेच….. ती पुढे वाचते….

“वैयक्तिक दु:ख कधितरी मग मागेच पडतात…. समाज ते मागे पाडायला भाग पाडतो…. चार वर्षाचं मुलं घरी आलं तरी आई धास्तावल्यासारखी शहानिशा करते, त्याला न समजणारे प्रश्न विचारते… शाळेत बसमधे तूला कोणी हात तर लावत नाही ना???? कोणी काही खायला दिलं तर खायचं नाही हं… कोणी हात लावला तर रागावयचं हं…. ते मुलं बावरतं मग, ते सांगतं बसमधून उतरताना अंकल हात धरून उतरवतो, मग काय करू ???? … आईकडेही उत्तरं नसतात…. अविश्वास दाखवायला ती शिकवत असते….. एक एक ’धडे’ वाढतात… आणि दु:ख ही…. दु:खाचा डॊंगर होतो नुसता….कडेलोट…... “

:) …. थोडक्यात आत्ता या क्षणी तुझं ’दु:ख’ एकदम टॉपला आहे म्हणजे…. हो की नाही…. टॉपला काय असतं, ’टेरेस’ :) …. तिथून होतो कडेलोट…. नवरा

— हे बघ तूला गंमत वाटतेय ना…… :( ….. ती

(ती अजून दु:खी जरा… पण कॉफी खरच मस्त जमली होती आजची :)… दु:खाचा दोलक कमी ते जास्त वर डोलतोय……किंचित हसू चेहेऱ्यावर , म्हणजे कॉफीची चव चेह्ऱ्यावर उमटावी असे काहीसे…नवऱ्याने तिच्या आवडत्या मगमधे, तिला आवडते तशी कॉफी , तिला गरज होती त्याक्षणी आणली याचा परिणाम मनावर झाला होता हे मान्य तिलाही ….)

— आता तू मला खरच सांग या सगळ्या पानभर दु:खात, दु:खाचं मूळ काय ???? …… नवरा

— मुळ ना मुळ आहे ते माणसाच्या प्रवृत्तीत…. स्वत: सुखी होताना, स्वत:चा स्वार्थ पहाताना इतरांचा विचार न करण्याच्या वृत्तीत दु:खाचं मुळ आहे, असतं ……. ती

— झालं मग… अगं जसं charity begins at home तसं लेट सुख अल्सो बिगिन ऍट अवर होमच :) …. आपण प्रत्येकाने निदान आपल्यापुरतं असा विचार केला की मी माझ्या सुखासाठी इतर कोणाला दु:ख देणार नाही, की जगावरचा बराच ताण कमी होइल नाही का…. :)

– मॅडम अहो आशावादी वागणं हे आपलं बलस्थान आहे त्यावरून ढळू नका…..मान्य, बरच काही नसतं आपल्या हातात, पण जे आहे ते अनेकांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे , आणि मी सुखी आहे म्हणणारेच सुखी असतात आणि होतात हे स्वत:चे डायलॉग्स तू विसरते हे माझं आता दु:ख झालयं  ;) ..खाली त्या डायरीत काय बघतेयेस, समोर बघ माझ्याकडॆ.. .. आणि हो कुठे पोहोचलय तुझं दु:ख, कडेलोटाला ना… करतोच थांब त्याचा कडॆलोट, ढकलतो त्याला सरळ खोल दरीत…. खून करतो आज त्या दु:खाचा……..  .. बोला आता काय म्हणताय .. :) :) ……. नवरा

— एक खून माफ :) …. ती

(मगाच्या तिच्या विचाराप्रमाणे ’समोर’ची बाजू  तर सुखाची होती ……. हा आपल्याला ’समोर’ बघायला सांगतोय, त्याच्याकडे …. :) )

(मनाची कॉफीशी घट्ट मैत्री झालीच होती आता…. मन हळूच कॉफीच्या कानात कुजबूजलं … तो जो समोर हसतोय ना तो ’सिरियल किलर’ आहे बरं, अश्या अनेक दु:खांचे त्याने खून केलेत !!!!! :) )